डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

डाव्या विचारांचा समाजवादी माणूस म्हणजे 'अरसिक'च असणार असा एक समज निर्माण झालेला आहे. आमध्या 'कॉम्रेड' मंडळींच्या 'झिंजट' आविर्भावामुळे त्या समजाला पुष्टी मिळालेली. नानासाहेबांनी हा 'समज' फार हळुवारपणे पुसून टाकायला शिकवले.

बोल बोल म्हणता एक वर्ष सरून गेले. गतवर्षी 1 मे 93 रोजी आम्ही पुण्यात कामगार दिनाच्या निमित्ताने 'कामगार साखळी' चे आयोजन केले होते. जागोजाग सभा झडत होत्या. राष्ट्रीय एकात्मता आणि समता यांनी हातात हात घालायचे. त्या अगोदरच 14 एप्रिल 93 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर प्रचंड समता परिषद झाली. त्या वेळच्या अभिवादन मिरवणुकीचे वर्णन केवळ 'भव्य' शब्दांत व्यक्त व्हावे. सारे राष्ट्रवादी, समतावादी, धर्मनिरपेक्षतावादी एकवटले होते. वयोवृद्ध नानासाहेब जातीने हजर होते. एक प्रकारचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होते. नानासाहेबांचा 'स्वभाव' पाहता हे विलसन चिन्ह मला काहीसे विलक्षण वाटले. कितीही भावनोत्कट क्षण असो, नानासाहेब कधी भारावून गेल्याचे मी पाहिले नाही. त्यांचे मन अलिप्त असे. त्या प्रसंगातही ते समीक्षक असत. अशा नानासाहेबांना 14 एप्रिल 93 रोजी स्टेजवर चढताना होत असलेला त्रास पाहून माझ्या डोक्यातील डॉक्टरी पाल चुकचुकत होती. नानासाहेबांनी सर्वांना मार्गदर्शन केले. खाजगीत बोलताना म्हणाले, "शरीर जड झाल्यासारखे वाटत आहे." कार्यक्रम संपला. दुसऱ्या दिवशी मी समाधानी घरी गेलो. नानासाहेब घराच्या वरच्या गॅलरीत बागकाम करीत होते. अंगात कुडता, कमरेला मद्रासी लुंगी, हातात खुरपे- नानासाहेब एकेका कुंडीतील माती हळूवारपणे उकरीत होते. निवडुंगाच्या बोडांना जपत खतपाणी देत होते. मी बाजूला बसून होतो. नानासाहेब काम करता करता बोलत होते. आमचा 'डायलॉग' चालला होता. 14 एप्रिल झाला. आता 1 मे-कामगार दिन- संयुक्त महाराष्ट्र स्थापना दिन. नानासाहेबांना साखळी कार्यक्रमाची माहिती दिली. माझे सांगणे पुरे व्हायच्या आत नानासाहेबांनी सांगितले, "या साखळीत मी पण येईन.'कामगार' नाही म्हणून मला वगळू नकोस!"

वास्तविक या साखळीतील महत्वाचा 'दुवा' म्हणूनच त्यांना निमंत्रण देण्यासाठीच मी गेलो होतो. त्यांनी बागकाम आटोपते घेतले. आम्ही खाली आलो. नित्याप्रमाणे राधाने कॉफी आणली. नानासाहेब म्हणाले, "तुझ्या बंगल्यात लावायला मी 'शततारका' चे रोप देणार आहे." पांढऱ्या शुभ्र नाजुक फुलांचे झुबके असलेला हा वेल. त्याला मंद सुवास... नानासाहेबांकडे जाता येता मी नेहमी शततारकेचा बहरलेला वेल सतत पाहत होतो. 1 मे 93 रोजीच्या कामगार साखळीत हा लोकशाही समाजवादी आनंदयात्री सहभागी होणार हे निश्चित झाल्याने माझा हुरूप वाढला.मनातले वार्धक्य गळून पडले. नानासाहेब अधूनमधून म्हणत, "...आम्ही बोलतो त्यामुळे आम्ही म्हातारे झालो आहोत हे तुम्ही लक्षात घेत नाही."

-परंतु 1 मे 93 च्या भल्या पहाटेस हा 'दुवा' निखळला आणि आमची साखळी तुटली.

नानासाहेबांना जवळपास पन्नास वर्षे पाहत आले. एसेम, नानासाहेब, विनायकराव हे आमचे वडीलधारे. त्यांच्याजवळ जाण्याचे भाग्य आम्हांला लाभलेले. सार्वजनिक, खाजगी अशा कोणत्याही कार्यक्रमात दोघांची हजेरी आवर्जून असे. माझे नवे घर- खरे म्हटले तर शीलाचे घर- बिबवेवाडीला बांधले जात होते. एसेम आजारी होते. मला म्हणाले, 'तुझं घर मला पाहायचंय!' बांधकाम अर्धवट झाले होते. अण्णा आजारी होते, आता काय करावे?... कसे बसे जमवले. दगड माती, सिमेंट, विटा, खडी तुडवून तात्पुरत्या फळीवरून चालत अण्णांनी बांधकाम पाहिले. अण्णांच्या पाठीच्या कण्यामुळे माझी छाती दडपत होती. परंतु अण्णांनी सारे पाहिले. शीलाला शाबासकी दिली. बंगला पूर्ण झाल्यावर नानासाहेब, मधु दंडवते आवर्जून घरी आले.नानासाहेबांच्या हस्ते एका कोपऱ्यात 'कॅशिया' तर दुसऱ्या कोपऱ्यात दंडवत्यांच्या हातून 'बॉटल ब्रश' ची रोपे लावली. आज ही दोन्ही झाडे बहरली आहेत. नानासाहेबांच्या शततारकेच्या रोपाची मला अद्याप याद आहे. नुकतेच दंडवते येऊन गेले. 'बॉटल ब्रश' कडे पाहून म्हणाले, "माझ्या हातून लावलेली झाडे जगतात, हे सर्वांना सांगितले पाहिजे." हे सारे सांगायचे महत्त्वाचे प्रयोजन आहे. डाव्या विचारांचा समाजवादी माणूस म्हणजे 'अरसिक'च असणार असा एक समज निर्माण झालेला आहे. आमध्या 'कॉम्रेड' मंडळींच्या 'झिंजट' आविर्भावामुळे त्या समजाला पुष्टी मिळालेली. नानासाहेबांनी हा 'समज' फार हळुवारपणे पुसून टाकायला शिकवले. स्वच्छता, नीटनेटकेपणा, नेमकेपणा, सुंदरता यांचा अंतर्बाह्य आविष्कार घडवण्याचे 'कसब' त्यांनी आम्हाला दिले. ते साहित्यिक होते.भाषेचा उच्चार आणि लेखन यांतून त्यांची 'प्रतिभा' सतत प्रत्ययाला येई. 1972-73 सालचा एक प्रसंग मला अजून आठवतो:

इंदापूर बावड्याच्या दलित-अत्याचार प्रकरणांत मुंबईहून नुकत्याच स्थापन झालेल्या दलित पँथरचे मोर्चेवाले साधना सभागृहात जमले होते. ढाले-ढसाळांची भाषणे झाली. ढसाळांच्या भाषणानंतर नानासाहेबांनी भाषणात विचारले. "...आयला मायला म्हटलेच पाहिजे का?" डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषावैभवाचा किस्सा त्यांनी ऐकवला. नानासाहेब विलक्षण परखड होते. अलीकडेच काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे प्रमुख डॉ. सि.तु. गुजर यांच्या सत्कार समारंभात बोलताना कोणीतरी म्हणाले, "..डॉ. गुजर खान्देशचे-खान्देश खान्देश." नानासाहेब भाषणात म्हणाले, "...डॉ. गुजर खान्देशचे परंतु पैलू पाडलेत पुण्याने!"

नानासाहेबांजवळ एक आगळा वेगळा गुण होता. त्यांना आवडणाऱ्या कार्यक्रमाला ते आवर्जून हजर असत. त्यांना आवडलेला खाद्यपदार्थ मागून घेत. म. फुले समता प्रतिष्ठानच्या कार्यालयात 'अंतराम कांबळे' या तरुणाचा आंतरजातीय विवाह अत्यंत साधेपणाने साजरा झाला. नानासाहेबांना कळल्यावर ते आले. येताना छोटीशी भेट घेऊन आले. 'आनंद देणे व आनंद घेणे.' सर्वांनी हा आनंद लुटावा.आम्ही या प्रसंगाची आठवण म्हणून 'अंतरामाचे' नाव बदलून टाकले व 'आनंद' नाव चालू केले. अशा छोट्या समारंभातही नानासाहेब स्वतःला विसरून जात. हमाल पंचायतीच्या कष्टाची भाकर मधील 'जिलेबी' नानासाहेब आवडीने खात. दर वर्षी त्यांच्या वाढदिवसाला आम्ही 'भेट' नेत असू.

राजकारणातले अनेक उन्हाळे, पावसाळे आम्ही त्यांच्या सानिध्यात अनुभवले. त्याच्या सानिध्यामुळे आम्हांला जीवन "काहीसे" कळले.

जीवन आम्हां कळले हो!

सापडलो एकमेकां... 

एसेमच्या जीवनात दहा वीस वर्षाचा असा कालखंड येऊन गेला आहे, की ज्या वेळी एसेम नुसता आशेचा कोंभ नव्हता, तर अनेकांना सावली देणारा आणि बहरलेला वृक्ष होता. ती अंधारातील ओळखीची साद नव्हती तर अंधार हटवणारा पलिता होता; ती खडकाळीतील वाट नव्हती तर तो वाटाड्या होता आणि तो सड्यावरचा निर्मळ पाण्याचा मर्यादित कोंड नव्हता तर आपल्या दोन्ही काटांवर कार्याची हिरवळ पसरीत खळाळत राहणारा निर्झर होता.

एसेमने आणि मी आमच्या ह्या दीर्घ जीवनयात्रेत सलोकता, समीपता आणि सरूपता हे मुक्तीचे तीन टप्पे तर ओलांडले आहेत खरे. सायुज्यतेची पायरी मात्र गाठण्याची उत्सुकता आमच्यापैकी कोणाला असेलसे वाटत नाही. कारण सायुज्यता म्हणजे शून्यात शून्य मिळवण्याचा प्रकार. त्यापासून सुख मिळेल तरी कसे? अस्ताला पोचल्यावर "सापडलो एकमेकां" असे नामदेवाप्रमाणे मला कसे म्हणता येईल? 

एसेम : एक विशेषनाम

Tags: समतावादी. कामगार दिन बाबा आढाव Equality Labor Day #Baba Adhav weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बाबा आढाव,  पुणे, महाराष्ट्र

असंघटित कष्टकऱ्यांचे नेते , सत्यशोधक  विचारांचे नेते 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके