डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘‘अरे वाऽ!... आम्हालाच प्रश्न विचारताय!... हे बघाऽ... कोणी तरी एलियनला या घरात शिरताना पाहिलं आहे, तो गॅलरीतून आला म्हणे...सगळीकडे ही बातमी फोनवर फिरते आहे आणि गावात अगदी भीतीचं वातावरण आहे, एलियनला पाहिलेली माणसं साक्षीसाठी पुढे येतायत...तेव्हा लपवू नकाऽ! सांगा.’’

आपल्या सुनंदाताईच्या मामांना तुम्ही ओळखता ना? शहरात आले की, ते त्यांच्या फ्लॅटवर कामासाठी राहतात आणि पुन्हा शेताकडे निघून जातात. या वेळेस मात्र त्यांच्या बाबतीत काही तरी भयंकर आणि अविश्वसनीय असं घडलं. म्हणून त्यांनी अगदी सकाळीच आपल्या भाचीला- सुनंदाताईला घाईघाईने बोलावून घेतलं. आता, सुनंदाताई एकटीच थोडी जाणार आहे? तिच्यासोबत ‘समशेर आणि मित्रमंडळ’ होतंच. त्या सर्वांनाच मामांची भीतिदायक, आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय हकिगत ऐकायची होती. पण सुनंदाताईने आणखीन एक काम केलं होतं. तिने आपल्या नंदूभय्याला अर्थात समशेरच्या मावसभावाला- म्हणजेच सबइन्स्पेक्टर नंदकुमारलासुद्धा फोन करून बोलावून घेतलं होतं. सगळे मामांच्या भोवती बसून त्यांची अविश्वसनीय हकिगत ऐकत राहिले. चलाऽ, वेळ न घालवता आधी मामांनी जी हकिगत सांगितली, ती त्यांच्याच शब्दांतून आपण ऐकू या...

अरे मुलांनो! झालं असं की, मी शेतावरचं काम आटपून इकडे शहरात आलो आणि या फ्लॅटवर येऊन पोहोचलो, दुपारी चार वाजता. तुमच्या ओळखीचे वकीलकाका मला भेटायला आले. त्यांच्याबरोबर कोर्टाची कामं मी आटपत बसलो. त्यात दोन-तीन तास गेले. मग नाटकाशी संबंधित असलेली हौशी कलावंतांची एक टीम येऊन गेली. म्हणजे, मीच त्यांना बोलावलं होतं- आपल्या गावातून नाटकाचे प्रयोग करायचेत ना, म्हणून. त्यांच्यात दिग्दर्शक होते आणि लेखक पण, नटपण. त्यांच्याशी गप्पा-टप्पा झाल्या. मी एकटाच असल्यामुळे खाली जाऊन सर्वांसाठी दूध घेऊन आलो. नाटकवाल्या ग्रुपपैकी कुणी तरी एकाने सर्वांसाठी चहा केला. मग आम्ही चहा प्यायलो. त्यांच्यापैकीच एकाने कपबशा विसळून टाकल्या. या वेळेस साधारण सव्वाआठ वाजत आले होते. रात्र पडायला सुरुवात झाली होती. सर्वांना निरोप देऊन आणि दरवाजा बंद करून, मी माझ्या वाचनाच्या खोलीमध्ये जाऊन बसलो. तुम्ही पाहताच आहात की, इथून गॅलरीचा दरवाजा आणि गॅलरी स्पष्ट दिसते. मी सगळे कागद आवरले. कामाच्या फायली नीट लावून ठेवल्या. साडेनऊ वाजता मला खाली जाऊन जेवायचं होतं, म्हणून तोपर्यंत एक पुस्तक वाचत बसलो. पुस्तकावरचा टेबललॅम्पचा प्रकाश सोडता सबंध घरात अंधारच होता. आणि त्यानंतर, साधारणतः पंधरावीस मिनिटांनी म्हणजेच पावणेनऊच्या सुमाराला मला गॅलरीकडून अचानक निळा प्रकाश दिसला. मी डोळे ताणून बघत राहिलो आणि माझा डोळ्यांवर विश्वासच बसेना. गॅलरीतून मला चक्क परग्रहावरचा माणूस येताना दिसला...!

‘‘काऽऽऽय...! परग्रहावरचा माणूस?...एलियन?... काय सांगताय काय मामा?’’ सुनंदाताई मोठ्याने ओरडली. बाकीच्या मुलांनीदेखील आश्चर्योद्‌गार काढला. नंदूभय्यासुद्धा उघडच दचकला. आपल्या समशेरलासुद्धा आश्चर्य वाटलंच होतं, पण तो अतिशय एकाग्रपणे मामांची हकिगत ऐकत होता. त्याने शांतपणे म्हटलं, ‘‘मग पुढे काय झालं मामा?’’ उत्तेजित आणि भयभीत झालेले मामा आपली हकिगत पुढे सांगू लागले. ती त्यांच्याच शब्दांत आपण ऐकू या.

...त्या माणसाच्या भोवती निळसर प्रकाश होता.

तो माणूस बुटका, लहानखोर बांध्याचा असला तरी त्याचं डोकं खूप मोठं होतं आणि त्याचे डोळे अगदी प्रखर, थोडेसे तिरके आणि मोठे होते- अगदी वाटीपेक्षा मोठे. बाकी त्याच्या अंगावर अंतराळप्रवाशासारखा सूट होता. काही पावलं तो पुढे चालत आला आणि त्याने काही तरी म्हटलं. त्याचे उद्‌गार मला समजणं शक्यच नव्हतं. पण खर्जातून आलेला कसलासा आवाज होता तो. नंतर त्याने माझ्याकडे बोट दाखवलं, नंतर एका बोटाने त्याने आपल्या घरातल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याकडे निर्देश केला आणि त्याच वेळेस माझ्यावर काही तरी जादूचा परिणाम व्हायला लागला. मला झोप यायला लागली आणि मी बसल्या जागीच झोपी गेलो...

‘‘मामा... तुम्हाला झोप लागली?... आणि नंतर?... नंतर काय झालं?’’

‘‘तुम्हाला जाग कधी आली मामा?’’ ...तेच तर सांगायचंय! तर, मला जाग आली थेट पहाटे. दचकून उठून बसलो, तर मुख्य दरवाजा आतून बंदच होता; पण गॅलरीचा दरवाजा सताड उघडा होता. मला वाटलं, काही तरी स्वप्न पडलं असेल आणि स्वप्नात मी परग्रहावरचा माणूस पाहिला असेल. कारण घर जसंच्या तसं होतं. विसळलेल्या कपबशा तशाच होत्या. टेबलावर पुस्तक तसंच होतं. मला मात्र बसल्या-बसल्या झोप लागली होती. पण वाटलं की, एकदा कॅमेऱ्याचं फूटेज नीट तपासून बघावं. तुम्हाला माहितीच आहे की, आपल्या घरात बाहेरच्या दिवाणखान्यात दोन कॅमेरे बसवलेले आहेत. एक मुख्य दारावर रोखलेला आहे, तर एक गॅलरीच्या दारावर रोखलेला आहे. मागे एकदा चोरीचा प्रयत्न झाला होता, तेव्हा आपल्या नंदूभय्यानेच हे कॅमेरे लावून घेण्याचा आग्रह धरला होता... आठवतंय ना तुम्हाला मिस्टर नंदकुमार?... तर मी पहिल्यांदा कॅमेरा क्रमांक एकचं फूटेज तपासलं. तिथे काहीच दिसलं नाही. कॅमेरा क्रमांक दोनचं फूटेज मात्र तुम्ही स्वतःच बघा...

मामांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच नंदूभय्या उठून कामाला लागला होता. त्याने तत्परतेने आणि कुशलतेने मॉनिटर चालू केला. त्यावरची घड्याळाची नोंद पाहिली. सगळे त्याच्या मागे उभे राहून आणि पुढे मान काढून अतिशय उत्सुकतेने मॉनिटरकडे पाहत राहिले. तिथे काहीच घडत नव्हतं. संध्याकाळच्या सात ते आठच्या सुमाराला नाटकाच्या ग्रुपचे लोक जाता-येताना दिसले. त्यातले दोघं-तिघं गॅलरीत डोकावून गेले. पण त्यानंतर पुढे काहीच दिसलं नाही.

अंधार पडत गेला तसं गॅलरीवरचं चित्रण अंधुक होत राहिलं. रात्रीच्या पावणेनऊच्या सुमाराला मात्र तिथे काही तरी वेगळं दिसलं आणि सगळ्यांनीच आश्चर्योद्‌गार काढला. गॅलरीतून, तिथल्या दरवाजातून निळा प्रकाश डोकावत राहिला आणि नंतर काही सेकंदांतच सगळ्यांनी तो एलियन- परग्रहावरचा माणूस पाहिला. त्याचं डोकं प्रमाणापेक्षा जास्त मोठं होतं आणि डोळे अतिशय प्रखर होते. तो बुटका व लहानखोर होता आणि त्याच्या भोवती कसलासा निळा प्रकाश होता. त्याने प्रवेश केला, तो थबकला. त्याने मान फिरवून सर्वत्र नजर टाकली. नंतर त्याने समोर बोट दाखवलं. नंतर कॅमेऱ्याकडे बोट दाखवलं आणि नंतर मॉनिटरवर रेघा-रेघाच दिसायला लागल्या. पुढे ठार काळोख. पुढे मात्र काहीही दिसलं नाही. सगळे आश्चर्याने स्तब्ध होऊन मॉनिटरकडे पाहत राहिले. आपण चक्क परग्रहावरच्या माणसाला- एलियनला पाहिलं, यावर त्यांचा विश्वासच बसेना. त्यांच्या छातीतली धडधड वाढली.

‘‘हे पाहून मात्र मी ओळखलं की, मला स्वप्न पडलं नव्हतं... माझ्यावर काही तरी जादू झाली होती... म्हणून मी तुम्हाला आणि आपल्या नंदूभय्याला बोलावून घेतलेलं आहे... आता पुढे काय करायचं, सांगाऽ!...’’

२/ समशेर प्रश्न विचारतो!

कोणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता. समशेर आणि मित्रमंडळ प्रचंड उत्तेजित झालं होतं, पण त्यांना काही सुचतदेखील नव्हतं. सगळ्यांना बसलेला धक्का थोडा ओसरायला लागल्यानंतर समशेरने विचारायला सुरुवात केली.

‘‘आपला हा दुसरा मजला आहे ना? मग हा एलियन अचानक गॅलरीतून घरामध्ये कसा आला? त्याचं ते यान किंवा फ्लाइंग सॉसर किंवा यूएफओ त्याने कुठे ठेवलं असेल? आणि तो नंतर लगेच कुठे निघून गेला? त्याला काय पाहिजे होतं? त्याला कॅमेरा आवडला नाही का? तो बोट दाखवून काय सांगत होता?... आणि मुख्य म्हणजे, मामांना झोप का लागली?’’

नंदूभय्या कॅमेऱ्याकडे, मॉनिटरकडे आणि गॅलरीकडे पाहत ताठ उभा राहिला होता. त्याने हसून म्हटलं, ‘‘माझ्या मनातले सगळे प्रश्न तू एका दमात विचारून टाकले आहेस, समशेर!’’

मामा बसले होते त्या खुर्चीच्या मागे जाऊन समशेर उभा राहिला आणि त्याने पिंकीला गॅलरीतून दिवाणखान्यात यायला सांगितलं. पिंकीने एलियनसारखी एन्ट्री घेतली, समशेरकडे बोट दाखवलं आणि नंतर कॅमेऱ्याकडे बोट दाखवलं. ‘‘इथून हे दृश्य व्यवस्थित दिसतं आहे... आणि मामांचा हा चहाचा कप इथेच आहे...’’ समशेरने बोटाने तो चहाचा कप दाखवला.

नंदूभय्याने हातरुमालामध्ये लपेटून तो कप हळूच उचलला, त्याचा वास घेतला आणि एका पिशवीत जपून ठेवला. त्याने म्हटलं, ‘‘याची व्यवस्थित तपासणी करावी लागेल... आणि या बंद पडलेल्या कॅमेऱ्याचीसुद्धा... आता बच्चेकंपनीचं काम झालेलं आहे आणि आमच्या डिपार्टमेंटचं काम सुरू झालेलं आहे... तेव्हा तुम्ही आता घरी जा...’’

नंदूभय्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सर्वांनी जोरात म्हटलं, ‘‘आम्ही मुळीऽऽच इथून जाणार नाही...’’

नंदूभय्या आणि समशेरची मित्रमंडळी यांच्यामध्ये अशी वादावादी सुरू असतानाच डोअरबेल वाजायला लागली आणि सगळे एकदम गप्प झाले. कुणी तरी दाराबाहेर आलेलं होतं!!

३/- चुकवू नका... चुकवू नकाऽ!

नंदूभय्याने पुढे होऊन दार उघडलं. लगेचच टी.व्ही. चॅनलवाल्यांचा गट आत घुसला. ते दोघं-तिघं होतेच.

सोबत पत्रकारही होते. एक तरुण मुलगी हातात माईक घेऊन पुढे उभी होती. कॅमेरे तयारीतच होते.

‘‘मी प्रमिला!... आमच्या न्यूज चॅनलची मी सिनिअर रिपोर्टर!... आम्हाला असं समजलंय की, इथे एलियन आला होता म्हणेऽ!’’

‘‘आँ?... छे... छे!-’’

‘‘खोटं बोलू नका!... कोणी तरी प्रत्यक्ष पाहिलंय आणि त्याने फोन केला होता आम्हाला-’’

‘‘काय सांगितलं फोनवर त्याने?’’

‘‘अरे वाऽ!... आम्हालाच प्रश्न विचारताय!... हे बघाऽ... कोणी तरी एलियनला या घरात शिरताना पाहिलं आहे, तो गॅलरीतून आला म्हणे... सगळीकडे ही बातमी फिरते आहे आणि गावात भीतीचं वातावरण आहे, एलियनला पाहिलेली माणसं साक्षीसाठी पुढे येतायत... तेव्हा लपवू नकाऽ! सांगा.’’

इतका भडिमार करीत ती प्रमिला नावाची मुलगी पुढे-पुढे येत राहिली. अचानक तिचं लक्ष नंदूभय्याच्या तांबूस बुटांकडे गेलं.

‘‘म्हणजे तुम्ही पोलीस आहात!... हॅलोऽ, मी तुम्हाला पाहिलंय यापूर्वी! तुम्ही सब्‌इन्स्पेक्टर नंदकुमार ना?’’

‘‘हो!’’

‘‘तरीच!... म्हणजे पोलीससुद्धा येऊन पोहोचलेत! म्हणजे, काही तरी भानगड आहे!... ही बातमी इंटरनॅशनल न्यूज आहे आता... भारत सरकार तुम्हाला विचारील... नासा विचारील... महत्त्वाची बातमी लपवून ठेवण्याचा ठपका येईल तुमच्यावर... खरं सांगाऽ... तुम्ही मामा ना?... तुम्हालाच दिसला ना एलियन?...’’

कॅमेरे घेऊन प्रमिलाचे सहायक पुढे आले. सगळ्या घराचं चित्रण करायला लागले. मामा गोंधळून गेले. नंदूभय्याही हतबुद्ध झाला; पण त्यांच्याशी धीराने बोलत राहिला. पण इतका वेळ आपला शेरलॉक होम्स्‌ काय करीत होता इकडे? चला- बघू या! समशेरने या गोंधळाकडे लक्षच दिलं नाही. त्याने टेबलावरची वृत्तपत्रं तपासायला आणि वाचायला सुरुवात केली. अचानक त्याचं लक्ष वेधलं गेलं कशामुळे तरी. त्याने पेपर हातात धरला. तो हळूच मामांकडे गेला. त्याने मामांना आत बोलावलं. नवल करीत मामा त्याच्यासोबत आत आले.

‘‘काय रे?’’

‘‘मामा, तुमच्याकडे कोणते पेपर्स येतात?’’ मामांनी नावं सांगितली. समशेरने तो पेपर दाखवला. विचारलं,

‘‘हा... हा पेपर येतो?’’

‘‘छे- छे!... हा तर लोकल पेपर आहे... यात सिनेमा-नाटकाच्या जाहिराती आणि थोड्या बातम्या असतात-’’

‘‘मग हा इथे कसा?’’

‘‘अरे, ती नाटकवाली मंडळी आली होती नात्यांचा असेल, विसरून राहिलेला!’’

समशेरचं समाधान झालं नाही. तो एका नाटकाच्या जाहिरातीकडे आणि शेजारच्या बातमीकडे पाहत राहिला. बातमीवर लाल पेनने सर्कल केलं होतं. एकदा, दोनदा वाचल्यानंतर समशेरचे डोळे चमकू लागले... जणू त्याला काही तरी सापडलं आहे!!

समशेरने ती जाहिरात नंदूभय्याला दाखवली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि म्हणाले, ‘चला, आज संध्याकाळी नाटक पहायला जाऊ या.’

४/ एलियनची धमाल!

थिएटरवर प्रचंड गर्दी होती. मुलं, त्यांचे पालक, शिक्षक, आबाल आणि वृद्ध...सगळ्यांनीच मोठी गर्दी केली होती. बहुतेकांना शहरात एलियन आल्याबद्दलची बातमी समजली तर होतीच, पण या नाटकाबद्दल कुतूहलसुद्धा होतं. नंदूभय्यामुळे समशेर आणि मित्रमंडळींना तिकिटं तर मिळालीच, पण त्यांना अगदी पुढे बसण्याची संधीसुद्धा मिळाली. सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली असतानाच भीतिदायक संगीताच्या ठेक्यावर पडदा हळूहळू उघडला गेला आणि मुलांनी टाळ्या वाजवल्या. सगळेच उत्सुकतेने नाटक बघायला लागले. नाटकाचं नावंच होतं-‘एलियनची धमाल.’

पहिल्या प्रवेशात भारतीय शास्त्रज्ञ गंभीरपणे चर्चा करताना दिसले. त्यांचं म्हणणं असं होतं की, पृथ्वीवर परग्रहावरून बरेचसे एलियन आलेले आहेत आणि आणखीसुद्धा येणार असल्याचा संदेश त्यांनी यंत्रावर पकडला आहे. शहरात एलियन आले तर त्याचा काय परिणाम होईल, अशी ही चर्चा रंगत जात असतानाच प्रवेश संपतो आणि दुसऱ्या दृश्यात एक गृहस्थ आपल्या घरात वाचत बसलेले दिसतात. त्यांना पाहताच सुनंदाताईने आणि आपल्या मित्रमंडळींनी पण आश्चर्योद्‌गार काढला. सुनंदाताई म्हणाली, ‘‘हे पात्र किती मामांसारखं दिसतंय, नाही? तसंच टक्कल, चष्मा, काळा कोट आणि धोतर... टेबल पण तसंच ठेवलंय...’’

समशेरने हळू आवाजात पण शांतपणे म्हटलं, ‘‘पण ताई, इतकंच नाही! मामांच्या टेबलामागे शाळेत असतो तसा पृथ्वीचा गोल ठेवलेला आहे, तसाच त्यांनी इथेसुद्धा ठेवलाय... म्हणजे कॉपी करायचा मोह त्यांना सुटला नाही...’’

‘‘त्यांना म्हणजे कोणाला?... एलियनना?’’

सुनंदाताईने कुजबुजत विचारलं. पण तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, कारण पाठोपाठ लोकांनीच त्यांना दटावून गप्प केलं. मग सगळे शांतपणे नाटक पाहू लागले.

मामांसारखं दिसणारं पात्र वाचत बसलेलं असताना समोरच्या विंगेतून निळा प्रकाश आत यायला लागला आणि भीतिदायक संगीत वाजायला लागलं. पाठोपाठ एलियनने विंगेतून प्रवेश केला. लगेच सबंध थिएटर टाळ्यांच्या कडकडाटात बुडून गेलं. नंदूभय्या, समशेर, सुनंदाताई, हरी, पिंकी, लीला आणि बाकीचे सगळे एकदम ताठ बसून आश्चर्याने पाहत राहिले.

त्यांना आश्चर्य वाटायचं कारण असं होतं की, मामांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमध्ये अर्धा मिनिट दिसलेली आकृती अगदी अशीच होती. अंगात अंतराळप्रवाशासारखा सूट, अंगभर निळा प्रकाश, डोकं प्रमाणापेक्षा मोठं, खूप प्रखर अन्‌ मोठे वाटीच्या आकाराचे डोळे आणि हिरवा रंग. त्या एलियनने आल्याबरोबर डान्स करायला सुरुवात केली. प्रेक्षक मुलांनी शिट्ट्या आणि टाळ्यांनी थिएटर डोक्यावर घेतलं. नंतर त्या एलियनने मामांसारख्या दिसणाऱ्या त्या पात्राकडे बोट दाखवलं. नंतर खर्जातल्या आवाजात काही तरी म्हटलं आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे बोट दाखवलं. पाठोपाठ यंत्र बिघडल्याचा घर्र... घर्र... घर्र असा आवाज येऊ लागला. मामांसारख्या दिसणाऱ्या पात्राला झोप यायला लागली आणि ते पात्र टेबलावर डोकं ठेवून झोपी गेलं.

पाठोपाठ आणखीही एलियन विंगेतून उड्या मारत मंचावर आले आणि त्यांनी धमाल डान्स करायला सुरुवात केली... नाटक असंच रंगत-रंगत पुढे सरकत राहिलं आणि आपला समशेर ऊर्फ शेरलॉक अतिशय एकाग्रपणे सगळं नाटक पाहत राहिला. जणू, त्यातून त्याला एलियनच्या कोड्याचा काही सुगावा लागणार आहे! मामांबाबत घडलेली घटना नाटकात कशी आली...? त्याने स्वतःलाच प्रश्न केला.

0

नाटक संपलं होतं. थिएटरच्या मागे एका मोठ्या जीपमध्ये समशेर आणि मित्रमंडळी बसून होती. स्वतः नंदूभय्या ड्रायव्हरच्या जागी बसला होता. कुणीच काही आवाज करीत नव्हतं, बोलत नव्हतं. कारण तशा सूचना नंदूभय्याने देऊन ठेवल्या होत्या. थोड्या वेळाने लेखक आणि दिग्दर्शकाची जोडी एका स्कूटरवरून जायला निघाली. त्यापूर्वी त्यांनी एका सहायक नटाला म्हटलं, ‘‘बंड्या... आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ.नारळगावकर यांच्याकडे जाणार आहेस ना तू?...विसरू नकोस...’’

आणि नंतर त्यांची स्कूटर सुसाट निघाली. काही अंतर सोडून नंदूभय्याची जीपसुद्धा मागे पळत राहिली.

म्हणजे, चक्क पाठलाग. लवकरच दोघं एका बिल्डिंगसमोर येऊन थांबले. ती जोडगोळी आत निघून गेली तसा हलक्या आवाजात समशेर म्हणाला, ‘‘सुनंदाताई... तू होऊ घातलेली शिकाऊ पत्रकार आहेस... आणि आम्ही सगळे तुझे मित्र अन्‌ या नाटकाचे फॅन आहोत... उद्या सकाळी आपल्याला या जोडगोळीची भेट घ्यायची आहे... समजलं ना?’’

‘‘नाही तरी मला पत्रकार व्हायचंच आहे... काय बोलायचं ते सांग, म्हणजे झालं...’’

नंदूभय्या म्हणाला,‘‘तोपर्यंत मला या बंड्याला ताब्यात घेतलं पाहिजे...’’

५/ सुरेश आणि रमेश!

समशेर ऊर्फ शेरलॉक होम्स्‌ आणि त्याच्या मित्रमंडळाने फ्लॅटची डोअरबेल उत्साहाने वाजवली.

चष्मा लावलेली आणि हातात टेपरेकॉर्डर घेतलेली ‘पत्रकार सुनंदाताई’ तयार होतीच. दार उघडलं गेलं. दारात बहुधा दिग्दर्शक महाशय असावेत. समशेरने त्यांना जवळजवळ ढकलून देऊन आपल्या मित्रमंडळींसह घरात प्रवेश केला. त्याने उत्साहाने बोलायला सुरुवात केली.

‘‘काल आम्ही तुमचं नाटक पाहिलं!... धमाल आहे नुसती!... आम्हाला की नाही... तुमचं नाटक खूप आवडलं... म्हणून आम्ही भेटायला आलो... बंडूकाका म्हणाले, भेटून या...’’

‘‘अं?... बंडूने सांगितलं?’’

‘‘हो, म्हणून तर आम्ही सगळे आलो...! ही आमची बहीण... ही पत्रकार आहे...’’सुनंदाताईने लगेच पुढे होऊन बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, ‘‘सध्या सगळीकडे तुमच्या नाटकाची तुफान चर्चा आहे... काल होते ना मी बघायला... मुलं अगदी बेभान होतात... नाचतात... खूपच धमाल आहे नाटक तुमचं...’’

‘‘हो ना?... अरे सुरेश, बघ कोण आलंय... सुरेशराव नाटकाचे लेखक आहेत, बरं का...’’ पाठोपाठ सुरेश (नाटकाचे लेखक) येऊन कुतूहलाने बघायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद दिसायला लागला.

‘‘इतकं आवडलं तुम्हाला माझं नाटक?’’ त्यांनी विचारलं.

सुनंदाताई आता पुढे होऊन खुर्चीवर जाऊन बसली आणि त्या दोघांची मुलाखतच घ्यायला लागली. कधी लिहिलं नाटक, किती दिवस लागले बसवायला, कसं सुचलं इत्यादी प्रश्न विचारून तिने त्या दोघांना बोलतं ठेवलं. अतिशय आनंदलेले ते दोघे, ‘पत्रकार सुनंदाताई’च्या प्रश्नांना उत्तरं देत राहिले आणि तिचा टेपरेकॉर्डरही मुलाखत रेकॉर्ड करू लागला.

तेवढ्या वेळात आपला समशेर काय करीत होता? समशेरने गॅलरी, गॅलरीचं दार, खिडकी इत्यादीची पाहणी करायला सुरुवात केली. मग तो येऊन बसला. म्हणाला, ‘‘एक्सक्यूज मी काका... पण सध्या या शहरात खरंच एलियन आलेत म्हणे!... मी पेपरमध्ये वाचलं... झालंच तर न्यूज चॅनलवर पण सांगताहेत... खरंच आले असतील का? तुम्हाला काय वाटतं?’’

रमेश आणि सुरेश ही जोडगोळी गंभीर झाली. सुरेश म्हणाला,‘‘या प्रश्नाचा शोध आपल्या शास्त्रज्ञांनी लावायचा आहे... पण एलियन घराघरामध्ये जात आहेत, असं मीसुद्धा ऐकून आहे!... पण आमचं काम मुलांमध्ये आनंद निर्माण करायचं आहे... म्हणून आम्हाला आमचं काम करू द्या... तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना नाटक बघायला सांगा... सगळ्यांना घेऊन या आणि तुम्हीसुद्धा पुन:पुन्हा बघा... पालकांना सांगा... तुमच्या सरांना सांगा... आवडलं ना तुम्हाला नाटक?’’

‘‘होऽऽऽ!’’

सर्वांनी सामूहिक होकार दिला. सुनंदाताईने त्यांची मुलाखत आटोपली, शुभेच्छा दिल्या आणि ‘आज पण नाटक बघायला येणार आहोत’ असं सांगून निरोप घेतला.

मामांच्या घरी दिसलेल्या स्थानिक वृत्तपत्राचा गठ्ठा टेबलावर पाहून समशेरने हरीकडे सूचकपणे पाहिलं.

६/ एलियन आले... पण किती?

रात्रीचे आठ वाजले होते. अंधार पडला होता. सुरेश आणि रमेश अतिशय आनंदाने एकमेकांना टाळ्या देत बसले होते. ‘आपलं नाटक तुफान चाललं आहे आणि शंभर प्रयोग नक्कीच होतील’ असं ते एकमेकांना सांगत होते.

इतक्यात ती अविश्वसनीय घटना घडायला लागली. गॅलरीचा दरवाजा हळूहळू उघडला गेला आणि निळा प्रकाश डोकावू लागला. पाठोपाठ एका एलियनने प्रवेश केला. हा तसाच होता- मामाच्या घरी आलेला आणि काल नाटकात दिसलेला. प्रमाणापेक्षा मोठं डोकं, रंग हिरवा, वाटीएवढे मोठे प्रखर डोळे आणि सर्वांगावर निळा प्रकाश! सुरेश आणि रमेश आश्चर्याने थक्क होऊन बघत राहिले. तेवढ्यात त्या एलियनने डान्स करायला सुरुवात केली. रमेश नावाच्या दिग्दर्शक महाशयाला पहिल्यांदा कंठ फुटला.

दबलेल्या आवाजात त्याने दटावायला सुरुवात केली. ‘‘अरे, अरे, अरे... बंड्या, तिकडे नऊ वाजता प्रयोग सुरू होणार आहे आणि तू इथं काय करतोस?...तुला शास्त्रज्ञ नारळगावकर यांच्याकडे जाऊन कालच्या-सारखंच सोंग वठवायला सांगितलं होतं ना मी?... तिकडे गेला होतास?... आणि इथे येऊन नाचतोयस कशाला?... काय चावटपणा आहे?’’

पण तो एलियन नाचतच राहिला आणि पाठोपाठ आणखी एक एलियन आत आला, मग दुसरा आणि तिसरा आणि चौथा. एलियनची एक टोळीच एकदम गॅलरीमधून हॉलमध्ये घुसली. त्या सर्वांनी धमाल डान्स करायला सुरुवात केली.

‘‘बंड्या, हा काय चावटपणा आहे? तू तर सर्वांनाच घेऊन आलास! आणि तिकडे नाटक कोण करणार? सिनिअर रिपोर्टर प्रमिलाच्या घरी एक टीम पाठवायचं ठरलं होतं ना आपलं? त्यामुळे तिला हे सगळं खरं वाटलं असतं...’’ रमेशने म्हटलं. पाठोपाठ सुरेश म्हणाला, ‘‘आणि हे काय? चहाचा कप? तो कशाला नाचवतोयस इथं, बंड्या?’’

सर्वांत आधी प्रवेश केलेल्या प्रमुख एलियनने कुठून तरी बाहेर काढलेला चहाचा कप नाचवत-नाचवत टेबलावर ठेवला आणि खर्जातून आवाज काढून म्हटलं, ‘‘कारण इथे कप नाही आणि त्यात झोपेचं औषध पण नाही... म्हणून हा कप इथे ठेवला पाहिजे...’’

 ‘‘तू बंड्याच आहेस ना? कोण आहेस तू?’’

‘‘मी बंड्या नाही... खरा एलियन पण नाही...’’

इतकं म्हणून त्या एलियनने आपल्या डोक्यावरचा मुखवटा हळूच काढून टेबलावर ठेवला. तो म्हणाला, ‘‘माझं नाव समशेर कुलूपघरे! मित्र मला शेरलॉक होम्स्‌ म्हणतात... आणि ही सगळी आमची मित्रमंडळी...’’

खुदुखुदू हसणाऱ्या पिंकी अन्‌ लीलाने आपल्या डोक्यावरचा मुखवटा काढून ठेवला आणि बाकीच्यांनी पण तसंच केलं. सुनंदाताई मात्र नाचत राहिली आणि पुढे जाऊन नाचत-नाचतच तिने फ्लॅटचा दरवाजा उघडला, आणि बाहेरून नंदूभय्याने- अर्थात  सबइन्स्पेक्टर नंदकुमारने कडक युनिफॉर्ममधून एन्ट्री घेतली. पाठोपाठ सिनिअर रिपोर्टर प्रमिला आणि तिची टीम होतीच. एखादा जादूगार नमस्कार करतो त्या स्टाईलमध्ये समशेरने सुरेश व रमेशला वाकून नमस्कार केला आणि हसून म्हटलं, ‘‘नाटक चालावं म्हणून आणि खूप प्रसिद्धी मिळावी म्हणून असं काही करण्याची खरं तर गरज नसते... गुणवत्ता असली म्हणजे पुरे... पण मामांना आणि शहरातल्या अनेकांना तुम्ही घाबरवून टाकलंत, हे काही चांगलं केलं नाही... मामांच्या खोलीतला पृथ्वीचा गोल नाटकात जसाच्या तसा वापरून तुम्ही चूक तर केलीच होती... बाकीची कबुली तर तुम्हीच दिली आहे... पुढचा सगळा तर्क करणं फार अवघड नव्हतं...’’

नंदूभय्या पुढे आला आणि म्हणाला, ‘‘सबइन्स्पेक्टर नंदकुमार हिअर! चला, लेखक आणि दिग्दर्शक महाशय, तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा खुलासा करायचा आहे... बंड्या आमच्या ताब्यात आहे!... पण मीही थोडा खुलासा करतो...’’ त्याने खोटा-खोटा सॅल्यूट करून पुढे म्हटलं, ‘‘आपल्या समशेरने त्या बातमीकडे माझं लक्ष वेधलं!... तसंच चहाच्या कपाची रासायनिक तपासणी करण्याचा आग्रह धरला!... आश्चर्य म्हणजे चहात झोपेचं औषध सापडलं! म्हणजे, ज्यांनी चहा बनवला त्यांनी औषध घातलं असणार, हो ना...? आणि बातमीत तर चक्क मामांचं नावच होतं!... म्हणजे नंतर घडणाऱ्या घटनेचा आधीच उल्लेख कसा?...पुढचं सोपं होतं!... श्रेय आपल्या समशेरला!’’

सुरेश आणि रमेश रडवेले होऊन हात जोडून बसून राहिले. सिनिअर रिपोर्टर म्हणाली, ‘‘हा गुन्हा असला तरी ही कलावंताची चूक आहे!... मुलांच्या आनंदावर आम्हाला विरजण घालायचं नाही... आम्ही ही स्टोरी प्रसारित करणार नाही... कडक वॉर्निंग देऊन यांना सोडून देता येईल का, ते बघाऽ!’’ त्यावर नंदूभय्या हसला. त्याने मान डोलावली

आणि म्हटलं, ‘‘तुम्ही काळजी करू नका... आजचं नाटक होईलच आणि पुढेही होतच राहील... कारण मुलांचा आनंद आम्ही मुळीच हिरावून घेणार नाही... घ्यायचा पण नाही... समशेर आणि मित्रमंडळी! चला, तुमच्या प्रयोगाची वेळ झाली... मुखवटे घालून तुम्हालासुद्धा धमाल नाचायचं आहे ना नाटकात? चला तर...’’

मित्रहो! तुम्हाला पण एलियनच्या टोळीमध्ये सामील होऊन धमाल नाचायचं आहे, हो ना? चला तर व्हा सामील! आणि तुम्हाला समशेर ऊर्फ शेरलॉक होम्स्‌चा पत्ता पाहिजे? त्याला भेटायचं असेल ना? घ्या पत्ता लिहून. पाववाली गल्ली... आता तुम्हाला बेकर स्ट्रीटची आठवण यायला लागली, त्याला मी काय करू?

Tags: भारत सासणे समशेर कुलूपघरे शेरलॉक होम्स कथा एलियन bharat sasane story alien Sherlock homes 2016 balkumar Diwali ank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे,  पुणे
bjsasane@yahoo.co.in

मागील चार दशके भारत सासणे हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक मानले जात असून, त्यात कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, अनुवाद इत्यादी प्रकारचे लेखन आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके