डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कुमारजींना 1986 मध्ये त्या काळातील गाण्यांविषयी मत विचारलं. तर ते म्हणाले, ‘गाण्यातील पूर्वीसारख्या भावना आजच्या गाण्यात नाहीत. आजचं गाणं गुळगुळीत आहे, गोड-गोड गातात. पण वरवरचं. बंदिशीचं आणि स्वरांचं प्रेम नाही.’ तानेविषयी ते म्हणाले, ‘स्वतःचा स्वर जोपर्यंत सच्चा लागत नाही तोपर्यंत तान घेणं हे फार अवघड असतं. आवाजावर प्रभुत्व आल्यानंतरच त्यांचा उपयोग चांगला होतो. तान में सब संगीत बैठा हुआ है, असं अनेकांचं मत आहे. पण ते मूर्खपणाचं आहे. नुसती गडबड, इकडून तिकडे पळणं म्हणजे तान नाही. स्वर ओरबाडल्याने तान निर्माण होत नाही. तान ऐकून आनंद निर्माण झाला पाहिजे. जर चांगली तान घेता आली, तर ती तान ऐकून रडणारेही आहेत.’ श्रोत्यांविषयी त्यांचं मत जाणून घेऊ या. त्यांचं म्हणणं होतं की, मोठ्या मैफिली ह्या खऱ्या मैफिली नाहीतच. ते सहसा मित्रांसोबतच गायचे.

पं.कुमार गंधर्व यांना क्षयाची बाधा झाल्यामुळे 1948 मध्ये ते मुंबईहून देवास येथे वास्तव्यास आले. त्यांच्या गायनास डॉक्टरांनी बंदी घातली होती. त्यांची तब्येत पूर्ववत्‌ झाल्यावर 1954 मध्ये त्यांचं गायन पुन्हा सुरू झालं. वयाची  24 ते 30 ही 6 वर्षं ते अंथरुणावर खिळून होते.  पुढे एका मुलखातीत त्यांना विचारलं, ‘‘ऐन उमेदीतील सहा वर्षं वाया गेली नसती, तर आपलं गायन आणखीच बहरलं असतं, असं आपल्या मनात येतं का?’’ कुमारजी तत्काळ उत्तरले, ‘‘माझं गायन बंद असण्याचा मला फायदाच झाला. या काळात माळव्याचं लोकसंगीत आणि नाथपंथीयांचं संगीत माझ्या कानांवर पडत गेलं. मला त्यात अधिकाधिक खोलवर जाता आलं. भारतीय संगीताचा उगम हा लोकसंगीतातून झाला आहे, हे मला समजत गेलं. नाथपंथीयांच्या निर्गुण विचारांचं आकलन करता आलं.’’ पुढे ते म्हणाले, ‘‘मी आजारीच पडलो नसतो, तर गातच राहिलो असतो. भौतिकवादी जगातच रमत गेलो असतो. ह्या आजारपणामुळे मला संगीताविषयी मूलभूत विचार करण्याची संधी मिळाली आणि अमूल्य असं ऐश्वर्य गवसत गेलं. असा ऐवज गात राहण्यानं मिळाला नसता.’’

कुमारजींनी आजारपणानंतर ऋतुदर्शन घडवत वर्षा, वसंत आणि हेमंत या तिन्ही ऋतूंची अनुभूती आपल्याला दिली. त्या काळातच विदुषी दुर्गाबाई भागवत अतिशय दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळून होत्या. त्या काळात त्यांनी निसर्गाचं अत्यंत सूक्ष्म निरीक्षण केलं. त्यातून 1956 मध्ये ‘ऋतुचक्र’ हे अभिजात ललित लेख आपल्याला दिले.

कुमारजींच्या गायननिर्मितीमधील ऋतुसंगीत हे एक तेजस्वी दालन आहे. दुर्गाबाई ऋतूविषयी म्हणतात, ‘ऋतू म्हणजे फिरता काळ!’ या ऋतूंमधील वैविध्याची दृक्‌-श्राव्य प्रचिती आपल्याला कुमारजींनी दिली. फाल्गुन व चैत्र (मार्च व एप्रिल) या काळातील वसंताला ऋतुराज ही एक महती लाभली आहे. दुर्गाबाई फाल्गुन मासाला ‘रूपधर फाल्गुन’ म्हणतात आणि चैत्राला ‘वसंतहृदयी’ म्हणतात. कुमारजी म्हणतात, ‘हे राग, ह्या बंदिशी आपल्याला काही रंग, रूप दाखवत आहेत. सृष्टीचे काही नियम, स्वरांचे काही नियम, फळा-फुलांचं सांगणं, पशू-पक्ष्यांचं बोलणं, अंतःकरणाचे काही भाव, सुख-दुःखाच्या ताण्याबाण्यांतून जन्मलेले सण आणि यातला आनंद हेच तर मी गात आहे.’

वसंत ऋतूची सुरुवात दाखवताना ते आपल्याला अरुणोदय दाखवतात. रात्रीचा प्रहर संपतोय, संधिकाल दूर सारून क्षितिजावर उषःप्रभा दिसतेय, अंधार दूर होऊन तांबडं फुटण्याच्या आधी आसमंत प्रसन्न होऊ लागतो. शांत अवकाशात पक्ष्यांची किलबिल सुरू होते. याची स्वरानुभूती म्हणजे कुमारजींचा रतिभैरव!

अरुण आ के किरण रंग फेक्यो री

भूमरी ये हँस हँस उछायो री ॥

भावरा गान राग बन गुंजे हो

राज दरबार कमल दल जाग्यो री ॥

बावराग्यो सब अलिमन फुल्यो

बोलन लगी कोयलिया री ॥

ही बंदिश ऐकताना असं वाटतं की, कुमारजी एका मोठ्या कॅनव्हासवर विविध रंगांनी चित्र काढत आहेत.

ह्या ऋतुराज वसंताचं स्वागत आदिवासी आणि सामान्य लोक अतिशय मनोभावे करतात. कुमारजी लोकसंगीताबद्दल म्हणतात, ‘भाषा जेवढी शहरी होत जाते तेवढी रुक्ष होत जाते. बोलीमध्ये जो आपलेपणा आणि गोडी आहे, ती शहरी भाषेत नाही. लोकसंगीत हे त्या जीवनाचं सहजस्फूर्त संगीत आहे. त्या महिला कोणतीही कामे करताना, प्रवासाला जाताना गात असतात. ते गाणं स्वत:साठी आहे. लोकसंगीतामधील काही धून ह्या अशा आलेल्या आहेत की, त्यांच्यासमोर ज्ञानी माणूसही चक्रावून जातो. लोकसंगीताच्या निर्मात्याचं नावसुद्धा कोणाला माहिती नसतं, तरीही ते आपल्यापर्यंत येतं. शास्त्रीय संगीताच्या गुरुस्थानी लोकसंगीत आहे.’ त्या लोकसंगीतातील हे वसंत ऋतूचं स्वागत!

आयल हो रितुराजा । रसराजा

उमंग भरे, खेलन फाग!

कंद कुसुम पेहेरे, फूलन के हरुवा ॥

गावत नाचत सब सखीया मिल ।

हँस हँस कर मन रंजन ॥

डारे कृष्ण गल बैया ।

डारे श्याम गल बैया ॥

त्यांचं वाचन दांडगं होतं. विंदा करंदीकर, दुर्गा भागवत, इरावतीबाई कर्वे यांच्या लेखनातील संदर्भ संभाषणात येत. त्यांच्या आप्तवर्तुळात देशभरातील विविध भाषिक साहित्यिक, चित्रकार, नाटककार, अभिनेते, अभिकल्पक, शिल्पकार, पत्रकार हे होते. कुठेही नवीन काही झालं की, ते कुमारजींना सांगत व दाखवत. 

कुमारजींच्या जीवनात कवी, साहित्यिक यांना व त्यांच्या साहित्यप्रतिभेला महत्त्वपूर्ण स्थान होते. ते म्हणत, ‘आपण रोज जगतच असतो. पण ते जगणं कसं आहे आणि कसं असावं याचं भान कवी, साहित्यिक आणि कलावंत आपल्याला देत असतात.’ कुमारजी नेहमी सांगत, ‘गायकांना जीवनामध्ये कलेबद्दल, साहित्याबद्दल कुतूहल पाहिजे. साहित्यातील अनेकविध नवे भाग त्यांना कळले पाहिजेत. जसे- वास्तुकलेविषयी ज्ञान हवे. इतर क्षेत्रांमधला आनंद घेता आला तर त्याचं सर्वात छान प्रतिबिंब त्यांच्या संगीतात पडेल. मग तो जास्त आनंद देऊ शकेल. लय आणि स्वर मध्ये संगीत रुतलेलं आहे असं म्हणायचं आणि आपण काहीच करायचं नाही, हे मला नाही पटत. कारण जीवनाला सोडून कुठलीही कला वेगळी असत नाही.  कला फक्त चांगली आणि जीवन वाईट आहे, असा वाद करण्यासाठी करावा. पण जीवन फार सुंदर आहे. कला सुंदर आहे, साहित्य चांगलं आहे, जीवनाला समृद्ध करण्यासाठीच तर कलांचा उपयोग आहे. माझ्या सौभाग्याने सर्व क्षेत्रांमधले लोक माझ्या गाण्यावर प्रेम करणारे सामाईक झालेत. त्यांच्यामुळे माझ्यामध्ये वेगळे विचार करण्याची क्षमता आली. परंतु नुसतेच साहित्याचे नाही, तर निसर्गाचेही वेड हवे. मला जे वेगवेगळ्या क्षेत्रांतले लोक भेटले, त्यांच्यामुळे मी अधिक समृद्ध झालो आहे. हे सगळं निसर्गाचं नियोजन आहे की काय, असंच मी समजत आलेलो आहे. शाळा-कॉलेजात न जाताही मला हे ज्ञान माझ्या मित्रांच्या माध्यमातून, मी केलेल्या वाचनातून मिळाले आहे...’ शोधून व हेरून मध मिळवण्याच्या भ्रमरवृत्तीला ‘मधुकर’ आणि त्यामुळे भुंग्याला ‘विराट ज्ञानी’ असं म्हटलंय. ही वृत्ती कुमारजींनी मनोभावे जोपासली होती. त्यांच्याकडे 2000 पुस्तकांचा संग्रह  होता.

त्यांनी निसर्गाशी तादात्म्य पावून साधना केली आहे. दिवसाचे आठ प्रहर आणि वर्षाचे सहा ऋतू याचं अतिशय सूक्ष्म निरीक्षण त्यांनी केलेलं आहे. ते त्यांनी अनेक बंदिशींतून व्यक्त केलेलं आहे. वसंत ऋतूमध्ये झाडाला फुटणारी पालवी, तिच्या अनेक तऱ्हा, फुलांचे वेगवेगळे रंग आहेत. या सगळ्याची प्रचिती कुमारजी श्री कल्याण रागात गायलेल्या ‘देखो रे ऋत फूलन लगी’ ह्या बंदिशीतून व्यक्त करतात.

देखो रे ऋत फूलन लगी ।

रंग रंग छाये रे मेरो मन भाये ॥

अरे ये दुजो रे रंग मिल आये ।

संजा केरी लाली रे मेरो मन भाये ॥

कुमारजी आपल्यासमोर बंदिश अशा पद्धतीने साजरी करत की, सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकायचे. पण तरीही त्याचं श्रेय त्यांनी स्वतःकडे नाही घेतलं. ते म्हणतात, ‘वसंत ऋतूचे नखरे आम्ही काय सांगायचे? आम्हाला वाटतंय की, आम्ही सांगतोय. पण हे ग्वाल्हेर घराण्याचे फार पूर्वीचे नखरे आहेत. ते त्यांनी तसे व्यक्त केलेत. मी ते फक्त त्या पद्धतीने व्यक्त करतो.’ कुमारजी असं जरी म्हणत असतील, तरी त्या बंदिशीला सादर करताना येणारी परिपूर्णता, समग्रता कोणालाही भावते. ही बंदिश राग बागेश्रीमध्ये कुमारजींनी गायली आहे

ऋतू बसंत तुम अपने उमंग सो ।

पी ढूँढन मैं निकसी घर सों ॥

आओ जी लाला घर बिठलाऊँ ।

फाग बंधाओ पिरी सरसों ॥

‘वसंत ऋतूत वनराई बहरते. पण वनराईचा बहर आपल्याला दिसतो का? आपण वसंत ऋतू नेमका कसा बघतो? मुळामध्ये आपण काही नीट बघतो का? आपण आकाश, आकाशातले रंग, निसर्गातील पालवी यांना पाहतो तेव्हा आपल्याला काही प्रश्न पडतात का?’ असे प्रश्न दुर्गाबाई भागवत विचारतात, तसंच कुमारजीही विचारतात. वनराई बहरल्यावर तिचं वर्णन कुमारजी करतात.

बनराई बौराय लाग्यो ।

फुलामी हँसरियो है ॥

साच्यो बौराय है, पती झर लाग्यो ।

अजब गजब इको करम है ॥

दुर्गाबाई फाल्गुन मासाविषयी म्हणतात, ‘चहूकडे नाजूक नादाच्या लाटा वाहत आहेत, झाडांत व आकाशांत पक्ष्यांचे प्रणयाने आर्द्र व मधुर झालेले आवाज एकमेकांत मिसळत आहेत. साळुंख्यांच्या आवाजातला किनरेपणा कमी होऊन त्यांच्या गळ्यातला गोडवा जणू काही शिरश्याच्या पालवीला उमलवतो आणि भुलायला लावतो. पोपटांच्या कर्कश आरोळ्यातून काही तरी जाणते शब्द कारुण्य व आनंद यांनी काठोकाठ भरल्यासारखे बाहेर पडत आहेत. सदोदित भांडल्याचा कलकलाट करणाऱ्या चिमण्यांचा आवाजही आता बदलला आहे. प्रणयोन्मादाच्या ऐन क्षणीही कलापूर्ण संयम बाळगणारे हे पक्षी आपल्या गंभीर शब्दांनी आपल्याला असं सांगतायत की, आयुष्यातील आनंद मनमुराद चाखायचा असेल तर कोणत्याही क्षणी मनाचा ताबा जाऊ देऊ नका.’ कुमारजी ह्या फाल्गुन मासाला  बंदिशीतून अधिक फुलवतात.

आयो रंग फाग सखी सब खेले ।

मेरो मन रसिया आ रे मंदर ॥

सब रस घोले धूम मचायो ।

तुम बिन कैसे खेलू लंगर ॥

कुमारजी निसर्गात रममाण होत होते. त्यामुळे त्यांना प्रत्येक ऋतूचा आनंद घेता येत होता. कुमारजी म्हणायचे,  ‘आपण पावसात छत्री न घेता भिजलं पाहिजे, ऊनपण सहन केलं पाहिजे, पंख्याशिवाय राहता आलं पाहिजे. या सर्व गोष्टी करायला आपल्याला जमलं पाहिजे, तर आपल्याला सर्व ऋतू कळतात.’ ते पाऊस आल्यानंतर पावसाचे स्वागत मनापासून करायचे. त्यांच्या बंदिशींमध्ये दादूर (बेडूक), मोर, पपीहा यांचा उल्लेख असायचा. वसंत ऋतू आल्यानंतर कोकिळ गायली नाही तर कुमारजी म्हणायचे, ‘अजूनही हिराबाई कशा गायल्या नाहीत?’ होळीमध्ये ते स्वतः पळसाच्या फुलापासून रंग तयार करून, गुलाल वगैरे रंगांनी रंग खेळत होते. त्यामुळे त्यांना वसंत ऋतू फुलल्यानंतर मनापासून आनंद होत होता. पुढील बंदिशीत वसंत ऋतूत फुललेल्या पळसाचे वर्णन करताना प्रेयसी किंवा पत्नी कशी तिच्या प्रियकराच्या किंवा पतीच्या आठवणीत रममाण आहे. ते वर्णन करत आहेत. कुमारजींच्या स्वरांमधून आपल्याला कधी शिल्प काढल्याचा भास होतो, कधी नर्तन केल्याचा भास होतो. त्यांच्या स्वरांची हीच किमया आहे.

टेसुल बन फुले रंग छाये ।

भँवर रस लेत फिरत मदभरे ॥

अरे रस लोभिया हमें ना तरसावो ।

पिया जो परदेसा जरत मन मेरो ॥

वसंत ऋतूच्या काळातलं रंगरूप कसं असतं, हे त्यांच्या राग बसंतमधील या बंदिशीतून आपल्याला ऐकायला मिळतं.      

रंग केसरिया सिर पागा बंधले ।

बनलेरीया रंग लै खिल आयो रे ॥

पेरी है तो रे सैंया ।

रंग कुसुम्भी चिरो, घघरो चुनरीरे ॥

अमेरिकेत राशेल कार्सन ह्या जीवशास्त्रज्ञ पर्यावरणाची गीता झालेलं- ‘सायलेंट स्प्रिंग’ 1961 मध्ये लिहीत होत्या. त्यातील पहिल्याच परिच्छेदात त्यांनी वसंत ऋतूचं वर्णन केलंय- ‘वसंत ऋतू फुलला, फुलं फुलून आली, सगळीकडे वसंत ऋतूची सगळी लक्षणं दिसत होती; पण पक्ष्यांचं कूजन ऐकू येत नव्हतं. पक्षी पटापट मरून पडत होते. तो मूक वसंत होता.’ त्यांनी त्यामागील कारणांचा सखोल शोध घेतला. ते पक्षी कीटकनाशकामुळे मरतायत, हे त्यांच्या लक्षात आलं.

शास्त्रज्ञ आणि कलावंत एका वेळेला एकसारखाच विचार करतात. देवासला 1961 मध्ये वसंत ऋतू आला, परंतु तो दर वेळच्या वसंत ऋतूसारखा नव्हता. सर्व ऋतूंकडे सूक्ष्म लक्ष असणाऱ्या कुमारजींनी  त्या विचित्र  वसंत ऋतूचं बहार रागामधील ही बंदिशीतून वर्णन केलंय.  

ऐसो कैसो आयो रीता रे ।

अंबुवा पे मोर ना आयो ॥

कऱ्यो ना गुंजारे भंवरा रे ।

पीर बढयो रे कोयल की ।

रंग ना खिल्यो हे फुलवारे ॥

चैत्राच्या आगमनाविषयी दुर्गाबाई लिहितात, ‘पुष्प मुद्रेचं लेणं ल्यालेले, बेसुमार रंगांनी नटलेले, प्रखर उन्हानी अंग भाजणारे आणि त्याच वेळी अत्यंत शीतल, सुखकारक दृष्टीला भ्रांत करणारे, प्राणिमात्रांतल्या निर्मितीच्या उन्मादक वृत्तींना चेतवणारे असे हे महिने. ऋतुराज वसंताचे स्पंदन म्हणजे चैत्र. चैत्रातल्या पालवीचे रूप कोठेही अतिशय मनोहर. पिंपळाची झाडे पहा कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या पताका नाचवीत उभी आहेत. शेजारी कडुलिंबाचे झाड निळसर फुलांच्या तुऱ्यांनी मढून गेलेले आहे. त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी मनोरम वाटतो. नव्या पानांचा साज चढवून या जांभळीने शुभ्र फुलांचा नाजूक मोहोर आणि हिरव्या लांबोड्या फळांचे घोस अंगावर धारण केले आहेत.’

याच वसंत ऋतूतील चित्तवृत्तींविषयी कुमारजी म्हणतात,

चित चंचल मोरा होय जायो री ।

फूल खिले कचनार चमेली ॥

भौरा गुंजार करे रस चाख्यो ।

देख मोरा मन चैन न आयो री ॥

जपानमध्ये गेल्या काही वर्षांपासून उपचाराची एक नवी पद्धत सुरू झाली आहे. ‘वनांमध्ये मग्न व्हा, झाडांना स्पर्श करा, झाडांमध्ये राहा, झाडांना निरखा... त्यामुळे तुमची तब्येत कदाचित सुधारू शकेल’ असा हा वृक्षोपचार आहे. जे. कृष्णमूर्ती यांनी असा ‘निसर्गोपचार’ सातत्याने वर्णन केला आहे. ते दृष्टांत देताना ‘निसर्गाकडे सजगतेने पाहा’ असं कायम सांगायचे. तेच कुमार गंधर्वही गायनातून सांगत आहेत. आंब्याचा मोहोर आपण सगळ्यांनी पाहिला आहे. तो आपल्याला खूप मनोहर वाटतो. पण कडुलिंबाच्या मोहोराकडे कधी आपलं बारकाईने लक्ष जात नाही. अशा चैत्रातल्या बहरलेल्या कडुलिंबाविषयी कुमारजी राग चैतीभूपमध्ये गाऊन सांगतात,

निमोरीका बौरा है रे ।

गमकीला है मन बौरा रे ॥

बौरा चैता बौराये रे ।

ये उतपतियापे मन बौरा रे ॥

सूत्ररूपाने एका वाक्यात ज्ञानाचं सार सांगतात ते ज्ञानी!  कुमारजींना विचारलं, ‘भारतीय संगीत म्हणजे काय?’ तर ते म्हणाले, ‘बंधनातलं स्वातंत्र्य.’ बंदिश म्हणजे काय, असं विचारलं तर ते म्हणतात, ‘बंधनयुक्त स्वर म्हणजे बंदिश.’ बंदिश ही बंधनयुक्त असली तरी ती स्वैर असली पाहिजे. अर्थपूर्ण अक्षर, ताल व रागाचा आकार हे तीन घटक एकत्र घेऊन जन्मते, ती बंदिश. 

कुमार गंधर्व यांच्या बंदिशी ‘अनुपरागविलास’मधून वाचायला मिळतात. ह्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत कुमारजी म्हणतात, ‘भानुमती को, जिसने मेरे हर विचार, प्रत्येक कृती को परखा और अन्य किसीके पास जाकर परख करवाने की आवश्यकता मुझे कभीभी प्रतित नहीं होने दी. जिसने मेरे विचारों को अपना बना लिया तथा स्वयं के विचारों से मुझमें साहस निर्माण कर मेरे विचारों को आकारबद्ध किया. जिसका स्मरण किये बिना मैं कभीभी कुछ नहीं कर सकता.’ कुमारजी क्षयरोगाने आजारी होते, तेव्हा ह्या आजारपणाच्या सहा वर्षांच्या कालावधीत भानुमतीबाईंनी कुमारजींची मनोभावे सेवा-शुश्रूषा केली आणि त्यांना आजारपणातून यशस्वीरीत्या बरे केले. कुमारजींच्या आयुष्यात भानुमतीबाईंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भानुमतीबाई 1961 मध्ये वारल्या. त्यानंतर हे पुस्तक प्रकाशित झाले. भानुमतीबाई वारल्यानंतर त्यांच्या अस्थींचं विसर्जन क्षिप्रा नदीमध्ये करण्यात आलं. ती रक्षा जेव्हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहायला लागली, तेव्हा कुमारजींची नजर वर गेली. आंब्याला आलेला मोहोर त्यांच्या दृष्टीस पडला. भानुमतीताईंना आंबे खूप आवडत होते, त्या वेळेला त्यांच्या भावना कुमारजींनी राग बागेश्रीमध्ये व्यक्त केल्या. ह्या बंदिशीमध्ये कुमारजींनी ज्या काही ताना आणि हरकती घेतल्या आहेत, त्या अवर्णनीयच.

फेर आई मोरा अंबुवा पे ।

अजब गोलाई बनाई रंगायो ॥

इत तो तरू पाती झरन सब लागे ।

देखन मनरंग गुसैला कैसु डायो ॥

दुर्गाबाई बहरलेल्या झाडांविषयी म्हणतात, ‘रूप, रस, गंधमय अशा चैत्राची शोभा झाडावर बांधल्या जाणाऱ्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वास येते. ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची तर काही वाटोळी चेंडूसारखी, तर काही पसरट गोल अशी ही घरटी आणि फुललेली फुले वसंताच्या चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे वाटतात.’ या बहरलेल्या फुलांविषयी कुमारजी म्हणतात,

फूल बेदाग ये बन ।

बन घन खिरैं सुंदर ॥

तरू पर लागे सोहे ।

बेलरीया खिरैं फिरे सुंदर ॥

कुमारजींच्या आवाजाविषयी विख्यात संगीतकार अरविंद गजेंद्रगडकर म्हणतात, ‘कुमारांच्या आवाजात एक अपूर्व गुणवत्ता आहे. त्यात विलक्षण चपळाई आहे. तो हवा तसा कोणत्याही सप्तकात मुरडतो. कोणतीही गरुडासारखी झेप घेऊ शकतो. तो आरोही, अवरोही कसाही जातो. पण अवरोही खटक्याने तर विलक्षणच. त्यांचे गाणे मुळात आघातयुक्त आहे, पण ते ख्यालामध्ये. भजनात, पदांत आणि ठुमऱ्यांत ते अगदी मोरपिसासारखे मुलायम होऊन जातात. निहार मृदू खरवसासारखा असा आवाज आणि अशी किती तरी मोहक रूपे आपल्याला जाणवतात. कधी कधी ते कमालीचा बारीक स्वर काढतात, तर कधी जोरदार गमकाची आरास मांडतात. केवळ आवाज व स्वर लावण्याच्या इतक्या विविध तऱ्हा आणि परिमाणे क्वचितच ऐकायला मिळतात.’ त्याचंच उदाहरण म्हणजे ही त्यांची राग गौरी बसंतमधील बंदिश.             

आज पेरीले गोरी रंग बसंतीचीरा ।

आय रितुराज, कोयलरीया कूके ॥

रंगादे रंगादे अरे रंगरेजरा ।

आय रितुराज, कोयलरीया कूके ॥

कुमारजींना 1986 मध्ये त्या काळातील गाण्यांविषयी मत विचारलं. तर ते म्हणाले, ‘गाण्यातील पूर्वीसारख्या भावना आजच्या गाण्यात नाहीत. आजचं गाणं गुळगुळीत आहे, गोड-गोड गातात. पण वरवरचं. बंदिशीचं आणि स्वरांचं प्रेम नाही.’ तानेविषयी ते म्हणाले, ‘स्वतःचा स्वर जोपर्यंत सच्चा लागत नाही तोपर्यंत तान घेणं हे फार अवघड असतं. आवाजावर प्रभुत्व आल्यानंतरच त्यांचा उपयोग चांगला होतो. तान में सब संगीत बैठा हुआ है, असं अनेकांचं मत आहे. पण ते मूर्खपणाचं आहे. नुसती गडबड, इकडून तिकडे पळणं म्हणजे तान नाही. स्वर ओरबाडल्याने तान निर्माण होत नाही. तान ऐकून आनंद निर्माण झाला पाहिजे. जर चांगली तान घेता आली, तर ती तान ऐकून रडणारेही आहेत.’ श्रोत्यांविषयी त्यांचं मत जाणून घेऊ या. त्यांचं म्हणणं होतं की, मोठ्या मैफिली ह्या खऱ्या मैफिली नाहीतच. ते सहसा मित्रांसोबतच गायचे. 50-60 लोकांसमोरच गायचे. जेव्हा हजार-हजार लोकांच्या मैफिली व्हायला लागल्या तेव्हा ते म्हणाले, ‘ह्या सभा मला काही रुचत नाहीत. मी दुर्बीण लावून श्रोत्यांकडे बघायचं का? मोठ्या मैफिलीत संवाद नीट होतच नाहीत.’ एकदा शिवाजी मंदिरमध्ये कुमारजींचा तुलसीदास यांच्या भजनाचा कार्यक्रम होता आणि श्रोते फक्त 30 होते. तरी कुमारजी अडीच तास मनःपूर्वक गायले. गायनाचा कार्यक्रम झाल्यावर त्यांना विचारलं की, कमी श्रोत्यांमुळे तुमच्या गायनाचा रसभंग झाला नाही का? तर ते म्हणाले की, मी आत बघून गातो; बाहेर बघून नाही.

रसिया को नर बनावो री, रसिया को ।

गाल गुलाब भ्रिगन बिच अंजन बेंदी ॥

भाल लगावो री रसिया को ।

कट लेहेंगा उरमाय कंचुकी ॥

चंदर सीस ओढवोरी रसिया को ।

मानत नही कोन फाग मे प्रभूका ॥

मन मान्योसो की जोरी रसिया को ।

पुरुषोत्तम प्रभूकी छब निरखे ।

जसुमती पास नचावो री रसियाको ॥

एकंदरीत आजारपणातील सर्व मर्यादा असूनही कुमारजींनी आजारपणातील काळ विलक्षण प्रतिभेनं उपयोगात आणला. त्या काळातील संगीतविषयक  मूलभूत चिंतनातून ‘धून उगम राग’, ‘निर्गुणी भजन’, ‘ऋतू संगीत’, ‘माळवा की लोकधुने’ या निर्मितीची बीजे पडली, ज्यांचा पुढे ते विस्तार करीत गेले. त्यांनी परंपरेच्या खोल तळाशी जाऊन त्या परंपरांना आधुनिक केलं. गायन समकालीन केलं. म्हणूनच त्यांना ‘विसाव्या शतकातील संगीतसूर्य’ ‘युग संजीवक द्रष्टा कलाकार’, ‘क्रांतिकारक’, ‘संगीतातील कबीर’ अशा अनेक उपाध्या बहाल होत गेल्या.

गायन ही एक अमूर्त कला आहे. प्रत्येक जण त्याला आपापल्या वकुबानुसार मूर्त रूप देत असतो, तर रसिक त्यांच्या क्षमतेनुसार खोलवर जाऊन आनंद घेतात. कबीराच्या भजनात म्हटलेलं आहे, रूप सरूप अरूप दिखाके हम ही हमसे खेले युगन युगन हम योगी. तसं संगीतातलं रूप, सरूप, अरूप एकत्रितपणे कुमारजींच्या संगीतातून दिसतं. त्यांच्या गायनातून आपली शून्य ते अनंत अशी यात्रा घडून येते. बाह्य जग आणि अंतर्मन उमजून येतं. 

(दि.8 एप्रिल हा शास्त्रीय संगीताला व लोकसंगीताला नवा आयाम देणारे पं. कुमार गंधर्व यांचा जन्मदिन! त्यानिमित्ताने लातूर येथे अतुल देऊळगावकर यांनी मागील वर्षी दृक्‌-श्राव्य चित्रफिती व निरूपण यातून ‘पं.कुमार गंधर्व आणि ऋतू वसंत’ हे दर्शन घडवले होते. त्याचे शब्दांकन केले आहे रूपाली महेश यांनी.)

Tags: लोकसंगीत कला दुर्गा भागवत बंदिश भारतीय शास्त्रीय संगीत कुमार गंधर्व weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अतुल देऊळगावकर,  लातूर
atul.deulgaonkar@gmail.com

मुक्त पत्रकार अशी ओळख असलेल्या अतुल देऊळगावकर यांनी ग्रामीण विकास व पर्यावरण या विषयांवर प्रामुख्याने लेखन केले असून त्यातून आलेली अर्धा डझन पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत.


Comments

  1. Chaitrali- 07 Apr 2021

    अप्रतीम लेख.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके