डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सट्टेबाजी, क्रिकेट आणि वृत्तपत्रे…

दक्षिण आफ्रिकी क्रिकेट संघाच्या कप्तानाने केलेल्या सौदेबाजांच्या संगनमताची बातमी जगात मोठा भूकंप झाल्याप्रमाणे वर्तमान पत्रांनी ठळकपणाने प्रसिद्ध केले. लेख, अग्रलेख, स्फुटे, चौकटी, व्यंगचित्रे अशा वेगवेगळ्या जागी वृत्तपत्रांनी हा विषय खेळता ठेवला. क्रिकेटमधल्या सौदेबाजीची तंत्रे, त्याची क्रिकेटच्या इतिहासातील उदाहरणं इत्यादी घटनांचा वेध वृत्तपत्रं यानिमित्ताने घेतील असं वाटलं होतं. पण काही अपवाद वगळता वृत्तपत्रांनी निराशा केली.

दक्षिण आफ्रिकी क्रिकेट संघाच्या कप्तानानं सौदेबाजांशी संगनमत करून क्रिकेट रसिकांच्या डोळ्यात धूळफेक केली असं दिल्ली पोलिसांना तपासणीत आढळून आलं, देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी आठ कॉलमी मथळे देऊन या गोष्टीला पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली.

दुसऱ्या दिवशी या कप्तानानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. वृत्तपत्रांनी पुन्हा पहिल्या पानावर कप्तानाच्या छायाचित्रासह लांबलचक मथळा दिला. 

महत्त्व कशाच? 

तिसऱ्या दिवशी आफ्रिकेच्या राजदूतांनी पत्रकारपरिषद घेतली-चौकशीच्या कामी आपण पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य देऊ सांगितलं. वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर हेही वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केलं, नंतर कप्तानानं भारतीय सौदेबाजांशी आपले पूर्वीपासून संबंध होते सांगितलं. वृत्तपत्रानं त्याचं निवेदनही लांब मथळा देऊन पहिल्या पानावर छापलं.

तब्बल सात ते आठ दिवस वृत्तपत्र क्रिकेटमधील सौदेबाजीच्या बातम्या डोक्यावर घेऊन नाचत होती. पुण्या मुंबईतील मराठी-इंग्रजी वर्तमानपत्रांना तर ऊत आला होता. जगात मोठा मूकंप झाल्याप्रमाणे ती वागत होती. लेख. अग्रलेख, स्फुटे, चौकटी, व्यंगचित्रे अशा वेगवेगळ्या जागी वृत्तपत्रांनी हा विषय खेळता ठेवला.

क्रीडाक्षेत्रातल्या सौदेबाजीची ही घटना महत्त्वाची आहे याबद्दल कुणाचे दुमत नाही. पण वर्तमानपत्रांनी त्याचा इतका बाऊ करावा? जर्नालिझमच्या कोणत्या कॉलेजात या प्रकारची पत्रकारिता शिकवली जाते ठाऊक नाही.

आफ्रिकी क्रिकेट मंडळानं गुन्ह्याची कबुली देणाऱ्या कप्तानाची उचलबांगडी केली. दुसऱ्या दिवशीच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानाचा 90 टक्के भाग या सौदेबाजीविषयक मजकुरानं व्यापला होता. डाव्या कोपऱ्यात झुपाटा लाहिरी या भारतीय वंशाच्या लेखिकेला 'पुसित्झर' पुरस्कार मिळाल्याची लहानशी बातमी होती. डाव्या कॉलममध्ये शिवसेनेचा औरंगाबाद पालिका निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे सांगणारी चार ओळींची बातमी होती. बस्, अवांतर मजकूर इतकाच.

जनमानसात क्रिकेट या खेळाविषयी असलेलं प्रेम लक्षात घेऊन केवळ लोकानुनयाचा भाग म्हणून संपादक या बातमीशी खेळत होते की त्यांना स्वतःलाच या क्रीडाप्रकाराचं विशेष आकर्षण असल्यानं त्यांच्याकडून अभावितपणे हे घडले हे समजणं मुश्किल आहे. पण पत्रकार अनेकदा तारतम्य सोडून वागतात हे खरं आहे. खास करून क्रिकेटविषयक घटना छापताना त्यांचा तोल जाताना दिसतो.

क्रिकेट हा मुळात बेभरवशाचा खेळ. 'नशीब' हा ज्या खेळातला महत्त्वाचा घटक असतो. त्याकडे जुगारी लोकांचे लक्ष गेलं नाही तरच नवल, एका सामन्यात सामनावीर म्हणून गाजलेला फलंदाज नंतरच्या सामन्यात दोन्ही डावात शून्यावर बाद होऊ शकतो, पहिल्या डावांत विक्रमी बळी घेणाऱ्या गोलंदाजाला दुसऱ्या डावात फलंदाज फोडून काढतात. एका मालिकेत सर्वोत्तम ठरलेला खेळाडू दुसऱ्या मालिकेत इतका अयशस्वी ठरतो की त्याला संघातून हाकलण्याची मागणी होऊ लागते. जुगाराला आमंत्रण मिळावं अशा बऱ्याच गोष्टी या खेळात आहेत.

तरीही कप्तानानं रीतसर जुगारात सामील व्हावं हा प्रकार कुणालाही खटकावा असा आहे. अर्थात वृत्तपत्रांनी या घटनेचा किती बाऊ करावा हा प्रश्न उरतोच. आठवडाभराची वर्तमानपत्रं पाहिली तर क्रिकेट आणि सट्टेबाजी यांखेरीज या काळात दुसरी महत्त्वाची घटना पृथ्वीवर घडली नाही असा एखाद्याचा समज व्हायचा.

सट्टेबाजीची पाळेमुळे 

या देशात क्रिकेट हा प्रकार हिंदी सिनेमाइतकाच लोकप्रिय आहे. तरीदेखील देशात पाच टक्के लोक क्रिकेटच्या बॉल स्टम्प पॅड इत्यादी सामग्री वापरून तो गल्लोगल्ली टेनिसचा बॉल वापरून क्रिकेट खेळला जातो. या वास्तवाची जाणीव या खेळाबद्दल बोलता लिहिताना बाळगायला हवी. हिंदी चित्रपटांचा चाहता वर्ग हा जसा चित्रपटाचा नाही तर त्यातल्या नटांचा चाहता असतो तसं क्रिकेटप्रेमिकांचही असतं. ते क्रिकेटपेक्षा आवडत्या क्रिकेटियरवर प्रेम करतात. बऱ्याचदा आवडते खेळाडू बाद झाले की सामन्यातला त्यांचा इंटरेस्ट संपतो.

सौदेबाजीमुळे या खेळाला आता वल्लभभाई पटेल स्टेडियमवर खेळल्या (की खेळवल्या) जाणाऱ्या फ्री स्टाईल कुस्तीचा दर्जा येणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे. शीतपेय बनवणाऱ्या कंपन्या सामने पुरस्कृत करू लागल्यापासून क्रिकेट खेळामागील राष्ट्रीय भावना केव्हाच नष्ट झाली आहे.

क्रिकेट सामन्यांची वाढती संख्या, टीवी, क्रीडा साप्ताहिकातर्फे या खेळाचे पुरवले जाणारे लाड, खेळाडूंना मिळणारे ग्लॅमर, खेळाडूमागे धावणाऱ्या प्रायोजक कंपन्या, जाहिरात संस्था, यामुळे आपल्या देशात या खेळाला इंडस्ट्रीजचं रूप आलं आहे. व्हिडिओ युनिटमधले कामगार, खेळपट्टीची देखभाल करणारे कर्मचारी, क्रीडातज्ञ समालोचक, मुक्त क्रिडापत्रकार असा अनेकांचा रोजगार या इंडस्ट्रीवर अवलंबून आहे. सट्टेबाजीची पाळमुळ किती खोलवर गेली आहेत. भारतीय क्रिकेट क्षेत्रात ती शिरलीत की नाही, या प्रश्नाच्या उत्तरावर बरंच अवलंबून आहे. कदाचित त्याचं उत्तर होकारार्थी आलं तर या इंडस्ट्रीला मोठा धक्का बसेलच पण क्रिकेट शौकिनांचं भावविश्वही यामुळे फार हादरून जाईल.

आफ्रिकी क्रिकेटसंघाच्या कप्तानाच्या गैरव्यवहारामुळे निर्माण झालेली गुंतागुंत, क्रिकेटमधल्या सौदेबाजीची तंत्रे, क्रिकेटविश्वातील सौदेबाजीची इतिहासातील उदाहरणं इत्यादी घटनांचा वेध वृत्तपत्रं या निमित्तानं घेतील असे वाटले होते. वास्तविक इंटरनेटमुळे अलीकडे संशोधनात्मक मांडणी खूप सुलभ झाली आहे. पण काही अपवाद वगळता वृत्तपत्रांनी निराशा केली, अग्रलेखातील मल्लीनाथी किंवा शेरेबाजी यांच्यापलीकडे जायची सवय वृत्तपत्रांनी लावून घेतली तर ती इलेक्ट्रॉनिक वृत्तप्रसारणांवर मात करू शकतील.

हे शक्य वाटत नाही कारण वृत्तपत्रसृष्टी आजचं चित्र फार खेदजनक आहे. मोठ्या वृत्तपत्रांतील मालकांचा वरचष्मा वाढू लागल्यापासून वृत्तपत्रांची दिवसेंदिवस दयनीय अवस्था होत चालली आहे. टीव्हीनं सांस्कृतिक जगात निर्माण केलेल्या सवंग वातावरणाचा थेट परिणाम त्यांच्या रंगीत पुरवण्यांवर दिसू लागला आहे. महाराष्ट्र टाइम्सची रंगीत पुरवणी निघू लागल्यापासून 'बाँबे टाइम्स' ही टाइम्सची एरवी उथळ वाटणारी पुरवणी दर्जेदार वाटू लागली आहे. एवढं एक उदाहरण या क्षेत्रातील दिवाळखोरी सूचित करायला पुरेसं आहे. 

सट्टेबाजीमुळे क्रिकेटसारख्या खेळात येऊ घातलेली सवंगता, रद्दी टीव्ही मालिका, प्रतिष्ठित वृत्तपत्रांच्या अप्रतिष्ठित रंगीत पुरवण्या, अभिरुचीहीन एकपात्री कार्यक्रम, उथळ ऑर्केस्ट्रा हे सर्व पाहिले की सांस्कृतिक प्रदूषणाचे संकट आता क्रीडा आणि प्रसारमाध्यमांच्या उंबरठ्यापाशी येऊन पोचलं की काय, अशी शंका येऊ लागते. नीतिमत्तेपासून दूर सरकत चाललेली आजची वृत्तपत्र या प्रदूषणाबद्दल किंवा क्रिकेट क्षेत्रातल्या सट्टेबाजीबद्दल शेरेबाजी काय आणि किती करणार.

Tags: क्रिकेट आणि वृत्तपत्रे… सट्टेबाजी जनअरण्य अवधूत परळकर avadhoot paralkar cricket ani vruttapatre sattebaji #janaranya weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके