“आपल्या आईपासून दुरावण्याची जी चूक माझ्याकडून झाली, ती कोणाकडूनही होता कामा नये. मी लहान होते म्हणून झाली असेल, ते काहीही असो; पण तुम्ही असं होऊ देऊ नका. आईची चांगली काळजी घ्या. तिला काहीही झालेलं असणार नाही. अरे तिचं वय तरी काय आहे असं? आणि तुम्ही मुलं काय कमी का आहात? अगदी संख्येनंसुद्धा ढीगभर आहात. आईचा पर्याय कसला शोधता? आईला पर्याय नसतो हे कधीही विसरू नकोस. तुझ्या इतर भावंडांनाही नीट समजावून सांग! तू एवढा हिंडतोस-फिरतोस त्याचा उपयोग काय? समजलं का मी काय म्हणतेय ते?"
'नमस्कारम् तमिऴ् मावशी!' मी मावशीच्या पायावर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार करण्यासाठी वाकलो. तेवढयात एकाएकी वीज कडाडल्यागत तिचा एक मुलगा गरजला. मावशीला नमस्कार करून उठून पाहतो तर समोर तंबी उभा होता. “आइ सिंप्ली डोन्ट अन्डरस्टॅन्डऽ यू! व्हाय आर यू हिअर? वुई आर नॉट्ट रिलेटेड टू यू! वुई आर नॉट युवरं रिलेटिव्हज्. अन्डरस्टँड?" तमिळ मावशीच्या घरात शिरल्याशिरल्याच तिच्या एका थोराड अंगापिंडाच्या धाकट्या मुलानं म्हणजे माझ्याच एका मावसभावाने अंगविक्षेपांसह अकांडतांडव करीतच मला सुनावलं. "ठीक आहे. ठीक आहे. ती नातीबिती सगळी बाजूला राहू दे! आपण समजा एकमेकांचे मावसभाऊ वगैरे नसलो तरी निदान एकाच देशात राहणारे 'देशबांधव' तर आहोतच ना?" मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करीत म्हटलं. “नो नोऽ! यू आर नॉर्थ इंडियन ॲन्ड वुई आर साउथ इंडियन्स!” तो पुन्हा गुरगुरला, “आइ डोन्टऽ अन्डरस्टैंड, वाय यू कम हिअर अगेन ॲन्ड अगेन!” तंबी बराच वेळ बडबडत होता, मी शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होतो. मग मावशीनं मला खुणेनंच तिच्या शेजारच्या पाटावर सांगितलं.
मी पाटावर मांडी घालून बसलो. थोडयाच वेळात उजव्या नाकपुडीत हिऱ्याची लखलखती चमकी घातलेली मावशीची एक मुलगी- ललिता आली आणि तिनं मंद स्मितहास्य करीत माझ्यासमोर गरम-गरम कॉफी ठेवली. क्षणार्धात माझ्यासमोर एक केळीचं पान मांडण्यात आलं, एकीनं चपळाईनं त्या केळीच्या उजव्या पानावर चार इडल्या वाढल्या, सुबक द्रोण ठेवला. सगळं काही व्यवस्थित चालू होतं, रीतीपद्धतीनं; पण आल्याआल्या जे काय घडलं ते मला हे फार अनपेक्षित नव्हतं, पण त्याचा उद्रेक इतका भयंकर असेल असं वाटलं नव्हतं. काहीजण म्हणतात त्याप्रमाणे ती सावत्र असली म्हणून काय झालं, ती माझी मावशीच होती, आणि आईनं, आजीनं तर सावत्रपणा मुळात नाही हे कधीच सिद्ध केलेलं आहे. घरात ढीगभर नोकर-चाकर होते; तरीही आजीनं आपल्या साऱ्या मुलींचं अगदी तान्हेपणापासून सर्व काही केलं. हो, आता घरात बरीच मुलं असल्यामुळे मोठ्यांच्यात आणि धाकट्यांच्यात अंतर बरंच राहिलं; ह्याला कोण काय करणार? आता केवळ ह्याच कारणावरून कोणी सावत्रपणाचे जावईशोध लावले तर त्याला काय करणार?
अशा विघ्नसंतोषी माणसांच्या तोंडाला का हात लावता येतो? मुली मोठ्या झाल्यावर शेजारी-पाजारी असतात ना उगाचंच कान फुंकायला. कोणी गोरे परदेशी आले; मोठ्या विद्वत्तेचा नि पांडित्याचा आव आणून त्यांनी ह्या बहिणींना सांगितलं की ही तुमची सावत्र आई आहे म्हणून! असले उपद्व्याप करून अशा विघ्नसंतोषी पंडितांना काय समाधान मिळतं कोण जाणे! पण तेव्हापासून आमची ही मावसभावंडं उगाचंच आम्हांला दुरावली, आमच्याशी फटकून वागू लागली. तमिळ ही आमची सगळ्यांत मोठी म्हणजे ज्येष्ठ मावशी. फार लहान वयात ती दक्षिणेकडे आली नि त्यामुळे तिला तिच्या आईजवळ म्हणजे आमच्या आजीजवळ फार काळ राहता आले नाही. त्याचा परिणाम असा झाला की तिच्या आईकडून जे संस्कार तिला अन्यथा मिळाले असते ते तेवढ्या प्रमाणात मिळाले नाहीत. आजीची जेवढी छाप आमच्या आईच्या नि इतर मावश्यांच्यावर दिसते तेवढी ती तमिळ मावशीवर दिसत नाही, हे मात्र खरं आहे. एकदा माझ्याशी बोलता बोलता शेजाऱ्या-पाजाऱ्यांचा विषय निघाला तेव्हा आजी मोठ्या दुःखाने म्हणाली होती की, “अरे माझ्याच पोटच्या मुलींच्यात मी असा भेदभाव करीन का रे कधी?" आजीच्या जखमेवरची खपली अगदी सहजपणे निघाली होती.
“आजी, अगं जगातील लोक काय बोलतात, बरळतात. आपण कशाला लक्ष द्यायचं त्यांच्या बरळण्याकडे? सत्य काय हे आपल्याला माहीत आहे." मी आजीला समजावण्याचा प्रयत्न करीत म्हटलं. “त्याचं काय आहे” आजीनं पदरानं आपले डोळे टिपले नि ती हळूहळू सांगू लागली, “अरे, तमिळ ही माझी पहिली मुलगी ज्येष्ठ कन्या, त्यामुळे स्वाभाविकच आमच्यात वयाचं अंतर कमी आहे. मीही तिच्या लहानपणी लहान होऊन तिच्याशी खेळत असे. मी तिची सवंगडी झाले. तिच्याशी फुगडया-झिम्मा खेळले, सागरगोटे खेळले. आम्ही दोघींनी झाडावर चढून चिंचा काढल्या, तऱ्हेतऱ्हेच्या फुलांचे गजरे करून केसात माळले. मी तिची जिवाभावाची मैत्रीण झाले होते. तमिळ मोठी झाली. वयात आली तेव्हा अगस्ती ऋषी देशाटन करून आले होते, त्यांच्या आग्रहावरून तिला दूरदेशी दक्षिणेत दिल. त्या काळी तो प्रदेश खरोखरच दूर होता रे बरं, तेव्हा अडचणी तरी किती असायच्या म्हणून सांगू? असंख्य! असंख्य डोंगर, विंध्य, सातपुड्यासारखे उंच उंच महाकाय पर्वत, गोदा-कृष्णेसारख्या अवखळ नद्या, काट्याकुट्यांनी नि हिंस्र श्वापदांनी भरलेली जंगलं आणि दंडकारण्यासारखी महाभयंकर घनदाट अरण्यं! ह्या सगळ्या प्रदेशातून ना कुठे धड वाटा, ना कुठली वाहतुकीची साधनं.
ह्या सगळ्या अडचणींमुळे काय झालं की प्रदीर्घ काळ आमच्यातला संपर्कच तुटला बघ! काळ काय, चालूच होता. आमच्यातला संपर्कच तुटल्यामुळे कालपरत्वे आमच्यातलं मानसिक अंतरही दुर्देवानं वाढत गेलं. मी तरी काय करणार? खूप खूप वाईट वाटायचं रे! पोरीच्या आठवणीनं मी रात्ररात्र जागी असायची, पण मी तरी काय करू शकत होते? आमच्यातला संबंध पार तुटल्यासारखा झाला काही काळ. आणि दुर्दैवानं पुढे काही दुष्ट शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी तिच्या मुलांच्या डोक्यात ही सावत्रपणाची कल्पना भिनवली! आता काय सांगायचं रे! जगाचा तरी काय न्याय असतो बघ ना! माझी पोटची पोर ती नि तरीही जगानं माझ्या मातृत्वावर खुशाल सावत्रपणाची तप्त प्रतिमा उमटवून चर्रकन डाग द्यायचे.” एरवी अत्यंत गंभीर, खंबीर, निश्चयी, तर्ककर्कश आणि कर्तव्यकठोर असणाऱ्या आमच्या आजीनं आपल्या हृदयाच्या एका कोपऱ्यात दडवलेलं जळजळीत दुःख एवढ्या वर्षांत प्रथमच माझ्यापुढे येऊ दिलं होतं. आजीच्या मातृहृदयात दडून बसलेलं हे दुःख ऐकून, तिची अजूनही भळभळणारी जखम पाहून मीही काही काळ सुन्न झालो होतो. बिचारी आजी, पोटची पोरच तिच्यावर रुसली होती. तमिळ मावशीकडे माझं जाणं-येणं नित्यनेमानं होत होतं. मावशीचं प्रेम माझ्यावर होतंच, पण तिच्या मुलांनीही मला पाहुणा म्हणून स्वीकारलं होतं. शेवटी प्रेम हे सहवासातूनच निर्माण होत असतं. परवा मी अचानकपणे गेल्यावर काय योगायोग होता कोण जाणे, पण मावशीनंच कधी नव्हे ती सगळ्यांची चौकशी केली. मी जेव्हा आईच्या प्रकृतीचा विषय काढला तेव्हा ती किंचित अस्वस्थ झालेली दिसली. बोलता बोलता अचानकपणे थांबली.
"का गं मावशी, काय झालं?'
“काही नाही रे, अलीकडे माझी प्रकृतीही बिघडली आहे की काय असं मला वाटायला लागलंय” मावशी जरा गंभीरपणानंच म्हणाली.
"तुझी? तुला काय झालं?” मी मोठया काळजीनं विचारलं.
"खरं सांगायचं तर मला काहीही झालेले नाही. पण आमच्या घरातल्या दादा लोकांचं वागणं पाहून मला वाटतं आणि त्यांनाही वाटतं की आई आता कालबाह्य झाली म्हातारी झाली म्हणून! तसं जाहीरपणे चांगलं बोलतात माझ्याबद्दल, पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र त्यांना माझी माया पुरेशी वाटत नाही. मला नव्या गोष्टी कळत नाहीत; नवं तंत्रज्ञान मला समजणार नाही असं एकसारखं म्हणत असतात अरे ह्यांना जे काय कळतंय ते मीच शिकवलं आहे ना त्याना की जन्माला येतानाच सारं शहाणपण घेऊन आले होते?" मावशी एकाएकी खवळून म्हणाली. “कोणे एके काळी मी आईशी जरा फटकून वागले, पण तेव्हा मला कळलंच नाही की आपण काय चूक करत आहोत ते.” मावशी बोलता बोलता पुन्हा थांबली. “पण आईशी असं वागणं आपल्या हिताचं नसतं, हे मला उशीरानं असेल, पण उमगलं आहे.” एवढ्यात ललितानं समोर कॉफी आणून ठेवली. काहीही न बोलता आम्ही दोघांनी कॉफी प्यायला सुरुवात केली.
“हे बघ, तू इकडे केव्हाही ये, त्यात कसलीच अडचण नाही. हे घर तुझंच आहे समज!” कॉफीचे चार घोट घेऊन मावशी म्हणाली, “पण एक सांगू?”
“आपल्या आईपासून दुरावण्याची जी चूक माझ्याकडून झाली, ती कोणाकडूनही होता कामा नये. मी लहान होते म्हणून झाली असेल, ते काहीही असो; पण तुम्ही असं होऊ देऊ नका. आईची चांगली काळजी घ्या. तिला काहीही झालेलं असणार नाही. अरे तिचं वय तरी काय आहे असं? आणि तुम्ही मुलं काय कमी का आहात? अगदी संख्येनंसुद्धा ढीगभर आहात. आईचा पर्याय कसला शोधता? आईला पर्याय नसतो हे कधीही विसरू नकोस. तुझ्या इतर भावंडांनाही नीट समजावून सांग! तू एवढा हिंडतोस-फिरतोस त्याचा उपयोग काय? समजलं का मी काय म्हणतेय ते?"
“हो, जननी जन्मभूमिश्च
स्वर्गादपि गरियसी”
Tags: Agasti Rushi Tamil South Indians North Indian Avinash Biniwale अगस्ती ऋषी तमिळ साउथ इंडियन्स नॉर्थ इंडियन अविनाश बिनीवाले weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या