‘विज्ञान एक्स्प्रेस’बद्दल ज्योती सांगते की, सुरुवातीला उपकरणे पाहून चकित होणारी मुले-मुली थोड्याच वेळात स्वतःहून पुढाकार घेत ती हाताळू लागतात. एकदा आम्ही त्यांना मायक्रोस्कोपखाली कांद्याच्या आवरणाची स्लाइड, त्यातील पातळ कोशिका दाखवल्या. तर मुला-मुलींनी आजूबाजूच्या झाडांची- महुआ, छिंद, आंबा, फुले, यांची पाने, पाकळ्या आणून स्लाइडखाली अभ्यासल्या आणि त्यातील विविधता त्यांनीच आम्हाला सांगितली. मुलांना फक्त थोडीशी मदत दिली की, ती आपली आपणच शिकतात. विज्ञानदिनानिमित या वर्षी ‘बचपन बनाओ’ने आयोजित केलेल्या शिबिरात टेलिस्कोपने आकाश-दर्शनाबरोबरच मुलांना ड्रोन बनवायलाही शिकवले. सतत चालणाऱ्या अशा निरनिराळ्या वैज्ञानिक उपक्रमांत मुलांना विज्ञान समजावून देण्याबरोबरच त्यांना त्याची आवड निर्माण करणे, चौकसबुद्धी जागृत करणे, प्रयोगशीलता वाढवणे यावर भर दिला जातो.
एक मध्यमवयाची महिला ‘एक हप्ताभर से पेट दर्द है’ अशी तक्रार घेऊन आली. पोट तपासणीसाठी तिने साडी बाजूला केली; तेव्हा तिच्या पोटावर उभ्या रेषेत असलेल्या, भाजल्यासारख्या दिसणाऱ्या जखमांचे व्रण दिसले. ‘हे काय झाले?’ विचारले, तर पोटदुखी घालवण्यासाठी तिने स्वतः केलेला तो उपाय होता. जंगलात स्वतः जाऊन तिने विशेष प्रकारची वनस्पती शोधली, तिची पाने चेचून ती पोटावर रगडली. त्याने ते व्रण उमटले होते. तिला म्हटले, ‘‘पेट दर्द तो ठीक नहीं हुआ. ऊपर से पेट पे ये निशान बन गये.’’ ती नुसतीच हसून ऐकत राहिली.
तेवढ्यात तिच्यासोबतच्या महिलेने मला घाईघाईने माहिती पुरवली- ‘‘बहोत जनका दर्द ये जंगल कि दवा चूस लेता है और फिर ठीक हो जाता है. फिर उनके ऐसे घाव नहीं बनते. जिनका दर्द ये दवा चूस नही ले पाता, उनके ऐसे निशान बन जाते है.’’
तिची सारी लक्षणे पित्ताची होती. त्यासाठी तिला औषधे देण्यासोबतच योग्य आहारपद्धती व पथ्ये समजावून सांगणे महत्त्वाचे होते. पोटदुखीसाठी इथे आणखी एक उपाय केला जातो. तो म्हणजे पोटावर गरम वस्तूने चटके देणे. बाळ खूप रडत असेल, तर त्यावरही हा इलाज केला जातो. मासिक पाळीची कोणतीही समस्या असली तरी त्याचे कारण काळी जादू आहे, असे समजून त्यासाठी मांत्रिकाचा इलाज, जडीबुटी असे प्रकार केले जातात. कांजिण्या झाल्या तर त्याला ‘माता आ गयी’ असे म्हणून अशा रुग्णांना मंदिराच्या परिसरात ठेवले जाते, देव-देव केला जातो. डॉक्टरकडे नेले जात नाही.
अशा अनेक भ्रामक समजुतींमुळे आजार बळावणे, उपचार न घेणे, रुग्ण गंभीर होणे, दगावणे अशा गोष्टी घडतात. अज्ञानामुळे भीती, भीतीपायी घरीच उपचार केले जातात. पौष्टिक आहार, व्यक्तिगत स्वच्छता याच्या माहितीअभावी आरोग्य खालावते. त्यामुळे आरोग्यासोबतच शिक्षण, रोजगार या क्षेत्रांचाही सर्वंकष विकास होणे खूप महत्त्वाचे आहे. बिजापूरपासून 110 किमी अंतरावर दंतेवाडा आहे. बिजापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.अय्याज तांबोळी व दंतेवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कुमार दोघेही धडाडीने विकासकामे करत आहेत आणि दोघेही एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत. त्यामुळे नवनवीन योजनांची देवाण-घेवाण व परस्परसहकार्याने दोन्ही जिल्हे वेगाने प्रगती करत आहेत.
बिजापूर जिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसरद्वारा केलेले पोस्टमॉर्टेम असो वा स्त्रीरोगतज्ज्ञाने बलात्काराच्या केसमध्ये स्त्रीची केलेली तपासणी असो; संबंधित डॉक्टरला त्या केससंदर्भात दंतेवाड्याला असलेल्या कोर्टात जावे लागते. कोर्ट केससाठी दंतेवाड्याला मी जेव्हा जेव्हा जाते, तेव्हा ‘बचपन बनाओ’ या सामाजिक संस्थेच्या कॅम्पसवर जाणे ठरलेलेच. या कॅम्पसमध्ये आदिवासी समाजासाठी काही काम करायचे, या हेतूने दंतेवाड्यामध्ये आलेली मुले-मुली राहतात. ‘बचपन बनाओ’तर्फे 12 किमी अंतरावरच्या ‘चंदेनार’ इथे गावातील व आजूबाजूच्या पाड्यांतील मुला-मुलींसाठी उन्हाळी शिबिर चालू आहे. ज्योती, श्रीराम, मी आणि माझे वडील आम्ही चंदेनारकडे निघालो. तर रस्त्यात सकाळचे सत्र संपवून, काही मुलांसोबत ‘छोटा हत्ती’ वाहन चालवत परत निघालेला प्रणित भेटला.
मूळचा आंध्र प्रदेशमधील, कर्नूलचा असलेला प्रणित सिंन्हा पुण्यामध्ये IISER ला आयआयटीचे शिक्षण घेण्यासाठी आला. अनाथालय चालवणाऱ्या आई- वडिलांमुळे सामाजिकतेचे संस्कार लाभलेले. IISER मध्ये ‘दिशा’ नावाचा गट बनवून, त्यातर्फे पुण्यातील झोपडपट्टीतील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी त्याने कार्य सुरू केले. त्यासोबतच इतर सामाजिक संस्थांना भेटी देणे हेही चालूच होते. त्याच्यावर विज्ञानखेळणी बनवणाऱ्या अरविंद गुप्तांचा विशेष प्रभाव पडला. प्रणित सात-आठ वर्षांपूर्वी दंतेवाड्याजवळ बारसूर येथे काम करणाऱ्या डॉ.गोडबोलेंच्या संपर्कात आला. पंधरा दिवस इथे राहून, येथील विविध शाळांमध्ये विज्ञानप्रयोग करणे, शैक्षणिक उपक्रम घेणे असे काम त्याने केले. दीर्घकाळ बदल घडवायचा असेल तर त्यासाठी इथे राहून दीर्घकालीन प्रयत्न केले पाहिजेत, या विचाराने तो पुणे सोडून सात वर्षांपूर्वी दंतेवाड्याला आला.
स्वतः शासकीय पोर्टाकेबिनमधील आदिवासी मुलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम करत असतानाच, त्याने महाराष्ट्रातील तरुणांना दंतेवाड्यामध्ये एका महिन्यासाठी येऊन शाळांमध्ये एखादा छोटा उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद म्हणून पहिल्या एका वर्षात महाराष्ट्रातील 45 मुले-मुली येऊन गेली. त्यात प्रामुख्याने पुण्याची ज्ञानप्रबोधिनी व IISER चे विद्यार्थी होते, तसेच प्रणितचे IISER चे दोन प्रोफेसरही येऊन त्याला कौतुकाची थाप देऊन गेले. त्यामुळे उत्साह वाढून पुढच्या वर्षी प्रशासनासोबत काम करत, एक वर्षाची ‘बचपन बनाओ’ ही फेलोशिप सुरू केली. त्या वेळचे दंतेवाडा जिल्हाधिकारी देवसेनापती आणि जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी नीरज बंदसोड यांनी प्रणितचे काम व तळमळ पाहून त्याला प्रशासनातर्फे संपूर्ण सहकार्य दिले. त्यांनीच राहण्यासाठी दिलेल्या जागेत ‘बचपन बनाओ’चा परिसर फुलला. प्रणितच्या या नवनवीन प्रयोगांतून ‘बचपन बनाओ’ ही सामाजिक संस्था साकारली. चार भिंतींमध्ये बंदिस्त, कठीण पुस्तकांच्या गजांआड लपलेला आणि आदिवासींना भीतिदायक वाटणारा ‘शिक्षण’ नावाचा प्रकार रूढ चौकटीतून बाहेर काढून, त्याला मुक्त, आनंददायी व आदिवासी जीवनाशी सुसंगत कसे बनवता येईल, यावर प्रणित व त्याच्या टीमचे प्रयोग चालू आहेत.
चंदेनारच्या या उन्हाळी शिबिरात सकाळच्या सत्रात मूर्तिकला, चित्रकला, नृत्य, संगीत यासोबत कॉम्प्युटर चालवण्याचे प्रशिक्षण, तर दुपारनंतरच्या सत्रात निरनिराळे खेळ घेणे चालू आहे. इथे विजेची सोय नाही, म्हणून 20 लॅपटॉप हे संस्थेच्या ऑफिसमध्येच पूर्ण चार्जिंग करून इथे मुलांसाठी आणले जातात. मूळची अकलूजची असलेली इंजिनिअरिंगची पदवीधर ज्योती पताळे ही तीन वर्षांपूर्वी ‘बचपन बनाओ’ फेलोशिपच्या माध्यमातून एक महिन्याकरिता सुकमामधील शाळांमध्ये विज्ञानप्रयोग शिकवण्याच्या निमित्ताने आली. तिला इथे आदिवासी मुलांसाठी कामाची गरज जाणवली. तिने सुखकर इंजिनिअरिंगची नोकरी न करता, ‘बचपन बनाओ’सोबत काम करण्याचा निर्णय घेतला. ट्रकसारखी अवजड वाहने चालवण्याची आवड असलेली ज्योती छोट्या बसमध्ये- ज्याचे ‘विज्ञान एक्स्प्रेस’ असे नामकरण केले आहे, त्यामध्ये- वैज्ञानिक प्रयोगांचे साहित्य, उपकरणे, मायक्रोस्कोप घेऊन खेडोपाडी, संवेदनशील, अतिदुर्गम भागातही निर्भीडपणे जाते. सरकारी शाळांचे परीक्षण करायचे असते, तेव्हा नक्षलग्रस्त भागात जायला सरकारी लोक तयार होत नाहीत; तेव्हा हे ‘बचपन बनाओ’चे शिलेदार तिथे पोहोचतात. तिथे आधी त्यांची चौकशी होते, मगच त्यांना आत प्रवेश मिळतो.
या ‘विज्ञान एक्स्प्रेस’बद्दल ज्योती सांगते की, सुरुवातीला उपकरणे पाहून चकित होणारी मुले-मुली थोड्याच वेळात स्वतःहून पुढाकार घेत ती हाताळू लागतात. एकदा आम्ही त्यांना मायक्रोस्कोपखाली कांद्याच्या आवरणाची स्लाइड, त्यातील पातळ कोशिका दाखवल्या. तर मुला-मुलींनी आजूबाजूच्या झाडांची- महुआ, छिंद, आंबा, फुले, यांची पाने, पाकळ्या आणून स्लाइडखाली अभ्यासल्या आणि त्यातील विविधता त्यांनीच आम्हाला सांगितली. मुलांना फक्त थोडीशी मदत दिली की, ती आपली आपणच शिकतात.
विज्ञानदिनानिमित या वर्षी ‘बचपन बनाओ’ने आयोजित केलेल्या शिबिरात टेलिस्कोपने आकाश-दर्शनाबरोबरच मुलांना ड्रोन बनवायलाही शिकवले. सतत चालणाऱ्या अशा निरनिराळ्या वैज्ञानिक उपक्रमांत मुलांना विज्ञान समजावून देण्याबरोबरच त्यांना त्याची आवड निर्माण करणे, चौकसबुद्धी जागृत करणे, प्रयोगशीलता वाढवणे यावर भर दिला जातो.
‘बचपन बनाओ’ ही संस्था आदिवासी समाजातील उत्साही तरुणांना पाठबळ देते, प्रशिक्षित करते आणि विविध शासकीय योजनांमध्ये त्यांना संधी उपलब्ध करून देते. येथील आदिवासी समाजाला जास्तीत जास्त स्वयंपूर्ण करण्याकडे त्यांचा कल नेहमीच असतो.
इथेच मला आणखी एक वल्ली भेटले, ते म्हणजे श्रीराम देशपांडे. व्यवसायाने सायकॉलॉजिस्ट असलेला, काही काळ पुण्यात क्लिनिक चालवून नंतर विशेष स्त्रियांसाठी (वेश्याव्यवसाय करणाऱ्या) काम करणारा श्रीराम, ‘बचपन बनाओ’च्या एका वर्षाच्या फेलोशिपमध्ये काम करण्याकरिता दंतेवाड्याला आला आणि येथेच रमला. सध्या तो अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागातील मंगनार या गावात शिक्षक म्हणून काम करतोय. मुलांच्या वसतिगृहातच राहणे, मुलांसोबत जेवणे, जंगलात फिरणे, मुलांनी दगडाने मारलेले पक्षी-प्राणीही कधी चाखणे, असे सर्व उद्योग करत तो त्यांच्यातील एक बनून राहतोय, मुलांना शिकवतोय, घडवतोय व स्वतःच्याही आयुष्याचा अर्थ शोधतोय. ‘पहिल्यांदाच शाळेत जाणाऱ्या या आदिवासींच्या पिढीला मी लिहायला-वाचायला शिकवतो, ही कल्पनाच मला खूप भारी वाटते, कामाचे समाधान देते...’ श्रीराम उत्साहाने सांगतो.
चंदेनारच्या भागात आम्ही जिथे होतो, तिथे आजूबाजूला जंगल पसरले होते. समोरच्या गावाने ‘बचपन बनाओ’ला वापरण्यासाठी दिलेल्या सामुदायिक भवनच्या छोट्या इमारतीमागे, वनराजीने आच्छादलेले पहाड पसरले होते. शेजारच्या मोकळ्या जागेत, रिमझिम पावसात भिजत पोरांचा गोट्यांचा खेळ रंगला होता. माझ्या वडिलांनी त्या मळकट कपड्यांतील मुलांकडे बघत विचारले की, ही मुले आंघोळ करत नाहीत का? करतात ना, रोज करतात. कधी दिवसातून दोन-तीन वेळाही करतात. पण प्रत्येक वेळी स्वच्छ पाणी असेल असे नाही. कधी डबक्यात करतात, कधी तलावात करतात. तलाव इथे सामाईक असतो. त्यातच जनावरेही उतरतात, त्यामुळे पाण्यातून रोगराई पसरते. त्यात यांच्याकडे टॉवेल, कपड्यांचा आणखी एक जोड नसतो. त्यामुळे अंघोळ करून, ओल्याच अंगावर तेच घामेजलेले कपडे घातले जातात, त्यामुळे त्वचेचे रोग, खरूज पसरते.
ज्योती सांगत होती : या मुलांना जंगलातील स्वच्छंदी आयुष्य जगायची सवय असते. सध्या चिंचा, आंबे यांचा सीझन चालू आहे, तर पोरे भटकत आहेत. अशा मुलांना वसतिगृहात करमत नाही. गावात फक्त प्राथमिक शाळा आहे. माध्यमिक शिक्षणासाठी निवासी शाळा, सक्तीचे वसतिगृह आहे. उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी तर दंतेवाड्याला जावे लागते. जंगलात मोकळ्या वातावरणात जगणाऱ्या या मुलांना बंदिस्त, कृत्रिम शिस्तीची वसतिगृहे रुचत नाहीत आणि बरीच मुले-मुली शिक्षण अर्धवट सोडून परत गावी येतात. शिक्षण अर्धवट सोडण्याचे मुलींचे प्रमाण खूप जास्त आहे.
या आदिवासींची निसर्गाशी नाळ घट्ट जुळलेली आहे. ती तोडून, त्यांना बंदिस्त वातावरणात डांबून, त्यांना पूर्ण परक्या असलेल्या भाषेत, त्यांच्या आयुष्याशी संबंध नसलेले शिक्षण द्यायचा आपण हट्ट करतो आणि त्यात ते अपयशी ठरले तर त्यांना आपण मागासलेले ठरवून मोकळे होतो. हे त्यांचे अपयश नसून, आपल्या शिक्षणव्यवस्थेचे अपयश आहे.
अय्याज सर एकदा म्हणाले होते, गोंडी भाषा ही फक्त बोलली जाते, ती लिखित स्वरूपात अस्तित्वात नाही, म्हणजेच तिला स्क्रिप्ट नाही. त्यामुळे लिहायला वाचायला शिकणारी आदिवासींची ही पहिलीच पिढी आहे. त्यांना आणखी जास्त वेळ लागेल मुख्य प्रवाहात येण्यासाठी. तोपर्यंत त्यांना पूर्ण मदत करणे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यांना खरे तर देशातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये काही जागा आरक्षित ठेवायला हव्यात.
‘बचपन बनाओ’ संस्था चंदेनार गावामध्ये स्वतंत्ररीत्या शाळा सुरू करत आहे. 11 जूनला गावातील लोकांच्या हस्तेच शाळेचे उद्घाटन झाले. त्याबरोबर संस्थेचे प्रशासनासोबतचे कामही चालूच राहणार आहे, कारण सिस्टीममध्ये राहून बदल घडवण्यासाठी त्याला प्रयत्न करायचा आहे. पण यापुढे शासकीय निधी घेणे बंद करून, पूर्णपणे स्वतंत्र व लोकांनी स्वेच्छेने दिलेल्या निधीच्या बळावर काम करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. कारण विचारले तेव्हा त्याने विशद केले की- सरकारी निधी घेतला की, त्यासोबत सरकारी नियम, रीतीभाती पाळणे आले. त्यात वेळेचा व शक्तीचा अपव्यय होतो. म्हणून स्वतंत्ररीत्या शाळेचे मॉडेल विविध प्रयोग करून, राबवून यशस्वी करायचे आणि नंतर ते प्रशासनासमोर मांडून, ते सरकारी शाळांत राबवण्यासाठी प्रयत्न करता येतील. पण सध्या तरी ‘बचपन बनाओ’ स्वबळावरच काम करेल. यामध्ये बाहेरून शिक्षक न बोलवता, याच भागातील शिक्षक निवडणे आणि योग्य प्रशिक्षण देऊन दूरगामी बदलासाठी तयार करणे, हे ठरवले आहे. सरकारी शाळा, जितक्या निधीमध्ये, ज्या प्रक्रियेने काम करतात; ते तसेच ठेवून, तेच मॉडेल यशस्वीरीत्या राबवून दाखवायचे, हा उद्देश असणार आहे. तसेच याच समाजातील शिक्षकांच्या सहभागामुळे शाळा स्वयंपूर्ण होऊ शकेल, हाही संस्थेचा उद्देश आहे.
‘बचपन बनाओ’च्या टीममधे प्रणित, ज्योतीसोबतच गुजरातची भारती, उत्तर प्रदेशची शहनाज या मुलीही काही वर्षांपासून काम करत आहेत आणि संस्थेचा तंबू सांभाळत आहेत. तसेच या टीमसोबत भतभैय्या- जे की आदिवासी आहेत- हेसुद्धा काम करतात. ते संस्थेचे सर्व टेक्निकल काम सांभाळतात तसेच गोंडी, हळबी यांचे भाषांतर करण्याचीही जबाबदारी पार पाडतात.
चंदेनारवरून दंतेवाड्याला परत येताना आम्ही मुद्दाम दूरचा रस्ता घेतो. दोन्ही बाजूला मोठमोठे वृक्ष असणारा, मनमोहक हिरवाईने नटलेला तो रस्ता डोळ्यांचे पारणे फेडतो. ज्योती उत्साहाने सांगत राहते- रस्त्याच्या बाजूला आपल्याला काही दिसत नाही, पण इथून आत पाच-सहा किलोमीटर पार वसले आहेत. आत गेल्यावरच ते नजरेस पडतात. शाळेसाठी मुले गोळा करायला आम्ही या पारांवर फिरतोय सध्या. आत्तापर्यंत 60 मुले-मुले जमली आहेत शाळेसाठी.
सध्या ‘छिंद’ या फळाचाही सीझन आहे. खजुरासारखे चव लागणारे, मोठी बी असणारे. या फळापासून मद्य बनवले जाते. रस्त्याच्या बाजूला त्याची झाडे दिसतात. मधेच रस्त्यात एके ठिकाणी लगोर, धनुष्यबाण घेऊन जंगलाकडे निघालेली तरुण पोरे दिसतात.
कधी कोणा तरी व्यक्तीने मला सांगितले होते की, आतल्या गावांमध्ये ध्वजारोहणाच्या दिवशी तिरंग्याऐवजी काळा झेंडा फडकवला जातो. झेंड्याचा रंग बदलला की, माणसे हिश्श्यात वाटली जातात आणि एकमेकांच्या जीवावर उठतात. इथे काम करताना अप्रत्यक्षपणे जाणवत राहते की, It,s war going on. या सर्वांत इथले आदिवासी भरडले जातात. त्यांना काय हवे आहे, याचा विचार कोणालाही करायचा नसतो. राज्य, प्रदेश, भाषा या साऱ्यांच्या सीमा पार करून इथे काम करणारी ही तरुणाई आदिवासींची भावी पिढी घडवू पाहते आहे. त्यांची जिद्द, काम, तळमळ उद्याच्या भविष्याचे स्वप्न रंगवू पाहते आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम.
(प्रणित सिन्हा- bachpanbanao@gmail.com)
Tags: बिजापूर डायरी डॉ. ऐश्वर्या रेवडकर विज्ञान एक्स्प्रेस डॉ.अय्याज तांबोळी ध्वजारोहण छिंद शहनाज उत्तर प्रदेश भारती गुजरात सायकॉलॉजिस्ट श्रीराम देशपांडे ज्योती पताळे इंजिनिअरिंग अकलूज नीरज बंदसोड देवसेनापती बारसूर दिशा प्रणित सिंन्हा कर्नूलचा आंध्र प्रदेश आदिवासी समाज चंदेनार बचपन बनाओ मेडिकल ऑफिसर बिजापूर सौरभ कुमार दंतेवाडा Engineering Flag Hoasting Chind Shehnaj Uttar Pradesh Bharati Gujrath Psychologist Shriram Deshpande Jyoti Patale Akluj Niraj Bandsod Devsenapati Baarsur Disha Pranit Sinha Karnul Andhra Pradesh Tribals Chandenar Bachpan Banao Medical Officer Bijapur Saurabh Kumar Dantewada Dr. Ayyaj Tamboli Meseals Eating Habbits Diet Forest Acidity Science Express weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या