डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पोलिसकाका त्यानंतर कोपऱ्यातल्या खुर्चीत जाऊन बसले आणि कुजबुजत्या स्वरात सुरू झाली चर्चा. मघाची प्रत्येक हालचाल समशेरने ‘लाइव्ह कॉमेंट्री’प्रमाणे उच्चारून दाखवली होती. त्यामुळे जे दिसलं, ते सर्वांनाच समजलं होतं. पण चावी त्यांनी कोणाला सुस्पष्टपणे दिल्याचं दिसत नव्हतं. या तिघांपैकीच कोणाकडे तरी चावी हस्तांतरित केली असेल, तर ती सापडायला पाहिजे होती. आणि मुख्य मुद्दा असा की, त्यांनी ही चावी दिली तरी केव्हा आणि कशी?

1/ तातडीचं बोलावणं!

सुनंदाताईला फोन आला आणि ती उडालीच. फोन समशेरचा होता आणि फोनवर त्याने घाईघाईने सांकेतिक भाषेत तिला संदेश दिला होता. संदेश होता की,सुनंदाताईने आपल्या नेहमीच्या मित्रमंडळींना घेऊन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तातडीने पोहोचावं. सुनंदाताई चक्रावलीच. काही महत्त्वाचं काम असल्याशिवाय समशेर कुलुपघरे ऊर्फ शेरलॉक होम्स्‌ असा निरोप देणार नाही याची खात्री असल्यामुळे सुनंदाताईने आपली स्कूटर वाऱ्यासारखी दामटली आणि तिने पहिल्यांदा हरीला गाठलं आणि नंतर सर्वांना निरोप देऊन व पुढे घालून तिने सगळी टीम ‘हॉटेल ब्लू फॉक्स’वर नेऊन पोहोचती केली.या वेळेस काय प्रकरण आहे याची तिलाही मोठी उत्सुकता लागली होती. गंपू आणि हरी सुनंदाताईला सारखे विचारत राहिले की, आपण इथं या हॉटेलमध्ये कशासाठी आलेलो आहोत? सुनंदाताईला तरी कुठे माहीत होतं!

2/ ‘शेरलॉक होम्स्‌’ सर्वांना सांगतो!

हॉटेलच्या बाहेर पोलिसांचा पहारा होता. गंभीर वातावरण होतं. पण स्वतः सबइन्स्पेक्टर नंदकुमार कडक युनिफॉर्ममध्ये हॉटेलच्या फाटकाजवळ उभा होता आणि त्याने सर्व मुलांना पट्‌कन आत जाण्याच्या सूचना दिल्या. आता, सबइन्स्पेक्टर नंदकुमारची म्हणजे आपल्या ‘नंदूभय्या’ची मी वेगळी ओळख तुम्हाला करून देणार नाही. कारण यापूर्वीच्या समशेरच्या बुद्धिचातुर्यसाहस कथांमधून हा नंदकुमार आपल्याला भेटला आहे. तर गंपू,लीला, पिंकी, हरी आणि भीमू ‘शक्तिमान’ या सर्वांना घेऊन सुनंदाताई घाईघाईने रूम नंबर 303 मध्ये जाऊन पोहोचली. तिथे तुमच्याच वयाचा आणि तुमचा मित्र समशेर कुलुपघरे ऊर्फ ‘शेरलॉक होम्स्‌’ एका सोफ्यावर बसून समोरच्या ‘लॅपटॉप’कडे एकाग्रपणे पाहत होता.त्याच्या शेजारी गोट्या बसला होता आणि वातावरण गंभीर व चिंतेचं होतं. सुनंदाताईने विचारलं, ‘‘काय झालं शेरलॉक? आम्हाला इथे कशाला बोलावलंय?’’

तेवढ्यात सबइन्स्पेक्टर नंदकुमार आत आला. त्याच्याबरोबर गणवेषात एक पोलिस कॉन्स्टेबलसुद्धा होता. नंदूभय्या आल्याचं पाहून समशेरने आपल्या टीमला थोडक्यात माहिती दिली. त्याच्या म्हणण्याचा सारांश असा-

या वेळचं हे प्रकरण देशाच्या सुरक्षेसंबंधी असून गंभीर असं आहे. त्यामुळे समशेर आणि त्याची मित्रमंडळी यांना हस्तक्षेप करण्याची परवानगी नाहीच. पण गोट्याचे वडील या हॉटेलमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने थांबलेले आहेत,म्हणून गोट्याच्या विनंतीवरून आणि नंदूभय्याच्या संमतीने समशेर व मित्रमंडळी इथे येऊन पोहोचलीत.प्रकरण असं आहे की, लष्कराच्या संशोधनासाठी काम करणाऱ्या एका कंपनीतील शास्त्रज्ञ टी. चंद्रशेखर यांनी काही गोपनीय माहिती कोठे तरी दडवून ठेवली असून ती माहिती त्यांनी ‘नको त्या लोकांच्या हाती’ सुपूर्त करण्याचं‘वाईट काम’ केलं आहे; म्हणजेच त्यांनी गद्दारी केली आहे. ही माहिती समजल्यानंतर लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी हॉटेलमध्ये बंदोबस्त ठेवला असून कोणालाच बाहेर जायची परवानगी नाही. टी. चंद्रशेखर यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना भेटायला सकाळपासून किती तरी संशोधक, कारखानदार, विचारवंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आलेल्या आहेत. आज दुपारी शास्त्रीय विषयावरचा एक परिसंवादच हॉटेलमध्ये झाला.पोलिसांना असा संशय आहे की, टी. चंद्रशेखर यांनी त्यांना भेटायला आलेल्या कोणाजवळ तरी कुठल्या तरी लॉकरची छोटीशी चावी बेमालूमपणे हस्तांतरित केली असावी. ही चावी बाहेर जाता कामा नये, कारण त्या कुठल्याशा लॉकरमध्ये ठेवलेली गुप्त माहिती शत्रूच्या हाती लागू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची झडती घेण्याचे काम चालू असून अजून चावी सापडली नाही. टी. चंद्रशेखर यांची सगळी हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर नोंदवली आहे. टी. चंद्रशेखर यांनी गद्दारी करून ही चावी कोणाला दिली आणि ती चावी कुठे असेल, हे शोधून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

समशेरने हे सगळं थोडक्यात सांगितल्यानंतर नंदकुमार म्हणाला, ‘‘प्रकरण राष्ट्रीय सुरक्षिततेशी संबंधित आहे!... म्हणून प्रकरण सीरियस आहे!...तुम्हाला या खोलीच्या बाहेरसुद्धा जाता येणार नाही!...मात्र लॅपटॉपवर टी. चंद्रशेखर यांच्या सगळ्या हालचाली आणि सर्वांच्या झडतीचे पंचनामे पाहायला मिळतील...मी इतकीच मदत करू शकतो... या वेळेस शेरलॉक, तुला आणि तुझ्या मित्रमंडळींना या खोलीत बसूनच हे कोडं सोडवायचं आहे... आहे कबूल?’’

‘‘ठीक आहे नंदूभय्या... कबूल! आम्ही या खोलीत बसूनच काय मदत करता येते ते पाहतो...’’

शेरलॉकच्या या वक्तव्यावर सबइन्स्पेक्टर  नंदकुमार थोडंसं हसला. नंतर मात्र लगेचच गंभीर झाला आणि म्हणाला, ‘‘टी. चंद्रशेखर यांच्याजवळ कुणी गेलेलं नाही... पण परिसंवाद संपल्यानंतर आणि दुपारच्या भोजनानंतर टी. चंद्रशेखर शतपावली करीत राहिले... त्या वेळेस मात्र त्यांना काही जण भेटून गेले...असे एकूण तिघे आहेत... एस्‌. मोहन, बालसुब्रमण्यम्‌ आणि अक्षयकुमार!... या सर्वांनी टी. चंद्रशेखर यांच्याबरोबर हस्तांदोलन केलं आहे... ती छोटीशी किल्ली हस्तांदोलन करताना देऊन टाकणं सहज शक्य आहे... त्यामुळे या तिघांची आम्ही झडती घेतली...मात्र चावी सापडली नाही... तुम्हाला काही ‘क्ल्यू’सापडतो का बघा... मात्र वेळ फक्त चाळीस मिनिटे!...बघा, हे आव्हान पेलता येतं का?’’

चाळीस मिनिटांत अवघड कोडं सोडवण्याचं आव्हान देऊन नंदूभय्या निघून गेला आणि सगळे एकमेकांकडे पाहत राहिले. समशेर सोडवील हे कोडं चाळीस मिनिटांत?

3/ चर्चा

लष्कराच्या आदेशाप्रमाणे चाळीस मिनिटांनंतर सगळं हॉटेल रिकामं करायचं असल्यामुळे समशेरसहित सगळ्या मित्रमंडळींना तेथून बाहेर पडावं लागणार होतं. म्हणून सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज आणि पोलिसांनी केलेल्या पंचनाम्याचे कागद बघून काही सांगता, सुचवता येईल का-

इतकंच समशेरला करता येणार होतं आणि खोलीच्या बाहेर जाताही येणार नव्हतं. त्यातून वेळ चाळीस मिनिटं. सुनंदाताई पहिल्यांदा बोलली-

‘‘पण समशेर, हे कसं शक्य आहे? आणि आपण कशी मदत करणार त्यांना?’’

गंपू म्हणाला,‘‘गद्दाराला शिक्षा झालीच पाहिजे!... कोणत्याही परिस्थितीत ती चावी त्यांनी कोणाला दिली असेल, हे शेरलॉक अन्‌ आपण शोधून काढलंच पाहिजे...’’

लीला मात्र ‘लॅपटॉप’कडे पाहत होती. ती म्हणाली, ‘‘हे तू काय पाहतोयस?’’

समशेर पहिल्यांदा काहीच बोलला नाही. तो लॅपटॉपकडे एकाग्रपणे पाहतच राहिला. आणि मग म्हणाला, ‘‘आधी आपण कॅमेऱ्यामध्ये ‘शूट’ झालेलं जे काही आहे, ते पाहू या!... प्रत्येक प्रसंगाचं मी वर्णनकरीत जाईन. तुम्ही पाहायचं आणि काही खटकत असेल तर सांगायचं!... त्यानंतर झडतीच्या पंचनाम्याचे कागद पाहू... काका, तुम्ही आम्हाला ‘फूटेज’ दाखवा...’’

पोलिसकाकांनी ‘लॅपटॉप’मधील चित्रीकरण पुन्हा दाखवायला सुरुवात केली. मुलं उत्सुकतेने अगदी डोकावून डोकावून पाहू लागली. काय दिसत होतं त्यांना?

4/ काय दिसलं?

हॉटेलची लॉबी दिसते. टी. चंद्रशेखर हळूहळू शतपावली करीत आहेत. त्यांच्या हातात चणे-मुरमुऱ्यांचा त्रिकोणी पुडा असून हळूहळू एक-एक दाणा ते तोंडात टाकतायत आणि स्वतःशीच काही तरी पुटपुटतायत. छतावर लावलेला कॅमेरा त्यांच्या हालचाली टिपतो आहे. मध्येच टी. चंद्रशेखर घड्याळाकडे पाहतात. तेव्हाच एस्‌. मोहन येतात. टी.चंद्रशेखर त्यांचं हसून स्वागत करतात. मात्र शतपावली थांबवत नाहीत. एस्‌. मोहन त्यांच्याबरोबर हळूहळू चालत राहतात आणि काही बोलत राहतात. टी.चंद्रशेखर पुड्यातून काही चणे-फुटाणे सहजच एस्‌.मोहन यांना काढून देतात. एस्‌. मोहनसुद्धा चणे-फुटाणे खात-खात त्यांच्या सोबत चालत राहतात आणि नंतर काही बोलून व निरोप घेऊन निघून जातात. जाताना हस्तांदोलन करतात. या ठिकाणी चित्रीकरण थोडं थांबतं, फ्रीज होतं- दोघांचा ‘शेकहँड’ नीट दिसावा म्हणून. त्यानंतर थोड्याच वेळात बालसुब्रमण्यम्‌ येतात,टी. चंद्रशेखर यांचं अभिनंदन करतात आणि त्यांच्याबरोबरच शतपावली करतात. टी. चंद्रशेखर त्यांनासुद्धा चणे-फुटाणे देतायत. बालसुब्रमण्यम्‌ चणे-फुटाणे खात थोडं रेंगाळतात, थबकतात, काही बोलतात आणि निघून जातात. जाताना पुन्हा ‘शेकहँड’ आणि चित्रीकरण याही ठिकाणी थबकतं. पाठोपाठ अक्षयकुमार येतात. त्यांनी लांब कोट घातलेला आहे आणि डोक्यावर हॅटसुद्धा. तेसुद्धा टी. चंद्रशेखर यांच्याबरोबर गप्पा मारतात, त्यांच्या बरोबरीने लॉबीमध्ये सोबतीने चालत राहतात. आता दोघेही दरवाजाच्या जवळ उभे आहेत. अक्षयकुमार निरोप घेतात, वाकून हस्तांदोलन करतात आणि जातात. याही वेळेला हस्तांदोलनाचे दृश्य पोलिसांनी फ्रीज केलेलं आहे. दोन-तीन-चार किंवा पाच सेकंदांनंतर टी.चंद्रशेखर यांना काही तरी आठवलं आहे. ते एकदम अक्षयकुमारांना हाक मारतात मोठ्याने, थोडं हसून आणि हात उंचावून. कॅमेरा त्यांची ही हालचाल स्पष्टपणे टिपतो. हाक ऐकल्यामुळे अक्षयकुमार लगबगीने पुन्हा येतात. या वेळेस दरवाजातूनबाहेर आल्यामुळे ते पाठमोरे दिसतायत. टी. चंद्रशेखर अक्षयकुमारांबरोबर काही तरी बोलतात. टी. चंद्रशेखर त्यांना हसून काही तरी सांगताहेत आणि सहजच चणे-फुटाणे ‘ऑफर’ करताहेत. अक्षयकुमार चणे-फुटाणे घेतात, तोंडात टाकतात, काही बोलतात आणि जातात. जाताना पुन्हा एकदा अक्षयकुमार वाकून हस्तांदोलन करतात. टी.चंद्रशेखर पुन्हा पूर्ववत्‌ लॉबीमध्ये शतपावली करीत आहेत. संपूर्ण चित्रीकरणाची वेळ साडेआठ मिनिटे. चित्रीकरण इथे थांबतं.

5/ फक्त सत्तावीस मिनिटं राहिलीत आता!

सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील साडेआठ मिनिटांच्या चित्रीकरणाकडे समशेर ऊर्फ शेरलॉक होम्स्‌ एकाग्रपणे पाहत राहिला. पोलिसकाकांनी हसून म्हटलं,

‘‘आमच्याकडे तुम्हाला दाखवण्यासारखं इतकंच आहे... आता याच्यातून तुम्हाला काय समजतं, ते तुम्हीच बघा...’’

पोलिसकाका त्यानंतर कोपऱ्यातल्या खुर्चीत जाऊन बसले आणि कुजबुजत्या स्वरात सुरू झाली चर्चा. मघाची प्रत्येक हालचाल समशेरने ‘लाइव्ह कॉमेंट्री’प्रमाणे उच्चारून दाखवली होती. त्यामुळे जे दिसलं, ते सर्वांनाच समजलं होतं. पण चावी त्यांनी कोणाला सुस्पष्टपणे दिल्याचं दिसत नव्हतं. या तिघांपैकीच कोणाकडे तरी चावी हस्तांतरित केली असेल, तर ती सापडायला पाहिजे होती. आणि मुख्य मुद्दा असा की, त्यांनी ही चावी दिली तरी केव्हा आणि कशी?

‘‘फक्त तीस मिनिटं राहिलीत!’’ सुनंदाताईने म्हटलं. समशेरने मान हलवली. तो म्हणाला, ‘‘आता, जसं जसंदिसत गेलं तसं तसं मी बोलत गेलो आणि तुम्ही सर्वांनी ते सगळं पाहिलं आहे!... आता, प्रश्न असा आहे की,टी. चंद्रशेखर यांनी या तिघांपैकी कोणाला ती चावी हस्तांतरित केली असावी?.. पोलिसांचं म्हणणं असं आहे की, तिघांच्याही जवळ किंवा त्यांच्या सामानात किंवा आसपास कोठेच ती चावी सापडली नाही... मात्र शेकहँड करीत असताना ती चावी देता येणं शक्य आहे!’’

सगळे विचारात पडले. एक-एक मिनिट पुढे सरकतं आहे. हळूहळू ताण वाढतो आहे. आव्हान चाळीस मिनिटांत पेलायचं आहे. आपल्या नंदूभय्यामुळे प्रकरणात लक्ष घालता येतंय खरं, पण येत्या अठ्ठावीस मिनिटांनंतर हॉटेल सोडून तत्काळ निघून जायचं आहे. पण त्यापूर्वी, ही चावी कुठे असावी आणि कोणाला दिली असावी, याबाबत आपला तर्क सांगायचा आहे. आव्हान तर स्वीकारलंय. वेळ थोडा आहे. सगळे आपल्या शेरलॉककडे पाहत राहिले. मग गोट्याने म्हटलं,

‘‘शेरलॉक!... ते चणे-फुटाण्याचं काय प्रकरण आहे?’’

‘‘त्यात कसलं प्रकरण?... त्यांना चणे खायची सवय होती आणि गप्पा मारत-मारत सहजच त्यांनी चणे-फुटाणे तिघांना ‘ऑफर’ केले, असं दिसतंय!... पण ते देत असताना चावी देणं शक्य नाही... कारण‘फूटेज’मध्ये ते दिसलं असतं... तसंच चणे-फुटाणे मिळाल्यानंतर कोणीही खिशात हात घातले नाहीत...पण आणखीन काही?’’

‘‘बुटात वगैरे लपवली असेल चावी?’’

त्यावर पोलिसकाका तिकडून हसले आणि म्हणाले, ‘‘नाही! सर्व ठिकाणी तपासलं आहे... चावी सापडली नाहीए!’’

‘‘फक्त सत्तावीस मिनिटं राहिलीत आता!’’ सुनंदाताईने घोषणा केली.

6/ पंचनामा!

समशेरने त्या फायली उचलल्या आणि म्हटलं,‘‘आधी हे पंचनाम्याचे कागद वाचू!... यामध्ये प्रत्येकाकडे सापडलेल्या छोट्या-मोठ्या सामानाची यादी आहे!...’’

वरील तीन व्यक्तीं व्यतिरिक्त इतर चार‘पाहुण्यां’जवळच्या सामानाची यादी त्या फायलीत होती. समशेरने त्या फायली वेगळ्या केल्या आणि प्रत्येक फायलीमधील यादी तो मोठ्याने वाचत राहिला. इतर सर्व ऐकत राहिले.‘‘हं!... नोटा... सुट्टे पैसेऽ... दाढीचं सामान...रुमाल... औषधं... कपडे... डायरी...’’अचानक तो दचकला. जणू त्याला काही सापडलं आहे. घाईने त्याने ‘लॅपटॉप’कडे धाव घेतली. ‘फास्टफॉरवर्ड’ करून तो चित्रीकरण पाहत राहिला.वातावरणात प्रचंड तणाव निर्माण झाला. सर्वांनी श्वास रोखले. सुनंदाताईने घोषणा केली,‘‘चोव्वीस मिनिटं!... शेरलॉक!’’

पण समशेरचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो अगदी उत्तेजित झाला होता. त्याने म्हटलं, ‘‘पण इथे काही तरी आहे!’’

7/ सही रे, सही!

समशेरचे डोळे चमकू लागले. मित्रमंडळी श्वास रोखून पाहत राहिली. समशेर एकाग्र होऊन खोलीमध्ये फेऱ्या मारीत राहिला. त्याचा हा मूड त्याच्या मित्रांना ओळखीचा होता. त्याला नक्कीच काही तरी सापडलं आहे. समशेरने आपल्या प्रसिद्ध अशा पिशवीतून स्केचपेन बाहेर काढलं आणि त्याने एका फाईलमध्ये काही तरी खूण केली. मग त्याला काही तरी आठवलं. टेबलावरची वर्तमानपत्रं उघडून तो चक्क सिनेमा नाटकाच्या जाहिराती बघू लागला. मग म्हणाला,

‘‘हे नाटक आपण बघितलेलं आहे ना रे गंपू...हरी...? सही रे, सही?’’

समशेरच्या मित्रमंडळींना आश्चर्याचा धक्का बसला. वेळ कोणती, प्रसंग काय आणि आपला शेरलॉक होम्स्‌ चक्क नाटकाबद्दल बोलतोय? त्याला वेड तर लागलं नाही? पण सुनंदाताई थोडी मोठी होती वयाने आणि म्हणून ती पट्‌कन सावध झाली. समशेरला मदत करण्याच्या हेतूने तिने त्याला बोलतं करण्यासाठी म्हटलं, ‘‘हो ना!... मला आठवतंय!... आपण सगळेच नव्हतो का गेलो?.. धमाल होती!’’

‘‘धमाल होती, अगदी धमाल! सही रे, सही!’’ समशेरने जवळजवळ ओरडून म्हटलं. आणि त्याने अत्यंत घाईने आणि खूप उत्साहित होऊन, उत्तेजित होऊन कॉल बेल वाजवली- एकदा... दोनदा... तीनदा. लगेचच घाईने नंदूभय्या आत डोकावला.

‘‘काय रे?’’

‘‘नंदूभय्या आपण पाहिलं होतं ना रे नाटक- सही रे,सही?’’

नंदूभैय्या एकदम चमकला. अर्थपूर्ण नजरेने तो समशेरकडे म्हणजे आपल्या शेरलॉककडे पाहू लागला आणि म्हणाला, ‘‘म्हणजे काय? मीच तर दाखवलं होतं ना ते नाटक तुम्हा सगळ्यांना?... आठवतंय मला!’’

‘‘चणे-फुटाणे खात आपण मस्त एन्जॉय केलं होतं ना?... आणि त्यानंतर सर्वांनी साबण लावून हात धुवावेत, असं तूच सांगितलं होतंस... आठवतं?’’

हे अनाकलनीय वाक्य बोलून समशेरने नंदूभय्याच्या हातात एक फाईल ठेवली आणि खूण केलेली ओळ दाखवली. नंदूभय्या एकदम ताठ झाला. त्याने घाईघाईने ती फाईल ओढून घेतली आणि तो आल्या पावली धावत निघून गेला. काय चाललंय, ते कोणालाच कळालं नाही. सगळे आश्चर्याने समशेरकडे पाहत राहिले. त्याला विचारण्यात काही अर्थ नव्हता, हे अनुभवातून त्यांना समजलं होतंच. सुनंदाताईने मात्र तिचं काम चोख केलं. घड्याळ पाहत तिने घोषित केलं, ‘‘अठरा मिनिटं!...फक्त अठरा मिनिटं.. नाही, सतराच!’’

बहुधा ‘कॉम्प्युटर’पेक्षा जास्त वेगाने समशेरचा मेंदू धावला असावा म्हणून तो थकून बसून राहिला. आणि एक-एक मिनिट पुढे सरकत राहिला. तीन मिनिटं... चार मिनिट... पाच... आणि सहा. बरोबर साडेआठ मिनिटांनंतर नंदूभय्या खोलीत आला. त्याच्या सोबत एकलष्करी अधिकारीसुद्धा होते. नंदूभय्याने घोषणा केली, 

‘‘चावी सापडलीय! आणि आम्ही त्याला अटकसुद्धा केलीय!.. वेल डन, समशेर ऊर्फ शेरलॉकहोम्स्‌!’’

...आणि मित्रमंडळींनी एकदम जल्लोषच केला. लष्करी अधिकाऱ्याने मात्र कुतूहलाने समशेरकडे पाहिलं आणि म्हटलं,‘‘हाऊ कुड यू डू दॅट?’’ (तुला कसं समजलं?)

आता स्पष्टीकरण करण्याची जबाबदारी समशेरवर होती. त्याच्या चेहऱ्यावर अतिशय समाधान पसरलं होतं.एखादा जादूगार उभा राहावा तशा थाटात समशेर‘लॅपटॉप’समोर उभा राहिला.

8/ सुटलं कोडं!

आपल्या समशेरने, म्हणजेच शेरलॉक होम्स्‌ने बोलायला सुरुवात केली,

‘‘हे चित्रीकरण आपण सगळ्यांनी पाहिलं आहेच!..अक्षयकुमारांची भेट टी. चंद्रशेखर यांच्याबरोबर दोन वेळेस झालेली आहे... पहिल्यांदा अक्षयकुमार जातात आणि हाक मारल्यावर पाच सेकंदांनी पुन्हा येतात... मात्र दुसऱ्यांदा ते पाठमोरे दिसतात... दुसऱ्यांदा येणारी व्यक्ती म्हणजे अक्षयकुमारच असणार, असा आपला समज होणं साहजिकच आहे... आपल्या हालचाली कॅमेरा टिपतो आहे याची टी. चंद्रशेखर यांना जाणीव असावी...’’

सर्व जण अतिशय लक्षपूर्वक आपल्या शेरलॉक होम्स्‌चं म्हणणं ऐकत राहिले. सबइन्स्पेक्टर नंदकुमार, ते लष्करी अधिकारी, पोलिसकाका, सुनंदाताई आणि आपली मित्रमंडळी. समशेर जे बोलला, ते इथे शब्दशः सांगण्यापेक्षा त्याचा संक्षेप सांगतो-

अक्षयकुमार निरोप घेऊन जातात. पण टी.चंद्रशेखरांना काही तरी आठवतं. ते अक्षयकुमारांना मोठ्याने हाक मारून बोलावतात. ही बहुधा खूण असावी. हाक मारल्यानंतर तसाच लाँग कोट आणि हॅट घातलेली व्यक्ती घाईघाईने पाठमोरी येते. कॅमेरा त्या व्यक्तीला टिपतो. पेहराव तोच आहे म्हणून ते अक्षयकुमारच असतील, असे पाहणाऱ्यांना वाटणं साहजिक आहे. टी. चंद्रशेखर या व्यक्तीला सुद्धा चणे-फुटाणे ‘ऑफर’करतात. ती व्यक्ती सहजच गप्पा मारल्याप्रमाणे उभी राहते, चणे-फुटाणे खाते, शेकहँड करते आणि निघून जाते. या वेळेस मात्र या चौथ्या व्यक्तीला चावी हस्तांतरित करण्यात आली आहे. दोन्ही प्रसंगांतील व्यक्तींच्या बुटांकडे पाहिल्यास दोघांचे बूट थोडे वेगळे असल्याचे लक्षात येते. बाकी लाँगकोट आणि हॅट सारखीच आहे. श्री. बोकाडिया नावाच्या पाहुण्याकडे सापडलेल्या सामानाच्या यादीत पोलीस कर्मचाऱ्यांनी सुवाच्य अक्षरात नोंद केली आहे... पैसे... नाणी.. रुमाल.. डायरी...औषधं... सेंटची बाटली... पेन... पेन्सिल... दोन फुटाणे... तीन शेंगदाणे... चार मुरमुरे! आता हे बोकाडिया महाशय टी. चंद्रशेखर यांना भेटलेच नसतील, तर त्यांच्या कोटाच्या खिशातून हे चणे-फुटाण्याचं प्रकरण बाहेर कसं आलं? म्हणजेच ही चौथी व्यक्ती म्हणजे श्री. बोकाडिया असू शकतील आणि त्यांचा साबणाचा व्यवसाय असल्यामुळे ही चावी एखाद्या साबणामध्ये दडवून ठेवली असावी... ‘सही रे, सही’ नाटकात नाही का एकच नट दोन ठिकाणी दिसण्याचा भ्रम निर्माण होतो; तसाच काहीसा हा प्रकार...

समशेरने जे सांगितलं, ते अक्षरशः खरं ठरल्याचं नंदूभय्या म्हणाला. पोलिसांनी बोकाडियांना आणि टी.चंद्रशेखर यांना अटक केली असल्याचंही त्याने सांगितलं. चावी पण साबणात दडवून ठेवलेली सापडली, हेही सांगितलं.

सुनंदाताईने घोषणा केली.‘‘चाळीस मिनिटं संपायला अजून अडीच मिनिटं बाकी आहेत!... समशेर, तू कोडं सोडवलंस!...चाळीस मिनिटांचं आव्हान आपण पेललं!..शाब्बास!... सही रे, सहीऽ!’’

‘‘पण गोट्याने चणे-फुटाण्यांबद्दल विचारलं नसतं,तर हे कोडं सुटलंच नसतं!... हे क्रेडिट गोट्याला आहे!’’

पाहिलंत ना, कसा नम्र आहे आपला मित्र! ते लष्करी अधिकारी मात्र अजूनही समशेरकडे आणि त्याच्या मित्रांकडे अविश्वासाने पाहत होते. आपल्या नंदूभय्याच्या चेहऱ्यावर मात्र आनंद आणि अभिमान पसरला होता. सर्व मुलांना स्वखर्चाने ताजमहाल दाखवण्यासाठी घेऊन जाण्याचं बक्षीस त्याने तिथल्या तिथे जाहीर केले. लष्करी अधिकाऱ्याने मग समशेरचं अभिनंदन केलं. समशेरने लगेचच त्या लष्करी अधिकाऱ्यांना सॅल्यूट ठोकला आणि अतिशय आदराने म्हटलं,

‘‘जय हिंद सर!’’

त्याच्या मित्रमंडळींनीसुद्धा जोरात तसंच म्हटलं. मित्रहो, तुम्हीदेखील समशेरच्या मागोमाग ‘जय हिंद’म्हटलं असेल, याची मला खात्री आहे.

Tags: बालकुमार शेरलॉक होम्स समशेर चाळीस मिनिटांचं आव्हान भारत सासणे Balkumar Sherlock Holmes Samsher Chalis Minatach Avhan Bharat Sasne weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे,  पुणे
bjsasane@yahoo.co.in

मागील चार दशके भारत सासणे हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक मानले जात असून, त्यात कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, अनुवाद इत्यादी प्रकारचे लेखन आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके