डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

काही पराक्रम : काही विक्रम; भारतीय क्रिकेट - एक सिंहावलोकन

2000 साली क्रिकेटक्षेत्राला भूकंपाचा एक जबरदस्त हादरा बसला. मॅचफिक्सिंगचं प्रकरण उद्भवलं व काही भारतीय खेळाडू वादाच्या भोवऱ्यात अडकले. एक-दोघांवर कारवाईही करण्यात आली. सुदैवानं क्रिकेटर आलेले हे काळेकुट्ट ढग आता पांगले असून सभ्य गृहस्थांच्या या खेळाला पुन्हा पूर्वीचे रूप प्राप्त झालेलं आहे. गौरवाची बाब म्हणजे सचिन तेंडुलकरचा उदय आणि त्याचं उज्ज्वल यश. तीक्ष्ण नजर, चपळ पदलालित्य, आणि टाईमिंगवरील हुकमत यामुळे सचिननं टेस्ट व एकदिवसीय सामन्यांचं भिन्न तंत्र इतकं आत्मसात केलं आहे की त्यात श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या ब्रायन लारालाही त्यानं मागं टाकलेलं आहे. मात्र नायडू-देवधरांच्या वेळचं मुक्त स्वातंत्र्याचं क्रिकेट हल्ली राहिलेलं नाही. आता सगळा मामला आहे तो बाजारी, व्यापारी व पैशाला महत्व देणाऱ्या क्रिकेटचा!
 

13 जुलै 2002. लंडनमधील ती दुपार कोण विसरेल?

लॉर्ड्स मैदान. इंग्लंड आणि भारत यांच्यातला अंतिम एकदिवसीय सामना. मैदान तुडुंब भरलेलं. प्रथम इंग्लंडची बॅटींग, दोघांची शतके. एकूण 325 धावा! एकदिवसीय सामन्यात 300च्या पुढे धावा केल्या की विजय निश्चित! त्यामुळे भारताची आता घडगत नाही असंच वाटलं होतं-

पण मनावर कुठेही दडपण येऊ न देता कप्तान सौरव गांगुलीनं सुरेख खेळ केला. त्याला सेहवागनं चांगली साथ दिली. पण ही जोडी फुटल्यावर भराभर तीन चार विकेटस् पडल्या! सचिन तेंडुलकरही पडला! त्यामुळे भारताला लवकरच गाशा गुंडाळावा लागणार हे स्पष्ट दिसू लागलं.

पण नाही. दोन तरुण एकत्र आले आणि ते इंग्रजांवर तुटून पडले. ट्युडर व गॉफ हे महाकाय व ख्यातनाम गोलंदाज, पण त्यांनाही त्या दोन युवकांनी तुडवलं! ते दोन युवक म्हणजे युवराजसिंग व महंमद कैफ. त्यांनी विजयाची अंधुकशी आशा निर्माण केली. पण एवढ्यात युवराज परतला. त्यामुळे सुकाणू तुटल्यासारखंच झालं. नाव डुचमळायला लागली. मात्र एवढ्यात कैफला कैफ चढला! चौकार षटकारांचं तांडव सुरू झालं! जोरजोरात चेंडू टाकणारे गोलंदाज, तुफानी फटके मारणारे फलंदाज आणि चेंड्रमागे धावणारे इंग्रजी फील्डर्स- असं चित्र दिसू लागलं. शेवटी तळाच्या फलंदाजांची मदत घेत कैफनं 326 धावा गाठल्या आणि इंग्रजांना नामोहरम केलं. या 326 धावा केवळ 210 मिनिटांत निघाल्या होत्या!

युवराज व कैफनं फार आक्रमक व आकर्षक फटके मारले होते. पौर्वात्य जिद्द कशी असते, हेच त्यांनी दाखवून दिलं होतं. अशीच जिद्द आणि ताकद फार पूर्वी एका बहाद्दर फलंदाजाने दाखवून दिली होती. इंग्लंडच्या बलवत्तर संघाशी टक्कर देऊन आपली योग्यता सिद्ध करण्याची आणि आपलं बळ पारखून घेण्याची तेव्हा पहिलीच संधी भारतीय खेळाडूंना मिळाली होती.

एम.सी.सी. व हिंदू यांच्यातला एक ऐतिहासिक सामना बाँबे जिमखान्याच्या मैदानावर खेळला गेला होता. साल होतं 1927. एम.सी.सी.नं 363 धावा केल्या होत्या आणि त्यात गाय अर्ल नामक एका बलदंड फलंदाजानं 130 धावा ठोकल्या होत्या. विशेष म्हणजे त्यात 8 षटकार होते! आणि 11 चौकार! हा धडाकेबाज खेळ पाहून सी. के. नायडूंचे हात चुरूचुरू छागले. बाहू स्फुरण पावू लागले. दुसऱ्याच दिवशी त्यांनी ‘इस्से भी जादा’ खेळ करून दाखवला. येईल त्या चेंडूला फटकारत त्यांनी धावांचा धबधबा सुरू केला. इंग्रजांना पळता भुई थोडी झाली! नायडूंच्या आतषबाजीनं मैदान दणाणून निघालं! 'कम ऑन नायडू' अशी आरोळी उठली की त्या दिशेला नायडू षटकार ठोकत! त्यांनी बघता बघता गाय अर्लचं रेकॉर्ड मोडीत काढलं. 100 मिनिटांत 153 धावा काढल्या! त्यात 13 चौफेर चौकार होते आणि 11 टोलेजंग षट्कार!

'हम भी कुछ कम नहीं हेच त्या दिवशी नायडूंनी आणि इतर भारतीय खेळाडूंनी दाखवून दिलं होतं. आता तसंच भारताच्या तरुण खेळाडूंनीही दाखवून दिलेलं आहे.

भारतीय क्रिकेटचा दर्जा दुर्लक्षित करण्याजोगा नाही, हेच या नव्या पिढीनं इंग्रजांना इंग्रजांच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा सिद्ध करून दिलेलं नाही का? मध्यंतरीच्या काळात अशाच स्वरूपाचे अनेक प्रसंग व घटना घडल्या. अनेक विक्रम रचले गेले, आणि अनेक पराक्रम नोंदले गेले. त्यामुळे भारतीय क्रिकेटचा इतिहास मोठा रोमांचक झालेला आहे. 1932 साली महंमद निस्सारण आपल्या झंझावाती गोलंदाजीचा हिसका दाखवला होता. भारताची ती पहिलीच टेस्ट होती, आणि तेही लॉर्डस वर. पर्सी होम्स व हर्बर्ट सटक्लिफ ही इंग्लंडची पहिली जोडी विक्रमी होती. आठच दिवसांपूर्वी त्यांनी बिनबाद 555 धावा काढून एक नवं रेकॉर्ड रचलं होतं. पण निस्सारच्या अग्निबाणापुढं त्यांचा टिकाव लागला नाही! पाहता पाहता ती जोडी तर फुटलीच पण 3 बाद 19 अशी इंग्लंडची खराब सुरुवात झाली! हा प्रताप होता भारतीय गोलंदाजीचा. पण तो तिथेच संपला. कारण पुढे क्षेत्ररक्षकांनी झेल सोडण्याची एक नवी परंपरा सुरू केली आणि भारतीय संघ हरत गेला.

1936च्या दौऱ्यात विजय मर्चंट व मुश्ताक अली यांची जोडी अशी काही जमली होती की त्यांनी बिनबाद द्विशतकी भागीदारी उभारली होती. परदेशात पहिले शतक काढण्याचा मान मुश्ताक अलीना मिळाला होता. त्यांचे पदलालित्य इतकं अचूक आणि चापल्ययुक्त होतं की कुठं चेंडू टाकायचा, हेच इंग्रज गोलंदाज विसरून गेले होते. क्रीजमधलं त्यांचं कथक नृत्य आजही जुने इंग्रज विसरले नाहीत!

1946 साली विजय मर्चंट यांनी काढलेले शतकही संस्मरणीय म्हटलं पाहिजे. 128 धावा काढताना त्यांचा असा काही जम बसला होता की त्यांना मार्गातून हटवणं इंग्रजांना अशक्यप्राय होऊन बसलं होतं! शेवटी ते धावबाद झाले! त्यावेळी कॉमेन्टेटर जॉन अर्लाट यांनी उद्गार काढले होते, "विजय मर्चट यांना बाद करण्याचा एकच मार्ग शिल्लक होता म्हणजे त्यांना घावबाद करणं." आणि त्याच मार्गानं ते शेवटी बाद झाले! नेव्हील कार्डस् हे प्रख्यात लेखक तर म्हणाले, "विजय मर्चंट गोरे असते तर ते इंग्लिश संघात सहज निवडले गेले असते!" भारतीय खेळाडूबद्दल असे कोणी उद्गार काढले की बर वाटतं. ऊर भरून येतो.

लाला अमरनाथ चे पहिले शतक घ्या. केवळ 18व्या वर्षी त्यांनी शैलीदार खेळ करून शतक काढले होते! त्यावेळी इंग्रज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक पार दमून गेले होते. त्यांनी मैदानावर बियरचे ग्लासेस मागवले होते! असंच दृश्य मी स्वतः 1937 साली पूना क्लब मैदानावर पाहिले होतं. तेव्हा लॉर्ड टेनिसन् संघाची गोलंदाजी फोडून काढत, प्रा. देवधरांनी 118 धावा काढल्या होत्या, आणि इंग्रजांना अक्षरशः पाणी पाजलं होतं. देवधरांचे शतक फळ्यावर फडकल्यावर सारे इंग्रज मैदानावर आडवे झाले होते आणि त्यांनी 'पाणी' मागवलं होतं!

पहिल्या चोवीस टेस्टमध्ये भारतीय संघाला एकही विजय मिळाला नव्हता. तो मिळाला 25व्या टेस्टमध्ये. 1952 साली मद्रासला. विजयी संघाचे कप्तान होते विजय हजारे आणि शिल्पकार होते विनू मंकड. विनू मंकड यांनी त्यावेळी आपल्या मंदगती डावच्या गोलंदाजीवर पहिल्या डावात 8 इंग्रजांना गारद केले होते! आणि दुसऱ्या डावात 4 जणांना! त्यावेळी मंकडना चेव येण्यासाठी कप्तान विजय हजारे यांनी एक युक्ती योजली होती. "मंकड दमलाय, त्याची बोलिंग आता फोडून काढतो" असं इंग्रज फलंदाज म्हणत आहेत अशी टोचणी दिली होती की मंकड यांचा स्वाभिमान डिवचला जाई व ते शर्थीनं प्रयत्न करत. त्यामुळेच आम्ही ती टेस्ट जिंकली असे खुद्द विजय हजारेंनीच सांगितल्याचे मला आठवतं.

विनू मंकडचा हा पराक्रम झाला भारतात, पण इंग्लंड दौऱ्यात त्यांनी लॉर्डस् गाजवल्याचं कोण विसरेल?

1952 सालच्या, दौऱ्यातल्या संघात त्यांची प्रथम निवड झालेली नव्हती. का तर त्यांना हॅजलिंग्डनच्या कौंटीकडून खेळण्याचं आमंत्रण आलेलं होतं. ते आमंत्रण स्वीकारण्यापूर्वी त्यांनी आपली इंग्लंड दौऱ्यासाठी नक्की निवड होणार ना, हे कळवण्याची बोर्डाला विनंती केली होती. पण बोर्डानं ते सांगायला नकार दिला होता. त्यामुळे मंकड हँजलिंग्डन कौंटीकडे निघून गेले! त्याचाच परिणाम त्यांना भारतीय संघातून वगळण्यात झाला! 8 विकेट्स् घेणाच्या यशस्वी गोलंदाजाला वगळा खरं, पण तोच गोलंदाज पुढे संकटात सापडलेल्या भारतीय संघाच्या मदतीला धावून आला! ती गोष्ट घडली लॉर्डसच्या मैदानावर. अगोदरच्या टेस्टमध्ये 4 बाद 0 धावा व दारुण पराभव खावा लागल्यानंतर कप्तान विजय हजारे यांनी बोर्डाला खास विनंती करून विनू मंकड यांना संधात घेण्याची परवानगी मागितली. ती "दयाळू" बोर्डानं दिली! आणि काय आश्चर्य? लॉर्डसची ती टेस्ट म्हणजे 'सबकुछ विनू मंकड' होऊन गेली! पहिल्या डावात त्यांनी 72 धावा तर केल्याच पण (तब्बल 73 षटकं) विकेटस् घेतल्या! तिथेच ते थांबले नाहीत तर लगेच दुसऱ्या डावात 184 धावा फडकावल्या! ट्रेन, वेडसर व जिम लेकर हे त्यावेळचे जगप्रसिद्ध गोलंदाज, पण मंकडनी त्यांनाही खडे चारले! पुन्हा दुसऱ्या डावात 24 षटके टाकायला स्वारी तयार! मॅच झाल्यावर ब्रिटिश टॅब्लॉईडसनी विनू मंकड यांच्यावर मुक्तकंठानं स्तुतिसुमनं उधळली, "इंग्लंड विरुद्ध विनू मंकड" असं एकाने समीकरण मांडले तर दुसऱ्यानं "मेंग्नीफिशंट मंकड" अशा शब्दांत त्याची प्रशंसा केली! ब्रिटिश वृत्तपत्रांनी एका भारतीय खेळाडूची एवढी स्तुती करावी ही गोष्ट अपूर्व होती.

खेळाडू असे पराक्रम करत असतानाच भारतीय क्रिकेटमध्ये अनेक स्थित्यंतरं घडत होती. जुन्या काळचं क्रिकेट हे आक्रमक होतं. त्यावेळचे धुरंधर खेळाडू म्हणजे पी. विठ्ठल, प्रा. देवधर व सी. के. नायडू ही त्रिमूर्ती. संथ, बचावात्मक क्रिकेट त्यांना मंजूर नव्हतं. चेंडू हा मारण्यासाठी आहे आणि तो मारलाच पाहिजे हे त्यांचं धोरण होतं. ही मंडळी 'बंपरला' डोक्यावर चढू द्यायची नाहीत त्या गतिमान क्रिकेटच्या जमान्यात प्रेक्षकांना खरा आनंद मिळायचा. कारण क्रिकेट खेळणं म्हणजे आनंद मिळवायचा व आनंद द्यायचा हेच तेव्हाचं ब्रीदवाक्य होतं.

पुढं काळ बदलला. तंत्राला महत्त्व आलं. उगाच फटकेबाजीच्या मागे लागून विकेट फेकायची नाही, या विचारसरणीचा अंमल सुरू झाला. त्यामुळे धावांचे डोंगर रचले जाऊ लागले. विक्रम करण्याची अहमहमिका वाढली. मर्चटनी 154 धावा केल्या की हजारे 164 पर्यंत मजल मारत! मर्चटनी लागोपाठ तीन द्विशतकं फडकवली. तर हजारे यांनी दोन त्रिशतकं झळकावली. लाला अमरनाथ, पॉली उम्रीगर, विनू मंकड, पंकज रॉय आणि विजय मांजरेकर हेही शतकावर शतके नोंदवू लागले. या हव्यासापायी खेळ कंटाळवाणा होत गेला. त्यातच, विजय मिळाला नाही तरी चालेल पण पराभव खायचा नाही; या बचावात्मक वृत्तीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सामने एकामागून एक अनिर्णित राहू लागले! प्रेक्षक सामन्यापासून दूर जाऊ लागले. पहिल्या डावात धावा कमी झाल्या तर दुसऱ्या डावात कातडीबचाऊ, संथ खेळून सामना कसाबसा वाचवायचा अशी उदाहरणं घडू लागली. भारतातील खेळपट्ट्या संथ व मंद असल्यानं फलंदाजाचे फावलं, तर अशा निगरगट्ट खेळपट्टीमुळे गोलंदाज निष्प्रभ ठरू लागले!

म्हणूनच की काय त्या काळात वेगवान गोलंदाजांचे दुर्भिक्ष्य जाणवू लागलं. महंमद निस्सार, दत्तु फडकर व रमाकांत देसाई असे मोजके गोलंदाज सोडले तर भारताकडे तोपर्यंतच्या काळात प्रभावी वेगवान गोलंदाज झालाच नव्हता!

या नकारात्मक खेळाची 60 सालानंतर. जोरदार प्रतिक्रिया उमटली आणि भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठे स्थित्यंतर घडून आलं. इंग्लंडमधील कौंटी सामन्यात खेळलेले पतौडीचे धाकटे नवाब हिंदुस्थानात आले आणि अल्पावधीत त्यांच्याकडे कप्तानपद दिलं गेलं. त्याच सुमारास ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनची टेस्ट समसमान धावांमुळे बरोबरीत सुटली होती. वेस्ट इंडीजचा कप्तान फ्रैंक वॉरेल आणि ऑस्ट्रेलियाचा कप्तान रिची बेनी यांनी सकारात्मक डावपेच लढवून एकमेकास तोडीस तोड उत्तर दिलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत जिंकण्याचा प्रयत्न करायचा हा महामंत्रच त्या दोन आक्रमक कप्तानांनी जागतिक क्रिकेटला दिला होता.

पतौडीनं त्या महामंत्राचं तंतोतंत पालन केलं, आणि भारतीय क्रिकेटला एक नवा - दृष्टिकोन दिला. हरलो तरी चालेल; पण शेवटच्या चेंडूपर्यंत जिंकण्याचा प्रयत्न करायचा, हेच तत्त्व त्यानं उदाहरणानं सर्वांच्या गळी उतरवलं. त्याचाच परिपाक म्हणजे भारतानं 1964 साली विजयादशमीच्या दिवशी मुंबईला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला सनसनाटी विजय आणि लगेच 65 साली रंगपंचमीच्या दिवशी दिल्लीला न्यूझिलंडविरुद्ध मिळवलेला चित्तथरारक विजय. या दोन्ही सामन्यांमध्ये प्रतिपक्षाच्या घशात गेलेला सामना पतौडीने ओढून काढला होता. या विजयामुळे भारतीय क्रिकेटला एक प्रकारे संजीवनीच प्राप्त झाली. त्यामुळेच सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सामने खेळले जाऊ लागले.

पतौडीने आणखी एक महत्त्वपूर्ण डावपेच आखला होता. नाहीतरी भारतीय खेळपट्ट्या ट्रुतगतीला पोषक ठरत नाहीतच, तेव्हा असे मंदगती गोलंदाज घ्यायचे की ज्यांच्या फसव्या फिरकीच्या मोहजालात प्रतिपक्षाचे फलंदाज सापडतील. अशीच रणनीती पतौडीने योजली. परदेशातील खेळपट्टया मंदगतीला अनुकूल नसल्यानं तेथे प्रभावी मंदगतीवाले नसतात. त्यामुळे तेथील फलंदाजांना उत्कृष्ट मंदगती खेळण्याची सवय नसते, हे पतौडीने ओळखले होते. याचाच फायदा भारतीय संघाला मिळावा अशी दूरदृष्टी ठेवून पतौडीनं चार चार मंदगती गोलंदाज संघात घेण्याची पद्धत रूढ केली.

त्याचा परिणाम असा झाला की, प्रसन्ना, वैंकटराघवन, चंद्रशेखर व बेदी हे गोलंदाज द्रुतगतीवाल्यांपेक्षाही भेदक व परिणामकारक ठरू लागले. त्यांच्या मदतीनंच पतौड़ीनं त्यावेळी वेस्ट इंडीज व इंग्लंडविरुरचे काही टेस्ट सामने जिंकून दाखवले होते.

हेच डावपेच पुढे अजित वाडेकरनं कृतीत उत्तरवले, एवढंच नव्हे तर त्याची सुधारून वाढवलेली आवृत्ती साकार केली. या गोलंदाजांसाठी "क्लोज-इन-फिल्डर्स"ची योजना करून त्यानं फदाजांवर दबाव टेबला आणि त्यांना पार नेस्तनाबूत केलं. एकनाथ सोलकर, वेंकटराधवन्, अवीद अली व स्वतः अजित वाडेकर यांनी अवघडातले अवघड झेल घेतले आणि मंदगती गोलंदाजीची धार तीक्ष्ण केली. प्रसन्नाच्या चौकडीनं जेवढया विकेट्स घेतल्यात, तितक्याच इतर देशांतील कोणत्याच मंदगतीवाल्यांनी घेतलेल्या नाहीत. एकही दर्जेदार वेगवान गोलंदाज न घेता केवळ मंदगती गोलंदाजांच्या जिवावर टेस्ट सामने जिंकता येतात, हेच त्यांनी दाखवून दिलं. पतौडीच्या डावपेचांचाच हा परिणाम होता.

पतौडीचं युग संपून गावसकरचं पर्व सुरू झालं, फलंदाजीतील अनेक विक्रम मोडण्याचा त्यानं सपाटाच सुरू केला. दोन्ही डावातील शतकं, मालिकेतील सर्वाधिक घावा, मोठया भागीदान्या, द्विशतक. प्रचंड दाढदुखी असताना केवळ मानसिक एकाग्रतेच्या बळावर तुफानी गोलंदाजीशी केलेला प्रतिकार वगैरे खास वैशिष्ट्यामुळं गावसकरचं नाव जगभर गाजले आणि भारतीय क्रिकेटची प्रतिमा उजळून निघाली कप्तान झाल्यावर गावसकरनं एक क्रांतिकारी प्रयोग केला. प्रसन्ना वगैरे मंदगतीवाल्यांची सही संपत आली होती. त्यामुळे गावसकरनं तीन तीन मध्यमगती गोलंदाज संघात घेऊन च स्लिपमध्ये प्रथमच पाच क्षेत्ररक्षक ठेवून खेळाला वेगळीच कलाटणी दिली. 1978 साली कपिलदेवचा उदय झालाच होता. त्याला मध्यवर्ती ठेवून त्याच्याभोवती मदनलाल, करसन धावरी, रॉजर बिन्नी यांसारखे गोलंदाज गावसकरने संघात घेतले. त्यामुळे प्रथमच भारतीय संघाचा चेहरा-मोहराच बदलून गेला. मंदगतीला प्राधान्य देणारा "अहिंसावादी", "शाकाहारी" संघ त्यामुळे एकदम बंपर, बीमरची आणि आऊट स्विंग, इनस्विंगची भाषा बोलू लागला! भारतीय क्रिकेटमधलं हे मोठंच परिवर्तन होतं.

दरम्यान गावसकरनं ब्रॅडमन रेकॉर्ड उधळून लावलं होतं व टेस्टमध्ये इतर कोणाहीपेक्षा अगोदर 10,000 धावांचं लक्ष्य गाठलं होतं.

याच सुमारास एक दिवसीय सामन्यांना प्रारंभ झाला होता. बघता बघता या सामन्यांना तुफान लोकप्रियता लाभली! त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली. 1975 सालच्या पहिल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने सहभाग घेतला होता, पण गावसकरसकट कोणालाच वन डे सामन्यांचं तंत्र जमलेलं नव्हतं, असं दिसून आलं. त्यामुळे त्या स्पर्धेत भारताचा पार फज्जा उडाला! पण हळूहळू हे तंत्र आत्मसात करण्याचा प्रयत्न होऊ लागला. देशात देवधर ट्रॉफी व विल्स ट्रॉफी्वारे खेळाडूंना एक दिवसीय क्रिकेटच्या तंत्राचा सराव होत गेला आणि संघाचा खेळ सुधारला. हे आणखी एक स्थित्यंतर.

एक दिवसीय सामन्यात अष्टपैलू खेळाडूंची उपस्थिती आवश्यक असते. देशात खऱ्या अर्थानं ख्यातनाम अष्टपैलू खेळाडू एक विनू मंकड सोडल्यास दुसरा कोणी झालाच नव्हता. आता फास्ट बोलींग टाकणारा अष्टपैलू खेळाडू हवा होता. परदेशात गेल्यावर फास्ट बॉलर्सची गरज भासते. पूर्वी दत्तू फडकर नाव करून गेला होता. पण त्याला फारशी संधी मिळाली नव्हती. आता मात्र कपिल देवच्या रूपानं खराखुरा अष्टपैलू खेळाडू भारतीय संघात मौजूद होता. त्याच्याबरोबरीनं रॉजर बिन्नी, मोहिंदर अमरनाथ, रवि शास्त्री असे चांगल्या वकुवाचे अष्टपैलू खेळाडू मिळाल्यानं भारतीय संघ एकदिवसीय सामन्याच्या तंत्रात मुरला.

कपिलदेवकडेच आता नेतृत्व आलेलं होतं आणि त्यानं बॅटींग, बोलींग, फिल्डिंगमध्ये आपलं नाणं खणखणीतपणे वाजवलं होतं. याच कपिलदेव-पर्वात्त भारतीय संघानं क्रिकेट क्षेत्रातील गौरीशंकर शिखर गाठलं. अगोदर झिंबाम्बेविरुद्ध निम्मा संघ अल्पधावांत बाद झालेला असताना व पराभव समोर दिसत असताना कपिलनं एकहाती सामना फिरवला होता. धडाकेबंद खेळ करून त्याने 175 धावा काढल्या; आणि विजय संपादन केला होता. अंतिम फेरीतही अष्टपैलू खेळ करून त्याने दोन वेळच्या जगज्जेत्या संघाला (वेस्ट इंडीज) अस्मान दाखवलं, त्यामुळे विश्वविजेतेपदाचा बहुमान भारताला मिळाला. (1983 साल) या विजयात कप्तान कपिलचा सिंहाचा वाटा होता. शतकातला सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू म्हणून बिसडेनन कपिलची निवड केली, ती योग्यच ठरते.

त्यानंतर 1985 साली सुनील गावसकर कप्तान असताना भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात झालेली बेन्सन अँड हेजेस ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली. 75 साली चाचपडत खेळणारा भारतीय संघ एकदिवसीय सामन्यात केवळ 8-10 वर्षांमध्ये केवढी प्रगती करू शकला हेच यावरून दिसते.

एकदिवसीय सामन्यांचे फायदे-तोटे जगजाहीर असले तरी जन-सामन्यांच्या दृष्टीने ही स्पर्धा सर्वाधिक लोकप्रियता मिळवून बसलेली आहे. यात वाद नाही. या स्पर्धेतील दणदणीत विजयांमुळे भारताची प्रतिष्ठा वाढली हे निश्चित.

यानंतर 2000 साली क्रिकेटक्षेत्राला भूकंपाचा एक जबरदस्त हादरा बसला.. मॅचफिक्सिंगचं प्रकरण उद्भवलं व काही भारतीय खेळाडू वादाच्या भोवऱ्यात अडकले. एक-दोघांवर कारवाईही करण्यात आली. पण सुदैवानं क्रिकेटवर आलेले हे काळेकुट्ट ढग आता पागले असून सभ्य गृहस्थांच्या या खेळाला पुन्हा पूर्वीचे रूप प्राप्त झालेले आहे.

दूषित झालेले वातावरण निवळण्यासाठी पुन्हा खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरीच उपयुक्त ठरलेली आहे. अनिल कुंबळेनं दिल्लीच्या टेस्टमध्ये पाकिस्तानच्या दहाच्या दहा विकेटस् घेऊन जागतिक विक्रमाची बरोबरी केली तर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण कलकत्त्याला झुंजार 284 धावा काढून ऑस्ट्रेलियावर मात केली. हरभजनसिंगनंही उत्कृष्ट ऑफस्पिन गोलंदाजी टाकून ऑस्ट्रेलियाला जर्जर केलं, अशा वैयक्तिक व सांघिक कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटचा दबदबा वाढण्यास मदत झाली.

या सगळ्यात गौरवाची बाब म्हणजे सचिन तेंडुलकरचा उदय आणि त्याचं उज्वल यश. तीक्ष्ण नजर, चपळ पदलालित्य, मनगटाची योग्य हालचाल आणि टाईमिंगवरील हुकमत यामुळे सचिननं टेस्ट व एकदिवसीय सामन्यांचे भिन्न तंत्र इतकं आत्मसात केलं आहे, की त्यात श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या ब्रायन लारालाही त्यानं मागं टाकलेलं आहे. ब्रॅडमनच्या टेस्ट शतकांची त्यानं बरोबरी केलेली असून एक दिवसीय सामन्यांत तर शतकांचे आणि धावसंख्येचे नवे विक्रम रचलेले आहेत. जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून तज्ज्ञांनी एकमुखानं वाखाणलेला हा खेळाडू भारतीय असावा याचा प्रत्येक क्रीडारसिकाला अभिमान वाटतो.

असे विक्रम आणि असे पराक्रम करत करत आणि निरनिराळी स्थित्यंतरं घडत घडत भारतीय क्रिकेट आज एका विशिष्ट टण्यावर येऊन पोचलेलं आहे. सुदैवानं सचिन, सौरव गांगुली, राहुल द्रविड व व्हीव्हीएस लक्ष्मण या मातब्बरांच्या जोडीला तरुणाईनं साथ द्यावी आणि विरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, महंमद कैफ, दिनेश मोंगिया आणि 17 वर्षांचा पार्थिव पटेल यांसारखे नवोदित खेळाडू चमकावेत, हे सुचिन्ह आहे.

मात्र नायडू-देवधरांच्या वेळचं मुक्त स्वातंत्र्याचे क्रिकेट हल्ली राहिलेलं नाही, याचं वाईट वाटतं. आता सगळा मामला आहे तो बाजारी, व्यापारी व पैशाला महत्त्व देणाऱ्या क्रिकेटचा!
 

Tags: नायडू-देवधर सचिन तेंडुलकर मॅचफिक्सिंग बाळ. ज. पंडित भारतीय क्रिकेट Naidu-Deodhar Sachin Tendulkar Matchfixing baby. H. Pandit Indian cricket weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बाळ. ज. पंडित

(जन्म : २४ जुलै १९२९; मृत्यू : १७ सप्टेंबर २०१५)

प्रख्यात क्रिकेट समालोचक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके