नुकतेच जेव्हा सोव्हिएत संघाचे विघटन झाले आणि त्याची अनेक प्रजासत्ताके एकामागून एक वेगळी होऊन स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र होत गेली, तेव्हा मला सरदार पटेलांची पुन्हा-पुन्हा तीव्रपणे आठवण होत राहिली. त्यांनी चतुराईने आणि अतिशय समर्थपणे एकात्म अखंड भारताची निर्मिती केली म्हणून तर सोव्हिएत संघाच्या आजच्या वर्तमान स्थितीत जशी पुनरावर्तनाची भीती आहे, तशी भारतात उरली नाही. लेनिनपेक्षाही थोर अशी सरदारांची थोरवी आणि त्यांच्या दीर्घदृष्टीची प्रचीती आपणास येथे येते.
सरदार वल्लभभाई पटेलांना मी फक्त एकदाच पाहिले व ऐकले, सुरतेच्या किल्ल्याच्या मैदानात. मी माझ्या वडिलांचे बोट धरून उभा होतो, त्या वेळेस ते आमच्या जवळून गेले. ते कदाचित त्यांच्या जीवनाचे अंतिम पर्व होते. काही काळानंतर ते स्वर्गवासी काले. त्याबरोबरच भारतातील स्थिर, व्यवहारी, देशहितदक्ष, द्रष्ट्या राजनीतीचे युग संपुष्टात आले.
नुकतेच जेव्हा सोव्हिएत संघाचे विघटन झाले आणि त्याची अनेक प्रजासत्ताके एकामागून एक वेगळी होऊन स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र होत गेली, तेव्हा मला सरदार पटेलांची पुन्हा-पुन्हा तीव्रपणे आठवण होत राहिली. त्यांनी चतुराईने आणि अतिशय समर्थपणे एकात्म अखंड भारताची निर्मिती केली म्हणून तर सोव्हिएत संघाच्या आजच्या वर्तमान स्थितीत जशी पुनरावर्तनाची भीती आहे, तशी भारतात उरली नाही. लेनिनपेक्षाही थोर अशी सरदारांची थोरवी आणि त्यांच्या दीर्घदृष्टीची प्रचीती आपणास येथे येते. भारताच्या घटनेतसुद्धा प्रजासत्ताकांची नव्हे, राज्यांची व्यवस्था आहे. तरीसुद्धा स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेस भारत शेकडो संस्थानांमध्ये विभागला जाण्याची शक्यता होती. या संस्थानांना भारतामध्ये विलीन करण्याबाबत जर शिथिलपणा, अदूरदृष्टी व कौशल्याचा अभाव दाखविला असता तर आज भारताची काय स्थिती असती ह्याची कल्पनासुद्धा करणे कठीण आहे. फक्त काश्मीरच्या बाबतीत सरदार पटेलांनी अनेक धोक्याचे इशारे दिले तरीसुद्धा, त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी जो मनाचा अस्थिरपणा दाखविला त्याचे दुष्परिणाम देश आजसुद्धा भोगीत आहे. काश्मीरच जो काही उणा अधिक भाग भारताच्या शासनाखाली राहू शकला आहे तोसुद्धा सरदारांच्या समयसूचकतेमुळे. चीनच्या बरोबर भारताच्या संघर्षाचा प्रश्नच नव्हता, तेव्हासुद्धा सरदारांनी तिबेटच्या संदर्भात चीनपासून सावध राहाण्याबद्दल सुचविले होते. त्यात त्यांच्या अप्रतिम दीर्घदृष्टीची ओळख पटते. आत्मविश्वास हा त्यांचा प्रधान गुण होता. रझाकारांच्या आतंकवादी, आतून ठुसठुसणाऱ्या हैद्राबादच्या गळवाला त्यांनी पोलीसपावलांची टाचणी लावून ती अवघड शस्त्रक्रिया पार पाडली. यात त्यांचा आत्मविश्वास प्रकर्षाने दिसतो. आज पंजाब, काश्मीर आणि आसामच्या आतंकवाद्यांचा हिंसाचार, आपल्या शासनाची धुरा सांभाळणाऱ्यांना घाबरट व दिशाहीन बनवत आहे.
तेव्हा भरपूर आत्मविश्वास असलेला हा सरदारस्पर्श किती समर्थ होता ते कळते. सरदार पटेलांच्यात पालक आणि शासक ह्या गुणांचा अद्भुत समन्वय झालेला होता. प्रजेचे सर्व तऱ्हेने उत्तम पालन करावे, पण आततायींना दंड देताना मागेपुढे पाहू नये जसा आदर्श शासनधर्म त्यांनी आचरून दाखविला. हे सर्व ते करू शकले कारण त्यांची दृष्टी व हात पूर्णपणे स्वच्छ होते. स्वतःच्या हितासाठी, स्वार्थासाठी त्यांनी कधीच काही केले नाही. स्वत:च्या पुत्राचे वर्तन त्यांना योग्य वाटले नाही तेव्हा त्याच्याशी संबंध तोडताना ते कचरले नाहीत. पंतप्रधानपदाचा प्याला ओठाशी होता तेव्हासुद्धा त्यांनी सर्वोच्च स्तराची त्यागवृत्ती दाखविण्यात जराही संकोच दाखविता नाही. जगाच्या इतिहासात ही कदाचित असामान्य घटना असेल.
सरदार पटेलांची मोठ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते पोलादी पुरुष होते. आकाशाकडे पाहात राहणारे नव्हते, हवेतील आदर्शांना कवटाळणारे मानवही नव्हते. आणि तरीसुद्धा त्यांच्या कार्याला आदर्शाचा पूर्णपणे रंग चढलेला होता. जगाच्या राजकारणात आदर्श आणि व्यवहारीपणाचा असा समन्वय विरळाच! अशा थोर सरदारांच्या जीवनातील सर्वांत अधिक कारुण्यपूर्ण व नैराश्याचा क्षण कोणता? स्वतः देशाचे गृहमंत्री असतानासुद्धा, साक्षात आपल्यासमोर उभे असणारे, स्वतःचे गुरु असे ज्यांना मानले त्या महात्मा गांधींची हत्या हा सरदारांच्या जीवनातील सर्वात करुण क्षण होता. गांधीजींच्या जिवाला धोका आहे त्याची पूर्ण सूचना मिळाली होती. गांधी स्वतः आपल्या रक्षणाबद्दल जरादेखील चिंतित वा सावध नव्हते. ही गोष्ट सरदारांच्या कार्याला अधिकच अवघड करणारी होती. तरीसुद्धा गांधीजींना वाचविणे शक्य झाले असते अशी भावना एवढ्या वर्षानंतरही मनात उद्भवते. परंतु येथेच मनुष्यावर मात करणारा नियतीचा विजय प्रतीत होतो. ही एक घटना, एवढे तर निश्चित सुचवते की, सरदार पटेल कितीही थोर असले तरी शेवटी ते मानव होते, अतिमानव (सुपर मैन) नव्हते. आणि आपण त्यांचे त्या संदर्भातच मूल्यांकन करावयास हवे. सरदार वल्लभभाईंचे निधन भारतीय स्वातंत्र्य बाल्यावस्थेत असताना झाले. म्हणून त्यांची उणीव विशेष भासते. त्यांच्या कार्याला गौण ठरविण्याच्या पद्धतशीर प्रयत्नांवर मात करून सरदारांची थोरवी लोकांपर्यंत पोहोचली आहेच.
त्यांच्या सूर्यप्रकाशी कार्याला उजाळा देण्यासाठी सरकारी वा घराणेशाही पाठबळाची आणि प्रचारमोहिमेची आवश्यकताच उरली नाही. भारताच्या इतिहासात सरदार हे एक विराट व्यक्तिमत्व होते आणि राहील. त्यांना मातीत मिळवू शकेल असे एकही वादळ वा धुळीचा लोट उद्भवेल हे शक्यच नाही, कारण - त्यांचे व्यक्तिमत्त्व सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे.
Tags: Soviet Union Personality Gandhi Razakar Hyderabad Neharu Saradar Iron man Freedom सोव्हिएत संघ व्यक्तिमत्त्व रझाकार संस्थान हैद्राबाद नेहरू सरदार गांधी पोलादी पुरुष स्वातंत्र्य weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या