डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

मला त्याचा प्रश्न बोचला. त्याचे म्हणणे काहीअंशी खरे होते. त्याहीपेक्षा जास्त मला दुसऱ्या गोष्टीची काळजी होती. इथे बिजापूरच्या जिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करताना आम्हा सर्वांवर जबाबदारी होती की, या आदिवासी लोकांचा विश्वास जिंकणे. बासागुडा या गावातून कधी नव्हे ते हे लोक आमच्याकडे आशेने मदतीसाठी आले होते. त्यांची रुग्ण मरणाच्या दारात आहे हे त्यांनाही दिसत होते. तिच्यावर इलाज करायला आम्ही नकार दिल्याने त्यांचा विश्वास आम्ही गमावणार होतो. ते लोक रुग्ण परत घेऊन गेल्याने गावातील इतर लोकांचाही बिजापूरच्या रुग्णालयावरचा विश्वास उडणार होता. मला बेच्चोचे मरण दिसत होते. जळालेल्या जखमा आणि अडकलेले मृत बाळ यामुळे काही तासांत तिला तिच्या घरी वेदनादायी मरण येणार होते. कल्पनेतही मला ते चित्र नकोसे वाटत होते. दुसरीकडे आम्ही शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला, तर कदाचित ती ऑपरेशन थिएटरमध्ये टेबलावरच किंवा पुढच्या 24 तासांत मरण पावेल, काही टक्के आशा आहे की, ती वाचेल; परंतु तिच्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे होते.

जेव्हा अतिशय गंभीर अवस्थेतील रुग्णाचा उपचारांनी जीव वाचण्याची शक्यता जवळजवळ नसतेच, तेव्हा अशा मरणासन्न अवस्थेतील रुग्णासाठी एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय केले पाहिजे? अशा रुग्णावर उपचार करणे नाकारून त्याला तशा वाईट अवस्थेत सोडून द्यावे, की निदान काही प्रयत्न करून त्या व्यक्तीला वेदनामुक्त मरण देणे हे डॉक्टरचे कर्तव्य ठरते?

असा प्रसंग कधी माझ्या आयुष्यात उभा ठाकेल आणि एक स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून मला तो निर्णय घ्यावा लागेल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. बिजापूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील प्रभाग हुसूरमधील ‘बासागुडा’ या गावातील 29 वर्षांची ‘बेच्चो’ संध्याकाळी साडेसहा वाजता आमच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. मी माझ्या खोलीत होते, वॉर्डची आया पळतच मला बोलवायला आली, ‘‘मॅडम, जल्दी आओ.’’ काहीतरी गंभीर प्रकरण आहे, हे मी तेव्हाच ओळखले. पण जेव्हा मी ‘उमंग’ या आमच्या मातृ-शिशु इमारतीमध्ये पोहोचले, तेव्हा लेबर रूममधील बेच्चो पाहून मी स्वतःच दचकले. ही 29 वर्षांची बेच्चो नवव्यांदा गर्भवती झालेली. यापूर्वीच्या आठ अर्भकांपैकी चार मृत, तर चार जिवंत. (इतक्या वेळी स्त्रिया गर्भवती राहणे हे या भागात सर्रास आढळते.)

बासागुडा हे अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात येत असल्याने तेथील अगदी बोटांवर मोजण्याएवढेच रुग्ण बिजापूरला येतात. थोडेफार बासागुडाच्या PHC मध्ये इलाजाकरता येतात, तर मोठ्या प्रमाणावर बाळंतपणे घरीच होतात. नक्षलवाद्यांच्या सततच्या वावराने, C.R.P.F. सोबत होणाऱ्या त्यांच्या चकमकींमुळे बासागुडा गाव बदनाम आहे. त्यामुळे 19 तारखेला बेच्चोला बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या, तेव्हा तिला रुग्णालयात नेण्याचा विचार कोणीही केला नाही. घराला लागूनच असलेल्या, शेणाने सारवलेल्या खोलीत तिला नेण्यात आले. गावातील काही अनुभवी वृद्ध स्त्रियांनी तिच्या बाळंतपणाची जबाबदारी घेतली. डिसेंबरचा महिना असल्याने कडाक्याची थंडी. खोलीमध्ये तिला थंडीपासून बचावासाठी शेकोटी पेटवण्यात आली. दोन दिवस तिला कळा येत राहिल्या. 20 तारखेला संध्याकाळी 5 वाजता ती उभी राहून शेकोटीचा शेक घेत होती. वरती खुंटीला कपडा लटकवलेला होता, त्याला धरून ती उभी होती. कळेच्या असह्य वेदनेपायी तिचा हात सुटला, तोल गेला आणि ती शेकोटीवर पडली. दोन्ही पाय, ढुंगण, कंबर जळाली.

पावणेसात वाजता ती माझ्यापुढ्यात ‘उमंग’च्या डिलिव्हरी रूममध्ये होती. मी आयुष्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची रुग्ण पाहत होते आणि नर्सेसप्रमाणे मीही घाबरले होते. ती 45 टक्के भाजली होती, जखमा बऱ्याच खोल होत्या. जळालेली त्वचा कोळशाचा वास मारत टरफलासारखी निघत होती, खालचे मास उघडे पडले होते. अशा जखमा प्रचंड वेदनादायी आणि उपचार करण्यासही गंभीर व अवघड असतात. तिला मी तपासले. तिच्या पोटातील बाळ मृत झाले होते. बाळ बरेच खाली आले होते. तिला जरूर ते इंजेक्शन्स देण्यात आले, माझ्या अंदाजाने एका तासात तिची डिलिव्हरी होणार होती. जिल्हा रुग्णालयातील सर्जन डॉ.नागुलन याच्याशी मी रुग्णाबद्दल चर्चा केली, ‘‘तू डिलिव्हरी कर, पुढच्या तिच्या जळीत जखमांच्या उपचारांची सर्व जबाबदारी मी घेतो.’’ डॉ.नागुलनच्या या आश्वासक प्रतिसादाने मला धीर आला.

दीड तास झाला तरी तिच्या डिलिव्हरीची काहीच चिन्हे दिसेनात. तिचे मृत बाळ मधेच अडकले होते. याला आम्ही ‘obstructed labor’ म्हणतो. आईचा जीव वाचवण्यासाठी अशा केसेसमध्ये तातडीने सिझेरियन शस्त्रक्रियेची गरज असते. तशा गंभीर अवस्थेतही बेच्चो बाळंतपणाच्या कळा घेत होती आणि इतक्या असह्य वेदनेतही तिच्या डोळ्यांत पाण्याचा एक थेंबही नव्हता. कुठून येते इतकी सहनशक्ती या आदिवासी स्त्रियांत? मला आश्चर्य वाटत होते तिच्या न रडण्याचे. डॉ. नागुलनशी चर्चा करून मी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. रुग्णाला शस्त्रक्रियेदरम्यान कधीही मरण येऊ शकते, याची पूर्ण कल्पना नातेवाइकांना दिली. भूलतज्ज्ञ डॉ.मित्तल याला मी तातडीचा निरोप पाठवला. डॉ.मित्तल याच्यासोबत आत्तापर्यंत मी बऱ्याच अवघड शस्त्रक्रिया केलेल्या असल्याने अशी केस फक्त तोच हाताळू शकतो, याची मला पूर्ण कल्पना होती.

डॉ.मित्तल लगेच पोहोचला. त्याने बेच्चोला तपासले आणि मला सरळ नकार दिला. जळालेल्या अवस्थेमुळे बेच्चोला भूल देणे प्रचंड अवघड आणि तिच्या जीवासाठी धोकादायक ठरणार होते. शस्त्रक्रियेतून जरी ती वाचली, तरी भुलीतून ती बाहेरच नाही आली तर व्हेंटिलेटरशिवाय आम्ही तिला वाचवू शकणार नव्हतो. मित्तलने सरळ सांगितले, ‘‘अशा अवस्थेत तिच्यावर आपण उपचार करणे म्हणजे तिच्या मृत्यूला निमंत्रण आहे. आपण तिच्या जीवाशी का खेळायचे? आपण तिला पुढे जगदलपूरला पाठवले पाहिजे, तेच योग्य राहील.’’ डॉ.मित्तलला माझे वागणे पटत नव्हते. त्याच्या जागी तो बरोबरच होता. पण मला माहीत होते की, 180 किमी दूर असलेल्या जगदलपूर येथे तिच्यावर इलाज होणार नाही आणि पुन्हा तिथून पुढे 450 किलोमीटरवर रायपूरला पाठवले जाईल. या सर्व प्रवासात ही कधीही मरण पावेल. पण डॉ. मित्तलशिवाय मी शस्त्रक्रिया करू शकणार नव्हते.

बेच्चोच्या नातेवाइकांना मी कल्पना दिली की, आम्ही रुग्णवाहिकेतून बेच्चोला जगदलपूरच्या मोठ्या सरकारी रुग्णालयात पाठवू. पण ते तयार नव्हते. महिला हात जोडू लागल्या की, जे इलाज करायचे ते इथेच करा. गोंडी भाषा बोलणाऱ्या या अतिदुर्गम भागातील आदिवासी लोकांना एक तर बिजापूरला यायचीच भीती असते, त्यात इथून पुढे जगदलपूरला जायचा तर ते विचारही करत नाहीत. भाषेचा अडसर, शहराची भीती, राहण्या-जेवणाचा खर्च, मागे घरी असलेले बच्चे-कच्चे या साऱ्या त्यांच्या चिंता खऱ्या असतात. त्यातील एका पुरुषाने मला प्रश्न केला, ‘‘हम उसे यहाँ बिजापूर ले कर आये है. अगर आप उसका इलाज नहीं कर रहे है, तोह जगदलपूरवाले क्यों करेंगे? इधर नहीं हो रहा, तो उधर भी इलाज नहीं होगा, हमे पता है.’’ त्यांनी तिला परत बासागुडाला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

मला त्याचा प्रश्न बोचला. त्याचे म्हणणे काहीअंशी खरे होते. त्याहीपेक्षा जास्त मला दुसऱ्या गोष्टीची काळजी होती. इथे बिजापूरच्या जिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करताना आम्हा सर्वांवर जबाबदारी होती की, या आदिवासी लोकांचा विश्वास जिंकणे. बासागुडा या गावातून कधी नव्हे ते हे लोक आमच्याकडे आशेने मदतीसाठी आले होते. त्यांची रुग्ण मरणाच्या दारात आहे हे त्यांनाही दिसत होते. तिच्यावर इलाज करायला आम्ही नकार दिल्याने त्यांचा विश्वास आम्ही गमावणार होतो. ते लोक रुग्ण परत घेऊन गेल्याने गावातील इतर लोकांचाही बिजापूरच्या रुग्णालयावरचा विश्वास उडणार होता. मला बेच्चोचे मरण दिसत होते. जळालेल्या जखमा आणि अडकलेले मृत बाळ यामुळे काही तासांत तिला तिच्या घरी वेदनादायी मरण येणार होते. कल्पनेतही मला ते चित्र नकोसे वाटत होते.

दुसरीकडे आम्ही शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला, तर कदाचित ती ऑपरेशन थिएटरमध्ये  टेबलावरच किंवा पुढच्या 24 तासांत मरण पावेल, काही टक्के आशा आहे की, ती वाचेल; परंतु तिच्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे बासागुडाच्या लोकांना संदेश जाईल की, बिजापूरच्या डॉक्टरांनी प्रयत्न केले. आपल्या रुग्णाला वाऱ्यावर सोडून नाही दिले. सरकारी रुग्णालय आणि डॉक्टरांबद्दल त्यांना विश्वास वाटेल. तसेच तिला घरात योनीत बाळ अडकलेल्या वेदनादायी स्थितीत मरण येण्यापेक्षा भुलीमध्ये शांत वेदनामुक्त मरण आले तर ते माणुसकीचे ठरणार होते. तो अवघड निर्णय आम्हा सर्वांना घ्यावा लागणार होता. बेच्चोला बासागुडाला घरी नेण्यासाठी रुग्णवाहिकेत ठेवले गेले. ती अजूनही खाली जोर लावून ते बाळ बाहेर काढण्याचे प्रयत्न करतच होती. ‘‘मॅडम, उसे मत जाने दो,’’ असे म्हणत नर्सेस रडकुंडीला आल्या होत्या. तेवढ्यात अचानक डॉ.मित्तल आणि डॉ.लोकेश दोघेही तिथे पोहोचले. डॉ.मित्तलने ती सारी स्थिती पाहिली आणि सूचना केली, ‘‘चला, रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या.’’ आणि मी सुटकेचा नि:श्वास सोडला.

आम्हा सर्वांच्या अथक प्रयत्नांनी तिची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि रात्री 12 वाजता ती यशस्वीरीत्या भुलीतून बाहेरही आली. पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे होते. त्यात जर ती जिवंत राहिली, तर तिचा जिवावरचा धोका टळणार होता. डॉ.मित्तल व मी रात्री आळीपाळीने बेच्चोला तपासत होतो. पहाटे चार वाजता खोलीत झोपताना मी प्रार्थना करत होते की, काही तरी चमत्कार व्हावा आणि ती वाचावी. दुसऱ्या दिवशी बेच्चो जिवंत राहिली. आमच्या नर्सेस आनंदित होत्या की, आपण बेच्चोला वाचवू शकलो. चार नर्सेस मिळून तिच्या जखमा साफ करत होत्या, औषध लावून ड्रेसिंग करत होत्या. तिसऱ्या दिवशी बेच्चो माझा हात धरून बेडमध्ये उठून बसली. नर्सेसने मिळून तिला पकडून उभे केले, चालवले, तिचे तोंड धुतले, केस विंचरले. हा सर्व प्रवास आम्हा ‘उमंग’च्या डॉक्टर्स व नर्सेससाठी एक नवी शिकवण ठरली. मला बेच्चोच्या जिद्दीचे, सामर्थ्याचे, सहनशक्तीचे प्रचंड आश्चर्य वाटत होते. या सगळ्यात एकदाही ती रडली नाही, किंवा एकदाही ‘मला दुखते आहे’ अशी तिने तक्रार केली नाही. कशाच्या बनलेल्या आहेत या आदिवासी स्त्रिया? आपल्याला एक सुई टोचली तर रडू येते आणि ही भाजलेल्या खोल जखमा घेऊन, मृत बाळासोबत गर्भाशयही काढण्याची मोठी शस्त्रक्रिया होऊनही दोन दिवसांत जिद्दीने उभी राहते, चालते; इतकी शक्ती कुठून येते यांच्या अंगात?

सर्जन डॉ.नागुलनने पुढे तिचा ताबा घेतला. तिच्या जखमा बऱ्या करण्यासाठी त्याचे अजूनही अथक प्रयत्न चालू आहेत. तिला 12-13 बाटल्या रक्त देऊनही तिचे हिमोग्लोबिन अजून कमी आहे. तिचे नातेवाईक तिला एकटे सोडून गेले आहेत. पण तिची जिद्द आहे बरी व्हायची आणि ती एकटीच राहते आहे जिल्हा रुग्णालयात. ते तीन-चार दिवस मी बेच्चोच्या अतिताणाने थकून गेले होते. काही तरी कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.अय्याजसरांना भेटायला गेले. सरांशी गप्पा झाल्या तेव्हा सर्व ताण कुठल्या कुठे पळून गेला. नवी प्रेरणा मिळत राहते सरांना भेटून. संध्याकाळी होस्टेलवर परतले तेव्हा सर्व मिळून सजावट करत होते. अय्याजसरांचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता आणि रात्री सरप्राईज पार्टी आयोजिली होती. गेले काही दिवस मी नीट खाल्ले-प्यायले नव्हते, झोपले नव्हते. त्या रात्री वाढदिवसाच्या पार्टीत पोट भरून जेवले. मिळून गाणी गायली. आनंद यापेक्षा वेगळा काय असतो?

बिजापूरमध्ये मॉल्स व सिनेमाहॉल नसला तरी आम्ही सारे खूप धमाल करतो, खूष राहतो. कधी ताण-तणाव आला तरी सर्व एकमेकांना मदत करतात, मिळून राहतात. व्हॉट्‌स ॲपवर मी महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या ग्रुपवर बेच्चोची केस लिहिली. मला ओळखणाऱ्या न ओळखणाऱ्यांनीही आमच्या टीमचे मनापासून अभिनंदन केले. दोन दिवस कौतुकपर मेसेज येत राहिले आणि माझ्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू आले. एक जिद्दी, प्रामाणिक जिल्हाधिकारी बिजापूरमध्ये सर्व सुविधायुक्त रुग्णालय उभे करतो काय, वेगवेगळ्या राज्यातून आम्ही डॉक्टर्स इथे येतो काय आणि सारे मिळून एका आदिवासी स्त्रीसाठी प्रयत्न करतो काय- सारेच मला स्वप्नवत्‌ वाटते.

Tags: आदिवासी स्त्रीरोग छत्तीसगढ tribal adivasi strirog chhattisgadh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात