डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘‘कुलकर्णीचं म्हणणं असं की, त्याने दहा हजार  रुपये मालकाला परत दिले आहेत. पण त्यांना इतका  राग आला होता की, त्यांना फीटच आली आणि ते  खाली पडले. मालकाचं म्हणणं असं की, त्यांनी  कुलकर्णीचे दहा हजार रुपये पाहिलेच नाहीत; तेव्हा  कुलकर्णी खोटं बोलतोय. पोलिसांना दहा हजार  रुपये काही सापडले नाहीत. तेव्हा हे कोडं काय आहे?  कुलकर्णी खरं बोलतोय का? त्या बिचाऱ्याने कबूल  केल्याप्रमाणे खरंच दहा हजार रुपये परत केले का?  केले असतील, तर ते रुपये कोठे आहेत? बरं, कोणी  ऑफिसच्या बाहेरसुद्धा गेलेलं नाही. 

शासकीय विश्रामगृहाच्या एका खोलीत सगळे  जमले होते... समशेर ऊर्फ शेरलॉक होम्स्‌, सुनंदाताई,  हरी, गोट्या, लीला, पिंकी आणि सगळेच- अगदी  मोत्यासुद्धा! त्या सर्वांचा ‘‘नंदूभय्या’’ अर्थात  सब्‌इन्स्पेक्टर नंदकुमार मोठ्या खुशीत होता. समशेरने  मागचं एक प्रकरण सोडवलं होतं आणि वचन  दिल्याप्रमाणे- ॲज्‌ पर प्रॉमिस्‌- आज नंदूभय्यानेही  सर्वांना छोटीशी पार्टी दिली होती. फ्रूट ज्यूसचे ग्लास  समोर ठेवले होते आणि खाद्य पदार्थांची रेलचेल होती. 

नंदूभय्याने सर्वांकडे हसून म्हटलं,  ‘‘ओके... ओके... यापूर्वी प्रॉमिस केल्याप्रमाणे मी  तुम्हाला स्वखर्चाने ताजमहाल पाहायला आग्ऱ्याला  नेणार आहे... विसरलो नाही मी!... पण आज ही  छोटी पार्टी सगळ्यांसाठी ठेवलीय, कारण आता तरी  आपल्याला काही काम नाही... आपल्या शेरलॉक  होम्स्‌ने चाळीस मिनिटांचं आव्हान यशस्वीपणे पेललं  होतं... आणि ते कोडं सोडवलं होतं!... म्हणून  आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे...’’ 

‘‘पण नंदूभय्या, आग्र्याला जायचं लवकर ठरव ना!... आम्हाला ताजमहाल बघायचाय...’’ 

‘‘होऽ!...ते प्रॉमिस मी राखून ठेवलंय!... चला,  एन्जॉय करा...’’ 

खाद्य पदार्थांवर सगळे तुटून पडले. सगळ्यांना खूप  आनंद झाला होता. सुनंदाताई मात्र जबाबदारीने  कामाला लागली होती. तिच्यासमोर सात मोठी  कलिंगडे ठेवली होती आणि हरीच्या मदतीने ती  कलिंगडे व्यवस्थित कापून फोडी करण्याच्या उद्योगात  मग्न होती. लीला आणि पिंकी त्या फोडी बश्यांमध्ये  भरत होत्या आणि लाडका मोती सर्वांकडे बघून  आपला आनंद व्यक्त करत होता. नंदूभय्याने सर्वांना  हसत-हसत कोडं सांगितलं. 

‘‘सात कलिंगडं होती...सगळी खाल्ली!...  शिल्लक किती राहिली?’’ 

‘‘एऽऽ!... सातच शिल्लक राहतील- आमच्या  पोटात... आणि बश्यांमध्ये साली शिल्लक राहतील...!  हे काय कोडं आहे?’’ सगळे ओरडले. 

‘‘बरं... बरं!... मग आणखीन एक कोडं...’’  नंदूभय्याने सगळ्यांना कोडं विचारायला सुरुवात  केली. 

‘‘एक वाघ असतो!... त्याला पाणी प्यायला  पाणवठ्यावर जायचं असतं!...’’  

‘‘मग?’’   

‘‘पण तिथं काही फोटोग्राफर पण असतात,  त्यांना  लपून वाघाचे फोटो काढायचे असतात... चोरून!’’  ‘‘मग?’’ 

‘‘वाघ त्यांना पाहतो... मग पुढे जातच नाही...  लपून बसतो!’’ 

‘‘मग काय होतं?’’ 

‘‘फोटोग्राफर्स चौघे असतात... एक लपून बसतो  कॅमेरा घेऊन... तिघे परत जातात!... वाघ ते पाहतो  आणि निश्चिंत होऊन पाणी प्यायला जातो!...  कारण? सांगाऽऽ...’’ 

सगळे डोकं खाजवू लागले. एकमेकांकडे पाहू  लागले. समशेर थोडं हसला. मग म्हणाला,  ‘‘का बरं?... वाघ निश्चिंत होऊन पाणी प्यायला  का गेला?’’ 

नंदूभय्याने हसत म्हटलं,  ‘‘कारण वाघाला गणित येत नसतं नाऽ! चार उणे  तीन बरोबर एक, हे गणित त्याला येतच नसतं... त्याने  विचार केला, सगळे गेले... तेव्हा चला...’’  सगळे एकदम धावून गेले. हसत म्हणाले,  ‘‘हे चीटिंग आहे... हे काही कोडं नाही...’’ 

अशी गडबड, गोंधळ आणि मजा चालू असतानाच  एक हवालदार अचानक गंभीरपणे खोलीत आला.  त्याने कडक सॅल्यूट ठोकला. मग त्याने नंदूभय्याच्या  कानात काही तरी सांगितलं. एक फाईल व एक लॅपटॉप  हातात दिला आणि स्वतः एका कोपऱ्यात  अटेन्शनमध्ये उभा राहिला. वातावरणच पालटलं.  हसणारी मुलं थोडी गंभीर झाली, थोडी हिरमुसली  आणि त्यांच्या नंदूभय्याकडे पाहू लागली. सगळ्यात  आधी सावरली ती सुनंदाताई. थोडी वयाने मोठी होती  ना ती!

ती म्हणाली,  ‘‘नंदूभय्या... नो प्रॉब्लेम... तुझं चालू दे काम...  आम्ही इकडे पार्टी एन्जॉय करतो...’’  तिने मुलांना एका कोपऱ्यात जमवलं. पण समशेर  मात्र कुतूहलाने नंदूभय्याकडे पाहत होता. त्याने  विचारलं,  ‘‘काय झालं रे भैय्या?’’ 

‘‘साहेबांनी माझ्याकडे हा लॅपटॉप पाठवलाय...  आणि ही फाईलसुद्धा... मी रजेवर आहे, हे त्यांना  माहितीय... पण तरीही त्यांना माझं मत पाहिजे आहे...’’ 

‘‘कशाबद्दल मत?’’ 

‘‘यात एक व्हिडिओ क्लिप आहे... पाच-सात  मिनिटांची... ती बघायची आणि मत द्यायचं... ही  टिप्पणी पण वाचायची आहे...’’  सबइन्स्पेक्टर नंदकुमारने- अर्थात नंदूभय्याने  पहिल्यांदा फाईलमधली एक पानी टिप्पणी नजरेखाली  घातली. मग लॅपटॉप उघडून त्याने त्यातली व्हिडिओ  क्लिप पाहायला सुरुवात केली. त्याचं समाधान झालेलं  दिसलं नाही. त्याने डोकं खाजवलं.

मग म्हटलं,  ‘‘हे भलतंच कोडं आहे...’’ 

‘‘कोडं?’’  इतकं म्हणून समशेर उत्सुकतेने पुढे आला. 

‘‘काही तरी खटकतंय... पण कळत नाही... तू बघ  रे जरा समशेर... आणि तुम्हीही सगळे बघा...’’

 ‘‘पण प्रकरण तरी काय- सांग ना जरा...’’ 

‘‘सांगतो... नीट ऐका सगळे...’’  नंदूभय्या सगळ्यांना सांगू लागला. सगळ्यांनी कान  टवकारले. प्रकरण असं होतं. 

कोणी बिहारीलाल नावाचे कारखानदार आहेत.  मोठा रागीट गृहस्थ. खूप राग आला की, या गृहस्थाला  फीटच येते. हा माणूस बेशुद्धच पडतो थोडा वेळ. या  बिहारीलालचा कुलकर्णी नावाचा एक कर्मचारी आहे.  या बिचाऱ्या कुलकर्णीने दहा हजार रुपये आपल्या  मालकाकडून उसने घेतले होते. ते बुधवारी परत  करायची बोली होती. पण कुलकर्णी बुधवारऐवजी एक  दिवस उशिरा पोहोचला, मालकाकडे पैसे द्यायला. 

‘‘म्हणजे गुरुवारी... बरोबर?’’  लीलाने विचारलं. नंदूभय्याने मान डोलावली.

तो  पुढे सांगू लागला...  ‘‘एक रिसेप्शनिस्ट असते ऑफिसमध्ये, माहीत आहे ना? तिच्याकडे फोन वगैरे असतात.’’ 

‘‘होऽ! माहीत आहे...’’ 

‘‘तर, हा कुलकर्णी पहिल्यांदा तिच्याकडे गेला  आणि मालकांना भेटायचंय असं म्हणाला...’’  

‘‘कुलकर्णीला बसवून ठेवण्यात आलं बराच वेळ.  नंतर त्याला एकट्यालाच आत बोलावणं आलं. हा  एकटाच आत गेला. हे सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्याने  बरोबर दाखवलंय.’’ 

‘‘मग?’’  समशेरने कुतूहलानं विचारलं. 

‘‘कुलकर्णी आत गेला आणि लगेचच दोन मिनिटांत  मालक मोठ्याने ओरडायला लागला. त्याला खूप राग  आला असणार. नंतर काही तरी धाड्‌कन खाली  पडल्याचा आवाज आला. ऑफिसचे कर्मचारी  धावले. दोघं दरवाजाजवळ उभे राहिले. त्यांची आत  जायची हिंमत झाली नाही. काही धीट कर्मचारी मात्र  आत गेले. दोन-तीन सेकंदांनंतर एका कर्मचाऱ्याने  कुलकर्णीला घट्ट धरून बाहेर आणलं. त्याला वाटलं  असेल की, कुलकर्णीने मालकावर हात उगारला  असावा. पाठोपाठ बाकीच्या कर्मचाऱ्यांनी बेशुद्ध  मालकाला उचलून बाहेर आणलं. मालकाला फीट  आली होती. त्याला सोफ्यावर झोपवण्यात आलं.’’ 

आता सर्वांनाच उत्सुकता वाटायला लागली होती.  सुनंदाताईसुद्धा आता पुढे आली. बाकीचेही पुढे आले.  हरीसुद्धा. गंपूसुद्धा आणि त्याचा मोतीसुद्धा. 

‘‘मग?’’  त्यांनी विचारलं. 

‘‘मग पोलिसांना- आम्हाला फोन केला एका  कर्मचाऱ्याने... आम्ही पोहोचलो लगेचच...  मालकाला तोपर्यंत शुद्ध यायला लागली होती...’’ 

‘‘मग?... त्याने काही सांगितलं?’’ 

‘‘कुलकर्णीचं म्हणणं असं की, त्याने दहा हजार  रुपये मालकाला परत दिले आहेत. पण त्यांना इतका  राग आला होता की, त्यांना फीटच आली आणि ते  खाली पडले. मालकाचं म्हणणं असं की, त्यांनी  कुलकर्णीचे दहा हजार रुपये पाहिलेच नाहीत; तेव्हा  कुलकर्णी खोटं बोलतोय. मग पोलिसांनीही झडती  घेतली. आतल्या चेंबरमध्येसुद्धा तपासलं.  कर्मचाऱ्यांचे खिसे पाहिले. पण पोलिसांना दहा हजार  रुपये काही सापडले नाहीत. तेव्हा हे कोडं काय आहे?  कुलकर्णी खरं बोलतोय का? त्या बिचाऱ्याने कबूल  केल्याप्रमाणे खरंच दहा हजार रुपये परत केले का?  केले असतील, तर ते रुपये कोठे आहेत? बरं, कोणी  ऑफिसच्या बाहेरसुद्धा गेलेलं नाही. कॅमेऱ्याने हे सगळं  टिपलेलं आहे. 

‘‘समशेर! तू बघ बरं... काय दिसतंय! तुम्ही  सगळेच बघा... फक्त सात मिनिटांचं रेकॉर्डिंग आहे...  मला मात्र काही तरी खटकतंय...’’ 

आणि मग मित्रांनो, आपल्या समशेरकडे- आपल्या  शेरलॉक होम्स्‌कडे अशा तऱ्हेने ही सूत्रं आली आणि तो  एकदम गंभीर आणि एकाग्र दिसायला लागला. त्याचे  डोळे चमकायला लागले. सगळ्यांना त्याची ही लक्षणं  माहीतच होती. त्यामुळे तेही गप्प आणि गंभीर झाले.  घोळका करून उभे राहिले. समशेरने पहिल्यांदा टाईप  केलेली ती टिप्पणी शांतपणे नीट वाचली. मग तो  टेबलासमोर बसला. त्याने लॅपटॉप समोर उघडून  ठेवला. बाकीचे सगळे त्याच्या मागे उभे राहिले.  सगळ्यांची नजर लॅपटॉपच्या पडद्यावर. सुनंदाताईने  लॅपटॉप चालू केला. मित्रांनो... तुम्हीसुद्धा समशेरच्या  मागे उभे आहात ना त्या घोळक्यात? तुम्हालाही  बघायचंय ना काय दिसतंय ते? चला तर... बघू या,  काय दिसतंय लॅपटॉपच्या पडद्यावर. अगदी  ‘‘सीनवाईज’’ पाहू या- बारकाईने. 

सीन एक : रिसेप्शनिस्ट मुलगी बसली आहे.  कुलकर्णी येतो. काही तरी सांगतो. मुलगी त्याला  बसायला सांगते. मग फोनवर बोलते. त्याला थांबायची  खूण करते. 

सीन दोन : कर्मचारी खाली मान घालून काम करत  आहेत. कोणी उठलेलं नाही. एक कर्मचारी जांभई देतो. 

सीन तीन : रिसेप्शनिस्टचा फोन वाजतो. मुलगी  फोनवर ऐकते. मालकाच्या चेंबरकडे हात करून  कुलकर्णीला जायला सांगते. कुलकर्णी उठतो. 

सीन चार : कुलकर्णी पाठमोरा दिसतो. तो  मालकाच्या चेंबरच्या दारासमोर थबकलेला आहे.  त्याने दारावर टक्‌टक्‌ केली आहे. मग अदबीने आणि  दार ढकलून कुलकर्णी आत जातो. दार बंद होतं. 

सीन पाच : बंद दाराआड आरडाओरडा ऐकू येतो.  कर्मचारी दचकतात. मान वळवून पाहतात. पाठोपाठ  ‘धप्प्‌’ असा काही तरी पडल्याचा आवाज. 

सीन सहा : कर्मचारी धावतात. रिसेप्शनिस्ट  जागेवरच घाबरून उभी राहते. दोन कर्मचारी बंद  दाराजवळ थांबतात. तीन कर्मचारी दार ढकलून आत  जाताना दिसतात. 

सीन सात : केबिनचा बंद दरवाजा उघडला जातो.  एक कर्मचारी कुलकर्णीला घट्ट धरून बाहेर आणतो.  जणू कुलकर्णी पळून जाणार आहे. पण कुलकर्णी पळून  जात नाही. तो धप्पकन सोफ्यावर बसकण मारतो  आणि बसून राहतो. लगेचच तीन कर्मचारी बेशुद्ध  मालकाला उचलून आणतात. सोफ्यावर ठेवतात. एक  कर्मचारी बाटलीतून पाणी घेऊन बेशुद्ध मालकाच्या  चेहऱ्यावर पाणी शिंपडतो आहे. 

सीन आठ : एक कर्मचारी रिसेप्शनिस्टच्या  टेबलावरून फोन करतो आहे. त्याची पाठ कॅमेऱ्याकडे.   त्यानंतर लॅपटॉपचा पडदा संपूर्ण रिकामा. त्यानंतर  काहीही दिसलं नाही. व्हिडिओ क्लिप संपली होती.  समशेरने आणि सगळ्यांनी ही सगळी दृश्ये क्रमशः  पाहिली, पाच-सात मिनिटांत.

समशेर लॅपटॉपच्या  पडद्याकडे एकाग्रपणे पाहत बसून राहिला. मग  म्हणाला,  ‘‘आतल्या खोलीत कॅमेरा नाही?’’ 

‘‘गुड क्वेश्चन! आत सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला  नाही... त्यामुळे आत काय घडलं, ते समजायला मार्ग  नाही... कुलकर्णी म्हणतो, त्याने खाकी पाकिटात  ठेवलेले दहा हजार रुपये खिशातून बाहेर काढले,  टेबलावर ठेवले. पण त्याआधीच मालकांना फीट  आली, ते ओरडायला लागले आणि खाली पडले...  नंतर काय घडलं, ते सगळं आपण पडद्यावर पाहिलेलं  आहे...’’

 समशेरने विचारलं,  ‘‘आणि ते खाकी पाकीट कोणाजवळच सापडलं  नाही?’’ 

‘‘नाही ना... म्हणून तर कोडं आहे...!’’

समशेर आता कुणाकडेच पाहत नव्हता. त्याची नजर  लॅपटॉपच्या पडद्यावर खिळलेली होती. त्याने गंभीरपणे  पुन्हा लॅपटॉप चालू केला. पुन्हा एकदा तो पडद्यावरची  दृश्ये बारकाईने पाहू लागला. त्याची मित्रमंडळीसुद्धा  मान वाकवून आणि घोळका करून पाहू लागली.  स्तब्धता आणि शांतता. मग दृश्यंसुद्धा दिसायची  थांबली. पुन्हा पडदा कोरा. तरीही समशेर हलला नाही.  त्याने हळूच घसा साफ केला.

तो म्हणाला,  ‘‘नंदूभय्या... पोलिसांना कोणी फोन केला होता?’’ 

‘‘बाबूरावने... यानेच कुलकर्णीला पकडून बाहेर  आणलेलं होतं...!’’ 

‘‘हो... ते दिसतंय या सीनमध्ये... बाबूराव फोन  करताना पण दिसतात...’’ 

‘‘मग?’’ 

‘‘नंदूभय्या, तुला काही तरी खटकतंय ना?’’ 

‘‘होऽ!’’  ‘‘अरे पण भैय्या, वाघाला गणित कळत नसतं...  चार उणे तीन बरोबर एक- हे गणिताचं समीकरण  वाघाला माहीत नसतं नाऽ...’’ 

नंदूभय्या ताड्‌कन उभा राहिला. धावला. त्याने भर्रकन  पुन्हा लॅपटॉप सुरू केला. पुन्हा तो खाली वाकून प्रत्येक  दृश्य पाहू लागला आणि मान हलवू लागला. जणू त्याला  आता थोडं-थोडं समजतं आहे. समशेरने म्हटलं,  ‘‘त्या रिसेप्शनिस्टची झडती घेतली?’’ 

नंदूभय्या आता जवळजवळ ओरडलाच. त्याने  त्याचा मोबाईल चालू केला आणि तो बाहेर धावला.  तो येईपर्यंत सगळे एकमेकांकडे पाहत उभे राहिले.  कोणीच काही बोललं नाही, कारण कुणाला काही  समजलंच नव्हतं. पण मग दहा मिनिटांनी नंदूभय्या परत  आला. तेव्हाही तो मोबाईलवर बोलतच होता.  नंदूभय्याने मोबाईल थोडा दूर केला आणि त्या  हवालदाराला हुकूम केला-  ‘‘सगळ्यांना आइस्क्रीम घेऊन याऽ... क्विक्‌! हे  घ्या पैसे...’’

हवालदार गडबडला. पण त्याने पैसे घेतले आणि तो  बाहेर धावला. एकदम अचानक आइस्क्रीमची ऑर्डर  का दिली, हे कोणालाच कळलं नाही. नंदूभय्या परत  खुशीत दिसायला लागला होता. त्याने म्हटलं,  ‘‘आता मात्र मी माझा शब्द पाळणार!...  सगळ्यांना आग्र्याला घेऊन जाणार... ताजमहाल  दाखवणार... सगळा खर्च माझा...’’ 

‘‘अरे, पण झालं तरी काय?’’  हरीने विचारलं. 

‘‘काय झालं?... अरे, सुटलं कोडं!... वेलडन्‌  समशेर ऊर्फ शेरलॉक होम्स्‌! पैसे रिसेप्शनिस्टकडेच  निघाले... तुझ्या बरोबर लक्षात आलं...  शाब्बास!...’’ 

आता यावर मात्र सुनंदाताई चिडली. रागावली.  थोडी रुसली. म्हणाली,  ‘‘नाहीच आहोत आम्ही इतके बुद्धिमान... पण  आम्हाला समजेल असं काही बोलणार आहात की  नाही?... गणित काय... वाघ काय... कोडं काय! तू  सांग रे समशेर नीट... नाही तर बघ-’’ 

तिने समशेरला हुकूमच सोडला. दमही दिला.  सुनंदाताईच्या सात्त्विक संतापाचा समशेरने मान ठेवला.  तो हसत उठला आणि उभा राहिला- जणू एखादा  जादूगार जादूचे प्रयोग करायला उभा राहतो. किंवा, जणू  एखादा वक्ता व्याख्यान द्यायला उभा राहतो, तसा!  बाकीचे अर्थातच त्यामुळे खाली बसले. कुतूहलाने पाहू  लागले आणि ऐकू लागले. समशेर बोलायला लागला,  सावकाश.

त्याने सुनंदाताईला म्हटलं,  ‘‘ताई... नाही लक्षात येत? वाघाला गणित का  कळत नव्हतं? चार फोटोग्राफर होते... एक लपला...  तीन परत गेले... वाघाला वाटलं, सगळे गेले... त्याला  वजाबाकी येत नाही ना... तो निश्चिंत झाला... पण  इथे कॅमेऱ्याने बरोबर टिपलेलं आहे... आणि  आपल्याला वजाबाकी येत असते...’’

‘‘म्हणजे?’’  सगळ्यांनी एकदम विचारलं.

समशेर पुढे बोलायला  लागला.  ‘‘दोन कर्मचारी दाराजवळ थांबले!... त्यांची आत  जायची हिंमत झाली नाही... तीन कर्मचारी मात्र आत  गेले... एकाने- म्हणजे बाबूरावने- कुलकर्णीला घट्ट  धरून बाहेर आणलं... तिघांनी बेशुद्ध मालकाला  उचलून बाहेर आणलं... तिघे आत गेले होते... चौघे  बाहेर आले!... चौथा कुठून आला?’’ 

‘‘अरेच्चाऽऽ!’’  सगळे ओरडले. 

‘‘म्हणजे हा बाबूराव आधीच आत लपून बसला  होता की काय?’’

 ‘‘हा चौथा कर्मचारी आत होता, हे नक्की-’’ 

‘‘आणि तो बाहेर आला?’’ 

‘‘एक्झॅटली!... अशा वेळेस काय गोंधळ होतो, हे  आपण पाहिलं!... कोण आत गेलं आणि कोण बाहेर  आलं, हे कोण बघणार?... तर, त्या गोंधळात त्याने  पाकीट उचललं, कुलकर्णीला पकडलं आणि बाहेर  आणलं... तोही कर्मचारीच... त्यामुळे कोणाला शंका  आली नाही... मग त्याने फोन करण्याच्या बहाण्याने  रिसेप्शनिस्टकडे जाऊन तिला पाकीट दिलं... मग फोन  करून तो परत आला आणि मालकाजवळ थांबला...  लक्षात आलं?’’

‘‘म्हणून कोणाजवळच पैसे सापडले नाहीत... हो  ना रे?... कारण ते दूऽर रिसेप्शनिस्टकडे होते... ती पण  सामील होती?’’

 समशेर म्हणाला,  ‘‘असणारच!... तर कोडं असं आहे- तिघे आत  गेले... चौघे बाहेर आले... हेच नंदूभय्याला खटकत  होतं... माझ्याही लक्षात एकदम आलं नाही... पण मग  तो जोक आठवला... वाघाचा... नंदूभय्याने  सांगितलेला...!’’ 

‘‘होऽऽ... वाघाला गणित कळत नसतंऽऽ!’’ 

सगळे ओरडले. हसू लागले. आणि त्यांना आपल्या  मित्राचा- समशेरचा खूप अभिमानसुद्धा वाटला.  समशेरने सहजपणे ते कोडं सोडवलं होतं. सबइन्स्पेक्टर  नंदकुमार- म्हणजे आपला नंदूभय्या- समशेरचं  अभिनंदन करीत असताना त्याच्या मित्रांच्या  घोळक्यात तुम्हीसुद्धा उभे आहात ना? तुम्हालासुद्धा  समशेरचं अभिनंदन करायचंय आणि त्याला  भेटायचंसुद्धा आहे... हो ना? पत्ता पाहिजे? घ्या  लिहून- पाववाली गल्ली... काय? बेकर स्ट्रीटची  आठवण येते?... छे... छे... मला काही माहीत नाही! 

‘समशेर कुलुपघरे’ या बुद्धिचातुर्यसाहस  कथांचा नायक भारत सासणे यांनी मराठी  साहित्यात उभा केला आहे, त्याचा हा  आणखी एक पराक्रम.    

Tags: समशेर कुलुपघरे कथा भारत ससाणे बालकुमार दिवाळी अंक bharat sasane story balkumar diwali ank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे,  पुणे
bjsasane@yahoo.co.in

मागील चार दशके भारत सासणे हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक मानले जात असून, त्यात कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, अनुवाद इत्यादी प्रकारचे लेखन आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके