इथे सध्या पाच उपस्वास्थ्य केंद्रे असून, जवळजवळ 33 गावे त्याअंतर्गत येतात. अजून नवी चार केंद्रे सुरू होणार आहेत. या सर्व गावांतून 188 गर्भवती मातांची नोंदणी झाली आहे. अजून कदाचित काही जणी या नोंदणीतून सुटल्याची शक्यता आहे. कारण दुर्गम भाग, खराब रस्ते, जंगलाच्या आत असणारी काही गावे, अस्वल व अन्य जंगली प्राण्यांचे वास्तव्य, पावसात नद्या भरून तुटणारा संपर्क, नक्षलग्रस्त भाग, यामुळे अनेक आदिवासी स्त्रिया आरोग्य-सेवेपासून वंचित राहतात. घरीच होणाऱ्या प्रसूतींचे प्रमाण खूप अधिक आहे. आधी त्या थोड्या टेन्शनमध्ये बसल्या, पोपटासारखी छापील उत्तरे देऊ लागल्या. मग मी त्यांना समजावले की- या आपल्या गप्पा आहेत, मी काही सरकारी कामासाठी किंवा त्यांच्या कामाचे गुणांकन करण्यासाठी आलेली नाही; तेव्हा कुठे त्या मग मोकळेपणाने, खरे- खरे सांगू लागल्या.
आज सकाळीच पावसाच्या आवाजाने जाग आली. या प्रसन्न वातावरणात मी चहा पीत पॅसेजमध्ये खुर्ची टाकून बसले. दोन दिवसांपासून भयानक गरम होत होते, आजच्या पावसाने छान थंडावा पसरला. हॉस्पिटलमध्ये जाताच माझ्या स्टाफने घेराव घातला. नर्सेसने आणि सहकारी डॉक्टरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक कापणे झाले. आज मला फिल्ड व्हिजिटसाठी बासागुडाला जायचे होते. सीएमओ डॉ. पुजारीसर येताच आम्ही सरकारी वाहनाने निघालो. बिजापूरपासून भोपालपट्टणमला जाणाऱ्या रस्त्याने काही किलोमीटर गेल्यावर, डावीकडे आत आवापल्लीच्या दिशेने रस्ता जातो. तिथे नवीनच मोठे प्रवेशद्वार बनवले आहे. हा रस्ता बनवताना इथे 168 CRPF बटालियनच्या अनेक जवानांचा बळी गेला आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे ‘शहीदस्मृती द्वार’ बनवून तिथे 24 शहीद जवानांचे फोटो लावले आहेत.
आम्ही जसजसे पुढे निघालो, तसतसे रस्त्याच्या दोन्ही बाजूची वृक्षराजी घनदाट होत गेली. समोर क्षितिजापर्यंत पसरलेल्या, आभाळाला टेकणाऱ्या पहाडांच्या रांगा दिसत होत्या. हा रस्ता विलक्षण सुंदर आहे. ते सौंदर्य पाहण्यात मी हरवून गेले. बिजापूर जिल्ह्याच्या चार प्रभागांपैकी हा उसुर प्रभाग आहे; जो अतिसंवेदनशील, अतिदुर्गम, सर्वांत जास्त नक्षलग्रस्त आणि त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सर्वांत जास्त पिछाडीवर आहे. मधे-मधे छोटी-छोटी गावे आणि CRPF चे चेकपोस्ट लागत राहतात. बऱ्याच ठिकाणी CRPFचे बंदुकधारी जवान जंगलात जाताना किंवा रस्त्याच्या कडेला त्यांच्या वाहनासमवेत गस्तीवर दिसतात. बिजापूरपासून 30 किलोमीटरवर आवापल्ली येते. हे या भागातील त्यातल्या त्यात बऱ्यापैकी मोठा बाजार असलेले गाव आहे. येथील चिरोंजी, म्हणजेच चारोळ्या आणि मशरूर प्रसिद्ध आहेत.
तिथून उजवीकडे एक किलोमीटरवर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्याच रस्त्याने पुढे 12 किलोमीटरवर हुर्सेर येते. पण हा रस्ता खूप जास्त खराब असल्याने 12 किलोमीटर अंतर जायलाही बराच वेळ लागतो. उसुरहून बरेच रुग्ण दुचाकीवर बिजापूरला येतात. उसुरहून पुढे आतल्या पहाडी भागात खूप सुंदर ‘नंबी’ धबधबा प्रसिद्ध आहे, परंतु तिथे जाणारा रस्ता उद्ध्वस्त झालेला आहे. आम्ही आवापल्लीपासून सरळ निघालो. या रस्त्यावर मुरदंडा गाव येते. येथील उपस्वास्थ्य केंद्र सुंदर रंगवलेले दिसले.
गावाचे नाव वाचून मला आठवले की, येथून बरेच आदिवासी रुग्ण बिजापूरला येतात. येथील CRPF आणि आतल्या लोकांच्या धुमश्चक्रीच्या बऱ्याच गोष्टी प्रसिद्ध आहेत. बिजापूरपासून 48 किलोमीटरवर बासागुडा येते. गावाच्या अलीकडेच प्राथमिक आरोग्य केंद्र लागते. तिथे एका वर्षापासून मुख्य मेडिकल ऑफिसर डॉ. मनीष उपाध्याय काम पाहतात. डॉ. मनीष मूळचे मध्य प्रदेशचे, छत्तीसगड वेगळे झाल्यावर ते रायपूरमधे स्थायिक झाले. त्यांच्यासोबत आयुष विभागाचे डॉ. साहू काम पाहतात. डॉ. साहू मूळ ओडिशाचे असून गेल्या 20 वर्षांपासून इथे काम पाहतात. येथील फार्मासिस्टही अनेक वर्षांपासून इथे काम करत आहेत. आज शुक्रवार, बाजारचा दिवस असल्याने रुग्णांची बऱ्यापैकी गर्दी होती. डॉ.मनीषच्या सांगण्यानुसार बाजाराच्या दिवशी 100 ते 120 रुग्ण येतातच.
मीही रुग्ण तपासणीसाठी क्लिनिकमध्ये बसले. इथे जास्त करून गोंडी बोलणारे लोक येतात. काही मराठी बोलणारे लोकही इथे भेटतात. त्यांच्याशी मराठी बोलले की, त्यांचे ठरलेले उत्तर असते, ‘हमारा मराठी आपके जैसा सुध मराठी नहीं है.’ माझी आईच मराठीची प्राध्यापिका असल्याने, तिने मला शिकवलेय- त्या-त्या प्रदेशानुसार लोक वेगळ्या ढंगाने मराठी बोलतात, ती अशुद्ध भाषा नसते; तर ती तेथील लोकांची बोलीभाषा असते. बिजापूरला मी ज्या स्त्रिया पाहते, त्यापेक्षा येथील आदिवासी स्त्रिया आणखी जास्त आतील भागातील वाटतात. त्यांचा पेहराव, चेहऱ्यावरचे गोंदण वेगळे भासते. कमरेला एक कपडा गुंडाळलेला आणि छातीवरही एक कपडा किंवा ब्लाऊज. हातात चांदीचे जड गोठ. नाकात दोन्ही बाजूला टोचलेले आणि दागिना घातलेला. आजकाल बिजापूरमधील शिक्षित, नोकरदार स्त्रियांचे पाहून, आदिवासी स्त्रियाही साडी नेसू लागल्या आहेत. पण पेहराव बदलला तरी चेहऱ्यावरचे आजूबाजूच्या जगाबद्दलचे बेफिकीर भाव तसेच.
एक अशीच आदिवासी स्त्री चांगली साडी नेसलेली, क्लिनिकमधे उभ्यानेच तिच्या खांद्यावर लोंबकळणाऱ्या मुलाला दूध पाजत होती. ब्लाऊज बाजूला करून स्तन उघडे केलेले, त्याला तिचे मूल लुचत होते. आजूबाजूला पुरुष रुग्ण, डॉक्टर असले तरी ती निवांत. त्यात तिच्या ‘बिनधास्त’ असण्याचा काही भाग नव्हता; तर आदिवासी लोकांसाठी हे सर्व खूप नैसर्गिक, सहज प्रवृत्तीचे आहे. नशिबाने आपल्यासारखे त्याचे विकृतीकरण होण्याची सुरुवात त्यांच्यात अजून झालेली नाही. ती भोळेपणाने मला न्याहाळत होती. आता सततचे ऐकून मला थोडेफार गोंडी समजू लागले आहे. डॉ.उपाध्याय सांगतात, ‘‘तुम्ही यायच्या आधी सकाळीच तीन-चार गंभीर रुग्ण आले होते. सुई लावून, औषधे घेऊन निघूनही गेले. मी त्यांना तुम्ही येईपर्यंत थांबवण्याचा खूप प्रयत्न केला; पण बिलकुलच तयार झाले नाहीत, थोडाही वेळ थांबायला. बिजापूरला येणे तर दूरची गोष्ट. इथे दहा मिनिटे वाट बघायला पण तयार नव्हते.’’
त्यांना मी बेच्चोबद्दल सांगितले. बेच्चोला पूर्ण बरे करून आम्ही घरी पाठवले आहे. आम्ही सुट्टी दिली, तेव्हा घरी जाण्याच्या आनंदाने बेच्चो खूप खूश झाली होती. येथील नर्सेसना तिच्याबद्दल माहिती होती. मी फिरून दवाखाना पाहिला. तेथील काम करणाऱ्या नर्सेस त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सांगू लागल्या. दोघींना वंध्यत्वाचा त्रास होता. त्या स्वतः नर्सेस असूनही लज्जेमुळे बिजापूरला आल्या नव्हत्या. मी समजावले की, बिजापूरला आम्ही सोनोग्राफी, दुर्बिणीतून तपासणी सर्व करतो; तुम्ही या तरी. तेवढ्यात एक रुग्ण कॉपर-टी बसवून घ्यायला आली. कॉपर-टी बसवून घ्यायला ग्रामीण भागातील स्त्रिया बिलकुल राजी नसतात. खूप गैरसमज आहेत लोकांमध्ये त्याबाबतीत. ही स्वतःहून आल्यामुळे मी खूश झाले. मग त्या स्त्रीला कॉपर-टी बसवताना तेथील नर्सेसला पण शिकवले कशी बसवायची ते. सरकारी दवाखान्यात चांगल्या प्रकारच्या कॉपर-टी पुरवल्या जातात; परंतु बऱ्याच ठिकाणी त्या कशा बसवायच्या, हेच नर्सेसना येत नसल्याने त्याचा उपयोग होत नाही. कॉपर-टी बसवली, हे डॉ. मनीषना कळताच, त्यांनीही शिकायची इच्छा व्यक्त केली. जेवणाच्या तयारीच्या वेळी मग आम्ही तीच चर्चा केली.
फिल्डवर काम करणाऱ्या नर्सेस आज बाजाराचा दिवस असल्याने हॉस्पिटलमध्येच होत्या. रुग्णतपासणी झाल्यावर मी त्यांना गप्पा मारायला बोलावले. बिजापूरमध्ये बसून मला बासागुडा हे नाव फक्त कळते. तिथे आजूबाजूला किती गावे आहेत, कसला प्रदेश आहे, काही काही समजत नाही. म्हणून मग आज चर्चा करू या म्हटले की- बासागुडा किती मोठे आहे, या प्राथमिक केंद्राच्या अंतर्गत किती गावे आहेत... इथे सध्या पाच उपस्वास्थ्य केंद्रे असून, जवळजवळ 33 गावे त्याअंतर्गत येतात. अजून नवी चार केंद्रे सुरू होणार आहेत. या सर्व गावांतून 188 गर्भवती मातांची नोंदणी झाली आहे. अजून कदाचित काही जणी या नोंदणीतून सुटल्याची शक्यता आहे. कारण दुर्गम भाग, खराब रस्ते, जंगलाच्या आत असणारी काही गावे, अस्वल व अन्य जंगली प्राण्यांचे वास्तव्य, पावसात नद्या भरून तुटणारा संपर्क, नक्षलग्रस्त भाग, यामुळे अनेक आदिवासी स्त्रिया आरोग्य-सेवेपासून वंचित राहतात. घरीच होणाऱ्या प्रसूतींचे प्रमाण खूप अधिक आहे.
आधी त्या थोड्या टेन्शनमध्ये बसल्या, पोपटासारखी छापील उत्तरे देऊ लागल्या. मग मी त्यांना समजावले की- या आपल्या गप्पा आहेत, मी काही सरकारी कामासाठी किंवा त्यांच्या कामाचे गुणांकन करण्यासाठी आलेली नाही; तेव्हा कुठे त्या मग मोकळेपणाने, खरे- खरे सांगू लागल्या. अतिदुर्गम गावात रस्ते खराब असल्याने, चारचाकी वाहन ये-जा करू शकत नसल्याने अनेक स्त्रिया घरीच बाळंत होतात. इथे दाई प्रसव करवतात. तसेच त्यांच्या अनेक अंधश्रद्धा, हानिकारक प्रथा असल्याने दवाखान्यात यायचे प्रमाण खूप कमी आहे. जेव्हा एखाद्या स्त्रीचे बाळंतपण लांबते किंवा काही समस्या उद्भवते, तेव्हाच तिला दवाखान्यात आणले जाते. अतिदुर्गम गावात खाट उलटी करून, आडवे लाकूड टाकून, पालखीसारखे ते खांद्यावर उचलले जाते आणि गर्भवतीला त्यात बसवले जाते. अशा प्रकारे काही किलोमीटर अंतर पार करून गर्भवतीला बासागुडाच्या या प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात आणले जाते. काही ठिकाणी नद्या-नाले आडवे येतात. पावसात ते भरले की, मग तर लोक ते पार करूच शकत नाहीत. अनेक वेळा गावातून रुग्णाला बाहेर आणताना नक्षली लोकांची परवानगी घ्यावी लागते.
नक्षली लोकांचा विषय निघाला तेव्हा मला कळले की, या -नर्सेसलाही गावात जायला त्या लोकांची परवानगी लागते. कधी लसीकरण असेल, एखादी शासकीय योजना राबवायची असेल, तपासणी दिवस असेल किंवा कसला सर्व्हे असेल; तर गावकऱ्यांमार्फत त्यांना पूर्वकल्पना देऊन मगच ते करावे लागते. गावातील लोकांचे आधारकार्ड बनवायलाही त्यांची परवानगी नाही. त्यामुळे त्यांचे बँकेमध्ये खाते उघडले जात नाही, त्यामुळे शासकीय योजनेतून बाळंतपणाचे मिळणारे पैसे त्यांना मिळत नाहीत. ‘इधर आधारकार्ड, बँक खाता नही के बराबरही है. सिर्फ थोडेबहोत जो पढे लिखे लोग है, उन्होने बनाया है.’ हे सारे ऐकून मी तर डोक्याला हातच लावला. नर्स -सोबत गावात फिरायचे, गावातील गर्भवतींना भेटून तपासायचे, दवाखान्यात डिलिव्हरीसाठी यायला त्यांना प्रवृत्त करायचे- हे सारे विचार करणारी मी थंड होऊन गेले. इथे काहीच होऊ शकत नाही, हे मला जाणवले.
मी त्यांच्याशी मासिक पाळीबद्दल गप्पा मारू लागले. त्यांना त्याची लाज वाटते का, पहिल्यांदा पाळी आली तेव्हा त्यांनी काय केले, सफाई कशी ठेवायची वगैरे. त्या आता खुलून सर्व सांगत होत्या. आम्ही शाळेतही जाऊन मुलींना ही माहिती सांगतो, म्हणाल्या. त्यांच्या घरी असणाऱ्या भ्रामक समजुतींबद्दलही सांगू लागल्या. पहिली पाळी आली की, सात दिवस घरीच बसवले जाते. कुठल्याही पुरुषासमोर जायचे नाही, असा नियम असतो. पहाटेच आजी गरम पाण्याने मुलीला अंघोळ घालते, तिचे कपडे धुऊन टाकते. पाळी थांबल्यावर डोक्यावरून अंघोळ घातली जाते. दक्षिण भारतीय असणाऱ्या समाजात सात दिवसांनंतर मुलीला नवरीसारखे सजवले जाते, हळदी लावली जाते, तीन दिवस नातेवाईक जेवायला येतात, भेटवस्तू देतात. तेलंगणा राज्याच्या सीमेजवळ हा भाग येत असल्याने ही दक्षिण भारतीय पद्धत येथील काही गोंडी समाजातही आली आहे. परंतु मुख्यत्वे ही ‘तेलगा’ या समाजात जास्त दिसते. ‘‘घरी कशाला हात लावू देत नाहीत, कोणाला स्पर्श करायचा नाही, म्हणून आम्ही मासिक पाळी आली की तीन-चार दिवस इथे हॉस्पिटलमध्येच येऊन राहतो.’’ त्या हसत सांगत होत्या.
प्राथमिक स्वास्थ्य केंद्रापासून अर्धा किलोमीटरवर गाव येते. उजव्या बाजूला 168 CRPF बटालियनचा कॅम्प आणि डावीकडे गाव. दुचाकीवर आम्ही गावातून डॉ.मनीषच्या क्वार्टरमध्ये गेलो. मी किचनमध्ये डोकावले, तर काही नर्सेस आणि वॉर्डबॉय मिळून स्वयंपाक बनवत होते. मधेच डॉ.मनीषने आत जाऊन त्यांना पोळ्या बनवायला मदत केली. या भागात रोटी खायची पद्धत नाही, फक्त भात खातात. त्यामुळे रोटी किंवा पोळी बनवायला येथे शिकवायला लागते. बाहेरच्या खोलीत आम्ही टेबल-खुर्च्या घेऊन जेवायला बसलो. डॉ.मनीष सांगत होते, ‘‘काही दिवसांपूर्वी बायको आली होती, तिने सर्व खुर्च्या, सोफा, भांडीकुंडी असे सामान खरेदी करायला लावले. मी तर सर्व किराणा- अगदी अमूलचे दूधसुद्धा रायपूरहून घेऊन येतो. इथे काही मिळत नाही. या भागात गाई-म्हशीचे दूध काढायची पद्धत नाही. दूध व दुधाचे पदार्थ आदिवासी बिलकुल खात-पीत नाहीत.’’
दोन दिवसांपासून इथे लाईट गेलेली होती, आजच आली होती. डॉ.मनीषच्या घरी सोलर पॅनेल बसवले असल्याने ते निवांत होते. जिल्हाधिकाऱ्यांची कृपा म्हणून सोलर बसवले गेले. जेवण करून आम्ही दुचाकीवरून बाहेर पडलो. मी डॉ.साहूंना म्हणाले, ‘मुझे मार्केट देखना है.’ आम्ही आमच्या गाड्या तिकडे वळवल्या. समोर मोठा पूल लागला. डॉ. साहू सांगू लागले, ‘‘पुलाच्या पलीकडे जुने, मूळचे बासागुडा गाव आहे. सलवा जुडूममध्ये गावातील लोक जीव वाचवण्यासाठी गाव सोडून, पळून बिजापूरला येऊन काही महिने राहिले. परत येऊन पुलाच्या अलीकडे ‘हिरापूर’ या नावाने नवे गाव वसले. पूल के उस तरफ अंदर के लोगो का राज चलता है.’’ आम्ही दुचाकीवरून पूल पार केला. खाली कमी पाणी होते. त्यात कोणी कपडे धूत होते, काही पुरुष अंघोळी करत होते. दुपारचे चार वाजले असल्याने बाजार संपून, बाजाराची जागा पूर्ण रिकामी झालेली होती. समोर सुंदरपैकी रंगवलेली रहिवासी शाळा होती. मला आठवले... काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ.अय्याजसर बासागुडामधे गावकऱ्यांशी संवाद साधायला सभा घ्यायला आले होते. रात्री त्यांनी येथील शाळेत मुक्काम करून आदिवासी मुला-मुलांशी संवाद साधला होता. अशा ठिकाणी येऊन राहणारे हे पहिलेच जिल्हाधिकारी असल्याने त्याची सर्वत्र चर्चा झाली होती.
रस्त्याच्या कडेला ‘बदलता बिजापूर’चा मुख्यमंत्री रमणसिंहांचे मोठे फ्लेक्स होते. बाजार चालू असताना इथे मोठ्या स्क्रीनवर विविध विकास योजनांचे, जिल्हारुग्णालयाचे फोटो दाखवले जातात. आम्ही तिथे गाड्या थांबवल्या. येथून सरळ रस्ता बारा किलोमीटरवर असलेल्या तर्रेम गावाला जातो. येथून पाच किलोमीटरवर पुढे त्यांची सत्ता सुरू होते, त्यांच्या परवानगीशिवाय जाता येत नाही. तर्रेमला नवे उपस्वास्थ्य केंद्र बनले आहे. त्या लोकांनी परवानगी दिली की जाणे-येणे सुरू होईल. आम्ही तिथून परत फिरलो. पुलाच्या अलीकडे आल्यावर, ‘चिरोंजी गुठली मिल’ दिसली. मी उत्सुकतेने ती पाहायला गेले. तीन-चार स्त्रिया ती चालवतात. आदिवासी स्त्रिया जंगलातील चिरोंज्या येथे आणून विकतात. मिलमध्ये त्याचे वरचे आवरण काढून, आतल्या चारोळ्या बाहेर काढून विकल्या जातात. त्यांना विचारले की, तुम्हाला कुठून प्रशिक्षण मिळाले या कामाचे? त्यांनी अभिमानाने सांगितले, जिल्हाधिकाऱ्यां- मार्फत ओडिशामध्ये त्या प्रशिक्षण घेऊन आल्या आहेत. मी पाचशे रुपयाच्या अर्धा किलो चारोळ्या घेतल्या.
परत हॉस्पिटलमधे गेलो, तेव्हा बाहेर टीव्ही चालू होता. डॉ.मनीष हसत सांगू लागले की- जेवणाच्या सुटीनंतर, दुपारी परत ड्युटीवर यायला स्टाफ कंटाळा करतो. टीव्हीच्या नादाने सारे येतात. बऱ्याचदा घरी लाईट जाते, गरम होते, तेव्हाही स्टाफ मग हॉस्पिटलमध्ये येऊन थांबतो. आम्ही परत निघालो. पुढच्या वेळी आपण या भागातील मितानींना गोळा करून मीटिंग घेऊ या- मी डॉ.मनीषना सांगितले. ‘यहाँ की मितानीन नही आती. देखेंगे, जितने आयेंगे उनके लिये नाश्ता रखेंगे, बाते करेंगे.’ परत जाताना रस्त्यात कुसुम झाडाची आंबट फळे विकणारी पोरे-पोरी बसलेली होती. दहा रुपयाला खूप सारी फळे. चाखून पाहिली, तर प्रचंड आंबट. परत पोहोचायला पाच वाजून गेले. बासागुडाला काही काम होऊ शकणार नाही, या नकारात्मक विचाराने मी उदास झाले होते.
Tags: शहीदस्मृती द्वार बासेगुडा बिजापूर डायरी डॉ. ऐश्वर्या रेवडकर ayeshwarya revadkar bijapur diary weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या