स्वातंत्र्यानंतर भारताच्या शासनयंत्रणेतील अनेक वरिष्ठ इंग्रज अधिकारी इंग्लंडला परतले; मुस्लिम अधिकारी पाकिस्तानात निघून गेले. अशावेळी उभ्या राहिलेल्या आव्हानाला सरदारांनी भारतीय सनदी सेवा उभी करून तोंड दिले. प्रशासकीय वर्गाला राष्ट्रभक्तीचे आवाहन करून देशाच्या बिकट परिस्थितीत कार्यप्रवण केले. सरदारांच्या मृत्यूनंतर ‘आम्ही निष्ठापूर्वक देशाची सेवा करू’ अशी शपथ घेऊन या सेवकांनी सरदारांना श्रद्धांजली वाहिली.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात तसेच भारताच्या नवनिर्मितीतही सरदार वल्लभभाई पटेलांचा सिंहाचा वाटा आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला, त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. परंतु अपार प्ररिश्रम घेऊन ते पदवीधर झाले व नंतर वकिलीची परीक्षा देऊन ते वकील झाले. वकिली करीत असताना त्यांनी प्रथम आपल्या मोठ्या भावाला बॅरिस्टर होण्याची संधी दिली आणि नंतर मग स्वतः बॅरिस्टर झाले. बॅरिस्टर झाल्यावर त्यांची वकिली जोरात सुरू झाली. पण खोऱ्याने पैसा देणारा हा धंदा सोडून त्यांनी अनेक प्रकारच्या सार्वजनिक जबाबदाच्या अंगावर घेतल्या व त्या क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.
प्रथम अहमदाबाद म्युनिसिपालिटीच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणून व नंतर म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम कार्य केले. मात्र सत्तेच्या लालसेने किंवा एखाद्या हुद्याच्या लोभाने त्यांनी कधीच कार्य केले नाही; प्रत्येक कार्य त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने केले. जेव्हा अतिवृष्टीने शहर ग्रस्त होई तेव्हा रात्र रात्र जागून ते पीडित लोकांकडे धाव घेत (विमानाने नव्हे, पायी) आणि त्यांना तात्कालिक मदत मिळवून देत. कॉलऱ्याच्या साथीत लोक सुरक्षिततेसाठी म्हणून शहर सोडून बाहेर जात तेव्हा त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे असे समजून हा माणूस त्यांच्यामध्येच राही आणि त्यांना मदत करी. ब्रिटिश उच्च अधिकाऱ्यांबरोबर वेळप्रसंगी दोन हात करूनही त्यांनी शहराच्या हिताला जोपासण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे कार्यकर्त्याने कोणतीही जबाबदारी उचलली तर ती किती निष्ठेने पूर्ण केली पाहिजे त्याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले.
जेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ते प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा त्या पदाला शोभेल अशाप्रकारे संघर्षपूर्ण तसेच रचनात्मक असे दोन्ही प्रकारचे कार्य करून त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
1927 मध्ये जेव्हा पुराचे संकट आले तेव्हा अतिवृष्टीने संकटग्रस्त झालेल्या खेड्यांमध्ये पीडितांसाठी त्यांनी अनेक कामे सुरू करून त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न निष्ठापूर्वक केला. पाण्याने चारी बाजूंनी वेढल्या गेलेल्या खेड्यांमध्ये अन्नपाणी मिळणे तेव्हा कठीण झाले होते. अशा ठिकाणी त्यांनी स्यवंसेवक पाठवून त्यांना अन्नधान्य व कपडे वगैरे पुरवले, घरे बांधण्यासाठी त्यांना सामानसुद्धा उपलब्ध करून दिले.
खेडा जिल्ह्याच्या कलेक्टरकडेही लोकांसाठी अन्नधान्य पोहोचविण्याची त्यांनी व्यवस्था केली. त्यावेळचे व्हाईसरॉय लार्ड आयर्विन स्वतः त्यांचे काम पाहायला गेले होते. वल्लभभाईंच्या कामाने प्रभावित होऊन त्यांनी एक लाख रुपये पीडितांसाठीच्या मदतकार्याला दिले. अशाप्रकारे वल्लभभाईंनी सरकार व समाजसेवकांना एकत्र आणून दोघांनीही जबाबदारी संयुक्तपणे उचलावी असे आयोजन केले. 1934 मध्ये जेव्हा बोरसदमध्ये प्लेगची साथ सुरू झाली तेव्हा तर ते बोरसदमध्येच ठाण मांडून बसले आणि रात्रंदिवस राबून तेथील अनेक घरे स्वच्छ करून रोगावर नियंत्रण मिळवण्याचे भगीरथ कार्य त्यांनी केले. तेथे लोकांसाठी तात्पुरते दवाखाने उभारून त्यांनी लोकांना वैद्यकीय मदत मिळवून दिली.
1921 मध्ये असहकार आंदोलनाच्या वेळी त्यांनी अहमदाबादेतील म्युनिसिपालिटीच्या शाळांना मिळणाऱ्या सरकारी अनुदानावर पाणी सोडले, आणि त्यांचे राष्ट्रीय शाळांत रूपांतर केले.
बोरसदमध्ये दरोडेखोरांच्या जुलमाने लोक अत्यंत त्रस्त झाले होते. सरकारलाही दरोडेखोरांवर मात करण्याच्या कामी अपयश आले होते. उलट सरकारने पोलिसांच्यावर होणारा जास्तीचा खर्च कररूपाने प्रजेच्या माथी मारला होता. तेव्हा वल्लभभाई लोकांच्या पाठीशी जिद्दीने उभे राहिले व लोकांच्या सहकार्याने त्यांनी असे जोरदार आंदोलन सुरू केले की त्यापुढे सरकारलाही नमते घ्यावे लागले व प्रजेवर लादलेला जुलमी कर रद्द करावा लागला. 1917 मध्ये गांधीजींनी जेव्हा खेडा येथे सत्याग्रह सुरू केला तेव्हा ते गांधीजींच्या मदतीला धावले आणि त्यांना इतकी सक्रिय मदत केली की, गांधीजींनाही कबूल करावे लागले की वल्लभभाईंची साथ नसती तर हा सत्याग्रह यशस्वी झाला नसता.
जगप्रसिद्ध बारडोली लढ्याचे वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी ते उभे राहिले व त्यांच्या सहकार्याने त्यांनी असा पुरुषार्थ गाजवला की तेथेही ब्रिटिश सरकारला नमते घ्यावे लागले व शेतकऱ्यांवर लादलेला वाढवलेला सारा चौकशी करून कमी करावा लागला. नागपूरमध्ये झेंडा सत्याग्रह झाला व जमनालालजी पकडले गेले. तेव्हा सत्याग्रहाची जबाबदारी सरदारांनी उचलली व अगदी थोड्या अवधीत त्या सत्याग्रहातही त्यांनी यश मिळवले व सिव्हिल लाईन्समधून राष्ट्रीय झेंडा घेऊन कुच करण्यास सरकारचा असणारा विरोध त्यांनी मोहून काढला. या प्रकारे संघर्ष आणि रचनात्मक कार्य अशा दोन्ही कार्यात ते सतत पुढे राहिले व यश प्राप्त करीत गेले.
सत्य, अहिंसा, अस्तेय, असंग्रह, ब्रह्मचर्य, स्वावलंबन, अस्पृश्यता-निवारण, अभय, स्वदेशीचा स्वीकार, स्वार्थत्याग, आणि सर्वधर्मसमभाव या गांधीजींनी सांगितलेल्या अकरा व्रतांचा अर्थ जाणून त्यांनी त्याचा स्वीकार केला व जीवनभर अत्यंत नम्रतेने या व्रतांचे पालन केले. आंदोलने अहिंसक असू शकतात व त्यात भाग घेणारे आंदोलनकार यत्किंचितही हिंसा केल्याशिवाय आंदोलन यशस्वी करू शकतात हे त्यांनी नागपूर, खेडा, बोरसद, बारडोली वगैरे सत्याग्रहांचे यशस्वी संचालन करून सिद्ध करून दाखवले.
तुरुंगात तेव्हा जेवण फारच निकृष्ट असायचे. भाकऱ्या दाताने चावता न येण्याइतक्या चिवट व जाड असायच्या, पण तुरुंगवासाच्या अवधीत त्या भाकऱ्यांचा चुरा करून तो पाण्यात भिजवून ते खायचे. ते विधुर झाले. तेव्हा त्यांचे वय तसे लहानच होते. परंतु स्वतःला पुन्हा विवाहबंधनात अडकवून न घेता एकटे राहाणे त्यांनी पसंत केले. अशा प्रकारे ब्रम्हचर्यव्रताचा आदर्श त्यांनी लोकांपुढे ठेवला. बारडोलीत स्वराज्य आश्रमात उत्तम प्रकारे शेती करून केळ्याचे मुबलक पीक कसे घेता येते हे लोकांना त्यांनी दाखवून दिले, आणि त्या भागातून स्टीमर भरून केळ्यांची परदेशी निर्यात करण्यात यश मिळवले. वल्लभभाईंनी अनेक उच्च पदे भूषविली, परंतु तरीही ते अकिंचनच राहिले. त्यामुळेच गांधीजींची रचनात्मक कार्ये - खादी, अस्पृश्यता निवारण, आदिवासी सेवा, नवी तालीम, (नवे शिक्षण) वगैरे गोष्टी- त्यांनी गुजरातमध्ये अनेक संस्थांद्वारे यशस्वी करून दाखवल्या.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात अमोल कामगिरी बजावल्यानंतर जेव्हा दिल्लीत ते सत्तेवर आले तेव्हा अल्प काळात त्यांनी अनेक आव्हाने स्वीकारली, व ती यशस्वी रीतीने पार पाडली. महत्त्वाच्या क्षेत्रांतील वरिष्ठ इंग्रज अधिकारी स्वदेशी परतले, तसेच मुस्लिम अधिकारी पाकिस्तानात निघून गेले तेव्हा त्या जागी नवीन यंत्रणा उभारण्याचे मोठे काम समोर उभे राहिले. अशावेळी वल्लभभाईंनी सनदी सेवा उभी केली आणि सनदी नोकरांना राष्ट्रभक्तीचे आवाहन करून त्यांच्याकडून उत्तम प्रकारे काम करून घेतले. जेव्हा सरदार वारले तेव्हा ‘आम्ही निष्ठापूर्वक देशाची सेवा करू.' असे म्हणून त्यांना या सेवकांनी श्रद्धांजली वाहिली. जेव्हा देश दोन भागांत खंडित झाला तेव्हा कालव्याच्या पाण्याखालची 50 टक्के जमीन 18 टक्के लोकवस्ती असलेला पाकिस्तानात गेली आणि तांदूळ तसेच गव्हाच्या पिकाच्या एक तृतीयांश उत्पादन पाकिस्तानात गेले. त्यावेळी परदेशाहून 10 लाख टन किंवा त्यापेक्षाही जास्त अन्नधान्य आयात करण्याची पाळी भारतावर आली. तेव्हा शेती, पाणीपुरवठा वगैर गोष्टींना प्राधान्य देऊन अन्नधान्याबाबत देशाला लवकर स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी पावले उचलली. नर्मदा योजनेचा विचार सर्वांत आधी वल्लमभाईंनीच मांडला. आणि मुंबई तसेच मध्य प्रांताच्या सरकारचे लक्ष या योजनेकडे त्यांनी वेधले.
जेव्हा देश खंडित झाला तेव्हा देशात मोठी दंगल उसळली होती. परंतु दिल्लीत सरकारी यंत्रणेवर कडक नजर ठेवून अत्यंत तटस्थ वृत्तीने डोळ्यात तेल घालून मुसलमानांच्या रक्षणासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केले. जेथे आवश्यकता भासली तेथे रजपूत आणि शीख सैन्य हटवून मद्रासहून सैन्य मागवून मुसलमानांच्या संरक्षणाची व्यवस्था केली. स्वतः अमृतसरला जाऊन त्यांनी शीख बंधूंना समजावले आणि मुस्लिम निर्वासितांची स्पेशल ट्रेन सुरक्षितपणे पाकिस्तानला पोहोचल अशी व्यवस्था केली. या निर्वासितांच्या सुरक्षिततेचे संपूर्ण श्रेय सरदार वल्लभभाईंना आहे असे पतौडीच्या नबाबाने त्या वेळी कबूल केले होते.
देश खंडित झाल्यावर देशातील संस्थानिकांचा जटिल प्रश्न त्यांनी अत्यंत मुत्सद्देगिरीने अल्प काळात सोडवला. वल्लभभाईंनी संस्थानिकांना राष्ट्रभक्तीचे आवाहन करून त्यांना सांगितले की, भूतकाळ आठवा, आपसांतील दुहीमुळेच भारताला वारंवार आलेल्या परकीय आक्रमणांपुढे हतप्रभ होण्याची पाळी आली. आता भविष्यातपुन्हा ही चूक करू नका. राष्ट्रीय हित महत्त्वाचे आहे हे जाणून आपण सर्व जण मिळून राष्ट्रासाठी पुरुषार्थ करू या. वल्लभभाईंचे हे आवाहन सर्व संस्थानिकांनी स्वीकारले. भोपाळचे राजे संस्थानिकांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याच्या विचारात होते; पण वल्लभभाईंच्या म्हणण्यावर त्यांनीही विचार केला व त्यांनी वल्लभभाईंचे म्हणणे स्वीकारले. स्वतःचे सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर त्यांनी जाहीरपणे कबूल केले, 'मी हरलो आणि वल्लभभाई जिंकले.' त्यावर वल्लभभाई म्हणाले, 'यात माझा कसलाच विजय झाला नाही किंवा तुमचा पराजयही झाला नाही. हा औचित्याचा विजय आहे. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने हे करणे आवश्यक होते व त्यात भोपाळ नरेशांनी सहकार्य दिले हे खरोखरीच अभिनंदनीय आहे.'
हैद्राबादमध्ये नाइलाजाने पाच दिवस पोलीस कारवाई करावी लागली. काश्मीरचे खाते पंतप्रधानांच्या हाती असल्याने ते तेथे काही करू शकले नाहीत. पण जेव्हा काश्मीरवर आक्रमण झाले तेव्हा विमानाने तेथे सैन्य पाठ्यून वाचलेल्या काश्मीरचे रक्षण करण्याचे फार मोठे काम वल्लभभाईंनी केले. वल्लभभाईंनी जर संस्थानांचे विलीनीकरण केले नसते तर देशाचे असंख्य तुकडे पडले असते आणि मग देशाचा कारभार करणे फार कठीण झाले असते. तसेच कालवे, रस्ते, वीज वगैरे गोष्टींचा नीट विकास झाला नसता कारण त्यामध्ये अनेक विघ्ने निर्माण झाली असती. वल्लभभाईंचे कार्य जर्मनीच्या बिस्मार्कपेक्षाही खूप मोठे व महान आहे. त्यांच्या या कार्याची तुलना कोणाबरोबरही होऊ शकणार नाही. अलग मताधिकार राष्ट्रीय हिताला अत्यंत बाधक असल्याचे घटना सभेतील अनेक सदस्यांना त्यांनी पटवून दिले.
सरदार अनेक क्षेत्रांत यशस्वी ठरले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षावर त्यांचा असाधारण प्रभाव होता. तरीदेखील, 1929, 1935 आणि 1946 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी बहुमताने त्यांचे नाव सुचविले गेले असतानाही त्यांनी ते पंडित जवाहरलाल नेहरुंच्याकडे सोपविले.
1946 मध्ये जर ते काँग्रेसचे प्रमुख असते तर आपोआपच देशाचे पंतप्रधान झाले असते. पण पंडित जवाहरलाल नेहरू आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत त्यामुळे देशासाठी ते जास्त वेळ देऊ शकतील असा विचार करून ते पंतप्रधानपदापासून बाजूला झाले.
सरदार पटेल पोलादी पुरुष होते असे म्हणण्यात येते याचा अर्थ ते कठोर हृदयाचे होते असा नव्हे, तर ते कोणतेही कठीण-कठोर निर्णय स्वतः घेऊ शकत होते. त्यांची सहनशीलता अपार होती. ते लहान असताना त्यांच्या काखेत एक गळू झाले तेव्हा लोखंडाची सळी लाल होईपर्यंत तापवून त्यांनी त्या गळवावर स्वतः गरम डाग दिला होता. विलायतेमध्ये असताना पायाला नारू झाला, तेव्हा क्लोरोफॉर्म घेतल्याशिवाय त्यांनी ऑपरेशन करून घेतले होते. कोर्टात एक केस चालवीत असताना त्यांची पत्नी वारल्पाची तार आली तेव्हा त्यांनी शांतपणे ती खिशात ठेवली आणि स्वतःचे भाषण पुढे सुरू केले. स्वत:च्या अशिलाचे काम योग्य तऱ्हेने पूर्ण करून मगच ते घरी गेले. कर्तव्य करीत असताना वैयक्तिक सुख-दुःखाचा विचार त्यांना नसे. अशा प्रकारे स्वतःच्या बाबतीत ते अत्यंत कठोर होते. पण इतरांशी वागताना मात्र अत्यंत सह्रदय होते. जेलमधून लिहिलेल्या एका पत्रात बेचाळीस कार्यकर्त्यांचा उल्लेख होता. त्या सर्वांच्या विषयी अनेक प्रकारची चिंता त्यात व्यक्त केली होती. अशा प्रकारे ते वज्रापेक्षा कठोर आणि फुलापेक्षाही मृदू होते. त्यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र सखोल अभ्यास करण्यासारखे, समजून घेण्यासारखे व अनुकरण करण्यासारखे आहे.
Tags: Bureaucrats British India Nehru Gandhi Vallabhabhai Patel Saradar iron man Partition पाकिस्तान अखंड भारत सनदी अधिकारी काँग्रेस लोहपुरूष राज्यघटना सरदार पटेल प्रशासक राष्ट्रभक्ती इंग्रज शासनयंत्रणा सत्याग्रह weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या