डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘वीरधवल’ने कुमारवयात मला प्रभावित केलं असलं, तरी माझी लेखनसामग्री या किंवा अशा कादंबऱ्यांतून आली असं मी म्हणणार नाही. पण ज्या ‘मास्टर स्टोरी टेलर्स’चा उल्लेख मी वर केला आहे, त्यांनी जीवनाबद्दल काहीएक चिंतन नोंदवलं तर आहेच. भव्य आणि गुंतागुंतीचा मानवी जीवनपट मांडताना अनेक अमेय अशा मूल्यांकडे त्यांनी निर्देश केला आहे. हे निर्देश त्या वयातच मला सजग करून गेले असावेत. नंतर पुढे मी माणसाच्या दुःखाचा शोध घेत राहिलो. माणसाला शोधत राहिलो आणि त्याच्या जगण्यातलं, त्याच्या मानसविश्वातलं गूढ शोधत राहिलो. ‘वीरधवल’ने ही सुरुवात करून दिली, असं म्हणता येणं शक्य आहे.  

वेळ संध्याकाळ. इलेक्ट्रिसिटी सर्वत्र आलेली नव्हती. कंदिलाचा प्रकाश पसरायला लागलाय. सहावी-सातवीत असलेला मी मित्राच्या अवाढव्य आणि ऐतिहासिक वाड्यामध्ये उभा. वाडा गूढ, अंधारा. जुन्या बांधकामाचा आणि ‘बळद’ असलेला. चकाकत्या काळ्या, पण जुन्या लाकडांचे खांब. भिंतीत कुतूहलाचे कोनाडे. छतावर एक जुनं झुंबरदेखील आहे. कधी कधी ते पेटवलेलं दिसायचं. तिथं, त्या अपुऱ्या प्रकाशात एक आजीबाई चष्मा लावून एक जाडजूड पुस्तक वाचत बसलेल्या दिसायच्या. स्त्रियांनी साक्षर असणं समाजात संमत नसलं तरी उच्चवर्णीयांच्या स्त्रिया घरातच वाचनाचं शिक्षण घेत असत. आजीबाईदेखील अशाच परंपरेतल्या असणार. मी त्यांच्या हातातल्या त्या ग्रंथाकडे कुतूहलाने पाहत राही. त्यांचं रंगून जाणं, पुस्तकात बुडून जाणं मला जाणवायचं. त्यांच्या हातातलं ते पुस्तक कोणतं असावं, असा प्रश्न मला पडलेला असे.

पुढे त्या गेल्या, वारल्या. काही दिवसांनंतर मित्राने सांगितलं, त्यांचं म्हणून जे काही सामान होतं त्याची तपासणी चालू आहे. माझं नेहमीच जाणं-येणं असायचं मित्राच्या घरी, त्याच्या वाड्यात. म्हणून नंतर मी त्याच्या घरी गेलो. त्याने मला लांबूनच आजींचं सामान दाखवलं. चष्मा, चार-सहा पुस्तकं, औषधांच्या बाटल्या आणि घडी करून ठेवलेले कपडे- एखादं-दुसरं नऊवारी पातळ. मी हळूहळू पुढे झालो. संमतीच्या अपेक्षेने मित्राकडे पाहू लागलो. त्याने हळूच मान हलवली. मग मी ती पुस्तकं पाहू लागलो. ‘शिवलीलामृत’ नावाचं एक पुस्तक होतंच. पण  मला तो मोठा ग्रंथ पाहायचा होता. तो मी उचलला आणि नाव पाहिलं. शीर्षक होतं- ‘वीरधवल’. लेखक नाथ माधव. ‘वीरधवल’ या रोमहर्षक पुस्तकाने माझा तेव्हापासून पाठलाग सुरू केला आहे.

त्या वयात आणि तेव्हा ‘वीरधवल’ची ती प्रत मला तत्काळ वाचायला मिळू शकली नाही. पण ती अगदी सुरुवातीची दुर्मिळ अशी प्रत असणार, कारण ते पुस्तक म्हणजे आजींची प्रॉपर्टी होती त्यांनी जपलेली- माहेराहून आणलेली. माझी आठवणच 1960 ते 1963 या दरम्यानची आहे. नाथमाधवांचा काळ 1928 ला संपतो. सन 1912 मध्ये बहुधा ‘वीरधवल’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे. नंतर या पुस्तकाच्या असंख्य आवृत्त्या प्रकाशित झालेल्या दिसतात. त्या प्रकाशित होत असताना या पुस्तकातल्या मजकुरात काही बदलसुद्धा झालेले आहेत. जुनी भाषा सोपी करण्याचा प्रयोगदेखील कोणी तरी केला होता म्हणतात. गाळणी-वगळणी तर केली गेलेली आहेच.

आठवण अशी की, एका वृत्तपत्राने शंभर वर्षांतील शंभर उत्कृष्ट पुस्तकांची यादी केली होती. त्यात सुरुवातीला ‘वीरधवल’चा समावेश नव्हता. नंतर मात्र वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांमुळे हे पुस्तक या यादीत समाविष्ट करावं लागलं. वि.वा. शिरवाडकर यांनी या पुस्तकाची आठवण नोंदवलेली आहे. धडधडत्या काळजाने आणि डोळ्यांत प्राण आणून कादंबरी कशी वाचत होतो, याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

काळ पुढचा. पुण्यातील वरदा प्रकाशनाचं दुकान. मी विक्रीसाठी ठेवलेल्या पुस्तकांकडे कुतूहलाने पाहतो आहे. ‘वीरधवल’सह नाथमाधवांची काही पुस्तकं आणि गो.ना. दातारांची अनेक पुस्तकं तिथं मला दिसतात. म्हणजे, तो खजिनाच. मी ती पुस्तकं निवडतो. इतरही काही पुस्तकं निवडतो. निर्विकार परंतु सात्त्विक चेहऱ्याचे तिथे बसलेले मालक ह.अ. भावे माझ्याकडे एकटक पाहतायत. त्यांनी मला बहुधा ओळखलेलं. पण ते ओळख दाखवीत नाहीत. सगळी पुस्तकं घेऊन मी त्यांच्या काऊंटरकडे जातो. त्यांना बिल करायला सांगतो. किंचितसं स्मित करीत ते म्हणतात की- ‘‘बाकीच्या पुस्तकांचं बिल करतो, पण हे पुस्तक मी तुम्हाला माझ्याकडून भेट म्हणून देतो आहे. ज्या कुतूहलाने आणि आवडीने ही पुस्तकं तुम्ही निवडलीत, त्यातून मला त्याची किंमत मिळाली आहे.’’ ते नेमकं ‘वीरधवल’ हेच पुस्तक उचलतात आणि माझ्या हातात देतात. आज तीच प्रत माझ्या संग्रही आहे. म्हणजे, ‘वीरधवल’ माझा पाठलाग करतोच आहे.

महाराष्ट्राच्या सीमेवरच्या मराठी पट्ट्यातील एका वाचकाची भेट रेल्वेमध्ये झाली. आपण मराठी साहित्याचे वाचक आहोत, असं त्यांनी सांगितल्यानंतर मी त्यांच्याशी गप्पा सुरू केल्या. तुम्ही काय वाचलं आहे, असं मी विचारल्यानंतर त्यांनी ‘वीरधवल’चा आवर्जून उल्लेख केला आणि मी चकित झालो. सीमेवर जुनी मराठी आणि अभिजात ग्रंथांची आवड व स्मरण जपलं गेलं असावं, हेही माझ्या लक्षात आलं.

अठरावं शतक संपत असताना आणि त्यानंतरच्या तीसएक वर्षांमध्ये मराठी भाषेत ‘रोमहर्षक कादंबरीलेखना’चा कालखंड सुरू झाला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मराठी साहित्याचे ‘मापदंड’ तयार होत असतानाच एका बाजूने गो.ना. दातार, नाथमाधव आदी ‘मास्टर स्टोरी टेलर्स’ विलक्षण असं लिहीत होते. त्यांच्या कादंबऱ्यांचे आधार उघडच ‘परदेशी’ जरी असले, तरी रूपांतर करताना अस्सल भारतीयत्व अवतरित होत होतं. रहस्य, रोमांच, अतींद्रिय अनुभवातली निगूढता, कट- कारस्थानांमुळे निर्माण होणारी उत्कंठा, जन्मरहस्यं, संकटं या सर्वांना अवगुंठित करणारा वीररस इत्यादींमुळे या कादंबऱ्या त्या काळात रसिकप्रिय आणि अफाट लोकप्रियसुद्धा झाल्या होत्या.

समाजमानसशास्त्राच्या अंगाने मराठी साहित्याची तपासणी करणाऱ्यांनी असं निदर्शनास आणलं आहे की, रहस्य-रोमांच-गूढतेची मोहिनी फक्त मराठी भाषेतच निर्माण झाली होती असं नाही; काही वर्षे आधीच हिंदी भाषेमध्ये बाबू देवकीनंदन खत्री ‘चंद्रकांता’, ‘भूतनाथ’, ‘भूतनाथ-संतती’ इत्यादी कादंबऱ्या लिहीत होते. ‘चंद्रकांता’ वाचण्यासाठी लोक साक्षर झाले आणि रांगा लावून नियतकालिकाचे अंक मिळवीत राहिले, असा उल्लेख सापडतो.

इंग्रजी भाषेमध्ये अठराव्या शतकाच्या अखेरीस गॉथिक शैलीच्या कादंबऱ्यांचा जन्म झालेला आहे. जॉर्ज विल्यम मॅक्‌ऑर्थर रेनॉल्ड्‌स नावाच्या अशाच एका ‘मास्टर स्टोरी टेलर’ने ‘केनेथ- अ टेल ऑफ दि हायलॅन्ड्‌स’ ही 46 भागांची कादंबरी सन 1856 मध्ये लिहिली. आपला ‘वीरधवल’ याच कादंबरीच्या सामग्रीतून आलेला आहे. व त्यानंतर समाजमानस ‘वीरधवल’ला विसरायला तयार नाही. मात्र, 2012 मध्ये शंभर वर्षं पूर्ण होत असताना आपल्याला ‘द्वारकानाथ माधव पितळे’ ऊर्फ ‘नाथमाधव’ या लेखकाची आठवण झाली नाही किंवा ‘वीरधवल’बद्दल  आपण चर्चाही केली नाही.

जी प्रत तेव्हा माझ्या हाती लागली ती संक्षिप्त, कंडेन्स स्वरूपाची असावी. पण तरीही या कादंबरीने खिळवून ठेवलं. इंग्रजी पुस्तकांचा परिचय अजून व्हायचा होता. पण तरीही आणि तो होण्याआधीच ‘वीरधवल’चं गारूड माझ्या कुमार मनावर पसरायला लागलं होतं. मनाने मी कादंबरीत शिरलो होतो. वयाचा कुमारवयीन कालखंड सुरू असल्यामुळे रहस्य-रोमांच इत्यादींचा प्रभाव स्वाभाविकपणे मनावर होताच. ‘वीरधवल’ झपाटून टाकणारी कादंबरी आहे, हे लक्षात यायला लागलं. पुढे इंग्रजी वाचायला लागल्यानंतर ‘वीरधवल’च्या मूळ कलाकृतीचा मी शोध घेऊ लागलो.

मानसशास्त्राचा कुठलासा सिद्धांत आहे म्हणे. मी असं ऐकलं की- कुमार वयोगटाच्या मानसकालखंडात ज्यांनी अद्‌भुतरसाचं सेवन केलं नाही, ती माणसं पुढे चालून अविकसित व्यक्तिमत्त्वाची, खुजी व खुरटी, शुष्क, उर्मट आणि पोटार्थी अशी होतात. सौंदर्याचा बोधदेखील त्यांना नीट होत नाही. ही मंडळी निसर्गदत्त प्रतिभा विकसित करू शकत नाहीत, कुपोषित व कल्पनाशून्य बुद्धीचे धनी होऊन बसतात. हा सिद्धांत वाचल्यानंतर मी चकित झालो.

पुष्कळ वेळेस आयुष्यात एकाकीपणा अनुभवाला येतो. माणसं उदास, एकटी आणि निराश होतात. अशा वेळेस दिलासा देणाऱ्या काही मित्रांना बोलावून आणावं लागतं. आपापल्या अभिरुचीप्रमाणे, संस्कारांप्रमाणे हे मित्र वेगवेगळ्या प्रकृतीचे असू शकतात. या यादीमध्ये आपला ‘वीरधवल’ही असतो. त्याला पाचारण केल्यानंतर, बोलवल्यानंतर मग गारूड सुरू होतं. मनामध्ये घोडदौड सुरू होते. श्वास रोखला जातो. आपल्या एकाकीपणाच्या आयुष्यामध्ये झपाटून टाकणारा, जगवणारा असा दिलासा निर्माण होतो. या दिलाशाचं नाव ‘वीरधवल’ असतं.

आपला वीरनायक धोक्याने बंदिवान झालेला आहे. आता त्याला सोडवलं तर पाहिजे. त्याचे मित्र त्या आयोजनाची सुरुवात करीत आहेत. आपणही अदृश्य रूपाने त्यांच्यामध्ये सामील झालेलो आहोत. आपणही वेषांतर केलेलं आहे. आपल्यालाही गुप्त मार्गाने सिंहगुहेत जायचं आहे. काहीएक सोंग वठवून आणि पहारेकऱ्यांची नजर वळवून आपल्याला मोठ्या हिकमतीने आपल्या वीरनायकाला बंदिवासातून सोडवायचं आहे. आपणही श्वास रोखून धडधडत्या काळजाने त्या आयोजनात सामील झालेलो आहोत. ‘वीरधवल’ला सोडवायचं तर आहेच.

काय बिशाद आहे आपली इकडे-तिकडे बघण्याची! आपण कादंबरीच्या अंतरंगात उपोद्‌घातापासूनच ओढले गेलेलो असतो. जादू आपल्यावर पसरायला लागलेली असते. उत्कंठा वाढायला लागलेली असते. आणि हा सगळा कथानकपट म्हणजे सोपं प्रकरण नाही याची पण खात्री पटायला लागलेली असते. आपण गुंगून जातो. रंगून जातो. गुंतून पडतो. आपल्यावर गारूड होतं. आपल्याला भूल पडते. शस्त्रागाराचा गुप्त दरवाजा खाड्‌कन उघडलेला आहे. प्रत्येक जण भयभीत आहे. तेवढ्यात अंगात सर्वांगकवच, मस्तकावर शिरस्त्राण आणि हातात नग्न तलवार घेतलेल्या योद्ध्याची आकृती एकदम आत यायला लागते...

गॉथिक शैलीच्या इंग्रजी रहस्यरंजनात्मक कादंबऱ्यांमध्ये असावं तसं सगळं वातावरण ‘वीरधवल’मध्येसुद्धा आहेच. ‘वीरधवल’मधील वीरनायकाचं जन्मरहस्य, क्रूर कूट कारस्थानं, सत्याचा विजय, करामती आणि हिकमती इत्यादी सामग्री आपल्याला प्रभावित करून गेलेली असते. लेखकाच्या रचनेची कुशलता लक्षात आलेली असते. हा एक मोठा  कथानकपट असून, अनेक पात्रांची गुंतागुंत मोठ्या कौशल्याने वेगवेगळ्या कालखंडांतून गुंफत नेलेली आहेहे आपल्या लक्षात येतं. हे कौशल्य रेनॉल्ड्‌सपेक्षा कमी नाही हे माझ्या लवकरच लक्षात आलं.

कथाकार, दीर्घ कथाकार, नाटककार व कादंबरीकार म्हणून मी स्थिर होऊ लागलो तरी एका बाजूने मी बालकुमार साहित्यदेखील लिहीत राहिलेलो आहे. माझ्या आंतरिक प्रातिभविश्वाला फुटलेली ही एक अलवार, सुंदर अशी हिरवी फांदी आहे. अद्‌भुतरसाच्या सेवनापासून मी वंचित राहिलो नाही, हा सरस्वतीचा आशीर्वाद. त्यामुळे मी कदाचित शुष्क आणि पोटार्थी झालेलो नाही. जी.ए. कुलकर्णी या प्रतिभावंत लेखकाशी माझी तुलना व्हायला लागली, तेव्हा माझ्या दीर्घ कथांमध्ये गूढता आहे, असं वरवरचं कारण सांगितलं गेलं. यथावकाश समीक्षकांनी माझी लेखनप्रवृत्ती वेगळी आणि जी. एं.ची वेगळी, हे आवर्जून सांगितलं आणि मी मुक्त झालो. मानवी दुःखाचं कारण जी. ए. नियतीमध्ये शोधतात, तर मानवी दुःखाचं कारण सासणे मानवाच्या वर्तनामध्ये शोधतात- असा फरक नोंदवला गेल्याचं पाहून मी सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही जी कथित गूढता माझ्या कथा-दीर्घ कथांमध्ये येते आहे ती कोठून येत असावी, असा काही प्रश्न पडतो. मानवी जीवन तर्कातीत आणि अनिर्वचनीय तर आहेच, पण अनाकलनीय गूढाने व्याप्तदेखील आहे. ‘वीरधवल’ने कुमारवयात मला प्रभावित केलं असलं, तरी माझी लेखनसामग्री या किंवा अशा कादंबऱ्यांतून आली असं मी म्हणणार नाही. पण ज्या ‘मास्टर स्टोरी टेलर्स’चा उल्लेख मी वर केला आहे, त्यांनी जीवनाबद्दल काहीएक चिंतन नोंदवलं तर आहेच. भव्य आणि गुंतागुंतीचा मानवी जीवनपट मांडताना अनेक मूल्यांकडे त्यांनी निर्देश केला आहे. हे निर्देश त्या वयातच मला सजग करून गेले असावेत. नंतर पुढे मी माणसाच्या दुःखाचा शोध घेत राहिलो. माणसाला शोधत राहिलो आणि त्याच्या जगण्यातलं, त्याच्या मानसविश्वातलं गूढ शोधत राहिलो. ‘वीरधवल’ने ही सुरुवात करून दिली, असं म्हणता येणं शक्य आहे.

नाथमाधवांनी आपली भूमिका कादंबरीच्या अखेरीस स्पष्ट केलेली आहे. ती मननीय आहे. त्यातील एक उतारा असा... ‘‘‘शास्त्रकारांनी मानवी प्राण्यांच्या अंतःकरणाचे मन, बुद्धी, चित्त व अहंकार असे जे चार भाग आहेत, त्याला अंतःकरणचतुष्ट्य म्हटले आहे. कोणत्याही वस्तूविषयी मोह उत्पन्न होणे हे मनाच्या साह्याने होते. त्या वस्तूकडे एकदा मन लावले की, वस्तू प्राप्त करून घ्यावी किंवा नाही याबद्दलचा निश्चय बुद्धी करते. बुद्धीने निश्चय केला म्हणजे त्या वस्तूंचे सारखे चिंतन होते आणि एकदा चित्तवृत्ती एखाद्या वस्तूकडे लागली म्हणजे त्या मनुष्याला दुसरे-तिसरे काही सुचत नाही. ती वस्तू केव्हा प्राप्त होईल, असे त्याला होऊन जाते. अंतःकरणाची अशी स्थिती झाली म्हणजे प्रयत्नाला सुरुवात होते आणि जर का अहंकाराने पाठिंबा दिला, मग काय विचारता? इच्छित वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य नाही-नाही ते प्रयत्न करतो. वाटेल ते अनाचार करतो, शक्य त्या युक्त्या लढवितो व आपले मनोरथ पूर्ण करून घेतो.’’

नाथमाधवांची ही भूमिका शंभर वर्षांपूर्वीची आहे. नाथमाधव जे सांगत आहेत, ते बाळबोध आणि कालबाह्य आहे असं मानण्याचं कारण नाही.

सुरुवात आजीबाईंच्या कंदिलाच्या गूढ प्रकाशापासून झाली आहे. भविष्यात हा प्रवास पुढे सरकत राहणार. काही कलाकृती प्रभावित करतात. प्रतिभेला पंख फुटायला मदत करतात. कल्पनाशक्ती तरल करतात. मग उद्देश केवळ मनोरंजनाचा राहत नाही. आयुष्यात कालातीत चांगुलपणा जपावा लागतो. हा चांगुलपणा आणि चिरंतन मूल्ये सोबत घेऊन अनोख्या प्रवासाला सुरुवात करायची असते. ‘वीरधवल’सारख्या कादंबऱ्या केवळ मनोरंजन आणि बुद्धिरंजन करीत नाहीत; व्यक्तिगत पातळीवर जीवनरस प्रदान करतात, समाजालाही बोध देतात. तो बोध स्वीकारायचा की नाही, हे समाजाने ठरवायचं. काही काही कालजयी कलाकृती आपल्याला कुमारवयातच भेटतात, प्रभावित करतात-हे आपलं भाग्य.

Tags: भारत सासणे साहित्य मराठी पुस्तके वाचन वाङ्मय मराठी साहित्य नाथमाधव गो.ना. दातार नाथमाधव वीरधवल weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे,  पुणे
bjsasane@yahoo.co.in

मागील चार दशके भारत सासणे हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक मानले जात असून, त्यात कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, अनुवाद इत्यादी प्रकारचे लेखन आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके