डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

‘अ प्रॉमिस्ड लॅन्ड’ या पुस्तकाच्या निमित्ताने संवाद (भाग 2)

माझ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात सत्ता कशी राबवावी, याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज होते. आक्रसताळेपणा केल्यामुळे आणि खत्रूडपणे वागल्यामुळे अधिकाधिक कामे मार्गी लावता येतात, असा त्यांचा समज होता. माझ्या कारकिर्दीतील काही प्रसंग मला आठवतात- जेव्हा माझ्या पाठीराख्या वर्गामध्ये, किमानपक्षी बुद्धिवंतांमध्ये नैराश्याची व हताशपणाची भावना निर्माण झाली होती. ही मंडळी लिंडन जॉन्सन (23) आणि माझ्यामध्ये तुलना करून दोघांमधला फरक दाखवायची. ते म्हणायचे, जॉन्सन हा अतिशय घाणेरडा माणूस असला, तरी त्याने व्होटिंग राईट्‌स्‌ ॲक्ट 24 संसदेकडून मान्य करून घेतला की नाही? आणि असेच बरेच काही. ओबामा, तुम्ही तशा पद्धतीने वागले पाहिजे, तुम्ही नको इतके चांगले आहात...

प्रश्न - मला तुमच्या लेखनप्रक्रियेविषयी म्हणजे तुम्ही हे पुस्तक कसे लिहिले, याबद्दल विचारायचे आहे. त्याबद्दलचा माझा एक प्रश्न असा आहे की, तुम्ही मोठ्या प्रमाणात सर्व गोष्टींना एका संदर्भचौकट देता- म्हणजे या गोष्टींची चर्चा त्यांच्या-त्यांच्या संदर्भचौकटीत करता- आणि नेमकेपणाने बोलायचे झाले, तर तुम्ही तुमच्या विरोधकांबद्दल चर्चा करताना एक संदर्भचौकट किंवा काहीएक पार्श्वभूमी देऊनच ती करता, याबद्दल आहे. हे पुस्तक म्हणजे सध्याची राजकीय परिस्थिती किंवा वर्तमान आणि खूप मागच्या काळातील राजकीय भूतकाळ यांना जोडणारा एक सांधा वाटतो. तुम्ही तुमच्या राजकीय भूमिका संयमी पद्धतीने मांडता. खरे पाहिले तर ट्रंप त्यांच्या मित्रांबाबत जितका चांगूलपणा दाखवितात, त्यापेक्षा अधिक तुम्ही तुमच्या शत्रूंबद्दल दाखविता. ही शैली तुमच्या स्वभावामुळे इथे येते का? तसेच, आपण राष्ट्राध्यक्ष होतो आणि त्यामुळे आपल्या लिखाणाला एक पोक्तपणा पाहिजे, या धारणेमुळे येते का? मी तुम्ही तुमच्या शपथग्रहण सोहळ्याच्या दिवशीचे जे वर्णन केले आहे, त्याबद्दल विचारत आहे. मावळते राष्ट्राध्यक्ष बुश यांच्यासोबत गाडीत होतात, लोक त्यांच्याविरोधात खिल्ली उडवून घोषणा देत होते आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. 

- राजकारणाच्या सर्वोच्च स्थानी असतानादेखील मी माझे स्वत्व जपून ठेवण्यासाठी- माझा आत्मा, काय चूक काय बरोबर याबद्दलचे माझे ठोकताळे, धारणा, माझे चारित्र्य, माझ्या लेखी मी जो कोण आहे तो- हे सगळे आपल्या हातून निसटून जाऊ नये यासाठी माझे चाललेले प्रयत्न या पुस्तकातील एकूण कथनाचा एक प्रमुख पैलू आहे.

प्रश्न - या पदाचे हास्यास्पद (absurd) स्वरूप पाहता, कोणताही राष्ट्राध्यक्ष आपल्यातील माणूस कसा काय जिवंत ठेवू शकतो, हादेखील प्रश्न पडतो. 

- (राष्ट्राध्यक्ष असला तरी) तो पिता असतो, मित्र असतो, पती असतो. पुस्तकातील पहिल्या विभागाचे नाव ‘द बेट’ म्हणजेच पैज असे आहे. पहिली पैज जी मी लावत आहे ती अमेरिकेच्या स्वरूपात अनुस्यूत असलेल्या तिच्यातील आणि लोकशाहीच्या अंगभूत ताकदी संदर्भातील. एक मोठा, विविधता असलेला, आपापसात मतभेद असल्यामुळे वाद घालण्याची हौस असलेला, बहुवांशिक असा देश तेथील समाजाला अधिक परिपूर्ण करू शकतो आणि जगाला एक उदाहरण घालून देऊ शकतो, यावर माझा विश्वास आहे. असे होईल, यावरच मी एका अर्थाने पैज लावली. ज्या दुसऱ्या मुद्याबाबत मी स्वतःशी पैज लावली ती म्हणजे, न सुधारण्याइतपत नीतिभ्रष्ट न होता मी या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकेन. म्हणून जटिल पर्यायांमधून अटळपणे करावी लागणारी निवड आणि अपरिहार्यपणे केल्या जाणाऱ्या तडजोडी, यांच्याशी झुंज देणारा असा मी तुम्हाला या पुस्तकात दिसेन. 

प्रश्न - या सगळ्याला सुरुवात तुमच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचारापासून झाली?

- माझ्या पहिल्या निवडणुकीवेळी एका व्यक्तीने ती निवडणूक- म्हणजे मी ज्या निवडणुकीची तयारी करत होतो ती- लढविणार नाही, असा मला शब्द दिलो होता आणि तिने तो शब्द फिरविला. आता उमेदवारीअर्ज स्वीकारला जाण्यासाठी जितक्या नागरिकांचा लेखी पाठिंबा लागतो, तितके संख्याबळ काही त्या व्यक्तीकडे नव्हते. तेव्हा माझ्यापुढे प्रश्न होता की- या मुद्याच्या आधारे अशा व्यक्तीविरोधात तक्रार करून तिची उमेदवारीच बाद करावी का? हवे त्याला किंवा तिला निवडणुकीला उभे राहता येणार का, हा या सगळ्यातला गाभ्याचा प्रश्न आहे. आता सह्या करून लेखी पाठिंबा व्यक्त करण्याची ही जी तरतूद आहे, तिचा हेतू प्रस्थापितांना आपल्या जागांवर कायम राहता यावे हा आहे. मुद्दा असा आहे- माझी याबद्दलची भूमिका काय आहे? मला याबद्दल नेमके काय वाटते? आणि याबाबतचा विचार पुस्तकामध्ये शेवटापर्यंत केलेला दिसेल. राष्ट्राध्यक्षपदाच्या माझ्या संपूर्ण कार्यकाळातही अगदी हाच विचार केलेला दिसेल.

तुम्हाला जे काही या सगळ्याबद्दल वाटत आहे, त्याचा पैलू हा पुढीलप्रमाणे आहे- जेव्हा मी विनयशील व सभ्यपणे वागले पाहिजे असा निर्णय घेतो आणि जेव्हा मी लोकांमध्ये चांगुलपणा आणि इतर तत्सम सद्‌गुण आहेत असे गृहीत धरतो, ते काही मी भोळा-भाबडा आहे म्हणून असे करीत नाही; तर असे वागले पाहिजे, असा निर्णय मी समजून-उमजून आणि जाणूनबुजून घेतलेला असतो. कारण, अधिकाधिक लोक या पद्धतीने वागले, तर हे जग अधिक सुंदर होईल. कधी कधी असे वागण्यात मी कमी पडतो आणि मग स्वतःबद्दलच माझा अपेक्षाभंग होतो. आपली वागणूक ही नीतिमत्ता, नैतिकता आणि मूलभूत स्वरूपाचा मानवी सभ्यपणा- अशा मुद्यांवर आधारलेली असणे महत्त्वाचे आहे, असे निदान मला तरी वाटते. 

माझ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात सत्ता कशी राबवावी, याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज होते. आक्रसताळेपणा केल्यामुळे आणि खत्रूडपणे वागल्यामुळे अधिकाधिक कामे मार्गी लावता येतात, असा त्यांचा समज होता. माझ्या कारकिर्दीतील काही प्रसंग मला आठवतात- जेव्हा माझ्या पाठीराख्या वर्गामध्ये, किमानपक्षी बुद्धिवंतांमध्ये नैराश्याची व हताशपणाची भावना निर्माण झाली होती. ही मंडळी लिंडन जॉन्सन (23) आणि माझ्यामध्ये तुलना करून दोघांमधला फरक दाखवायची. ते म्हणायचे, जॉन्सन हा अतिशय घाणेरडा माणूस असला, तरी त्याने व्होटिंग राईट्‌स्‌ ॲक्ट (24) संसदेकडून मान्य करून घेतला की नाही? आणि असेच बरेच काही. ओबामा, तुम्ही तशा पद्धतीने वागले पाहिजे, तुम्ही नको इतके चांगले आहात... 

प्रश्न - शिकागोच्या हाईड पार्क भागात राहणारे व कायद्याचे अध्यापन करणारे एक सभ्य प्राध्यापक....

- हो, हे आणि इतर बरेच काही. पण सार्वजनिक रीत्या नाही तर खासगीत मी लोकांना सागांयचो की- लिंडन जॉन्सन हे बऱ्याच गोष्टी करून घेऊ शकले, कारण सरतेशेवटी संसदेत त्यांच्याकडे प्रचंड संख्याबळ होते. बस्स, हेच. एफ.डी.आर.(25) यांच्या पाठीशी असाच पाठिंबा होता, तेव्हाच त्यांना हव्या त्या गोष्टी करून घेता आल्या. आणि बहुतेक वेळा खरा मुद्दा हाच असतो- तुम्हाला हवे असलेले कायदे मान्य करून घेण्यासाठी तुमच्या पाठीशी संसदेत आवश्यक ते संख्याबळ आहे का? आता अफोर्डेबल केअर ॲक्ट (26) मान्य करून घेण्याच्या प्रक्रियेकडे पाहू. हा कायदा फक्त सिनेटमध्ये मान्य करून घेणे पुरेसे नव्हते, तर सिनेटने मान्य केलेले हे विधेयक संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील- प्रतिनिधीगृहातील - माझ्या पक्षाच्या सदस्यांकडून मान्य करून घ्यायचे होते. तेसुद्धा जेव्हा सिनेटने मान्य केलेले विधेयकाचे प्रारूप अधिक सोई-सुविधा देत नाही म्हणून त्यांना फारसे पसंत नसताना! यात नॅन्सी पेलोसी (27) यांच्यासोबत काम करत मी माझ्याच पक्षातील सदस्यांशी अत्यंत प्रभावीपणे संवाद साधला आणि त्यांना विधेयक आहे त्या स्वरूपात मान्य करण्याबाबत पटवून देऊ शकलो. या सर्व प्रक्रियेमध्ये माझ्या मनासारखे व्हावे, म्हणून मी कोणाचीही गचांडी धरली नाही किंवा काही गुप्त कारस्थानेही केली नाहीत.

आता ज्या गोष्टी करून घेण्यात मी कमी पडलो त्याचा विचार केला तर ‘असे का झाले?’ हा प्रश्न उपस्थित होतो. आपण ज्या घटकांचा-शक्तींचा उल्लेख आणि विचार यापूर्वीच केला आहे, त्या याच्या मुळाशी होत्या- सिनेटमधील फिलिबस्टर ओलांडून पुढे जाण्यासाठी तुम्हाला 60 सिनेटर्सचा पाठिंबा हवा. माझ्या कारकिर्दीच्या पहिल्या महिन्याबाबत बोलायचे झाले तर, त्या वेळी या सर्व शक्ती माझ्या विरोधात काम करत होत्या. आमच्यासमोर एक प्रचंड मोठे आर्थिक संकट उभे राहिल्याचे आम्हाला स्पष्टपणे दिसत होते. त्यावरील उपाययोजना सिनेटमध्ये मान्य करून घेण्यासाठी आम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या काही सदस्यांचा पाठिंबा आवश्यक होता आणि तो आम्ही कसाबसा महत्‌प्रयासाने मिळवला. म्हणूनच आम्ही ‘अमेरिकन रिकव्हरी अँड रिइनव्हेस्टमेंट ॲक्ट’ (28) मान्य करून घेऊ शकलो. अशा आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठीच्या पॅकेजच्या बाजूने मतदान केल्याबद्दल पक्षातून त्या रिपब्लिकन्सपैकी एक असलेल्या आर्लेन स्पेक्टर (29) यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या अशा पॅकेजला रिपब्लिकन पक्षाचा काही वैचारिक विरोध नव्हता, याची आता आपल्याला कल्पना आलेली आहे. कारण त्यांनीदेखील दोन लाख कोटी डॉलरचे आर्थिक मदतीचे पॅकेज नुकतेच मान्य केले आहे. का, तर राष्ट्राध्यक्ष त्यांच्या पक्षाचे आहेत. 

प्रश्न - 2021 चा जानेवारी उजाडताच रिपब्लिकन मंडळी अर्थसंकल्पातील तुटीमध्ये पुन्हा एकदा रस घ्यायला लागतील.

- अर्थात. पुस्तक लिहिताना प्रत्येक्ष क्षणी मी मागे वळून पाहत होतो आणि प्रत्येक वेळी माझ्या मनात विचार यायचा की, अनेक प्रसंगांत मी नको इतक्या चांगुलपणाने वागलो. 

प्रश्न - तुम्ही अधिक चांगुलपणाने वागायला पाहिजे होते, असे नाही का वाटत?

- म्हणजे नेमके काय? 

प्रश्न - म्हणजे मॅककॉनेलना अधिक वेळा अनौपचारिक रीत्या भेटणे, विरोधकांशी अधिक संवाद साधत त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करणे...

- हे पाहा, हे सगळे दुसऱ्या खंडात येईल आणि मी त्याबद्दल अधिक स्पष्टपणे लिहिणार आहे. पण आता उदाहरणार्थ- जॉन बेनर (30) घ्या. माझे आणि त्यांचे राजकीय संबंध अतिशय उत्तम होते, पण स्वतःच्या पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा कायम ठेवण्यासाठी त्यांना एका विशिष्ट पद्धतीने वागावे लागायचे. माझ्याशी बोलताना- अर्थात खासगीत- ते प्रतिनिधीगृहातील आपल्या पक्षांच्या सदस्यांना नावे ठेवायचे. जॉन मॅकेनही हेच करायचे. विरोध कधीच वैयक्तिक नव्हता. आता मिच मॅककॉनेल यांना एकूण राजकीय व्यवस्थेत जवळचा असा कोणीच मित्र नाही. ज्यो बायडेन आणि मिच यांची दीर्घ काळापासूनच कशी मैत्री आहे, असे सध्या लिहिले जात आहे आणि ते वाचण्यात मला बरीच मौज वाटत आहे. दोघांचीही एकमेकांशी बऱ्याच वर्षांपासूनची ओळख आहे, परिचय आहे. मिच मॅककॉनेल यांच्याशी झालेल्या भेटी-गाठी, चर्चा-संवाद याबद्दल बायडेन काय म्हणाले आहेत ते माझ्यासमोर आहेच की. मी रिपब्लिकन मंडळींना आपलेसे करण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत, असे नाही. आम्ही त्यांना सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना निमंत्रित करीत असू- व्हाईट हॉऊसमध्ये चित्रपट दाखविण्याच्या कार्यक्रमांना, शासकीय भोजन समारंभांना, कँप डेव्हिडला...(31) तुम्ही ज्या कोणत्या कार्यक्रमाचे नाव घ्याल, त्या सर्वांना. त्यांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न कमी पडले, हा मुद्दा नाही. त्यांना माझे आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे राक्षसीकरण करणे हे राजकीय दृष्ट्या फायद्याचे होते. फॉक्स न्यूजसारख्या माध्यमांनी या राक्षसीकरणाचा प्रचार-प्रसार केला. त्यांच्या मतदारांचा यावर विश्वास बसायला लागला आणि कालांतराने राक्षसीकरण करण्याचे रिपब्लिकनांचे प्रयत्न इतके यशस्वी ठरले की, त्यांना आमच्याशी तडजोडी करणेच नव्हे तर मैत्रीपूर्ण पद्धतीने वागणेदेखील अवघड होऊन बसले.

प्रश्न - फ्लॉरिडाचे चार्ली क्रिस्ट (32) हे उदाहरण आहे?

- या सर्व गोष्टी फार लवकर घडल्या. मी पुस्तक लिहीत असताना जेव्हा मागे वळून पाहिले, तेव्हा मला कशाकशाचे आश्चर्य वाटले असे तुम्ही विचारले होते. आपल्या व्यवस्थेत गोष्टी किती वेगाने घडतात, हे मी विसरलोच होतो. माझा शपथविधी झाला आणि आम्ही एका महिन्याच्या आतच ‘अमेरिकन रिकव्हरी अँड रीइनव्हेस्टमेंट ॲक्ट’ मान्य करून घेतला. दोन ते तीन महिन्यांत वाहन उद्योगाला आम्ही आर्थिक मदतीचे एक पॅकेज दिले. बँकिंगव्यवस्था पूर्णतः ढासळू नये, यासाठीही आम्ही उपाययोजना केल्या. अशा वेळी माझी चार्ली क्रिस्ट यांच्याशी भेट होते. त्या वेळी ते अतिशय लोकप्रिय असे रिपब्लिकन पक्षीय राज्यपाल होते आणि पक्षभेदापलीकडे जाऊन काम करणारे अशी त्यांची ख्याती होती. मी त्यांच्याशी हस्तांदोलन करतो आणि दोन जिवलग मित्र जशी एकमेकांची उराउरी भेट घेतील, तशा पद्धतीची मिठी मारतो. या भेटीमुळे ते स्वतःच्या पक्षातच उपरे ठरले. हे सगळे कधी झाले, तर माझा शपथविधी होऊन एक महिना पूर्ण होण्याच्या आत. त्या वेळी माझ्या कामाबद्दल 63-65 टक्के लोक खूश होते. एका अर्थाने मी त्या वेळी राजकीय मधुचंद्राचा आनंद लुटणारा लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष होतो. आता मी इथे काय केले? तर, मी कोणाचे तरी अभिनंदन करीत आहे आणि त्यांच्याशी केवळ नम्रपणे व सौजन्याने वागत आहे. इथे क्रिस्ट यांच्यासारखा नेता काय करतो? तर, आपल्या राज्यातील आर्थिक परिस्थिती अधिकाधिक बिकट होत चालली असल्यामुळे राज्यातील लोकांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी आणि गृह कर्जाचे हप्ते भरता येत नसल्यामुळे याच लोकांच्या घरावर येणारी जप्ती टाळण्यासाठी आर्थिक मदतीच्या एका पॅकेजला पाठिंबा देतो. त्याच्या या भूमिकेसंदर्भात स्वपक्षात काय प्रतिक्रिया उमटते? तर, त्यांची तत्काळ बदनामी सुरू होते आणि त्यांना पक्षातून घालवून दिले जाते. इथून मार्को रुबियो (33) यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात होते. त्याचा प्रारंभ कसा होतो- तर चार्ली क्रिस्ट हे खऱ्या अर्थाने रिपब्लिकन नाहीत, या टीकेचा भडिमार करून. 

मग जॉन मॅकेन निवडणुकीनंतर घासून गुळगुळीत झालेले नेहमीचेच वाक्य उच्चारतात- ‘मी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना यश लाभो अशी प्रार्थना करतो’ आणि लगेच याचा प्रतिवाद-विरोध करणारी प्रतिक्रिया रश लिंबॉ यांच्याकडून येते. उजव्या विचारांच्या माध्यमविश्वात त्याची री ओढली जाते. 

आता या सगळ्याचा आम्ही विचार केला असता किंवा याला आमच्या हिशोबात धरले असते,आणि मी मिच मॅककॉनेल किंवा पॉल रायन (34) यांच्यासोबत आणखीन काही अनौपचारिक बैठका किंवा भेटी-गाठी घेतल्या असत्या, तर सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्या असत्या किंवा सर्व काही आलबेल झाले असते- हा जो समज आहे....

5. आयोवा राज्यात काय चालले आहे?

प्रश्न - तुम्हाला आयोवा (35) राज्याबद्दल प्रचंड आस्था-ममत्व असल्याचे तुमच्या लिखाणावरून स्पष्ट होते. या राज्याने तुम्हाला पाठिंबा दिला म्हणून एका अर्थाने तुमच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. पण तुमची भावना केवळ एवढ्यापुरती मर्यादित नाही. आपण इतिहासाच्या एका अगदी वेगळ्या टप्प्यावर आहोत, असे वाटायला लागले होते. त्यापूर्वीचा काळ म्हणजे तुमचा आयोवातील प्रचाराचा काळ. शिवाय माझ्या आकलनानुसार हा काळ म्हणजे तुमच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचाराला गती मिळण्यापूर्वीचा आणि तुमची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीचा तुम्ही अनुभवलेला निर्भेळ-निखळ आनंदाचा व मौजेचा हा शेवटचा काळ होय.   

- आयोवातील काळ हे सुवर्णक्षणच होते, कारण राजकारण आणि अमेरिका अपेक्षित दिशेने पुढे जात होते. त्या वेळी मी हेलावून गेलो होतो. आजही तो काळ मला हेलावून टाकतो. समाजातील सर्व स्तरांतील, सर्व घटकांतील तरुण-तरुणी- न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलीन भागातील कृष्णवर्णीय, कॅलिफोर्नियातील आशियाई वंशीय, अमेरिकेच्या मध्य भागातील शेतकरी कुटुंबं- सगळे माझ्या प्रचारात सामील झाले होते. साहित्याच्या एका बॅगेसह आम्ही त्यांना आयोवातील लहान शहरांमध्ये धाडून दिले. या शहरांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव होता. या तरुणाईने केले काय तर- किराणा दुकानासोमोर टेबल टाकून प्रचार केला, रोटरी क्लबच्या बैठकांना हजेरी लावली, लिटल लीगच्या (36) स्पर्धांसाठी स्थानिक संघांना प्रशिक्षण दिले. लोकांची मने जाणून, त्यांचे म्हणणे ऐकून आणि त्यांच्या आयुष्याशी समरस होऊन हे शहर आपलेसे करून त्यांना आमच्या बाजूला वळवले. सहभागात्मक लोकशाहीवर आधारित एक चळवळच आम्ही तिथे उभी केली. राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमॉक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळण्याच्या माझे प्रयत्न गांभीर्याने घेतले जाऊ लागले ते या चळवळीमुळेच. 

प्रश्न - पण त्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाच्या सलग दोन निवडणुकांमध्ये ओयोवाने ट्रंप यांच्या बाजूने कौल दिला होता. 

- मी एवढ्याच आधारावर इतक्या लवकर निराश होणार नाही. बेरोजगारीचा दर 2012 च्या निवडणुकीत 8.5 टक्के असूनही आयोवाने माझ्या बाजूने कौल दिला आणि ओयोवाच्या लोकसंख्येतील विविध वांशिक गटांचे लोकसंख्येतील प्रमाण काही बदललेले नाही. मी आयोवात बहुमताने जिंकलो. त्यामुळे या देशात काही तरी फार मोठा बदल झाला आहे, असा समज काही तितकासा खरा नाही. वस्तुस्थिती वाटते त्यापेक्षा अधिकच गुंतागुंतीची आहे. 

मुळातच मला मतदान करायला अनुकूल नसलेल्या मतदारांशी थेट संवाद साधण्याचा आयोवातला प्रचाराचा काळ हा शेवटचा प्रसंग होता. असा थेट संवाद मी पहिल्यांदा कधी साधला, तर सिनेटची निवडणूक लढवताना. आता इलिनॉयचा (37) दक्षिण भाग हा केन्टकी अथवा ओहायोचा दक्षिण भाग अथवा इंडियाना अथवा आयोवाच्या बऱ्याचशा भागांसारखा आहे. या सिनेट निवडणुकीच्या निमित्ताने माझ्या लक्षात आले की, सांस्कृतिक दृष्ट्या परंपरानिष्ठ अशा भागात, ग्रामीण किंवा लहान शहरांमध्ये- जेथील बहुसंख्य कष्टकरी वर्ग हा श्वेतवर्णीय आहे- तेथील मंडळींशी मी एक नाते प्रस्थापित करू शकतो आणि त्यांची मते मिळवू शकतो. त्याचे कारण म्हणजे विसंवाद घडवतील असे कोणतेही मध्यस्थ आम्हा दोघांमध्ये नव्हते. आणि हेच राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन्ही निवडणुकींमध्येसुद्धा घडले.

माझ्यासारखी सभ्य व सौजन्यशील व्यक्ती आयोवात जाऊन आपल्या आयुष्याची कहाणी सांगते आणि त्या मंडळींच्या आयुष्यांच्या कहाण्या ऐकते- हे सगळे त्या वेळी आयोवात शक्य होते, कारण राजकारणाचे स्वरूप एका अर्थाने बऱ्यापैकी विकेंद्रित होते. आता माझ्या राजकीय प्रवासातील एक विरोधाभासी पैलू म्हणजे- मी वॉशिंग्टनमध्ये विविध लोकांच्या भेटीगाठी सातत्याने घेऊन त्यांच्यावर माझी छाप पाडण्याचे आणि प्रतिमानिर्मितीचे प्रयत्न केले नाहीत. आयोवातल्या मंडळींना मी जितके प्रेम दिले, तितके प्रेम मी वॉशिंग्टनमधील प्रस्थापितांना दिले नाही, हे खरे आहे. आयोवातली मंडळी पाहिली की, मला माझ्या आजी-आजोबांची आणि मिशेलच्या आई-वडिलांची आठवण येते. येथे एक प्रकारची आपलेपणाची भावना आहे, एक प्रकारचा आप्तभाव आहे. पण आयोवातील प्रचार आटोपल्यानंतर आपण आता राष्ट्रीय पातळीवर प्रचार करीत आहोत, हे माझ्या लक्षात आले. वीस ते पन्नास हजारांच्या संख्येने लोक तुमच्या सभांना येतात, ही बाबच अशी आहे की, त्यामुळे डोक्यात हवा जाऊ शकते. 

प्रश्न - तुम्ही एक प्रकारे कशाचे तरी प्रतीक झालात. 

- याला डेव्हिड क्सेलरॉड (38) फारसे गांभीर्याने घेत नव्हता आणि या सगळ्याला निकालात काढत याला ‘दैवी प्रतीक ओबामा’ म्हणायचा. हे जे काही होत आहे ते धोकादायक आहे, हे त्याला माहिती होते. आजूबाजूच्या घडामोडी गाळून-चाळून लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या प्रस्थापित आणि वर्चस्व असलेल्या यंत्रणा व बातम्या यांच्या चष्म्यातून लोक आपल्याकडे पाहतात. आता या बातम्यांच्या स्रोतांचे स्वरूपच बदलले आहे. अगदी 2008 पर्यंत अशी परिस्थिती होती की, मी एखाद्या लहान शहरात गेलो तर तिथे एक स्थानिक वृत्तपत्र असायचे. त्याचा मालक किंवा संपादक उजव्या किंवा परंपरानिष्ठ विचारांचा असायचा. अनेक वेळा त्याच्या केसांचा क्रू कट असायचा. शिवाय बोटाय लावलेला असायचा. ही मंडळी अनेक वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाची समर्थक असायची. सरकारने कर वाढवावेत आणि ते पैसे खर्च करावेत, अशी भूमिका असणाऱ्या उदारमतवादी-पुरोगामी राजकारण्याचे म्हणणे एकूण घेण्यात त्यांना रस नसायचा; पण मला भेटायला ते तयार व्हायचे. मग तो संपादकीय लिहायचा- हा शिकागोचा वकील उदारमतवादी-पुरोगामी आहे. पण मला तो बरा व सभ्य वाटला आणि त्याच्याकडे काही चांगल्या कल्पनाही आहेत. स्थानिक दूरचित्रवाहिनीही कोणताही पक्षपात न करता सरळ पद्धतीने माझ्या प्रचाराचे वार्तांकन करायची.

आता तुम्ही त्याच शहरांमध्ये गेलात तर काय दिसेल? तर, ती सर्व वर्तमानपत्रे नाहीशी झालेली आहेत. आता प्रत्येक केशकर्तनालयातील टीव्हीवर किंवा माजी सैनिकांची जी देशव्यापी संघटना आहे, तिच्या स्थानिक सभागृहातील टीव्हीवर फॉक्स न्यूज लावलेले असेल. ते जर नसेल, तर सिंक्लेर समूहाच्या (39) मालकीची वाहिनी तरी लावलेली असेल. माझ्यासारखी व्यक्ती नेमकी कोण व कशी आहे, तिच्या राजकीय भूमिका काय व कोणत्या आहेत, ती कोणत्या मूल्यांवर विश्वास ठेवते याबद्दल पूर्वी जो समज असायची, धारणा असायच्या, ठोकताळे असायचे; त्यांत आता आमूलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे अशा मंडळींचा पूर्वग्रह आणि मनातील किंतु दूर सारून त्यांच्यापर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे.    

लिखाण संपल्यानंतर मला एक बाब जाणवली. एखाद्या तथ्याविषयी किंवा सामाईक घटनेविषयी पूर्वी आपल्या समाजात आणि राजकीय व्यवस्थेत सर्वांचे एकमत होत असे. काही बाबींबद्दल व्यापक अशी सहमती होती. आता हे चित्र पूर्वीसारखे राहिले नाही. या घसरणीची मला प्रचंड चिंता वाटत आहे. आता आपल्याकडे कोणी वॉल्टर क्राँकाईट (40) नाहीत. त्यांनी आपल्याला केनेडींच्या (41) हत्येच्या शोकांतिकेचे वर्णन टीव्हीवरून सांगितले. पण यासोबतच व्हाईट हाऊस आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी जे व्हिएतनाम युद्धाबद्दल सांगत आहेत त्यापेक्षा वस्तुस्थिती वेगळी आहे हेदेखील त्यांनी युद्धाचे समर्थक व विरोधक या दोघांनाही सांगितले. तसे आता आपल्याकडे कोणी नाही. अशा सामाईक आणि सर्वांना मान्य असलेल्या धारणा नसल्या, तर लोकशाही राबविणे अवघड होत जाते. 

आयोवातील पक्षांतर्गत निवडणुकीतील विजयानंतर रेव्हरंड जेरेमाया राईट (42) यांची दोन मिनिटांची व्हिडिओटेप प्रसिद्ध झाली. त्यात ते आफ्रिकी पद्धतीचे कपडे घालून अमेरिकेला जाम शिव्या देत आहेत. यामुळे एक वावटळ उठली आणि माझी उमेदवारी धोक्यात आली. पण ती सावरली. आता ते नेमके काय आणि का म्हणाले याची पार्श्वभूमी मी विशद केली, त्यांच्या वाक्‌ताडनाला एक संदर्भचौकट पुरविली. त्यामुळे शिकागोच्या साऊथ साईड भागात कधीही पाऊल न ठेवलेला आणि राईट काय म्हणाले याबद्दल बऱ्यापैकी नाराज असणाऱ्या देशातील एका मोठ्या वर्गाला मी माझ्या बाजूला आणले. त्या वेळचे माध्यमविश्व कसे वेगळे होते याचा हा पुरावा होय.

सध्या काय परिस्थिती आहे? तर, डेमॉक्रॅटिक पक्ष हा लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीच्या लोकांना दाखविण्यासाठी तयार केलेला मुखवटा आहे, अशी ठाम समजूत असणारा एक मोठा वर्ग देशात आहे. हे सगळे रुजत जाते. फिलाडेल्फियातील गरीब कृष्णवर्णीय जिथे राहतात, त्या भागात दारोदार जाऊन प्रचार करणाऱ्या स्वयंसेवकाशी अलीकडेच मी बोलत होतो. क्युनॉनने (43) प्रसृत केलेल्या कट-कारस्थानांच्या कथांबद्दल लोक त्याला प्रश्न विचारत होते. जत्रेतील किंवा सर्कशीतील आकर्षणांची जोरात ओरडून जाहिरात करणारे लोक जसे वागतात, तसेच वागण्याऱ्या एका व्यक्तीच्या प्रभावाखाली देशातील एक मोठा वर्ग आजदेखील आहे.  

6. माहिती तंत्रज्ञान-समाजमाध्यमांच्या कंपन्या विरुद्ध लोकशाही

प्रश्न - सध्या अस्तित्वात असलेल्या माहितीप्रसाराची द्वेषमूलक यंत्रणा नीतिमत्तेला न्यायापासून दूर नेत आहे का?

- माझ्या मते, ही व्यवस्था आपल्या लोकशाहीसमोरील सर्वांत मोठा धोका आहे. डोनाल्ड ट्रंप या व्यवस्थेतूनच निर्माण झाले. तिचे ते एका अर्थाने अपत्य आहेत. मात्र, ही व्यवस्था त्यांनी निर्माण केली नाही. त्यांनी ही व्यवस्था अधिक पक्की होण्याच्या प्रक्रियेला चालना दिली असेल, पण ती त्यांच्यापूर्वीही अस्तित्वात होती आणि ती त्यांच्या नंतरही टिकून राहणार आहे. आपण या समस्येला ज्या प्रकारे सामोरे जात आहोत, ते पाहून मी चिंताक्रांत झालो आहे. त्याचे कारण म्हणजे वॉल्टर क्राँकाईट यांच्या काळात...

प्रश्न - ते वॉल्टर क्राँकाईट यांचा काळ जाऊ द्या. आपण 2008 मधील आयोवातील प्रचाराबद्दल बोलू. आजघडीला तुमच्यासारखे नाव असणारी व तुमच्यासारखी जीवनकहाणी किंवा पार्श्वभूमी असणारी व्यक्ती आयोवात प्रचारार्थ गेली, तर तिला 10 मिनिटे तरी स्वतःचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल का, याबद्दल मला शंका आहे.

- अगदी आमूलाग्र बदल झाला आहे. मगाशी मी सर्वांना मान्य असणाऱ्या धारणा-समजुतींचा उल्लेख केला. एके काळी अशी परिस्थिती होती, कारण त्या वेळी तीनच मोठ्या व महत्त्वाच्या दूरचित्रवाहिन्या होत्या आणि काही मूठभर वृत्तपत्रे होती. त्यांचा जनमानसावर-लोकमतावर प्रभाव होता. आता तुम्ही कालचक्र मागे फिरवू शकत नाही. तुम्हाला इंटरनेट नाहीसे करता येणार नाही. प्रत्येक प्रकारच्या छटांच्या राजकीय विचार-धारणा बाळगणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठीच आणि तेवढ्याच आवडी-निवडींची पूर्तता करणाऱ्या हजारोंच्या संख्येने उदयाला आलेल्या विविध दूरचित्रवाहिन्यांना आपण नाहीसे करू शकणार नाही. आता सर्वांना मान्य असणाऱ्या धारणा-समजुतींच्या अभावी आपण मोठ्या समस्या हाताळूच शकणार नाही. आपल्यासमोर एका महामारीचा धोका उभा आहे. समस्या गंभीर आहे. पक्षभेद विसरा आणि डॉ. अँटोनी फाऊचींचे ऐका. अशा रोगांचा ते अनेक वर्षे अभ्यास करत आहेत. आपले सगळे निर्णय योग्यच ठरतील असे नाही, कारण विज्ञानात अंतिम असे काही नसते. वारंवार प्रयोग करत असताना दर वेळी काही नवी माहिती-तथ्ये पुढे येत असतात, पण आपण होता होईस्तोवर विज्ञानाच्या आधारे या संकटाचा सामना करू. लोकांचे जीव वाचविण्यासाठी विज्ञान काय सांगत आहे तेच करू, असे एकसुरात म्हणणे आता अवघड होऊ लागले आहे. 

प्रश्न - या परिस्थितीसाठी तुम्ही या कंपन्यांना जबाबदार धरता का?

- मी यासाठी माहिती तंत्रज्ञान-समाजमाध्यम कंपन्यांना सर्वस्वी जबाबदार धरत नाही. कारण समाजमाध्यमांच्या (social media) आधीपासूनच अशी परिस्थिती होती. पण समाजमाध्यमांनी त्याला विलक्षण गती आणि चालना दिली आहे. माझी आणि या कंपन्यांच्या मालक-चालकांची ओळख आहे. मी याबद्दल त्यांच्याशी बोललो आहे. या कंपन्यांचा असा आग्रही दावा आहे की, त्या काही ‘द अटलांटिक’सारखी पारंपरिक माध्यमे नाहीत. त्यांची भूमिका ही एखाद्या टेलिफोन कंपनीसारखी आहे. पण त्यांचा हा दावा काही फारसा पटण्यासारखा किंवा समर्थन करता येण्यासारखा नाही. आता ही मंडळी कशाचा प्रसार होऊ द्यायचा आणि कशाचा होऊ द्यायचा नाही, याबाबत आपला संपादकीय अधिकार वापरतातच की- मग भले तो विविध अल्गोरिदम यांच्यावर आधारित असो अगर नसो. आता देशात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक मतप्रवाहाला व्यक्त होण्यासाठी खासगी कंपन्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेच पाहिजे, अशी सक्ती आपल्या राज्यघटनेतील पहिली घटनादुरुस्ती करीत नाही. अंतिमतः सरकारी नियंत्रणे आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील मंडळींनी विकसित केलेले व्यवसाय यांची सांगड घालून आपल्याला या प्रश्नाचा सामना करावा लागेल, कारण परिस्थिती अधिक भीषण होत जाणार आहे. केवळ लेखी मजकुराच्या आधारे तद्दन खोट्या गोष्टींचा आणि कट-कारस्थानांच्या कथांचा प्रचार-प्रसार झाल्यामुळे अशी परिस्थिती आहे. पण कल्पना करा- मी किंवा तुम्ही व्हिडिओवर काहीबाही बोलत आहोत असे खोटेच दाखविण्याची तांत्रिक क्षमता निर्माण झाली, तर किती भीषण परिस्थिती निर्माण होईल! आपण आता अशा परिस्थितीच्या बऱ्यापैकी जवळपास पोहोचलो आहोत.  

टीपा - 

23. लिंडन बी. जॉनसन- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष (1963 ते 1969). अतिशय चाणाक्ष, धूर्त, पाताळयंत्री आणि प्रभावी संसदपटू आणि संसदीय कामकाजातील व्यूव्हरचनाकार. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. कल्याणकारी राज्याचा विस्तार केला आणि कृष्णवर्णीयांच्या अधिकारांना अधिक प्रभावी संरक्षण देणारे कायदे केले. 
24. व्होटिंग राईट्‌स्‌ ॲक्ट (Voting Rights Act)- 1965 मध्ये मान्य झालेला कायदा. कृष्णवर्णीयांना मतदार म्हणून नाव नोंदविण्यास कठीण जावे, या हेतूने मतदार होण्यासाठीचे जे विविध भेदभाव करणारे निकष अमेरिकेतील अनेक राज्यात होते ते या कायद्याने बेकायदेशीर ठरविले. 
25. एफ.डी.आर- फ्रँक्लिन डिलानो रूझवेल्ट. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष (1933-1945). 1929-1930 च्या महामंदीतून देशाला बाहेर काढले. कल्याणकारी राज्याचा एका अर्थाने पाया रचला. दुसऱ्या महायुद्धात देशाचे नेतृत्व. पदावर असतानाच मृत्यू. 
26. अफोर्डेबल केअर ॲक्ट (Affordable Care Act)- 2010 मध्ये मान्य झालेला कायदा. त्यायोगे अधिक अमेरिकी नागरिकांना अरोग्यविमा उपल्बध झाला. ओबामा केअर (Obama
Care)  या नावानेदेखील हा कायदा ओळखला जातो.
27. नॅन्सी पेलोसी- डेमॉक्रॅटिक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या. अमेरिकी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या- प्रतिनिधी गृहाच्या- विद्यमान सभापती. ओबामांच्या कार्यकाळातील पहिल्या दोन वर्षामध्ये याच पदावर आणि त्यानंतर 2010 मध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाने बहुमत गमावल्यामुळे अल्पमत पक्षाच्या गटनेतेपदी आणि अर्थातच आपल्या पक्षाच्या गटनेत्या.
28. अमेरिकन रिकव्हरी अँड रिइनव्हेस्टमेंट ॲक्ट (American Recovery and Reinvestment Act).  2008 च्या मंदीतून बाहेर पडण्यासाठी 2009 मध्ये मान्य केलेला कायदा.
29. आर्लेन स्पेक्टर- या सर्व प्रकरणाचा परिणाम म्हणून ते आपला रिपब्लिकन पक्ष सोडून डेमॉक्रॅटिक पक्षात सामील झाले. 2012 मध्ये निधन.
30. जॉन बेनर- रिपब्लिकन नेते आणि 2011 ते 2015 अमेरिकी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे- प्रतिनिधी गृहाचे- सभापती. पक्षांतर्गत गटबाजीमुळे पदाचा राजीनामा. सध्या राजकारणातून निवृत्त.
31. कँप डेव्हिड- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय रिसॉर्ट. अनेक राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या पण अनौपचारिक बैठकींचे ठिकाण. 1978 मध्ये अमेरिकच्या मध्यस्थीने झालेल्या इजिप्त आणि इस्रायल यांच्यातील शांतीकरारची बोलणी तसेच त्यावरील स्वाक्षऱ्या येथे झाल्या. 
32. चार्ल्स क्रिस्ट- रिपब्लिकन पक्षाचे माजी नेते आणि त्या पक्षातर्फे फ्लॉरिडा राज्याच्या राज्यपालपदी निवड. 2010 मध्ये पक्षातर्फे सिनेटसाठीच्या उमदेवारी मिळविण्याचा प्रयत्नात आघाडीवर. पण ओबामांच्या काही धोरणांना राज्यपालपदी पाठिंबा दिला म्हणून पक्षाने पाठिंबा काढून घेतला आणि त्यांची उमेदवारी मागे पडली. अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविली पण पराभूत. 2012 मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी ओबामांना पाठिंबा देत डेमॉक्रॅटिक पक्षात प्रवेश आणि सध्या त्याच पक्षाचे अमेरिकी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे- प्रतिनिधी गृहाचे सदस्य.
33. मार्को रुबियो- रिपब्लिकन नेते आणि फ्लॉरिडा राज्यातून निवडून आलेले सिनेट सदस्य. 2010 मध्ये पक्षातर्फे सिनेटसाठीची क्रिस्टी यांना जी उमेदवारी मिळू घातली होती, ती या प्रकरणामुळे अंतिमतः यांना मिळाली.  
34. पॉल रायन- रिपब्लिकन नेते. अमेरिकी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे- प्रतिनिधी गृहाचे माजी सभापती. सध्या राजकारणातून निवृत्त.
35. आयोवा- अमेरिकेतील राष्ट्रध्यक्षपदासाठीचा आपला उमेदवार कोण असावा यासाठी दोन्ही प्रमुख पक्ष- रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक- पक्षांतर्गत निवडणुका घेतात. यांना primaries असे म्हणतात. आयोवात या primaries इतर राज्यांपेक्षा सर्वात आधी होतात आणि म्हणून आयोवाला अमेरिकेच्या राजकारणात एक आगळे महत्त्व आहे.
36. लिटल लीग- 4 ते 16 वयोगटातील मुलांसाठी बेसबॉल आणि सॉफ्टबॉलच्या स्थानिक स्पर्धांचे आयोजन आणि अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणारी संस्था.
37. इलिनॉय- 2004 मध्ये ओबामा हे सिनेटमध्ये इलिनॉय राज्यातून निवडून गेले. 
38. डेव्हिड क्लरॉड- प्रचारादरम्यान आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात ओबामांचे वरिष्ठ सल्लागार.
39. सिंक्लेर ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन- अनेक दूरचित्रवाहिन्या आणि रेडिओ वाहिन्याची मालकी असणारा माध्यम समूह. उजव्या विचारांकडे उघड कल. 
40. वॉल्टर क्राँकाईट- सुप्रसिद्ध अमेरिकी दुरचित्रवाणी पत्रकार. त्यांच्या विश्लेषणाला आणि म्हणण्याला मानणारा मोठा वर्ग होता. 
41. जॉन एफ. केनेडी- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष
42. रेव्हरंड जेरेमाया राईट-शिकोगोतील धर्मगुरु. ओबामांचे लग्न त्यानींच लावले. त्यांच्या चर्चचे ओबामा कुटुंबीय सदस्य. या वादानंतर संबधात काहीसा दुरावा. 
43. क्यूनॉन (Q-non)- 2017 मध्ये उगम पावलेली आणि लवकरच इटंरनेट आणि समाजमाध्यमांच्या आधारे प्रसृत झालेल्या कट-कारस्थानांचा दावा करणारी उजव्या विचारांची आभासी चळवळ. प्रणेता आजदेखील अज्ञात. यातर्फे पुरोगामी आणि उदारमतवाद्याच्या विरोधात गलिच्छ आरोप करण्यात आले. 

(भाग 3 : पुढील अंकात)

अनुवाद : अभय दातार, नांदेड

या मुलाखतीचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बराक ओबामा

माजी अध्यक्ष- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके