डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

संगीतकलानिधीचे पुण्यस्मरण

मास्तर कृष्णरावांना संगीतकलानिधी हे बिरूद प्राप्त झाले होते. खरोखर हे विशेषण अगदी समर्पक आहे, यथार्थ आहे. सौंदर्याचा साज चढवलेले रागसंगीत, ठुमरी-चैती कजरीसारखे ललित संगीत, अभंग-गौळणींचे लडिवाळ भक्तिसंगीत, असा सोहळा रंगला मास्तरांच्या गायनात.

1997 हे वर्ष महाराष्ट्रातील संगीतलुब्ध रसिकांच्या दृष्टीने एक उत्सवी संवत्सरच. साधना साप्ताहिकाची नित्यकर्तव्ये कोणतीही असली तरी आपल्या रसिक बांधवांच्या सांस्कृतिक ऊर्मी उपेक्षिण्याइतकी साधना अरसिक होऊ शकत नाही. या वर्षी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांची जन्मशताब्दी आहे आणि त्यांना समजदारीने संगीतविद्या देणाऱ्या थोर गायनाचार्याची- पं. भास्करबुवा बखले यांची- पंचाहत्तरावी पुण्यतिथीही यंदाच साजरी होत आहे. दोन नक्षत्रांची ही युती आमच्या सर्व वाचकांसाठी आनंददायी व्हावी यासाठी आम्ही या विशेषांकाचा मांड मांडला. 

आमचे वाचक हे जाणतात की आपला विशेषांक सर्वांगी सफळ संपूर्ण व्हावा ही आकांक्षा पुरी करावयाची असेल तर 'श्रमणार्यांचे हात हजार' लाभावे लागतात. साधना हे काही भरभक्कम आर्थिक पाठबळावर उभे राहिलेले पत्र नाही; पण आपुलकीने 'साधना' च्या प्रत्येक उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करणारे जिवलग सहकारी आमच्या भाग्ययोगामुळे आम्हाला नेहमीच मिळत आले आहेत. मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर म्हणजे आपल्या बहुरंगी तेजाची पखरण संगीताच्या आकाशात करीत राहणारे एक नवलाईचे नक्षत्र होते. मेहनतीने गाणे साध्य केले आणि मग त्याची आवर्तने अखंडपणे एकवीत राहिले, अशा गायकांत त्यांची गणना नाही. 

जे घेतले ते वाटून टाकले एवढीच त्यांच्या विद्याधनाची महती नाही. 'रवि रस शोषुनि घेतो हजारपट परत द्यावयासाठी' सहस्रगुणमुत्त्रष्टं आदत्ते हि रसं रविः, या कालिदास-वचनाचा जिवंत साक्षात्कार घडवणारे मास्तर कृष्णरावांसारखे प्रतिभावंत गायक विरळा. दारिद्रदैन्याचा बाऊ न करता, विद्या ग्रहण करण्यासाठी पडतील ते कष्ट आनंदाने पत्करून, हिम्मत कधीही हरू न देता कृष्णरावांनी संगीतकला आपलीशी करून टाकली, तिला नवनवे स्वरपंख प्राप्त करून दिले. जडाला जखडलेल्या समाजाला चैतन्याचे नाना उन्मेष अनुभवायला देऊन अलौकिक अपार्थिव आनंदाचा लाभ त्यांनी मिळवून दिला. मास्तर कृष्णरावांसारखे असे अजरामर कलासाधक पाहिले की नियतीचे आणि निसर्गाचे किती आभार मानावेत असे होऊन जाते. 

मास्तर कृष्णरावांना संगीतकलानिधी हे विरूद प्राप्त झाले होते. खरोखर हे विशेषण अगदी समर्पक आहे, यथार्थ आहे. सौंदर्याचा साज चढवलेले रागसंगीत, ठुमरी-चैती कजरीसारखे ललित संगीत, अभंग-गौळणींचे लडिवाळ भक्तिसंगीत, असा सोहळा रंगला मास्तरांच्या गायनात. नानारस खुलवणाऱ्या लोकचरितांना म्हणजेच नाटकांना अलंकृत करण्यासाठी निर्माण झालेल्या नाट्यसंगीताला अनेक चमकदार पैलू पाडले ते मास्तरांनी. चित्रपटांचा जमाना आला तेव्हा रसिकांनी सहजपणे ओठांवर खेळवाव्यात अशा सोप्या चाली त्यांनी चित्रपटासाठी बांधून दिल्या, मास्तरांची मैफल म्हणजे 'पाहावे ते फळ रसदार' अशी श्रीमंती मिरवणाऱ्या बागशाहीचा बहार.

या मैफली ज्यांनी ऐकल्या त्यांनी त्या केवळ कानांनी ऐकल्या नाहीत मनानेही ऐकल्या आणि अंतःकरणाच्या कुपीत चिरंतन स्मृतींच्या रूपाने जपून ठेवल्या.. मास्तरांचे गुरू मुख्यत्वेकरून भास्करबुवा बखले हे खरे; पण त्याखेरीज ज्यांच्या गायनाला अभिनवतेचा स्पर्श झालेला होता, असे कितीएक गायक मास्तरांचे गुरूच होते. कुमारगंधर्व म्हणत असत 'गुरू ने कहा वैसा कर । गुरू ने किया सो मत कर ! यातली ग्यानबाची मेख ज्यांच्या ध्यानात येत नाही ते कार्बन कॉप्या काढीत राहतात. गुरुवर निष्ठा ठेवावी. त्याने दिलेल्या विद्येचे ग्रहण करावे, मनन करावे पण अंती या सगळ्याचा साक तेवढा मनात उरू द्यावा. तो बीजासारखा समजून, आपल्या प्रतिभेचे त्यावर शिंपण करून अभिनव रंगांची सुगंधी फुले फुलवावी, यातच कलेच्या किमयेची सार्थकता आहे. 

संगीतकलानिधी मास्तर कृष्णरावांनी कलेच्या निर्मितीचे अंतःप्रवाह जाणले, जोपासले. जिवंत आणि जातिवंत सौंदर्याचे नवनवे उन्मेष असे बहराला आणले की त्यांच्या मोहिनीने रसिकांची मने चिरकाल सुखी व्हावी. त्यांच्या संगीताचा आनंद घेणाऱ्या तृप्त रसिकांनी मनोमन, 'धन्य आनंददिन' असे गुणगुणतच घरी परतावे. संगीताचे स्वर अवकाश भरून टाकतात आणि अंती अनंतात विरून जातात; तरी त्या स्वरांनी दिलेल्या आनंदाची आठवण खऱ्या रसिकांनी मनीमानसी जपून  ठेवलेली असते. अशा रसिकांची कृतज्ञता प्रतिभावंतांचे गुणगान अनुक्तपणे करीत राहते. ही कृतज्ञताच प्रसंगविशेषी व्यक्त करणे एवढाच विशेषांक काढण्यामागचा हेतू. 

संपादकीय विभाग केवळ निमित्तमात्र असतो. श्रीमती शैला आणि श्री. सुधीर दातार, श्री. राजाभाऊ फुलंब्रीकर - म्हणजेच मास्तरांचे चिरंजीव- अशा सुहृदांनी आपुलकीने दिलेले सहकार्य; शेखर गोडबोले यांनी दिलेला त्यांच्या कलादृष्टीचा लाभ श्री. मधुकर बाक्रे यांचे समर्थ पाठवळ. श्री. पु. ल. देशपांडे, श्रीमती ज्योत्स्ना भोळे प्रभृतींचे नाना परीचे साहित्य : खुद्द कार्यालयातील सहकार्यांनी काळजीपूर्वक केलेल्या कार्मागऱ्या, सर्वश्री दादासाहेब नाईकनवरे , डी. एस. अशी मदतनीस धावणाऱ्या सुहृदांच्या किती मोहन वाघ, कुलकर्णी, नावे सांगावीत ? आमच्या विश्वस्त बंधूंना रुचणार नाही तरी राहावत नाही म्हणुन उल्लेख केला पाहिजे- सा. रे. पाटील, किशोर पवार, नाना डेंगळे, सदानंद वर्दे प्रभृतींच्या सहज सहकार्याचा. नेहमीच्या संपादकांचे ओझे हलके केले ते विशेष संपादकीय सहकार्य देणाऱ्यांनी आणि सजावट मांडणीत पुढाकार घेणाऱ्या शेखर गोडबोले यांनी सारांश, दोस्तोंका काम हमारा नाम!

Tags: सदानंद वर्दे  नाना डेंगळे  किशोर पवार भास्करबुवा बखले ज्योत्स्ना भोळे पु. ल. देशपांडे कृष्णराव फुलंब्रीकर वसंत बापट Sadanand Varde Nana Dengale Kishor Pawar Bhaskarbuaa Bakhale Jotsna Bhole P.L.Deshapande Krushanrao fulanbarikar Vasant Bapat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके