शाळेत जज्जचा एक मुलगा होता. एकदा शिक्षक त्याला परदेशी धोतरावरून बोलले. त्या जज्जने तक्रार केली. तेव्हा त्या शिक्षकाची बाजू घेत गुरुजी म्हणाले, ‘शिक्षकाचे काम काय फक्त पुस्तकेच शिकवायचे असते काय?’ ही त्यांची शिक्षणदृष्टी होती. सन १९२८मध्ये राष्ट्रीय वातावरणात अमळनेरला आचार्य कृपलानी यांचे व्याख्यान झाले. गुरुजी छात्रालयातील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन व्याख्यानाला गेले. रात्री आल्यावर मुले झोपली. गुरुजी फेऱ्या मारत राहिले. शेवटी राहवेना, तेव्हा त्यांनी मुलांना उठवले आणि म्हणाले, ‘‘अरे, तुम्हाला झोपा तरी कशा येतात? इतके चांगले व्याख्यान ऐकल्यावर तुम्ही देशासाठी झिजेन, खादी वापरीन, अशा शपथा घ्यायला हव्यात!’’
गुरुजींना मुलांची टोकाची काळजी असे. कृष्णा परळीकर हा विद्यार्थी आजारी पडला आणि गावाकडे गेला. गावाकडून तो पत्र पाठवायचा. पुढे पत्र येणे बंद झाले, तेव्हा गुरुजी त्याच्या गावाला गेले. त्याला विषमज्वर झालेला होता. गुरुजी तिथेच राहिले आणि त्याची सेवाशुश्रूषा केली. या सुमारास गुरुजींचे आजोबा आजारी असल्याची तार आली आणि नंतर त्यांचे देहावसान झाले, पण कृष्णा बरा होईपर्यंत गुरुजी त्याच्या गावीच राहिले.
यशवंत पवार हा विद्यार्थी श्रीमंत कुटुंबातील होता. तो खोली झाडत नसे. त्याची खोली तशीच अस्वच्छ असे. गुरुजी स्वत: त्याच्या खोलीत गेले आणि झाडू लागले. मग त्याला काही वाटले आणि तोही खोली झाडू लागला. घरून काही चांगले पदार्थ आणीत असे, पण इतर मुलांना देत नसे. एकदा दुसरा एक गरीब मुलगा गावाकडून आल्यावर गुरुजींनी त्याला डबा सोडायला लावला आणि त्यातील पदार्थ सर्वांना खायला दिले. यशवंत पवारलाही बोलावून घेतले. त्याने खाल्ले आणि लगेच म्हणाला की- गुरुजी, माझ्या डब्यात पण काही पदार्थ आहेत, ते मी आणतो. तो गेला आणि आणले. त्याने इतर मुलांना ते दिले. त्यानंतर तो खूप बदलला.
अमळनेरच्या छात्रालयात मुले होती. ती नेहमी सहभोजन करीत. आपले पदार्थ इतरांना द्यावेत, हा उपदेश गुरुजी स्वत:ही पाळत असत. एकदा गुरुजींच्या मावशीने बडोद्याहून त्यांना श्रीखंडाच्या वड्या पाठवल्या. एक मुलगा गावाकडे चालला होता. गुरुजींनी त्याच्यासोबत त्या वड्या दिल्या. तो मुलगा आल्यावर म्हणाला की- गुरुजी, माझ्या आईला या वड्या खूप आवडल्या. गुरुजींनी बडोद्याच्या मावशीला पत्र लिहून पुन्हा वड्या मागवल्या आणि त्या मुलाच्या घरी पाठवल्या.
गुरुजी लेखनाला बसताना मृगाजिनावर बसत, पण ते मृगाजिन जीर्ण झालेले होते. तडवी नावाच्या सातपुड्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या मुलाने ते बघितले आणि सुट्टीत गेल्यावर एका काळविटाची शिकार करून ते मृगाजिन काढून आणले, आनंदाने गुरुजींना दिले. त्याला वाटले, इतकी किमती वस्तू दिल्यावर गुरुजी खूप आनंदी होतील. पण गुरुजींच्या डोळ्यांतच पाणी आले. गुरुजी म्हणाले, ‘‘तडवी, माझ्याकरता का एका स्वच्छंदी, आनंदी प्राण्याला तू ठार केलेस? किती आनंदाने खेळला असेल आतापर्यंत? कुणालाही त्याचा उपसर्ग तर नव्हता ना? का मारलेस त्याला? किती मऊ त्याचे अंग, खडबडीतपणा जणू नाहीच कशात! जवळ घ्यावे, यावे धावत, खावे झाडपाला नि कोवळे गवत. तू माझ्याकरता एका निरापराध प्राण्याला ठार मारलेस? माणसाच्या माणुसकीवर या प्राण्यांचा किती विश्वास. रंग जशी वैराग्याची ध्वजाच! फार फार प्रसन्न हा प्राणी. मरण आलेल्याचे मृगाजिन घ्यावे हो!’’ हे ऐकल्यावर तडवीला खूप वाईट वाटले. गुरुजींच्या अश्रूंनी त्या दिवशी मुलांना भूतदयाची जाणीव करून दिली.
एक दिवस एका गुलाबाला कळी लागली. त्या रात्री छात्रालयातील मुलांना घेऊन बगीच्यात बसून गुरुजींनी त्या गुलाबाच्या फुलाचा जन्मोत्सव साजरा केला. त्या रोपट्याला रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांनी सजविले. मुलांनी गाणी म्हटली. बासरी वाजवली. यातून मुलांना निसर्गाविषयी वेगळेच प्रेम निर्माण झाले. गुरुजी एकदा शिकवत होते, तेवढ्यात पाऊस सुरू झाला. गुरुजींनी शिकविणे थांबविले आणि म्हणाले, ‘‘बाहेर पाऊस पडताना मी का शिकवत बसू?’’ आणि वर्ग सोडून दिला.
शाळेत द.मा.वैद्य नावाचा विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याला फी भरता येत नसल्याने शाळा सोडून द्यावी लागणार होती. गुरुजी त्याला म्हणाले, ‘‘तुला वर्षभर मी फी देईन, पण शाळा सोडू नकोस.’’ आणि गुरुजी खरोखर दर १ तारखेला त्याच्या वर्गासामोर उभे राहून त्याला बाहेर बोलावत आणि फीच्या पैशांची पुडी बांधून त्याला देत. नीलकंठ कुलकर्णीला ‘ओल्या दुष्काळामुळे मदत पाठविणे शक्य नाही, तेव्हा परत निघून यावे’ असे पत्र त्यांच्या घरच्यांनी लिहिले. तो वसतिगृह सोडणार, हे गुरुजींना समजले. त्यांनी त्याला वर्षभर १० रुपयांची मदत केली.
एकदा मुले आणि गुरुजी सहलीला गेले. रात्री झोपताना मुलांनी गुरुजींसाठी गादी आणली. पण गुरुजी म्हणाले, ‘जर मुले सतरंजीवर झोपली आहेत, तर मग मी गादीवर झोपणार नाही.’ गुरुजीही सतरंजीवर झोपले.
मुलांची माफी मागण्याइतका उमदेपणाही गुरुजींकडे होता. एकदा शाळेचे प्रतिनिधी निवडण्यावरून मतभेद झाले. तेव्हा गुरुजींनी त्याला जवळ थांबवून जे बोलले, ते कोणत्याही शिक्षकाला अंतर्मुख करणारे ठरावे. गुरुजी त्याला म्हणतात, ‘‘बाळ चुकलो हो मी- रागावू नकोस हो माझ्यावर! सहवासाने मला छात्रालयातल्या मुलांविषयी अधिक प्रेम वाटले, हे मी नाकबूल करत नाही. सहवासाने जरा चुकत होतो- पण बाळ, तुझ्या स्वाभिमानाने मला सावध केले. नको रागावूस बाळ. मी का तुमचा नाही? छात्रालयातील मुले का तुझी नाहीत?’’
त्या काळात खादी वापरण्याची चळवळ जोरात सुरू होती. गुरुजी मुलांनाही खादी वापरायला प्रोत्साहन देत. त्यामुळे मुले मोठ्या संख्येने खादी वापरत असत. काही मुले घरच्यांचा विरोध न जुमानता खादी वापरत होती. जळगावहून खादीचे गठ्ठे घेऊन लोक येत, ते विक्री करायला गुरुजी त्यांना मदत करत. शाळेत जज्जचा एक मुलगा होता. एकदा शिक्षक त्याला परदेशी धोतरावरून बोलले. त्या जज्जने तक्रार केली. तेव्हा त्या शिक्षकाची बाजू घेत ते म्हणाले, ‘शिक्षकाचे काम काय फक्त पुस्तकेच शिकवायचे असते काय?’ ही त्यांची शिक्षणदृष्टी होती. सन १९२८ मध्ये राष्ट्रीय वातावरणात अमळनेरला आचार्य कृपलानी यांचे व्याख्यान झाले. गुरुजी छात्रालयातील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन व्याख्यानाला गेले. रात्री मुले झोपली. गुरुजी फेऱ्या मारत राहिले. शेवटी राहवेना, तेव्हा त्यांनी मुलांना उठवले व म्हणाले, ‘‘अरे, तुम्हाला झोपा तरी कशा येतात? इतके चांगले व्याख्यान ऐकल्यावर तुम्ही देशासाठी झिजेन, खादी वापरीन, अशा शपथा घ्यायला हव्यात!’’
शहरात कॉलरा साथ आली, तेव्हा गुरुजींनी विद्यार्थ्यांचे पथक उभारले. ‘पाणी उकळून प्या’ अशी सूचना मुले सर्वत्र करत होती. वसतिगृहात मुलांचे आणि गुरुजींचे हे नाते बघून शाळेतील गावात राहणारी मुलेही तिथेच येऊन थांबत, खेळत. फक्त जेवायला आणि झोपायला घरी जात. संपूर्ण खानदेशात या वसतिगृहात प्रवेश मिळावा म्हणून रीघ लागली. प्रवेश नाकारता-नाकारता वैताग आला.
अगदी मुलांमध्ये भूतदया जागृत व्हावी, म्हणून गुरुजींनी शिमग्याच्या दिवसांत मुले गाढवांना जो त्रास देतात, त्याविरोधात काम करणाऱ्या ‘गर्दर्भ क्लेशनिवारण मोहिमे’ला प्रोत्साहन दिले. गाढव हा किती कष्टाळू प्राणी आहे, याविषयी लिहिले. गाढव हा अत्यंत सहनशील प्राणी आहे. खायला कागदाचे कपटेही चालतात. कामात अंगचोरपणा त्याला माहीत नाही. अशा या गुणसंपन्न प्राण्याला मुले खूप छळतात, तेव्हा शिमग्याला गावात फिरून आपण याला आळा घालू या. त्यानुसार मुलांनी गावात जाऊन अनेक ठिकाणी गाढवांची मुक्तता केली.
Tags: हेरंब कुलकर्णी साने गुरुजी आणि विद्यार्थ्यांचे नाते शिक्षकांसाठी साने गुरुजी आचार्य कृपलानी खादी भूतदया मृगाजिन छात्रालय अमळनेर Love for animals Mrugajin Compassion towards creatures Aachary Krupalani Khadi Hostellife Chhatralay Amalner Heramn Kulkarni Sane Guruji's Relationship with Students Sane Guruji for Teacher Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या