डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आत गुरुजी कुणाशीतरी गोड आवाजात बोलत राहिले. काही माणसं हार घेऊन आली आणि गुरुजींना हार घालून गेली. विषय त्यांच्या सत्काराचा होता...कालचा फाटका धूर्त माणूस आमदार होताच कोट्यधीश कसा होतो? मराठीचा अभिमान बाळगायचा आणि मुलांना इंग्रजी शाळेतून शिक्षण यायचं, हे कसं? इकडे राष्ट्रप्रेम, आणि तिकडे मुलगा- सून अमेरिकेत!...माझ्यासारखा बुद्धिमान मुलगा निर्माण झाला याचं नवल करीत तुम्ही माझ्या परंपरेला, माझ्या जातीला नावं ठेवता आहात की नाही? धिस् इज व्हेरी सट्ल! राष्ट्रवादाच्या गप्पा झडल्या. राष्ट्रप्रेमी मंडळींचे जथ्थे घरटी एक माणूस अमेरिकेला पाठवत राहिले, उद्याच्या सुवर्ण भवितव्यासाठी. इथे मराठीच्या अवहेलनेबाबत चिंतित होत राहिले, आणि मुलाच्या सहकार्यने  अमेरिकेतही जाऊन येऊ लागले. मग प्रवासवर्णनही लिहू लागले. त्याचीही पुस्तकं होऊ लागली.   
 

गुरुजींनी कुलूप उघडलं, दार ढकललं, दारात पडलेली दोन-तीन पत्रं उचलली. मग मागे वळून म्हटलं, 
‘ये रे! मनीष!’
मनीष आत आला आणि गप्प गप्प बसून राहिला. गुरुजींनी त्याच्या ‘मूड’ कडे पहिल्यांदा लक्ष दिलं नाही, मग ते हसून, पत्र वगैरे पाहून म्हणाले, “तू बैस! मी आलो!” 
त्यांनी जरा सकारणच उशीर लावला, आत घुटमळून, मग त्यांनी दोन कप चहा केला; आणि कप सांभाळत ते बाहेर आले. हळूहळू, मनीष एकदम संकोचला. 
‘मला हाक मारली असतीत-' 
‘बैस तर! चहा घे!....’
मनीषने कप घेतला आणि तो हळूहळू घुटके घेत राहिला; जणू त्याला काही घाई नाही. गुरुजी पाहत राहिले त्याच्याकडे. प्रथम, न बोलता; मग त्यांनी विचारूनच टाकलं,
‘हा देश सोडून बाहेर गेलं पाहिजे, असं तुला का वाटतं?’ मनीषने कप बाजूला ठेवला. तो थोडं विचारात पडला, थोडंसं हसला. 

‘सर, इथं काय आहे?’ 
‘अरे, म्हणजे काय?’ 
‘म्हणजे इथे कोणतं भवितव्य आहे?’ 
‘हे तू भावनेच्या भरात बोलतोयस, की तुझा काही विचार आहे?’
‘विचार आहे!’ 
‘सांग तर!’
‘नवं काय आहे? तुम्हाला सगळं माहीत आहे!’
‘तरी पण?’
मनीषने जरा दूर नजर स्थिर केली, जणू तो क्षितिजापलीकडे पाहतोय. त्याला क्लेशही होत असावेत सांगताना; आणि त्याच्या निवेदनात एक छद्म होतं, सूक्ष्म असं.

‘छोट्या-छोट्या तालुक्यांचे भूप्रदेश एका- एका सत्ताधीशाला आंदण दिल्यासारखे असतात! हे इथले कर्ते-करविते! मुळातले हे गुंड-राजकारणी असतात! त्यांच्या ताब्यात तिथल्या शिक्षणसंस्था!... तिथले शिक्षक-
प्राध्यापक त्यांचे गुलाम!... त्यांना स्वतःचा म्हणून काही आवाजच नसतो! साखर कारखाने, पतसंस्था, बाजारसमित्या इत्यादी छोटी-मोठी कुरणं यांच्या मालकीची!.... अशा सामान्य कुवतीच्या लोकप्रतिनिधींची साखळी असते! हे सरदार मोठया सरदाराला जाऊन मिळालेले असतात!... ग्रामीण क्षेत्रात पैसा पोहोचलेला नाही! ... कोरडवाहू शेती परवडत नाही, म्हणून छोटा शेतकरी कंगाल आहे! सरकारी योजनांद्वारे पैसा पोहोचतो, पण त्यात कंत्राटदारी स्थानिक पुढारीच करतात! कामांचं काही होवो, बिल उचलण्यासाठी हे तत्पर!... या देशाचा माजी पंतप्रधान तुरुंगात जाऊ शकतो!... प्रांताचा मुख्यमंत्री तुरुंगात जातो!... टांगेवाले, डोअरकीपर, व्हिडिओ टॉकीज चालवणारे अर्धशिक्षित- असंस्कृत पुढारी कपाळावर टिळे लावून आणि दाढ्या वाढवून मंत्री होतात!... ही सगळी इथल्या सामान्य, सोशिक माणसाची विटंबना आहे की नाही?’ 

मनीषने नाटकातल्या दीर्घ भाषणानंतर ‘पॉज’ घ्यावा तसं थोडं थांबून विचारलं. गुरुजी चकित झाले होते, आणि प्रभावितही झाले. 
‘तुला खरंच असं वाटतं?’
‘हो! लंगोटी पेपर्स फक्त ब्लॅक-मेलवर चालतात की नाही .... मग एकूण नीतिमत्ता शिल्लक आहे का..... एखाद्या क्षेत्रातील?’
‘पण तुला असं का वाटायला लागलंय?' 
‘पण अशी वस्तुस्थिती आहे की नाही?' 
‘साधारणपणे तुझं बरोबर आहे!’
दोघं, न बोलता थोडा वेळ बसून राहिले. तेव्हाच आतमध्ये फोन वाजायला लागला. गुरुजींनी आत्ता येतो, अशा अर्थाची खूण केली. ते आत गेले. फोन मनीषच्या वडिलांचा होता.
‘पोहोचला, मनीष?’ 
‘आलाय इथे!’
‘समजावून सांगता त्याला! फॅडिस्ट आहे! विचारी आहे!... 
‘नाहीतरी, तरुण मुलं आजकाल विचार करीत नाहीत!... तो कोणत्या संघटनेशी वगैरे सलग्न आहे का?’
‘नसावा!... पण सगळ्यांच्या विरोधात बोलतो!’
‘मी बोलतोय त्याच्याशी!’ 
गुरुजी बाहेर आले. हसले.
‘हांऽ! तर काय.... अशी वस्तुस्थिती आहे की नाही?’ 
‘आहे! पण चांगल्या बाजूही पाहिल्या पाहिजेत!’
‘उदाहरणार्य?’
‘हा संतांचा देश…’
‘संतांनी जातीयवाद मजबूत केला की नाही?... कर्मयोग शिकवला का?... दैववाद शिकवला की नाही?’
‘लोकोत्तर महापुरुषांची भूमी...’
‘खादीधारी शोषणकर्ते निर्माण झाले!... आज तुरुंगाची वाट धरताहेत! आदर्श म्हणून कोणाकडे पाहायचं?’
‘लढवय्यांचा देश....’

‘गुलामी स्वीकारली!’ रजपुतांनी मोगलांची, आम्ही सगळ्यांनी मूठभर ब्रिटिशांची! कोणता गौरवशाली इतिहास आहे हा?’

‘एकूण इथं आदर्शवत असे काही नाही तर!... म्हणून देश सोडून बाहेर जावं असं तुला वाटतं आहे?’

‘बाहेर नंदनवन आहे असं नाही! पण इथं कोणाला ‘स्कोप’ नाही! ...जातीयवादी विचारातून राजकारण, अर्थकारण, साहित्य आणि विज्ञान मुक्त नाही!’
‘विज्ञानसुद्धा?’ 
‘फॅसिलिटीज कोणाच्या हातांत आहेत? विज्ञानाची फळे कोण चाखतंय इथं?’ 
‘याबद्दल सविस्तर बोलू या...’ 

तेव्हाच चार-पाच लोक आत आले, एकदम, पूर्वसूचना न देता; आणि वाकून गुरुजीच्या पाया पडू लागले.

‘अरे-अरे! बसा-बसा! काय काढलंत?’ जागा मिळेल तिथं ते बसले आणि खूप आदराने गुरुजींकडे बघू लागले. त्यांच्यापैकी एकजण गुरुजींना कुठल्याशा व्याख्यानाची गळ घालू लागला. गुरुजी ‘छे छे नाही-नाही’ म्हणत राहिले; आणि अर्धवट हसत, अर्धवट नाराज होत त्यांनी प्रस्ताव स्वीकारला. भीत भीत ती मंडळी मानधन वगैरे बोलू लागली तेव्हा थोडं रागावून, गुरुजींनी त्यांना त्या मुद्यावर चर्चा नको, असं सांगितलं; आणि पत्र पाठवा, आठवण द्या, खूप काम असतात ना, असं सांगून त्यांना रवाना केलं, मनीष पाहत राहिला. त्या सगळ्यांकडे. 

ते गेले, तसं गुरुजींनी म्हटलं, 
‘जेवला नसशील, हो ना?' 
‘जेवलो नाही!’
‘कुणावर त्रागा करायचा? आणि का?’
‘छे... छे! त्रागा वगैरे नाही!’... मी फक्त जेवलो नाही. इतकंच!
‘वाटलंच!.... दुसरं , तू स्वतः हा देश सोडून जाण्या विचारात आहेस काय?’
‘नाही, अशी काही तयारी नाही! पण संधी आल्यास जाणार!’ 
‘बाहेर तरी काय, हेच... असंच असेल नाss...’ 
‘वेगळं असेल! स्कोप असेल!’ 
‘प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे तियं चीज तरी होतं! इथं?’
‘एकूण तू कडवट झाला आहेस, मनीष!’ 

पुन्हा एक फोन आला आणि गुरुजी आत गेले. मनीष एकटाच बसून राहिला बाहेर. आत गुरुजी कुणाशीतरी गोड आवाजात बोलत राहिले. काही माणसं हार घेऊन आली आणि गुरुजींना हार घालून गेली. विषय त्यांच्या सत्काराचा होता, पुढे केव्हातरी करण्याबाबतचा. लगेच दोन मुलंही आली, तरुण अशी. एक गोरा, ‘शार्प’ दिसणारा. गुरुजी आतच होते, फोनवर बोलत.. मनीष त्या नव्या मुलांकडे पाहत राहिला, तेही पाहत राहिले. पेशंटसनी एकमेकांकडे दवाखान्यात बसून पाहत बसावं तसं. मग त्या मुलानेच बोलणं सुरू केलं, 

‘काय, पीएचडी वगैरे का?’
‘छे... छे!’ 
‘मग?’  
‘मग काही नाही.’ 
‘मी विश्वजित! गुरुजींचा फॉलोअर...’ 
‘फॉलोअर म्हणजे?’ 
‘म्हणजे मी त्यांचे विचार प्रसारित करतो!’ 
‘आणि त्यांचे विचार काय आहेत?’ 
विश्वजित थोडं तुच्छतेने हसला, म्हणाला, 
‘ते असे थोडक्यात कसे सांगता येतील?’
‘विस्ताराने सांगता येतील ना?’ 
‘तुमचं नाव काय?’ 
‘मनीष!... मी त्यांची मतं विचारायला आलो होतो!’ 
‘सरांची- म्हणजे, गुरुजींची? माय गुडनेस्!’ 
‘त्यात काय झालं? त्यांना मतं असतीलच ना?’  

तेव्हा गुरुजी बाहेर आले. हसले. दोन्ही मुलांनी पाया पडण्याची तत्परता दाखवली. त्यांनी ओळख करून दिली. आरामात बसून त्यांनी जरा विचारी नजरेनं दोघांकडे पाहिलं, म्हटलं, 

‘अरे विश्वजित!... याला कुठे आदर्श दिसतंच नाहीये. या भारतभूमीत... कडवट झाला आहे!... बुद्धिमान आहे!,.. तुला काय वाटतं?’ 

विश्वजितने थोडं चमकून पाहिलं मनीषकडे. मग त्याने वादाचा पवित्रा घेऊन, बुद्धिवादी पद्धतीने पाहून मनीषला म्हटलं, 
‘तुम्हांला आदर्श कुठेच दिसत नाही?’ मनीषने दुर्लक्ष केलं. पण शिकारी कुत्र्यासारखं किंवा शिकवलेल्या ससाणा पक्ष्यासारखं तो पुढे झुकून बघू लागला, जणू मी आता कच्चा खातो वादात, तेव्हा मनीषने म्हटलं, 

‘तुम्हाला दिसतो?’ 
‘हो!’ 
‘कुठे?’ 
‘इथंच!... गुरूमध्ये!... शिक्षणसंस्कृतीत!’ 

‘शिक्षणसंस्कृती काय चीज असते?... कोणती शिक्षणपद्धती?... पहिलीपासून इंग्रजी शिकवता, मग पाचवीपासून शिकवता!.... मेडिकलसाठी एन्ट्रन्स परीक्षा कोणी निर्माण केली? इंग्रजीत पन्नास टक्के मार्क्स ही अट कशासाठी? या पद्धतीने परीक्षा घेतली तर कोण पास होतील आणि कोण नापास होतील? हे कारस्थान तुम्हांला आदर्शवत् वाटतं?’ 

विश्वजित जरा चमकला, थबकला, चकित झाला. गुरुजी आपण कशात नाही, अशा पद्धतीने निवांत बसून ऐकताहेत. मग विश्वजितने म्हटलं, 
‘तुम्ही... कोणत्या संघटनेचे?... तुम्ही दलित वगैरे आहात का?’ त्यावर मनीष मोठ्याने हसला. तेव्हाच त्याचं, सर्वांचंच लक्ष आत गेलं. गुरुजींची मुलगी शुभा उभी होती, दारात, मंद हसत. 

‘चला जेवायला! गुरुजी हसून म्हणाले, तू जेवलेला नाहीस! तिनं ऐकलंय ते! आता सुटका नाही! ...जा बाबा... मनीष! 

मनीषने थोडा संकोच केला, थोडे विश्वजितकडे खुन्नस देऊन पाहिले. विश्वजितनेही त्याच्याकडे तसंच पाहिलं. मग तो आत गेला. 
‘तुम्ही कशाला त्रास घेतलात? आणि जेवलो नाही असं कोणी म्हणाला, की त्याला जेवू घालण्याची तुमच्याकडे प्रथा आहे की काय?’

ती हसली, समजूतदार अशी. तिनं सगळी तयारी करून ठेवलेली होती. 
‘जेवा!... वाद नंतर घाला!’ 
‘ठीक आहे! आधी जेवतोच!  कारण भूक लागली आहे! 

मनीष जेवत राहिला. गुरुजी तेवढ्यात, बाहेर जातो म्हणून सांगून गेले. विश्वजितने लगबगीने शाल उचलली, चपलाही. सगळेच बाहेर गेले. मनीष जेवत राहिला, विचार करीत. 

‘तुमचा प्रॉब्लेम काय आहे?’ 
‘माझा? छे! छे!’
‘मग कडवट का झालात?’ 
‘तुम्ही ऐकलं वाटतं!’ 
‘ऐकावंच लागलं! या घरात नाहीतरी दुसरे काय चालतं?’ 
‘नेहमी वादविवाद, चर्चा चालते वाटतं?’ 
‘उद्यासाठी होप्स आहेत की नाहीत?... मला वाटतं, नेहमीच उद्यासाठी भवितव्य असतंच!’

तुम्हीच म्हणालात जेवा, वाद नंतर म्हणून! आता तुम्हीच वाद करताहात!’ 

शुभा त्यावर हसली, स्वच्छ असं. तिने त्याला पोळी वाढली. ती सहजपणे, पण कदाचित सूचकपणे म्हणाली, ‘सरांनी... म्हणजे गुरुजींनी मत दिलं नसेलच ना?’
‘ऐकून घेतलं! पण त्यांची बुद्धिमत्ता विलक्षण आहे!’ 
‘तुम्ही हे कशावरून म्हणता म्हणजे?’ 
‘मी त्यांची पुस्तकं वाचलीत. व्याख्यानं ऐकलीत!’
‘आणि किती वेळा भेटलात... चर्चा केलीत?’ 
खर तर दोन-तीनदाच!... आज आणि निरोप देऊन!

‘बाबा म्हणाले, जा आणि भेट त्यांना!’ 
‘इथं, सध्याच्या जगण्याच्या पद्धतीमुळे कोणालाच भवितव्य नाही की काय?’  

तो एकदम स्तब्ध झाला. घास हातातच राहिला. 
‘तुम्हाला काय सुचवायचंय?’ 

‘झाडाला फुल येतं तेव्हा आधी ते दिसत नाही, पण ते झाडामध्ये आधीच असतं की नाही? भवितव्यं असतंच आणि ते सुंदर असतं!’ 

‘कदाचित तुमचं बरोबर असेलही! पण सध्या तरी आपण सगळे गाळात रुतलो आहोत! कालचा फाटका धूर्त माणूस आमदार होताच कोट्यधीश कसा होतो? मराठीचा अभिमान बाळगायचा आणि मुलांना इंग्रजी शाळेतून शिक्षण यायचं, हे कसं? इकडे राष्ट्रप्रेम, आणि तिकडे मुलगा-सून अमेरिकेत!’

ती हसली, पुन्हा, स्वच्छ छान असं. तिने बाहेर चाहूल घेतली. म्हटलं,

‘तुम्ही पुन्हा सुरू केलंत! तुम्हांला मी जेवायला सांगितलं होतं!...जेवण आवडलं नाही?’ 
‘आवडलं, म्हणून तर शक्ती येऊन बोलायला लागलो.... पण तुमचं बरोबर असेलही!’
पण तिचं लक्ष त्याच्याकडे नसावं, ती बाहेरचा अंदाज घेत राहिली आणि पटकन् बाहेर गेली, थोडी धावत, कसल्याशा त्वरेने. कोण आलंय ते त्याला तिथून दिसू शकत नव्हतं. जाणून घेण्याचं प्रयोजन नव्हतं, कर्तव्य नव्हतं. पण मनीषला पडद्याआडून शुभा थोडीशी दिसत होती, भ्यालेली.... 
‘का आलास?’ 
‘काय करू मग? धीर सुटायला लागला!’ 
‘गुरुजी घरी नाहीयेत म्हणून!... उगाच तमाशा झाला असता!’
‘मी जातो ..... केव्हा भेटणार आहेस?’ 
‘गुरुजींचा विरोध आहे!’
‘माहीत आहे मला! माझ्यात काय कमी आहे?’ 
‘मला माहीत नाही!... तू आत्ता जाऽ..’ 

नंतर काही कुजबूज, काही चर्चा, धास्तावलेली, त्वरा असलेली. मग तो गेला असावा. शुभा आत आली, भ्यालेल्या व्यथित चेहऱ्याने. 

‘प्रकाश आला होता!’ 
‘कोण प्रकाश?’ 
‘आला होता म्हणून सांगू नका बर का!’ 
‘मी? छे! छे!... मी. कशाला सांगू?’ 
‘पण कोण प्रकाश?’ 
ती त्यावर, न बोलता, जेवण वाढत राहिली. मनीष जेवत राहिला.


-: 2 :-

गुरुजीनी ग्रंथ बाजूला ठेवला. मग मनीषला निरखून पाहत त्यांनी म्हटलं, 
‘तू मांडतोयस तसं हे गणित नाही- नसतं! आणि चित्र इतक निराशाजनकही नाही!... आशेला जागा आहे- असते!’ 
‘'उदाहरणार्थ?’
‘उदाहरणार्थ तूच!’
‘म्हणजे?’
‘म्हणजे असं की ज्या मातीतून तुझ्यासारखे सुपुत्र जन्माला येतात. बुद्धिमान असे.... ती माती वांझ असेल का? या मातीला... या देशाला भवितव्य नसेल?’
‘हे सेंटिमेंटल होतंय....’
‘आणि ज्या शिक्षण पद्धतीवर तू टीका करतोय्स् त्याच शिक्षणपद्धतीने तुला असं बोलण्याचं, असा विचार करण्याचं सामर्थ्य दिलं आहे..... आपल्याकडे विचारस्वातंत्र्य आहे.... तू लोकशाहीच्या एका अद्भुत सामर्थ्यावर उभा आहेस!... तू विचार करू शकतोस.... टीका करू शकतो.... हे तुझं स्वातंत्र्य इथं मान्य आहे!... म्हणून इथं भवितव्य आहे... आशा आहे!’ 

‘हा काही प्रतिवाद नाही...’ 
‘दुसरं असं की, राष्ट्रप्रेम हा मुद्दा! या मुद्द्यामुळे हा देश सोडून जाता येत नाही. किंवा या देशाचा द्वेष करता येत नाही! हा मुद्दा सगळ्यांना बांधून ठेवत असतो!’

चर्चा चालू असतानाच काही प्रसिद्ध व्यक्ती एकदम आत आल्या. बरेच लोकही होते.
‘काय, चर्चा चाललीय वाटतं?’ 
‘दुसरं काय?’
‘गुरुजी! तुमच्या घरात सतत सरस्वतीचा वावरच असतो....’ 
‘का लाजवताय! अहोऽ या भाग्याच्या गोष्टी!’
‘भाग्य मानता का तुम्ही?’ 
‘कर्मही मानतो! बसा ना…’ 

त्या सर्वांनी मनीषकडे खूप परकेपणानं पाहिलं. आणि ते बसले, सगळे. काहींना मिळेना जागा, तेव्हा मनीष उठला, म्हणाला,
‘बसा ना!’ नंतर तो आत गेला, थोड्या चोरटेपणाने. 
‘....कोण हा?’ 
‘आहे एक! बुद्धिमान आहे! लहान आहे!... दुनिया पाहिली नाही!....’

मनीष त्या वाक्यावर थोडं थबकला. त्याला किंचितशा तुच्छतेची झाक वाटली त्या वाक्यात. उगाचंच कोणी हसलं. मग सगळे हसले, मोठ्याने. ते हसणं आपल्याला आहे असं त्याला वाटलं, पुसटसं. शुभा पाहत राहिली त्याच्याकडे, कपाटाला टेकून.  
‘बाहेर नाही थांबलात?’ 
‘एक तर तिथं जागा नाही! त्यातून सगळे अनोळखी- थोर-थोर माणसे!... चहा पण त्यांना द्यावा लागेल ना!... म्हणून सांगायला आलो!’

‘तुम्ही नाही ओळखलंत त्यांना?’ 
‘लांबून फक्त!... ओळख म्हणून नाही!’ 
मनीषने स्टूल घेतला आणि तो कोपऱ्यात बसून राहिला, खिडकी बाहेर पाहत. त्याच्याकडे पाहून शुभा हसली. त्याला तसे बसलेले पाहून, ‘मग आता तुमच्या वादाचं-चर्चेचं काय?’ 
‘काहीच नाही!’ उसासा सोडून त्याने म्हटलं, आणि हसून पाहिलं, मग म्हणाला, 
‘असं वाटलं होतं की माझं काही समाधान होईल. काहीतरी प्रतिवाद ऐकायला मिळेल! खरं तर त्यांनी निरोप देऊन बोलावूनच घेतलं होतं! त्यांनीच फोन केला काकांना, आणि पाठवून द्या म्हणाले!’ 
‘मग?’ 
‘मग मुद्दा सेंटिमेंटस्वर थांबला! त्यांचं म्हणणं असं की ज्या सिस्टीमवर मी टीका करतो आहे, त्या सिस्टीमनेच मला त्याच सिस्टीमवर टीका करण्याचं सामर्थ्य आणि स्वातंत्र्य दिलंय! इतर ठिकाणी ते तसं नसतं! दुसरा मुद्दा माझ्यासारा बुद्धिमान मुलगा-’

मनीषने छातीला हात लावला. कडवट हसून त्याने पुढे म्हटलं,

‘माझ्यासारखा बुद्धिमान मुलगा जिथून निर्माण होतो तिथं, त्या मातीला भवितव्य नाही असं कसं म्हणता येईल? आहे की नाही बिनतोड? म्हणजे मी खूष! सिस्टीम खूष!... माझ्यासारखा बुद्धिमान मुलगा निर्माण झाला याचं नवल करीत तुम्ही माझ्या परंपरेला, माझ्या जातीला नावं ठेवता आहात की नाही? दिस इज व्हेरी सट्ल!’ 

‘असं त्यांना म्हणायचं नसावं, मनीष!’ 
‘पण तसा अर्थ निघतो! म्हणून आता, त्या प्रसिद्ध व्यक्तींची चर्चा चालेपर्यंत मी मागच्या दाराने सटकतो!’ ‘पण तुम्हांलाच चहा बाहेर न्यायचा आहे!’ 
‘अं?’
मी जाणार नाही त्यांच्यासमोर!...ते... त्यांना प्रकाश आवडत नाही! ते उघडपणे बोलतात!... तुम्हीच चहा न्या!’
‘ठीक आहे!’ 

मनीषने ट्रे बाहेर नेला. सर्वांना चहा दिला. कोणी त्याच्याकडे पाहिलंही नाही. न पाहताच कप उचलले. सगळे बोलताहेत. गहन अशी चर्चा चाललीय. मनीष फक्त चहा देणारा. विश्वजितही त्यातच दिसतोय. ते गृहस्थ चिंतेत आहेत काहीतरी. 

‘मिलिंदची काही खबर नाही... गुरुजी!’ 
‘का हो? फोन वगैरे...’

त्याचे तिथले अमेरिकेतील प्रश्न इथं बसून कळणार नाहीत!... पण त्याने एक कंपनी बदलली, दुसरी बदलली पत्ताही बदलला आहे!’...
‘मग?’ 
‘आपण इथे जीव टांगणीवर ठेवायचा झालं!’ 
‘मग?’
‘तुमच्या दिलीपला सांगा त्याचा फोन आला तर!... की जरा चौकशी तर कर म्हणावं!’

‘सांगतो! आजच येणार आहे रात्री!... इथली रात्र तिकडला दिवस!’ मनीष आत गेला. ट्रे त्याने टेबलावर ठेवला. शुभा तशीच उभी होती. ती हसली, थोडं. 
‘तुमचा चहा झाकून ठेवलाय....’ 
‘गुरुजींचा मुलगा अमेरिकेत आहे?’ 
‘मग? तुम्हाला माहीत नव्हतं?’
‘नव्हतं! दिलीपदादा अमेरिकेतच आहे!’ 
‘तो.... का गेला? इथून तिथं?’ 
‘काल म्हणत होतात, की इथे राष्ट्रप्रेम आणि मुलगा-सून अमेरिकेत, ते आम्हांला उद्देशून नव्हतं?’ 
‘माहीतच नव्हतं ना?... नाही, तसं कसं म्हटलं असतं मी मग?’ 
‘म्हणजे अप्रियं न ब्रूयात...' 
‘मला माहीत नव्हतं!... मी जातो आता!’ 

‘बाबा पण जातायत् दिलीपकडे, पुढच्या महिन्यात!’ 
‘गुरुजी? खरंच?’ 
‘हो!’ 
मनीष स्तब्ध झाला. शुभा त्याच्याकडे पाहून हसली, सूचक असं. म्हणाली, 
‘मग? तुम्हाला काय वाटलं?... आणि आता तुमच्या वादाचं आणि चर्चेचं काय?’ 
‘आता?... आता नाही!... जातो मी! येईन पुन्हा!’ तो मागच्या दरवाज्याने बाहेर पडला तेव्हा एक तरुण मुलगा तिथे उभा राहिलेला दिसला, मागेच, घराकडे पाहत. तो प्रकाश असू शकतो, त्याला वाटलं. 

 
-: 3 :-

रात्री दारावर थापा. नंतर बेलही वाजली. मनीषने पुस्तक बाजूला ठेवलं. बाबा झोपले होते. ते आतूनच म्हणाले, ‘कोण आलं असेल रात्री, बघ, एकदम दार उघडू नकोस.’ इत्यादी. मनीषने पाहिलं, तर शुभा उभी दारात. 
‘तुम्ही? आता?’

शुभा जरा चिंतेत होती, थोडी घाबरली होती... भराभर बोलू लागली. 
‘प्रकाशला भेटायला आले होते! गाड्यांची गडबड झाली! उशीर झाला आ हे!.... घरी सगळे चिंता करीत असतील!... गाडी चुकली म्हणून तुमच्याकडे आले असे सांगता येईल का तुम्हांला?’ 

‘म्हणजे, तुम्ही आमच्याकडे आला होतात असं सांगायचं?’
‘हो आणि सोडायला सोबत पण यायचं- म्हणजे त्यांना खरं वाटेल-’ 
‘येतो! आणि सांगतोही... पण खोट्याचा आधार किती घ्यायचा?... त्यापेक्षा त्यांना खरं सांगितलं तर…’ 
‘ते नंतर! आधी चलाऽ...’ आत मनीषचे बाबा उठून बसले असावेत. त्यांनी विचारलं. 
‘कोऽण रे?’ 
‘गुरुजींची मुलगी आलीय!’ 
‘बृहस्पतीची मुलगी? काय आमचं भाग्य? काय म्हणते?’ 
त्याने आत जाऊन, जरा ओरडून खुलासा केला. 

‘जा मग? विचारतो काय? नीट सोडून ये!’ त्याने कपड़े केले. तोपर्यंत ती बसली पण नाही, उभी राहिली चुळबुळत. 
‘चला!... पण जे सांगायचं ते नीट कन्व्हिनसिंग झालं पाहिजे!
‘आपण ठरवू!’ 

दोघं पोहोचले तेव्हा गुरुजींच्या घरात दिवे होते. बाकी इतर घरं अंधारात होती. आकाशात क्षीण चंद्र होता. गुरुजी आत येरझारा घालत होते. मनीषला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. 
‘अरे? काय झालं?' त्याने थोडक्यात सांगितलं. पण त्यांचं समाधान झालं नाही. ते रागाने पाहत राहिले, मग म्हणाले, तू कुठे गेली होतीस; आणि काय करत. होतीस, ते प्रत्यक्ष पाहणाऱ्याने सांगितले आहे! आणि हाही सामील?’

‘छे...छे!’ पण गुरुजी एकदम असंस्कृत अशा आविर्भावात रागाने थरथरत, हातवारे करीत आपल्या मुलीला रागावू लागले; बोलू लागले. त्यातला प्रमुख मुद्दा असा, की प्रकाशची जात हलकी आहे. तो जोड्याजवळ उभा राहण्याच्या लायकीचा नाही, इत्यादी.... आतून विश्वजित मनीषकडे ‘खुन्नस’ देऊन पाहतोय, आणि मनीष गुरुजींकडे. नंतर गुरुजींनी हातही उगारला शुभावर, तेव्हाच उघड्या दारातून प्रकाशने वेगाने प्रवेश केला. 

पुढच्या घटना आश्चर्यकारक होत्या. एक तर शुभाला प्रकाशने पाठोपाठ यावं, याचं आश्चर्यही वाटलं असावं आणि बरंही वाटलं असावं. आणि प्रकाशने असं ‘उघड’ व्हावं; त्या तणावपूर्ण प्रसंगात प्रवेश करावा याची तिला खूप भीतीही वाटली असावी. 

‘काय... करताय काय?’ 
‘तू कोण रे विचारणार?’ नंतर ते एकदम जातीयवादी शिव्या देऊ लागले. प्रकाश पुढे पुढे सरकू लागला, छाती पुढे काढून आणि मनीष त्याला मागे ओढत राहिला, तेव्हा गुरुजी त्याची अवहेलना करून एकदम मारू लागले तेव्हा तो छाती काढून म्हणाला, 
‘मीही उलटून मारू शकेन! पण मी सुसंस्कृत आहे!... आणि तुमचा खरा चेहरा मी पाहतोय! हेच तर मला बघायचं होतं! गुरुजी- वाss! नंतरचं विश्वजितचं धावून येणं, त्या दोघांची मारामारी, शुभाचे ओरडणं, शेजारी लाईट लागणे, मनीषने सोडवणं, प्रकाशला बाहेर घेऊन येणं. गुरुजीचं मनीषलाही आणि प्रकाशलाही परत येऊ नका, असं सांगणं. रात्रीचं गडद होणं, चंद्राचं क्षीण होणं, असं काही घडलं. त्या रात्री, मनीष आणि प्रकाश, कोणतीही ओळख नसताना बांधले गेले अनामिक सूत्राने, आणि चालत राहिले, लांबच लांब रस्ता, सुनसान असा, न बोलता.

-:4:

मनीष पुन्हा गेला नाही. त्यांनी बोलावलं नाही. गुरुजींचे ग्रंथ प्रकाशित झाले. त्यांचा सत्कार झाला. त्यांचं भाषण झालं. भाषणाचं कौतुक झालं. फोटो छापून आले. त्यांनी त्याला पुन्हा प्रतिवाद सांगायला बोलावलं नाही. त्याने त्यांचे ग्रंथ वाचले. त्यांना दुरून पाहिलं एकदा एका निमित्ताने. प्रकाशही त्याला भेटला नाही. पण तो भेटेल अशी त्याला खात्री वाटत राहिली, मनीषला. राष्ट्रवादाच्या गप्पा झडल्या. राष्ट्रप्रेमी मंडळीचे जथ्ये घरटी एक माणूस अमेरिकेला पाठवत राहिले, उद्याच्या सुवर्ण भवितव्यासाठी. इथे मराठीच्या अवहेलनेबाबत चिंतित होत राहिले, आणि मुलाच्या सहकार्याने अमेरिकेतही जाऊन येऊ लागले. मग प्रवासवर्णनही लिहू लागले. त्याचीही पुस्तकं होऊ लागली मनीष पाहत राहिला, तेव्हा त्याला शुभा भेटली, अचानक. तिचं लग्न झालेलं दिसत होतं. ती हसली, त्याला पाहून. त्याने विचारलं.

‘तुमचं लग्न झालेल दिसतंय! प्रकाशशी?’ 
‘नाही! नाही?... मग?’ 
‘दुसऱ्याशीच! आमच्यातलाच आहे!’ 
‘आणि प्रकाश?
‘त्याचं काय? त्याने झुरायचं होतं?... त्यानेही लग्न केलंय....’
‘अच्छाss!’ 
‘बाबा जाऊन आले अमेरिकेला!’ 
‘मला कळले ते! 
‘इथं भवितव्य नाही... उद्याला पहाट नाही असं तुमचं मत अजूनही आहे का?’ 
तो हसला, म्हणाला, ‘म्हणजे तुम्ही लक्षात ठेवलंय! अगदी असंच असं नाही!.. पण, इथं सगळं कठीणच आहे!’
‘म्हणजे तुमचं मत तसंच आहे तर!’ 
‘आणि तुमचं? मला नाही तसं वाटतं!’ 
‘असं तुम्हांला आधीही वाटायचंच!.... आता नंतर तसं का वाटतंय?’
‘त्यांना कळलं तर म्हणाले, की मग का नाही केलंस प्रकाशशी लग्न?.... मग आम्ही प्रकाशला भेटून आलो!’ ‘दोघं?’ 
‘हो! दोघं ... आणि बाबा तुमची आठवण काढतात!’ 
‘खरं की काय?’

‘खरंच! भेटला नाही म्हणतात!... पण खरं तर त्यांना तुमची भीती वाटतेय!’ 
‘माझी? का?’ 

ती दुःखी होऊन म्हणाली, ‘तुम्ही पाहिला ना त्यांचा खरा चेहरा त्या रात्री.. म्हणून! इतरांनी कोणी तो पाहिला नाही ना!’ 

‘म्हणून इथल्याला भवितव्य आहे म्हणता? त्यांना भीती वाटतेय... अजून भीती वाटतेय, म्हणून?... त्यांच्या भीतीमुळे पुढे उद्याचं भवितव्य आहे, असं म्हणायचंय?’ 

‘कदाचित!’
ती पहिल्यांदा खिन्नपणे म्हणाली, मग हसली, अचानक, स्वच्छ असं. नंतर मान तिरकी करून, निरोप घेऊन निघून गेली. मनीषला ‘या’ म्हणाली नाही, पत्ताही दिला नाही. त्यानेही विचारला नाही. 
तो थोडं स्तब्ध उभा राहिला. थोडा विचारात पडला. थोडं, नंतर हसला, स्वतःशीच. 

गुरुजींना मुद्दाम भेटायचं नाही असं मग त्याने ठरवलं, कारण त्यात सभ्यपणा असणार नाही. प्रकाशलाही भेटायचं नाही, मुद्दाम. कदाचित ती म्हणते ते खरं असेल. झाडाला येणारं फूल आज दिसत नसलं तरी ते झाडात असतंच. इथल्या वास्तवाला उद्या भवितव्य असेलही. कदाचित. तोपर्यंत- तोपर्यंत अशा अनेक भयभीत गुरुजींना न भेटलेलं बरं. 

मनीषने नंतर ही घडलेली कथा अनेकांना सांगितली. अनेकांना ती समजली नाही, त्यातील खोच जाणवली नाही. अनेकांना त्यातलं कूट उलगडलं नाही. म्हणाले, ‘वेडा आहेस- मग काय?- सो व्हॉट?’ 

मनीष आता तिकडे जायचं टाळतो. आठवून स्वतःशीच हसतो. कधी कोणाला ही कथा सांगतो- न उलगडता सांगतो. उद्यासाठी इथं, आज, सुंदर अशी तरतूद नाही असं म्हणताना अडखळतो कदाचित तिचं बरोबर असेल. आशावाद आशावादाला आणतो. आशावाद आशेला आणतो. आशा शक्यतेला आणते. शक्यता संभावनेला आणते. संभावनेतून घटना घडते. घटनेतून कदाचित, उद्याचं सोनेरी ऊन पडतं. थोडंसंच कदाचित, कवडसा कदाचित. फक्त उमज पडली पाहिजे. चेहऱ्यामागच्या चेहऱ्याचं दर्शन करणाऱ्याचं वाटणारं भय शिल्लक राहिलं पाहिजे. मग आशा आहे. मगा आशा आहे. ती म्हणते ते खरं असेल, कदाचित. उमलणारं फूल आज दिसत नाही. 

मनीष नंतर गर्दीत चालत राहिला आणि हरवत गेला. त्याचे बाबा त्याला म्हणत राहिले की ‘अरे,नुसता विचार करतोस. जा त्या बृहस्पतीकडे जा.... चर्चा नीट कर.’ त्यावर मनीष हसतो. थोडं त्यांना, थोडं स्वतःला. तो ही घडलेली कथा कधी इतरांना सांगतो. ते म्हणतात, ‘वेडा- मग काय झालं?’

मनीष नंतर मग कुठे गेला नाही. आता उमलण्याच्या फुलाची वाट पाहतो.
 

Tags: जातीयवादी चेहरा गुरुजी मनीष सो व्हॉट कथा आशावाद राष्ट्रवाद भारत ससाणे jatiywadi chehara guruji manish so what katha ashawad rashtrawad bharat sasane weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे,  पुणे
bjsasane@yahoo.co.in

मागील चार दशके भारत सासणे हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक मानले जात असून, त्यात कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, अनुवाद इत्यादी प्रकारचे लेखन आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके