'करी मनोरंजन जो मुलांचे। जडेल नाते प्रभुशी तयाचे' अशी त्यांची एक व्यापक भूमिका होती. अर्थात 'मनोरंजन' याचा गुरुजींना अभिप्रेत असलेला अर्थ फडके प्रभृती कलावाद्यांपेक्षा वेगळा होता.
बालसाहित्य आणि कुमारसाहित्य यांच्या निर्मितीत साने गुरुजींचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्या साहित्याचा वाङ्मयीन आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून तपशीलवार अभ्यास झाला आहे. 'करी मनोरंजन जो मुलांचे। जडेल नाते प्रभुशी तयाचे' अशी त्यांची एक व्यापक भूमिका होती. अर्थात 'मनोरंजन' याचा गुरुजींना अभिप्रेत असलेला अर्थ फडके प्रभृती कलावाद्यांपेक्षा वेगळा होता. ही गुरुजींची भूमिका त्यांच्या साहित्य आणि जीवन यांच्यासंबंधीच्या विशिष्ट विचारांतून निर्माण झाली होती. मातेची ममता, शिक्षकाचा संस्कारवादी दृष्टिकोन, आणि देशभक्ताचे उत्कटतेने रसरसलेले राष्ट्रप्रेम या पार्श्वभूमीवर नव्या भारतासाठी मुलांची नवी पिढी घडविण्यासाठी गुरुजींचा हा सारा खटाटोप होता. त्यांचा 'श्याम' आणि त्याची 'आई' यांची निर्मितीही 'धडपडणाऱ्या मुलांसाठी काही तरी करण्याच्या त्यांच्या दृष्टीतून झाली आहे. 'मातृहदयाचे मंगल स्तोत्र गाणारा' महाकवी हे त्यांचे आचार्य अत्रे यांनी केलेले वर्णन म्हणूनच सार्थ वाटते.
साने गुरुजींच्या एकूणच साहित्यात त्यांच्या बालमानसचित्रणाचे स्थान किती महत्त्वाचे आहे याचा वेध घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे. साने गुरुजींच्या कथानिर्मितीने मराठी कथेतील बालमानसचित्रणाला कितपत आशयघन आणि समृद्ध बनविले हे पाहण्याचाही येथे हेतू आहे. मला असे वाटते की, बालसाहित्य आणि बालमानसकथा निर्मितीचा आणि त्यातून प्रगट करावयाच्या बालमानसचित्रणाचा गुरुजींचा हेतू इतर बालसाहित्य कथाकारांपेक्षा वेगळा होता.
साने गुरुजींची कथानिर्मिती त्यांच्या संवेदनशील व्यक्तित्वाशी आणि त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाशी इतकी निगडित होती की या वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या बालमानसचित्रणाचा विचार करता येणारच नाही.
भारतीय स्वातंत्र्यासाठी पेटलेल्या संग्रामात कोणत्याही टोकाला जाऊन आहुती देण्याची तयारी असणाऱ्या तत्कालीन तरुण पिढीचे एक सुरेख प्रतीक म्हणजेच साने गुरुजी. पण गुरुजींचे हे आत्मदान जितके क्रांतिकारी जाणिवांनी प्रेरित झाले होते, तितकेच त्याला माणुसकी, सहवेदना आणि सर्वकष अन्यायाविरुद्धची चीड यांचीही पार्श्वभूमी होती. त्यातही विशेष म्हणजे त्यातून जशी भारतीय चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेण्याची तयारी, वैयक्तिक उत्कर्षाचा मोह टाळून, त्यांनी दाखविली, तितकीच त्यांच्या संवेदनशीलतेतून त्यांना सजग आणि रसडोळस साहित्याची निर्मिती करता आली.
लोकशाही समाजवाद निर्माण झाल्याशिवाय भारतीय समाजाचे कोणतेही प्रश्न वा समस्या सुटू शकणार नाहीत ही त्यांची दृढ़ जाणीव होती. या सर्वांसाठी कच्चा माल असणाऱ्या संस्कारक्षम असलेल्या लहान मुलांविषयी असलेल्या त्यांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा यातूनच त्यांच्या बालमानसचित्रणाची निर्मिती झालेली दिसते.
खेदाची गोष्ट ही की, गुरुजींच्या या योगदानाची आणि त्याच्या विविध परिमाणांची व्यामिश्रता तपासून घेण्याचे कष्ट घेण्याऐवजी काही समीक्षकांनी त्यांच्या या लेखनाकडे उपेक्षेने आणि हेटाळणीने पाहिले आहे.
वास्तविक मुलांविषयीचा विश्वास, वात्सल्य, अनुकंपा अशा अनेक संमिश्र जाणिवांतून त्यांच्या कथांतील बालमानसचित्रण आकाराला आले आहे. या चित्रणात नुसते मुलांना जाणून घेण्याचे कुतूहल नाही. वाङ्मयीन तटस्थता किंवा अलिप्तता नाही. एका विशिष्ट ध्येयवादी जीवनदृष्टीतून गुरुजींच्या जीवननिष्ठेची बालसृष्टीशी, बालांच्या भावजीवनाशी, त्यांच्या 'लहान मुला-मुलींच्या प्रेरणांशी एक अतूट सामिलकी झाली आहे. साने गुरुजींचे व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्त्व व त्यांचे बालमानसचित्रण एकमेकांपासून वेगळे काढता येत नाही, येणारही नाही. हीच त्यांच्या बालमानसचित्रणाच्या निर्मितीची मर्यादा आणि हेच त्यांच्या संस्कारक्षम बालविश्व निर्मितीचे यश म्हणता येईल.
त्यामुळे आपल्या कथेत लहान मुलांचे वर्णन करताना, त्यांच्या शारीर, मानसिक बौद्धिक, भावनिक, सामाजिक व सांस्कृतिक जाणिवांचे चित्रण करताना गुरुजी स्वतःच अगदी मुलांहून मूल झालेले दिसून येतात. पण या प्रक्रियेतही एक प्रकारचे दुभंगलेपण आहे. गुरुजींचे संस्कारक्षम मन एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडत असते. ते व्यक्तित्व चित्रणाचा विषय असते. विशिष्ट ध्येयप्राप्तीच्या झपाटलेपणातून ही निर्मिती होत असते. त्यामुळे गुरुजींचे हे मन एकाच वेळी या त्यांच्या बालमानसचित्रणाचे मार्गदर्शक आणि नियंत्रकही असते. त्यामुळे कथेतील पात्रे काही वेळा त्यांच्या हातातील कळसूत्री बाहुली बनतात.
वास्तविक, साने गुरुजी व्यक्तिस्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते पण त्यांच्या कथेतील व्यक्ती काही वेळा गुरुजींच्या अपरंपार मायेमुळे, नको तितक्या आत्मभानामुळे कोमेजलेल्या दिसतात. त्यामुळे काही वेळा जसे स्वतः साने गुरुजीच 'मूल' झालेले आढळतात, तसे काही ठिकाणी त्यांच्या कथेत आलेली मुले अकाली प्रौढत्व स्वीकारताना दिसतात. उदा. हिंदु-मुस्लिम संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लिहिली गेलेली आणि अत्यंत गाजलेली 'शशी' ही कथा साने गुरुजींच्या अशा प्रकारच्या बालमानसविश्लेषणाचे एक उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. या कथानिर्मितीचा त्यांचा हेतू कितीही चांगला असला आणि संवेदनशील बाल किशोर मनावर या गोष्टीचा खूप प्रभावही पडत असला- (अजूनही तसा तो पडतो, प्रत्यक्ष असा अनुभव मला आला आहे) तरी कथेतील 'शशी आणि अमीन' या स्वभावरेखांचा नैसर्गिक परिपोष खऱ्या अर्थाने या दीर्घ कथेत होत नाही, त्यामुळे व गुरुजींनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे ध्येयवादाचे/ मृत्यूविषयीच्या सुप्त आकर्षणाचे आरोपण 'शशी' व 'अमीन' या दोन्ही भावकोवळ्या व्यक्तिरेखांवर केल्यामुळे या व्यक्तिरेखा स्वाभाविक न राहता केवळ सद्भाव आणि सद्गुणांचे आणि अमूर्त आदर्शांचे पुतळे बनतात असे मला वाटते.
ही त्यांच्या विशिष्ट व्यक्तिचित्रण- पद्धतीची फलनिष्पत्ती आहे, असे दिवंगत नानासाहेब गोरे यांचेही मत दिसते. ते लिहितात 'व्यक्तित्वाचे रसग्रहण करतानासुद्धा तुम्हांला (साने गुरुजींना) त्यातले वैचित्र्य उपभोगता येत नाही. कारण तुम्हांला मानवा-मानवांमधला जणू एकच भावबंध मान्य असतो. तो म्हणजे प्रेमाचा आणि प्रेमामधली एकच छटा मान्य होते. ती म्हणजे वात्सल्याची. तुमच्या मनाच्या ह्या एकारलेल्या घडणीमुळे असे झाले की तुमच्या वाङ्मयाला महत्ता प्राप्त होण्यासाठी सृष्टीमधल्या अपार वैचित्र्याचे प्रतिबिंब जे त्यामध्ये उतरायला हवे, नेमके तेच उतरले नाही. लांबी, रुंदी व उंची या प्रमाणामुळे वाङ्मयाला घनत्व प्राप्त होते, त्याप्रमाणे वास्तवता, वैविध्य व आशय या त्रि-प्रमाणामुळे वाङ्मयाला घनत्व प्राप्त होते. पण तुमच्या सर्व कृतींना ही तिन्ही प्रमाणे प्राप्त होण्याऐवजी त्यांना तुमच्या मनातील आशयाचे एकमेव प्रमाण प्राप्त होत गेले आणि तुमच्या कृतींना प्रचाराचा म्हणजे सगळ्यांमध्ये एकच रस पाहण्याचा आणि सगळ्यांना एकाच वृत्तीचे बनविण्याच्या प्रयत्नांचा वास लागून त्या कृतींत न्यून निर्माण झाले. ('नारायणीय' पृ.139)
नानासाहेबांचे हे विश्लेषण साने गुरुजींच्या बालमानस चित्रणाच्या संदर्भातही तंतोतंत लागू पडते. साने गुरुजींच्या बालमानस आकलनाच्या स्वरूपाचा विचार करता, असे दिसून येते की एका बाजूने ते नानासाहेब म्हणतात त्याप्रमाणे सपाट आणि ठराविक ठशाचे (त्यांच्या वाङ्मयातील एकूणच व्यक्तिचित्रणाच्या पद्धतीचे) असले तरी दुसऱ्या बाजूने या बालमानसचित्रणाचा परीघ व्यापक असलेली ही दिसून येतात. राजकारण, समाजकारण, शिक्षणकार्य या निमित्ताने त्यांना जी भटकंती करावी लागली त्यामुळे, शाळा आणि छात्रालयांतून त्यांनी जी भ्रमंती केली त्यामुळे त्यांनी आपल्या लहान मुलांच्या चित्रणात विविध स्तरांवरील पात्रांचा समावेश केला. एका अर्थाने ते निखळ 'पांढरपेशी' किंवा 'सदाशिव पेठी' राहिले नाही. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्याही समाजातील विविध स्तरांतील मुला-मुलींचा त्यांच्या कथेत आणि 'गोड गोष्टी'त समावेश झाला आहे. त्यांच्या कथांतील किंवा गोष्टीतील पात्रांची नुसती नावे पाहिली तरी ही विविधता दिसून येते.
गुरुजींच्या जीवनविषयक मूल्यांच्या काही ठाम जाणिवांतून- उदा. सत्य, शिव, सौंदर्य याबरोबरच सौहार्द, समता, करुणा, ममता या भावनिक जाणिवांच्या आधारे त्यांचे बालक किशोर कुमार (बालमानस) चित्रण दृग्गोचर होते. शशी असो, मिरी असो, गोपाळ, रामा, जनी, अमीन, रहीम कोणतेही 'मूल' असो ते साने गुरुजींच्या प्रेमभावनेतून न्हाऊन निघालेले दिसून येते. पण या प्रत्येकाच्या वेगळ्या व्यक्तित्वाची आणि समस्यांची सूक्ष्म जाणीव असूनही तिला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप देताना मात्र गुरुजींची अथक जीवननिष्ठा आड आलेली दिसते.
त्यांच्या कथेत मुलांचे- त्यांच्या पालकांचे परस्पर संबंध, शाळांतील विविध सवंगड्यांशी असलेले संबंध, स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यात प्रभातफेऱ्या, प्रार्थनासभा, राष्ट्रीय गाणी, छात्रालय- वसतिगृहातील मुलांचे असलेले संबंध यांचे नीटस चित्रण येते. गरीब-आर्थिक दारिद्याने नाडलेले पालक, श्रमिक, दलित शेतकरी कुटुंबातील आईबाप, भूमिहीन शेतमजूर, फेरीवाले, हमाल यांच्या सहनशील व समजूतदार मुलांची वर्णने व समस्याही यात येतात. हटवादी, धर्मवेड्या, जातिवादी, मुलांच्या भावना समजून न घेता त्या दडपून टाकणाऱ्या पालकांचे चित्रणही येते आणि त्यासंबंधीचा रागही व्यक्त झालेला दिसून येतो. ते एका ठिकाणी म्हणतात, शिक्षणशास्त्रात असा एक नियम आहे. की मुलाला 'तू दगड आहेस, धोंडा आहेस असे म्हटल्याने तो मुळात दगड धोंडा नसला तरी होतो. आपल्या लादलेल्या श्रद्धेचे ते फळ असते.' (विश्राम पृ. 107)
साने गुरुजींच्या विविध पात्रांची वर्णने सरळसरळ काळ्या, पांढऱ्या रंगात असतात. त्यावर खुद्द त्यांचे स्पष्टीकरण असे- भरलेले हृदय रिकामे होईपर्यंत लिहावयाचे. दुसरे कलातंत्र मला येत नाही. तंत्र-मंत्रमय कलेचा येथे कदाचित खूनही असेल. कोणाला माहीत. (विश्राम पृष्ठ 7.)
साने गुरुजींच्या बालक सृष्टीतील बहुतेक मुलांना निसर्ग, नदी, समुद्र, वृक्षवल्ली, फुले, पाखरे यांच्याबद्दल आकर्षण आहे. त्यांची बहुतेक सर्व बालसृष्टी आई, भावंडे, शिक्षक, परमेश्वर यांना मानणारी आहे. कारण या बालसृष्टीवर गुरुजींच्या 'पंढरी" किंवा 'श्याम'च्या भावकोवळ्या संवेदनशील मनाची गडद छाया पडलेली दिसून येते.
साने गुरुजींच्या बालमानसचित्रणाच्या सर्व वाङ्मयीन मर्यादांसह त्यांच्या बालमानसचित्रणाचा अजूनही बालमनावर विलक्षण प्रभाव असलेला दिसतो. त्याचे रहस्य वा मर्म आचार्य अत्र्यांनी पुढील ओळींत अचूक शब्दांत पकडलेले दिसते. ते म्हणतात, 'त्यांचे अंतःकरण एखाद्या लहान मुलासारखे निष्पाप आणि निर्मळ होते. प्राजक्ताच्या फुलांसारखे कोमल. केव्हा फुलेल, केव्हा कोमेजेल सांगता येणार नाही. मुलांबरोबर हसणे, रडणे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे या गोष्टी गुरुजींनाच जमत असत. याचाच परिणाम म्हणून 'गुरुजींचे वाङ्मयसुद्धा जाईजुईच्या सड्याप्रमाणे आहे. लहान लहान त्रोटक वाक्ये, साधी सुटसुटीत सामर्थ्य व सौष्ठवसंपन्न भाषाशैली यामुळे त्यांचे साहित्य अमर आहे.' (आचार्य अत्रे : समाधीवरील अश्रू- पृष्ठ 72).
थोडक्यात, साने गुरुजींच्या बालमानस चित्रणाचा विचार करता 'करी मनोरंजन जो मुलांचे/जडेल नाते प्रभुशी तयाचे' या प्रवृत्तीतून ते निर्माण झाले असले तरी त्याचा मराठी कथेतील बालमानस चित्रणावर एक असाधारण ठसा उमटलेला आहे असे म्हणता येईल.
Tags: आचार्य अत्रे कुमारसाहित्य बालसाहित्य बालमानस साने गुरुजी Acharya Atre Kumarasahitya Balsahitya Balmanas Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या