साने गुरुजींनी जानेवारी 1947 ते मे 1947 या कालावधीमध्ये हा सत्याग्रह केला. या सत्याग्रहाची मुळं 1932 च्या पुणे करारापर्यंत जातात. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आपण स्वतःचं उर्वरित आयुष्य खर्च करू, असं जाहीर वचन गांधींनी या वेळी आंबेडकरांना दिलं होतं, त्याचा संदर्भ या सत्याग्रहामागे होता. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला गांधीवाद्यांना आवाहन केलं होतं. अस्पृश्यता दूर करण्यासाठी आपण प्रत्यक्षात कोणते प्रयत्न केले याचा लेखाजोखा मांडावा, असं आवाहन विनोबा भावे यांनी या बाबतीत गांधीवाद्यांचे प्रयत्न असमाधानकारक पातळीवरच असल्याचं लक्षात आल्यावर साने गुरुजी व्यथित झाले. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर अस्पृश्यता व जातीय भेदभाव यांबद्दलची आपली मनोवृत्ती बदलण्याची आत्यंतिक निकड आहे, याची लोकांना आठवण करून देणं गरजेचं असल्याचं गुरुजींना तीव्रतेने वाटलं.

पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांनी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांनाही प्रवेश मिळावा यासाठी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला सत्याग्रह केला होता. अलीकडच्या काळात या सत्याग्रहाकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसतं. जातिआधारित भेदभाव व अस्पृश्यता संपुष्टात आणण्याची जबाबदारी सवर्ण हिंदूंवर आहे, याची जाणीव करून देणारी ही एक महत्त्वाची प्रतीकात्मक कृती होती. यापूर्वी वासाहतिक काळात वायकोम (1924-25), पर्वती (1929), काळाराम (1930), गुरुवायूर (1932) व इतरही काही मंदिर-प्रवेशासाठीचे सत्याग्रह झाले. पण पंढरपूरमधील सत्याग्रह या सर्वांहून वेगळा ठरला, कारण विठ्ठल मंदिराची दारं अस्पृश्यांसाठी स्वेच्छेने खुली करण्यात या सत्याग्रहाला यश मिळालं. पण केवळ याच एका कारणामुळे हा सत्याग्रह दखलपात्र ठरतो असं नव्हे. इतर किमान दोन कारणंही तितकीच महत्त्वाची आहेत.
पहिलं कारण म्हणजे या सत्याग्रहाचं नेतृत्व करणारे साने गुरुजी हिंदू धर्मातील सुधारणेची निकड मांडत होते, पण हिंदू धर्माचं राजकीयीकरण करण्याच्या प्रकल्पापासून त्यांची भूमिका वेगळी होती- हिंदुत्वाचा प्रवाह आणि जातिव्यवस्थेच्या उच्चाटनासाठी हिंदू धर्माला नाकारणं, या दोन्ही राजकीय भूमिकांपासून त्यांनी अंतर राखलं होतं. एका बाजूला, त्यांचा हा सत्याग्रह हिंदू धर्माला सनातन्यांच्या कचाट्यातून मुक्त करू पाहत होता, तर दुसऱ्या बाजूला प्रबुद्ध किंवा अ-प्रबुद्ध ‘राजकीय’ हितसंबंधांपासूनही हिंदू धर्म वेगळा ठेवण्याचा प्रयत्न करत होता. ‘उदार हिंदू धर्मा’चे राजकीय गर्भितार्थ समजून घेण्यासाठी या भूमिकेचं गंभीर विश्लेषण करणं आवश्यक आहे, उदार हिंदू विचारांची समतेच्या लढ्यांसंदर्भातील निष्पत्ती कोणती असेल, हिंदू धर्माची व्यापक चौकट नाकारली नाही, तरीही जातिव्यवस्था नाकारणं किंवा तिचं उच्चाटन करणं शक्य होईल का, उदार हिंदू विचार हिंदुत्वापासून कोणत्या संदर्भात वेगळा ठरेल; यांसारख्या काही प्रश्नांची या निमित्ताने चर्चा करणे अपरिहार्य बनते.
दुसरे म्हणजे या सत्याग्रहाच्या अनुषंगाने धार्मिक सुधारणांच्या संदर्भात सत्याग्रहाचा वापर कसा असावा, व्यूहरचना कशी असावी व उद्दिष्टं कोणती असावीत याबद्दल गांधीवाद्यांमध्ये चर्चा झाली, त्यामुळेदेखील हा सत्याग्रह लक्षणीय ठरतो. संघटित हिंदू धर्मामधील सुधारणांच्या व्यूहरचना कोणत्या असतील, याबद्दलच्या गांधीवादी आकलनाच्या काही दिशा या चर्चेमधून सूचित होतात. प्रस्तुत निबंधामध्ये या दोन्ही आयामांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.(1)
साने गुरुजींनी जानेवारी 1947 ते मे 1947 या कालावधीमध्ये हा सत्याग्रह केला. या सत्याग्रहाची मुळं 1932 च्या पुणे करारापर्यंत जातात. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आपण स्वतःचं उर्वरित आयुष्य खर्च करू, असं जाहीर वचन गांधींनी या वेळी आंबेडकरांना दिलं होतं, त्याचा संदर्भ या सत्याग्रहामागे होता. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला गांधीवाद्यांना आवाहन केलं होतं. अस्पृश्यता दूर करण्यासाठी आपण प्रत्यक्षात कोणते प्रयत्न केले याचा लेखाजोखा मांडावा, असं आवाहन विनोबा भावे यांनी या बाबतीत गांधीवाद्यांचे प्रयत्न असमाधानकारक पातळीवरच असल्याचं लक्षात आल्यावर साने गुरुजी व्यथित झाले.(2)
स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर अस्पृश्यता व जातीय भेदभाव यांबद्दलची आपली मनोवृत्ती बदलण्याची आत्यंतिक निकड आहे, याची लोकांना आठवण करून देणं गरजेचं असल्याचं गुरुजींना तीव्रतेने वाटलं. अस्पृश्यता रद्द करणारे कायदे मंजूर होण्यापूर्वी आणि मंदिर-प्रवेशाबाबतच्या भेदभावजन्य प्रथांना कायदेशीर प्रतिबंध केला जाण्यापूर्वी ही प्रक्रिया सुरू करण्याची निकड साने गुरुजींना वाटली. सवर्ण हिंदूंनी अशा प्रकारच्या भेदभावजन्य प्रथा कायद्याच्या बडग्यामुळे नव्हे तर स्वेच्छेने सोडून द्याव्यात, असं त्यांना वाटत होतं. 1946 सालच्या अखेरीला वृत्तपत्रांना दिलेल्या निवेदनात साने गुरुजी लिहितात : महात्माजी यांनी 1932 मध्ये हरिजनांसाठी उपवास केला, त्या वेळेस देशभर एक प्रचंड लाट आली. काही मंदिरे उघडली, कोठे विहिरी मोकळ्या झाल्या. अखिल भारतीय हरिजन सेवक संघ स्थापन झाला. ठायी ठायी हरिजन छात्रालये सुरू झाली. त्या गोष्टीला आता 14 वर्षे झाली. थोड्या महिन्यांपूर्वी पूज्य विनोबाजी भावे यांनी किती मंदिरे उघडली? किती विहिरी मोकळ्या झाल्या? हरिजनांना किती जवळ केले? याचा हिशेब द्या, असे सांगितले. मी त्यांना त्या वेळेस लिहिले, हिशेब काय देणार? आम्ही सांगतो याचा कितीसा पहिणाम होणार? आमच्यासारख्यांनी बलिदाने केली पाहिजेत. मी सातआठ महिन्यांत जो प्रचार (हंगामी सरकारसाठीचा निवडणूक प्रचार) केला त्यात अस्पृश्यतेविषयीच सांगत असे. मुंबई सरकार आता कायदाही करत आहे. परंतु मनोबुद्धीतच जी क्रांती झाली पाहिजे, ती अद्याप झाली नाही. पंढरपूर मंदिर मोकळे व्हावे; पांडुरंगाच्या पायी हरिजनांना डोके ठेवता यावे, यासाठी आज मी एकादशीपासून उपवास करत आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या व्यवस्थापकांना माझी विनंती आहे की, त्यांनी देवाजवळ सर्व लेकरांस येऊ द्यावे. तशी त्यांनी घोषणा करावी. तोपर्यंत मी उपवास करत राहीन.(3)
या सत्याग्रहासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची निवड करण्यात आली, हीसुद्धा लक्षणीय बाब होती. विठ्ठल हा समन्वयवादी भक्ती-परंपरेचा देव आहे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण लोकाचाराशी त्याचे आंतरिक संबंध आहेत. महाराष्ट्रभरातून आणि कर्नाटकमधील काही भागांमधून आलेले वारकरी आषाढात पंढरपूरची वारी करतात. विठ्ठलाची आराधना परमेश्वर म्हणून नव्हे, तर ‘सखा पांडुरंग’ व ‘विठू माउली’ अशा रूपांमध्ये केली जाते.(4) वारकरी पंथातील लोक विविध जातीय पार्श्वभूमींचे आहेत, त्यात मोठ्या संख्येने स्त्रिया आणि अगदी मुस्लीम धर्मातील लोकही आहेत.(5) पारंपरिक पद्धतीनुसार वारकरी एकमेकांना भेटले की वय किंवा इतर सामाजिक भेदांच्या अलाहिदा एकमेकांच्या पाया पडतात आणि मग एकमेकांना आलिंगन देतात. या परंपरेचा गाभा समन्वयवादी व समतावादी असल्याचं मानलं जात असलं, तरी 1947 च्या सत्याग्रहापूर्वी केवळ सवर्ण भक्तांना आणि शूद्र वर्णातील व कारागीर जातींमधील व्यक्तींनाच मंदिरात प्रवेशाची मुभा होती. अस्पृश्यांना स्पष्टपणे प्रवेश नाकारण्यात येत असे. अस्पृश्यांच्याही दिंड्या दर वर्षी वारीसोबत पंढरपुरात पोचत असत, पण त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नसे. रोहिदास दिंडी, चोखामेळा दिंडी व अजामेळा दिंडी या अनुक्रमे चर्मकार, महार व मातंग समाजाच्या दिंड्यांना पहिल्या तेवीस सवर्ण दिंड्यांपासून वेगळं काढलं जात असे. त्यांच्या दरम्यान एक घोडा चालत असे.(6) या तीन जातींना वारीतही अस्पृश्यतेची वागणूक दिली जात असे. त्यांच्या दिंड्यांना पंढरपुराबाहेर इंद्रायणी नदीच्या काठावरच थांबवले जाई. इतर दिंड्या मात्र विठ्ठलाच्या भेटीसाठी शहरात प्रवेश करत.
हा भेदाभेद नष्ट व्हावा म्हणून महाराष्ट्रभरात चार महिने प्रचारदौरा काढून साने गुरुजींनी जागोजागी भाषणं केली, या भाषणांचे सार नवयुगमध्ये 4 मे 1947 रोजी त्यांनी लिहिलेल्या ‘महाराष्ट्राला अखेरची हाक’ या लेखात सापडते. यातून त्यांनी वारकरी पंथातील समतेची मर्यादा उघड केली. डॉ. आंबेडकरांनी या मर्यादांवर कायमच बोट ठेवलं होतं. ‘‘वारकऱ्यांना कल्पनेच्या पातळीवर समतेचा आभास अनुभवता येतो, पण एकदा ती/तो गावात प्रवेश करता झाला की आभास नष्ट होतात. गावाची व्यवस्था जातीयवादी तर्कपद्धतीनुसार चालते,’’ हे साने गुरुजींनी त्यांच्या भाषणांमधून व लेखनातून वारंवार मांडले. समता केवळ पोथिनिष्ठ असू नये, तर ती अनुभूतीच्या पातळीवर यायला हवी, हा त्यांचा आग्रह होता. विठ्ठल ही समचरण देवता असल्यामुळे वारकरी परंपरेचा खरा संदेश समतेचा आहे, याची आठवण साने गुरुजींनी विठ्ठलभक्तांना देऊ पाहत होते. आपला सत्याग्रह वारकरी परंपरेतील ‘सत्य’ व समता या अस्सल प्रेरणा जागी करण्यासाठी असल्याचं त्यांनी भाषणांमधून वारंवार सांगितलं. या सत्याग्रहाद्वारे विठ्ठलभक्तांप्रमाणेच मंदिरातील बडवे आणि विश्वस्त यांचंही मनपरिवर्तन घडवण्याचा साने गुरुजींचा प्रयत्न होता.
गुरुजींच्या या प्रयत्नाला महाराष्ट्राच्या विविध भागांमधून बऱ्यापैकी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हरिजन सेवक संघाच्या दस्तऐवजांनुसार, या सत्याग्रहादरम्यान 200 मंदिरं अस्पृश्यांसाठी खुली करण्यात आली. साने गुरुजींच्या दौऱ्याला प्रतिसाद म्हणून काही विहिरीदेखील खुल्या करण्यात आल्या. पंढरपूरमधील मंदिर खुलं व्हावं यासाठी हरिजन सेवक संघाने घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेवर 10 लाख लोकांनी सह्या केल्या.(7)
महाराष्ट्रातील विभिन्न सामाजिक-राजकीय, त्याचप्रमाणे धार्मिक गटांकडून मात्र या सत्याग्रहाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. वारकरी मठांकडून मिळालेले प्रतिसाद परस्परभिन्न होत. देहूकर मठ व अमळनेरकर मठ यांनी मंदिरप्रवेशाला विरोध केला, तर सातारकर मठ व तनपुरे मठ यांनी या मंदिरप्रवेशाला सक्रिय पाठिंबा दिला. पंढरपूरमधील भगवंतशास्त्री धारूरकर यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने विटाळापासून बचाव करण्यासाठी विठ्ठलमूर्तीमधील प्राण काढून घेणारी पूजा केली. त्यानंतर हा प्राण घागरीत घालून धारूरकरांच्या घरात बंदिस्त ठेवण्यात आला.(8) वाईतील नारायणशास्त्री मराठे यांनी मंदिरप्रवेशाला पाटिंबा दिला आणि धारूरकरशास्त्रींनी केलेल्या पूजेच्या पावित्र्याविषयी प्रश्न उपस्थित केले. वारकरी, मठ आणि शास्त्री-परंपरा या हिंदू धर्माच्या अनुयायांकडून मंदिरप्रवेशाच्या मुद्द्यावर परस्परांहून भिन्न प्रतिसाद आले. यातून एका अर्थी हिंदू धर्माविषयीच्या मतांची परस्परभिन्नताही दिसून येत होती.(9)
साने गुरुजींच्या सत्याग्रहाला दलित चळवळीच्या व ब्राह्मणेतर चळवळीच्या नेत्यांचाही संमिश्र प्रतिसाद मिळाला. मंदिरप्रवेशासाठी सुरू असलेल्या सत्याग्रहाबद्दल ‘नवयुग’ साप्ताहिकाने डॉ. आंबेडकरांना मत विचारले, तेव्हा ‘‘अशा तऱ्हेच्या संघर्षात काही अर्थ नाही, अशी आता माझी पूर्ण खात्री झाली आहे,’’ असं ते म्हणाले.(10) ब्राह्मणेतर चळवळीचं मुखपत्र असलेल्या ‘दीनमित्र’चे संपादक मुकुंदराव पाटील यांनी हा सत्याग्रह अनावश्यक असल्याचं मत मांडलं, याउलट साताऱ्यातील पत्रीसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील या ब्राह्मणेतर चळवळीतील नेत्यांनी साने गुरुजींच्या सत्याग्रहाला पाठिंबा दिला.(11) ब्राह्मणी समाजव्यवस्थेतील उतरंडीची वर्णव्यवस्था व हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान यांच्यातील संबंधांबाबत डॉ. आंबेडकरांनी सैद्धान्तिक मांडणी केली होती. पंढरपूरमधील सत्याग्रहात तथ्य नसल्याचं त्यांचं मत या मांडणीतूनच उगम पावलं होतं. या सैद्धान्तिक मांडणीच्या संदर्भात साने गुरुजींचा सत्याग्रह निश्चितपणे विवाद्य ठरतो. वायकोम (1924-25), पर्वती (1929), गुरुवायूर (1931) व इतर काही मंदिरप्रवेशाची आंदोलनं यापूर्वी झाली होती. काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर 1935 साली डॉ.आंबेडकरांनी घोषणा केली की, ‘माझा जन्म हिंदू म्हणून झाला असला, तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही.’ याचाच अर्थ हिंदू धर्माच्या मंदिरात प्रवेश हा जातिनिर्मूलनाच्या चळवळीसाठी महत्त्वाचा मुद्दा उरला नव्हता. महात्मा फुल्यांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत विकसित होत गेलेल्या जातिप्रश्नाच्या आकलनाच्या संदर्भात मंदिरप्रवेशाला फारशी प्रस्तुतता उरलेली नसतानाही साने गुरुजींनी मंदिर प्रवेशाचा मुद्दा हाती का घेतला हे पाहणे गरजेचे आहे.
आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी या संघर्षामागील तर्क स्पष्ट होणे गरजेचे आहे. वि.दा. सावरकरांसारख्या हिंदू राष्ट्रवाद्यांनीही अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेतला होता.(12) हिंदू अस्मिता एकसंध करण्याच्या मार्गात जातिव्यवस्थेचा अडसर होत असल्याचं ते मानत. अस्पृश्यांना कोणत्याही बंधनाविना प्रवेश देणारी मंदिरं बांधावीत, असं आवाहन सावरकरांनी त्यांच्या अनुयायांना केलं. त्यांची ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी 1931 मध्ये रत्नागिरी येथे पतितपावन मंदिराची उभारणी झाली. ही कल्पना देशभरात घेऊन जाण्यासाठी हिंदू राष्ट्रवादी उत्सुक होते. आसिंधूसिंधूपर्यंत पसरलेल्या हिंदू बांधवांच्या संघटनासाठी जातीचा अडथळा दूर करायला हवा, ही हिंदू राष्ट्रवाद्यांची भूमिकाच साने गुरुजींच्या मंदिरप्रवेशाच्या चळवळीतून दृढ होत होती का, या संदर्भातही साने गुरुजींच्या दृष्टिकोनाची छाननी करायला हवी. आंबेडकर व त्यांच्या चळवळीला तथ्यहीन वाटणारा मंदिरप्रवेशाचा प्रश्न हाती घेणं साने गुरुजींना का आवश्यक वाटलं? ते हिंदू संघटनाचं ध्येय समोर ठेवून होते का आणि त्यांच्या सत्याग्रहाचा हिंदू संघटनासंदर्भातील गर्भितार्थ कोणता होता?
डॉ. आंबेडकर व त्यांच्या अनुयायांना मंदिरं नको आहेत, तर राजकीय हक्क हवे आहेत; अशा वेळी आपण मंदिरप्रवेशाचा मुद्दा उपस्थित करून लोकांची दिशाभूल का करत आहात, असा स्पष्ट प्रश्न एका मुलाखतीत साने गुरुजींना विचारण्यात आला. यावर गुरुजी म्हणाले, ‘‘मी कोणाचीही दिशाभूल करत नाही. मला हिंदू धर्म अधिक उदार व्हावा असे वाटते. स्पृश्यांची दृष्टी मोठी व्हावी, अस्पृश्यांचा उद्धार व्हावा म्हणून हा प्रयत्न आहे. हरिजनांना राजकीय हक्क मिळू नयेत असे म्हणणारा मी नाही. मी राजकीय माणूस नाही. मी माझ्या क्षेत्रात माझ्या परीने कार्य करतो आहे. हरिजनांनी स्वतःला उर्वरित समाजापासून विभक्त राहून हरिजनांना राजकीय हक्क कसे मिळतील? मुंबई प्रांतातील सर्व विजयी उमेदवार आंबेडकरांच्या राजकीय पक्षाचे असते, तरी ते फक्त स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करू शकले असते का? इतरांपासून स्वतःला विभक्त करून आम्हांला राजकीय हक्क उपभोगता येणार नाहीत’’, असे निवेदन डॉ.आंबेडकरांनीच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते...(12) आगामी काळात स्वतंत्र भारतामध्ये अस्पृश्यांना जमिनीचे पुनर्वाटप केले जाईल, त्यांना शिक्षणात समान संधी दिल्या जातील, यातून त्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी आशाही साने गुरुजींनी या मुलाखतीत व्यक्त केली. पण हे होईपर्यंत बाकीच्या लोकांनी त्यांची अस्पृश्यतेबद्दलची मनोबुद्धी व मानसिकता बदलण्यापासून का थांबावे, ते स्वतःहून सर्व भेदभावांच्या रूढी का थांबवू शकत नाहीत, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.(13) आपला लढा लोकांची जाणीव बदलण्यासाठीचा आहे, त्यासाठी भौतिक वास्तवात क्रांती होण्याची वाट पाहण्याची गरज नाही, अशी साने गुरुजींची धारणा होती. भौतिक परिस्थिती बदलली, तरीही मानसिकता बदलण्यासाठी स्वतंत्रपणे प्रयत्न करावेच लागतील, असं त्यांचं म्हणणं होतं. लोकांनी हिंदू राज्य स्थापन करण्याच्या राजकीय कार्यक्रमासाठी लोकांना एकत्र आणण्यापेक्षा त्यांना हिंदू धर्माच्या खऱ्या प्रेरणेनुसार आचरण करायला सांगावं आणि पर्यायाने अधिक माणुसकीचं जीवन जगायला वाव मिळावा, म्हणून आपण हा प्रयत्न करत असल्याचं साने गुरुजींनी ठामपणे मांडलं. या दोन भूमिकांमधील सूक्ष्म, पण मूलभूत स्वरूपाचा भेद दिसतो. वि.दा. सावरकर यांच्यासारखे हिंदू राष्ट्रवादी आणि हिंदू महासभेचे मुंजे व भोपटकर यांनी या सत्याग्रहाला पाठिंबा जाहीर केलेला असतानाही साने गुरुजींनी त्यांना आपला मंच वापरू दिला नाही. चार महिने चाललेल्या दौऱ्यामध्ये व दहा दिवसांच्या उपोषणकाळातही साने गुरुजींनी हिंदू राष्ट्रवाद्यांपासून स्पष्टपणे अंतर राखलं.
अस्पृश्यतेबद्दलचा गांधीवादी दृष्टिकोन आपण स्वीकारलेला असल्याचं साने गुरुजी या आंदोलनादरम्यान ठामपणे सांगत होते. परंतु, इतर गांधीवादी मंडळींना आणि खुद्द गांधींनासुद्धा पंढरपूरच्या सत्याग्रहाची प्रस्तुतता व अर्थपूर्णता यांबद्दल पुरेशी खात्री वाटत नव्हती. हे आंदोलन सुरू करण्यामागील साने गुरुजींच्या हेतूंबद्दल काही गांधीवादी साशंक असण्याला विशिष्ट ऐतिहासिक कारणं होती. शिवाय, साने गुरुजींचा दृष्टिकोन अस्सल सत्याग्रही व्यवहाराच्या नियमांशी बांधिलकी राखणारा आहे का, याबद्दल काही जण साशंक होते. यातील ऐतिहासिक कारणांची मुळं 1930 च्या दशकापर्यंत मागे जातात. त्या वेळी साने गुरुजी पूर्व आणि पश्चिम खान्देशात काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून राहत होते. या प्रदेशातील कापड कारखान्यांमधील मजुरांना आणि शेतकऱ्यांनाही संघटित करण्यात त्यांनी कळीची भूमिका निभावली होती. विशेष म्हणजे या टप्प्यावर काँग्रेससोबत संयुक्त आघाडी करण्यासाठी उत्सुक असलेल्या कम्युनिस्टांनी साने गुरुजींना साथ दिली होती. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे व कॉम्रेड वसंतराव भागवत यांचा साने गुरुजींशी निकटचा संपर्क होता. साने गुरुजींनी 1936 मध्ये त्यांच्या मदतीने ‘काँग्रेस’ हे नियतकालिक सुरू केले होते. ‘काँग्रेस मायबाप, जाळील सर्व ताप,’ असं या नियतकालिकाचं घोषवाक्य होतं. ‘काँग्रेस’ पत्रातील संपादकीय लेखांमधून साने गुरुजी मुंबई प्रांतातील काँग्रेस सरकारच्या धोरणांची चिकित्सा करत. काही वेळा ही धोरणं गांधीविचारांशी विसंगत आणि काँग्रेसच्या मूळ प्रेरणेशी प्रतारणा करणारी असल्याची टीकाही ते करत असत. यामुळे ज्येष्ठ गांधीवादी व काँग्रेसमधील नेते साने गुरुजींच्या राजकीय आकलनाविषयी व प्रगल्भतेविषयी साशंक झाले होते. शंकरराव देव यांच्या मते, साने गुरुजींच्या कृती काँग्रेसला कमकुवत करणाऱ्या होत्या आणि या प्रदेशात समाजवादी-साम्यवादी विचारांना बळकटी आणण्यासाठी त्यांचा उपयोग होत होता.(14) 1939 नंतर कम्युनिस्टांनी दुसऱ्या महायुद्धाला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आणि काँग्रेससोबतची आघाडी तोडली. त्यांनी सोव्हिएत संघाशी दोस्ती असलेल्या ब्रिटिशांना पाठिंबा दिला. ब्रिटिशांना पाठिंबा दिल्यामुळे कम्युनिस्टांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं, मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ‘चले जाव’ आंदोलनातील सहभागामुळे तुरुंगवास भोगावा लागला. कम्युनिस्ट साने गुरुजींचा वापर करत असल्याची देव यांची शंका कालांतराने खरी ठरली. आपण सद्हेतूने केलेल्या मदतीचा वापर करून कम्युनिस्टांनी खान्देशात कामगार संघटनांमध्ये शिरकाव केल्याचं लक्षात आल्यावर साने गुरुजी व्यथित झाले, पण तोवर बराच उशीर झाला होता. त्यांनी कम्युनिस्टांपासून फारकत घेतली, पण काँग्रेसचा विश्वासही त्यांनी गमावला होता, त्यामुळे ते परिघावर ढकलले गेले.
या पार्श्वभूमीवर, पाच वर्षांनी साने गुरुजींनी मंदिरप्रवेशाचा प्रश्न हाती घेतला. देव आणि काँग्रेसचे इतर नेते साने गुरुजींच्या हेतूविषयी स्वाभाविकपणे साशंक झाले होते. काँग्रेसने मुंबई विधिमंडळात मंदिरप्रवेशाचा अधिनियम मांडला आणि महिन्याभराच्या आत तो अमलात येणार होता.(15) त्यामुळे साने गुरुजींचे नवीन साथीदार झालेले समाजवादी त्यांचा वापर करून काँग्रेसचं श्रेय हिरावून घेऊ पाहत आहेत, अशी काँग्रेसच्या नेत्यांची धारणा झाली. साने गुरुजी उत्कट, अतिहळवे, भावनिकदृष्ट्या अस्थिर व्यक्ती आहेत, अशी प्रतिमा निर्माण झाली होती; शिवाय, 1936 मध्ये युनायटेड फ्रंट स्थापनेत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. या पार्श्वभूमीवर देव आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी गुरुजींचं उपोषण थांबवण्यासाठी गांधीजींकडे साकडं घातलं. मुंबई प्रदेश काँग्रेस समितीने साने गुरुजींना उपोषण थांबवण्याचं आवाहन केलं. गुरुजींनी केवळ जागरूकतेची मोहीम सुरू ठेवावी, असं समितीच्या निवेदनात सुचवलं होतं. या सत्याग्रहामध्ये हरिजन सेवक संघ सहभागी झाला असला, तरी साने गुरुजींनी तत्काळ उपोषण थांबवावं, अशी तार महात्मा गांधींनी केली.
साने गुरुजींच्या आंदोलनाबद्दल गांधीवाद्यांकडून व्यक्त होणाऱ्या साशंकतांच्या दुसऱ्या प्रवाहाचे प्रतिनिधी म्हणून विनोबा भावे यांच्या दृष्टिकोनाचा विचार करता येईल. चार महिने सुरू असलेल्या जागरूकता मोहिमेला विनोबांनी पाठिंबा दिला होता, मात्र साने गुरुजींच्या उपोषणाला त्यांचा पाठिंबा नव्हता. सत्याग्रही आचरणासंदर्भात विनोबांनी काही कळीचे मुद्दे उपस्थित केले. मंदिराच्या विश्वस्तांनी मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं करावं याकरिता त्यांच्यावर नैतिक दडपण आणणारे आमरण उपोषण करू नये, असं सांगणारं पत्र विनोबांनी साने गुरुजींना लिहिलं होतं. धार्मिक सुधारणांच्या बाबींमध्ये सत्याग्रहाचा वापर कसा करावा, याबद्दलच्या गांधीवादी भूमिकेचं सार म्हणून विनोबांच्या या पत्राकडे पाहता येईल. साने गुरुजींना 25 एप्रिल 1947 रोजी लिहिलेल्या पत्रात विनोबा लिहितात, ‘‘सहा महिन्यांपूर्वी तुम्ही उपवासाचा संकल्प केलात; त्याहून आज फार वेगळी परिस्थिती आहे. जनमत मंदिरप्रवेशाला अनुकूल झाले आहे. त्याचे श्रेय पुष्कळसे तुम्हांलाच आहे. त्यामुळे मंदिरप्रवेश बिल शक्य झाले. लोकमतानुसारी कायदा अहिंसेत येतो. असा कायदा हे केवळ लोकमताचे प्रकाशन असते. म्हणून कायद्याने मंदिर उघडण्यात गोडी नाही, असे अशा कायद्याबद्दल म्हणता येत नाही. कायदा झाला तरी तो अमलात येतो की नाही, हा सवाल अशा कायद्याबाबत उठू शकत नाही. मग हा उपवास कोणासाठी? बडव्यांसाठी? बडव्यांचे आणि आमचे काही विचारांचे नातेगोते असते तर गोष्ट वेगळी. मग काय दोन-चार महिन्यांनी होणारी गोष्ट आत्ताच व्हावी म्हणून? अशी घाई सुधारकाला आणि सत्याग्रहीला न जमणारी आहे. मग काय देवळाचे निमित्त करून एकूण सर्वच हरिजन प्रश्नांबाबत लोकांची तयारी व्हावी म्हणून तर ते एखादे ‘निमित्त’ साधू पाहणे बरोबर नाही. सत्याग्रहाला ‘स्पेसिफिक’ अशीच बाब पाहिजे. सामान्य समाजशुद्धीसाठी अलगपणे उपवास करता येतो; पण तो आमरण असू शकत नाही. मुदतीचाच असतो.’’ (16)
गांधींनी तार पाठवली, विनोबांनी पत्र पाठवलं, तरीही साने गुरुजींनी उपोषणाचा निर्णय बदलला नाही. गांधींच्या पत्राला उत्तर देताना साने गुरुजींनी लिहिलं, ‘‘तुम्हांला जी मंडळी सांगायला आली, त्यांच्याजवळ मी चार तास हृदयातील अनंत दुःखे सांगितली. अनंत प्रश्न सांगितले. त्यातील ‘लोक नावे ठेवतात’ हा एकच मुद्दा या मुत्सद्दी लोकांनी तुम्हांसमोर ठेवला आणि तेवढ्यावर एकांगी निर्णय देऊनही आपण मोकळे होता. हा न्यायही नाही, समताही नाही, असे मी नम्रपणे म्हणण्याचे धारिष्ट्य करतो. कायदा केव्हा होईल तेव्हा होवो. माझे डोळे त्याकडे कधीच नव्हते. मी बडवे मंडळींसमोर उभा आहे. या उपवासकाळात एखाद्या वटहुकुमाने मंदिर उघडले, तर तांत्रिकदृष्ट्या प्रतिज्ञापूर्ती होईल; परंतु मला आनंद नाही. आत्मक्लेशाने ब्रिटिशांचीही हृदये आम्ही वळवू पाहतो. मग बडवे मंडळींची मी का पाहू नये? मी हे दुःखाने लिहीत आहे, तुम्ही जाणालच; परंतु काही क्षण असे असतात की, सारे जग विरुद्ध झाले, तर आपण अचल राहावे ही तुमचीच शिकवण आहे. जोपर्यंत दुसऱ्याचे युक्तिवाद वा निर्णय मला, माझ्या मनोदेवतेला पटत नाही, तोपर्यंत माझ्याशी मी सत्यनिष्ठ राहिलेच पाहिजे. दुसऱ्यांनी मला चुकीचे म्हटले तरी चालेल. थोर मोठे मला चूक म्हणाले, तर दुःख होईल; परंतु माझ्या मनाने मला चूक म्हणणे हे सर्वांत वाईट...’’ (17) गांधी व विनोबा यांनी उपोषणावर आक्षेप घेतलेले असूनही, साने गुरुजींनी त्यांचा आंतरिक आवाज ऐकून 1 मे 1947 रोजी आमरण उपोषण सुरू केलं. हे उपोषण 10 दिवस सुरू राहिलं.
लोकांचा दबाव, साने गुरुजींचा आत्मक्लेश, ग. वि. मावळंकर यांनी केलेल्या कुशल वाटाघाटी, यांमुळे 10 मे रोजीच्या मध्यरात्री पंढरपूर मंदिराच्या बहुसंख्य विश्वस्तांनी मंदिरप्रवेशाच्या बाजूने मत दिलं. 11 मे 1947 रोजी अस्पृश्यांनी विठ्ठलमंदिरात प्रवेश केला आणि साने गुरुजींनी उपोषण सोडलं. तेव्हापासून पंढरपूरचं मंदिर सर्व जातीजमातींसाठी खुलं आहे. वारीमध्ये चालणाऱ्या दिंड्यांच्या मध्ये घोड्याला दौडवून वेगळ्या ठेवल्या जाणाऱ्या अस्पृश्य दिंड्या आता मुख्य मिरवणुकीचा सलग भाग म्हणून आता वारी करतात.(18)
सामाजिक-राजकीय सुधारणांसाठी सत्याग्रहाचा वापर कसा करावा, याबद्दलच्या वादचर्चेसाठी एक नमुनेदार दाखला म्हणून पंढरपूरमधील मंदिरप्रवेश सत्याग्रहाचा विचार करता येतो. अस्सल गांधीवादी तत्त्वाप्रमाणे साने गुरुजींनी सत्याग्रह करण्याच्या पुरेसं आधी मंदिराच्या विश्वस्तांना सूचना केली होती आणि त्यांच्या सदसद्विवेकाला आवाहनही केलं होतं. विठ्ठलभक्तांकडूनही आणि या बदलाच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या इतर घटकांकडून त्यांनी पाठिंबा मिळवला होता. मंदिरप्रवेशाला विरोध करणाऱ्या सनातन्यांसह जवळपास सर्वांशी त्यांनी सार्वजनिक पातळीवर वादचर्चा केली होती. एका सार्वजनिक सभेमध्ये मंदिरप्रवेशाचे विरोधक विश्वास डावरे (19) यांना साने गुरुजी व सेनापती बापट यांनी मंचावर येऊन आपली मतं मांडण्यास सांगितलं होतं, आणि नंतर साने गुरुजींनी डावरे यांचा युक्तिवाद एकेक मुद्दा घेऊन खोडून टाकला, याबद्दलचे वृत्तान्त तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये उपलब्ध आहेत. साने गुरुजींनी विश्वस्तांना आमरण उपोषणाची सूचनाही प्रत्यक्ष उपोषण सुरू करण्याच्या पुरेशी आगाऊ दिली होती. सत्याग्रहाचे नियम कसोशीने पाळल्यामुळे तात्कालिक उद्दिष्ट गाठण्यात या सत्याग्रहाला यश मिळालं, असे म्हणता येऊ शकते.
2
पंढरपुरातील मंदिरप्रवेशाचा सत्याग्रह म्हणजे हिंदू धर्म अधिक समावेशक व प्रस्तुत करण्याचा प्रयत्न आहे, अशी साने गुरुजींची भूमिका होती. या सत्याग्रहाद्वारे, विशेषतः महाराष्ट्रभरातील चार महिन्यांच्या प्रचारदौऱ्याद्वारे साने गुरुजींनी ‘जातीयवादी भेदभाव नष्ट करण्याची गरज केवळ जातिव्यवस्थेच्या पीडितांनाच नसून जातिव्यवस्थेच्या लाभधारकांनाही आहे,’ हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. जातिव्यवस्थेच्या लाभधारकांनी, म्हणजे उच्च-जातीयांनी दलितांच्या उद्धारासाठी नव्हेत, तर स्वतःच्या नैतिक वाढीसाठी व मानवता साध्य करण्यासाठी भेदभावाच्या प्रथा सोडून द्यायला हव्यात; ही भूमिका निःसंशयपणे विवाद्य आहे, मात्र ही भूमिका जातीय भेदभावविरोधी संघर्षामधील सवर्णांच्या भूमिकेपुरती मर्यादित ठेवता येणार नाही. पुरुषसत्ता, भांडवलशाही यांसारख्या विविध श्रेणीबद्ध सामाजिक व्यवस्थांमधील लाभधारकांची समतेच्या संघर्षातली भूमिका काय असेल, या संदर्भातले प्रश्नही या वादाच्या अनुषंगाने व्यापक पातळीवर विचारात घ्यावे लागतील. शोषण-व्यवस्थेच्या लाभधारकांना संबंधित व्यवस्था अन्याय्य असल्याचं लक्षात आल्यावर ती नाकारण्यासाठी त्यांनी कोणत्या व्यूहरचना आत्मसात कराव्यात, दडपशाही नाकारण्यासाठी त्या व्यक्तीला कोणते अवकाश वापरता येतील; या दृष्टिकोनातून विचार केला, तर पंढरपूरमधील सत्याग्रह केवळ सामिलीकरणाचा प्रयत्न म्हणून नाकारता येणार नाही. विशेषतः साने गुरुजींच्या संदर्भात हे लक्षात घ्यायला हवं की, जातीय शोषण संपवण्यासाठी मंदिरप्रवेश हा एकमेव किंवा पुरेसा उपाय आहे, असं त्यांनी कधीच मानलं नाही. भूमिहीन मजुरांना, विशेषतः अनुसूचित जातींमधील मजुरांना शेतजमिनींचं पुनर्वाटप करायला हवं, ही भूमिका त्यांनी वारंवार मांडली.(20) अस्पृश्यांच्या राजकीय सबलीकरणाला त्यांचा पाठिंबा होता, हे आधी नमूद केलं आहेच. गांधीविचारांचं ठोस अधिष्ठान असलेल्या साने गुरुजींच्या व्यूहरचनेमध्ये जातीय शोषणाला आव्हान देण्याचा व हे शोषण नाकारण्याचा प्रयत्न दिसतो, पण तसं करत असताना त्यांनी हिंदू धर्माला नकार देण्याऐवजी या धर्मातील सुधारणेचा पर्याय स्वीकारलेला आहे. शिवाय, राजकीय व आर्थिक उपायांना दिलेला हा पर्याय नसून या उपायांच्या जोडीने धर्मातील सुधारणा करायला हव्यात, अशी साने गुरुजींची भूमिका दिसते. साने गुरुजींनी एका ठिकाणी लिहिलं आहे की, डॉ. आंबेडकर व श्री. राजभोज यांच्या मते हिंदुधर्मीय बुद्धधर्मी झाले म्हणजे जातीयता जाईल. एक तर बुद्धांना दशावतारात घालून त्यांची ‘अहिंसा परमो धर्म’ वगैरे शिकवण घेऊन आम्ही बौद्ध धर्म आत्मसात केलाच होता; परंतु हिंदू धर्माऐवजी बौद्ध धर्म नाव घेतल्याने का क्रांती होणार आहे? ख्रिश्चन धर्मात गेलेल्यात हा ब्राह्मण-ख्रिश्चन, हा महार-ख्रिश्चन असे भेद आम्ही ठेवलेच आहेत. बौद्ध धर्म नाव घेतलं तरी ही खोड का जाणार आहे? धर्माची नावे बदला, पक्षांची नावे बदला, जातीचे बिल्ले लावूनच आपण सर्वत्र असेच मिरवणार.(...)(21) यामागील मनोवृत्ती बदलणं आवश्यक आहे, असं साने गुरुजी म्हणत होते. ‘मनातली घाण जावो म्हणजे बाहेरची जाईल’ - यातून दोन मूलभूत मुद्दे पुढे येतात. एक, आर्थिक नियतिवादापासून अंतर राखण्याचा पर्याय जाणीवपूर्वक निवडल्यास त्याची वासलात ‘ब्राह्मणी सुधारणावाद’ म्हणून लावता येईल का? दोन, जातिव्यवस्थेचं उच्चाटन करण्यासाठी हिंदू धर्म नाकारणं अत्यावश्यक आहे का? हिंदू धर्मात सुधारणा शक्यच नाही का?
हिंदू धर्माच्या संदर्भात धार्मिक सुधारणांची मांडणी कशी करता येईल, या प्रश्नाला विविध प्रकारचे प्रतिसाद येतील - हिंदू धर्म सुधारण्याची गरजच नाकारणाऱ्यांपासून ते हिंदू धर्म सुधारण्याची शक्यता नाकारणाऱ्यांपर्यंत अनेक प्रकारचे हे प्रतिसाद असतील. हिंदू धर्माचे कट्टर समर्थक हिंदू जीवनदृष्टी, रूढी, प्रथा, समाजरचना या प्रत्येक पैलूचा तात्त्विक आधार मांडू पाहतील आणि हिंदू धर्म सुधारण्याची गरजच नाकारतील. दुसऱ्या बाजूला, हिंदू धर्म म्हणजे मनुस्मृतीद्वारे संहितीकरण झालेला ब्राह्मणी धर्म, ही मांडणी स्वीकारली तर हिंदू धर्म सुधारण्याची शक्यताच मोडीत निघते. त्यामुळे हिंदू धर्मातील अंगभूत श्रेणीबद्धता नाकारण्यासाठी हा धर्मच नाकारण्याची आवश्यकता असल्याची मांडणीही आपल्याला परिचित आहे. या दोन भूमिकांच्या मध्येे कुठेतरी साने गुरुजींसारख्या व्यक्तींची भूमिका येते. त्यांनी हिंदू धर्माचा अधिक मानवी आशय पुढे आणण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाबाबतीतही चिकित्सक प्रश्न उपस्थित करता येतातच. मंदिरकेंद्री उपासना, पौरोहित्य, वारी, विधी, या गोष्टी सुधारित हिंदू धर्माचा आवश्यक भाग राहतील की त्यांची अर्थपूर्णता संपुष्टात येईल? सुधारित हिंदू व पारंपरिक हिंदू हे दोघेही सारख्याच रूढी पाळणार असतील, तर त्या दोघांमध्ये भेद कसा करायचा? या सुधारित हिंदू धर्माला पुरोहितवर्गापासून फारकत घेता येईल की ब्राह्मणेतर व स्त्रिया यांना पौरोहित्याचा अधिकार दिल्याने हिंदू धर्म अधिक समावेशक होईल. पूजा करताना कोणते मंत्र उच्चारले जातील; त्यात श्रेणीबद्ध वर्णव्यवस्थेचं समर्थन करणाऱ्या पुरुषसूक्ताचा व तत्सम इतर स्त्रोतांचा समावेश असेल का? विशेषतः प्रार्थनेच्या अधिकारासंदर्भातील लिंगभावात्मक भेदभावाचा प्रश्न सुधारित हिंदू धर्मात कशा रीतीने हाताळला जाईल? कार्तिकेय, अयप्पा, शनी यांसारख्या देवांच्या मंदिरात पारंपरिकरीत्या स्त्रियांच्या प्रवेशाला बंदी आहे, मग सुधारित हिंदू धर्मामध्ये ही मंदिरंही स्त्रियांसाठी खुली होतील का? ऋतुस्त्रावादरम्यान किंवा त्या वयात आलेल्या स्त्रियांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी सुधारित हिंदू धर्म आग्रह धरेल का? हे मूलभूत प्रश्न साने गुरुजींनी व त्यांच्यासारखी भूमिका असलेल्या इतरांनी लक्षात घेतल्याचं दिसत नाही. यातून आपल्याला आणखी एक मूलभूत प्रश्न नोंदवावा लागतो. साने गुरुजींसारख्या मंडळींच्या दृष्टीने सुधारणांचा अर्थ काय होता? गुरुवायूर, वायकोम किंवा पंढरपूर असले मंदिरप्रवेशाचे अयशस्वी किंवा यशस्वी प्रयत्न काय साध्य करू पाहत होते? त्यांचं साध्य व्यापक स्वरूपाचं असेल, तर ते तात्कालिक उद्दिष्टांची सांगड व्यापक प्रश्नांशी कशी घालत होते आणि उपरोक्त प्रश्नांना कसं सामोरं जात होते?
मंदिरप्रवेशाच्या विविध घटनांमध्ये गांधींनी घेतलेल्या ‘वादग्रस्त’ भूमिका समजून घेतल्या तर त्यातून या प्रश्नांकडे पाहण्याची एक दृष्टी मिळते. हिंदू धर्माला एक संघटित धर्म म्हणून सुधारण्याबाबतची गांधीवादी भूमिका काय होती, याबद्दलही त्यातून काही उलगडा होतो. मंदिरप्रवेशाच्या प्रश्नावर गांधींनी द्विधावृत्ती दाखवली, कचखाऊ धोरण स्वीकारलं असं वाटत असलं, तरी त्याचा उगम संघटित हिंदू धर्माविषयीच्या त्यांच्या दृष्टिकोनात सापडतो. ब्राह्मणांच्या धुरीणत्वाखालील संघटित धर्म हे गांधीदृष्टीतील हिंदू धर्माचं रूप नव्हे.(22) गांधींनी धर्माचा अर्थ सांगताना कधीही पुरोहितांना किंवा ब्राह्मणांना वैध अथवा अंतिम अधिसत्ता मानलं नाही. गांधींनी धर्माचा अर्थ सांगण्याचा स्वतःचा अधिकार कधीही सोडला नाही. त्यांच्या आश्रमांमधील नित्यक्रमामध्ये प्रार्थनेचा समावेश असला, तरीही त्यांनी कोणत्याही आश्रमात कधीच मंदिर बांधलं नाही. मंदिरप्रवेशासाठी मंदिराच्या अधिकारीवर्गाचं हृदयपरिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी कायद्याची मदत घ्यावी, हे गांधींचं आवाहन या पार्श्वभूमीवर समजून घेता येतं. विश्वस्तांचं हृदयपरिवर्तन घडवण्यासाठी साने गुरुजींनी केलेलं उपोषण (तसेच वायकोम व गुरुवायूर इथली मंदिरप्रवेशाच्या आंदोलनाने)मंदिरप्रवेशाचा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार पुरोहितवर्गाकडे सोपणारं होतं. मंदिरप्रवेशाचा कायदा करून राज्यसंस्थेच्या ‘इहवादी’ हस्तक्षेपाद्वारेसुद्धा हाच परिणाम साधणं शक्य असल्यामुळे या बाबतीत उपोषण करणं अनावश्यक आहे, असं गांधींचं मत असल्याचं दिसतं. विनोबांनी साने गुरुजींना पाठवलेलं पत्र (वरती उद्धृत केलं आहे) बारकाईनं वाचलं, तर त्यांनी उपोषणाबद्दल नापसंती का व्यक्त केली याची अधिक समजूत पटायला मदत होते. ‘बडव्यांच्या विचारांशी आपलं काही नातंगोतं आहे का,’ असा प्रश्न विनोबा उपस्थित करतात. हिंदू धर्मात सुधारणा करायची असेल, तर ब्राह्मण्य नाकारणं आवश्यक आहे, याची आठवण हा प्रश्न करून देतो. त्यामुळे धार्मिक सुधारणेसाठीच्या नकार द्यायला हवा, आणि आपल्यावर धर्मविरोधी किंवा हिंदूविरोधी असल्याचा शिक्का बसणार असेल तरीही ती किंमत मोजून धर्माचा अर्थ सांगण्याचा आपला अधिकार ठामपणे प्रतिपादित करायला हवा. अशा धार्मिक सुधारणांना होणारा विरोध धर्मावर ‘खरी’ श्रद्धा ठेवणाऱ्यांकडून होतो की, धर्म ही राजकीय अस्मितेची बाब मानणाऱ्यांकडून होतो, हेही तपासायला हवे.
अनुवाद : अवधूत डोंगरे
----
टिपा व संदर्भ
1. सिमल्यातील प्रगत अध्ययन संस्थेने 28-30 मे 2017 या दिवसांमध्ये ‘चंपारण्य सत्याग्रहाची शंभर वर्षं’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. तिथे या निबंधाचा पहिला मसुदा सादर करण्यात आला. मूळच्या इंग्रजी निबंधात काही माफक संपादन करून प्रस्तुत मराठी भाषांतर केलं आहे.
2. मंगळवेढेकर राजा. (1974) साने गुरुजींची जीवनगाथा. पुणे : साधना, 340.
3. पाहा- ढेरे रा. चिं. (1984) श्री विठ्ठल : एक महासमन्वय. पुणे : पद्मगंधा प्रकाशन. शिवाय, Zelliot, E Berntsen, M. Ed. (1988) : The Experience of Hinduism : Essays on Religion in Maharashtra. Albany : State University of New York Press.
4. दर वर्षी आषाढवारीला पंढपुरात पायी जाणाऱ्या दिंड्यांमध्ये मुस्लिमांचा सहभाग असणारी कबीर दिंडीदेखील असते.
5. मंजुळ वा. ल. (2017) श्री क्षेत्र पंढरपुरातील मठांचा इतिहास, पुणे : उत्कर्ष प्रकाशन, 130.
6. मंगळवेढेकर : 1975, इतरत्र. 344.
7. या घडामोडींचे तपशीलवार वृत्तान्त ‘गोफण’ या स्थानिक मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झाले होते. गोफणचे संबंधित अंक एकत्रित करून ‘मंदिरप्रवेशाचे महाभारत’ या नावाने प्रकाशित (1984) करण्यात आले आहेत.
8. ढेरे : 1984, इतरत्र.
9. नवयुग, 4 मे 1947. (प्रस्तुत संग्रहात समाविष्ट)
10. उपरोक्त.
11. पाहा- फडके य. दि. (1984) शोध सावरकरांचा. पुणे : श्रीविद्या प्रकाशन. तसेच सुमंत, यशवंत (1988) प्रस्तावना- महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार. पुणे : प्रतिमा प्रकाशन.
12. नवयुग, 4 मे 1947. (प्रस्तुत संग्रहात समाविष्ट)
13. उपरोक्त.
14. खान्देशातील स्थानिक नेत्यांशी झालेल्या देव यांच्या पत्रव्यवहाराचं दस्तऐवजीकरण जिल्हा काँग्रेस समितीच्या अहवालांमध्ये झालेलं आहे (शंकरराव देव पेपर्स), हे अहवाल नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीमध्ये पाहायला मिळतात. या पत्रव्यवहारांमधून हा रोष दिसून येतो. या संदर्भातील तपशीलवार चर्चेसाठी पाहा- रेडकर चैत्रा (2020) साने गुरुजी : व्यक्ती आणि विचार, साधना, पुणे.
15. या संदर्भातील देवांचं किंवा काँग्रेसचं निवेदन उपलब्ध नाही, पण गांधी आणि विनोबा यांनी या काळात साने गुरुजींना लिहिलेल्या पत्रांवरून असं सूचित होतं की, साने गुरुजींचा सत्याग्रह अनावश्यक घाईचा आहे, अशी काँग्रेसमधील नेत्यांची धारणा होती.
16. विनोबा भावे (संपा. कालिंदी) (2007) स्नेह-सन्निधी- विनोबांनी 1950 पर्यंत लिहिलेल्या पत्रांचा संग्रह, परंधाम प्रकाशन, पवनार.
17. मंजुळ : 2017, इतरत्र, 130.
19. नंतर साने गुरुजींनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर डावरे यांनी साने गुरुजींविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली.
19. साने, पांडुरंग सदाशिव (1947-50/1999). स्वप्न आणि सत्य. हरिभाऊ लिमये, पुणे. शिवाय, पाहा- रेडकर, चैत्रा (2014), इतरत्र, 84-90, 143.
20. साने : 1947-50/1997, उपरोक्त, 23.
21. Omvedt, Gail (1994) Dalits and the Democratic Revolution : Dr. Babasaheb Ambedkar and the Dalit Movement in Colonial India, New Delhi : Sage, 266-7.
22. पाहा- Parekh, Bhikhu. (1989) Colonialism,Tradition and Reform : An Analysis of Gandhi's Political Discourse. Sage, New Delhi.
Tags: आमरण उपोषण लढा अस्पृश्य पंढरपूर मंदिरप्रवेश उपोषण साने गुरुजी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या