डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रक्त-प्रवाह पणाला लावावा लागतो तेव्हा अक्षरांचं दर्शन होतं. अर्थ त्याआधी प्रवाहित होतो की नंतर, हा पुन्हा वेगळा छळवाद. स्वतःच्या श्वासांची अडचण वाटावी असं संकट. 'क्रिएटिव्हिटी'चं कोडं गडद होत जातं. एक लेखिका म्हणते की हे कोळ्याचं जाळं विणावं तसं आहे. स्वतःतूनच रस बाहेर काढायचा, त्यातून तंतू बनवायचे, त्यातून जाळं विणत जायचं. स्वतः त्यात अडकल्यासारखे वाटतंही. पण अडकायचं नसतं. एक लेखिका म्हणते की माझी पात्रं माझ्या सोबत वावरतात. पण का लिहिता? लेखन आतून येतं की बाहेरून? उत्तरं येत राहतात, त्यांच्याकडून. मी विचारतो, विचारत राहतो, त्यांना आणि स्वतःला. का लिहावं लागतं?

माझ्या एका कथेत, कथा-नायकाच्या घरातला आरसा फुटतो. नायक म्हणतो, की चला, कटकट संपली. आता, नवा आरसा आणण्याचा, बसवण्याचा त्रास वाचला, खर्चही वाचला. नाहीतरी आरसे नको तितकं खरं बोलत असतात. आरशावर अशी केलेली टीका आरशाला आवडत नाही. दुसर्‍याच दिवशी आरसा कथा-नायकाला भेटायला येतो, स्वतःच. त्यानंतर जे संवाद होतात ते या रुपक कथेत नमूद आहेत. ती कथा पुन्हा इथे सांगायची नाही. पण आरसा इतकंच म्हणतो की, तुमच्या मनात जे आहे त्याच्या उलट आम्ही दाखवतो. म्हणजे, तुम्ही डावा हात उचलला की, उजवा हात उचलल्याचं दिसणार, तुम्ही चांगलं दिसण्याचा प्रयत्न केला की त्या उलटं दिसणार. कारण ते वास्तव असतं, जे तुम्ही पाहू इच्छित नाही. आपण जे असतो तसे आपण दिसत नाही. ही आरशाची भाषा आहे. आपण चांगले आहोत असं इतरांना दिसावं, असं तुम्हांला वाटतं. आरशाचं असं स्पष्टीकरण आहे.

आरशासमोर उभं राहणं म्हणजे स्वतःला पाहणं. स्वतःत उतरणं, स्वतःच्या डोळ्यांत डोळा भिडवणं. कवी म्हणतो तसं, स्वतःची भेट टाळण्याचेच दिवस आले आहेत नाहीतरी. कारण स्वतःची दृष्टादृष्ट ही अवघड बाब. तिथं आपणच पणाला लागतो. त्यातून, आपला समुद्र आपल्यातच. आणि नावही आपणच.

तेव्हा मग, तुम्ही का लिहिता? कोणती गोष्ट तुम्हांला लिहितं करते? कोणती अनिवार्यता? कोणती मजबुरी? कोणती कोर्‍या कागदाची हाक ऐकू येते तुम्हांला? मी त्या चार लेखिकांना एका मुलाखतीत प्रश्न विचारतो आहे. प्रश्न त्यांना नाही. खरं तर मलाच विचारतो आहे. विस्तारित होऊन त्यांच्या मुखातून स्वतःला ऐकतो आहे.

रक्त-प्रवाह पणाला लावावा लागतो तेव्हा अक्षरांचं दर्शन होतं. अर्थ त्याआधी प्रवाहित होतो की नंतर, हा पुन्हा वेगळा छळवाद. स्वतःच्या श्वासांची अडचण वाटावी असं संकट. 'क्रिएटिव्हिटी'चं कोडं गडद होत जातं. एक लेखिका म्हणते की हे कोळ्याचं जाळं विणावं तसं आहे. स्वतःतूनच रस बाहेर काढायचा, त्यातून तंतू बनवायचे, त्यातून जाळं विणत जायचं. स्वतः त्यात अडकल्यासारखे वाटतंही. पण अडकायचं नसतं. एक लेखिका म्हणते की माझी पात्रं माझ्या सोबत वावरतात. पण का लिहिता? लेखन आतून येतं की बाहेरून? उत्तरं येत राहतात, त्यांच्याकडून. मी विचारतो, विचारत राहतो, त्यांना आणि स्वतःला. का लिहावं लागतं?

निर्मिती-प्रक्रियेचं एक उत्तर असं मिळतं की ही एक 'केमिस्ट्री' आहे. सर्वसामान्य माणसाच्या सुख-दुःखातून, त्याच्या जगण्या-मरण्यातून, त्याच्या वेदना-व्यापाच्या अनिवार्यतेतून, अटळ प्राक्तनातून लेखक काही रसायनं वेगळी काढू पाहतो, त्याला सापडलेली. या प्रक्रियेत रसायनाची संयुगे सुद्धा होतात. दोन रसायनाच्या संयोगातून तिसरंच रसायन तयार होणार असतं. या प्रक्रियेतला दाह लेखकाला भोगावा लागतो. लेखकाला साक्षीभाव ठेवून, हा दाह स्वतःत शोषावा लागतो. म्हणून इथं, स्वतःला पणाला लावणं आलं. म्हणून आरसा आवश्यक असतो पण अडचणीचा वाटतो. तुम्ही स्वतःला नीट पाहत नाही, अशीच आरशाची कैफियत आहे.

माणसाच्या अटळ अशा व्यथांचा शोध घेताना, लेखक अनेकदा आणि अपरिहार्यपणे, सामाजिक-राजकीय किंवा आर्थिक संदर्भाच्या पलीकडे जाताना दिसतो. स्वतःची आणि इतरांची अस्तित्वकथा त्याला सांगायची असते. त्यासाठी त्याचा प्रवास असतो. कदाचित प्रयासही. हा दूरचा प्रवास, त्याला 'स्व'च्या केंद्राकडे घेऊन जातो. अमूर्तातल्या सुरावटी त्याला खुणावतात. आत्मजन्य दुःखं, बुद्धीजन्य दुःखं, नातेसंबंधांची अनाकलनीयता, जीवनाची व्यामिश्रता, या सगळ्यांतून काही विलक्षण सुरावट निर्माण होत असणार. ही सुरावट आंतरिक तंतुवाद्यावर झेलून लेखकाला मानवी अस्तित्वाबाबतची करुणाकर अशी धून, तयार करावी लागते. सर्वच चिंतनशील लेखकाला या अमूर्त सिंफनीचा शोध घ्यावा लागतो. ध्यास ही घ्यावा लागतो. तेच त्याचं अटळ असं भागधेय असतं. शेक्सपीअर म्हणतो तसं, 'तुला तीच शिक्षा' असते.

'का लिहितो?' असा प्रश्न त्या चार लेखिकांना विचारता विचारता स्वतःला प्रश्न विचारायचे असतात. जी उत्तरं येतात त्या सिंफनीची सुरावट ऐकू येते - ती स्वतःचीच नजर स्वतःच चुकवून ऐकली तर ऐकायची असते. यातून, लेखकाच्या वाट्याला जो दाह येतो, तोच 'चिरदाह' असतो! लेखकाची ही अडचण असते. स्वतःला भेटायचं असतं आणि स्वतःला टाळायचंही असतं. म्हणूनच कथा-नायकाच्या घरातला आरसा फुटतो. कथा-नायकाला सुटल्यासारखं वाटतं, पण आरसाच त्याला भेटायला येणार असतो, कारण आरशाचंही तेच भागधेय असतं. पण कवी जे म्हणतो आहे ते आरशांना समजलं तर आरसे दडून राहतील? की स्वतःच भेटायला जातील कवीला? मला वाटतं, जातील, स्वतः जातील. कवी म्हणतो आहे -

'आईना देख के निकला था
मैं घर से बाहर
आज तक हाथ में 
महफूज है पत्थर मेरा'

म्हणून 'का लिहिता' या प्रश्राचं उत्तर देता देता लेखणी घोटाळते. जे सांगायचे आहे ते सांगून संपलं आहे. असं वाटून घ्यायचे नसतं. कारण 'द रेस्ट् इज् सायलेंस!' हे ठाऊक असतं लेखकाला. त्यातून, जे सांगता येत नाही, ते सांगायचं नसतंच, नाहीतरी.

-त्या चार लेखिकांच्या घरांचा शोध आरसे घेतायत असे ऐकलं. आता उत्तरं त्यांना द्यायची आहेत. प्रश्नं तर, माझ्या निमित्ताने सुरू झाले स्वत:ला विचारलेले प्रश्न!

Tags: सिंफनी रसायनशास्त्र सर्जनशीलता लेखक शेक्सपिअर आरसा symphony chemistry creativity Author Shakespeare mirror weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे,  पुणे
bjsasane@yahoo.co.in

मागील चार दशके भारत सासणे हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक मानले जात असून, त्यात कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, अनुवाद इत्यादी प्रकारचे लेखन आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके