डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सम्यक् परिवर्तनाचा आग्रह बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांत अविनाश महातेकर हे आघाडीचे नाव आहे. विचार व कृती साथसाथ घेऊन जगणाऱ्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या अविनाश महातेकरांचे हे नवे सदर यापुढे दर महिन्याला प्रसिद्ध होईल.

'साधना' मध्ये नियमित लिहावं, हा निर्णय घ्यायला जवळजवळ एक वर्ष लागलं. अन्यत्र लिहितो. तिथल्या परिवाराशी जमून जातं. आपल्या लिहिण्याला एक अंतर्मनाचा सल आहे; तो समजून घेतला जाईल का? अनेक वेळा विषयानुरूप हा सल माझ्याकडून व्यक्त होतो. सहजगत्या आणि सौम्यपणे. तरीही त्यावेळची प्रतिक्रिया धड़ नसते. ज्येष्ठ, हे आम्ही असंच बोलणार, असा ग्रह करून आम्हांला उथळतेच्या जवळपास नेऊन सोडतात. यातनं मुख्य चर्चा आपसूक टळते. किंवा चुका आणि त्या दुरुस्त करण्याची संधी घेण्याचा प्रांजळपणा टाळला जातो. अगदी, ज्या परिवर्तनवादी चळवळीच्या वेगवेगळ्या प्रवाहात आपण सारेच उभे आहोत. ती अपरंपार आलबेल आहे, असं मानायचं काहीच कारण नाहीये. आज, सर्वच पातळीवर ज्या प्रकारचं पर्यावरण उभं राहिलंय. तेच मुळी आपलं काहीतरी चुकत होतं. हे सांगणारं आहे. अर्थात, कुणाचं काय चुकले, ही चर्चा हा मुख्य उद्देश नसतो. त्या आंतर संघर्षात मी कधीच रुची दाखवली नाही. ह्या ओघाने  निघणाऱ्या गोष्टी आहेत. 'साधना' मध्ये लिहावं असं मनात आल्यावर खूप गोष्टी नजरे समोर आल्या. त्यात पहिली गोष्ट, आमच्या आणि 'साधना' च्या नातेसंबंधाची. रिलेशनशिपची.

'मी' म्हणजे एक व्यक्ती आणि लेखक इतकं संभावित मला राहता येत नाही. ज्या अलिप्तपणाचं खूप कौतुक होत असंत, तो अलिप्तपणा चळवळीतल्या कार्यकर्त्याला पूर्णपणे साधलेला असतोच असं नाही. मी एका वैचारिक समूहाचा घटक बनतो; नि त्याच्या भल्याबुऱ्याशी निगडित होत जातो. ह्या पातळीवर मी कुठलीही रिलेशनशिप समजून घेत असतो. 

सत्तर-बहात्तरच्या काळात दलित तरुणांच्या विद्रोहाच्या संदर्भात 'साधना'ची भूमिका ही तारेवरची कसरत होती. थोर व्यक्तींच्या विचारांचे कंगोरे नि लोकानुनयवादी भूमिकेचा व्यवहार यांतला तो संघर्ष होता. त्यातून साधना तरून गेली ती केवळ सामाजिक बांधिलकीचा आयाम स्पष्ट झाल्यामुळेच. आजही 'साधना' ची धडपड सुसंस्कृत मनं घडवण्याच्या कामी येतेय ही कृतकृत्य करणारी गोष्ट वाटते. 'सुसंस्कृत'च्या नेमकेपणाबद्दल चर्चा असू शकते; पण एखाद्या साप्ताहिकाने, पत्रिकेने, प्रकाशनाने वैचारिक पौगंडावस्थेतील युवकांची मनं घडवायची जबाबदारी उचलावी, हा काळ शिल्लक राहिलाय का हा विवादास्पद प्रश्न आहे. अशा अंकांच्या माध्यमातून चळवळी करण्याचा एकूणच वकूब कमी झालाय. मुद्रण व्यवसायातील सहजता, स्पर्धा, वगैरे नावांखाली आणि वैचारिक क्रांतीची झूल घेऊन मुसंडी मारणाऱ्या गुबगुबीत अंकांच्या दडपणाखाली 'साधना' सारखे प्रकल्प तग धरून आहेत, हीच मोठी गोष्ट आहे.

बहात्तरचा सुमार होता. अनिल अवचटांसारखा संवेदनाक्षम कार्यकर्ता 'साधना'च्या संपादनाची जबाबदारी पहात होता. देशभर स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव वगैरे साजरा होत होता. रौप्यमहोत्सव म्हणजे चतकोर शतकाची गोष्ट; आणि साजरा होत होता, म्हणजे सरकारी खर्चाने सरकारी इमारतींवर रोषणाई वगैरे. सरकारी पैसा, सरकारी जाहिराती वगैरे. आपल्या संस्था-संघटना फार उत्सवप्रिय असतात. त्यांना स्वातंत्र्याच उधाण आलेलं, राष्ट्रभक्ती ही अशी संज्ञा आहे की तिला धरून लोंकांच्या डोळ्यांत अंजन घालणं कठीण. राजेरजवाड्यांच्या दसरा-दिवाळसणाचा माहौल लुकूलुकू  डोळ्यांनी बघण्याची आपली मानसिकता संपलेली नव्हती. आणि अनिल अवचटांनी 'साधना' चा अंक काढला. 

त्या, दरम्यान महाराष्ट्रातून दलितावरील अत्याचाराच्या कित्येक घटना चव्हाट्यावर आलेल्या. बावड्याच्या दलितांवर सामाजिक बहिष्कार ते सोन्नागावच्या दलित महिलेची नग्न धिंड, 'मराठा' त्या वेळचे खरमरीत दैनिक, 'सात दुःशासन' असा त्यांनी अग्रलेख लिहिता होता. वातावरणा अत्याचाराच्या विरोधात. आंबेडकरी चळवळीतल्या लिहू लागलेल्यांचाही हा उगवतीचा भर. अशा वातावरणात अनिल अवचटांसारखा संवेदनाक्षम कलावंत रूळलेल्या पायवाटेने जाणे कठीणच होते. त्यांनी आंबेडकरी आव्हाने थबथबलेल्या तरुणांना गाठले. मुंबईत, सिद्धार्थ विहार हॉस्टेलवर; वा तत्सम ठिकाणी. त्यांची स्पंदनं टिपली. त्यांना लिहितं केलं आणि स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्तानं ठिणग्यांनं लसलसलेला 'साधना' चा. स्वातंत्र्यदिन विशेषांक प्रकाशित झाला. अंधारातल्या जगांच्या स्वातंत्राचा अर्थ शोधणारा! 

चार सुखवस्तु उदारमतवादी वाचककांनी चाळून बाजूला करण्यापलीकडे, अनिल अवचटांच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांतुन आकाराला आलेल्या साधनेच्या अंकानं फार काही साधलं असतं, अशातला भाग नाही. पण वेगळीच खोडी झाली. राजा ढालेंचा औद्धत्यपूर्ण नकार चर्चेच्या मध्यभागी आला. राष्ट्रध्वजाचा अपमान, अर्वाच्य भाषा वगैरे दिशाहीन संहिताची चर्चा सुरू झाली. एकाएकी 'साधना' चा तो अंक शोधून शोधून मिळवायची गोष्ट ठरली. मग भाषेचा रांगडेपणा, संस्कृती, मानवी पिळवणुकीचे मूळ देशप्रेम, स्वातंत्र्य किती भारी गोष्ट, ठाम नकार देण्याचे औध्दत्य वगैरे गोष्टींवर दोन्ही बाजूंनी जोरदार चर्चा सुरू झाली. एक दुखणं वादळासारखं चर्चेत आलं. निमित्त 'साधना' आणि त्यातला राजा ढालेंचा लेख घडलं. देशावर  प्रेम करणारे खूप लोक असतात नि त्यांची देशप्रेमाची तऱ्याही वेगळीच असते. देशप्रेमाचा मक्ता  स्वतःकडे घेऊन इतरांना देशद्रोही ठरवण्यात वाकबगार असतात, खून-खराब्याची भाषा बोलून  जुन्या लढायांना उभारी देतात. त्या संबंध, जीवावर उठलेल्या वादळात दलित कार्यकर्ते जेवढे  खंबीर राहिले तेवढेच अनिल अवचटही खंबीर राहिलेले. चुकलंय किंवा पश्चातापाची भावना कुणाचीच नव्हती. त्या दरम्यानच एकूण आत्याचारांनी अस्वस्थ असलेल्या तरुणांची आंबेडकरी संघटना आकार घेत होती, 'साधने' तीन लेखाच्या चर्चेने त्यालाही वेग मिळाला.

साधना परिवारात दोन तट 'असावेत. 'दु:ख' सर्वांनाच मंजूर असावं. पण वेदनचं कारण काहींना पसंत नसावं. साधनाच्या काही ट्रस्टींनी राजीनामे दिले. या उभ्या झालेल्या गदारोळा मुळे एसेम चर्चेच्या केंद्रस्थानी आले. पुण्यातील युथ काँग्रेसच्या तरुणांनी, म्हणजे बहुतांश कांग्रेस पुढाऱ्याच्या सुपुत्रांनी 'साधना' वर मोर्चा नेला. एसेम त्यांना सामोरे गेले. मोर्चातील मुलं छाती बडवून म्हणत होती की 'राष्ट्रध्वजाचा अपमान... वगैरे वगैरे' एसेम म्हणत होते, तुमच्या बापाला जाऊन विचारा; ह्याच राष्ट्रध्वजासाठी मी तुरुंगाच्या फरशीवर झोपतोय. पण अशावेळी ऐकण्याच्या मन:स्थितीला एका संस्काराची आवश्यकता असते.

याच दरम्यान मुंबईतील तरुणांनी 'साधना' च्या समर्थनार्थ मोर्चा काढायचा निर्णय येतला. ढाले-ढसाळ अग्रेसर होते. दादर रेल्वे प्लॅटफॉर्मवर जमून आम्ही रात्रीच्या शेवटच्या पॅसेंजरने पुण्याला निघालो. तिथे पहिल्यांदा घोषणा दुमदुमली, 'हमारी साधना नही जलेंगी! ' 

इथं  'साधना' शी आमचं नातं जुळत चाललं. ती 'हमारी' होती, 'दलितोंकी' होती. 'साधना' जाळायला निघालेल्यांना आमचं सर्व शुचिर्भूतापलीकडंलं आव्हान होतं. म्हणून आम्ही 'साधना' च्या समर्थनार्थ पुण्यात मोर्चा काढला होता. पण हे नात टिकलं नाही, वाढलं नाही. तिथल्या तिथंच आटोपलं. असं का झालं, हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. पण झालं खरं.

राजा आणि नामदेव यांच्या समवेत पहाटेच्या पारीच आम्ही पुणे स्टेशनवर उतरलो. तेथून हा  शे-दीडशेचा तांडा शनवारातल्या 'साधना' वर माझ्या सोबत तेव्हा माझा मित्र विलास दाणी हा आलेला. 'साधना' कार्यालयात आमचं स्वागत वगैरे झालं. बैठकीच्या खोलीतल्या मधल्या खांबाला टेकून पांढऱ्या शूभ्र वस्त्रातले जे बसले होते तेच ना.ग.गोरे त्यांच्या आसपास कुठंतरी एसेम, अनिल अवचट होते. अन्य जे बसले होते त्यात बाबा आढाव असावेत, भाई वैद्यही असावेत.

नामदेव बोलत होता. पोततिडिकीनं बोलत होता. डावा हात पाठीमागं नि उजव्या हाताच्या बोटांसकट हालचाली, हा त्याचा अविर्भाच. बॉक्स बेलबॉटमची पँट नि पोपटी चटटयापट्ट्याच्या शर्ट हे त्याचं लिफ्तार 'साधने' तल्या वातावरणाला छेदून जात होतं. नामदेव तुटून पडला होता. 'नाना...' सोन्यासारख्या घटनेची पानं टराटरा फाडली जात होती, तेव्हा तुम्ही काय करत होतात? " वगैरे वगैरे, काळजाला भिडणारे त्यांचे बोल होते घटनेने दिलेली शोषितांच्या हक्काची हमी घटनेत राहिली, नि घटनेबाहेर  शोषित समूहांची वागवणूक होत राहिली होती. लोकनेते म्हणवणारे पुढारी तेव्हा संसदेत या संसदेबाहेर काय करीत होते हा  नामदेवचा सवाल होता. आत्मपरीक्षण करायला लावणारा. राजा त्याला बसल्या जागेवरून कॉमट्री करीत होता. 'अरे नामदेव, कशाला तू तुझं दुख मांडतोय!' वगैरे. सगळंच अप्रतिम. दोघांचाही अविर्भाव दलिताची वेदना समजून घेण्यातल्या डाव्या पुढाऱ्याच्या बुजरेपणाला ललकारत होता. वातावरण असं तयार झालं की आता क्रांती जणू संगमाच्या पुलापर्यंत जवळ  आलीय. फक्त एसेम जोशींनी होकार भरायचा अवकाश. त्या दिवशी एसेम किंवा नानासाहेब काय बोलले ते आता फार आठवत नाही. पण समाजवादी चळवळीत साकल्याने विचार व्हायला पाहिजे होता. अशी ती सारी घटना होती. अनिल अवचट त्यावेळी आमच्या सर्वांच्या खूप जवळ आले. नंतर पुन्हा ज्या गोष्टी घडल्या त्या साऱ्या वेगळ्याच.  

माझ्या आजही स्मरणात राहिलंय जे अनिल अवटांचं न डगमगता सारं ओझं स्वत:च्या खांद्यावर घ्यायचं तत्त्वज्ञान माणसानं चळवळीत कायम बांधिलकी राखून जगावं. ह्याचे संस्कार घडवणार यांचं वर्तन. साधना परिवारात नि साधनेच्या परसदारात काय भावविमर्ष होत होते किंवा झालेत, हा मुद्दा इथं गौण आहे. पण अनिल अवचटांनी जाणीवपूर्वक तयार केलेल्या 'साधना' च्या अंकाने दलित वेदना आणि विद्रोह यांतली सीमारेषा पूसत आणली. साधना हे निमित्त घडलं, नामदेवच्या भाषणाने नि राजाने त्याला केलेल्या कॉमेट्समुळं 'साधना' समर्थनार्थ निघालेला मोर्चा खूप सुन्न झाला. 'हमारी साधना नहीं जलेगी!' हा मोर्चा संपला. 

'साधना 'च्या संदर्भात केव्हाही आठवावी अशी ही आठवण, साधना समर्थनाचा मोर्चा ही संपला नि साधनाचा रोलही संपला. नंतरच्या काळात कानाला खडा लागल्यागत 'साधना' प्रकाशित होत राहिली. दलित-विद्रोहही पँथरच्या रूपाने प्रकट झाला नि झंझावात बनला. त्या काळात 'साधना' चर्चेत आली, राजा ढालें लेखा गाजला. आम्हीही लिहिलंय म्हणणारे गाजले, एक चळवळ उभी राहिली. एक आवर्तन संपलं, पुन्हा कृष्णामाई संथ वाहू लागली. पुन्हा काही निमित्तानं साधना चर्चेत आलीय, असं घडलं नसावं.

मुद्दा असा आहे की अशाप्रकारे प्रश्नांना भिडणारी नित्य प्रकाशनं आहेत का? एखाद्या चळवळीला गती द्यावी अशी अक्षरव्यवस्था आहे का? किंवा जी काही माध्यमं आहेत. त्यातून उभी राहणारी चर्चा आणि प्रत्यक्ष आंदोलन यात तफावत का पड़ते? अलीकडे वेगवेगळ्या निमित्तानं कितीतरी प्रश्नांची चर्चा अनेक पातळ्यांवर घडताना दिसते. विद्यापीठातनं, सेमिनारमधून, कार्यकर्त्यांच्या गटातनं अशा चर्चा घडून येतात. तात्विक पातळीवर खूप वरच्या दर्जाचं आकारमान या चर्चांना लाभलेलं असतं, यात शंका नाही. पण प्रत्यक्ष समूहात जाऊन काम करताना किती गोंधळ उडतो! तेथील लोकांचे प्रश्न निराळेच असतात. आणि सर्व प्रश्नांच्या उद्गगमाशी समाजव्यवस्थेतल्या हेव्यादाव्यांचा स्पर्श असतो, ही गोष्ट दुर्लक्षून किंवा नाकारून आपण काही करावं म्हटलं की फसगत होते. जातवास्तव हा सहजी नाकारता येणारा मुद्दा आहे असं मला वाटत नाही. भीषण स्पर्धा घेऊन उभ्या रहात चाललेल्या शहरांतील प्रश्न सर्वांनाच समजतात. पण त्यांच्या सोडवणुकीसाठी लोकांचं संघटन उभं करतानाचे निकष फार वेगळे असतात. लोक आपला' नेता' तरी काय निकष लावून निवडतात? हे सारे प्रश्न संभ्रमात टाकणारे आहेत.

या पातळीवर अजूनही भरपूर प्रबोधनाची गरज वाटत राहते. प्रबोधनाचा वेगळा अभ्यासक्रम असावा एवढी गरज वाटत राहते. ही जबाबदारी कुणी घ्यायची? आज; रचनात्मक काम, लोकांचं प्रश्नांवरचं संघटन, राजकीय संघटन, युवकांच्या आकर्षणाचे विषय वगैरे गोष्टींचे संदर्भ खूप बदललेत. मला तर पुरोगामी विचारांच्या तरुणांमधला सतत उभा राहणारा अंतःसंघर्षही धोक्याचा वाटतो. याला आमचीही चळवळ अपवाद नाही. या साऱ्या शक्ती एकवटतील हा भाबडा आशावाद बाळगण्यात अर्थ नाहीय. पण किमान संवादाच्या जागा तरी असल्या पाहिजेत.

Tags: हमारी साधना नही जलेंगी सात दुशासन मराठा एसेम जोशी अनिल अवचट नामदेव ढसाळ राजा ढाले दलित पँथर हमारी साधना पुढे काय अविनाश महातेकर Hamari sadhana nahi jalingi sath dushashan marata S.M Joshi Anil avchat namdev dhasal Raja dhale Dalit Panthar hamari sadhana phudhe kay avinash mahatekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अविनाश महातेकर,  कुर्ला, मुंबई

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व अभ्यासक 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके