डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सयाजीराव आणि डॉ. आंबेडकर : विचार-कृतींचा शोध

महाराजांनी अस्पृश्य-वंचितांच्या कल्याणाच्या कृतिउपक्रमांपासून राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ केलेला होता. बौद्ध व हिंदू तत्त्वज्ञान आणि सर्वधर्मीय विचारांचे अध्ययन त्यांनी केलेले होते. त्यांची धर्मविषयक जाणीव त्यांच्या धर्मविषयक भाषणांमधून प्रकटते. भांड यांनी ‘धर्मखाते आणि सामाजिक सुधारणा’ या प्रकरणात महाराजांच्या धर्मविषयक जाणिवांचा सखोल अभ्यास मांडलेला आहे. बडोदा हिंदू पुरोहित कायदा तर अगदीच अभिनव आणि कालऔचित्य साधणारा आहे (1915). हिंदू धर्मातील कोणत्याही जातीची व्यक्ती अभ्यास करून पुरोहित परीक्षा पास झाल्यावर धार्मिक कामास म्हणजे पुरोहित होण्यास पात्र ठरते. धर्मखातेही 1915 मध्ये त्यांनी निर्माण केले. बहुधार्मिक किंवा बहुसांस्कृतिक असणे ही उदारमतवादाची दिशा महाराजांच्या धर्मविषयक कृती-विचार-उक्तींमधून प्रकट झाल्याचे भांड यांचे प्रतिपादन आहे.   

‘महाराजा सयाजीराव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकात बाबा भांड यांनी या दोन्ही युगपुरुषांच्या विचारकृतींमधील संवादी संबंधांची पाहणी केली आहे. गेल्या काही वर्षांत भांड यांनी महाराजा सयाजीराव गायकवाडांचा संवेदनशीलतेने अभ्यास सुरू ठेवला आहे. चरित्रात्मक कहाणी, कादंबरी, चरित्र, इतिहाससंशोधनपर विश्लेषण अशा तऱ्हेने या अभ्यासाची ललित आणि वैचारिक गद्यात्मक मांडणीही केली आहे. महाराजा सयाजीरावांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाचा इतिहास ‘स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे’मध्ये केला आहे. ब्रिटिशांच्या सत्ताकाळातही सयाजीराव हे लहुा सार्वभौम राजा आहोत, या भूमिकेतूनच वावरत होते. सयाजीराव स्वातंत्र्याकांक्षी उपक्रमांना आणि क्रांतिकारकांना मदत करतात- या जाणिवेतून ब्रिटिशांचे सततचे पाठलाग कसे सुरू होते, असा घटनापट मांडून सयाजीरावांच्या स्वातंत्र्य चळवळीतील कामांची ओळख त्यांनी करून दिली आहे. इतिहासकारांनी सयाजीरावांच्या स्वातंत्र्य चळवळीतील कार्याकडे दुर्लक्ष केल्याची भावनाही भांड यांच्या इतिहासपर लेखनातून दिसते. 

सयाजीरावमहाराजांचे शिक्षण, समाज, संस्कृती, सहकार, शेती, उद्योग, साहित्य, धर्म या विविध जीवनक्षेत्रांतले काम मोठे आणि महत्त्वाचेही आहे. इ.स. 1875 ते 1939 असा दीर्घ काळ सयाजीरावांच्या कारकिर्दीचा आहे. इतर संस्थानिक व राजे यांच्याबद्दलच्या कल्पितापेक्षा सयाजीरावांचे कार्य वेगळे-नवे आणि भारतीय संदर्भात महत्त्वाचे ठरते, अशा महत्त्वमापनाच्या अनुषंगाने भांड यांनी सयाजीरावांसंबंधी लेखन केले आहे. 

‘महाराजा सयाजीराव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकात अस्पृश्यतानिवारण, जाती मोडणे, धर्मविषयक सुधारणा, अस्पृश्य-आदिवासी उद्धार अशा समतावादी कृतींना लक्षात घेत दोन्ही व्यक्तित्वांचा संबंध विश्लेषित करण्याचा प्रयत्न केला आहे.  

महाराजा सयाजीराव या द्रष्ट्या पुरुषाचे साहित्य प्रकाशित करीत असताना महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपणी वाचलेले देदीप्यमान चरित्रही डोळ्या’समोर सरकत होते. आयुष्यभर आपल्या समाजासाठी, देशाच्या सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न पाहिले. डॉ. बाबासाहेब आणि महाराजा सयाजीराव या लोकोत्तर पुरुषांच्या जीवनप्रवासाची ओळखही उपलब्ध संदर्भसाहित्याच्या मदतीने करण्याची लेखनप्रेरणा निर्माण झाली. या दोन महान योद्ध्यांनी आयुष्यभर जनकल्याणाचा ध्यास घेऊन समाजासाठी केलेल्या कार्याची ओळख करून द्यावी... ही भांड यांची या लेखनामागची भूमिका आहे. 

सयाजीरावांच्या अस्पृश्योद्धाराची कामगिरी 1877 मध्ये सुरू झालेली होती. वयाच्या 14 व्या वर्षी पंक्तीभेद त्यांनी दूर केला. आदिवासी-अस्पृश्य यांच्यासाठी सरकारी खर्चाने 1882 मध्ये शाळा-वसतिगृह सुरू केले. पुढे तर सक्तीने आणि मोफत शिक्षणाचा सर्वांसाठी प्रारंभ केला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनलादेखील वेगवेगळ्या प्रकाराने मदत केली. डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या परिषदांमध्ये समतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारी भाषणेही केली. बडोदा संस्थानात धर्मसुधारणा आणि सामाजिक सुधारणांनांनी अग्रक्रम दिला. समाजपरिवर्तन व स्वातंत्र्य- प्राप्तीसाठी ज्ञानाचे महत्त्व त्यांना होते. देशी-परदेशी होतकरू आणि गोर-गरिबांना शिक्षण मिळावे, आधुनिक ज्ञान व कौशल्ये प्राप्त व्हावीत म्हणून शिष्यवृत्ती योजना राबवल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक विकसनात महाराजांच्या शिष्यवृत्ती योजनांचा मोठा वाटा होता. 

डॉ. आंबेडकरांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मान्य करताना पहिल्या भेटीतच महाराज म्हणाले, ‘‘तुम्ही शिक्षण संपादन केल्यानंतर आपल्या जातीच्या व विद्येत मागे पडलेल्या लोकांत शिक्षणाचा प्रसार करण्याची कामगिरी हाती घेतली पाहिजे. आम्ही बडोद्यात अस्पृश्य वर्गात शिक्षणाचा प्रसार करण्याचे कार्य सुरू केले आहे. त्या कार्याप्रीत्यर्थ तुम्ही आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे.’’ ही भेट इ.स. 1907 मधली आहे. शिष्यवृत्ती मान्य करून घेताना करार करावा लागत असे. शिक्षणानंतर काही काळ बडोदा संस्थानात नोकरीची अट असायची. 1913 मध्ये बी.ए. झाल्यानंतर बाबासाहेब बडोद्यात पोहोचले; पण सात-आठ दिवसांतच त्यांना मुंबईला परतावे लागले. तेथील सवर्णांचे- अधिकाऱ्यांचे वर्तन बाबासाहेबांना मानवले नाही. मुंबईत महाराजांचा मुक्काम असल्याचे कळल्यावर बाबासाहेबांनी महाराजांची पुन्हा भेट घेतली. महाराजांनी अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. ‘चांगला अभ्यास करा. शिकून परत आल्यानंतर समाज आणि देशासाठी या शिक्षणाचा उपयोग करा’, असा सल्लाही दिला. 

शिष्यवृत्तीचे नियम व अटींमध्ये वेळोवेळी सवलती-सूट महाराजांनी दिल्या आहेत. बाबा भांड यांनी हा सगळा घटनाक्रम, कागदपत्रे, पूरक संदर्भ देत नोंदवला आहे. अमेरिकन शिष्यवृत्तीच्या काळातच बाबासाहेबांनी इंग्लंडमधील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीकाळ वाढवून घेतला. अर्थातच बाबासाहेबांच्या शिष्यवृत्ती प्रकरणात बडोद्यातील प्रशासकीय अधिकारी, दिवाण वगैरे करार-अटी-नियम यांची सातत्याने आठवण करून देत असत. पाचव्या वेळेस शिष्यवृत्ती वाढवून देण्यास-कालावधी देण्यास नकार आला आणि पुढे इंग्लंडमधून बाबासाहेबांना माघारी यावे लागले. बडोद्यात नोकरीत दाखल झाल्यावरही वरिष्ठांचे वर्तनराहण्याची गैरसोय यामुळे बाबासाहेब बडोद्यात नोकरीत राहू शकले नाहीत. या घडामोडी घडत असताना महाराजांची व्यग्रता, शारीरिक-मानसिक अडचणी, राजकीय घडामोडी यामुळे बाबासाहेबांच्या बाबतीतले प्रसंग-घटना यात लक्ष कमी दिले गेले असावे. अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून धारासभेवर नेमणे किंवा राहण्यासाठी घर बांधून देण्याची योजना आखणे किंवा पुस्तके परतीच्या प्रवासात नष्ट झाली म्हणून 300+200 रु. रक्कम मंजूर करणे, अशा तरतुदी महाराजांनी केलेल्या दिसतात. 

गोलमेज परिषदेतील बाबासाहेबांच्या भाषणाने प्रभावित होऊन महाराजांनी पार्टीचे आयोजन करणे, बाबासाहेबांच्या प्रिंटिंग प्रेससाठी चेक देणे, इतर संस्थानिकांनाही आवाहन करून निधी उभारण्यास मदत करणे वगैरे घटनाक्रम 1930 चा आहे. अस्पृश्यता उद्धार, समतानिर्मिती, जातिभेदास नकार ही सूत्रे दोन्ही महापुरुषांच्या बाबतीत समान होती. बाबा भांड यांनी या महापुरुषांच्या संबंधांच्या, भेटीच्या, संवादांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यातील संवाद-विसंवादांचा कागदपत्रे किंवा पूरक संदर्भांद्वारे आढावा घेतला आहे. महाराजांना बाबासाहेबांबद्दल, त्यांच्या विचार-कृतींबद्दल आस्थाभाव होता. बाबासाहेबांनाही कृतज्ञता वाटत असावी, असा अंदाज व्यक्त करताना भांड प्रश्नही उपस्थित करतात- 

विठ्ठल रामजी शिंदे, म.गांधी, उच्चवर्णीयांपलीकडे   अस्पृश्य-वंचितांच्या प्रश्नाकडे काणाडोळा करणाऱ्या समकालीन पुढाऱ्यांवर हिमतीने टीकाही केली... उभ्या आयुष्यात जाहीरपणे बाबासाहेब सयाजीरावांबद्दल कोठे बोलले का? त्यांच्या लेखनात महाराजा सयाजीरावांबद्दल राग अथवा कृतज्ञतेचा स्पष्ट उल्लेख आला का?... महाराजा सयाजीरावांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर का भेटले नसतील? (पृ. 128) गोलमेज परिषद 1930 नंतर बाबासाहेबांनी महाराजांबद्दल मौन बाळगले, असे दिसते. महाराजांच्या निधनानंतर 11 फेब्रुवारी 1939 च्या जनता अंकात श्रद्धांजलीपर लेखात बाबासाहेबांनी म्हटले आहे की, श्री सयाजीरावमहाराजांचे निधन ही माझी वैयक्तिक फार मोठी हानी आहे. त्यांचे उपकार मी केव्हाही विसरणार नाही. मला त्यांनी जे शिक्षण दिले, त्यामुळेच आजची योग्यता मला प्राप्त झाली. अस्पृश्य जातींवर त्यांचे फार मोठे उपकार झाले आहेत. त्यांच्याइतके अस्पृश्य जातीसाठी दुसऱ्या कोणीही कार्य केले नाही. ते मोठे समाजसुधारक होते आणि बडोदे संस्थानात सामाजिक सुधारणांविषयी जे कायदे करण्यात आले, ते युरोप व अमेरिकेतील कोणत्याही सुधारलेल्या राष्ट्राच्या तद्विषयक कायद्यांपेक्षा पुढारलेले आहेत... (पृ.128-129) अशीच कृतज्ञता बाबासाहेबांनी प्रतापसिंह महाराजांना लिहिलेल्या पत्रातही दिसते. बाबासाहेबांना 1950 मध्ये सयाजीराव महाराजांचे चरित्र लिहायचे होते, त्या पत्रात ते म्हणतात- ‘कै.हायनेस महाराजा सयाजीराव यांचे चरित्र लिहिण्याची आकांक्षा मी माझ्या मनात बाळगून आहे... ते अशी व्यक्ती होते की, ज्यांनी मला उच्चशिक्षण दिले आणि ज्याचा परिपाक म्हणून आज देशाच्या सार्वजनिक जीवनात मी उच्च दर्जा प्राप्त करू शकलो... ते माझे आश्रयदाते, भाग्यविधातेही आहेत... याबाबत ऋण व्यक्त करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे मी त्यांचे जीवनचरित्र लिहावे...’ (पृ.133) महाराजांच्या अस्पृश्यता उद्धाराच्या कार्याचा, सामाजिक सुधारणांचा आणि कायद्यांचा गौरव बाबासाहेबांनी केलेला आहे. व्यक्तिगत आयुष्यात महाराजांना ‘आश्रयदाते’ आणि ‘भाग्यविधाते’ मानल्याचे दिसते. भांड यांनी या कृतज्ञतेची दखलही घेतलेली आहे. 

महाराजांनी अस्पृश्य-वंचितांच्या कल्याणाच्या कृतिउपक्रमांपासून राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ केलेला होता. बौद्ध व हिंदू तत्त्वज्ञान आणि सर्वधर्मीय विचारांचे अध्ययन त्यांनी केलेले होते. त्यांची धर्मविषयक जाणीव त्यांच्या धर्मविषयक भाषणांमधून प्रकटते. भांड यांनी ‘धर्मखाते आणि सामाजिक सुधारणा’ या प्रकरणात महाराजांच्या धर्मविषयक जाणिवांचा सखोल अभ्यास मांडलेला आहे. बडोदा हिंदू पुरोहित कायदा तर अगदीच अभिनव आणि कालऔचित्य साधणारा आहे (1915). हिंदू धर्मातील कोणत्याही जातीची व्यक्ती अभ्यास करून पुरोहित परीक्षा पास झाल्यावर धार्मिक कामास म्हणजे पुरोहित होण्यास पात्र ठरते. धर्मखातेही 1915 मध्ये त्यांनी निर्माण केले. बहुधार्मिक किंवा बहुसांस्कृतिक असणे ही उदारमतवादाची दिशा महाराजांच्या धर्मविषयक कृती- विचार-उक्तींमधून प्रकट झाल्याचे भांड यांचे प्रतिपादन आहे. या पुस्तकातील महाराजा सयाजीरावांचे ‘अस्पृश्योद्धाराचे कार्य’ आणि ‘सयाजीराव महाराजांचे धर्मनिरपेक्षतेविषयक विचार’ ही दोन्ही परिशिष्टे अत्यंत महत्त्वाची आहेत. इ.स. 1877 ते 1937 या काळातील अस्पृश्योद्धाराच्या कार्याची संक्षिप्त नोंद करताना कालक्रमाने महाराजांच्या अस्पृश्योद्धाराची भूमिका कशी कृतिप्रवण होत गेली आहे, याचा निर्देश मिळतो आणि भारतीय राज्यघटनेतील तरतुदीचा संवादी संबंधही लक्षात आणून दिला आहे. 

या पुस्तकामुळे महाराजा सयाजीराव आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतिविचारातील सारखेपणा शोधण्याची संधी मिळते. 

स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय अशा मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेत या दोन्ही महापुरुषांच्या महत्त्वाच्या सहभागाचा धागा भांड यांनी निर्देशित केलेला आहे, या धाग्यादोऱ्यांच्या गुंफणीतून इतिहासाचे पुनर्वाचन घडले आहे. 

महाराजा सयाजीराव आणि डॉ.आंबेडकर

लेखक : बाबा भांड
महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद
पृष्ठे - 152/ मूल्य 150 रुपये   
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके