डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

थेरीगाथा : स्त्रीचळवळीसाठी वैचारिक दृष्ट्या पोषक मांडणी

स्त्रियांच्या संदर्भात केलेला उदात्त विचार आणि बौद्ध वाङ्‌मयातील थेरींबद्दल असलेल्या आकर्षणातून हेतकरांनी थेरींविषयी तौलनिक मांडणी साकारत भारतीय समाजरचनेत त्यांनी निर्माण केलेली स्वतंत्र ओळख या ग्रंथाद्वारे ठळकपणे अधोरेखित होते. ‘स्त्रीमुक्ती चळवळीला स्त्रीसंतांचे योगदान : कल्पना, वास्तवता व थेरींची तुलना’ या लेखामधून थेरींनी स्त्रीमुक्ती चळवळीला कसा हातभार लावला, त्यावर सत्यशोधकीय झोत त्यांनी टाकला आहे. स्त्रीमुक्ती चळवळीच्या संदर्भात भारतात स्त्रीसंतांचे योगदान लक्षात घेतले जाते. मात्र, बौद्ध धम्मात अर्हतपदी पोहोचल्या थेरींचा स्त्रीमुक्तीचा स्वर अथवा त्यांनी माराशी निग्रहपूर्वक केलेल्या संघर्षाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. असे असले तरी, जागतिक स्तरावर या स्त्रियांच्या कर्तृत्वाचा शोध-हीस डेव्हिड्‌स, आर पिशेल व कॅथरीन ब्लॅकस्टोनसारख्या तत्त्वज्ञांनी-विचारवंतांनी घेतला आहे. 

‘थेरीगाथा : स्त्रीमुक्ती, समाज आणि तत्त्वज्ञान’  हा सुनील हेतकर यांचा स्त्रीचळवळीस पोषक ठरलेला महत्त्वाचा ग्रंथ. ‘पुरुषप्रधान संस्कृतीखाली दबलेल्या, पिचलेल्या जगातील तमाम स्त्री-स्वरांना व स्त्रियांना सामाजिक सन्मान मिळवून देणाऱ्या युगपुरुषांना’- ही बोलकी अर्पणपत्रिका ग्रंथलेखनामागची भूमिका स्पष्ट करते. यानिमित्ताने दबलेल्या स्त्री-स्वरांचे  हुंकार सर्वसामान्यांना ज्ञात होतील. यापूर्वी ‘थेरीगाथा’च्या संदर्भात मराठी भाषेतून अल्पांशाने लेखन झालेले आहे. पण इतर ग्रंथांप्रमाणे या ग्रंथात दंतकथा, काल्पनिक बाबींना थारा न देता लेखकाने तटस्थपणे वस्तुस्थितीचे आकलन व अभ्यास करून लेखन केले. त्यामुळे सदर ग्रंथाचे मोल धम्मचळवळीसह स्त्रीचळवळीस अनेकार्थाने पोषक ठरते. ‘थेरीगाथा : स्त्रीमुक्ती, समाज आणि तत्त्वज्ञान’ या ग्रंथाच्या निर्मिती भारतीय समाजातील एकूणच स्त्रियांच्या जीवनाचे सम्यक्‌ दर्शन या माध्यमातून प्रकट व्हावे व त्यातील बुद्ध तत्त्वज्ञान सामान्यापर्यंत  सामाजिक बांधिलकीतून पोहोचावे या व्यापक दृष्टिकोनातून झाली. ‘थेरीगाथा’ हा त्र्याहत्तर स्त्रियांच्या जीवनानुभवांचे कथनमूल्य असलेला पहिला पद्यात्मक स्वरूपाचा मौलिक ग्रंथ होय. स्त्रीजीवनातील स्वानुभवाच्या मनोज्ञ उद्‌गाराची ही सैद्धांतिक गाथा भारताच्या इतिहासातील पहिली  वाङ्‌मयनिर्मितीची घटना म्हणता येते.

‘थेरी’ म्हणजे मुक्तिपदाला अथवा अर्हतपदाला पोचलेल्या बौद्ध भिक्षुणी. ‘गाथा’ म्हणजे बौद्धकालीन भिक्षुणींनी स्वानुभवातून रचलेल्या पदांचा संग्रह. तो गद्य, पद्य, कथा व संवाद या वाङ्‌मयीन अंगानेदेखील समृद्ध ठरला आहे. पाली भाषेतील ‘त्रिपिटक’ हा ग्रंथ बुद्धाच्या वचनांचा, तत्त्वज्ञानांचा संग्रह म्हणून जगप्रसिद्ध आहे. यामध्ये तीन पिटकांचा समावेश आहे. 1) सुत्तपिटक, 2) विनयपिटक व 3) अभिधम्मपिटक असे त्यांचे तीन भाग पडतात. यामधील सुत्तपिटकात पाच संग्रह आहेत. ते पुढीलप्रमाणे- 1) दीघनिकाय 2) मज्झिमनिकाय 3) अङ्‌गुत्तरनिकाय 4) संयुक्तनिकाय 5) खुद्दकनिकाय. या पाच संग्रहांमधील खुद्दकनिकायात एकूण 15 उपसंग्रहांपैकी आठव्यात थेरगाथा आणि नवव्या संग्रहात थेरीगाथांचा समावेश आहे. शिवाय तेराव्या उपसंग्रहात थेर व थेरींच्या जीवनकथांचा समावेश आहे. उपसंग्रह 9 यामध्ये 73 भिक्षुणींच्या एकूण 522 गाथा आढळून येतात, असे वर्गीकरण नमूद केले आहे.

थेरीगाथेतील वचनांमध्ये ज्या बौद्ध भिक्षुणी कार्यरत होत्या, त्यामध्ये चार स्तर आढळून येतात. 1) कोशल, मगध आणि आलवी राजवंशाच्या महिला. 2) शाक्य व लिच्छवी सामंतांच्या महिला. 3) ब्राह्मण कुटुंबातील स्त्रिया. 4) वेश्याव्यवसायातील स्त्रिया आढळून येतात. तात्पर्य, थेरीगाथेमध्ये समाजातील सर्व प्रकारच्या स्त्रिया कार्यरत होत्या. जेव्हा त्या बुद्धाच्या धम्माला जाऊन मिळाल्या तेव्हा त्यांच्यामधील सर्व प्रकारचे भेद बुद्धवचनांच्या श्रवणाने गळून पडलेले दिसतात.

थेरीगाथांच्या इतिहासाचे अवलोकन केल्यास गौतम बुद्धांच्या स्त्रीविचाराकडे लक्ष वेधले जाते. तथागत गौतम बुद्धांनी व्यावहारिक व तात्त्विक अशा दोन्ही पातळ्यांवर स्त्रियांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले. स्त्रियांना संघात प्रवेश देण्याची बुद्धांची कृती म्हणूनच स्त्रीस्वातंत्र्याची नांदी ठरली. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्त्वत्रयीमुळे बुद्धाचा धम्म केवळ पाचशे वर्षे न टिकता अडीच हजार वर्षांहून अधिक काळ टिकून आहे.

बुद्धांनी संघात प्रवेश देताना आठ प्रकारच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले. ही नियमांची आचारसंहिता बौद्ध भिक्षूंसाठीदेखील तयार केली. त्याची परिणती म्हणून बुद्धांनी महाप्रजापती गौतमीसह पाचशे स्त्रियांना प्रव्रजित होण्यास अनुमती दर्शविली. अशा प्रकारे स्त्री-पुरुषांनी युक्त बुद्धाचा संघ सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यास तप्तर झाला. बुद्धाच्या या व्यापक विचारांमुळे त्यांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान अंगीकारून मानसिक विकास घडवून आणला आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने स्वत:चा इतिहास साकारला. हा काव्यमय इतिहासच थेरीगाथेमधून पाहायला मिळतो. 

‘बौद्ध वाङ्‌मयात माराचे स्थान व थेरींचा संघर्ष’ याची अतिशय अभ्यासपूर्ण व  चिकित्सक मांडणी हेतकरांनी या लेखात केली आहे. ‘मार’ ही विध्वंसक, हिंसक मानसिक प्रवृत्ती असून बौद्ध वाङ्‌मयात ‘मार’ या मानसिक प्रवृत्तीला व्यक्तिरेखेच्या स्वरूपात साकारले. ज्याप्रमाणे हिंदू संस्कृतीत राक्षस ही कल्पना व्यक्तिसदृश रूपात मांडलेली आहे, तसा ‘मार’ या मानसिक प्रवृत्तीचा वापर बौद्ध वाङ्‌मयात केलेला दिसून येतो. या मताचे तर्कशुद्ध निरसन करण्यासाठी हेतकरांनी मार ही कोणी व्यक्ती नसून ती अकुशल विचारांचे प्रतिनिधित्व करणारी मानसिक प्रवृत्ती आहे; मार या मानसिक प्रवृत्तीला व्यक्तिरूप देऊन सर्वसामान्यांच्या मनात अंधश्रद्धेची बीजं रोवली जातात, असे निक्षून सांगितले. लहरी मनावर जसे कुशल विचार अधिराज्य करतात, तसे अकुशल विचारही आक्रमण करीत असतात. ज्या व्यक्तीला चांगले-वाईट व सत्य-असत्याचे योग्य आकलन होते, ती व्यक्ती ध्येयप्राप्तीकरिता अनेक अडचणींवर मात करते. दुष्ट विचारांशी संघर्ष करीत आपले ध्येय गाठण्यात ती यशस्वी होते. थेरींनीसुद्धा अशा अकुशल विचारांवर मात करीत आपले इप्सित गाठले. या मार्गावर चालू पाहणाऱ्या थेरींदेखील मोठ्या निग्रहाने सदसद्‌विवेकबुद्धीचा वापर करून माराच्या अकुशल विचारांवर विजय प्राप्त केला. अशा थेरींपैकी शैला, खेमा, सोमा, उप्पलवणा, चाला, उपचारा व शीर्षोपचाला या थेरींचा रोमहर्षक संघर्ष मनोज्ञरीत्या साकारला आहे, तो प्रेरक म्हणता येईल.

थेरीगाथेत रूपकाचा अतिशय उत्कृष्ट वापर करून ही अकुशल प्रवृत्ती साकारली गेली असली तरी, ही दुष्ट प्रवृत्ती मानवासंगे सावलीसारखी सोबत करते. म्हणून हेतकरांनी त्या प्रवृत्तीला मानवाचा मित्र म्हटले आहे. ‘माराने अर्थात मनाने’ केवळ बुद्धांची समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला नाही, तर निर्वाणप्राप्तीसाठी इच्छा धरणाऱ्या थेर व थेरींनादेखील याचा प्रत्यय आलेला आहे. ह्या थेरी आपल्या मार्गात अडसर आणू पाहणाऱ्या कामवासना, कंटाळा, भूक व तहान, विषयवासना, आळस, भीती, कुशंका, गर्व, लाभ व सरकार, पूजा व खोटी कीर्ती अशा सेनांना निश्चयाने पराभूत करतात आणि अकुशल विचारांवर विजय मिळविताना दिसतात. त्या हरेक थेरींचे लेखकाने केलेले वर्णन केवळ रसाळच नाही, तर तर्कशुद्धरीत्यादेखील मनाला भावते. एकूणच, माराने अकुशल मनाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना थेरींनी बुद्धाच्या तत्त्वप्रणालीचा सांगोपांग, यथार्थ विचार करून खंबीरपणे उत्तरे दिली. त्यामुळेच थेरी इतर कोणत्याही धर्मांतील स्त्रियांपेक्षा विश्वात श्रेष्ठ ठरलेल्या आहेत.

या ग्रंथातील तिसऱ्या लेखात ‘थेरीगाथेतून अभिव्यक्त होणारे दु:ख व दु:खनिरोध’ याचा परामर्श घेतला आहे. हा परामर्श घेताना पाली भाषेतील मूळ गाथा सादर करून त्याचा मराठी अन्वयार्थ अंकित केला. त्यामुळे थेरींची वेदना समजून घेण्यास एक प्रकारे मदतच झाली. थेरींनी दु:खमुक्ती कशी प्राप्त केली, याचाही चिकित्सक वेध घेतला. लेखकाच्या या अमोघ परिश्रमामुळे ते अभिनंदनास पात्र ठरतात.

भारतीय समाजरचनेत स्त्रियांना दुय्यम स्थान असल्यामुळे रेणुका व अंबासारख्या स्त्रियांना निर्वाणप्राप्तीऐवजी दु:खप्राप्ती झाली. त्यामुळे ‘भारतीय समाजरचनेत स्त्रियांना कधी मोक्षप्राप्ती होणार नाही का?’ असा प्रश्न निर्माण झाला. त्याला थेरींनी आपल्या कृतिआचरणातून सकारात्मक उत्तर दिले आहे. स्त्रियांनाही मोक्षप्राप्ती होते, याचे अनेक दाखले थेरींच्या काव्यरचनेतून मिळतात. बुद्धाचे तत्त्वज्ञान आचरणात आणणाऱ्या या थेरी केवळ बुद्धाच्या अनुयायीच नव्हत्या, तर त्या मानवी जीवनाच्या भाष्यकार, दार्शनिक व तत्त्वचिंतकही होत्या. त्यामुळेच त्या दु:खाला पाहून हतबल न होता, बुद्ध तत्त्वज्ञानाच्या आधारे निःसंकोचपणे दु:खावर विजय प्राप्त करताना दिसतात. यामध्ये किसा गौतमी, पटाचारा, आम्रपाली व कुंडलकेशा आदी थेरींनी आपल्यावर कोसळलेल्या दु:खावर मोठ्या संयमाने मात केली.

मूलतः कवी-प्रवृत्ती असलेल्या हेतकरांच्या  लेखनाची भाषाशैलीही काव्यागत स्वरूपाची आहे. परिणामतः दु:खमुक्ती प्राप्त करणाऱ्या थेरींचे त्यांनी केलेले वर्णनही मनोज्ञ झाले. म्हणून हे प्रकरण अत्यंत रसाळ झाले असून ते वाचलेच पाहिजे. थेरी आणि त्यांचे दु:ख व दु:खनिरोधाच्या अनुभवी काव्यात्मक कथा वाचताना वाचक त्यात हरवून जातो. या समग्र थेरींनी आपल्या जीवन-चरित्रातून आपणाला दु:खविषयक विचार, जो मानवी जीवनात जळूसारखा मानवमुक्तीच्या प्रवासात रोधक ठरलेला आहे, त्या जळूरूपी शोषकाला- त्याला मानवमुक्तीच्या मार्गातून हद्दपार केले. वस्तुतः या ठिकाणी हेतकर यांच्या अभ्यासाची खरी कसोटी लागते. दु:खमुक्तीच्या मार्गातील गाथा चपखलपणे शोधून त्यांचा अर्थ आणि अन्वयार्थ लावण्याचे कसब इथे प्रकर्षाने नजरेत भरते.

‘थेरीगाथेतून अभिव्यक्त होणारे स्त्रीदर्शन’ या लेखात हेतकरांनी केवळ थेरींचे अभिव्यक्त होणे साकारले नाही, तर तत्कालीन भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांचा असलेला दर्जा आणि स्त्रियांचे वर्तमान वास्तवदेखील तटस्थपणे साकारले. त्यामुळे बुद्धपूर्व काळ, बुद्धकाळ आणि बुद्धोत्तर आधुनिक काळातील स्त्रीचित्रण त्यांनी कवेत घेतले. थेरी उब्बिरी ही मुलीच्या मृत्युमुळे दु:खी झाली होती. हृदयात घुसलेले दु:ख मुळापासून उपटून फेकून देण्यात ती यशस्वी झाली. संपत्तीचे वाटप केल्यानंतर थेरी सोणाला मुलांना आपल्यात स्वारस्य नसल्याचे कळते आणि ती प्रव्रजा स्वीकारते. थेरी अड्डकासीने शरीराच्या मोबदल्यात संपत्ती एकत्र केली, पण तिच्या मनात त्याविषयी तिरस्कार उपन्न झाल्यामुळे ती प्रव्रजा स्वीकारते. थेरी विमलाची कथाही अशीच. थेरी पूर्णिका, रोहिणी, चापा, शुभा, नंदुत्तरा व सुमेधा या सर्व थेरींनी जीवनाचे आत्मपरीक्षण करताना स्त्रीधर्माच्या लक्षणांकडे लक्ष न देता मानसिक विकारांवर विशेष लक्ष केंद्रित केले, यामुळेच त्यांना निब्बाण प्राप्त झाले. बुद्धकाळात निःसंकोचपणे अभिव्यक्त होणाऱ्या ह्या साऱ्या थेरींचा निग्रह आणि बुद्ध तत्त्वज्ञानावर असलेली असीम निष्ठा यामुळे जागतिक इतिहासात त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

स्त्रियांच्या संदर्भात केलेला उदात्त विचार आणि बौद्ध वाङ्‌मयातील थेरींबद्दल असलेल्या आकर्षणातून हेतकरांनी थेरींविषयी तौलनिक मांडणी साकारत भारतीय समाजरचनेत त्यांनी निर्माण केलेली स्वतंत्र ओळख या ग्रंथाद्वारे ठळकपणे अधोरेखित होते. ‘स्त्रीमुक्ती चळवळीला स्त्रीसंतांचे योगदान : कल्पना, वास्तवता व थेरींची तुलना’ या लेखामधून थेरींनी स्त्रीमुक्ती चळवळीला कसा हातभार लावला, त्यावर सत्यशोधकीय झोत त्यांनी टाकला आहे. स्त्रीमुक्ती चळवळीच्या संदर्भात भारतात स्त्रीसंतांचे योगदान लक्षात घेतले जाते. मात्र, बौद्ध धम्मात अर्हतपदी पोहोचल्या थेरींचा स्त्रीमुक्तीचा स्वर अथवा त्यांनी माराशी निग्रहपूर्वक केलेल्या संघर्षाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. असे असले तरी, जागतिक स्तरावर या स्त्रियांच्या कर्तृत्वाचा शोध-हीस डेव्हिड्‌स, आर पिशेल व कॅथरीन ब्लॅकस्टोनसारख्या तत्त्वज्ञांनी-विचारवंतांनी घेतला आहे. जागतिक पातळीवरील समुदायाला थेरींच्या कार्याची स्पष्ट जाणीव आहे, असे हेतकर नोंदवितात. भारतीय स्तरावर मात्र थेरींचा स्त्रीमुक्ती चळवळीच्या संदर्भात विचार झाला असता, तर स्त्रीमुक्ती चळवळीला एक वेगळी दिशा मिळाली असती. आज भारतीय स्त्री पुरुषधानव्यवस्थेची बळी ठरली नसती, हेदेखील नमूद करण्याचे धाडस हेतकर दाखवितात. महाराष्ट्रात  आध्यात्मिक स्तरावर कार्य करणाऱ्या महदाईसा, मुक्ताबाई, जनाबाई, बहेणाबाई व वेणाबाई यांसारख्या स्त्री संतांनी आपल्या गुरूंचीच ‘री’ ओढली. त्यांनी धर्मव्यवस्था व वर्णव्यवस्थेला धक्का लावणारे अभंग वा कवने रचली नाहीत किंवा आचरणानेदेखील त्या व्यवस्थेविरुद्ध चालताना दिसत नाहीत, असा अभ्यासांती हेतकर निष्कर्ष काढतात, तो सत्याच्या कसोटीवर खरा उतरणारा आहे. त्यामध्ये अपवाद मात्र नामदेवांची दासी जनाबाईचा सांगता येईल. जनाबार्इंनी इतर स्त्रियांच्या तुलनेत व्यवस्थेविरुद्ध बंडाची किंचित भूमिका घेतलेली जाणवते. बाकी संत स्त्रिया आंधळेपणाने विठ्ठलभक्तीत दंग झालेल्या दिसतात.

संत स्त्रियांच्या तुलनेत थेरी स्वतंत्र विचार करतात. बुद्धत्व प्राप्तीनंतर कपिलवस्तूला भेट देणाऱ्या बुद्धांना स्वत:हून सामोरी न जाणारी, आपल्या सन्मानाला तडा जाऊ न देणारी यशोधरा दृष्टीस पडते. नदीत डुबकी मारल्याने पापमुक्ती होत नाही, हे ब्राह्मणाला धाडसाने सांगणारी दासीकन्या थेरी महत्त्वाची वाटते. राजघराण्यातील अनेक थेरींनी मारांसोबत निकराने संघर्ष करून अकुशल विचारांवर विजय मिळविला. एकूणच, बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीत थेरींनी मुक्ती मिळविली, निब्बाण प्राप्त केले. स्वतंत्र निर्णयक्षमता आणि लढाऊ बाण्याच्या बाबतीत महानुभाव, भागवतधर्म व रामदासी पंथातील स्त्रियांहून थेरी श्रेष्ठ ठरतात, असा समुचित निष्कर्ष हेतकर नोंदवितात.

मराठीतील वाङ्‌मयीन चळवळीचा इतिहास हा हेतकरांच्या अभ्यासाचा व आवडीचा विषय असल्यामुळे वाङ्‌मय चळवळीतील स्त्रीवादाचा तटस्थ पण तौलनिक दृष्टीने नेमका वेध घेतला आहे. भारतीय स्त्री-स्वकथन व काव्य या दोन प्रकारांमधूनच विशेषतः अभिव्यक्त झाली. आधुनिक स्त्रियांचे काव्य व स्वकथनातून प्रकट झालेला स्त्रीविचार व थेरीगाथांमधून प्रकट झालेल्या स्त्रीविचारांचा अन्वयार्थ लावला, तर आधुनिक वाङ्‌मयातील स्त्री ही पुरुषांना केंद्रस्थानी ठेवूनच व्यक्त झालेली दिसते. स्वत:ला नगण्य समजत या स्त्रीने पतिभक्ती, पतिप्रेम व पतिनिष्ठेतूनच लेखन केले. यात स्त्रीमुक्ती आणि वैचारिक स्वातंत्र्याचा स्वर ठळकपणे जाणवत नाही. अगदी रमाबाई रानडेंपासून ते साठोत्तरी कालखंडातील स्वकथन वा आत्मचरित्रांमधूनही हाच स्वर कमी-अधिक स्वरूपात पाहायला मिळतो. ‘मला उद्‌ध्वस्त व्हायचं आहे’, हे मलिका अमरशेख यांचे स्वकथनही यांस अपवाद ठरत नाही. यामध्ये मलिका अमरशेख पुरुषी सत्तेला धारेवर धरते, तेव्हा तिला स्वत:मधील दोष दिसत नाहीत. नवऱ्याच्या वेश्यागमनाला स्वीकृती देते. मात्र स्वत:मधील पारंपरिकतेला ती हद्दपार करू शकली नाही. इथेच तिच्यातील स्त्रीत्वाचा पराभव होतो. त्या दु:खातून तिला सावरता आलेले नाही. मुक्तीच्या मार्गाचे योग्य ज्ञान नसल्यामुळे ती दु:खमुक्त होऊ शकली नाही. आधुनिक काळातील स्त्री व थेरीगाथेतील दु:खमुक्ती करणाऱ्या स्त्रीविचारांमध्ये हा फरक जाणवतो. काव्य हा प्रकारही यास अपवाद नाही. काव्यातही पती व प्रियकराच्या शरीरनिष्ठ नात्यांभोवती आधुनिक कविता रुंजी घालते. काही ठिकाणी स्त्रियांवरील अन्यायाविरोधात निषेधप्रवण स्वर प्रकटतो, त्यातून नवआत्मभानाचा प्रत्यय येतो. असाच स्त्रीवादी जाणिवेचा विचार थेरींनी काव्यात्मक रूपाच्या स्वकथनातून मांडला. हे हेतकरांच्या विवेचनातून स्पष्ट होते.
भारतीय स्तरावर तथागत गौतम बुद्ध, महात्मा जोतिराव फुले, राजा राममोहन रॉय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या पुरुषी मंडळींनीच स्त्रीमुक्तीचा पाया रचला, हेही स्त्रीमुक्ती चळवळकर्त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे आणि हीच स्त्रीवादी विचारांची देशीय परंपरा आहे. त्यामुळे पाश्चात्त्य स्त्रीवादात भारतीयांना प्रेरणा शोधण्याची गरजच उरत नाही.

एकंदरीत, ‘थेरीगाथा : स्त्रीमुक्ती, समाज आणि तत्त्वज्ञान’ हा ग्रंथ अनेकार्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. या ग्रंथात जसा स्त्रीमुक्तीचा विचार आहे, तसाच तत्कालीन सामाजिक जीवन व तत्त्वज्ञानाचाही सर्वव्यापी अंगाने वेध घेतला आहे. त्यामुळे थेरीगाथेतील स्त्रीमुक्तीचा विचार तर कळतोच, पण एकूणच भारतीय समाजरचनेत विविध धर्मांमध्ये स्त्रीची अवस्था व तिचा घडून आलेला विकास लक्षात येतो. सोबतच पाश्चात्त्य समाजव्यवस्था त्या वेळी स्त्रीवादासंदर्भात काय भूमिका घेत होती, हेही विविध तज्ज्ञांच्या वैचारिक दाखल्यांवरून लक्षात येते.

बौद्ध वाङ्‌मयातील थेरीगाथांत इतर वाङ्‌मयाच्या तुलनेत मानवी सौंदर्य, गहनता व धैर्यकुशलतेसह वैविध्यता आढळते. येथे स्वातंत्र्याचा उद्‌घोष, मानवी मुक्तीचा स्वर व प्रखर जाणिवेचा सूर प्रकटला आहे. थेरीगाथेतील भिक्षुणी या बुद्धाचा इहवादी विचार स्वीकारतात. ऐहिक जीवनाला महत्त्व देतात आणि आत्मवाद व ईश्वरवादाला त्याजतात. म्हणून त्यांना अकुशल विचारातून मुक्ती मिळते. यालाच बुद्ध निब्बाण म्हणतात. एकूणच- स्वतंत्र चिंतन, विचारांची सुस्पष्ट भूमिका, तौलनिक पद्धतीचे दाखले, काव्यात्मक शैलीची रसाळता व तर्कशुद्ध मांडणी यामुळे अत्याधुनिक काळातील स्त्रियांमध्ये स्त्रीसत्त्वाची जाणीव-जागृती आणण्यासाठी प्रस्तुत ग्रंथ मोठा हातभार लावतो.

थेरीगाथा : स्त्रीमुक्ती, समाज आणि तत्त्वज्ञान
लेखक : सुनील हेतकर
सुगावा प्रकाशन, पुणे
मूल्य :  200 रुपये

 

Tags: अशोक इंगळे बौद्ध वाङ्‌मय सुगावा प्रकाशन महिला सुनील हेतकर समाज आणि तत्त्वज्ञान थेरीगाथा : स्त्रीमुक्ती weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात