डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)


निसर्ग व मानव हे अद्वैती सूत्र केंद्रस्थानी आणून त्याचं तत्त्वज्ञान व मानसशास्त्र निर्माण होणं आवश्यक आहे. अशी मांडणी जगातील तत्त्वज्ञ व मानसशास्त्रज्ञ करत आहेत. सर्ग म्हणजे निर्माण होत राहणं. ‘निसर्ग’ म्हणजे ‘जे सतत व न थांबता निर्माण होत असतं.’ सहजासहजी लक्षात न येणारा सूक्ष्म बदल म्हणजे निर्मिती! निसर्गात सतत परिवर्तन होत असते. सांख्य दर्शनात, ‘‘ ‘प्रकृति’ म्हणजे निसर्ग’ सतत उत्क्रांत होणारी घटना आहे,’’ अशी मांडणी केली आहे. ‘वृक्षवल्लींना सोयरे’ मानणारी वृत्ती आपल्याला समजलेली असल्याचा आभास होतो. ते केवळ तोंडी लावण्यापुरतं आहे, हे आपण जाणून असतोच. ह्या दांभिकपणापलीकडं गेलो तरच आपल्या मराठी जगताला विशाल व समग्र दृष्टी पुन्हा एकदा लाभून साहित्य व कलानिर्मितीमध्ये वसंत बहरू शकेल.
 

तहानेनं व्याकूळ झालेल्या गुराला पाणी पाजावं, असं आपल्या मनात येईल? तुम्ही मोठ्या कष्टानं कावडीमध्ये गंगेचं पाणी भरून आणलं आहे. अचानक पाण्यासाठी तडफडणारं गाढव दिसलं तर त्या गाढवाला पाणी पाजावं, असा विचार चुकूनतरी आपल्या मनाला स्पर्शून जाईल? समोरचं जनावर भुकेनं कासावीस झालं आहे, हे आपल्या ध्यानात येईल? आणि आलं, तरी त्यानं आपल्या शिदोरीतलीच भाकरी खाल्ली तर आपली प्रतिक्रिया कशी असेल? आसपासचा दगड वा चप्पल फेकून कुत्र्याला हाकलून देऊ की त्या श्वानाच्या भुकेनं कळवळून त्याला तुपाची वाटी देऊ? पापभीरू व ईश्वरभक्त परायणसुद्धा अशी भूतदया दाखवणं अशक्यप्राय आहे. एकनाथ व नामदेव यांच्या मनात असं का आलं असेल? 

1990 मध्ये व्हॉयेजर उपग्रहानं सौरमालेचं छायाचित्र धाडलं. 3.6 अब्ज मैलांवरून दिसणाऱ्या पृथ्वीला पाहून प्रो.कार्ल सगान म्हणाले, ‘‘अंतराळामधील सुंदरसा निळा ठिपका!’’ (जी संज्ञा पुढं सर्वमुखी झाली.) तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांना ‘निळे हे व्योम, निळे हे सप्रेम, निळेपण सम आकारले’, असा साक्षात्कार कसा झाला असेल? सतराव्या शतकात आसपासची संकुचित वृत्ती अनुभवताना तुकोबांना ‘बसोनी थिल्लरी, बेडूक सागरा धिक्कारी’ हा दृष्टान्त कसा झाला असेल? गौतम बुद्धाच्या जातककथा, इसाप व विष्णुदास शर्मा (पंचतंत्र)यांच्या बोधकथा जगभर पसरल्या. ह्या सर्व रचनाकारांना व द्रष्ट्यांना अशी वेगळी दृष्टी का व कशी लाभली असेल? तर ह्या ‘कळवळ्याच्या जाती’ प्राणी व वनस्पतींशी इतकी तद्रूप होती की, त्यांना जीवसृष्टीतील सर्व जीवांचा जीव समजत-उमजत असे आणि त्यांसाठी त्यांचं काळीज तुटत असे. पृथ्वी ही यजमान असून आपण काही काळासाठीचे पाहुणे आहोत, आपण पृथ्वीचे स्वामी नाही आहोत, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळं त्या विचारांतून त्यांच्याकडून तशी साहित्यनिर्मिती नैसर्गिकरीत्या झाली. त्यांचा निसर्गाशी अतूट बंध होता. त्यांचं जीवनच निसर्गमय होतं. ते जीवनच त्यांच्या काव्यातून अभिव्यक्त झालं. वनस्पती, पक्षी-प्राणी, ओढे-नाले, नद्या-समुद्र, टेकड्या, पर्वत ह्या निसर्गनिर्मित सर्व घटकांचं सूक्ष्म निरीक्षण करून त्यांतून ज्ञानाचं मर्म आपल्या हाती ठेवण्याचं कार्य संतकाव्यानं केलं आहे. आठशे वर्षांपूर्वीचं हे साहित्य अभंग आहे, आजही समकालीन आहे, ते त्यातील भावामुळंच. (आपला त्याचा काही संबंध आहे का? एवढाच प्रश्न आहे.)

माणूस हजारो वर्षं निसर्गाच्या सान्निध्यात व निसर्गाशी साहचर्यानं राहत होता, त्या काळात त्याला निसर्गाचा नाश करता आला असता; परंतु त्या काळातील त्याची विचारदृष्टीही समग्र होती. निसर्गाविषयी खोलवर आंतरिक आस्था होती. आता मात्र आपल्याला निसर्गाच्या विनाशाविषयी यत्किंचितही खंत वाटत नाही. सध्या दर मिनिटाला जगातील किमान 2,400 वृक्ष तर दरसाल 1.5 ते 2 कोटी हेक्टरवरील वृक्ष तोडले जातात. ‘पृथ्वीतलावरून अब्जावधी हेक्टर अरण्य नाहीसं झालं आहे. हा वाढत जाणारा वेग पाहता 2100 मध्ये जगात एकही सदाहरित अरण्य शिल्लक राहणार नाही,’ असं अरण्यतज्ज्ञांचं भाकीत आहे. मानवी अविवेकाचं विच्छेदन करताना  पर्यावरणीय अध्यापन व राज्यशास्त्र ह्या विषयाचे अधिकारी प्रो.डेव्हिड ऑर म्हणतात, ‘‘माणूस आणि निसर्ग यांच्या नात्यातील हा बिघाड आपल्या अंत:करणात खोलवर रुजला आहे.’’ ह्या बिघाडाचं बीज सोळाव्या शतकात पडलं. (ज्या काळी आपल्याकडं निसर्गमग्न संतकाव्याचा बहर चालू होता) फ्रान्सिस बेकन (1561-1626) यांनी, ‘निसर्गाला अंकित करणं हा मानवाला मिळालेला अधिकारच आहे.  निसगानं मानवाची सेवा केली पाहिजे.’ अशी मांडणी करून निसर्गविनाशाची तात्त्विक पायाभरणी केली. रेने देकार्त (1596-1650) यांनी, ‘‘बुद्धी, अनुभव व भावना नसलेले प्राणी म्हणजे साधी यंत्रं (घड्याळासारखी) होत,’’ अशी त्यावर इमारत उभी केली. त्यानंतर निसर्गापासून माणूसच भावनेनं दूर होत गेला. निसर्गावर मात करण्याच्या आकांक्षेला तात्त्विक अधिष्ठान मिळालं. निसर्ग व माणूस दोघांचंही शोषण करणाऱ्या मनोवृत्तींना आधार सापडला. माणूस व निसर्ग यांच्यात म्हणजेच माणसाची विवेकापासून फारकत होऊन पुढे ती वाढतच गेली. 

1980 मध्ये ऑल्विन टॉफ्लर यांनी ‘थर्ड वेव्ह’ या ग्रंथातून औद्योगिक क्रांतीची कारणं व परिणाम समजावून सांगताना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा इतिहास सादर केला. माणूस शेती करायला लागल्यानंतर शारीरिक शक्ती हेच निर्णायक बळ होतं. बळाचा वापर करून उत्पादन, पशू व स्त्रियांची लूट व्हायची. औद्योगिक क्रांतीनंतर मालमत्तेला महत्त्व आलं. कोळसा, खनिज तेल, सोनं, पैसा यांचा ताबा घेण्यासाठी धडपड झाली. कृषिक्रांतीनं बाहुबलींना, तर औद्योगिक क्रांतीमुळं धनाढ्यांना सूत्रधार करून टाकलं. माहिती क्रांतीमध्ये ज्ञानाला सर्वोच्च स्थान मिळत आहे. (परंतु जगातील बहुसंख्य जनताही ‘शरीरानं एकविसाव्या शतकात आणि मनातून मध्ययुगा’त अशा अवस्थेत आहे.)

प्राचीन (शेतीक्रांतीच्या) काळात मनगटी बळाच्या जोरावर अनेक बलवान देशांनी सुबत्ता असणाऱ्या देशांची लूट केली. इजिप्त, ग्रीस, रोमन व फिनिशिया साम्राज्यांनी इ.स.पूर्व 1500 ते इ.स.पूर्व 300 पर्यंत आशियाई व आफ्रिकी देशांतून शेतमालाची लूट केली व गुलामांना राबवून घेतले. हा वसाहतवादाचा आरंभ होता. आधुनिक काळातील ‘शोधपर्वा’चा हेतू लूट हाच होता. पंधराव्या शतकात 1415 मध्ये पोर्तुगालनं उत्तर आफ्रिकेतील सेऊट बंदरावर ताबा मिळवल्यानंतर मँडरिया व केप वेर्देही बळकावले. 1499 मध्ये कोलंबस भारत व चीनच्या शोधात निघाला, मात्र तो बहामाला जाऊन थडकला. यानंतर स्पेन व पोर्तुगाल यांनी अमेरिका, भारत व आशियाई-आफ्रिकी देशांवर स्वाऱ्या चालू केल्या. पाठोपाठ इंग्लंड, नेदरलँड, फ्रान्स व जर्मनी ह्या देशांनी अन्य देशांना गुलाम करण्याची मोहीम चालू केली. इतिहासकार फिलिफ हॉफमन म्हणतात, ‘‘औद्योगिक क्रांतीपूर्वी 1800च्या सुमारास 35 टक्के जग, तर 1914 च्या पहिल्या महायुद्धाच्या वेळी 84 टक्के जग हे युरोपिअनांची वसाहत झालं होतं.’’ वसाहतींमधील कच्चा माल व गुलामांचे श्रम यांवरच अनेक उद्योग उभारले गेले व भरभराटीला आले. इंग्लडमध्ये रबराची गरज निर्माण झाली, तेव्हा ब्रह्मदेश, मलेशिया, थायलंड, सिंगापूर ह्या मलाय द्वीपसमूहातील सदाहरित अरण्यांना नष्ट करून रबर लागवड करण्यात आली. पुढं सर्व वसाहतवादी देशांनी मसाल्याचे पदार्थ, चहा, ऊस, अफू, खनिज इंधन व अन्य किमती ऐवजांचा खजिना लुटून घेत त्या भागातील स्थानिक जनता व आदिवासींचं जगणं अशक्य करून टाकलं. नंतर पाश्चात्त्य वसाहतवादी देशांचं हेच ‘विकाससूत्र’ कॉर्पोरेट कंपन्यांनी अधिक वेगानं पुढं नेत, जंगलावर अवंलबून असलेल्या स्थानिक जनतेला पर्यावरण निर्वासित करून टाकलं आहे. ‘द नटमेग्ज कर्स - पॅराबल्स फॉर अ प्लॅनेट इन क्रायसिस’ ह्या पुस्तकात अमिताव घोष म्हणतात, ‘‘डच इस्ट इंडिया काळापासून आजपर्यंत, 1 टक्क्याकडून 99 टक्क्यांंचं शोषण होेत आलेलं आहे. भांडवलशाहीचं स्वरूप व व्यवहार यांत फरक पडलेला नाही. आपण हयात असलेल्या वनस्पतींवर अन्नासाठी, तर गोठून गेलेल्या जीवाश्म रूपातील वनस्पतींवर ऊर्जेसाठी पूर्णपणे अवलंबून आहोत. आजवर कधीही नव्हतं एवढं आपलं जीवन वनस्पतीकेंद्रित झालं आहे. इंधनांपासून लिथिअमपर्यंत आणि पाम तेलापासून कोकोपर्यंत सर्व कारणांसाठी निसर्गसंपदेला खरवडणं अथक चालू आहे. त्यामुळं हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणं हे वरचेवर जटिल होत चाललं आहे.’’ 

कोणत्याही काळाचा युगधर्म व समाजाचा कल हा मुख्य प्रवाहातील भाषेवरून लक्षात येतो. सध्याच्या भाषेतील प्रचलित संज्ञा पाहा : ‘खर्च परिणामकारकता, खर्च-लाभ विश्लेषण, लक्ष्य, उद्दिष्ट, मोजता येण्याजोगी परिणती, संख्यात्मक वर्तनबदल, ह्या सर्व संज्ञा यंत्राशी संबंधित आहेत. तर आपल्या जागतिक संस्कृतीचं सध्याचं प्रतीक संगणक हे आहे. ‘यंत्रसामग्री व आज्ञावली, विदा, स्मरणशक्तीची पुनर्प्राप्ती, ऑनलाइन, प्रोग्रॅमिंग’ हे शब्दप्रयोग सर्रास रूढ झालेआहेत. ‘एकरेषीय यंत्रणा, वेग, कार्यक्षमता’ ह्यांना उच्चतम मूल्य प्राप्त झालं आहे. ही प्रतीकं आणि चिन्हं हेच वास्तव आहे, असा भ्रम निर्माण करतात. आभास हेच वास्तव वाटू लागतं.  अशी भाषा व तसंच जीवन यांमुळं सभोवतालास निर्जीव वस्तूंचा समुदाय करून टाकलं जात आहे. जगाचं ‘वस्तुकरण’ झालं आहे. व्यक्ती ह्यादेखील ‘वस्तू’ झाल्या आहेत. वस्तूंनी वस्तूंना हाताळणं हे जीवन झालं असून त्यातून आत्माच निघून गेला आहे. बिघडलेल्या यंत्रातील दोषनिश्चिती करून ठाकठीक करणं. आता मात्र ही मानवी यंत्रं वारंवार बिघडत, कोसळत चालली आहेत. 

पर्यावरणीय तत्त्वज्ञ पॉल शेपर्ड ‘नेचर अँड मॅडनेस’ (1992)मध्ये मानवी वेडाचाराची चिकित्सा करताना म्हणतात, ‘‘निसर्गाशी जवळीक असल्यास निसर्गातील व्यवहार अनुभवत  ‘स्व’च्या पलीकडं पाहणं स्वाभाविक असतं. शहरीकरणाचा वेग वाढत गेल्यानंतर  शहरवासीयांची बाल्यावस्थेतच निसर्गापासून फारकत होत गेली. बालकांचं बाहेर पडणं, बागडणं बंद होत गेलं तसतशी बालपणापासूनच आत्मकेंद्रीतता वाढत गेली. ‘स्व’च्या पलीकडील जग आकसत गेलं. अस्सल व आतून येणारं निसर्गप्रेम आटत जाऊन त्याचं उत्परिवर्तन (म्युटेशन) होत गेेलं व ती लटकी माया ही उद्यानं व प्राणिसंग्रहालयांत क्वचित वा किंचित, शोभेपुरती वा रंजनापुरती ठेवली गेली. त्यामुळं तिथूनच निसर्गनाशाविषयी अलिप्तता, दुरावा निर्माण होत गेला. (स्वत:पासूनही दुरावण्याची आणि एकाकी होण्याची बीजं इथंच पडत गेली.) उलट निसर्गाला नगण्य लेखण्याचे संस्कार होत गेले. माणूसकेंद्री विचार दृढ होत राहिले. निसर्गाविषयी भय आणि संशय बळावत चालला. युरोप-अमेरिकेत अशा पिढ्यान्‌पिढ्या घडत गेल्या. निसर्गावर अमर्याद नियंत्रण व मालकी प्रस्थापित करून शक्य तितक्या व वाढत्या वेगानं संपत्तीची निर्मिती करणं हेच उद्योगांचं व औद्योगीकरणाचं उद्दिष्ट राहिलं. ही विचारसरणी होत गेली. भाषा बदलत गेली. कृत्रिमता वाढत गेली. त्यातून एकसुरी संस्कृतीचा समाज (मोनो कल्चर) निर्माण करण्यासाठी जागतिकीकरणाचा वेडाचार अथकपणे चालू झाला. ’’

मनुष्य जन्मापासून वयाची विशी गाठेपर्यंतची (स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होईपर्यंतची) विकास प्रक्रिया ही प्रदीर्घ असते. विशेषत: बालमन घडत जाणं ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. बालजगत हे पक्षी-प्राणी, वृक्षवेली, पानं-फुलं, चंद्र-चांदण्या, नद्या-समुद्र यांच्या कथा व कवितांनी भरून गेलेलं असतं. मातेचं व कुटुंबीयांचं उबदार वात्सल्य, कानांवर पडणारी गाणी व पक्षी-प्राणी यांचे आवाज- यांतून सभोवतालच्या जगाशी नातं जोडत बालकांचं दृक व श्राव्य विश्व घडत जातं. निसर्गात नित्य नूतनतेमुळं व निसर्गसान्निध्यामुळं बालमनात निसर्गाविषयी जिव्हाळा, निरागसता व कुतूहल या बाबी वाढत जातात. ही प्रक्रिया नैसर्गिकरीत्या व सहज होत जाते. बालक त्याची चिकित्सा वा तत्त्वसिद्धांतन करत नाही. निसर्ग हा बालमनाचा अविभाज्य घटक वा त्याचाच एक सेंद्रिय हिस्सा होऊन जातो. ह्या काळात प्राण्यांवर वर्चस्व गाजवावं, त्यांना संपवावं, असं त्याच्या मनात चुकूनसुद्धा येत नाही. सदैव निसर्गाच्या कुशीत राहणारी आदिवासी वा ग्रामीण भागातील मुलं यांची वाढ अशी होते. ती, सण, उत्सव, समारंभ सर्व प्रसंगांत गायन-नर्तन करत निसर्गाच्या सोबत असतात. निसर्गाची अनेक गूढं उकलत जातात. त्यामुळं ती अनुभव व ज्ञान सहजगत्या मिळवत समृद्ध होत जातात. (असं शिक्षण बालपणापासून मिळणं आवश्यक आहे. फिनलंड, स्वीडन, नॉर्वे, अनेक युरोपीय देश व अमेरिकेत त्याअनुसार शैक्षणिक धोरण बदललं जात आहे.) मानसशास्त्रज्ञ विल्यम व क्लेअरर सेल म्हणतात, ‘‘बालवयात संगोपनाकडं दुर्लक्ष म्हणजे बालकांना शत्रुुत्वाची वागणूक देणंचआहे.’’ व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्वाच्या टप्प्यात निर्माण होणाऱ्या ह्या धक्क्यामुळं एकाकीपणाची भावना तीव्र होत जाते. एकलेपणाची भीती व तिरस्कार वाढत जातो. त्यातून वस्तू, व्यक्ती व निसर्ग यांवर ताबा मिळवण्याची भावना बळावत जाते. यातूनच यंत्र व उपकरणांवरील अवलंबित्व वाढत जातं. निसर्गाला अव्हेरण्याची ही ऐतिहासिक वाटचाल पाश्चात्त्य जगात विशेषत्वानं दिसून येते. परिणामी निसर्गविनाश, उधळमाधळ यांविषयी तसूभरही खेद वाटत नाही. 1990 नंतर ह्या भावनेचंही जागतिकीकरण झालं. 

प्रकृती ही अतिपरिचित असूनही अजिबात परिचय नसणारी अशी संज्ञा आहे. एकविसाव्या शतकात प्रवेश केल्यापासून आरोग्यतज्ज्ञ प्रकृतीविषयीचे तसेच आजारांविषयीचे मूलभूत प्रश्न उपस्थित करत आहेत. निरोगी शरीरात रोगाचा शिरकाव कसा होतो, हे अजूनही पुरेसं उलगडलेलं नाही.  त्यात शरीर व मन यांचा किती व कसा सहभाग असतो, यांवर अजूनही वाद व संशोधन चालूच आहे. ‘आहार, विहार व विचार यांवर प्रकृती अवलंबून आहे,’ असं आयुर्वेद मानत आलं आहे. आरोग्यविज्ञानही आता ‘सभोवतालचा निसर्ग याचा  शरीर व मनावर परिणाम होतो,’ ह्या निष्कर्षाला येत आहे.

डॉ. थिओडोर रोझॅक (‘पर्यायी संस्कृती- काउंटर कल्चर’ ह्या संज्ञेचे निर्माते) यांनी कामभावना, मिथकं-प्रतीकं ह्यापलीकडं जाऊन अबोध मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न  केला. त्यातून ते निसर्गाशी असलेल्या नात्याचा वेध घेऊ लागले. रोझॅक हे समाजजीवशास्त्रज्ञ डॉ. एडवर्ड विल्सन यांच्या मांडणीनं प्रभावित झाले होते. 1984 मध्ये विल्सन यांनी निसर्गाशी मानवाची मुळं घट्ट जोडली असण्यामागं ‘जीवाकर्षण’ (बायोफिलिया) कारणीभूत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, ‘‘माणसाला जीव व जैव प्रक्रियेसंबंधी जन्मजात आकर्षण व आत्मीयता असते.’’ पृथ्वीतलावर गुरुत्वाकर्षणानंतर ह्या मोठ्या व मूलभूत बलाचा शोध लागल्यामुळं डॉ. रोझॅक हरखून गेले आणि त्यांनी ‘जीवाकर्षण संकल्पने’चा विस्तार केला. ‘‘निसर्ग ही माणसाच्या अबोध मनात दडलेली उपजत प्रेरणा आहे. त्यामुळंच जन्मापासूनच चंद्र-तारे, नदी-नाले-वृक्ष-वेली-फुलं-फळं यांच्याविषयी आस्था व ओढ असते,’’ असं सांगून रोझॅक यांनी पर्यावरणीय अबोध मनाची (इकॉलॉजिकल अनकॉन्शस माइंड) महती सांगितली. निसर्ग व मानव यांच्यातील आदिबंध हा धर्म, तत्त्वज्ञान, आदर्शवाद यांहूनही अधिक दृढ, सघन व खोल आहे. आपलं निसर्गाशी असलेलं नातं उमजून घेणं अनिवार्यआहे, याकडं लक्ष वेधण्याचं ऐतिहासिक कार्य रोझॅक यांनी केलं आहे. 

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस औद्योगीकरणाला वेग आला. नोकरी-व्यवसायासाठी खेड्यांतून शहरांकडं ओढा सुरू झाला. कशाचीही शाश्वती उरली नाही. वातावरण कमालीचं अस्थिर, असुरक्षित झालं. जुनी मूल्यं खरी वाटेनात. धार्मिक रूढी फोल ठरू लागल्या. आयुष्याला आधार  ठरलेल्या व्यक्ती, संस्था व व्यवस्था कुचकामी वाटू लागल्या. 1985 मध्ये फ्रेड्रिक नित्शे यांनी ‘दस स्पोक झरतुष्ट्र : अ बुक फॉर ऑल अँड नन’ ह्या ग्रंथातून त्या काळातील कुंठितावस्थेचं वर्णन केलं, ‘‘परमेश्वराचा मृत्यू झाला आहे. आणि आपण त्याची हत्या केली आहे. आता आपण आपलं सांत्वन कसं करणार आहोत? एक खुनी दुसऱ्या खुन्याला धीर कसा देऊ शकेल? आपल्या हातावरील रक्ताचे डाग पुसू शकेल, असं पवित्र तीर्थ कुठं सापडेल? आपल्याला पापक्षालनासाठी कोणतं प्रायश्चित्त घेता येईल? आता ह्या कृत्याची जबाबदारी आल्यामुळं आपल्यालाच महान होणं अपरिहार्य नाही काय? आपल्यालाच परमेश्वर होऊन त्याला साजेसं वर्तन व कृती करत राहणं अटळ नाही का?’’ हा घंटानाद करत विसावं शतक जन्माला आलं. कुजत चाललेली समाजव्यवस्था पाहून अस्वस्थ नित्शेंनी थेट नाभीलाच हात घातला आणि परमेश्वराच्या मृत्यूची खबर दिली. त्यानंतरचं जग पूर्वीसारखं राहिलं नाही. ईश्वराला हद्दपार करून ख्रिश्चन धर्मावर हल्ला चढवणाऱ्या नित्शेंनी विसाव्या शतकातील साहित्याचा नायक ‘अँग्री यंग मॅन’ या संकल्पनेला जन्म दिला. जीवनाला आपण स्वीकारतो का नाकारतो, तत्त्वज्ञानातील हा महत्त्वाचा प्रश्न असतो. नित्शेंनी जीवनाला नाकारलं नाही. उलट परमेश्वर नसलेल्या जगात आपली जबाबदारी आपल्यावर आल्याची जाणीव करून दिली. (‘परमेश्वराचा मृत्यू झाला आहे.’ ह्या विधानाचा संदर्भपूर्णांशानं असा आहे.) आयुष्याला अर्थ देण्याचं काम पारलौकिक, बाह्य शक्ती करणार नसून त्यासाठी आपल्याला झगडावं लागणार असल्याचं भान दिलं. आणि ती जाणीव याच काळातील साहित्यातून प्रगल्भपणं व्यक्त झाली.

1901 मध्ये मनोविश्लेषण शास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांनी ‘दैनंदिन आयुष्यातील मनोविकृती’ (सायकोपॅथॉलॉजी ऑफ एव्हरीडे लाइफ) ह्या विषयावर सलग व्याख्यानं दिली. त्यांतून त्यांनी दररोजच्या आयुष्यातील संभाषणात नकळत होणाऱ्या चुका, विस्मरण, यांतून निर्माण होणारे विनोद दाखवून दिले. त्या प्रसंगांचं सखोल विश्लेषण करून दाखवलं. व्यक्ती व समाज यांच्या वर्तनाचा अन्वय लावण्याचा मार्ग दाखवला. भ्रामक प्रवृत्ती व तिच्या व्यक्त होण्याच्या छट़ा आणि त्यामागील अबोध मन यांचा उलगडा करून दिला. अशा प्रकारे फ्रॉइड यांनी मनोविश्लेषणाचं गूढ दूर करण्याचा आरंभ केला आणि मानसशास्त्र सर्वत्र रुजण्यास आरंभ झाला. त्यामुळं जगाची विचार करण्याची रीतच बदलून गेली. 

त्याच फ्रॉइड यांना 1929मध्ये ‘मानवी आत्ममग्न वृत्तीमुळं संपूर्ण मानवी संसृती (सिव्हिलायझेशन)धोक्यात येईल.’ असा वेध घेता आला होता. त्यांनी ‘सिव्हिलायझेशन अँड इट्‌स डिसकन्टेन्ट्‌स’ ह्या पुस्तकात मानवी संस्कृतीचं मनोविश्लेषण केलं होतं. त्यांच्या ह्या अखेरच्या पुस्तकात व्यक्ती व समाज यांच्या स्वरूपातच मूलभूत तणाव असल्याचं विश्लेषण त्यांनी केलं होतं. ‘‘मनुष्याची मूल प्रेरणा ही सुखप्राप्ती व सुखासाठी धाव (प्लेझर-प्रिन्सिपल) अशी असतेे. कुठलीही व्यक्ती, स्वसुखासाठी अमर्याद व सहजस्फूर्त (इन्स्टिंक्टिव्ह) स्वातंत्र्याच्या शोधात असते. तर समाजाकडून (सिव्हिलायझेशन), त्या प्रेरणांचं दमन करून जुळवणूक घेण्याची मागणी असते. मुनष्यस्वभावाचं स्वरूप हेच समूहाच्या विरोधी असतं. वैयक्तिक  आकांक्षांना बंधनं घालण्यासाठी समूहाकडून नियम व कायदे केले गेले. अतृप्त इच्छांची पूर्तता करण्यासाठी मनुष्य कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि  ह्या आदिम प्रेरणा मानवी समूहास घातक आहेत.’’ फ्रॉइड यांनी संसृती व संस्कृतीच्या  वाटचालीसमोरील जटिल आव्हाने तेव्हाच सांगून ठेवली होती. फ्रॉइड यांनी सभ्यतेचा अंत होत असल्याचा इशारा दिला होता. एकविसाव्या शतकाचा आरंभ होताना ‘निसर्गाची राजरोस व सातत्यानं हत्या होत असून आपण सगळे त्यात सहभागी आहोत,’ अशी घोषणा कोणीही केली नसली तरी त्या वास्तवाची जाणीव सर्वांना होत आहे. अतीव आत्मकेंद्रीपणातून निसर्गाचा अव्हेर चालू आहे. आपणच निर्माण केलेल्या आभासी जगात आपण वावरत आहोत. त्यामध्ये केवळ हावरटपणा व लोभ यांतून दृष्टी दूषित झाली आहे. निसर्ग हाच अडथळा मानून त्याला नाहीसं करण्याचा चंग बांधलाआहे. त्यातून स्वत:चं विलगीकरण चालू आहे. ‘सामूहिक विवेकशून्यता’ (मूर्खपणा) वाढत चालली आहे. त्यातून उत्पन्न झालेला अंतर्बाह्य कोलाहल मानवाला पेलवेनासा झाला आहे. विसाव्या शतकाच्या आरंभी मानसशास्त्रज्ञांनी मानवी वर्तनाविषयीचं विश्लेषण केलं, आता मात्र त्यांनी पर्यावरणीय सवयींविषयींचं विश्लेषण करून सांगणं आवश्यक आहे. ते कार्य मानसशास्त्रज्ञ करत नसल्यामुळं पर्यावरण-शास्त्रज्ञांना करावं लागत आहे. (आता फ्रॉइड, कार्ल युंग, एरिक एरिकसन, अल्बर्ट एलिस आदी धुरंधर असते तर त्यांनी हेच केलं असतं.) आपण आत्मघातकी दिशेनं जात असूनही आपल्या सवयी अजिबात बदलत नाहीत, इतकं मानवी वर्तन अतर्क्य आहे. वाईट पर्यावरणीय सवयी हा सक्तीचा विकार (कंपलसिव्ह डिसऑर्डर) इााला असून आपल्याला त्याचं भान नाही व आता तो विकार थांबवताही येत नाही. अविवेकी वर्तन हे अति अंगवळणी पडलं असून त्याचीच एक तार्किकता तयार झाली आहे. (‘पडिले वळण इंद्रिया सकळा’) सार्वजनिक धोरणांत त्यांचा सहज शिरकाव झाला आहे.  ह्या काळात निसर्गविनाश हीच दैनंदिन जीवनातील मनोविकृती झाली आहे. निसर्गनाशामुळं समाजाची मानसिक अवस्था बिघडत चालली आहे. याचं सविस्तर व सखोल विश्लेषण झालं पाहिजे.

अनेक गूढ व कूट प्रश्नांचा पाठपुरावा करणाऱ्या फ्रॉइड यांनी ‘मी कोण?’सारखाच मूलभूत महाप्रश्न (अनेक उपप्रश्नांना जन्म देणारा) उपस्थित केला. ‘मानव आणि विश्व, मानव आणि निसर्ग यांच्यात काही नातं आहे का?’ परंतु त्याचं उत्तर देताना मात्र ते समग्र विचार करू शकले नाहीत. ते म्हणाले, ‘‘ह्या विश्वामध्ये जिवाची आणि मानवी मानस यांची निर्मिती ही एक विक्षिप्त घटना म्हणता येईल.’’ त्यांचा मानवी मानसाबाबतचा हा सुटा दृष्टिकोन आजही मानसशास्त्राच्या मानगुटीवर बसून राहिला आहे. त्यामुळं तो केवळ वैयक्तिक पातळीपर्यंत अडकून राहिला होता. विश्व हे अफाट व अथांग आहे तसंच मनोविश्वदेखील  अमर्याद आहे. त्याला ती विश्वात्मकता देऊन रोझॅक यांनी महाप्रश्नाच्या व्याप्तीचा विस्तार केला. 1992मध्ये डॉ. रोझॅक  यांनी ‘व्हॉइस ऑफ अर्थ : ॲन एक्स्प्लोरेशन ऑफ इकोसायकॉलॉजी’ या पुस्तकात ‘आधुनिक मानसशास्त्रानं मन आणि निसर्ग यांचा एकत्र विचार न करण्याचा मोठा गुन्हा केला आहे. पर्यावरण व मानसशास्त्र ह्या दोन्हींना एकमेकांची गरज आहे,’ असं मत मांडलं होतं. निसर्गाच्या अतिशय जवळ राहणाऱ्यांना निसर्गाच्या खाणाखुणा माहीत असतात. त्याअनुसार त्यांच्या वर्तनात व व्यवहारात ते बदल करत असतात. या उपजत शहाणपणाला ते ‘पर्यावरणीय चातुर्य’ (इकॉलॉजिकल विस्डम) म्हणतात. आदिवासी, शेतकरी व कोळी यांच्यामध्ये ते सहज जाणवतं. म्हणून रोझॅक म्हणतात, ‘‘पर्यावरणीय अबोध मनात निसर्गाविषयी जिव्हाळा आहे, अलिप्तता की तिटकारा- यावर निसर्गाशी होणारे व्यवहार ठरतात.’’ त्यांनी पर्यावरणाचा माणसावर होणाऱ्या परिणामांचा विचार करताना ‘परिसंस्था मानसशास्त्र’ (इकोसायकॉलॉजी) ही संज्ञा वापरली होती. हा विचार पुढं नेताना प्रो.ऑर, लिंडा बुझेल, चॅल क्विस्टलॅरी रॉबिन्सन यांसारखे विद्वान ‘सध्या मानवजातीला मानसोपचार नव्हे तर ‘परिसरोेपचारा’ची (इकोथेरपी) आवश्यकता आहे,’ असं आग्रहपूर्वक सांगत आहेत. डॉ. रोझॅक यांनी निसर्गापासून झालेली मानवाची फारकत हेच सर्व समस्याचं मूळ आहे; या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी ‘सध्याच्या धावपळीच्या जीवनाचा वेग कमी करणं, लोकशाहीकरण, विकेंद्रीकरण’ हा मार्ग स्वीकारणं आश्यक आहे,’ हा उपाय सुचवला आहे.  

थोडक्यात, निसर्ग व मानव हे अद्वैती सूत्र केंद्रस्थानी आणून त्याचं तत्त्वज्ञान व मानसशास्त्र निर्माण होणं आवश्यक आहे. अशी मांडणी जगातील तत्त्वज्ञ व मानसशास्त्रज्ञ करत आहेत. सर्ग म्हणजे निर्माण होत राहणं. ‘निसर्ग’ म्हणजे ‘जे सतत व न थांबता निर्माण होत असतं.’ सहजासहजी लक्षात न येणारा सूक्ष्म बदल म्हणजे निर्मिती! निसर्गात सतत परिवर्तन होत असते. सांख्य दर्शनात, ‘‘ ‘प्रकृति’ म्हणजे निसर्ग’ सतत उत्क्रांत होणारी घटना आहे,’’ अशी मांडणी केली आहे. बौद्ध दर्शनात आणि काही उपनिषदांतही - ‘अनित्यतावादा’त - ‘जे अनित्य आहे, जे स्थिर नाही, सतत बदलते ते जग,’ असं बौद्ध दर्शन स्पष्ट करतं. ‘वृक्षवल्लींना सोयरे’ मानणारी वृत्ती आपल्याला समजलेली असल्याचा आभास होतो. ते केवळ तोंडी लावण्यापुरतं आहे, हे आपण जाणून असतोच. ह्या दांभिकपणापलीकडं गेलो तरच आपल्या मराठी जगताला विशाल व समग्र दृष्टी पुन्हा एकदा लाभून साहित्य व कलानिर्मितीमध्ये वसंत बहरू शकेल.


हेही वाचा : विद्येविना विकासाचा ‘अर्थ’बोध - अतुल देऊळगावकर

Tags: ऑल्विन टॉफ्लर atul deulgaonkar Nature and man weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अतुल देऊळगावकर,  लातूर
atul.deulgaonkar@gmail.com

मुक्त पत्रकार अशी ओळख असलेल्या अतुल देऊळगावकर यांनी ग्रामीण विकास व पर्यावरण या विषयांवर प्रामुख्याने लेखन केले असून त्यातून आलेली अर्धा डझन पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके