Diwali_4 आपण आता ‘भ्रमयुगात’ प्रवेश केला आहे!
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

आपण आता ‘भ्रमयुगात’ प्रवेश केला आहे!

मी मराठीतला लेखक आहे किंवा माजी जिल्हाधिकारी आहे वगैरे परिचय मी दिला नव्हता. ज्ञानापुढे नम्र होण्याचा माझा प्रयत्न राहिला. माझी गती पाहून माझ्या गुरुजींनी मला ‘इंदिरा गांधी ओपन निव्हर्सिटी’च्या उर्दू भाषेच्या दोन परीक्षा द्यायला लावल्या. मी त्या उत्तीर्ण झालो. आता मी उर्दू भाषेचा ‘डिप्लोमा होल्डर’ आहे. त्याच सुमाराला गुरुजींनी मला हे नाटक वाचायला दिलं होतं. ते वाचायचे राहून गेले होते. ‘कोरोना’काळात हे नाटक हाती लागलं. पुन्हा आता आत्मविश्वासही होता, म्हणून हे नाटक वाचलं. सन एकोणीसशे चौसष्टमध्ये लिहिलेलं नाटक सन दोन हजार वीसमध्येसुद्धा अगदी प्रस्तुत आहे, लागू पडतं आहे, हे पाहून मी चकित होत राहिलो. भोवती आज जे घडतं आहे, त्याबद्दलची चर्चा साठ वर्षांपूर्वीच्या नाटकात केली तर आहेच; पण दिशादर्शन पण केलंय, तोडगाही सांगितलाय, हे पाहून मी आणखीनच चकित झालो. या नाटकाचा मराठी अनुवाद केला पाहिजे, असे मला वाटू लागले. मग अल्पावधीत थेट उर्दूतून मराठीत हा अनुवाद उतरून आला.

: 1 :

सन एकोणीसशे तीसच्या आधीपासूनच उर्दू साहित्यविश्वामध्ये ‘तरक्की पसंद तहरीक’ची सुरुवात झाली. पुरोगामी विचारांचे लेखक या चळवळीशी जोडले गेल्याचे दिसून येते. उर्दूतले पहिल्या फळीचे, महत्त्वाचे आणि मौलिक लिखाण करणारे लेखक या चळवळीचा हिस्सा होते. मुन्शी प्रेमचंद हे यातले एक उदाहरण. याच मालिकेतले महत्त्वाचे नाव कृष्ण चंदर यांचे आहे. के. ए. अब्बास यांनी त्यांच्या चिंतनात हा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहेच. पीडित, शोषित आणि वंचित अशा तळागाळातल्या उपेक्षित माणसाचा क्षीण आवाज समाजात बुलंद करणे ही या चळवळीची भूमिका. मंटो, राजेंद्रसिंह बेदी, इस्मत चुगताई आदी नावेसुद्धा याच चळवळीशी जोडलेली. कृष्ण चंदरचे हे नाटक ‘कौमी एकते’च्या चळवळीचा एक भाग म्हणून लिहिले आणि सादर केले गेले. नाट्यलेखनाचा हेतू ‘सामाजिक - राष्ट्रीय एकते’चा प्रचार करणे हा असला, तरी मानवी मूल्यांबाबतचे भाष्य महत्त्वाचे. ‘दरवाजे खोल दो’ हे नाटक सन एकोणीसशे चौसष्टमध्ये लिहिले गेले. याच सुमारास या नाटकाचे प्रयोग मंचावर सादर झाले आणि ‘नभोनाट्या’च्या स्वरूपातदेखील सादर होत राहिले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘कौमी एकते’ची चळवळ घोषित केली होती. कृष्ण चंदर या चळवळीत नाट्यलेखन माध्यमातून सक्रिय झाले. त्या निमित्ताने आणि त्या अनुषंगाने, काळाच्या पुढे पाहणारे, द्रष्टे असे एक नाटक आपल्याला उपलब्ध झाले.

: 2 :

ज्या काळात कलाकृती लिहिली जाते, त्या काळाबद्दल बोलत असतानाच ती कलाकृती येणाऱ्या काळाबद्दलही सूचन करीत असेल, तर ती कालजयी मानली जाते. कालजयी कृतीत दोष नसतात असे नाही; पण जो कथित संदेश आणि सूचन यांचे वहन ही कलाकृती करते, त्या संदेशामुळे ती कृती श्रेष्ठदेखील मानावी लागते. व्यापक असा करुणाभाव, मनुष्यजातीच्या अस्तित्वाबद्दलची आस्था व एकतेची वाटणारी निकड यामुळे ‘दरवाजे खोल दो’ हे ‘प्रचारकी नाटक’सुद्धा श्रेष्ठ आणि कालजयी होऊन जाते.

स्वातंत्र्य नुकतेच मिळाले होते. ‘कौमी एकते’ची- राष्ट्रीय एकात्मतेची हाक देण्यात आली होती. समाजातल्या प्रस्थापितांचे प्रातिनिधिक विचार विषाक्त पद्धतीने प्रसृत होत होते. अशा परिस्थितीत, लेखकाची जबाबदारी म्हणून हे नाटक लिहिले गेले. सामाजिक प्रश्नांना कलाकृतीने अंतिम असे उत्तर द्यायचे नसते, याचे भान असतानासुद्धा कृष्ण चंदर यांनी या नाटकातून संदेश आणि ‘सोल्युशन’ दिलेले आहे. उत्तर देण्याचे टाळण्यापेक्षा उत्तर सुचवून ‘अडकणे’ जास्त योग्य. कृष्ण चंदर यांनी हा धोका पत्करला आहे.

: 3 :

मी उर्दू शिकायला सुरुवात केली, तेव्हा माझे शिक्षक श्री. अतिक शेख यांच्या वर्गात मी जाऊन बसत असे. वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या वयोगटांतले स्त्री-पुरुष तिथे एकत्रितपणे उर्दू शिकायला येत. काही पत्रकार, काही गायक आणि परफॉर्मिंग आर्टशी संबंधित व्यक्ती तिथे आलेल्या असत. कोणाला उच्चार सुधारून घ्यायचे होते, कोणाला शायरीत रस होता, तर अनेकांना केवळ कुतूहल होतं. माझा उद्देश वेगळा होता. ऐकून आणि थोडं बोलून मला थोडं उर्दू येत होतं, पण मला व्यासंग वाढवायचा होता. उर्दू लिपी वाचता येऊन त्या लिपीमधूनच थेट उर्दू साहित्याचं वाचन करावं, उर्दू लिपी लिहिता यावी आणि या समृद्ध भाषेचा थेट परिचय व्हावा, असा माझा उद्देश होता. मी तिथे ‘अलीफ-बे-पे...’ गिरवायला लागलो. मी मराठीतला लेखक आहे किंवा माजी जिल्हाधिकारी आहे वगैरे परिचय मी दिला नव्हता. ज्ञानापुढे नम्र होण्याचा माझा प्रयत्न राहिला.

माझी गती पाहून माझ्या गुरुजींनी मला ‘इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी’च्या उर्दू भाषेच्या दोन परीक्षा द्यायला लावल्या. मी त्या उत्तीर्ण झालो. आता मी उर्दू भाषेचा ‘डिप्लोमा होल्डर’ आहे. त्याच सुमाराला गुरुजींनी मला हे नाटक वाचायला दिलं होतं. ते वाचायचं राहून गेलं होतं. ‘कोरोना’काळात हे नाटक हाती लागलं. पुन्हा आता आत्मविश्वासही होता, म्हणून हे नाटक वाचलं. सन एकोणीसशे चौसष्टमध्ये लिहिलेलं नाटक सन दोन हजार वीसमध्येसुद्धा अगदी प्रस्तुत आहे, लागू पडतं आहे, हे पाहून मी चकित होत राहिलो. भोवती आज जे घडतं आहे, त्याबद्दलची चर्चा साठ वर्षांपूर्वीच्या नाटकात केली तर आहेच; पण दिशादर्शन पण केलंय, तोडगाही सांगितलाय, हे पाहून मी आणखीनच चकित झालो. या नाटकाचा मराठी अनुवाद केला पाहिजे, असं मला वाटू लागले. मग अल्पावधीत थेट उर्दूतून मराठीत हा अनुवाद उतरून आला. जी दोन चिंतनं या नाटकाच्या अखेरीस जोडलेली आहेत, त्यांचाही अनुवाद मी केला. आपल्या सगळ्यांसाठी ही सगळी सामग्री आज प्रस्तुत, उपयुक्त, महत्त्वाची व दखलपात्र अशी आहे.

: 4 :

‘कौमी एकता’ हा नंतर केवळ सरकारी कार्यक्रम होऊन गेला, तरी एकोणीसशे बासष्टच्या सुमारास ती हार्दिक अशी एक हाक होती. विशिष्टांची प्रातिनिधिक मानसिकता काय आहे, रुग्णावस्था काय आहे; हे नेमकं सांगून त्यावरचा इलाज काय आहे, हे पण सांगण्याची गरज होती. कृष्ण चंदर यांनी ढोबळ प्रतीकांमधून ही समस्या सोप्या पद्धतीने मांडली. आजसुद्धा ‘सबका साथ- सबका विकास- सबका विश्वास’ ही अधिकृत घोषणा होते, तेव्हा ‘सब’ म्हणजे कोण, हा प्रश्न उपस्थित होतोच. म्हणजे ‘आम्ही’ तर आहोतच, पण ‘तुम्ही’ही आहात- असा अर्थ सूचित करायचा असतो. त्यातून द्वंद्व अधोरेखित होतं. ‘तुम्ही’ म्हणून जे कोणी आहेत, ते ‘आपल्यातच’ समाविष्ट आहेत, हे नाटकातून सांगितलंय. या देशाचा सर्वांनी एकत्रितपणे विकास करायचा आहे, हे साठ वर्षांपूर्वी लिहिलेल्या नाटकात नेमकेपणाने नोंदवलं आहे, हे विशेष.

नाटकाचं कथानक इथे सांगण्याचं प्रयोजन नाही, कारण आतापर्यंत तुम्ही नाटक वाचलेलं आहे. ‘कमलकुंज’ हे प्रतीक आहे. ही नवी इमारत म्हणजे हा नवा, स्वतंत्र झालेला देश आहे. (कमलकुंज हे नाव कसं सुचलं असावं?) पंडित रामदयाळ स्वत:ला या इमारतीचा मालक समजतो आहे; त्यामुळे ‘इतरांनी’ इथे राहू नये, ही त्याची भूमिका. ही इमारत (देश) उभी करण्यात सर्वांचे योगदान आहे, सर्वांचे हात लागले आहेत. त्यामुळे सर्वांनी इथे राहावे, मनाचे दरवाजे आणि मेंदूच्या खिडक्या उघडाव्यात- अशा ‘टोन’वर नाटक संपतं. आज हे ‘सोल्युशन’ सोपं, प्राथमिक आणि बाळबोध वाटण्याची शक्यता आहे. कारण आज सन दोन हजार वीसमध्ये जगणं गुंतागुंतीचं झालं आहे आणि समस्या जटिल झाल्या आहेत. पण जटिल समस्येचं उत्तर सोपंही असू शकतं.

नाटक लिहिलं त्या वेळच्या समस्या वेगळ्या होत्या. पाकिस्तान नुकताच अस्तित्वात आला होता. जखम ताजी होती. आता पुन्हा विभाजनवाद कोणाला नकोच असणार. पण नाटकात हरिजनाच्या तोंडचे संवाद सावध करतात. (हरिजन हा शब्द आता बाद झाला आहे.) अपमान झाल्यानंतर आपण ‘वेगळी, स्वतंत्र आणि जास्त उंच’ इमारत बांधणार आहोत, असा इशारा हा धार्मिक आणि सात्त्विक प्रवृत्तीचा हरिजन व्यक्त करतो. नंतरच्या कालौघात आपण ‘खलिस्तान’ची चळवळ पाहिलीच.

मिर्झाचा मित्र घर भाड्याने घेण्यासाठी येतो, पण त्याची लखनौची उर्दू भाषा पाहून त्याला खाण्या-पिण्याच्या अनेक अटी घालून पंडित रामदयाळ त्याला जवळजवळ नाकारतोच. पण या मित्राने स्वत:च घर नाकारलेलं आहे.  इतक्या अटी असतील, तर मलाच इथे राहायचं नाही आणि तुमच्या दांभिकतेवर ‘हिप्पोक्रसी’बद्दल बोललंही पाहिजे- असं तो ठणकावतो. आज परिस्थिती अशी आहे की, कोणत्याच विषयाबाबत सार्वत्रिक टीका-टिपणी करण्यात येत नाही. एक सार्वत्रिक मौन आणि स्वार्थी प्रशंसा भरून राहिला आहे. ढोंगबाजीवर प्रहार केला पाहिजे, हा इशारा आपल्याला सावध करतो, सजग करतो. विधायक टीकेची गरज हा नाटककार त्याच वेळेस अधोरेखित करतो आहे.

नाटकाची सुरुवात मुसलमानांना घर नाकारण्यापासून होते. पण नंतर हळूहळू ‘बहुजन इतरेजनां’बाबतचीसुद्धा ‘हेट स्टोरी’ व्यक्त व्हायला लागते. त्याची कारणं वरवरची असतात. ‘तुम्ही हिंदू आहात ना? असाल तर स्वागत. पण मांस खाता का, कांदा-लसूण खाता का, कपडे कोणते वापरता, भाषा कोणती आहे तुमची?...’ नंतर सुरू होते नकार-मालिका. पंडित रामदयाळ मालक आहे. तो ठरवील त्यांनीच इथे राहायचं आहे. (मी मालक आहे इथला, समजलंऽ?... प्रोप्रायटर!) पण पंजाबी सुतार त्याला कामगार म्हणून चालतो. मल्याळी मजूर, मद्रासी रंगारी त्याला पसंत आहे. पण त्यांनी प्रॉपर्टीत स्थान मागू नये, हक्क मागू नये, राहण्याची मुभा मागू नये. श्रमाचं शोषण चालतं, ‘क्लेम’ चालत नाही. मूळ कारण ‘हेट’ हे आहे. विद्वेष आणि तिरस्कार हे आहे.

नाटकाची लेखनव्यवस्था म्हणून काही सामग्री हेतुत: गोळा करण्यात आली आहे. ‘कमलकुंज’ ही नवी इमारत (नवा देश!) बनवण्यासाठी इथे बहुभाषी, वेगवेगळ्या प्रदेशांत राहणारे कामगार-तंत्रज्ञ एकत्र आले आहेत. याचा अर्थ असा की, हा देश सर्वांनी सर्ववंशीयांनी, सर्व जातींनी आणि सर्वधर्मीयांनी घडवला. राज्यकर्त्यांना साहाय्यक मुनीमही पाहिजेच असतात. इमारतीचा- कमलकुंजचा मुनीम मिर्झा हा मुसलमान आहे. हा वीस वर्षांपासून काम करतो, पण याला अधिकार नाहीत. हा मुसलमानास घर भाड्याने देण्यासाठी शब्द टाकू शकत नाही. त्याचं ‘फ्रस्ट्रेशन’ नाटकात व्यक्त झालं आहे. म्हणजेच राज्यकर्त्यांना मुसलमान मुनीम चालतो, फक्त त्याने त्याची मर्यादा पाळावी. (दोघेही वेगवेगळ्या डब्यातून पान खातात!)

नाटककाराला ‘कमलकांत’कडून- नव्या पिढीकडून खूप अपेक्षा आहेत, आशा आहेत. ही पिढी आधुनिक विचारांची आहे. ही नव्या युगातली तरुण मंडळी पारंपरिक जळमटं नाकारतील आणि ‘लिहिली जात असलेली विद्वेषाची कथा’ मिटवतील, खोडून टाकतील- अशी अपेक्षा नाटककार व्यक्त करतो. (हा चाव्यांचा गुच्छ तुला द्यायला मी परत आलोऽ!) सूत्रं आता नव्या पिढीकडे जावीत, हे सूचन नाटकात आहे. पुढच्या पिढीने सूत्रं स्वीकारली असतील; पण ‘मनाचे दरवाजे आणि मेंदूतल्या खिडक्या’ उघडल्या का, हा प्रश्न आहे.

नाटककार प्रतीकांशी खेळतो. ही प्रतीकं गूढ अशी नाहीत, पण ‘दरवाजा, खिडकी आणि स्टूल’ हे फर्निचर म्हणून विकत घेण्याच्या अटीवर वाचक म्हणून मी अडखळलो. या फर्निचरची किंमत चार हजार का आहे, याचं स्पष्टीकरण देताना पहिला मुसलमान ग्राहक ‘या दरवाजांना मनुष्याची कातडी लावली आहे’ असं उपहासानं म्हणतो; तेव्हा मी खूश झालो. माझ्यासारख्या लेखकाला हे प्रतीक सापडलं असतं तर या प्रतीकाशी किती खेळता आलं असतं आणि लेखनीला किती फांद्या फुटल्या असत्या! कृष्ण चंदर यांनी मात्र ही संभाव्य ‘फँटसी’ पुढे नेली नाही. मात्र उपहास, व्यंग याचा पुरेपूर वापर होत राहिला आहे. सर्वच पात्रांनी नाटकाच्या शेवटी हळूहळू एकत्र होणे आणि आनंदी संगीताच्या तालावर नाटक संपणे, ही त्या वेळची आधुनिक पद्धत असणार. नाटकात हा आशावाद आवश्यकच होता. भारतीय माणसाचं ‘वैचारिक परिवर्तन’ जवळजवळ अशक्य असतं. अध्यात्म मात्र परिवर्तन आणू शकते. म्हणून पंडित रामदयाळला मरावं लागलं आहे आणि मरून परत यावं लागलं आहे. दरम्यान, त्याला इमारतीचा (देशाचा!) आत्मा भेटला आहे. या ‘फँटसी’चा वापर केल्यानंतरच अपेक्षित असा तोडगा सांगितला जातो. सर्वांना बोलवा, सर्वांसाठी दारं सताड उघडा, सर्वांचा हक्क-योगदान मान्य करा... ‘दरवाजे खोल दोऽ’- हा तो तोडगा.

: 5 :

‘काळ तर मोठा कठीण आला’ असं काळाच्या प्रत्येक टप्प्यावर लेखकाने म्हटलं आहे. ‘काळ’ ही संकल्पना भव्य अशीच आहे. आपल्या परंपरेत या संकल्पनेचा मनोज्ञ वापर करण्यात आला आहे. भर्तृहरी म्हणतो की, दिवस आणि रात्रीच्या एका आड असलेल्या काळ्या-पांढऱ्या सारीपाटावर स्त्री-पुरुषांच्या सोंगट्या भिरकावून काळ स्वत:च खेळ मांडतो आहे आणि स्वत:च खेळ पाहतो आहे.

‘काळा’ने बोटाला धरून आपल्याला वेगवेगळ्या युगांतून प्रवास घडवला. यंत्रयुग, मग अणुयुग, मग अवकाशयुग, आधुनिक तंत्रयुग- असा प्रवास करीत आपण आता ‘भ्रमयुगात’ प्रवेश केला आहे. आपण भ्रमित होतो आहोत आणि बधिरदेखील होतो आहोत. भोवताली विद्वेषाची कथा- ‘हेट स्टोरी’- लिहिली जातेय. या कथेचा अन्वयार्थ लावणं अवघड झालं आहे. आपल्याला सगळ्यांचा विश्वास पण पाहिजे आहे आणि धु्रवीकरण पण पाहिजे आहे. नाव विचारून मगच भाजी आणि फळं विकत घेणं, मुसलमान गाडीवाल्याला ‘आपल्या क्षेत्रातून’ हाकलून देणं, मारहाण करणं, नफरत पसरविणं, ‘नो एंट्री’च्या पाट्या लावणं- हे सगळं घडत असताना सर्वत्र प्रगाढ असं ‘चतुर मौन’ पसरलेलं आहे आणि आपल्याला  ‘सबका विकास’ पाहिजे आहे. दलित-बहुजनांच्या मनात संशय निर्माण झाला आहे आणि आपल्याला ‘सबका साथ’ पाहिजे आहे. प्रमुख प्रवाहाचा ‘रुग्ण अहंकार’ वाढतो आहे. हे सगळं भ्रमयुगात घडणं शक्य आहे, तसंच घडतं आहे. हे आपल्याला कुठे घेऊन जाणार? पंडित रामदयाळच्या आत्म्याला ‘देशाचा आत्मा’ भेटतो आणि सांगतो की- हा रस्ता कुठेच घेऊन जात नसतो. ज्या घराचे दरवाजे आणि खिडक्या सताड उघड्या आहेत, त्याच घराचे मालक सद्‌गती प्राप्त करतात. ‘दरवाजे खोल दो-’ या साठ वर्षांपूर्वीच्या उर्दू नाटकाचं स्मरण आपल्याला या ‘भ्रमयुगात’ करावं लागतं. आपल्या समस्यांची त्यात चर्चा आहे आणि सोल्युशन पण नोंदवलं आहे. हे सोल्युशन बाळबोध वाटलं तरी तारक आहे. दुसरा कोणताच मार्ग नाही. आपल्या चिंतनात कृष्ण चंदर यांनी हेच म्हटलंय, ‘दूसरा कोई रास्ता नहीं...’

लेखकाच्या कर्तव्याचा भाग म्हणून या उर्दू नाटकाचा मी मराठीतून अनुवाद केला आणि आपल्यासमोर प्रस्तुत केला आहे. अशीच नाटकं, असेच स्वच्छ विचार आपल्याला तारणार आहेत, यापुढे!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे
bjsasane@yahoo.co.in

मराठी कथाकार


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात