डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

…पण कर्म आपलं, जबाबदारी मात्र ग्रहांची. कुंडलीच्या अमुक घरात अमुक इष्ट ग्रह आला असता तर बरं झालं असतं असं आपण म्हणणार. ग्रहांपेक्षा माणसं भोवती फिरत असतात आपल्या. त्यांचं काय?

तो भक्तिभावाने चिंब होतो. मी प्रभावीत होत नाही. मी आसपास पाहतो. एक आक्रोडाचं पार्टिशन. पलीकडे काही खुर्च्या. काही लोक तिथं बसलेले. एक लठ्ठ माणूस. 

जर नंबर लागला तर, आणि त्यांचा मूड असेल तर गुरुजी टक लावून पाहतात, चेहऱ्याकडे. मग सांगतात. वेळ, रास, इत्यादी. हंसाबेन लिहून घेते. मग शेजारच्या खोलीकडे तिथे पंचांग विभाग. तिथे एक कॉम्प्युटर. तिथे तत्कालीन ग्रहस्थिती 'व्हेरिफाय' होते.

पाऊस पडतो. चकाकत्या आरशाप्रमाणे ऊन येतं आणि जातं. वातावरण मंद, उदास, जगदीशच्या पेजरच्या संदेशाप्रमाणे मी ठरलेल्या ठिकाणी उभा, वाट पहात. घडयाळ धावतं आहे. सर्वच पार्थिव अपार्थिवातून काळ प्रवाहित होतो आहे. माणसं थांबलीत. माणसं जाताहेत. प्राक्तन त्यांना ओढतं आहे. करुण अशी अपरिहार्य गती प्रत्येकाला. आणि जे थांबलेत पावसात आडोशाला, त्यांची काही मजबुरी. मी पाहतो, या सगळ्याकडे. घड्याळाकडे पाहतो. संध्याकाळचे रंग भिजलेले. रात्र दूर नाही. संथ लयीत पाऊस पडतोय, निर्ध्वनी. जणू अनिवार्य... जगदीश येतो तेव्हा तो खिन्न वाटतो. थोडंसंच हसतो, खूण करतो. रेनकोट सांभाळत मी कारमध्ये. आता काचेवर थेंबांची नक्षी. ‘‘आपल्याला गुरुजीकडे जायचंय!’’
मी जाम दचकतो, आणि जास्त कंटाळतो. म्हणजे मध्यरात्रीपर्यंतचा वेळ गेला. ‘‘अरे, पण आता…’’ 
‘‘तुला कळतं म्हणून तुला घेतलं...’’ 
‘‘मी वाचतो थोडं, पण कळतंच असं नाही !’’ 
‘‘तेच ते! आम्हांला वाचण्याचा नाद नाही.. म्हणून तुला ये म्हटलं!’’ 
म्हणजे गेले पाच-सहा तास !‘‘'अं?' नाही तर काय? मूड असेल तर सांगतात!... नसेल तर बसवून ठेवतात!... त्यांची पूजा...! गर्दी... गरज आपल्याला आहे बाबा! त्याशिवाय का कोणी वेळ खर्च करेल?’’
मी गप्प बसतो, बाहेर पाहतो. हेही बरोबरच आहे म्हणा. गरजू माणूसच वेळ खर्च करीत असतो, गरजेच्या पूर्ततेसाठी. आणि गरज कोणाला नाही? कोणाला कशाचं दुःख आहे. तर कोणाला कशाचं. घर बांधायचं आहे. योग आहे का ? लग्न जमतच नाही, अनुकूलता असून, नोकरीत अडलं आहे. पत्नीशी बेबनाव. मुलं विचारीत नाहीत. म्हातारपण पोरकं झालं आहे. मुलीने परस्पर-जमवलंय. वेअब्रू करून ठेवलीय. बॉसशी पटत नाही. नोकरी-धंदा टिकत नाही. आमदनी होत नाही. दुःख जात नाही. मन बेचैन असतं. कोणाचं काय, तर कोणाचं काय. एकाचा हेवा करत म्हटलं की तू तर भूस्वामीच आहेस. म्हणजे तुझ्याकडे साक्षात जमीनच आहे काही एकर. त्यावर तो म्हणतो की लहान भाऊ वैरी झाला आहे. त्याच्या डोक्यात खूळ आहे. बंधु-वैर घेऊन जमिनीचं सुख कसं घ्यायचं? असं आहे प्रत्येकाच्या मागे काहीतरी. आणि प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे उद्याचं. पण नशिबाचं पाखरू काही सापडत नाही. प्रत्येक जण गरजू. त्याशिवाय वेळ कोण खर्च करणार?

मी गाडीतून बाहेर पाहतो. पाऊस मंद मंद उतरतो आहे लयीत. संधिप्रकाश झपाट्याने काळवंडतोय. ‘‘पण अपॉइंटमेंट घेतली का?" 
जगदीश डोकं हालवतो, नजर न हटवता. मग खिन्नपणे म्हणतो, ‘‘ते सगळं ठरलंय! फोन केला होता मी!... या म्हणाले म्हणून तर!... मग तुला कळवलं.’’ 
‘‘ते बोलावून तर ठेवतात !... पण सांगतातच असंही नाही!’’ 
जगदीश काही बोलत नाही. कारचा हेडलाइट रस्त्यावर पडतो. त्यात वरून पावसाच्या रेषा दिसतात. ‘‘सालं. सगळं कॉम्प्लिकेटेड झालंय!’’ 
‘‘अं?’’ 
‘‘मुलीचं लग्न’’ 
‘‘होईल रे!’’
‘‘वेड्या! तसं नाहीये!... मुलीला लग्नच करायचं नाही! मी त्या विवंचनेत असायला पाहिजे बाप म्हणून... पण… पण?’’ 
‘‘मी राधामधे इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलोय!... म्हणजे बघ!’’ मी ऐकून असतो. मला थोडं माहीत असतं ते. मला नवलही वाटलेलं असतं. चिंताही वाटलेली असते. थोडंसंच विकृत कुतूहलही वाटलेलं असतं. पण मी मित्राची भूमिका निभवण्याचा निर्णय घेतो. पाण्याचा फवारा बंद काचेवर पडतोय, मी म्हणतो, ‘‘मला थोडं माहीत आहे, आणि थोडं तूच सांगितलं आहेस!... पण हे योग्य वाटतं तुला?’’ 
‘‘योग्य म्हणजे काय? मी अडचणीत. व्याख्या कुणाला माहीत आहे इथे!’’ 
मी म्हणतो, ‘‘अरे वहिनी असताना !... त्यातून मुलं मोठी असताना हे बरोबर नाही!" 
‘‘म्हणजे चूक, असंच ना?... पण मी घटस्फोट वगैरेबद्दल काही बोललोय का? अजून तरी नाही! आणि तसं माझ्या डोक्यात नाही! मला तुझ्या वहिनीबद्दल आदर आहे!" 
‘‘आणि प्रेम?’’ 
‘‘आय डोंट नो! म्हणून तर म्हटलं, सगळं कॉम्प्लिकेटेड झालंय म्हणून !" 
‘‘आणि वहिनींना माहीत आहे?’’ 
‘‘असावं ! म्हणजे आहे ! पण ती काहीच विचारत नाहीये.’’ 
‘‘मुलीला?’’ 
‘‘ती तिच्याच प्रॉब्डेममध्ये आहे! तिला लग्न करायचं नाही.’’ 
‘‘आणि राधाला?’’ 
‘‘तिला काय? तिला सगळं माहीत आहे!’’ 
म्हणजे हे एकतर्फी वगैरे नाही! पाऊस वाढतो. समोर, काचेवर टपोरे थेंब टपटपतात. वायपर आपल्या गतीने फिरतोय. पण काहीच 'वाइप' केलं जात नाही. गाडी पुढे धावत राहते. आम्ही दोघे गप्प राहतो. 
‘‘तुझा खाजगी प्रश्न आहे! व्यक्तिगत! टू पर्सनल !... पण एक विचारू?’’ 
‘‘आय नो!... तू काय विचारणार? असं का? सगळं ठीक असताना असं का?... म्हणजे पैसा आहे. सोन्यासारखी बायको... असंच ना?’’ 
‘‘व्हॉट डू यू मीन बाय इनव्हॉल्व्हमेंट?’’ 
‘‘अच्छा! असं विचारायचंय?... खरं सांगायचं तर, मलाच नीट माहीत नाही!’’ 
‘‘वहिनीचं काही...’’ 
‘‘चूक? छे...छे:! ती चांगली बाई आहे!’’ 
‘‘तूही चांगला माणूस आहेस!... मग असं का?’’ 
त्याचा मोबाइल वाजतो. तो काही विचारतो आणि ऐकतो. मग पुन्हा शांतता. थोडा वेळ. 
‘‘थोडा उशीर लागेल म्हणे!... गुरुजींची पूजा चाललीय!’’ 
‘‘आता?’’
‘‘त्यांचे तसंच आहे!’’ 
‘‘तूच म्हणाला होतास एकदा...! माणसाला रोजच्या जीवनात काय लागतं?.. चांगलं जेवण, वेळचे वेळी !... गुड़ सेक्स!... इगो फुलफिल्मेंट!... सक्सेस! हो ना?’’
‘‘हो! असंच काही तरी तर ते सगळं मिळतंय मला! पण... पण? 'हा पण मोठा वाईट आहे! तो काही तरी अपूर्णता ठेवतो!... काय ते समजतं नाही..... एक अस्वस्थता, एक पोकळी राहून जाते!’’ 
‘‘मग याचा अंजाम?" 
‘‘माहीत नाही! मी राधाकडे ओढला जातोय, आणि मला ते माहीत आहे !... सगळं कॉम्प्लिकेटेड झालंय!’’ 
‘‘मग?’’ 
‘‘आपली कुंडली नाही !... गुरुजी सांगतात म्हणे चेहरा बघून! वेळसुद्धा सांगतात! रास सांगतात!... प्रॉब्लेमवर उपाय सुचवतात म्हणून मग वाटलं जावं.’’ 
‘‘तुला त्यासाठी स्वतःची कुंडली पाहिजे?’’ 
‘‘मग?... तूच मघापासून विचारतोयस् ना, असं का... असं का म्हणून...? ...अॅस्ट्रॉलॉजिकली या सगळ्या घोटाळ्याचे कारण तरी समजेल!’’ 
मी चकित होऊन त्याच्याकडे पाहत राहतो. त्याच्या लक्षात येतं माझं 'पॉइंटेड' पाहणं. तो खिन्न, उदास हसतो. मी विचारतो. ‘‘तुझा विश्वास आहे? या गोष्टी त्यात असतात?’’
‘‘कुणाला माहीत !... गुरुजींची खूप तारीफ ऐकलीय! तूही ऐकलीस !... आज जायचंय ठरलंय! आता पोहोचूच आपण!’’ 
‘‘खरं आहे. तारीफ मीही ऐकलीय. पण तारीफ खुदाची करायची असते, ज्याने सृष्टी रचली. तारीफ त्याची, ज्याने ग्रह-तारे रचले. पण कर्म आपले, जबाबदारी मात्र ग्रहांची. कुंडलीच्या अमुक घरात अमुक इष्ट ग्रह आला असता तर बरं झालं असतं असं आपण म्हणणार. ग्रहांपेक्षा माणसं भोवती फिरत असतात आपल्या. त्यांचं काय? म्हणजे हे संबंधांचं जाळं आहे.’’ 

गाडीला ब्रेक लागतो. रस्त्यावर कुत्र्याची जोडी मध्येच. केविलवाणी, पाऊस त्यांच्यावर उतरतोय. जगदीश त्यांना शिवी घालतो. एक स्कूटरवाला जिवाच्या आकांताने वेगाने स्कूटर दामटताना दिसतो. काय असेल त्याची मजबुरी? मी सन्मित्राची मर्यादित भूमिका सोडत नाही. ‘‘राधा!.... तिचं काय म्हणणं आहे !" 
‘‘ती? काहीच नाही!’’ 
‘‘म्हणजे ती रिलेशन्स असेच मेन्टेन करू शकेल?’’ 
‘‘असं कोणी विचारत असतं का बाबा?... आय् लाईक हर!... तिलाही कोंडी फुटावीशी वाटते !... पण! हा पण फार वाईट!... म्हणून तर म्हटलं, कुंडली करून घ्यावी!... हे ताण जरा समजतील !’’ 
असं सगळं समजत असतं काय? शनी सप्तमस्थानाकडे बघतोय. सप्तमेश शनीकडे बघतोय. सगळे ग्रह एकमेकांकडे पाहतात. नशीब आपल्याकडे पाहतं. आपण नशिबाकडे पाहतो. मोठीच गुंतागुंत. चला, नाही तरी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुटका नाही. जगदीशला बोलावंसं वाटतं आहे. कदाचित, गुरुजींसमोर जे बोलायचं आहे त्याची 'रंगीत तालीम' त्याला करायची असावी, किंवा उजळणी. त्याची नजर  रस्त्यावर. सवयीने, एक गतीने गाडी धावतेय. मी रेनकोट झटकतो. पाणी ओघळून खाली वाहतंय याची चोरटी जाणीव मला. 
‘‘राधाने नवरा सोडलाय, बऱ्याच वर्षांपूर्वी !... तो टुकार माणूस आहे...’’ 
‘अं?’ मी जरा विस्मयाने पाहतो. एका संपूर्ण माणसाबद्दल आपण इतक्या सहजपणे कसं काय प्रमाणपत्र देऊ शकतो, याचं मला आश्चर्य वाटतं. मी बोलत नाही. त्याचा ‘मेलन्कली' मूड कायम. 
‘‘त्याला आमच्या अफेअरबद्दल समजलंय!... तो आता वारंवार राधाकडे यायला लागला आहे म्हणे !... सालं, सगळं कॉम्प्लिकेटेड झालंय!’’ 
मला चिंता वाटते. मला नवल वाटतं. मला संबंधांच्या जाळ्याचा विस्मय आणि कौतुक वाटतं. माणसं कशी जगतात, आणि जगत राहतात. गाडी थांबते. आमचा ‘ठिकाणा’ आलेला असतो. कुठलंसं अपार्टमेंट, गुरुजींचा म्हणे चवथा माळा. आधीच गाड्या उभ्या, रेनकोट डोक्यावर धरून आम्ही गाडी पार्क करतो. जगदीशला ‘रिव्हर्स’ व्यवस्थित येत असताना मी रेनकोट डोक्यावर धरून उगाचच ‘येऊ द्या...येऊ द्या’ असं मध्यमवर्गीय पद्धतीने 'मार्गदर्शन' करतो. नंतर जिना. लिफ्ट बंद आहे म्हणे. जिन्यावरून वरच्या बाजूने लोक उतरत असतातच. एक खूप सुगंधी बाई, नटलेली आणि श्रीमंत. एक झुळझुळीत रेशमी गोरा व्यापारी. दोन सचिंत म्हातारे. मध्यमवर्गीय, नोकरदार, धंदेवाले, कारखानदार. पुढारीसुद्धा. मवाली वाटणारासुद्धा, पत्रकार आणि खंडणीवालेसुद्धा. माझ्या ओळखीचा एक मंत्र्यांचा पी.एस. उतरतो. ओळख देत नाही. उदबत्तीचे खूपसे संमिश्र वास आम्हांला वाट दाखवतात. 

फ्लॅट खूप मोठा, दर्शनी बैठक. ती तशी लहानच, लगेच गॅलरीसुद्धा. शेजारी मात्र खोल्या. मी गर्दीकडे पाहतो. काही जण जाताहेत. काही जण बसून आहेत, काही ताटकळताहेत. काही आधीच आलेले व्यवस्थित, गॅलरीत टेकून त्रिभंगी उभे. गॅलरीतून थोडं थोडं पाणी उतरतंय, उदबत्तीचा गंध. दाट, संमिश्र. भिंतीला लागून गाद्या अंथरल्या आहेत. पांढऱ्या स्वच्छ. त्यावर कोणी बसलेले नाही. ही गुरुजींची गादी. आणि भिंतीवर चित्रविचित्र मोठ्या तसबिरी. एक मी ओळखतो. ही तसबीर कार्तिकेयाची आहे. त्यात मोर डौलदार आहे. दुसरी तसबीर मी ओळखू शकत नाही. एक देवी आहे इतकं नक्की. त्रिनेत्रा. बहुधा शिवा. पण कमळवासिनी आहे. हातात पाश, धनुष्याचा बाण, वरदा. मुख तेजस्वी, पण हात निळे. म्हणजे काय आहे कुणास ठाऊक. आणि ही चिन्हं, फुलांची सजावट हे कशासाठी? मी स्वतःला विचारतो.  

एक गुजराती दिसणारी बाई पुढे येते आणि न बोलता खुणेने विचारते, जगदीश सांगतो हलक्या आवाजात. ती रजिस्टर पाहते. मान डोलावते. मग विचार करून एक कागदाचा तुकडा हातात देते. तेरा की चौदावा नंबर, मी मनातल्या मनात कपाळाला हात लावतो. कुणी तरी तिला ‘हंसाबेन’ अशी हाक मारतं. हंसाबेन माझ्याकडे विचित्र रोषाने पाहत निघून जाते. जणू तिला सुचवायचंय की बघ्याचं काय काम? पण मी लक्ष देत नाही. जगदीश खाली बसतो. मी भिंतीलगत उभा. एक माणूस येऊन विचारून जातो मला. मी जगदीशकडे बोट दाखवतो. माणूस जातो. बाहेर वीज लकाकते. प्रकाश, खिडकीतून. गॅलरीतील माणसं दचकतात. पाऊस वाढतो. काही जण घड्याळाकडे पाहतात. मी पाहत नाही. आता मला घाई नाही. आता मी इथे आहे आणि पाहतो आहे. टक्कल पडलेला एक माणूस माझ्याजवळ येऊन उभा.

‘‘तुम्ही किती वेळा आला?’’ 
‘‘इथे? पहिल्यांदाच!’’ 
त्याच्या डोळ्यांत दया. तो कीव करावी तसं पाहतो. 
‘‘एकदाच? मी पाच वेळेस आलो!.... पण भेट एकदाच झाली!’’ 
यात भूषण काय ते मला समजत नाही. मी नुसता पाहतो. थोडंसं थंडपणे.
‘‘पाच वेळा गेलो तेव्हा एकदाच नंबर लागला! म्हणाले, 'तुमच्या घराजवळ विहीर असली पाहिजे! शंभर टक्के बरोबर आहे!... पण मग पुढे काही सांगितलं नाही.. आज सहाव्यांदा...’’ 
‘‘नुसतं पाहून सांगतात?’’ 
‘‘नुसतं तोंडाकडे पाहून सांगतात! जन्म केव्हा झाला आहे! रास काय आहे! कुंडलीतील ग्रह!... बाप रे!’’ 
‘‘कसं काय?’’ 
‘‘शान!... सिद्धी.’’ 
तो भक्तिभावाने चिंब होतो. मी प्रभावीत होत नाही. मी आसपास पाहतो. एक आक्रोडाचं पार्टिशन, पलीकडे काही खुर्च्या. काही लोक तिथं बसलेले. एक लठ्ठ माणूस. मी कोपऱ्यात खाली बसलेल्या पन्नाशीच्या त्या बाईकडे पाहतो. त्या शांतपणे जपमाळ ओढताहेत. जेव्हा नंबर लागेल तेव्हा लागेल. मी उगाचच त्यांच्याकडे पाहतो. इतरांपेक्षा मला त्या जरा वेगळ्या, निश्चिंत वाटतात. बाकीच्या सगळ्यांत अधीरता आहे. बेचैनी आहे. तडफड आहे. घाई आहे. घाई नाही ते दोघंच या सगळ्यांत. एक त्या. दुसरा मी. जगदीश खाली बसलेलाच. पण तोही जरा बेचैन, मधेच तो मला पाहतो आणि खाली बसण्याची खूण करतो. मी दुर्लक्ष करून पावसाकडे पाहतो. आतून बारीक घंटांचे आवाज. आरतीचे आवाज, म्हणजे पूजा चाललीय वाटतं. एक लठ्ठ माणूस आपला अनुभव सांगू पाहतोय. मी त्याच्या दिशेने जातो. ऐकतो. हंसाबेन कुठूनशी येऊन पुन्हा रोषाने पाहून जाते. मी तिच्या डोळ्यांत पाहून मंद हसतो. ती घाईघाईने नजर चुकवते. मग परत येऊन कुजबुजत म्हणते, ‘‘तुम्ही बसा! नंबर लागेल तेव्हा लागेल!’’ 
मग पुन्हा निघून जाते. लठ्ठ माणूस सांगतो, ‘‘नुसतं पाहून म्हणाले, तुमची कुंभ रास!... वास्तुदोष आहे!... यश नाही...! मग म्हणाले, तुम्हांला घरभेदी शत्रू आहे!... शंभर टक्के!" 
‘‘मग आज पुन्हा आलात?’’ 
‘‘म्हणजे कुंडली मिळाली मला!’’ 
‘‘कशी?’’ 
तो सांगतो. पद्धत सांगतो. ‘‘म्हणजे जर नंबर लागला तर, आणि त्यांचा मूड असेल तर गुरुजी टक लावून पाहतात, चेहऱ्याकडे. मग सांगतात. वेळ, रास, इत्यादी. हंसाबेन लिहून घेते. मग शेजारच्या खोलीकडे तिथे पंचांग विभाग. तिथे एक कॉम्प्युटर. तिथे तत्कालीन ग्रहस्थिती ‘व्हेरिफाय’ होते. (बरोबरच असते म्हणा ती!) नंतर मग पुढची खोली. तिथेही कॉम्प्युटर. एक माणूस 'फी' जमा करून घेतो. ‘कॉम्प्युटराइज्ड’ कुंडली काढून देतो. म्हणजे अंशात्मक वगैरे. दशा-महादशाही काढून दिल्या जातात.’’ 
‘‘मग?’’ 
‘‘काही स्पेसिफिक प्रॉब्लेम्स असले तर पुन्हा यावं लागतं!’’ 
"तसे तुम्ही आलात?’’ 
‘‘न येऊन कसे चालेल?’’ 
तो आदराने जीभ बाहेर काढतो. ‘‘म्हणजे वास्तुदोष आहे ना! घराजवळ पिंपळाचे झाड. मुंजोबाची बाधा वास्तूला आहे म्हणे! मनःशांती नाही, यश नाही!... मग आलो! आज बघू या काय सांगतात!’’ 
मी हळूहळू कंटाळतो. खिसे चाचपडतो. चोरून 'चुइंगम' काढून तोंडात टाकतो. नकळत तोंड हलू लागतं. मी त्यामुळे जरा बेदरकार होतो. अजून गुरुजी बाहेर आलेले नाहीत. अजून लोक ताटकळताहेत. पण बसून आहेत. दोघं विचारून निघून जातात. पण दोघं नव्याने येतात. धंद्यात खोट बसलेला गुळगुळीत जाड, हलवायासारखा दिसणारा माणूस गादीसमोर, तसबिरीसमोर बसून आहे. बायको बरोबर, हात जोडून. आता त्याचाच नंबर आहे. मी गुरुजींबद्दल ऐकून आहे, त्यांची ख्याती. मंत्रालयातले बरेचसे अधिकारी इथं येतात. निव्वळ कुंडली तयार करून घेणं हा काही उद्देश नसतो. म्हणजे ते तर आहेच. कारण सगळे काही लहानपणी कुंडली करून घेत नाहीत. ते शक्यही नसतं. मग ढोबळ मानाने तारीख सांगितली, किंवा वर्ष सांगितलं तर मग 'बिनचूक' कुंडली बनवून मिळते. मग त्या आधारे तुमचे प्रश्न. समस्या, दुःखमय जीवनावर काही तोडगे. उपाय. कोणाचं काय, तर कोणाचं काय. सिनेमात यश पाहिजे. एक 'हिट' पाहिजे. 'मोठया दुस्काळाच्या वक्ताला' जन्मलास, असं आईने सांगितलं, म्हणून ढोबळ वर्ष घेऊन मित्र कुंडली तयार करून घेऊन गेला आहे. पैसे खातो म्हणून त्याची चौकशी करतायत. तक्रार करणारे नातेवाईकच. एकमेकांची नीट चिंता नाही आणि ग्रहांची चिंता. मी सुस्कारतो. पहिल्यांदाच घड्याळ पाहतो. मग जगदीशला जाऊन चिमटा काढतो. आम्ही दोघं गॅलरीमध्ये. 
‘‘का रे?’’ 
‘‘च्यायला, आज नंबर लागेल? तेरावा नंबर आहे.’’ 
‘‘पण आधीचे लोक आले नाहीत!’’ 
‘‘लागेल... बघू!’’ 
‘‘तुझ्याकडे तारीख आहे?’’ 
‘‘ढोबळमानाने ! वेळ मात्र नाही! वर्ष माहीत आहे!’’ 
‘‘आत्ता पूजा चाललीय! मी हंसाबेनला विनंती करू का?’’ 
तो दचकतो. त्याला आश्चर्य वाटतं. ‘‘तुझी कशी ओळख?" 
‘‘ओळख कसली? इथेच तर ओळख.’’
‘‘बघ मग झाली ना!’’ 
मी आत पाहतो. हंसाबेन दिसत नाही. मी रस्त्यावर पाहतो. पाऊस उदास, संथ गतीने उतरतोय, जणू अपरिहार्य, रस्त्याने छत्रीतून जाणारं जोडपं, रोमँटिक असं. त्यांना कुंडली, भविष्य आणि प्राक्तनाची चिंता नाही. त्यांचे हात गुंफलेले. बहुधा त्यात वर्तमान सुरक्षित. पुढचं पुढे. मी सभ्य माणसासारखी नजर वळवून घेतो. समोरच्या फ्लॅटमधून दिसतं, खिडकीतून. एक रागावलेली आई झाडूने मुलाला मारतेय. काय असेल त्या मागचं कारण? काय असेल त्यांचं नशीब? जीवन असं ठिकठिकाणी प्रवाहित होतं आहे. मी पुन्हा आत पाहतो. आक्रोडाच्या पार्टिशनच्या पलीकडे हालचाल. बहुधा खुर्च्या रिकाम्या होतायत. मी एक चक्कर मारतो. हंसाबेन कुणाशी तरी बोलतेय. मी डोळ्यांत पाहून हसतो. ती स्तब्ध होते. जरा अस्वस्थ होते. मी कुजबुजतो. हंसाबेन रजिस्टर चाळते. म्हणते, ‘‘बघते प्रयत्न करून! पण गॅरंटी देत नाही हां.’’
इथे कोणाला गॅरंटी पाहिजे विशेषतः तिच्याकडून! ती जाते, पण जाताना स्मित करते. मी कॉम्प्युटररूममधे जाऊन पाहतो. तिथे काम चालूच. मी परततो. मी जगदीशला खूण करतो. सांगतो हळूच. तो चकित. 
‘‘ती कोणाचं ऐकत नाही, म्हणे !...’’ 
‘‘बघशीलच आता, गुरुजी बाहेर आले की!...’’ 
‘‘तुझ्याशी बरं बोलली?" 
मी हसतो. परिमार्जन म्हणून नाही, पण उगाचच मी माझ्या जरा लठ्ठ बायकोची आठवण काढतो. जगदीश माझ्यामागे. आम्ही आक्रोडाच्या पार्टिशनच्या आड असलेल्या खुर्च्यावर जाऊन बसतो. तिथं एक स्त्री बसलेली. मी ओझरतं पाहतो. चंदेरी साडी. डोक्यावर पदर. तिचं पूर्णपणे आमच्याकडे लक्ष. ती विचलित वाटते. मी गादी आणि कार्तिकेय, आणि दाराकडे पाहतो. आता कदाचित गुरुजी येतील. जगदीश एकदम दचकून माझा हात घट्ट धरतो. मीही दचकतो. पण मला कळत नाही. 
‘‘राधा?’’
मी त्या स्त्रीकडे पाहतो, राधाकडे. ती केव्हाची आलेली. बहुधा आधीपासून, आमच्या येण्याच्या आधीपासून पार्टिशनच्या आड बसलेली. तिने आम्हांला तेव्हाच पाहिलं असणार. ती तेव्हापासूनच विचलित, बेचैन असणार. जगदीश विस्मयाने नुसता पाहतो आहे. ती हळूच, आत्मपीडक असे स्मित करते.
‘‘हो! मीच आणि तू?" 
"मीही! पण तू सांगितलं नाहीस, इथं येणार म्हणून...’’ 
‘‘आणि तूही…’’ 
दोघं एकमेकांना पाहत राहतात. जगदीश पुढे झुकून जरा तिच्याजवळ सरकतो. देवाने निर्माण केलेलं तणावातलं अंतर जरा कमी करण्याचा प्रयत्न करतो. मी आश्चर्यातून अजून सावरलेलो नाही. मी त्या जपमाळ ओढणाऱ्या आणि जरा निश्चिंत दिसणाऱ्या बाईंकडे पाहतो तेव्हाच मी गडबड ऐकतो.  गुरुजी बाहेर येतात. खरं तर त्यांना आणलं जातंय. धरून, उचलून. साठी उलटलेला. जवळपास लोळागोळा माणूस. आपल्याच तंद्रीतला. गुरुजी हात जोडून बसतात. हा नमस्कार कोणाला म्हणून नाही. हंसाबेन शेजारी बसते. एक जण उदबत्तीचा जुडगा पेटवून ठेवतो. सुगंधाचा भडिमार. काही दिवे लागतात. प्रतिमा उजळतात. आता शांतता पसरते. कुजबूज थांबते. धंद्यात खोट बसलेला माणूस पुढे सरकतो, बायकोसह. मीही पाहू लागतो. पलीकडच्या प्रिंटरचा आवाज थांबतो. जणू सगळ्यांचं नशीब अचल होतं, थांबतं. 
‘‘गुरुजीऽ! ठीक आहे नाऽ....’’ 
‘‘अं?’’ 
गुरुजी लोडाला टेकून झोपी जातात थोडा वेळ. 
‘‘त्यांना झोप नाही हो, खूप ताण पडतो, सगळ्या लोकांचा!’’ हंसाबेन सांगते. मग शोधते जणू सगळ्यांमधून मला. मी तिला दिसतो, दूर खुर्चीवर बसलेला. मग ती इतरांकडे पाहते. 
‘‘गुरुजीऽ....’’ 
‘‘अं?’’ 
‘‘तबियत सारोऽ छे?’’
‘‘अं?’’ 
‘‘यांना बघा गुरुजी ... यांचा नंबर आहे! ...यांची रास सांगू शकाल?’’ 
गुरुजी काही तरी पुटपुटतात. समोरच्या, धंद्यात खोट आलेल्याकडे आरपार पाहतात. पुन्हा काही विचारतात. 
‘‘नाही, तारीख-वार नाही. वर्ष ?’’ 
‘‘वर्ष सांगता येईल का होऽ?’’ 
‘‘एकोणीसशे सत्तेचाळीस!’’ हंसाबेन ओरडून सांगते. 
गुरुजी ऐकतात. पण ऐकले असं चेहऱ्यावरून दिसत नाही. मध्येच पाणी पितात. पाण्याचा ओघळ वाहतो छोटासा, ओठातून. हंसाबेन नॅपकिनने पुसते. 
‘‘बोलोऽ गुरुजीऽ’’
‘‘तुमच्या आधी एक भाऊ झाला होता, वारला, व्यंग होतं, बरोबर?" 
समोरचा माणूस नमस्कार करतो. त्याचं तोंड आश्चर्याने उघडतं. 
‘‘धंद्यात खोट आली?’’ 
‘‘हो गुरुजी.’’ 
‘‘येणारच!’’
‘‘दोन ऑगस्ट सत्तेचाळीस! वेळ सकाळी सहा वाजता! रास वृषभ!’’ 
‘‘रास कोन्ती गुरुजी? जन्म की लग्न?’’ 
गुरुजींचा ‘फ्लो’ थांबतो थोडा, आणि त्यांना अडथळा वाटतो. ते हाताने नापसंती दाखवतात. हंसाबेन जीभ काढते. हसते. लोक हसतात. ‘‘लग्न वृषभ! जन्म-रास वृश्चिक! ग्रह लिहून घ्या!’’
हंसाबेन कॉम्प्युटराइज्ड छापील कागद घेते. त्यावर चौकोन इत्यादी छापलेलं असतं. लोकांची उत्सुकता. 
‘‘लग्नी शनी! हर्षल. बरोबर! चंद्र सप्तमात, षष्ठेश अष्टमात, अष्टमेश षष्ठात!’’
गुरुजी नमस्कार करतात. बहुधा कालपुरुषाला. हरवतात. डोळे मिटतात. उघडतात. मी पाहतो. गुरुजी पुढे काहीच बोलत नाहीत.
‘‘त्यांना धंद्यात खोट बसलीय!... काय करता येईल?’’ 
ते पुटपुटतात काहीतरी. हंसाबेन गंभीर होते. ‘‘सचोटीने व्यवहार करा, म्हणतात गुरुजी!’’ तो मान हालवतो.
‘‘पंचांग सेक्शनमधून व्हेरिफाय करा! तारीख-वेळ द्या त्यांना!... मग पुढे कॉम्प्युटरमधून काढून घ्या!... फी तिकडे भरायची...’’
‘‘पन् जरा तोडगा? पन् तोडगा सांगा गुरुजी...’’ 

ते सांगत नाहीत. ती हाताने खूण करून उठवते. तो नाखुशीने उठतो. पुढचा माणूस जाऊन बसतो पुढे. मी जगदीशकडे पाहतो. त्याच्या चेहल्यावर आक्रोडाच्या पार्टिशनचा जाळीदार छायाप्रकाश. तिच्याही. ते दोघं एकमेकांकडे पाहताहेत. ते कुजबुजतात. माझ्या प्राणांचा कान होतो. म्हणजे मी सभ्य माणूस असतो. चोरून ऐकण्याची माझी इच्छा नसते. पण मी ऐकतो. शेवटी मी मित्र आहे. म्हणजे माझी प्रामाणिक भूमिका. 
‘‘काय ठरवलंस?’’ 
‘‘अजून काही नाही!’’
‘‘ तू?" 
‘‘अजून काही नाही!’’ 
‘‘मग?" 
‘‘मग काही नाही!’’ 
‘‘हे कुठपर्यंत चालणार?’’
या अनादी प्रश्नाला उत्तर नाही. तसं ते नसतंच. जाळीदार पार्टिशनचा प्रकाश दोघांवर. ती व्याकूळ. जणू तृषार्त. तिचे डोळे बोलतात. त्यांत वादळ खळाळतं. पापण्या झुकतात. त्यांत बाष्प. एक सुस्कारा. जगदीशकडून सांत्वनेचा एक चोरटा स्पर्श, हे सगळ आक्रोडाच्या पार्टिशनच्या आड. ती कुजबुजते. 
"तो यायला लागताय आता!’’ 
‘‘हो?" 
‘‘कारखानदाराबरोबर जमवलंयस म्हणतो! हसतो! घाणेरडं बोलतो! त्याच्या सवयी गेलेल्या नाहीत! त्याला पाहताच मला गुदमरायला होतं!... भीती वाटते... निराशा वाटते’’- 
मी तिच्याकडे न पाहता ऐकतो. तिच्या कुजबुजण्यात, तिच्या आवाजात मला कंप जाणवतो. मला ते करुण वाटतं. हिची भीती, हिचं गुदमरणं, हिचं कुंठित, विकल जगणं या बारा घरांच्या चौकोनात बसवता येईल का? कदाचित येईलही. पण त्या पलीकडेही एखादं तेरावं घर असावं. या साऱ्या पसाऱ्यापलीकडचं. 
‘‘पैसे पाहिजेत का त्याला ?... हरामखोर...’’
‘‘प्रश्न पैशाचा नाही, जगदीश!... पैसे मी देते आहेच त्याला !... पण हे कुठपर्यंत चालणार?" 
कुठपर्यंत चालणार? तृष्णेची गती कुठपर्यंत चालणार? मी सुस्कारतो. न जाणवेल या पद्धतीने. पाहतो गुरुजींना. ते आता लोडाला टेकून कलंडलेत. त्यांचे डोळे मिटताहेत. काटकुळासा माणूस उदबत्ती पेटवून जातो. पुन्हा सुगंधाचा लोट, 
‘‘गुरुजी? सारो छे? यांचे सांगता का?... यांचं गुरुजीऽ’’ 
‘‘नाही... सांगत नाहीत! पुढच्या वेळेला !" 
समोरचा माणूस निराशेने उठतो. थोडी मोकळी जागा. काही दुसरे पुढे सरकतात. वीज कडाडते. गॅलरीत आता तिरकस पाऊस. गॅलरीतले आत येतात. भिंतीला टेकून बसतात. भयग्रस्तसे. चिंताग्रस्त असे. मी पुन्हा त्या पन्नाशीच्या बाईकडे पाहतो. त्या तिथं मला विसंगत वाटतात. मी उठतो. उगाच सावकाश, लक्ष न वेधता फिरत जवळ जातो. माझ्यामागे पार्टिशनच्या आडचं कुजबुजतं वादळ मी तसंच सोडतो. मी आता गादीच्या जवळ. भयप्रद तसबिरी. उग्र गंध. हंसाबेन माझ्याकडे पाहते आणि अस्वस्थ होते. पण लक्ष नाही असे दाखवते. रजिस्टर पाहते. 
‘‘आठ, नंबर आठ!’’ 
थोडी खळबळ. एक सफारी सुटातला माणूस येऊन बसतो. त्याच्याकडे मात्र कुंडली आहे. 
‘‘इथूनच केतीय का?’’ 
‘‘नाही! आधीचीच आहे!’’ 
‘‘व्हेरिफाय केलीय का? बिनचूक आहे?" 
हंसाबेन चिडल्यासारखी. मग गुरुजींकडे पाहते. ते डोळे उघडतात. डोळ्यांतली झोप उडाली आहे. ते हसतात. 
‘‘चहा देता का, बेन?’’ आत धावपळ. मघाचा काटकुळा इसम चहा आणून देतो. बहुधा आतमध्ये तयारच ठेवला असणार, थर्मासमध्ये. गुरुजी चहा पितात. तब्येतीत हसतात. माणसात येतात. जणू इतकी मंडळी गप्पा मारायला आलीत. 
‘‘पाऊस पडतोय वाटतं?’’ 
यांना आत्ता समजलं काय? मी त्यांच्या अस्वस्थ बोटांकडे पाहतो. त्यांत अंगठ्या, कसल्या कसल्या. कॅट्स आय आणि सफायर इत्यादी. मग गुरुजी थोडा हास्य विनोद करतात. राजकारणावर जरा टीकाटिप्पणी, समोरचा त्यांना सर्पदोषाविषयी विचारतो, ते सर्पदेवतेबद्दल माहिती सांगू लागतात. मी ऐकतो. वाचून ती मला माहीत असते. नवं काही कळत नाही. कालसर्प योग. त्याचे प्रकार. त्याच्या शमनाचे उपाय. प्राचीन ग्रंथांतले दाखले. त्या पन्नाशीच्या बाई उठून उभ्या राहतात. घड्याळाकडे पाहतात. जरा पुढे येतात. गुरुजींना आणि हंसाबेनकडे पाहतात. मीही पाहतो त्यांना.
‘‘मी जाऊ का? पुन्हा येईन!’’ 
हंसाबेन संमतिदर्शक मान हालवते. पण गुरुजी हाताने थांबवतात, जाऊ देत नाहीत. पाहतात त्या बाईना, एकटक. 
‘‘बसा! जाऊ नका!’’ 
‘‘गुरुजी सांगताहेत- बसा! -बसा हो बसा! कधी नव्हे ते-’’ 
त्या घुटमळतात. बसतात. 
‘‘आता तब्येत चांगली राहत नाही!... त्यातून सर्वांचं ओझं घ्यायचं! कार्तिकेयांची कृपा म्हणून जिवंत आहे! नाही तर हे गाठोडं केव्हाच जायचं-’’ 
‘‘वा गुरुजी! असं कसं बोलता?’’ 
‘‘नऊ नंबर! नऊ.’’ 
गप्पिष्ट मागे सरकतात. दुसरा माणूस पुढे येतो. पण गुरुजी त्याच्याकडे पाहत नाहीत. आठ नंबर अजून कुंडली हातात धरून. गुरुजी हसतात. 
‘‘या...या!... इकडे या!’’ 
सगळ्यांना नवल वाटतं. गुरुजी पत्रिका मागून घेतात. मी पाहतो. पाहत राहतो त्या माणसाकडे. करुण आणि केविलवाण्या झालेल्या जिवाकडे, एरवी हा लौकिक जगात रुबाब करत असणार. ऑफिसात हाताखालच्या लोकांना 'ईडियट' वगैरे म्हणत असणार. दुर्बलांना तुच्छतेने कमी लेखत असणार. पेपर वाचून राजकीय मते सांगत असणार. शोषण करीत असणार. जमलं तर दारू पीत असणार. मौजमजा करीत असणार. आणि हा आता पत्रिका हातात घेऊन उभ्या आयुष्याचा लेखा-जोखा मांडत करुणपणे बसून आहे. 'नंबर आठ' सांगतो. 
‘‘मुलाशी पटत नाही. तो माझा द्वेषच करतो.’’ 
मतभेद असतात. भांडणं होतात. त्याचाही मनस्ताप. आपलाही मनस्ताप. आपण त्याच्यासाठी काही तरी केलंय हे त्याला मान्यच नाही. इत्यादी...इत्यादी... मीही ऐकतो ते. इथे काही लपवाछपवी नाही. हे एक बरंच आहे. ज्याने त्याने आपापली जखमी छाती सगळ्यांसमोर उघडायची. छातीच काय, पाठसुद्धा... जर पाठीकडून वार झाले असतील तर. सगळ्यांच्याच दुःखाचा उघडा बाजार आहे. मी हंसाबेनकडे पाहतो. ती लक्षपूर्वक ऐकतेय. लिहूनही घेतेय. मी वळून पाहतो. पार्टिशनच्या आडून जाळीदार प्रकाशातली 'कश्मकश' तशीच. गुरुजी सांगतात, की इष्ट ग्रह इष्ट घरात यावेत. तसे ते आले तर इष्ट परिणाम होतो. अनिष्ट ग्रह चांगले परिणाम दाखवीत नाहीत. ते सगळं प्राथमिक असतं. मला नवं असं काही ऐकायला मिळत नाही. म्हणजे असं की, ग्रह काही खाली येत नाहीत. माणसं येतात. आपल्याभोवती माणसंच असतात. त्यांनी इष्ट असावं. आपण इष्ट असावं. दोघांचे संबंध इष्ट असावेत. परिणाम इष्ट होतो मग. हे माझे मनातल्या मनात विश्लेषण. माणसाने माणसाची चिंता करावी. ‘नंबर आठ’ ला काही तोडगा सांगता सांगता गुरुजी एकदम ‘ट्रान्स’मध्ये जातात. काही स्तोत्र म्हणू लागतात. मी ऐकून समजण्याचा प्रयत्न करतो. पण विशेष काही समजत नाही. काही ‘कार्तिकेया’ची स्तुती असावी. ‘नंबर आठ’ वाट पाहत तसाच बसून. नंतर गुरुजी झोपतात लोडाला टेकून, पाऊस पडत राहतो. सगळे गप्प बसून राहतात, किंवा कुजबुजतात, मी पार्टिशनकडे पाहतो. दोघं जाळीदार सावल्यांत बसून हलक्या आवाजात काही बोलताहेत. लठ्ठ माणूस पूर्ववत बसून. टक्कल पडलेला माणूस हंसाबेनजवळ वशिला लावण्याचा प्रयत्न करतो. ती त्याचा प्रयत्न हाणून पाडते, कठोर डोळ्यांनी पाहून. रात्र सरकते. मी दुसऱ्यांदा घड्याळाकडे पाहतो. मी पाहतो, गुरुजींकडे. ते आता झोपलेच आहेत जवळजवळ, मग लोक का थांबलेत; असा मला प्रश्न पडतो. ते असंच मधून मधून झोपतात! मग उठून पुन्हा सांगतात! ‘‘किती वेळाने उठतात?’’ माझा जरा खवचट सवाल, पण सांगणारा सांगतो की बहुधा दहा-पंधरा मिनिटांनी. मी उठतो. नवीन दोघं येतात आणि चौकशी करून जातात. एक कॉम्प्युटररूममध्ये जाऊन ‘मोबाइल’चा नंबर देऊन जातो. नंबर आला की कळवा! मी संथपणे तीन-चार खोल्यांतून, गॅलरीतून-सगळीकडून निरुद्देश फिरतो. गॅलरीत एक जण मला गाठतो. ‘‘का आलात? काय प्रॉब्लेम?’’ 
मी विचार करतो... तसे प्रॉब्लेम खूप असतात. नाही असं नाही. पण इथं आणू शकेल असा प्रॉब्लेम कोणता? तसं, आपल्यालाही पोटात अल्सर आहे. बायको आजारी पडते. मुलगा एकदा नापास झाला होता. पण त्याने आता नोकरी मिळवली आहे. आपली स्कूटर नादुरुस्त असते अनेकदा. पण 'वाहनसुख' आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण कुठे गेलो नाही. तसे ठीक आहे. ठीकच आहे. हां, तसं 'त्या' बाबत बायकोचा रस संपत आला आहे. पण तसं तर होतच असतं. आणि आपला रस वाढतो आहे असंही नाही. मग काय सांगावं? मी त्याला सांगतो. तिची विरक्ती. म्हणजे या वयात, आपण काही म्हातारे झालोत का बघा बर? पण काय करणार? सप्तमात राहूचे भ्रमण आहे म्हणे. ऐकणाऱ्याच्या सगळ्या शरीराला कान फुटतात. मी गंभीरपणे तो ‘नाजूक प्रॉब्लेम’ मोकळेपणाने सांगतो, आणि मनात खूप हसतो. त्याची पंचायत अशी की त्याला विचारता येत नाही. मग मी विचारतो, त्याला. ‘‘मुलीचं लग्न होत नाही!... कुंडली नाही! तिचीही नाही! माझीही नाही... मग हे चेहरा पाहून सांगतात म्हणे !’’ 
‘‘मुलीला कशाची आवड आहे!’’ 
‘‘आं?’’ 
‘‘म्हणजे कला, गायन वगैरे?’’ 
तो चमत्कारिकपणे पाहतो. विचार करतो. मी आणखी प्रश्न विचारतो. 
‘‘म्हणजे मुलीची हॉबी काय? तिचा आवडता लेखक कोणता?...’’ 
बाप सांगू शकत नाही, त्याला मुलीबद्दल फारशी माहिती नाही. ते प्रश्न त्याला निरर्थक वाटतात. ग्रह आणि तारे त्याला अर्थपूर्ण आणि जरुरी आहेत. तो मुलीला समजू शकत नाही. तो मुलीबद्दल चिंतित नाही. त्याला मुलीच्या लग्नाची चिंता आहे. सप्तमातला मंगळ त्याला जवळचा आहे. मुलगी दूरची आहे. त्याला मुलीची 'हॉबी' माहीत नाही. मी हळूहळू कंटाळतो. मग नजर रस्त्यावर. रस्त्यावरून आता वेगाने जाणाऱ्या मोटारगाड्या. सगळ्यांना घरी जायची घाई आहे. मी पुन्हा आत. पार्टिशनच्या आडोशाला. तिथं जाळीदार सावलीतलं धुमसतं भावनांचं नाट्य. उसासे आणि सुस्कारे. मधेच आवाज चढतो आणि उतरतो. जगदीशचा मोबाइल एकदम ‘स्टाइल’मध्ये केकाटतो. सगळ्यांच्या  निषेधाच्या नजरा. जगदीश घाईने हळूहळू बोलतो. मी ओळखतो, वहिनींचा फोन. जगदीश अजीजीने बोलतो, काही सांगतो. राधाच्या बांगड्या निषेधात्मक वाजतात. मी पाहतो तिला. तिच्या आत्म्यातून तृप्तीची ज्योत मला काही दिसत नाही. तिचं सौंदर्य मला उग्र, जरा कांगावखोर वाटतं. मला तिच्याबद्दल फारसा आदर वाटत नाही. मी त्या दोघांना पुन्हा एकांत देतो. उठतो. आणि सुगंधाचा भपकारा येतो. गुरुजी अजूनही झोपलेले. पण हंसाबेन दिसत नाही. म्हणजे अजून खूप वेळ आहे. तेरावा नंबर आमचा. राधाचा कितवा, माहीत नाही. ती बोलेल की नाही, दोघं बोलतील की नाही माहीत नाही. दोघांना कुंडली हवी आहे. दोघांना उद्याचा खुलासा हवा आहे. दिलासा हवा आहे. आत्ताच्या, आजच्या गुंत्याची सुटका उद्याच हवी आहे. रात्र सरकते आहे. पाऊस पडतो आहे. मी कॉम्प्युटररूममध्ये. तिथं एक पार्टिशन छोटंसंच. कोपऱ्यात. हंसाबेन तिथं उभी. ती माझ्याकडे पाहून हसते. इकडे तिकडे पाहते. मग मला खूण करते. बोलावते. मी जातो. छातीत न धडधडता. 
 ‘‘ही आमची रेस्टरूम!... खूप थांबावं लागतं ना!... घ्या !’’ 
ती कागदाच्या ग्लासमध्ये थर्मासमधून चहा देते. मी सावकाशीने, चवीने पितो. हसतो. पुन्हा तिच्या डोळ्यांत पाहून. 
‘‘तुम्ही पाहिल्यांदाच?" 
‘‘हो! ते मित्र थांबलेत ना...’’ 
‘‘हां-हां पण तुमची काही समस्या नाही का?’’ 
‘‘माहीत नाही बुवा!" 
‘‘कुंडली करायचीय तुमची ?" 
"नाही !’’ 
मी शांतपणे. माझा शांत निश्वयीपणा तिला विचलित करतो. ती चवीने चहा पिते. इतका निवांतपणा आम्हांला मिळतो! मग मी तिला विचारतो. ती घुटमळते. पण मग सांगते. एकदम फुटून पडून, जणू सांगणे तिची गरज आहे. कथा तीच. वेगळी काही नाही. तीच, जी ठिकठिकाणी घडते. दुःखाची, तृष्णेची. असुरक्षिततेची. मानवीय संबंधांची. नवरा सामान्य. ही जरा महत्त्वाकांक्षी. त्याला ‘बुद्धी’ नाही. म्हणजे भोळा-खुळा, साधा. इतरांच्या शोषणाची ही बळी. काही मर्यादेपर्यंत, नंतर ती गुरुजींबद्दल ऐकून. ती सेवा करते. एकदा गुरुजींचे आणि कार्तिकेयाचे (एकतर्फी) संवाद ऐकते. 
"तू जनकल्याण कर. तुझ्या सेवेसाठी मी ‘मुली’सारखी मुलगी पाठवते" असं देवतेचं म्हणणं. ती पोहोचते. सूत्रं हाती घेते. आता तिचा दरारा. तिचं गुरुजी ऐकतात. तिच्यावाचून पान हालत नाही. पण ती कंटाळली आहे. म्हणजे तिला सुरक्षितता प्राप्त आहे. वैभवही मिळू लागलंय. पण दुःखी, व्याकूळ माणसांचा गराडा आहे. (म्हणून तुम्ही वेगळे वाटला, वायले वाटले!).
‘‘नवरा कुठे- आय मीन मिस्टर?’’ 
‘‘तो उदबत्ती लावणारा!’’
तिची उघड तुच्छता. मी पाहतो. तिला, तिच्या नवऱ्याला. गर्दीला. मला ती जरा समजू लागते. 
‘‘पण बिनउपयोगी आहे!’’
 ती जरा सूचकपणे, जरा उपहासाने, जरा उग्रपणे दबल्या आवाजात म्हणते. धीटपणे पाहते. मी कागदी ग्लास बादलीत टाकतो. ‘‘येत जा, मधून...मधून!’’ ती म्हणते. मी थोडंसं शहारतोच. म्हणजे भीतीने असं नाही, कदाचित थंडीने. मला तिथल्या कार्यपद्धतीबद्दल विचारायचं असतं. म्हणजे कुंडली कितपत ‘खरी’ असते वगैरे, पण मी विचारत नाही. मला आठवतं. गुप्तरोगाचा इलाज करणाऱ्या डॉक्टरची एक नर्स माझ्या मित्राच्या ओळखीची झाली होती. ती म्हणाली होती, ‘‘आते जाओ बीच-बीच में’’ कुणाचं काय, तर कुणाचं काय, सगळ्यांमधून जीवन वाहत असतं. माणसांची भ्रमंती आपल्याभोवती. ग्रहांची नाही. आपण माणसांना ओळखत नाही. मूकपणे उदबत्ती लावत फिरणाऱ्या त्या हडकुळ्या नवन्याचं काय असेल दुःख? आणि त्याची कुंडली काय असेल? त्याला का तोडगा देऊ नये ? म्हणजे मंगळवारी नखं काढ, पांढरं फूल वाहा. लवंग जवळ ठेव, इत्यादी. मी थोडा व्यथित होतो. पण गुरुजी उठतात. हंसाबेन जाते, घाईघाईने.
मी थोडा रेंगाळतो. 'कॉम्प्युटरबॉय कार्ड पाहून हसतो. पण तो हसत नाही. मी पुन्हा पहिल्या खोलीत. आता पार्टिशनच्या आड चाललेलं अश्रूंचं वादळ शमलेलं. राधा गप्प, शांत, खाली जमिनीकडे बघत बसलेली. जगदीश गुरुजींकडे पाहतोय. मीही पाहतो, ते तरतरीत दिसतात. सगळ्यांच्याकडे पाहून हसतात. त्या पन्नाशीच्या जपमाळ ओढणाऱ्या बाई पुन्हा उठतात. हंसाबेनला म्हणतात, ‘‘जाऊ मी? पुन्हा येते !.. नंबर काही लागत नाही, असं दिसतंय!’’ गुरुजी त्यांना पाहतात. पाहत राहतात. मला आणि मलाच त्यांच्या डोळ्यांतलं काही वेगळं कुतूहल दिसतं. ते खूण करतात. बाई पुढे. ते बसण्याची खूण करतात. 
‘‘बसाऽ बसा हो, बसा ताई! गुरुजी स्वतः सांगताहेत…’’ 
बाई बसतात. गुरुजी पाहतात. नीट बसतात मांडी घालून. हंसाबेन शेजारी. 
‘‘किती वेळा आलात, यापूर्वी ?"
"तीन-चार वेळेस आले होते! मुलाबद्दल विचारायचं होतं! तूप गर्दी, म्हणून बाहेरच्या बाहेर पण गेले एक-दोनदा!’’ 
माहीत असल्याप्रमाणे गुरुजी मान हलवतात. पाहत राहतात. मीही पाहतो, हळूच जवळ सरकून, आणि बसून, मला गुरुजींच्या डोळ्यात कोवळीक दिसते. मानवीय अशी, मघापासून दिसणारी अमानवी, दैवी चमक दिसत नाही. मला पहिल्यांदाच तिथं माणूस दिसतो. सामान्य असा. मला कुतूहल वाटतं. मी थोडं पुढे सरकतो. मला काही मानवीय नाट्याचा गंध येतो. इतर कोणी पाहत नाही. पाहू शकत नाही. इतर सगळे 'नंबरवाले' असतात, त्यांना 'ट्रांस' मधल्या गुरुजींची गरज आहे. भविष्य सांगणाऱ्या, तोडगा सांगणाऱ्या गुरुजींची. त्यांचे मंगळ सप्तमात आहेत. नाही तर शनी महाराजांची त्यांच्यावर दृष्टी आहे. हर्षलसारखा विक्षिप्त ग्रह त्यांच्या भाग्यात आहे. ते वाट पाहताहेत. ‘सांगितलं जाण्याची.’ मी मात्र मानवीय गुरुजींना पाहतो. एक अनामिक, कोवळं पान आठवणींना फुटताना मी पाहतो. 
‘‘अमुक गावात राहत होता, पूर्वी ?’’ 
‘‘हो हो गुरुजी ... अगदी बरोबर!" 
‘‘मंदिर होतं ? रामाचं!... एक पिंपळवृक्ष....’’ 
‘‘अगदी बरोबर!’’ एक मऊ, रेशमी, अदबशीर असं स्मित त्यांच्या ओठांवर. डोळ्यांतही, किती किती भूतकाळ चालून आला अंगावर. किती वर्षं झाली, किती वर्षं सरली. आणि आता इथं भेटतो आहोत. 
‘‘रामबागेचं म्हणत होता?’’ 
‘‘हो!’’ 
बाई जरा पुढे सरकतात. पण स्थिर, त्रयस्थपणे जपमाळ चालूच. मात्र कुतूहल त्यांनाही वाटतं. त्या प्रभावीतही होतात. 
‘‘जोशांचा वाडा म्हणायचे... फुलांचा बाजार भरायचा.’’ 
‘‘गुरुजी, अगदी बरोबर!... किती नेमकं सांगताय!’’ 
 

मी इतरांना पाहतो. सगळे एक तर ऐकतायत थक्क होऊन, किंवा आपापल्याच विवंचनेत मी इतरांना पाहतो. उदास, संथ गतीचा पाऊस उतरत राहतो. रात्र बरीच झालीय. पार्टिशनच्या जाळीदार पडद्याआड हलक्या आवाजात कुजबूज चालू. तिथे एक संबंधार्थ मानवीयच असं वादळ सुरू आहे. एकमेकांत गुंतणं आणि भयभीत होणं, गुंता सोडवण्याचा प्रयत्न करणं आणि पुन्हा त्या प्रयत्नांमुळे गुरफटणं. नैतिकतेचा ताण झेलणं. सुस्कारणं, दुसऱ्याच्या मुलीचे लग्न जमत नाही. तो इथं बसून आहे नुसता. तिसऱ्याला धंद्यात खोट बसलीय. तोही प्रभावीत आहे, इथे बसून. आणि इथं, वेगळंच असं नाट्य घडतं आहे. मलाच कळणारं, उमजणारं, माझ्याच साक्षीनं. गुरुजींच्या डोळ्यांत आता अगदी व्याकूळ कोवळीक. 
‘‘त्या वाड्यात एक कुसुम नावाची मुलगी रहायची!’’ त्या थरारतात. जपमाळ थरारते. थांबते एकदम, जणू पृथ्वीची गती स्थिरावली आहे. 
‘‘गु....गुरुजी’’ टक्कल पडलेला व्याकूळ होतो. अभिनिवेशाने बोलतो, सांगतो… 
‘‘पाहिलंत? किती ज्ञान ! सिद्धीचं...’’ 
हडकुळा हंसाबेनचा नवरा उदबत्ती लावून जातो. त्याचं तेवढंच काम. 
‘‘तिच्या वडिलांना तिच्या लग्नाची चिंता असायची! हं.... कोणत्या वडिलांना नसते?... त्यांना होती…’’ 
त्या आता जपमाळ थांबवून गुरुजींना निरखून पाहताहेत. मी त्या बाईंना निरखून पाहतो. मला त्यांच्या डोळ्यांतील खळबळ दिसतेय. आकाशीय स्मृतीची पानं त्यांच्या मनात फडफडताहेत. त्या काही आठवतात, काही विचार करतात. मी गुरुजींकडे पाहतो. ते मला व्याकूळ वाटतात. डोळे करुणार्द्र, मऊ, जणू ते गतस्मृतींकडे वळून पाहताहेत. दरम्यान किती काही घडून गेलं. ‘‘दोघी मैत्रिणी असायच्या! काय बरं तिचं नाव?’’ 
बाईंचे ओठ हालतात, पण त्या उच्चारत नाहीत. गुरुजी दूर पाहतात. दूर, क्षितिजापार. हंसाबेनच्या चेहऱ्यावर कौतुक आणि अभिमान. ती गुरुजींच्या अंगावरची शाल सारखी करते. 'नंबर नऊ' चुळबुळतो. त्याला घाई आहे. दुसऱ्याचं काय करायचं आहे? आपलं समजलं, बस झालं. माझ्या दुःखावर उपाय काय आहे ? काय करू? काळ्या वस्त्रात जवस बांधून जलाशयाजवळ फेकू? लाल फूल गणपतीला वाहू? पांढरा भात काळ्या कुत्र्याला खायला घालू? उपास करू? माझ्या मुलाशी माझे सूर जुळलेले नाहीत. त्याच्या आवडीनिवडी मला माहीत नाहीत. पण तो माझे ऐकेल, वेगळं राहायला जाणार नाही, सुनेच्या मुठीत राहणार नाही, यासाठी काय करू ? मुलीचं लग्न. राहू दे तिचं शिक्षण अर्धवट, तिला काय करायचंय, विचारायची गरज काय? तिचं लग्न. काय तोडगा ? बुधाची आंगठी घालू? कसं व्हायचं दुःखमुक्त? कोणी विशेष लक्ष देत नाही. कुणाला समजत नाही. बिलोरी काचा हळूच एकमेकांना स्पर्श करून जातात, तशा दोन नजरा एकमेकांना, हळुवार मोरपिसासारख्या स्पर्श करतात. काही जोखतात. पारखतात. बोलतात. मी पाहतो. पाहत राहतो. मला ते नाट्य मोठं हृद्य वाटतं. 
‘‘काही तरी बरंच नाव होत बघा... वृंदा !... हो ना?’’ 
बाईंचे ओठ हालतात. अनुमोदन द्यायचं त्या विसरतात. चूक, बरोबर असं सांगण्याची त्यांना आता गरज वाटत नाही. इतरांना ते सिद्धीचं प्रदर्शन वाटतं, ऐकणाऱ्यांना. हंसाबेनला. नंबर आठ आणि नऊला. तिकडे, मागे जगदीश मग्न राधाला समजवण्यात. त्यांचे ‘व्हिस्पर्स’ ऐकू येतायत. मधूनच. गुरुजींचा मऊ स्वर. हळूचार असा. ते सांगतात. सांगू लागतात. जणू काही काळजातलं निवेदन.

‘‘कुसुम आणि वृंदा! जिवाभावाच्या मैत्रिणी !... मिळून मंदिरात जायच्या !.. मिळून फुलं आणायच्या! जणू पाठच्या बहिणी!.. वारली ना ती?’’ 
बाईंचे ओठ घट्ट मिटलेले. मी पाहतो. त्या गुरुजीकडेच पाहताहेत. डोळ्यांत हलकंस पाणी. 
‘‘वारली ती!... तेव्हाच! आणि त्यांच्या समोरच, वाड्यातच तो रहायचा ना, सावळासा तरुण! अं?’’ 
‘‘पाहायचा त्यांच्याकडे ! मनातल्या मनात झुरायचा! कुढायचा!... गरीब होता ना तो!... एकदा...’’
‘‘गु.... गुरुजी! एकदा, एके रात्री, एका चांदण्या रात्री, वाड्याच्या गच्चीवर त्याने प्रेमनिवेदन केलं, कुसुमजवळ....’’
गुरुजींचा स्वर चांदण्यात भिजलेला आता. हळूवार. मऊ, नाजूक, जणू त्यांना ते सगळं दिसतंय. आश्चर्य आहे, नाही? ट्रांसमध्ये गेले की गुरुजी सगळे सांगतात! मी स्मित करतो. मला माहीत असतं, गुरुजी ट्रांसमध्ये नाहीत. ते स्मृतींना उजळवतायत. आणि वेगळंच, कोवळं, वयाच्या पलीकडे (खरं तर मागे) जाऊन अनोखं असं मानवीय नाट्य घडतंय, मी त्याचा साक्षीदार आहे. 
"नाही... तसं घडायचं नव्हतं! विधिलिखित वेगळंच होतं!’’ 
गुरुजी स्तब्ध. मीही स्तब्ध. क्षण मोठा नाजूक. मौनाचंच औषध आहे, त्या जखमेवर. आणि बाई बोलतात त्याच मऊ, मोरपंखी स्वरात. हरवून जाऊन.
‘‘कुसुमवर इतर जबाबदाऱ्या होत्या.... कुसुम मात्र अखेरपर्यंत विसरू शकली नाही ते निवेदन, ते संभाषण!... तिच्या मनात राहिलं ते ... नंतर तिचं लग्न झालं....! तिचं काही वाईट झालं नाही! चांगलंच झालं!... काळ्याचं पांढरं झालं !.... ती सुखी आहे आता!... पण त्या निवेदनाबद्दल आयुष्यभर ऋणी आहे..." 
गुरुजी मोठ्याने सुस्कारतात. हरवतात... दूर पाहतात. 
‘‘कुसुमच्या कुंडलीत इष्ट असे ग्रह आले नाहीत!..... नको ते ग्रह... नको त्या ग्रहांनी तिला आपलंसं केलं !... योग्य ग्रह जर आले असते तर जीवनाची कथा काही वेगळीच झाली असती.. जीवनाची कुंडली वेगळीच घडली असती... मोठी खंत आहे..." 
बाईंनी एव्हाना ओळखलेलं असतंच. पण त्या स्थिर आहेत. कदाचित त्यांची स्थिरता वाढलीय. पृथ्वीचं भ्रमण, जे थांबलं होतं, ते पुन्हा सुरू. माळ पुन्हा फिरू लागते. सगळे नियमित, स्थिर. बाई बोलतात. थोडं निश्चयानं. थोडं खबरदार करणाऱ्या स्वरात. थोडं धारदार. 
‘‘गुरुजी! कुसुमच्या कुंडलीत योग्यच ग्रह आले !... उभं जगणं ती सुखात जगली!... मुलं झाली! मोठमोठी मुलं आहेत तिला !.. हां, त्यांच्या नोकऱ्या कधी टिकतात, कधी टिकत नाहीत. चालायचंच!... अडचणी असतातच... पण कुसुमचं जगणं व्यर्थ नाही गेलं !... ती सुखी झाली !... ते आलेले ग्रह तिने आपले मानले !... तसं मानल्यानंतर मग समस्याच संपली!... गुरुजी .... त्या मुलाची कुंडली बघावी!... त्यातच इष्ट ग्रह आले नाहीत...’’ 

दीर्घ स्तब्धता. त्यानंतर प्रसवणाऱ्या अर्थाला साक्षीदार होऊन मी, भारावून, मौन आणि स्तब्ध. गप्प. म्हणजे असं म्हणायचं आहे तर. आपली माणसं आपली मानली पाहिजेत. म्हणजे दुःखमुक्तीवरचा उपाय तो असूही शकतो. इतरांना काय चाललंय कळत नाही. पण गुरुजी काही तरी सांगतायत इतकं नक्की. आणि सगळं खरंच असावं. ज्या अर्थी ते सांगताहेत. 

बाई उठून उभ्या राहतात. गुरुजींना ते अनपेक्षित आहे. ते जरा दचकतात. मला त्यांचं दचकणं जाणवतं. 
‘‘म्हणजे ?... जाणार?’’ 
‘‘आता, जाते गुरुजी!’’ 
हंसाबेनला काही समजलेलं नाही. ती विरोध करते. तुमची समस्या कुठे सांगितली असं म्हणते. मी मंद स्मित करतो. म्हणजे खरंच हिला काही कळले नाही, व्यथेचं फूल डोळ्यांसमोर उमललं आणि कोमेजू लागलं आहे. पण हिला पत्ता नाही. 
‘‘जाणार?’’ ('कुसुमला जावं लागेल ना?... ती कशी थांबू शकेल?... पण आता तिला जाऊ या!... त्या चांदण्या रात्रीच्या निवेदनाची याद निघाली आहे!... त्या आठवणीसाठी आता कुसुमला जाऊ द्या...') 
"पुन्हा येणार ना?" ('कुसुम आता नाही येणार!.... ती खूप मागे पडलीय! भूतकाळाच्या धुक्यात हरवलीय!'...) 
‘‘समस्या सुटायचीय ना मुलाची ...’’ 
‘‘त्यालाच घेऊन येते !..... येणार तर!... पुन्हा येईन! आता उशीर झाला पाऊस पण पडतोय!’’ 
(तुमची... कुसुमची कुंडली मांडली असती!') (....'कशाला? तुमचीच मांडून बघा!... ग्रह तुमच्या कुंडलीत आले नाहीत योग्य असे!... माझ्या नाही!... आपल्यांना मी आपलं करून घेतलं आहे!. आणि आता चर्चा कशाला? काळ्याचे पांढरे झाले !.. आता रंगीत स्वप्नं पडायची बंद झालीत !...) 
‘‘जाताय मग?’’ गुरुजींचा स्वर थोडा हताश. मी ऐकतो. कंसातसे शब्द अनुच्चारित. पण ते मी ऐकतो. प्राणांच्या कानांनी ऐकतो. त्यात मला चोरटेपणा वाटत नाही. विकृत कुतूहल वाटत नाही. उलट मी थरारतो. कंपित होतो. करुण वाटतं. मी आतून मनातून थोडा चिंब होतो. माळ अव्याहत फिरतेय हातात. आणि स्थिर निश्चिंतता पुन्हा प्रकर्षाने जाणवते. पण पावलं घुटमळतात. (कुसुम थोडी घुटमळतेय.) मग बाई जातात, निग्रहाने जातात. दार लावलं जातं, मागे पावसाचा आवाज येतो, संथ लयबद्ध. एक थंड शहारा, मघाचं चांदणं संपलेलं. मघाची कोवळीक समाप्त. हळूच, आठवणीला फुटलेलं पोपटी नाजूक पान काळवंडतं. कोणाला काही लक्षात येत नाही. ग्रह गरगरा फिरतात, कुंडलीच्या बारा घरांमधून, डोळे वटारतात. मंगळ तामस रंगाने चमकतो. शुक्र तारकेशच. तो घातक लोभस रंगाने लकाकतो. हंसाबेन ओरडते. 
‘‘नंबर नऊ...नंबर नऊऽ....’’ 
मी वळून पाहतो. जगदीश स्तब्ध. राधा डोळे पुसतेय. धंद्यात खोट आलेला माणूस सचिंत, टक्कल पडलेला सचिंत. मुलीचे लग्न न होणारा माणूस सचिंत, मुलाशी न पटणारा ऑफिसर सचिंत. रात्र या साऱ्यांमधून सरकून पुढे वाहिलेली. ओली, पावसाची. रात्र आता बरीच झाली आहे. गुरुजी झोपू पाहताहेत. त्यांनी झोपू नये, आपल्याकडे पाहावं असं इतरांना वाटतं. गुरुजींना 'ट्रान्स' येतोय. उदबत्तीचा घमघमाट आहे. पाऊस उतरतोय, दुःखी सतारीसारखा, अव्याहत. अपरिहार्य, सतत, संतत. सृष्टी रचणाऱ्याला सलाम, (तो असेल तर!) जीवन वाहवणाऱ्याला सलाम. आशा, आकांक्षेला, त्यांच्या अस्तित्वाला, अस्तित्वाच्या गरजेलाही सलाम. 

कुणाचं काय, तर कुणाचं काय आहे. ज्या कोणी प्रतिभावंताने माणसाचे जीवन बारा खात्यांत बसवलं, त्यालाही नमस्कार. पण अटी आहेत काही. काही साधे मुद्दे आहेत. मुद्दा असा आहे की आपल्यांना आपलं करावं. भोवती माणसंच असतात. आपल्या कुंडलीत माणसंच असतात. त्यांचे इष्ट परिणाम होऊ शकतात, आपण त्यांच्या कुंडलीत बांगला ग्रह बनून गेलं पाहिजे. तेही-येतात चांगले ग्रह बनून. सहाव्या स्थानी नोकर, आणि सातव्या स्थानी बायको, असंच असतं. म्हणजे माणसंच. आपण इतरांशी कसं वागतो हे टक्कल पडलेल्याला माहीत नाही. ढेरपोट्याला माहीत नाही. मुलींची 'हॉबी' माहीत नाही. मुलाची आवड माहीत नाही. जगदीशची बायको चांगली आहे. पण तो राधाकडे झेपावतो. राधा त्याच्याकडे. दोघं एकमेकांभोवती फिरताहेत. (ग्रहांप्रमाणे, कुंडलीतल्या!) आणि हंसाबेन 'बिनकामाचा नवरा' असल्याचे सांगून सूचक निमंत्रण देते, सेवा करते. सुरक्षितता मिळवते. पण तिची आणि राधाची तृष्णा संपत नाही. आणि गुरुजी इतरांची कुंडली पाहतात. त्यांच्या कुंडलीत मित्र नाहीत. इष्ट ग्रह नाहीत. ते करुण होऊन गेले आहेत. मला सावळ्या रंगाची, जरा लठ्ठ होऊ लागलेली बायको आठवते. ती बिचारी माझ्याकडे प्रेमाने पाहते. त्याचं कारण काही नसतं. मी सभ्य गृहस्थ असल्यामुळे एरवी कबूल करीत नाही, पण मीही तिच्यावर प्रेम करतो. माझे मुलांवर प्रेम आहे. जीवनावर आहे. मित्रांवर आहे. मी माझ्या कुंडलीत त्यांना आणलंय. आणि मीही गेलोय इष्ट ग्रह बनून त्यांच्या कुंडलीत. मला माझी कुंडली मांडावीशी वाटत नाही. तसं समस्या आहेतच, नाही असे नाही. उदाहरणार्थ, पगार पुरत नाही, इत्यादी... किंवा स्कूटर नादुरुस्त असते, इत्यादी...
मी पाहतो बाहेर. पाऊस पडतो. वीज चमकते. रात्र सरकते. 'नऊ नंबर' पुढे पुढे सरकतो. जगदीश माझ्याजवळ येऊन बसलेला आता. राधा तिथंच, पार्टिशनच्या पडद्यामागे, पापण्यातल्या बाष्पासह, तिलाही विचारायचं आहे. जगदीशलाही. हंसाबेनचा नवरा उदबत्ती लावून जातो. पुन्हा पुन्हा. सुगंधाचा भपकारा. पुन्हा कार्तिकेयाची तसबीर प्रकाशमान. पुन्हा निळ्या हातांची देवी तेजस्वी होते. सर्वांच्या आशा पुन्हा पल्लवीत होतात. ग्रह त्यांच्या कुंडलीत गरगरा फिरतात. नशिबाला जाग तरी येते किंवा निद्रा तरी त्यांच्या त्यांच्यापुरती. अस्वस्थ हंसाबेन. ती पाहतेय माझ्याकडे. मी (लठ्ठ होऊ पाहणाऱ्या सावळ्या रंगाच्या पत्नीला स्मरून) तिच्या डोळ्यांत पाहून हसतो, सभ्य असूनही. गुरुजींना जाग येतेय. ते 'ट्रांस’मध्ये जातायत. ती न राहवून विचारते मला, 
‘‘तुम्हांला करायचीय कुंडली?’’ 
‘‘नाही!’’ 
मी एकदम मोठ्याने, खूप मोठ्याने म्हणून जातो. सगळे माझ्याकडे आश्चर्यानं पाहताहेत. मी त्यांच्याकडे, बाहेरच्या पावसाच्या रात्रीकडे पाहतो. सगळ्या पार्थिव अपार्थिवातून कालप्रवाह प्रवाहित होत राहतो. मला जाणवतो. चमत्कारिक नजरांचं मला काहीच वाटत नाही. माझ्या घोषणेमुळे मनावरचं नकळत आलेलं ओझं उतरतं. विस्तारलेली रात्र पावसात भिजत राहते. मी पाहत राहतो. सगळ्यांकडे, सगळीकडे, स्वतःकडे.

Tags: भावनांचा कल्लोळ कुसुम हंसाबेन जगदीश गुरुजी अव्यक्त प्रेमकथा भारत सासणे पावसाची रात्र flurry of emotions गूढकथा kusum hansaben jagdish guruji enexpressed love story bharat sasane night of rain mystery weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे,  पुणे
bjsasane@yahoo.co.in

मागील चार दशके भारत सासणे हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक मानले जात असून, त्यात कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, अनुवाद इत्यादी प्रकारचे लेखन आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके