डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर या आधी  चित्रपट येऊन गेला आहे. महानाट्य येऊन  गेले आहे. मात्र, एका चित्रपटात मावेल असे  हे विषयच नाहीत. तसे चरित्रही नाही. बाबासाहेब आंबेडकर ही व्यक्ती नव्हती, ती समष्टी होती आणि तो एक विचार होता. दीर्घ  वंचनेनंतर एका समाजाच्या उत्थानाचा  निसर्गालाच सुचलेला तो एक विचार होता... मग आता हा विचार पडद्यावर कसा  दाखविणार?  नितीन वैद्य हे तसे व्यावसायिक  निर्माता आहेत. याआधी त्यांनी मराठी  चित्रपट, मालिकाही केल्या आहेत. सध्या  हिंदीत त्यांची ‘साईबाबा’ ही मालिका सुरू  आहे. त्यामुळे त्यांना डॉ. बाबासाहेब  आंबेडकर मालिकेच्या रूपात मांडावेसे वाटणे हे थोडं ‘थॉटफुल’ वाटलं. त्यांच्याशी  बोलताना जाणवलं की, ते या मालिकेकडे  व्यावसायिक व्हेंचर म्हणून नाही बघत. बाबासाहेबांच्या आयुष्याकडे ते यथार्थ  जाणिवेने बघतात. 

आताचं वास्तव फार वेगळं आहे. सारा देशच एका  वैचारिक आवर्तनात सापडला आहे. डावीकडे जावे की,  उजवीकडे... हे करताहेत ते बरोबर आहे की, ते करत होते  ते चांगले होते- असे प्रश्न आणि त्यांचा गोंधळ वाढत  चालला आहे. या देशाचा प्राण नेमका काय? त्याचे स्वत्व,  सत्त्व आणि तत्त्व काय, यावर भ्रम निर्माण केला जातो आहे. काश्मीर- 370,  गोहत्या कायदा, नवा नागरिकत्व कायदा  आणि त्यापाठोपाठ येणारा एनआरसी... या सगळ्यांमुळे  निर्माण झालेला गोंधळ,  घटनेची अन्‌ लोकशाहीची गळचेपी होते आहे,  असं अनेकांना वाटता-वाटता आता ते  बहुसंख्यांना वाटू लागलं आहे. अशा वेळी या देशातल्या  सामान्यांना दोनच नावे आठवतात- महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ‘आज बाबासाहेब हवे होते  सोबत’ असे- ज्या बहुसंख्यांच्या मनात पोरकेपणाची  अस्पृश्य जाणीव पुन्हा एकदा निर्माण झाली आहे- त्यांना  वाटू लागलं आहे.

अशा वातावरणात स्टार प्रवाह वाहिनीवर ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका सुरू  होऊन चांगली स्थिरावली आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेली  ही मालिका आता बाबासाहेबांच्या प्रौढावस्थेपर्यंत  पोहोचली आहे. त्यामुळे वर्तमानात भेडसावणाऱ्या अनेक  प्रश्नांच्या आवर्तात या मालिकेच्या रूपात डॉ. बाबासाहेब  आंबेडकर लोकांच्या पाठीशी उभे राहू शकतात. तसा  अनुभव अनेक जण घेत आहेत. आता ही मालिका तब्बल  दोन कोटी लोक नियमित पाहतात. मराठीत असूनही अनेक  हिंदीभाषकही ही मालिका आवर्जून पाहतात. केवळ  दलित-बहुजन असाच प्रेक्षकवर्ग या मालिकेला नाही, अभिजनही आवर्जून ही मालिका पाहतात आणि आपल्या  मुलांनाही सांगतात. सुधारणावादी विचारांची पेरणी व्हावी,  असे वाटणारा प्रत्येक जण ही मालिका पाहतो आणि  इतरांनाही बघायला सांगतो.

खरे तर महापुरुषांच्या जीवनावरील चित्रपट, मालिकांची  डॉक्युमेंटरी होण्याची शक्यता दाट असते किंवा गडद- भडक होण्याची शक्यता दाट असते. मेलोड्रामा होतो बऱ्याचदा. बाबासाहेबांच्या मालिकेत तर ही जास्त शक्यता  होती. या मालिकेची डॉक्युमेंटरी अद्याप तरी झालेली नाही  किंवा मग मेलोड्रामा होण्याची शक्यता असलेल्या प्रसंगातही तो तोल नीट सांभाळण्यात आला आहे. अगदी  छोटा भिवा दहावी पास होतो, हा प्रसंग डोळ्यांतून पाणी  काढतो; पण डोळ्यांतून निघणारं पाणी अदबेनं कडांपाशी  थांबून राहावं, याची दक्षता लेखक-दिग्दर्शकांनी घेतली  आहे. त्यानंतरही अनेक प्रसंग असेच संयमानं हाताळले गेले  आहेत. बाबासाहेबांचा लढा शोषणाच्या विरोधात होता. शोषण करायला लावणाऱ्या माणसाचे माणूस म्हणून मूल्य  कमी करण्यास ऊर्जा पुरविणाऱ्या विचारांना बाबासाहेबांचा विरोध होता. कुठला धर्म-जात यांच्याविषयी त्यांच्या  मनात व्देष-राग नव्हता. त्यामुळे या मालिकेतून उगाच कुणा  धर्म-जातीवर कोरडे ओढण्याचा छुपा अजेंडा अजिबातच  राबविला गेलेला नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर या आधी चित्रपट येऊन  गेला आहे. महानाट्य येऊन गेले आहे. मात्र, एका चित्रपटात मावेल असे हे विषयच नाहीत. तसे चरित्रही  नाही. बाबासाहेब आंबेडकर ही व्यक्ती नव्हती, ती समष्टी  होती आणि तो एक विचार होता. दीर्घ वंचनेनंतर एका  समाजाच्या उत्थानाचा निसर्गालाच सुचलेला तो एक  विचार होता... मग आता हा विचार पडद्यावर कसा  दाखविणार?  नितीन वैद्य हे तसे व्यावसायिक निर्माता  आहेत. याआधी त्यांनी मराठी चित्रपट,  मालिकाही केल्या  आहेत. सध्या हिंदीत त्यांची ‘साईबाबा’ ही मालिका सुरू  आहे. त्यामुळे त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या  रूपात मांडावेसे वाटणे हे थोडं ‘थॉटफुल’  वाटलं. त्यांच्याशी बोलताना जाणवलं की, ते या मालिकेकडे  व्यावसायिक व्हेंचर म्हणून नाही बघत. बाबासाहेबांच्या  आयुष्याकडे ते यथार्थ जाणिवेने बघतात. त्यांचं बालपण, चवदार तळे, काळाराम मंदिराचा लढा आणि दीक्षा... असा  मोठा प्रवास आहे आणि बाबासाहेब हे कृतिशूर विचारवंत  होते. नायक वाटावेत असा प्रसंग घडवितानाही त्यामागे एक  मोठा विचार होता. आजच्या काळाच्या भाषेत सांगायचे तर  केवळ ‘सनसनी पैदा’ करण्याची ती कृती नव्हती...

वैद्य म्हणाले की- ‘मेकिंग ऑफ महामानव’ हा प्रवास मांडायचा होता. आता महाडच्या चवदार तळ्याचा लढा या मालिकेत  येऊन गेला. सागर देशमुख हे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातला ‘विद्वान योध्दा’ कॅरी करतात. घटना नाही  तर त्यामागचा विचार-आशय मांडायचा आहे, मनासोबत  मेंदूचंही रसिकेतेने पोषण करायचे आहे,  हे या मालिकेची  संपूर्ण टीमच लक्षात ठेवते आहे,  हे जाणवत राहते. स्टार प्रवाहचे कंटेंट हेड सतीश राजवाडे यांनी ही कल्पना  उचलून धरली. राजवाडे एक स्वयंसिध्द दिग्दर्शक आहेत. त्यांनी आतापर्यंत जे विषय चित्रपटात मांडले, तेही हटके  होते आणि तरीही व्यावसायिक कोंदणात त्यांनी ते नीट बसविले. तसे करताना त्यांनी विषयाची आणि स्वत:चीदेखील घुसमट होऊ दिली नाही...दशमी  क्रिएशनचे वैद्य हे पत्रकारितेतून या व्यवसायात आले  असल्याने त्यांच्याही जाणिवा वेगळ्या आहेत. हे दोघे एकत्र आले आणि मग टीआरपीच्या मागे न लागता नेमक्या आणि  नेटक्या पध्दतीने बाबासाहेब नावाच्या महामानवाची गोष्ट  छोट्या पडद्यावर मांडण्याचा हा सिलसिला सुरू झाला.

ही कहाणी 200 भागांत मांडायची. त्यात वाहवत  जायचे नाही. पाणी टाकून कथानक पातळ करायचे नाही. फारच फार सव्वादोनशे भाग झाले तर,  तर तिथवर ठीक...  ही या दोघांचीही भूमिका होती,  मात्र आता ही मालिका  अधिक भागांची होणार,  हे दिसतं. तरीही ती लांबट,  कंटाळवाणी होणार नाही,  याची काळजी घेतली जाणार  आहे. जे घडलंय्‌ ते गाळायचं नाही आणि जे नाहीच घडलं  ते घुसवायचं नाही, ही भूमिका आहे. बाबासाहेबांचे  सहकारी चांगदेव भगवानराव खैरमाडे यांनी लिहिलेले बारा  खंड आणि हरी नरके यांच्या सात खंडांची मदत,  ही  मालिका मांडताना झाली. ललित अंगानेच ही कहाणी  मांडायची आहे आणि त्यात सत्याचा विपर्यास होऊ नये,  संदर्भ चुकू नयेत; पण त्यांचा संकोचही होऊ नये, याची  काळजी आम्ही घेतो आहोत,  असे सतीश राजवाडे  म्हणाले.

आता ललित अंगाने एखादी व्यक्तिरेखा मांडताना  सत्याचे सौंदर्यीकरण करता येते- नव्हे,  ते करावेच लागते.  मात्र,  हे स्वातंत्र्य किती घ्यायचे,  हा प्रश्न असतो. आता बाबासाहेबांच्या आत्याचे कॅरेक्टर या मालिकेत उठावदार  पध्दतीने आले आहे. तसा या पात्राचा उल्लेख त्यांच्या  चरित्रांमध्ये फारसा नाही,  मात्र मालिकेत भावना नीट पोहोचविण्यासाठी हे पात्र खूप जवळचे वाटते. म्हणजे  आत्याचे मरण या मालिकेत दाखविले,  त्या वेळी ही  मालिका आहे हे माहिती असूनही असंख्य प्रेक्षकांना रडू  आवरले नाही. आता बाबासाहेबांच्या चरित्रात या  आत्याचा पुसटसा उल्लेख आहे;  पण त्यांच्या बालवयातील  पाया पक्का होण्याच्या काळातली ही महत्त्वाची व्यक्ती होती,  हे कळते.

या मालिकेच्या लेखकांनी कल्पनेने त्या  काळातील वास्तवाचा वेध घेतला आणि आत्याचे पात्र  अधिक फुलविले. वास्तवातही ते तसे घडले असावे,  असे  वाटण्याइतके हे पात्र अस्सल वाटत राहिले.  एक वेगळा सामाजिक लढा या निमित्ताने छोट्या  पडद्यावर जागविला जातो आहे. आत्यावरचे ठीक आहे,  आता भिवा मोठा होतो आहे. त्याचा भीमराव होण्याकडे  प्रवास सुरू झाला आहे... या मालिकेच्या त्या वळणावर  असे वाटत राहिले की,  इथून पुढे बाबासाहेबांचे नायकी  कर्तृत्व (हीरोईक डीड्‌स)च दाखविले जाणार का?  कारण बाबासाहेबांच्या आयुष्यात नाट्यमय घटना भरपूर आहेत.  त्याच्या मोहात पडून नसत्या वळणावर ही मालिका जाईल  का, विव्देषी होईल का,  असे प्रश्न होते. मात्र,  त्यानंतर  बाबासाहेब हा एक विचार म्हणूनच प्रकट होत राहतात.  म्हणजे भगवान कृष्णाच्या बाललीला आणि नंतर गीता  सांगणारा कृष्ण हे दृश्य माध्यमात मांडताना गीतेचा विचार  दृश्यात्मक पातळीवर कसा आणायचा,  हा प्रश्न असतोच. तसेच आता बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीची वाटचाल  दाखविताना त्यामागचे विचार कसे प्रकट करणार? मग बाबासाहेबांची भाषणेच दाखविली,  तर ते रटाळ होण्याची  शक्यता आहे. त्यामुळे चवदार तळ्याचा लढा चित्रित  करताना घटना-प्रसंगांसोबतच संवादांत, बाबासाहेबांच्या  सभांमध्ये विचारांची पेरणी होत राहिली.

अनेक पात्रांच्या  तोंडूनही ही क्रांती व्यक्त होत राहिली. काळाराम मंदिराचा  लढा मालिकेत येणार, त्यानंतरचा एक मोठा कालपट आहे.  मुळात महात्मा गांधींसोबतचे कथित मतभेद आहेत,  स्वातंत्र्य चळवळीच्या टीपेच्या काळात बाबासाहेबांची  भूमिका आहे, घटनासमितीचे अध्यक्ष म्हणून हा देश कसा असावा,  या संदर्भातले त्यांचे विचार,  धम्मदीक्षा असे  अत्यंत महत्त्वाचे प्रसंग आहेत. नंतर लाभलेल्या असंख्य  सहकाऱ्यांचीही जोड या कथानकाला मिळणार आहे. छोट्या भिवानं शाळकरी मुलांना वाचनाची गोडी  लावली होती. मालिकेतल्या भिवानं नेपोलियनचे पुस्तक मिळवून वाचले, हे पाहून अनेक मुलांनी त्यांना हवी ती  पुस्तके मिळविली किंवा तसा प्रयत्न केला- मागणी केली  पुस्तकांची, अशा प्रतिक्रिया उमटल्यात... हे या मालिकेचे  यश आहे,  असे वैद्य म्हणाले.

मालिकेतले संवादही खूप छान लिहिले आहेत.  आत्याचे पात्र भिवावर संस्कार करणारे. ती दळून झाल्यावर जाते साफ करत असते. छोटा भिवा तिला विचारतो, ‘काय  करते आहेस?’  तर ती म्हणते, ‘जात्याचे अश्रू पुसती आहे.’ वर्तमान सामाजिक वास्तव हे पुन्हा एकदा आरक्षणाच्या  भोवती फिरू लागले आहे. येते दशक हे आरक्षण हाच मुद्दा सामाजिक ढवळणीचा असणार आहे आणि आरक्षण म्हटलं  की, बाबासाहेबांवर चर्चा पोहोचतेच. अशा वेळी ही  मालिका तारुण्यात येते आहे. नवभारताची पायाभरणी करणारा हा महामानव सकल मानवांचा माणूस म्हणून  विचार करणारा होता. जात आणि धर्म या आधारावर  कुणालाच समाजात आणि कायद्याने विशेषाधिकार नसावा, यासाठी त्यांचा लढा होता. संविधान रचताना त्यांनी  कायद्यासमोर सगळे समान हे सूत्र मांडले.

बाबासाहेबांच्या  सामाजिक आणि क्रांतिकारक बुध्दिवादी विचारांचा  आपापल्या सोईनुसार अर्थ दोन्ही बाजूंची माणसं लावत  असतात. ही मालिका या दोन्ही तटांवरच्या समुदायांना  योग्य बाबासाहेब सांगेल, अशी आशा या मालिकेने किमान  आतापर्यंतच्या वाटचालीत दाखविली आहे. पुढे मोहात न  पडता ही वाटचाल अशीच सुरू राहिली; तर  बाबासाहेबांबद्दलचे गैरसमज दूर होण्यास,  त्यांचा स्वार्थी समाजकारण व राजकारणासाठी होणारा गैरवापर  रोखण्यासाठी ही मालिका नव्या पिढीवर संस्कार करेल, ही आशा ठेवायला काय हरकत आहे ?  या मालिकेच्या लेखिका,  दशमणी क्रिएशनकडून काम  पाहणाऱ्या अपर्णा पाडगांवकरांशी गप्पा मारल्या. त्यांची  भूमिका महत्त्वाची आहे...

महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर  मागच्या दोनशे वर्षांचा कालखंड हा स्थित्यंतराचा म्हणून  बघितला पाहिजे. पेशवाई 1818 मध्ये नामशेष झाल्यानंतर  आजपर्यंत सामाजिक अभिसरण चालू आहे. या कालखंडावर ठसा अनेकांचा आहे... पण आजही  ज्यांच्याबद्दल सतत काही तरी बोललं जातं, ती व्यक्तिरेखा  म्हणजे डॉ. आंबेडकर. एका बाजूला लाखो लोकांचं प्रेम  आणि भक्ती, तर दुसरीकडे राखीव जागा दिल्या म्हणून  संताप... अशा दोनच बाजू आजवर दिसल्या. यापलीकडे  या महान व्यक्तिमत्त्वाचे असंख्य पैलू आहेत. ते व्यक्तिगत अभ्यास म्हणून उलगडून बघायला सुरुवात केल्यानंतर असं  वाटलं की, हे सगळं लोकांना सांगायला हवं... आणि  लाखो लोकांपर्यंत पोचायचं असेल, तर त्याला मार्ग आहे  तो टीव्हीचा. मनोरंजनाची गुटी दिली की विचारांचा डोस  सहज पोटात जातो,  म्हणून ही मालिका. त्या विचाराला  वाहिनीने उत्तम साथ दिली. चरित्र सांगायचं असलं तरी ते  कथेच्या माध्यमातूनच सांगितलं गेलं पाहिजे,  हे  पहिल्यापासून डोक्यात होतं. गोष्ट म्हणून सांगितलं तर,  कठीण गोष्टीही कळायला सोप्या होतात,  हे आपल्याला माहीत आहेच. हा गोष्टीचा फॉर्म सोडायचा नाही,  हे ठरवल्यानंतर पुढचं सगळं सोपं होतं...

अपर्णा सांगत  राहिली.  प्रमुख संशोधन सल्ला हरी नरके यांच्याकडून घेतला. ते या  विषयातले मोठे अभ्यासक आहेत,  हे सर्वजाहीर आहे. शिवाय अमित ढेकळे हा एक गुणी मुलगा आमच्या रिसर्च  टीममध्ये आहे. घटना काय घडली,  हे दाखवायचं असेल,  तर तेव्हा नेमकं कोण हजर होतं? त्यांचा पेहराव काय होता?  दिवस होता की रात्र? काय खाल्लं-प्यायलं- वाचलं? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं रोज शोधावी लागतात. उदा.- बाबासाहेब बाजारात जाऊन शेळी घेऊन  आले,  ही घटना आहे. तर बाजार नेमका कसा दिसेल,  हे शोधावं लागतं... हे भयंकर जिकिरीचं काम आहे. ते  आमची टीम करत असते. लेखनासाठी शिल्पा कांबळे ही गुणी लेखिका हाती  लागली. अक्षय पाटील, गणेश रासने,  किरण शिंगाडे,  पवन  झा असे आमचे सगळे सर्जनशील तंत्रज्ञ सहकारी ही  मालिका तयार करण्यासाठी आणि त्यातली ऑथेन्टिसिटी जपण्यासाठी अहोरात्र धडपडत असतात. मुळात कथनात्मक साहित्य म्हटलं की, त्यात रंजकता  अभिप्रेत आहेच. अशा प्रसिध्द व्यक्तिरेखेबद्दल बोलताना  मात्र विचार आणि रंजकता यांचा तोल सतत साधावा लागतो. मुळात आम्ही हे ठरवलं की- जे घडलं आहे, ते  दाखवायचं... त्यात नवं काही कल्पित म्हणून घुसडायचं  नाही आणि जे घडलं आहे ते टाळायचं नाही. दाखवल्या  गेलेल्या त्या-त्या घटनांना सत्याचा आधार आहे आणि  त्याचं सादरीकरण फक्त कल्पनेचा साज देऊन परिणामकारक  करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय, अमुक एखादी घटना  घडण्यापूर्वी त्याचा काय विचार झाला,  भावनांचा कल्लोळ  कसा होता, आंतर-व्यक्ती संबंध कसे होते आणि एक  परिपूर्ण व्यक्तित्त्व म्हणून बाबासाहेब कसे घडत गेले, त्यात अन्य लोकांचं काय व किती योगदान होतं- हे शोधण्याचा  हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

माणूस म्हणून बाबासाहेबांचा शोध घेणारी ही मालिका म्हणूनच प्रेक्षक आवडीने बघतात. वाचनाचे, लेखनाचे, संशोधनाचे काम सातत्याने सुरूच असते. मुळात मालिका करायची म्हणून वाचनाला सुरुवात केली असं नाही. आधीच्या वैयक्तिक अभ्यासातून काही  प्रेरणा घेत आमच्या टीममधल्या प्रत्येकाने काम केलं. ही  साधारणतः अडीचशे भागांचीच मालिका असेल, असं आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे कोणताही भाग आम्हाला  टीआरपी आहे म्हणून वाढवायचा नव्हता आणि नाही  म्हणून कमी करायचा नव्हता. दैनंदिन मालिकेसाठी काम करताना सगळे भाग आधीच लिहून ठेवणं अशक्य असतं. त्यामुळे लेखन अव्याहत सुरू राहतं. संशोधन-लेखन व  त्याच वेळी शूटिंग हे एकाच वेळी चालू असतात. आपण  काही तरी गंभीर आणि महत्त्वाचं करतो आहोत,  ही भावना  प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे सेटवरचे आमचे शंभरेक  सहकारी तंत्रज्ञ खूपच मन लावून काम करतात. आजवर हे  नाव फक्त ऐकलं होतं आणि आता त्याबद्दल आणखीन  समजून घेता येतं आहे,  ही भावना खूप मोलाची आहे  त्यांच्यासाठी. याचं श्रेय मात्र खुद्द डॉ. भीमराव आंबेडकर  यांनाच आहे. त्यांचा जीवनप्रवास खूपच प्रेरणादायी आहे आणि तोच आम्हाला आमचं कठीण काम नेटाने पुढे  न्यायला मदत करतो.

ही जेन्युइनिटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचते, असा आमचा विश्वास आहे आणि त्याचा प्रत्ययसुध्दा येतो. टीआरपीच्या स्पर्धेतसुध्दा या मालिकेने उच्च स्थान  मिळवलेलं आहे. मालिका सुरू झाली, तेव्हा ‘एवढं दोनअडीचशे भागांमध्ये तुम्ही काय दाखवणार आहात?’ असा  थोडा शंकेखोर, थोडा कुचेष्टेचा प्रश्न आम्हाला विचारला  जात असे. मात्र,  आता लोक ‘अहो, किमान पाचशे तरी  भाग करा बरं...’ असं आपणहून सांगतात. हेच  लोकप्रियतेचं निदर्शक आहे,  असं आम्हाला वाटतं...

नितीन वैद्य यांच्यासह मालिकेचे स्टार वाहिनीचे  कार्यकारी निर्माता असलेले नरेंद्र मुधोळकर या विषयावर  भरभरून बोलतात. ‘‘या मालिकेकडे व्यावसायिक  दृष्टिकोनातून नाही बघत. मी ग्रामीण भागात वाढलो आहे. लहानपणापासून उन्हातच वावरणाऱ्या समाजाच्या एका  स्तराकडे बघत आलो. मी विदर्भातला आहे. बाबासाहेबांनी  नागपूरला दीक्षा घेतली. त्यामुळे बाबासाहेबांच्या अनेक  ग्रंथांचे वाचन मी केलेले होते. या व्यक्तित्त्वाने झपाटूनच  टाकले आहे. त्यात मग वाहिनीवर काम करताना  राजवाडेसरांसारखा सामाजिक विचारांनी काम करणारा बॉस  मिळाला. बाबासाहेबांवर मालिका करण्याचा विचार मला  खूपच भावला. तो नितीन वैद्य यांनीही उचलून धरला आणि  मग मालिकेसाठी सगळीच जमवाजमव करताना मीच खूप समृध्द होत गेलो, खूप श्रीमंत झाल्याचा हा अनुभव  आहे...’’ असे नरेंद्र मुधोळकर म्हणाले.

दैनंदिन मालिका या आज बघून उद्या विसरल्या जातात. त्यांचं शेल्फ लाईफ खूप थोडं आहे- एक दिवसापुरतंच. ही मालिका मात्र टिकून राहील. भीमराव आंबेडकरांबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर अभ्यासक नाही, पण  निदान लहान मुलांना त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी तरी ही  मालिका लोक परत-परत बघतील,  हा आमचा विश्वास  आहे. अर्थात, हे श्रेय पुन्हा बाबासाहेबांचंच. त्यामुळे  निर्माता म्हणून ही अशी मालिका करायला मिळाली, याचा  दशमी क्रिएशन्सला खूपच आनंद आहे... निर्मात्या संस्थेच्या सर्वांचेच हे मत आहे. समाजमन घडविणारी,  कोलमडून पडणाऱ्यांना  सावरणारी ही मालिका आहे. लढण्याचं बळ आज अत्यावश्यक आहे,  ते बळ ही मालिका देईल, असे वाटते. हा भाबडा आशावाद म्हणता येईल; पण हा बाबासाहेबांच्या विचारांवरचा विश्वास मात्र नकी आहे.


अभ्यासकांचा सहभाग,  जिव्हाळा... 

या मालिकेचे निर्माते श्री. नितीन वैद्य हे माझे फार जुने मित्र आहेत. ते मला भेटले. हा विषय मालिकेसाठी निवडला  असून तज्ज्ञ म्हणून तुम्ही टीममध्ये यावे,  असे निमंत्रण त्यांनी दिले. सध्याच्या काळात कोट्यवधी लोक मालिका  बघतात. मालिकांचा प्रभाव आणि त्यांची सर्वदूर पोहोचण्याची क्षमता बघता,  मी तत्काळ होकार दिला. गेली 40 वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अभ्यास करीत असून त्यांच्या साहित्याचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग ॲण्ड स्पीचेस’चे अनेक खंड मी संपादित केलेले आहेत. आजच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक पटलावर बाबासाहेब कालातीत मार्गदर्शन करणारे आहेत. त्यांच्या जीवनकार्याचा व विचारांचा रिलेव्हन्स मालिकेमधून मांडण्याबाबत आमच्या अनेक चर्चा-बैठका झाल्या. मालिका पडद्यावर दिसण्याच्या किमान सहा महिने आधी आम्ही  तिच्यावर काम करीत होतो. 

हा विषय संवेदनशील आहे, अर्थात तितकाच जोखमीचाही आहे. संशोधन, मांडणी आणि सादरीकरण याबाबत आम्ही अपूर्व दक्षता घेतलेली आहे. त्यामुळेच मालिकेला प्रचंड लोकाश्रय मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत. त्यांनी शेतकरी, कष्टकरी, सर्व महिला, बहुजन समाज आणि मध्यमवर्गीय यांच्यासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. राष्ट्रीय एकात्मता, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि  न्याय या वैश्विक मूल्यांसाठी ते लढले. स्त्री-पुरुष समता, जातिनिर्मूलन, ज्ञानार्जन, ज्ञाननिर्मिती, धर्मचिकित्सा, संवाद, विद्रोह आणि राष्ट्रीय संपत्तीचे समान वाटप यासाठी ते झटले. त्यांचे हे विचार कोट्यवधी जनतेपर्यंत या मालिकेव्दारे  पोहोचत असल्याने राष्ट्रनिर्मिती आणि जाणीव-जागृतीचे काम होते आहे. गोष्टीरूप आंबेडकर या मालिकेव्दारे भारत उलगडला जात आहे. भारत-भाग्यविधाता असणाऱ्या बाबासाहेबांना घराघरांत,  मनामनांत पोहोचवणाऱ्या मालिकेच्या चमूचा एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. 
- प्रा. हरी नरके
 

Tags: मालिका हरी नरके बाबासाहेब आंबेडकर भाग्यश्री पेठकर hari narake dr. babasaheb ambedkar bhagyashree pethkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भाग्यश्री पेठकर
pethkar.bhagyashree3@gmail.com

लोकसत्ता’, ‘नवराष्ट्र मराठी दैनिक’, दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रांत उपसंपादक म्हणून काम केले आहे. ‘काया’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात