डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एरिक फ्रॉम यांचे 'द सेन सोसायटी' व अन्य

मानवतावादी तत्त्वज्ञ, सामाजिक मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम (1900-1980) यांनी बराच काळ धरून ठेवलं. फ्रॉम यांनी हिटलरच्या आगमनानंतर मायदेश जर्मनीला रामराम ठोकला. आधी स्वित्झर्लंड व पुढे ते अमेरिकेत वास्तव्यास गेले. औद्योगिक क्रांतीनंतर जगाची होत असलेली वाटचाल ते पाहत होते. त्यांच्या ‘द सेन सोसायटी’ (1955) मध्ये त्यांनी भांडवलशाही अमेरिका व साम्यवादी सोव्हिएत युनियन ह्या दोन्ही व्यवस्थांचं धारदार विच्छेदन केलं होतं. हे पुस्तक घेणं 1982 मध्ये भाग पडलं होतं.  

शाळेची सुटी संपल्यावर काही शिक्षक ‘काय वाचलं?’ असं विचारत. तेव्हा वर्गात शोभा होऊ नये यासाठी काळजी घेणं भाग होतं. घरातील वातावरणामुळे विविध प्रसंगी येणारे नरहर कुरुंदकर, अनंतराव भालेराव, वसंतराव पळशीकर, पन्नालाल सुराणा, पुष्पाबाई भावे यांच्याकडून हमखास येणाऱ्या ह्याच कठीण प्रश्नाला उत्तर देणं अनिवार्य होतं. ही महनीय मंडळी वयानं व ज्ञानानं अतिशय लहान असणाऱ्या बालकांशीही मनापासून बोलत असत. यातूनच ‘काय वाचावं?’ हे आवर्जून सांगत. शिक्षणाच्या व नोकरीच्या निमित्ताने पुण्यात असताना समर नखाते, माधुरी पुरंदरे यांच्या ‘माध्यम’ पथनाट्य चळवळीत सामील झाल्यावर ‘तोच’ प्रश्न धाकदायक होत गेला. नंतर ‘ग्रंथाली’ वाचक चळवळीमुळे दिनकर गांगल, कुमार केतकर, अरुण साधू यांच्या गाठीभेटी वाढत गेल्या. तेव्हाही भेटीतील आरंभीची विचारपूस ‘ह्याच’ दडपण आणणाऱ्या प्रश्नानं होत असे.

तर, अशा ह्या अटळ प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी करणं भागच होतं. ह्या सर्वार्थानं ज्येष्ठ मंडळींच्या बोलण्यातून येणारे संदर्भ समजले नाही, तर तो भयंकर अपमान वाटत असे. त्यामुळे संदर्भ आलेल्या पुस्तकांचा शोध घेणं अगत्याचं होतं. ह्या बुजुर्गांच्या घरी जाण्याची संधी मिळाली, तर त्यांच्या ग्रंथसंग्रहाकडे मन:पूर्वक पाहत नोंदी करून घेणं आवश्यक वाटायचं. वाचायचं तर अफाट आहे, ‘वाचनाचा क्रम कसा असावा?’ ही समस्या कधी सुटलीच नाही. ‘वाचनशिस्त आली नाही. खूप काही राहून गेलं आहे’, ही जाणीव सातत्याने टोचत राहते. अशा ह्या सदोष,  अरेषीय व अपरिपूर्ण वाचनप्रवासात अनेक लेखक-कवी सोबत येत बरंच काही देऊन गेले. ‘आपण फारच छोटे आहोत. आपला शब्दसंग्रह थिटा आहे. आपल्याला भाषावैभव कधी येणार? आपली दृष्टी ही भंगलेली, विखंडित आहे.’ ही टोचणी कायमची आहे व तशीच राहणार. त्यामुळे ‘दृष्टी समग्र व विशाल करण्याच्या आटोकाट प्रयत्नात’ काही लेखक-कवी-कलावंतांना कायम सोबत ठेवावं लागतं. जे. कृष्णमूर्ती, विनोबा भावे, तुकाराम, पं. कुमार गंधर्व, मर्ढेकर, विंदा, एलकुंचवार, एरिक फ्रॉम यांच्या सतत सहवासात राहून शिकत राहणं चालूच आहे.

वर्गमित्र दीपक देवधरमुळे भगतसिंगांचं ‘मी नास्तिक का आहे?’ हातात आलं. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी फासावर जातानाही न डगमगता परमेश्वराला नाकारण्याचं आंतरिक धैर्य असणाऱ्या विवेकी भगतसिंगानं पछाडून टाकलं. विख्यात इतिहासकार बिपीन चंद्रा यांनी 1970 मध्ये मूळ गुरुमुखीतील ह्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला आणि लोकवाङ्‌मय गृहामुळे ते लवकरच मराठीत आलं. ह्या पुस्तकामुळे भगतसिंगांच्या वाचनव्यासंगाची माहिती देशाला झाली.

‘मी नास्तिक का आहे?’मुळे वाचनाची आवश्यकता मनात ठसली गेली आणि विवेकी विचारही बळकट झाला.

महाराष्ट्रातील पथनाट्य चळवळीचे जनक समर नखाते यांच्या अभ्यासवर्गात अक्षरश: विश्वरूपदर्शन होत असे. ‘व्यक्तीचं व समाजाचं वर्तन कसं व का, हे समजलंच पाहिजे. राजकारणाचं व व्यवस्थेचं स्वरूप समजून घेण्यासाठी अर्थकारण समजून घेतलं पाहिजे. तसंच कोणीही कोणताही प्रश्न विचारला, तर आपल्याकडे उत्तर असलं पाहिजे’- असं बजावत ते आपल्याला न पडणारे प्रश्न टाकून अस्वस्थ करत. त्यांच्या बोलण्यात देशविदेशातील अनेक थोर लेखकांचे उल्लेख होत असत. मग त्या संदर्भांचा जमेल तसा पाठलाग सुरू केला. सोबतचे अनिल झणकर, दीपक देवधर, अश्विनीकुमार धर्माधिकारी, कामोद देशपांडे या मित्रांशी गप्पा मारताना ‘वाचलं पाहिजे’ हे ध्रुपद कायम असे. ‘ते काय वाचतात? आपलं काय राहिलंय? आपण किती मागे?’ ही भावना दाटून असे. त्या काळात (1978 ते 1984) सर्वांच्या भेटीगाठींचं ठिकाण होतं- ‘कॅफे डिलाइट’! (गुडलक चौकातील ‘हॉटेल वाडेश्वर’च्या जागी).

त्या टप्प्यात मानवतावादी तत्त्वज्ञ, सामाजिक मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम (1900-1980) यांनी बराच काळ धरून ठेवलं. फ्रॉम यांनी हिटलरच्या आगमनानंतर मायदेश जर्मनीला रामराम ठोकला. आधी स्वित्झर्लंड व पुढे ते अमेरिकेत वास्तव्यास गेले. औद्योगिक क्रांतीनंतर जगाची होत असलेली वाटचाल ते पाहत होते. त्यांच्या ‘द सेन सोसायटी’ (1955) मध्ये त्यांनी भांडवलशाही अमेरिका व साम्यवादी सोव्हिएत युनियन ह्या दोन्ही व्यवस्थांचं धारदार विच्छेदन केलं होतं. हे पुस्तक घेणं 1982 मध्ये भाग पडलं होतं. पाठोपाठ वसंतराव पळशीकर यांनी सुचविल्यामुळे रॅचेल कार्सन यांचं ‘सायलेंट स्प्रिंग’ (1962) घेतलं. ह्या दोन्ही पुस्तकांनी त्या काळातील प्रचलित विचारसरणींपेक्षा निराळ्या रीतीने पाहण्याची दृष्टी (लॅटरल थिंकिंग) दिली.

सोव्हिएत युनियनच्या स्थापनेपासूनच त्यांच्यात आणि अमेरिकेत संघर्ष जाणवत होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर ह्या दोन्ही देशांनी त्यांच्या आधिपत्याखालील देश वाढवून आपापला साम्राज्यविस्तार चालू केला. यातूनच शीतयुद्धाचा आरंभ झाला. (जॉर्ज ऑर्वेल यांनी ‘तुम्ही आणि अणुबाँब’ ह्या निबंधात ‘कोल्ड वॉर’ ही संज्ञा मांडली होती) साम्यवादी व भांडवलशाही ह्या दोन्ही विचारांनी ‘निसर्गाला अंकित करून विकास’ घडवला. युद्धसज्जतेसाठीच अवकाश-संशोधन, अणुऊर्जा, संगणक ह्या तंत्रज्ञानातील शोधमोहिमा चालू होत्या. या काळातच निसर्गाच्या मनमुराद विध्वंसाचा पाया जगभर घातला गेला आणि त्यामध्ये भांडवलशाही व साम्यवादी दोन्ही विचारसरणी एकाच दिशेने प्रवास करू लागल्या. वसाहतीतून मुक्त झालेल्या अनेक नव्या देशांनी हाच कित्ता गिरवला.

ह्या पार्श्वभूमीवर फ्रॉम यांनी ‘द सेन सोसायटी’मध्ये वास्तव दाखवलं होतं, ‘‘आपल्या लोकशाहीमुळे समाज हा सभ्य व सुसंस्कृत होत नाहीए. व्यक्तींची व समाजाची आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा सर्व बाजूने प्रगती झाली, तरच समाज प्र-गत होईल.’’ त्याची कारणमीमांसा करताना ते म्हणतात, ‘‘माणसानं स्वत:ला निसर्गापासून अलग करीत निसर्गविनाश चालू केला. पुढे समाजापासून वेगळं होत व्यक्तिवाद जोपासला. व्यक्तिस्वातंत्र्य व व्यक्तिवाद यात गल्लत करीत अतिरेकी व्यक्तिवादी होऊ लागला. ह्या प्रक्रियेत चढत्या भाजणीने वस्तुसंचय करू लागला. दरम्यानच्या काळात बाजारपेठ अतिशय शक्तिमान होत व्यक्तींवर ताबा मिळवू लागली. बाजारानेच नीती व मूल्यं ठरविण्याचा मक्ता घेतला. बाजाराची भाषा घराघरांत सर्रास ऐकू येऊ लागली. पैशाला अतिरेकी महत्त्व येत गेलं. पैसा हेच मोजमाप सर्वत्र लागू होताच, कमीत कमी काळात व कमीत कमी कष्टात अधिकाधिक पैसा हे आयुष्याचं ध्येय झालं. ‘बाजार’ हे मूल्य व्यक्ती व समाज, नाती व नीती सारं काही घडवत जातं. यातून माणसांना असुरक्षितता, अनिश्चितता, एकाकीपणा ह्या भावनांनी ग्रासून टाकलं आहे. पूर्वी माणसाला गुलाम होण्याची भीती होती. बाजारपेठ हीच सार्वभौम होत चालल्याने भविष्यात माणूस यंत्रमानव होण्याची शक्यता आहे.’’ असा भविष्यवेध करून फ्रॉम यांनी ‘वो सुबह हमही से आएगी’ अशी आशा दाखवत ‘मानवतावादी समुदायवादा’ची (ह्युमॅनिस्टिक कम्युनिटिरॅनिझम) मांडणी केली. त्यांना उदार व उन्नत समाज अपेक्षित होता. ‘‘कोणीही कोणावर सत्ता न गाजवता एकमेकांशी साहचर्याने जुळवून घेणारा, इतरांविषयी बंधुभाव व वात्सल्याची भावना असणारा, व्यक्तीचा सातत्याने गुणात्मक विकास होण्यास पोषक वातावरण असणारा समाज घडवावा लागेल.’’ हे फ्रॉम यांचं स्वप्नरंजन असं संबोधून हिणवण्यापेक्षा, अशी स्वप्नं पाहणं आवश्यक असल्याची जाणीव तेव्हा झाली होती. आजही ती तशीच टिकून आहे.

 फ्रॉम यांनी मूलभूत समस्यांचा अन्वय लावणारी ‘बियाँड द चेन्स ऑफ इल्युजन- माय एन्काउंटर्स विथ मार्क्स अँड फ्रॉइड’, ‘झेन बुद्धिझम अँड सायकोॲनॅलिसिस’, ‘द आर्ट ऑफ लिसनिंग’, ‘ऑन बिइंग ह्युमन’ अशी अनेक मौलिक पुस्तकं दिली आहेत. व्यक्ती व समाज यांच्या वर्तनाची अनेकांगी चिकित्सा करणाऱ्या फ्रॉम यांचा पाठपुरावा करणं माझ्यासाठी गरजेचं होतं. त्यांनी ‘फिअर ऑफ फ्रीडम’मधून सांगितलं, ‘स्वत:ची जबाबदारी स्वत: घेऊन निर्णय घेताना माणसाला ताण येतो. त्यामुळे स्वातंत्र्याचं भय वाटून पलायनवादी माणसं आपला ताबा ईश्वर, बुवा, नेता यांच्याकडे द्यायला सहज तयार होतात.’

प्रेम ही एक कला आहे, हे स्पष्ट करताना ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग (1956)’ मध्ये फ्रॉम लिहितात, ‘दुसऱ्या व्यक्तींची मालकी मिळवणे, तिच्याकडून अपेक्षापूर्ती करून घेणे म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम ही नैसर्गिक बाब वा भावना नसून ती एक साधना आहे. त्यासाठी आत्मप्रेमातून बाहेर पडून स्वत:मध्ये शिस्त व संयम, तसंच दुसऱ्या व्यक्तीविषयी विश्वास व आदर असावा लागतो. एका विशिष्ट व्यक्तीशी नातं प्रस्थापित करण्यापुरतं मर्यादित असतं ते प्रेम नाही, तो विस्तारलेला अहं असतो. सर्व माणसांविषयी, प्राणिमात्रांविषयी प्रीती वाटणं ही विशाल व  व्यापक प्रेमभावनेची खूण आहे.’

फ्रॉम यांनी ‘द ॲनाटॉमी ऑफ ह्युमन डिस्ट्रक्टिव्हनेस’ (1973) या पुस्तकात आक्रमकपणाचं सखोल व बहुआयामी विश्लेषण केलं आहे. टिकून राहण्यासाठी, स्वरक्षणार्थ उपजत येतो तो ‘सौम्य आक्रमकपणा’ असतो. इतरांचा ताबा मिळवणे, त्यांचा छळ करण्यात आनंद घेणे, ह्या प्रवृत्तींमधून ‘विध्वंसक आक्रमकपणा’ निर्माण होतो. अशी मांडणी करीत हिटलर, मुसोलिनी यांच्या वर्तनाचं सखोल व सूक्ष्म पातळीवर मनोविश्लेषण केलं आहे. ‘आत्मकेंद्रितता वा आत्मप्रेमामुळे आक्रमकता वाढीस लागते. कधी कधी एखादा समूहच आत्ममग्न होऊन इतरांना तुच्छ लेखत त्यांच्याशी क्रूरपणे वागू लागतो. अशा समूहात सामील व्यक्तींना त्या सर्वश्रेष्ठ असल्याचे भास होऊ लागतात. त्यामुळे त्यांना हिंसक होताना वावगं न वाटता ते कर्तव्यच वाटू लागते. आक्रमक वृत्ती ही जैविक (बायॉलॉजिकल) नव्हे (तसा सिद्धांत डेसमंड मॉरिस व आपल्याकडे विजय तेंडुलकर यांसारखे अनेक जण मांडत होते.) एकमेकांविषयी प्रेम व आदर, सहकार्य व साहचर्य हे नैसर्गिक आहे. त्यासाठी माणूस व निसर्ग यांना केंद्र मानून विकास करणारा समाज घडवला पाहिजे,’ असं ते म्हणतात. अखेरच्या काळातील फ्रॉम यांच्या लिखाणातून बौद्ध विचार अधिकाधिक येत गेले. कित्येक वेळा त्यांच्या मांडणीत जे. कृष्णमूर्तींचा भास होत असे. ‘सर्व बंधनं व चौकटींच्या पलीकडे जाताना तूच तुझा दीप हो’ हे त्याचं तात्पर्य होतं.

सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी 1985 मध्ये शस्त्रस्पर्धा थांबवून अण्वस्त्र निकामी करण्यास सुरुवात केली आणि शीत युद्धाच्या अंताचा आरंभ झाला. सोव्हिएत युनियनच 1991 ला कोसळल्यावर शीतयुद्ध समाप्त झालं. त्यानंतर मागील 30 वर्षांत निसर्गविनाशाचा वेग गेला. त्यासोबतच हवामान- बदलाच्या समस्या वाढत गेल्या. अजूनही विविध कारणांनी फ्रॉम यांचे संदर्भ येतच राहतात. फ्रॉम यांनी माणसाला जीवसृष्टीविषयी असणाऱ्या उपजत प्रेमाला जीवाकर्षण (बायोफिलिया) म्हटलं होतं. मागील वर्षी पर्यावरणाचे तत्त्वज्ञ प्रो.ग्लेन अल्‌ब्रेख्त यांनी जीवाकर्षण (बायोफिलिया) या संकल्पनेचा विस्तार केला. अल्‌ब्रेख्त यांच्या मते, ‘माणसाला केवळ स्वत:च्या परिसराविषयीच नव्हे तर सजीव-निर्जीवांसकट असलेल्या व्यापक विश्वाविषयीचा जिव्हाळा व आकर्षण असतं व ते वाढलं पाहिजे.’ या समग्र विचाराला ते ‘विश्वाकर्षण (सोलिफिलिया)’ म्हणतात. तर अमेरिकी विचारवंत प्रो.मायकेल सँडल यांनी समुदायवादाची निकड सांगताना म्हटलं आहे, ‘व्यक्तिवादामध्ये सांस्कृतिक व आर्थिक दृष्ट्या व्यक्ती हीच केंद्रस्थानी असते. समुदायाची सांस्कृतिक व आर्थिक प्रगती झाल्यास व्यक्तींची आपसुकच होते आणि व्यक्तींचे आपसातील संबंधही सुधारतात.’

पुढे कुमार केतकरांमुळे जे.कृष्णमूर्ती वाचत गेलो. ‘जीवनदृष्टी’ ह्या पुस्तकातून ते अस्तित्व, प्रेम, आनंद, भय, दु:ख यांविषयी मूलभूत प्रश्न विचारत हादरवून सोडतात. बदलासंबंधी त्यांना अनेक प्रश्न विचारले जात. ते म्हणत, ‘‘विज्ञान ज्या वेगानं प्रगती करत आहे, त्या वेगानं माणसाचं मन प्रगत होत नाही. आता प्रत्येक व्यक्तीला स्वत: सोडून इतर कोणाला तरी बदलावयाचं आहे. परंतु त्याने आधी स्वत:ला बदललं पाहिजे, स्वत:ची सफाई केली पाहिजे.’’

 याच काळात पं.कुमार गंधर्व यांचं गायन, मुलाखती तसंच त्यांच्यावरील लेख यांतून एक विशाल दालन खुलं होत गेलं. एकंदरीत व्यक्ती व समाज हे सुसंस्कृत व प्रगल्भ होत जावेत याचसाठी एरिक फ्रॉम, कृष्णमूर्ती, विनोबा, कुमारजी यांचा अट्टाहास होता. ते त्यांच्या मंथनातील नवनीत आपल्या हातात आयतंच ठेवत गेले. त्यांचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्यांच्या विचारांतील सूत्र मात्र सारखंच होतं. त्याची अधून-मधून उजळणी करताना ‘माझे मज कळो येती अवगुण’ ही तुकोबांनी सांगितलेली अवस्था येत राहते. स्वत:तील अपूर्णता नेहमी अस्वस्थ करीत राहते. तरीही ह्या ज्ञानियांच्या सान्निध्यात राहून स्व-क्षमतेनुसार काही शिकण्याचा प्रयत्न चालू ठेवायचा.

Tags: तत्वज्ञान पुस्तकदिन वाचन अतुल देऊळगावकर एरिक फ्रॉम द सेन सोसायटी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अतुल देऊळगावकर,  लातूर
atul.deulgaonkar@gmail.com

मुक्त पत्रकार अशी ओळख असलेल्या अतुल देऊळगावकर यांनी ग्रामीण विकास व पर्यावरण या विषयांवर प्रामुख्याने लेखन केले असून त्यातून आलेली अर्धा डझन पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत.


Comments

  1. Ravi AB- 24 Apr 2021

    लेख आवडला. प्रगल्भ होण्यासाठी समृद्ध होण्यासाठी खूप भांडवल मिळालं. धन्यवाद...

    save

  1. Michael Gons- 25 Apr 2021

    Reading the history of the literature gives me an idea how the world human community is being formed over thousands of years. But somehow the formation is not in the right direction. In India democracy is being killed! Who will direct?

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके