डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक सध्या निर्णायक वळणावर आहे. डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांच्यात चुरस आहे. त्यांच्या प्रचारसभा जोरात सुरू आहेत. अशाच एका सभेत फिलाडेल्फियामध्ये बराक ओबामा यांनी केलेले हे भाषण. सर्वसमावेशक राजकारण आणि सर्वंकष राष्ट्रउभारणी या संदर्भात भाष्य करणारे हे भाषण भारतालाही लागू आहे. विभाजनवादी आणि मूलतत्त्ववादी प्रवृत्ती प्रबळ होत असल्याचे दृश्य दिसत असतानाच, अशा प्रकारची मांडणी आपल्यासमोर येते आणि त्यातून राजकीय प्रक्रियेच्या नव्या परिणामाचे दर्शन घडते. ओबामाच्या संपूर्ण भाषणाचा अनुवाद : डॉ.प्रदीप आवटे यांनी खास 'साधना'साठी केला असून, भारतातील राजकीय प्रक्रियेसाठी मार्गदर्शक ठरणारा हा विचार आहे.
 

"We the people, in order to form a more perfect union."

या साध्यासुध्या वाटणाऱ्या शब्दांनी, दोनशे एकवीस वर्षांपूर्वी एकत्र आलेल्या काही लोकांनी असंभवनीय वाटणारा अमेरिकेत लोकशाहीचा प्रयोग सुरू केला. जुलूम आणि अत्याचारापासून सुटका करून घेण्यासाठी महासागर पार केलेल्या शेतकरी आणि बुद्धिवंतांनी, राज्यकर्ते आणि देशभक्तांनी 1787च्या फिलाडेल्फियाच्या परषिदेत आपला स्वातंत्र्याचा जाहीरनामा सत्यात उतरविला. त्यांनी सादर केलेल्या मसुद्यावर अखेरीस सह्या तर झाल्या, पण तो अपूर्णच राहिला. या देशातील गुलामगिरीच्या मूळ पापाने हा मसुदा डागाळला होता. याच प्रश्नांवर वसाहतींमध्ये वाद झाला. शेवटी या देशाच्या संस्थापकांना गुलामांच्या व्यापाराला परवानगी द्यावी लागली आणि या प्रश्नाची सोडवणूक भावी पिढ्यांच्या विवेकबुद्धीवर सोडावी लागली.

अर्थात गुलामगिरीच्या प्रश्नाचे उत्तर आपल्या घटनेत कोरलेले आहे, ती घटना कायद्याने आपल्या सर्व नागरिकांना समान नागरिकत्व बहाल करते आणि प्रत्येकाला स्वातंत्र्याचे व न्यायाचे अभिवचन देते. पण तरीही... गुलामांना जोखडातून मुक्त करण्यासाठी आणि संयुक्त संघराज्याच्या कोणत्याही वर्णाच्या आणि वंशाच्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला त्याचे हक्क आणि कर्तव्ये बहाल करण्यासाठी कागदावर लिहिलेले हे शब्द पुरेसे नव्हते आणि म्हणूनच अमेरिकेच्या अनेक पिढ्यांना आपली योग्य भूमिका बजावावी लागली, रस्त्यावर आणि न्यायालयात निदर्शने, संघर्ष करावे लागले, यादवी युद्ध आणि असहकार आंदोलनात जीवावर उदार होऊन लढावे लागले. आपल्या आदर्शांनी दिलेले अभिवचन आणि वास्तव यांच्यातील दरी बुजविण्यासाठी हा संघर्ष अटळ होता.

हे निवडणूक अभियान सुरू होताना आपण ठरविलेल्या अनेक कार्यापैकी हे एक कार्य होते- अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढलेल्या आपल्या पूर्वसुरींचा दूर पल्ल्याचा प्रवास अखंडित ठेवण्याचे, एक अव्याहत प्रवास अधिक न्यायी, अधिक समानशील, अधिक स्वतंत्र, अधिक प्रेमळ आणि अधिक प्रगत अमेरिकेसाठी! 

आपल्या काळातील आव्हाने आपण एकत्र आलो तरच सोडवू शकतो, या गाढ आत्मविश्वासानेच मला इतिहासाच्या या क्षणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी उद्युक्त केले आहे. आपले संघराज्य परिपूर्ण बनविण्यासाठी आपण हे समजावून घेतले पाहिजे- आपल्या जीवनकथा वेगवेगळ्या असतील, पण आपली आशा एकच आहे, आपण एकसारखे दिसू नसू कदाचित आणि नसू आलो आपण एकाच ठिकाणाहून पण जिथे जावयाचे आहे आपल्याला ती दिशा एकच आहे. होय, आपल्या मुला-बाळांसाठी, नातवंडांसाठी उज्वल भविष्य... हेच ते ठिकाण आहे.

अमेरिकन लोकांच्या चांगुलपणावरील आणि उदारतेवरील माझ्या प्रगाढ श्रद्धेतून हा विश्वास माझ्यात आला आहे आणि तसाच तो आला आहे, माझ्या जीवनकहाणीच्या अमेरिकन अध्यायातून! केनियाचा एक कृष्णवर्णीय पुरुष आणि कान्सासची एक गौरवर्णीय स्त्री यांचा मी मुलगा आहे. माझ्या गौरवर्णीय आजी आजोबांनी माझे संगोपन केले आहे. अमेरिकेतील काही सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये मी शिकलो आहे आणि जगातील गरिबात गरीब देशामध्ये राहिलो आहे. जिच्या शरीरातून गुलामांचे आणि गुलामांच्या मालकांचे रक्त वाहते आहे अशी एक कृष्णवर्णीय अमेरिकन स्त्री माझी पत्नी आहे. आणि हाच वारसा आम्ही आमच्या दोन गोड मुलींना दिला आहे. प्रत्येक वंशाचे, हरेक वर्णाचे भाऊ, बहीण, पुतणे, काका, चुलतभाऊ मला आहेत, जे तीन खंडात पसरले आहेत. जीवात जीव असेपर्यंत मी हे कधीच विसरू शकणार नाही की माझ्या जगण्याची ही चित्तरकथा जगाच्या पाठीवर केवळ अमेरिकेत घडू शकते, इतरत्र कोठेही नाही. 

याच माझ्या जीवनकथेने मला सर्वाधिक स्वीकारार्ह उमेदवार बनू दिले नाही. पण हीच ती माझी जीवनगाथा आहे की जिथे माझ्या प्रत्येक पेशीपेशीवर हे कोरले- हा देश म्हणजे निव्वळ अनेक राज्यांची, शहरांची भौगोलिक गोळाबेरीज नव्हे आणि म्हणूनच आपण अनेक आहोत, वेगवेगळे आहोत पण खऱ्या अर्थाने एक आहोत. 

या निवडणूक अभियानाच्या पहिल्या वर्षात आपण पाहिले आहे की अमेरिकन जनता एकतेसाठी किती भुकेली आहे! तिने सारे अंदाज खोटे ठरविले आहेत. माझी उमेदवारी निव्वळ वांशिक भिंगातून पाहण्याचा अनिवार मोह बाजूला सारून गौरवर्णीयबहुल अनेक राज्यांनी आपणाला निर्विवाद विजय बहाल केला आहे. याचा अर्थ या अभियानात 'वंश' हा मुद्दाच नव्हता अथवा नाही, असे नव्हे. निवडणुकीच्या विविध टप्प्यावर अनेक राजकीय समीक्षकांना मी अगदी 'काळा' किंवा 'पुरेसा काळा' असलेला भासलो. साउथ कॅरोलिनाच्या प्रायमरीज पूर्वी वांशिक ताणाचे बुडबुडे पृष्ठभागापर्यंत आलेले आपण पाहिलेले आहेत. प्रत्येक 'एक्झिट पोल' मध्ये माध्यमांनी वांशिक ध्रुवीकरणाचा पुरावा शोधण्याचा कसून प्रयत्न केला. आणि तरीही विशेषतः गेल्या एक-दोन आठवड्यातील वांशिक मुद्यावरील चर्चेने विभाजनवादी वळण घेतले हे आपल्याला मान्य करावे लागेल. 

एका बाजूला असे सूचकपणे म्हटले गेले की, माझी उमेदवारी म्हणजे 'अफर्मेटिव्ह अॅक्शन'चाच एक भाग आहे आणि वांशिक तडजोड स्वस्तात पदरात पाडून घेण्यासाठी उदारमतवाद्यांनी खेळलेली चाल आहे. तर दुसरीकडे माझे माजी धर्मगुरु रेव्हरंड राईट यांनी काही स्फोटक विधाने केली आहेत. ही विधाने विभाजनवादी आहेत. रेव्हरंड राईट यांच्या वक्तव्याने या देशाच्या थोरवीचा, चांगुलपणाचा, कृष्णवर्णीयांचा आणि गौरवर्णीयांचा अपमान केला आहे. मी यापूर्वीच रेव्हरंड राईट यांच्या वक्तव्याचा नि:संदिग्धपणे निषेध केला आहे. रेव्हरंड राईट यांचे हे वक्तव्य केवळ वादग्रस्त नाही, ते केवळ एका धार्मिक नेत्याचे त्याला जाणवलेल्या अन्यायाविरुद्धचे वक्तव्य नाही. उलटपक्षी या वक्तव्याने अमेरिकेची एक विकृत प्रतिमा निर्माण केली आहे- ज्या देशात वर्णभेद, वंशभेद सर्वव्यापी आहे. अमेरिकेतील साऱ्या उत्तम गोष्टींवर बोळा फिरवण्याचे काम या वक्तव्याने केले आहे. 

रेव्हरंड राईट यांचे वक्तव्य केवळ चुकीचे नाही तर विभाजनवादी आहे. ज्यावेळी आम्हाला ऐक्याची गरज आहे, ज्यावेळी आभाळाएवढे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला एकत्र येण्याची गरज आहे. अशावेळी हे दुर्दैवी वक्तव्य त्यांनी केले आहे. दोन युद्धे, अतिरेकी कारवायांची भीती, ढासळती अर्थव्यवस्था, आरोग्य व्यवस्थेची समस्या, पर्यावरणीय बदलांची गंभीर समस्या! या साऱ्या समस्या ना काळ्या आहेत, ना गोऱ्या, या लॅटिन नाहीत, ना आशियाई! खरे तर या आपल्या साऱ्या समोरील समस्या आहेत.

माझी पार्श्वभूमी, माझे राजकारण आणि मी मानत असलेली मूल्ये आणि आदर्श तुम्हांसमोर उघड केल्यानंतर मला वाटते, तुम्हाला माझे निषेधाचे वक्तव्य पुरेसे वाटावे. पण तरीही काही जणांच्या मनात मी स्वत:ला रेव्हरंड राईटशी- का जोडावे, असा सवाल असेल, मी स्वत:ला दुसऱ्या चर्चशी का जोडू नये, असा प्रश्न असेल. पण सत्य असे आहे की, या बातम्यांच्या आणि वक्तव्याच्या पलीकडला हाडामांसाचा रेव्हरंड जेरेमी राईट मी जवळून पाहिला आहे. वीस वर्षांहून अधिक काळापासून मी त्यांना ओळखतो. त्यांनीच तर मला खऱ्या ख्रिश्चन धर्माची ओळख करून दिली, साऱ्यांवर प्रेम करावयाच्या सामाजिक कर्तव्याचे भान त्यांनी मला दिले. दीनदुबळ्यांची, आजारी माणसांची सेवा कशी करावी, याचे वस्तुपाठ मी त्यांच्याकडून तर घेतले. या माणसाने एक नौसैनिक म्हणून आपल्या देशाची सेवा केली आहे आणि गेल्या तीस वर्षांपासून पृथ्वीतलावर चर्चच्या माध्यमातून ईश्वरी कार्य सुरू ठेवले आहे. बेघरांना आसरा, गरजूंना मदत, शिष्यवृत्त्या, एच.आय.व्ही.ग्रस्तांना मदत या साऱ्या माध्यमातून हे कार्य सुरू आहे.

'Dreams From My Father' या माझ्या पहिल्या पुस्तकात मी माझ्या ट्रिनिटीच्या सुरुवातीच्या दिवसांचे केलेले वर्णन असे आहे - "लोक मोठ्याने ओरडू लागले, त्यांच्या जागेवरून उठू लागले, टाळ्या वाजवू लागले, किंचाळू लागले, आशेने भारलेला, रेव्हरंडचा आवाज घेऊन वाऱ्याची एक जोरकस झुळूक आमच्यापर्यंत येत होती आणि त्याचवेळी, क्रॉसच्या पायाशी मी काहीतरी ऐकले. शहरातल्या हजारो चर्चमधूनही मला तो आवाज ऐकू आला आणि त्या क्षणी मला असा भास झाला, आम्ही सामान्य कृष्णवर्णीयांच्या जीवनकथा 'डेव्हिड आणि गोलियथ','मोजेस आणि फरार' यांच्या कथेत जणू मिसळून गेल्या आहेत. त्या पाण्याच्या धडपडीच्या, आशेच्या, स्वातंत्र्याच्या कथा आता आमच्या कथा आहेत. माझी कथा आहे. जे रक्त सांडले गेले ते रक्त आमचे आहे, ते अश्रू आमचे आहेत. त्या तेजोमय क्षणी मला हे उमजले, ते कृष्णवर्णीय चर्च म्हणजे आमच्या पूर्वजांच्या कथा भावी पिढ्याकडे वाहून नेणारे एक अनोखे वाहन आहे. आमच्या हालअपेष्टांच्या, आमच्या विजयाच्या ह्या कथा, ही गाणी म्हणजे आमच्या आठवणींचा उत्सव आहे, जल्लोष आहे. या आठवणींची आम्हाला शरम वाटण्याचे कारण नाही. या आठवणी आपण साऱ्यांनी नीट अभ्यासल्या पाहिजेत आणि प्रेमाने त्यांचे जतन केले पाहिजे, कारण या आठवणींच्या पायावरच आपल्याला आपले नवे जीवन घडवायचे आहे."

हा माझा ट्रिनिटीचा अनुभव आहे. या अनुभवात गडगडाटी हसणे आहे आणि क्वचित खालच्या पातळीवर जाणारा विनोदही आहे. त्यात नृत्य आहे, टाळ्या आहेत आणि सवय नसलेल्या कानांना त्रासदायक वाटू शकणारे किंचाळणे, ओरडणेदेखील आहे. त्यात दयार्द्रता आहे, दुष्टावा आहे, प्रखर बुद्धिमत्ता आहे आणि तसेच धक्कादायक अज्ञानही आहे. त्यात संघर्ष, धडपड आहे, विजय आहे, प्रेम आहे आणि हो, तसाच कडवटपणादेखील आहे. या साऱ्यांची गोळाबेरीज म्हणजेच तर अमेरिकेतील कृष्णवर्णीय अनुभव आहे.

मला वाटते, हे सारे माझे रेव्हरंड राईट यांच्याशी असलेल्या संबंधावर प्रकाश टाकू शकेल. व्यक्ती म्हणून त्यांच्यात काही दोष असले तरी ते माझ्या कुटुंबातील एक आहेत. त्यांनी माझ्या श्रद्धेला बळकटी दिली आहे, माझे लग्न लावले आहे, माझ्या मुलांना बाप्तिस्मा दिला आहे. त्यांनी कधीही कोणाला वांशिकतेवरून हिणवलेले मी ऐकलेले नाही. गौरवर्णीयांशी ते नेहमी सौजन्याने आणि आदराने वागले आहेत. ज्या समाजाची त्यांनी गेले कित्येक वर्षे सेवा केली त्या समाजाचेच काही बरेवाईट गुण त्यांच्यातही आहेत. मी माझ्या कृष्णवर्णीय समाजाला ज्याप्रमाणे नाकारू शकत नाही तद्वतच त्यांनाही नाकारू शकत नाही. 

मी माझ्या गौरवर्णीय आजीला ज्याप्रमाणे नाकारू शकत नाही तद्वतच रेव्हरंड राईट यांनाही! माझ्या गौरवर्णीय आजीने मला प्रेमाने वाढविले, माझ्यासाठी अनेकवेळा त्याग केला, तिचे माझ्यावर आत्यंतिक प्रेम होते पण तीच मला एकदा म्हणाली होती, 'रस्त्याने जवळून जाणाऱ्या काळ्या पुरुषांची तिला भिती वाटते.' अनेक वेळा तिच्या मनातील वर्णभेदी, वंशभेदी विचार तिने माझ्याजवळ व्यक्त केले, तेव्हा मी भितीने शहारलो होतो. हे सारे लोक माझ्या जगण्याचे अविभाज्य अंग आहेत आणि ते अविभाज्य हिस्सा आहेत अमेरिकेचा, ज्या देशावर मी आत्यंतिक प्रेम करतो. काही जणांना हा रेव्हरंड राईट यांच्या वक्तव्याच्या समर्थनाचा प्रयत्न वाटेल. पण खरेच असे काहीही नाही. 

खरे तर हा सारा घटनाक्रम विसरणे, त्याच्याकडे दुर्लक्ष करणे आणि रेव्हरंड राईट यांची लोकांच्या भावना पेटविणारा एक वेडसर म्हणून बोळवण करणे राजकीयदृष्ट्या सुरक्षित ठरले असते. पण आज वंश हा असा एक मुद्दा आहे की, तो या देशाने दुर्लक्षित करणे परवडणारे नाही. तसे झाले तर राईट यांनी केलेली चूकच आपण केली असे होईल. राईट यांनी अमेरिकेचा अवमान करणाऱ्या आपल्या प्रवचनात नेमके हेच केले आहे- समस्येचे सुलभीकरण, कायमस्वरूपी मनात रूजलेल्या वंशभेदाच्या कल्पना आणि वास्तवाला विकृत करणारे नकारात्मक गोष्टींचे बृहदीकरण! या वक्तव्याने आपल्या वांशिक वास्तवाची व्यामिश्रता पृष्ठभागावर आणली आहे. आजवर या व्यामिश्रतेची प्रामाणिक उकल करण्याचा प्रयत्न आपण केलेला नाही. आणि आजही आपण या वास्तवाकडे डोळेझाक केल्यास आरोग्य, शिक्षण, रोजगार यातील समस्या सोडविण्यात आपल्याला कधीही यश येणार नाही. आपले संघराज्य परिपूर्णतेकडे नेण्याच्या आपल्या प्रयत्नाला खीळ बसेल.

हे वास्तव समजावून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो कसे, याची आठवण ठेवावी लागेल. विल्यम् फॉकनरने एके ठिकाणी लिहिले होते, 'भूतकाळ अजून मेलेला नाही, त्याला अद्याप पुरलेला नाही. खरे पाहता, भूतकाळ अजून भूतकाळच झालेला नाही. आपल्याला या देशातील वांशिक अत्याचाराचा इतिहास पुन्हा आळविण्याची गरज नाही. पण आपल्याला हे ध्यानात घेण्याची गरज आहे की आज आफ्रिकन-अमेरिकन समाजात आढळणारा फरक हा आपल्या पूर्वजांनी या समाजावर केलेल्या अन्यायाचा परिणाम मात्र आहे. कृष्णवर्णीयांसाठीच्या वेगळ्या शाळा हीन दर्जाच्या होत्या आणि आहेत. अजूनही हा प्रश्न आपण सोडवू शकलेलो नाही. गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक यशातील भयावह दरी या व्यवस्थेचा परिपाक आहे. कायद्याने कृष्णवर्णीयांना सापत्नभावाची वागणूक दिली-गेली. कृष्णवर्णीयांना स्थावर संपत्ती घेण्यास प्रतिबंध करण्यात आला, आफ्रिकन अमेरिकेनांना कर्जे दिली गेली नाहीत, काळ्या घरमालकांना मॉर्गेजच्या अनेक सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले, त्यांना पोलीस किंवा अग्निशमन दलात प्रवेश नाकारला गेला. एकूण काय, वैध मार्गाने स्वत:साठी आणि भावी पिढ्यांसाठी संपत्ती गोळा करण्याचे सारे मार्ग काळ्यांसाठी बंद करण्यात आले होते. आज काळ्या-गोऱ्यामधील भीषण आर्थिक दरी आणि शहरी ग्रामीण भागातील गरीब लोकवस्त्यांचे पुंजके हा इतिहास नेमकेपणाने स्पष्ट करतो.

आर्थिक संधीचा अभाव, आपण आपल्या कुटुंबाचे नीटनीटके उदरभरणही करू शकत नाही यातून निर्माण होणारी लज्जा, वैफल्य यामुळे अनेक कृष्णवर्णीय कुटुंबे होरपळली आहेत. कृष्णवर्णीय वस्त्यांतील मूलभूत सुविधांचा अभाव, दमनकारी कायदे, पोलिसी अत्याचार यातून हिंसा, नासाडी, दुर्लक्ष यांचे दुष्टचक्र निर्माण होते. या प्रकारच्या वास्तवात रेव्हरंड राईट आणि त्यांची पिढी वाढली आहे. पन्नास-साठच्या दशकात त्यांना समज आली त्यावेळी 'विषमता' हा या देशाचा कायदा होता, संधींचा अभाव जाणीवपूर्वक निर्माण केला गेला होता. अशा सापत्नपणाच्या वातावरणात किती लोक अपयशी ठरले, हा मुद्दा महत्त्वाचा नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे किती जण या साऱ्यावर मात करून आपला मार्ग शोधू शकले, जेणेकरून त्यांच्यामागून येणारे माझ्यासारखे अनेकजण त्या मार्गावरून चालू शकतील.

अमेरिकन स्वप्नाचा एखादा तुकडा आपल्याला मिळावा, म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. काहींना तो मिळाला, पण अनेकांना सापत्न वागणूक समोर हार मानावी लागली. पराभवाचा हा वारसा कळत-नकळत भावी पिढ्यांना देण्यात आला. रस्त्याच्या कोपऱ्यात दिसणारी किंवा तुरुंगात खितपत पडलेली तरुण पिढी, भविष्यावरील विश्वास गमावलेली तरुण पिढी! अगदी ज्या कृष्णवर्णीयांनी काही मिळविले, त्यांच्याही जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात वंश आणि वंशभावनेने मूलभूत बदल केले. रेव्हरंड राईटची पिढी अपमानाच्या, संशयाच्या आणि भितीच्या त्या आठवणी अजून विसरलेली नाही आणि क्रोधाची, कडवटपणाची ती वर्षेही विसरलेली नाही. हा राग गोऱ्या सहकाऱ्यांसमोर सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होत नसेल कदाचित, पण मग तो व्यक्त होतो न्हाव्याच्या दुकानात नाहीतर किचनटेबलसमोर! कधी कधी राजकारणी लोक आपली 'वोट बँक' मजबूत करण्यासाठी किंवा आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी या रागाचा दुरुपयोग करतात.

आणि प्रसंगी हा राग व्यक्त होतो रविवारी सकाळी चर्चमधून! पण हा राग नेहमीच फलदायी नसतो, खरे प्रश्न सोडविण्यात तो व्यवधान निर्माण करतो, तो आपल्याला एकमेकांविरुद्ध उभे करतो, खरा बदल घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या 'आफ्रिकन अमेरिकन' ऐक्याला हा राग खीळ घालतो. पण हा राग खरा आहे, शक्तिशाली आहे. त्याची पाळेमुळे समजावून न घेता त्याचा निषेध केल्याने वंशावंशामध्ये असलेली गैरसमजाची दरी आणखीनच रूंदावेल. खरे पाहता, असाच एक राग गौरवर्णीय समाजातही विद्यमान आहे. अनेक मध्यमवर्गीय गोऱ्या अमेरिकनांना त्यांच्या वंशामुळे त्यांना काही विशेषाधिकार मिळतो असे वाटत नाही. ते येथे स्थलांतरित होऊन आले. त्यांना काहीच सहजासहजी मिळालेले नाही. त्यांनी शून्यातून आपले विश्व निर्माण केले. त्यांनी आयुष्यभर अपार कष्ट उपसले आणि आज त्यांना दिसते आहे त्यांच्या नोकऱ्या सातासमुद्रापार चालल्या आहेत. आयुष्यभर मरमर काम केल्यावरही पेन्शनची खात्री नाही. ते त्यांच्या भविष्याबद्दल काळजीत पडले आहेत, त्यांना वाटू लागले आहे की आपण पाहिलेले स्वप्न आपल्या हातातून निसटते आहे. आपण स्वतः कधीही न केलेल्या अन्यायाबद्दल आज कृष्णवर्णीयांना सवलती मिळताहेत, चांगली नोकरी मिळते आहे, चांगल्या कॉलेजात जागा मिळते आहे. आपल्या शेजारी वाढणारी गुन्हेगारीबद्दलची भिती म्हणजे आपला निव्वळ पूर्वग्रह आहे, असे जेव्हा गौरवर्णीयांना सांगितले जाते तेव्हा हळूहळू हा राग, विरोध वाढू लागतो.

गोऱ्यांच्या या रागाने, विरोधाने आपल्या राजकीय व्यवस्थेला आकार दिला आहे. 'अफर्मेटिव अ‍ॅक्शन' आणि 'वेल्फेअर कृतींना विरोध करण्यातून अनेक राजकीय समीकरणे उदयाला आली. गुन्हेगारीबद्दलच्या भितीचा राजकीय नेत्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी नित्य वापर केला आहे. टॉक शोचे संचालक आणि प्रतिगामी समीक्षकांनी वंशभेदावरील चर्चेला योग्य ते वळण देण्यास जाणीवपूर्वक खीळ घातली आहे.

काळ्यांच्या रागाइतकाच गोऱ्यांचाही हा राग मध्यमवर्गाच्या कुंठिततेचे खरे कारण शोधण्यास अपयशी आणि प्रसंगी घातक ठरलेला आहे. कार्पोरेट संस्कृतीतील संशयास्पद आतले व्यवहार, वॉशिंग्टनमधील लॉबीचे हितसंबंध, मूठभरांचे स्वार्थ जपणारी आर्थिक धोरणे, ही सारी ती कारणे आहेत. अशा परिस्थितीत योग्य ते प्रश्न उठवणाऱ्या गौरवर्णी यांना 'वंशभेदी' म्हटले गेल्याने वांशिक दरी आणखीनच रुंदावली गेली आणि परस्पर समन्वयाचा रस्ताच जणू बंद झाला. 

माझ्यासारख्या एका अपरिपूर्ण माणसांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीने एकाच निवडणुकीत आपण वंशभेदाच्या पलीकडे जाऊ, असे वाटण्याइतका भोळा मी नक्कीच नाही. पण माझी परमेश्वरावर आणि अमेरिकन लोकांवर अढळ श्रद्धा आहे आणि माझी खात्री आहे की, एकत्र काम केल्यानेच वंशभेदाच्या काही जुन्या जखमांच्या पलीकडे आपण जाऊ शकू. एका अधिक परिपूर्ण संघराज्याकडे आपल्याला नेऊ शकणाऱ्या रस्त्यानेच आपल्याला जावे लागेल. आपल्या भूतकाळाचे गुलाम न होता, या भूतकाळाचे ओझे आपण स्वीकारणे हाच तो रस्ता आहे. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संपूर्ण न्यायाचा आग्रह आपण धरला पाहिजे. आपण साऱ्यांनी एकत्र येऊन आरोग्य, शिक्षण आणि रोजगारनिर्मितीच्या अनुषंगाने प्रत्येक अमेरिकन नागरिकांची इच्छाआकांक्षा फलद्रूप होण्यासाठी झटले पाहिजे. हा रस्ता म्हणजे आपण आपल्या जीवनाची पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे, आपल्या वाडवडिलांकडून सारे काही मागताना आपल्या मुलांनाही काही दिले पाहिजे. आपण आपल्या मुलांना शिकवले पाहिजे की त्यांच्याही वाट्याला विषमता किंवा सापत्न वागणूक येऊ शकते, पण म्हणून त्यांनी स्वत:ला निराशेच्या खाईत लोटता कामा नये. माझी नियती मी घडवू शकतो, असा दुर्दम्य विश्वास त्यांच्यात असला पाहिजे.

रेव्हरंड राईट आपल्या भाषणात आपल्या समाजात विद्यमान असलेल्या वंशभेदाबद्दल बोलले ही त्यांची चूक नाही, त्यांची चूक ही आहे की, ते असे काही बोलले की जणू काही आपला समाज एका जागी थांबला आहे, त्याने आजवर काही प्रगतीच केली नाही. ज्या देशात माझ्यासारखा माणूस काळे, गोरे, लॅटिन, आशियाई, गरीब, श्रीमंत या साऱ्यांना बरोबर घेऊन सर्वोच्च पदाकरिता निवडणूक लढवू शकतो, तो देश अजूनही त्यांच्या दुर्दैवी भूतकाळाशी बांधला गेला आहे, असे राईट यांना कसे काय वाटू शकते? आपल्याला ठावे आहे आणि आपण पाहिलेले आहे की, अमेरिका बदलू शकते. हीच या देशाची खरी प्रतिभा आहे. आजवर आपण जे मिळवले तेच आपल्या उदयाची मिळकतीची आशा आहे.

कृष्णवर्णीय समाज जे सोसतो आहे ते केवळ त्यांच्या मनाचे खेळ नाहीत, ही विषम व्यवस्था, सापत्न वागणुकीचे अलीकडील काही प्रसंग, हे सारे खरे आहेत आणि आपण त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, केवळ शब्दाने नव्हे तर कृतीने! आपण आपल्या शाळांसाठी, समाजासाठी गुंतवणूक केली पाहिजे, सार्वजनिक अधिकाराचे कायदे पाळले जावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, न्याय व्यवस्था कार्यक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, आजवर ज्या संधी वंचितांना मिळाल्या नाहीत त्या त्यांना मिळाव्यात यासाठी आपण सक्रिय असले पाहिजे. साऱ्या अमेरिकन लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की, तुमचे स्वप्न सत्यात येण्यासाठी माझ्या स्वप्नाचा बळी घेण्याची गरज नाही. काळ्या, गोऱ्या साऱ्या मुलांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी केलेली गुंतवणूक अखेरीस साऱ्या अमेरिकेच्या प्रगतीसाठीच कारणीभूत ठरणार आहे. 

आपले धर्मग्रंथ सांगतात,आपल्या भावाचे रक्षक व्हा. आपल्या बहिणीचे रक्षक व्हा'. परस्परांत आपले हितसंबंध गुंतले आहेत, हे ध्यानात घ्या. या भावनेचे प्रतिबिंब आपल्या राजकारणातही दिसले पाहिजेत. 

या देशात आपल्याला निवडीचा अधिकार आहे. वांशिक विभाजनाला खतपाणी घालणारे राजकारण आपण स्वीकारू शकतो किंवा वंश, वंशभेद रात्रीच्या बातम्यांचा मसाला म्हणून वापरू शकतो. रेव्हरंड राईटचे प्रवचन साऱ्या वाहिन्यांवरून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. माझा छुपा पाठिंबा राईट यांना आहे असे किती लोकांना वाटते, हे आजमावू शकतो किंवा हिलरी निवडणुकीसाठी रेस' कार्ड वापरते आहे हाच मुद्दा प्राधान्याचा करू शकतो किंवा धोरणांचा कोणताही विचार न करता सारे गोरे जॉन मॅककेनला उचलून धरतील का, याची समीक्षा करू शकतो.

आपण हे करू शकतो, पण जर आपण असे केले तर मी तुम्हाला सांगतो, पुढील निवडणुकीत व्यवधानाचा मुद्दा दुसराच कोणता तरी असेल, नंतर आणखीन दुसरा आणि नंतर आणखीनच दुसरा! आणि दुर्दैवाने काहीच बदलणार नाही. हा एक पर्याय आहे किंवा या क्षणी, या निवडणुकीत आपण एकत्र येऊन ठामपणे म्हणू शकतो, "यावेळी अजिबात नाही (Not this time) यावेळी काळ्या-गोऱ्या, आशियाई-हिस्पॉनिक, स्थानिक अमेरिकन मुलांच्या भविष्यावर घाला घालणाऱ्या ढासळत्या शाळांबद्दल आम्हाला बोलायचे आहे. 

आमच्यासारखी न दिसणारी ही मुले आमची समस्या नाही, किंवा ही मुले शिकूच शकत नाहीत ही तुच्छतेची भावना यावेळी आम्हाला नाकारायची आहे. ही आमची मुले आहेत आणि एकविसाव्या शतकाच्या अर्थव्यवस्थेत आम्ही त्यांना मागे पडू देणार नाही. यावेळी अजिबात नाही. यावेळी आम्हा साऱ्यांना एकत्र येऊन वॉशिंग्टनमधील हितसंबंधी कंपूवर मात करावयाची आहे. 

एकेकाळी सर्व वंश-धर्माच्या स्त्री-पुरुषांना रोजगार देणाऱ्या आणि आता बंद पडलेल्या गिरण्यांबद्दल यावेळी आम्हाला बोलायचे आहे. माझ्यासारखा न दिसणारा कोणीतरी माझी नोकरी हिसकावून घेईल, ही खरे समस्या नाही तर माझी कंपनी निव्वळ फायद्याकरिता इथले रोजगार समुद्रापार पाठवते आहे, याबद्दल यावेळी आम्हाला बोलायचे आहे. आमच्या दिमाखदार झेंड्याखाली येऊन एकत्रित लढणाऱ्या, सेवा करण्याच्या, रक्ताळणाच्या सर्व वर्णाच्या, वंशाच्या स्त्री पुरुषांबद्दल यावेळी आम्हाला बोलायचे आहे. 

नको असलेल्या, विनाकारण लादलेल्या युद्धात जे ओढले गेले त्यांना घरी कसे आणायचे, याबद्दल आम्हाला बोलायचे आहे. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची योग्य ती काळजी घेऊन आम्हाला यावेळी आमची देशभक्ती सिद्ध करावयाची आहे.

बहुसंख्य अमेरिकन जनतेला आपल्या देशासाठी हे सारे करावे लागते आहे, असा जर माझा विश्वास नसता तर कदाचित मी या निवडणुकीत उभाच राहिलो नसतो. हे संघराज्य कधीच परिपूर्ण नसेल कदाचित, पण पिढ्यामागून पिढ्यांनी हे दाखवून दिले आहे की, हे परिपूर्ण होऊ शकते. आज एक विशेष गोष्ट मला तुम्हाला सांगावयाची आहे. डॉ.किंग यांच्या जन्मदिनी त्यांच्या चर्चमध्ये मी ही गोष्ट सांगितली होती. अँशले नावाची एक 23 वर्षांची गौरवर्णीय महिला. आमच्या साउथ कॅरोलिनातील फ्लॉरेन्समधील अभियानाची प्रमुख संघटक. ही निवडणूक सुरू झाली तेव्हापासून ती आफ्रिकन-अमेरिकन समाजाला संघटित करण्यासाठी झटते आहे. एके दिवशी एका निवांत क्षणी, सारे कार्यकर्ते टेबलाभोवती जमून गप्पा मारत होते. आपण या निवडणूक अभियानाशी का व कसे जोडले गेलो, हे एकमेकांना सांगत होते.  आणि अँशले सांगू लागली- ती नऊ वर्षांची असताना तिच्या आईला कर्करोग झाला. त्यामुळे तिच्या कामाचा खाडा झाला. आरोग्य विमा संपला. त्यांना दिवाळखोरी जाहीर करावी लागली. 

छोट्या अॅशलेच्या लक्षात आले की, तिच्या आईला मदत करण्यासाठी आपल्याला काहीतरी करणे भाग आहे. या चाणाक्ष मुलीने ओळखले की आपला मुख्य खर्च खाण्यावर होतो. या मुलीने आईला पटवून दिले की मला मस्टर्ड आणि सॅण्डवीच खूप आवडते. कारण हेच पदार्थ सर्वात स्वस्त मिळत. आणि असे तिने एक वर्षभर म्हणजे तिची आई बरी होईपर्यंत चालू ठेवले. अँशले म्हणाली, "मला या देशातील लक्षावधी मुलांना मदत करावयाची आहे आणि त्यांच्या पालकांनाही मदतीचा हात द्यावयचा आहे म्हणून मी या निवडणूक अभियानात सामील झाले."

खरे पाहता अँशलेला दुसराही मार्ग निवडता आला असता, कोणीतरी तिला सांगितलेही असेल, की तिच्या आईच्या आणि तिच्या हालअपेष्टांना आळशी आणि वेल्फेअर उपक्रमावर जगणारे काळे जबाबदार आहेत किंवा अवैधपणे या देशात येणारे हिस्पॅनिक्स जबाबदार आहेत. पण तिने असे केले नाही, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तिने आपले साथीदार विचारपूर्वक निवडले. अँशले आपली कथा संपवली. आता पाळी इतरांची होती, प्रत्येकजण आपापली जीवनकथा आणि कारणे सांगत होता. अखेरीस खूप वेळापासून कोपऱ्यात शांतपणे बसलेल्या एका वयोवृद्ध कृष्णवर्णीय व्यक्तीची पाळी आली. अँशलने त्यांच्या अभियानात सामील होण्याचे कारण विचारले. त्याने कोणताही विशेष मुद्दा सांगितला नाही, ना आरोग्यचा मुद्दा, ना अर्थव्यवस्थेचा! ना शिक्षणाची समस्या ना युद्धाची! बराक ओबामाला पाठिंबा देण्यासाठी मी इथे आहे, असेही तो म्हणाला. नाही. खोलीतील प्रत्येकाला तो एवढेच म्हणाला "मी अँशलेमुळे येथे आहे." 

त्या तरुण गोऱ्या मुलीला आणि त्या वृद्ध म्हाताऱ्याला एका धाग्यात बांधणारा हा क्षण अपुरा आहे, हे मी जाणतो. या देशाला उत्तम आरोग्यव्यवस्था देण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आणि आपल्या गोजिऱ्या मुलांना शिक्षण देण्यासाठी हा क्षण पुरेसा नाही, हे मी जाणतो. पण हा क्षण ही एक सुरुवात आहे, या क्षणाने आपले संघराज्य बळकट करणाऱ्या मोहिमेची सुरुवात केली आहे. फिलाडेल्फियामध्ये आमच्या देशभक्तांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केल्यानंतरच्या दोनशे एकवीस वर्षांत अनेक पिढ्यांनंतर आम्हाला हे उमगते आहे आणि हीच परिपूर्णतेची सुरुवात आहे.

अनुवाद : डॉ. प्रदीप आवटे

(डॉ. प्रदीप आवटे हे जागतिक आरोग्य संघटनेवरील अधिकारी आहेत) 
 

Tags: बेरोजगारी आरोग्यव्यवस्था डेमोक्रॅटिक पक्ष अध्यक्षीय निवडणूक अमेरिका  बराक ओबामा Unemployment Healthcare Democratic Party Presidential Election USA Barack Obama weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बराक ओबामा

माजी अध्यक्ष- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके