डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नाटक हा साहित्यप्रकार असला तरी साहित्यसंमेलनाच्या मंचावरून नाटकाच्या संदर्भात विशेष अशी चर्चा अलीकडे होताना दिसत नाही. स्वतंत्र अशी नाट्यसंमेलने होत असल्यामुळे व ‘त्यांचे’ वेगळे अस्तित्व असल्यामुळे झाली तर नाटकाबाबत वेगळी व त्या संमेलनांतून चर्चा व्हावी अशी काही भूमिका घेतली जाते असे म्हणतात. त्यामुळे प्रयोग मूल्याबरोबरच नाटकातून साहित्यमूल्य- नैतिकमूल्य असावे की नाही, नाटकाने समाजाला काही संदेश द्यावा की नाही, चांगला नाट्यानुभव म्हणजे काय इत्यादींबाबत विशेष अशी चर्चा अधिकृत व मान्य अशा मंचावरून होताना दिसत नाही. दिग्दर्शकाच्या स्वायत्ततेबाबत व नटमंडळींच्या स्वातंत्र्याबाबत आदर बाळगूनदेखील लेखक या नात्याने मी स्वतः नाटककाराच्या पक्षात आहे.

1 :

कविता जशी ‘स्वान्त:सुखाय’ लिहिता येते तसे नाटक ‘स्वान्त:सुखाय’ लिहिता येते काय असा प्रश्न मी जाणकार रसिकसमीक्षकांना विचारत आलो आहे. हा प्रश्न विचारणे ही बौध्दिक क्रीडा असली तरी त्यामागे एक कुतूहल जरूर आहे. कविता हा आत्मोद्‌गार असून बहुधा आन्तरिक एकांतात तो प्रकट होतो असे म्हणतात. त्याच पध्दतीने नाटकसुद्‌धा प्रकट होईल काय अशी ही चौकशी आहे. या प्रश्नांची उत्तरे ‘होय’ आणि ‘नाही’ अशी दोन्ही प्राप्त झालेली आहेत. नाटक जन्माला येते ते प्रथमतः मानसमंचावर आणि ते एक ‘व्हिजन’ असते, त्यामुळे लेखक आंतरिक स्वास्थ्यासाठी आणि स्वतःच्या गरजेतून नाटक लिहू शकेल असे एक उत्तर प्राप्त झालेले आहे. त्याउलट, नाटक ही प्रदर्शनी कला असल्यामुळे व सामान्यतः इतरांसाठी लिहावयाची कृती असल्यामुळे, नटमंडळी व दिग्दर्शक तसेच प्रेक्षक यांच्यासाठी नाटक लिहून होते व त्यामुळे ते ‘स्वान्त:सुखाय’ लिहिण्याचा प्रश्न उद्‌भवत नाही, असे दुसरे उत्तर प्राप्त झाले आहे.

2 : 

नाटक ‘स्वान्त:सुखाय’ लिहिणे शक्य आहे की नाही या चौकशी पाठोपाठ, नाटकात साहित्यमूल्य असणे आवश्यक आहे की नाही असा दुसरा मुद्दा चर्चेला येतो. बहुतेक नाटककार हे प्रामुख्याने साहित्यिक असल्यामुळे व नाटकसंहितेच्या व्यतिरिक्त त्यांच्या अन्य सक्षम ललितकृती अस्तित्वात असल्यामुळे नाटक हा प्रकार हाताळण्यासाठी तो मुळातून साहित्यिक असावा लागतो असा युक्तिवादाचा मुद्दा आहे.

असे असेल तर, अर्थातच अशा नाटकातून साहित्यिक व रसिकांना अभिप्रेत असलेली जीवनमूल्ये शोधता येतात असे स्पष्टीकरण दिले जाते. नाटककाराने नाटक लिहावयाचे व इतरांनी ते सादर करायचे असा हा नाट्यव्यवहार असायचा. या व्यवहारात नाटककाराचे श्रेष्ठत्व मान्य असायचे व या व्यवहारात नाटककाराची अहंतासुद्धा स्वीकृत असायची. नटमंडळींनी असे नम्रपणे म्हटले आहे की, आम्ही केवळ भार वाहणारे असून नाटककाराचे शब्द जसेच्या तसे रसिकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे काम आहे. या प्रचलित विधानातून नाटककार कृतीचा निर्माता व आम्ही ती कृती पोहोचविणारे, अशी भूमिका आहे. 

संहितेच्या आकृतिबंधात किंवा शब्दरचनेत हस्तक्षेप सुरू झाल्यानंतर नाटककाराने पुढील आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये असे बजावले आहे की, नाटककाराने काहीही म्हटले असले तरी नटंमंडळींनी त्यात बदल करू नये व पदरचे शब्द नाटकात घालू नयेत. इथपर्यंत नाटककाराची अहंता व पाठोपाठ संहितेमध्ये बदल अभिप्रेत नसण्याची भूमिका सर्वमान्य राहिली. नाटक हे नाटककाराचेच आहे ही भूमिकासुद्धा इथपर्यंत सर्वमान्य राहिली.

3 :

नाटकसंहितेला साहित्यमूल्याची आवश्यकता नसून, नाटक हा सादरीकरणाचा व अनुभव मांडण्याचा कलाप्रकार असल्यामुळे साहित्यमूल्याशिवायदेखील नाटक सादर करता येते असा प्रति-युक्तिवाद मागच्या काही वर्षांमधून मांडला गेलेला आहे. बांधील संहितेची तितकीशी आवश्यकता नसते, एक ‘लवचिक आराखडा’ असला तरी पुरे, त्या आधारे उत्स्फूर्त अशा अभिनयातून व अभिव्यक्तीतून नाटक सिध्द होऊ शकते असा नवतावाद्यांचा आग्रह असतो.  अशाच आग्रहातून प्रायोगिक रंगभूमी म्हणून ओळखली जाणारी चळवळ पुढे आलेली आहे. या विचारधारेच्या प्रभावातून रंगभूमीशी ‘प्रत्यक्ष संबंधित व्यक्ती’ नाटकाच्या संहिता लिहू लागल्या. 

एकदा नाटककार महत्त्वाचा नाही असे निश्चित झाले की मग संहिता आणि त्यात दडलेला अनुभव महत्त्वाचा हा मुद्दा अधोरेखित होत गेला. नाटककाराचे शब्द तर महत्त्वाचे पण त्यापेक्षा दोन ओळींमधला, दोन शब्दांधला अर्थ शोधून तो प्रत्ययाने दाखवणे-उभा करणे महत्त्वाचे असते हा मुद्दा धाक दाखवत राहिला. अशा ‘निर्मितसंहिते’तून प्रकट होणारे नाटक हे अर्थातच नाटककाराचे, दिग्दर्शकाचे की नटांचे असाही नवा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला.

4 :

‘दिग्दर्शकाचे नाटक’ ही संकल्पना बुद्धिमान नाट्यकर्मींच्या चर्चेमध्ये पुन्हा पुन्हा मांडली गेली आहे. मूळ संहिताकाराला अभिप्रेत असलेले परंतु प्रकट न झालेले अनेक मुद्दे ‘शक्यतांच्या स्वरूपात’ दिग्दर्शकाला आधी दिसतात व त्यातून त्याचे स्वतःचे म्हणून जे काही ‘इंटरप्रिटेशन’ असेल त्या अनुषंगाने, लवचिक पध्दतीने लिहिलेली संहिता सादर केली जाते असे यांचे म्हणणे असते. म्हणजे, नाटककार/संहिताकार याचे म्हणणे अंतिम नसून त्या म्हणण्याच्या व्यतिरिक्तसुद्‌धा काहीएक अर्थ सांगितला जाऊ शकतो व हे केवळ दिग्दर्शकाच्या अंतर्दृष्टीमुळे शक्य असते असा हा मुद्दा आहे. येथे, उघडच दिग्दर्शकाचे महत्त्व संहिताकाराच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्त आहे असे सांगितलेले असते. 

मागच्या काही दशकांमधून प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या काही बुद्धिमान दिग्दर्शक-रंगकर्मीयांनी स्वतःचे असे प्रवाह निर्माण केले. नाटकात किंवा मूळ संहितेत अभिप्रेत असलेले परंतु कदाचित प्रकट नसलेले अनुभव बाहेर ओढून काढून कलात्मक पद्धतीने परंतु रंजनवादाचा आश्रय टाळून सादर करणे आवश्यक असते व त्यासाठी दिग्दर्शकाकडे प्रतिभा असावी लागते, अशी अहंता नकळतपणे प्रसारित होत राहिली आहे. नाटकाच्या अर्थाचे दिग्दर्शकाला भावलेले व दिसलेले ‘इंटरप्रिटेशन’ हा मुद्दा मागील काही वर्षांत अचानकपणे पुढे आलेला आहे. एकाच नाटकाचे दोन दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले अन्वयार्थ तितक्याच समर्थपणे व स्वतंत्रपणे सादर होणे हा प्रकार मराठी व्यतिरिक्त अन्य भाषांतून दिसून आला. 

महाभारताच्या युद्धानंतर महाविनाशामुळे एका युगाचा अंत होणे या टप्प्यावरचा नाट्यानुभव वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी लवचिकपणे सादर केला, हे त्याचे एक उदाहरण. येथपर्यंत संहितेवर विचार करून नाट्यानुभव बाहेर काढण्यासाठी वर्कशॉप्सचा उदय होऊन नाटक हे दिग्दर्शकाचे असते हा विचार प्रसारित झालेला दिसतो. आपल्या संहितेत बदल करू नये असे नाटककार एका बाजूने बजावत असताना व नटमंडळी दुसऱ्या बाजूने नम्र भूमिका घेत असताना दिग्दर्शकाची अहंता तोपर्यंत सुप्त व मौन अशी राहात आली. परंतु त्यानंतर मात्र दिग्दर्शक या संस्थेने आपण नाटककाराइतकेच, संहितेइतकेच व कदाचित त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहोत अशी घोषणा अव्यक्तपणे केलेली दिसते.

दरारा निर्माण करणाऱ्या अशा बुद्धिमान रंगकर्मीयांनी आपणास हवे तसे नाटक लिहूनदेखील घेतलेले आहे. म्हणजेच हा अनुभव मला नाट्यस्वरूपात मांडावयाचा असून हा अनुभव मला अशा पद्धतीने लिहून हवा आहे, अशी भूमिका दिग्दर्शक नावाची संस्था घेताना दिसते. त्यामुळे प्रयोगक्षम संहितांची निर्मिती झाल्याचे सांगितले जात असले तरी नाटककाराने स्पष्ट करावयाचे साहित्यमूल्य हरवून जाते काय, असा प्रश्न फारसा विचारला गेला नाही. नाटकाचे तांत्रिकीकरण व अनुभव सादर करण्याची इच्छा यामध्ये या प्रश्नाचे उत्तर द्यावयाचे राहून गेलेले दिसते. 

‘गिव्हन सिच्युएशन’ व त्याचा अन्वयार्थ याचा बोलबाला रंगकर्मीयांमध्ये होत राहिला. सांगून सांगून गुळगुळीत झालेले उदाहरण असे की मंचावर मध्यभागी केळीचा घड लटकलेला आहे व एक किंवा अनेक भुकेल्या व्यक्ती पात्रे बनून मंचावर येतात.  आता, या गिव्हन सिच्युएशनमधून कोणकोणते अन्वयार्थ लावता येतात यावर चर्चा चालू राहते. म्हणजे, पात्र केळीच्या घडाला जसजसा स्पर्श करू पाहील तसतसा तो घड उंच उंच जाईल. म्हणजेच जीवनातील हव्या त्या गोष्टी अप्राप्य असतात असे एक इंटरप्रिटेशन मांडले जाते. 

हाच घड दिग्दर्शक गोल गोल फिरवतो व जीवनातील हव्या त्या गोष्टी चकवा देतात किंवा फसवतात, दमवतात असा अन्वयार्थ लावता येतो. दोन व्यक्ती केळी वाटून खाण्याच्या ऐवजी परस्परांशी भांडून मरून जातात व नंतर एक माकड येते व ते आल्याबरोबर ढेकर देते कारण त्याचे पोट भरलेले असते, तरी ते माकड केळीचा घड घेऊन त्या दोघांकडे दयार्द्र नजरेने पाहत निघून जाते, असेही इंटरप्रिटेशन दिलेले आहे. इथे, हे सगळे नाटककाराने संहितेमध्ये लिहिलेले नसले तरी त्याने केलेले सूचन सर्वार्थाने स्पष्ट करता येते असा हा मुद्दा आहे. दिग्दर्शकाला ओळींच्या मधले वाचता येत असेल तर त्याने मांडलेला अनुभव हा केवळ त्याचाच असतो व म्हणून नाटक दिग्दर्शकाचे असते असा हा विचारप्रवाह आहे.

5 : 

नाटक हे नाटककाराचे की दिग्दर्शकाचे या संदर्भात चर्चा चालू असतानाच नाटक हे कलावंतांचेसुद्धा असते असा एक तुलनेने अस्फुट असा विचार मांडला गेला. संहिता लवचिक व अनेक शक्यतांना प्रकट करण्याची मुभा देणारी असेल, व दिग्दर्शक त्यातील अनेक शक्यतांना प्रकट करण्यासाठी दिशा देत असेल तर नटमंडळी उत्स्फूर्त अशा आविष्कारातून त्यांना अभिप्रेत असा अनुभव प्रकट करू शकतात, म्हणून असे नाटक हे कलाकारांचेसुद्धा असू शकते असा हा मुद्दा. 

येथे अर्थातच नटमंडळी स्वतंत्र पद्धतीने नाट्यानुभव सामूहिकरितीने सादर करू शकतात हा विचार दिला जातो. दिग्दर्शकाच्या बरोबरीने किंवा थोडे जास्तच असे नटमंडळींचे स्थान अधोरेखित करण्याचा या मागे प्रयत्न दिसतो.  लोकरंगमंचाशी संबंधित असलेल्या संहितांसाठी दिग्दर्शक अनेक वेळेस दिशा दाखविण्यापुरता उपयोगी ठरतो व प्रखर जीवनानुभव कलावंतांच्या लवचिक अशा प्रकटीकरणातून स्पष्ट होतो असे सांगितले गेले आहे.

मंचावर एक किंवा दोन कलावंत अस्तित्वात न राहता अनेक कलावंतांचा सामूहिक आविष्कार अभिनयाचे रूपाने अस्तित्वात येतो व त्यामुळे असे प्रकट होणारे नाटक हे कलावंताचे नाटक असते असा हा विचार आहे. दिग्दर्शकाची अहंता अधोरेखित होत असतानाच हाही विचार पुढे येऊन कलावंत केवळ भार वाहणारा राहात नाही तर अनुभव पोहोचविणारा प्रवाहक होऊन अस्तित्व व्यापतो. ताजमहालच्या निर्मितीनंतर कलावंतांचे हात तोडणे, भगीरथ प्रयत्नानंतर शंभर पुत्रांचे अर्थात मजुरांचे नदीच्या प्रवाहात वाहून जाणे इत्यादी नाट्यानुभव दिग्दर्शकाची कृती म्हणून ओळखले जात नाहीत तर तो नाट्यानुभव केवळ नटमंडळींचा असल्याने असे नाटक हे नटमंडळींचे नाटक होऊन जाते.

6 :

प्रेक्षकांचेही नाटक नावाचा प्रकार कदाचित अस्तित्वात असावा. अमूक एक नाटकाचा शेवट कसा असावा हे प्रेक्षकांना विचारले जाते व मतमोजणी होऊन प्रेक्षकांच्या मतानुसार नाटकाचा शेवट सुखान्त की दु:खान्त असा होतो. भारताच्या बाहेर व अन्य भाषांतून असे केले जाते असे म्हणतात.प्रेक्षकांनी दीर्घकाळ आश्रय देणे व त्यामुळे दीर्घकाळ अशा नाटकाचे प्रयोग होत राहणे म्हणजे प्रेक्षकाचे नाटक म्हटले जाऊ शकते. लोकाग्रहास्तव इत्यादी प्रकार आपल्याकडेसुद्धा पूर्वी होताच. 

7 :

चांगले किंवा वाईट असे काही ठरविण्याचा कलाकृतीला अधिकार नसल्यामुळे नाटककाराने नाटकाच्या अंती किंवा नाटकामधून काही संदेश देऊ नये अशा स्वरूपाची काही चर्चा झालेली आहे. संस्कारयुगात शोभतील असे बाळबोध विचार देणे किंवा सुभाषितवजा संवाद पात्रांच्या तोंडी योजणे असे काही प्रयत्न करणे योग्य नाही असा नवतावाद्यांचा विचार प्रसारित होऊ लागल्यानंतर साहित्यिक नाटककारांची लेखणी काही काळ स्तब्ध झाली आहे. साहित्यमूल्ये अर्थात जीवनातील नैतिक मूल्ये यांच्याबाबतसुद्धा नवतावादी शंका निर्माण करू लागल्यानंतर नाटकातून समाजाला संदेश देण्याची प्रथा काही काळ थांबली आहे असे दिसते. त्याउलट, अनैतिकता ही सुद्धा जीवनाची एक बाजू असून तिचे स्पष्टीकरण, कदाचित समर्थन करता येते असा संदेश मात्र नवतेच्या आग्रहातून काही अंशी नाटकातून दिला गेला आहे. 

8 :

प्रेक्षकांना ‘एज्युकेट’ करण्याची आवश्यकता आहे असा विचार मागील काही वर्षांमधून रंगकर्मीयांच्या मार्फत मांडला गेला. तुम्ही ज्याला नाटक समजता तेच एक नाटक नसते तर त्याशिवाय वेगळे असे नाटक असू शकते व तुम्ही ते पाहून समजून घेतले पाहिजे असा हा विचार आहे. प्रेक्षकांवर रूढ व स्वीकृत अशा संकल्पनांची छाप असते व त्यास छेद देणे आवश्यक असते असे या विचारप्रवाहात मानले जाते. प्रेक्षकानुरंजन न करता त्याऐवजी कलेच्या संदर्भात त्यांना एज्युकेट करण्याचे धारिष्ट्य हा विचारप्रवाह दाखवीत असतो. काही प्रेक्षक अशा प्रयत्नांबाबत आस्था दाखवितात तर काही प्रेक्षक दाखवीत नाहीत. 

9 :

नाटक हा साहित्यप्रकार असला तरी साहित्यसंमेलनाच्या मंचावरून नाटकाच्या संदर्भात विशेष अशी चर्चा अलीकडे होताना दिसत नाही. स्वतंत्र अशी नाट्यसंमेलने होत असल्यामुळे व ‘त्यांचे’ वेगळे अस्तित्व असल्यामुळे झाली तर नाटकाबाबत वेगळी व त्या संमेलनांतून चर्चा व्हावी अशी काही भूमिका घेतली जाते असे म्हणतात. त्यामुळे प्रयोगमूल्याबरोबरच नाटकातून साहित्यमूल्य- नैतिकमूल्य असावे की नाही, नाटकाने समाजाला काही संदेश द्यावा की नाही, चांगला नाट्यानुभव म्हणजे काय इत्यादींबाबत विशेष अशी चर्चा अधिकृत व मान्य अशा मंचावरून होताना दिसत नाही. दिग्दर्शकाच्या स्वायत्ततेबाबत व नटमंडळींच्या स्वातंत्र्याबाबत आदर बाळगूनदेखील लेखक या नात्याने मी स्वतः नाटककाराच्या पक्षात आहे. सृष्टिकर्ता नाटककार असतो, त्याने तो अनुभव पहिल्यांदा पाहिलेला असतो व अनेक शक्यतांच्या स्वरूपात, कदाचित लवचिकपणे, कदाचित बांधीवपणे हा अनुभव त्याने कृतीतून मांडलेला असतो.

दिग्दर्शक आपल्या प्रतिभेतून हा अनुभव नाट्यानुभवामध्ये रूपांतरित करतो आणि कलाकार माध्यम बनतात. नाटक हे दिग्दर्शकाचे असेलसुद्धा, ते कलावंताचेदेखील असू शकेल, कदाचित प्रेक्षकांचेसुद्धा असेल पण सृष्टिकर्ता नाटककारच असणार असल्यामुळे नाटक हे नाटककाराचेच असते. कोणीतरी नव्या प्रतिभेच्या नाटककाराने समाजाला चांगला संदेश देण्याच्या प्रथेबाबत आग्रही राहून नाटकाला पुन्हा एकदा स्थिर केले पाहिजे असे मला वाटते. त्यामुळे व्यावसायिक रंगभूमीला पुन्हा चांगले दिवस येतील व प्रायोगिक रंगमंच पुन्हा कात टाकेल.  दलित आणि ग्रामीण जीवनाचे अनेक धुमारे आणि प्रवाह अजूनही मराठी रंगभूमीपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचलेले नाहीत, याचा देखील नव्या नाटककाराला विचार करावा लागेल. मला वाटते, आज ना उद्या हे होणार आहे ! 

या लेखावरील लेखी प्रतिक्रियांचे साधनाला विशेष अगत्य आहे- संपादक. 

Tags: नाटक नाटककार प्रेक्षक कलावंत दिग्दर्शक play playwrighter audience artist director weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे,  पुणे
bjsasane@yahoo.co.in

मागील चार दशके भारत सासणे हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक मानले जात असून, त्यात कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, अनुवाद इत्यादी प्रकारचे लेखन आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके