डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

साने गुरुजींचे उपोषण - काही आठवणी

आमची दौऱ्याची मिरवणूक ढोल-झांज-लेझीम यांच्या पथकासह पांगिरे गावात शिरली, तेव्हा काशीबाई रस्त्यावर गुरुजींचे दर्शन घेण्यासाठी येऊन उभी राहिली. आम्ही गुरुजींना तसे सांगताच एखाद्या लहान बालकाप्रमाणे गुरुजी धावत गेले अन त्यांनी भर रस्त्यावर काशीबाईच्या पायांवर डोके ठेवले! काशीबाई  भांबावून गेली! तिचे पाय गुरुजींच्या अश्रृंनी ओलेचिंब झाले!

'महाराष्ट्र का सुप्रसिद्ध विठ्ठल मंदिर हरिजनों के लिए खुला होने का शुभसमाचार मिला है । इसका सारा श्रेय श्री. साने गुरुजी को है।' असे प्रशंसोदगार महात्मा गांधीजीनी सायं प्रार्थनासभेत काढले. परंतु याच महात्मा गांधींनी दहा दिवसांपूर्वी साने गुरुजींना तार करून कळवले होते की 'तुमचे उपोषण चुकीचे आहे, ते थांबवा!' याचे कारण म्हणजे काही बुजुर्ग नेत्यांनी गांधीजींचे कान फुंकले होते,' महाराष्ट्रात मुंबई राज्याचे मुख्यमंत्री श्री. बाळ गंगाधर खेर मंदिर प्रवेशाचे विधेयक मंजूर करून घेणारच आहेत. त्यामुळे या उपोषणाची गरज नाही. महाराष्ट्रातील समाजवादी मंडळी साने गुरुजींना फूस देत आहेत!' या ऐकीव माहितीवर विसंबून गांधीजींनी साने गुरुजींना उपोषण सोडण्याचा सल्ला दिला होता. त्याला नम्रतेने साने गुरुजींनी तत्काळ उत्तरही पाठवले होते की, 'बापूजी, क्षमा करा, मी हे उपोषण आता थांबवू शकत नाही.

कायदा जेव्हा व्हायचा तेव्हा होवो. माझा भर हृदयपरिवर्तन करण्यावर आहे. यामुळे कायदयाच्या अंमलबजाबणीला बळच मिळणार आहे. शिवाय गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रभर दौरा करून लाखोंच्या सभेत जनतेला मी आश्वासन दिले आहे, ते मला पाळले पाहिजे. सत्य-असत्यासी मन गेले ग्वाही । मानियेले नाही बहुमता ॥ ही माझी प्रतिज्ञा आहे!" शेवटी लोकसभेचे तेव्हाचे सभापती ग. वा. मावळंकर यांच्या मध्यस्थीने मंदिराच्या बडवे मंडळींनी मंदिर प्रवेशास मान्यता दिली आणि गांधीजींना खरी वस्तुस्थिती कळल्यावर त्यांनीही खुल्या मनाने साने गुरुजींचे जाहीर अभिनंदन केले.! 

राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबर आता यापुढे सामाजिक स्वातंत्र्याचा लढा आपण सुरू करावा असे गुरुजींनी ठरवले महाराष्ट्राचे वारकऱ्यांचे दैवत असलेला विठोबा हा ज्ञानोबाला भेटत होता, तुकोबाला दर्शन देत होता, परंतु चोखोबाला मात्र मंदिराबाहेरच तिष्ठत ठेवत होता! हे पंढरपूरचे श्रीविठ्ठलाचे मंदिर हरिजनांना खुले करण्यासाठी त्यांनी प्राणांतिक उपोषणाचा संकल्प जाहीर केला! सर्वत्र खळबळ उडली! सेनापती बापटांनी साने गुरुजींना वडीलकीच्या नात्याने सल्ला दिला की प्राणांतिक उपोषण हे अंतिम अस्त्र आहे. सारे अन्य प्राथमिक उपाय थकल्यानंतर उपोषण करावे. त्यासाठी जनजागरण व मतपरिवर्तन करण्याचे  प्रयत्नही आधी करावेत. गुरुजींनी हा सल्ला मानला! 7 जानेवारी 1947 पासून पंढरपूर विठ्ठल मंदिर प्रवेश प्रचार-दौऱ्याचा प्रारंभ मुंबईपासून झाला. 

'अस्पृश्यता निवारणाच्या कार्याचा मंदिर प्रवेश हा एक भाग आहे. मंदिराच्या दरवाजाबरोबरच सर्वांच्या हृदयाचीही दारे उघडावीत हा आमचा प्रयत्न आहे! पंढरपूर हे महाराष्ट्राचे प्रमुख मंदिर आहे. ते उघडले की महाराष्ट्रातील गावोगावची मंदिरेही खुली होण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे! असे प्रतिपादन साने गुरुजी करीत असत. हा मंदिर प्रवेश-प्रचार दौरा सातारा जिल्ह्यातून दक्षिणी संस्थानांकडे आला. या दौऱ्यात पूर्णवेळ सहायक म्हणून आवश्यक कार्य करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. सांगली, मिरज, जमखंडी, रायबाग, पोंगिरे, निपाणी, चिखली, गडहिंग्लज, राधानगरी, मलकापूर, कोडोली, जोतिबाचा डोंगर, कोल्हापूर, नृसिंहवाडी, कुरुंदवाड वगैरे गावी हा प्रचारदौरा झाला. या दौऱ्यात साने गुरुजी आणि सेनापती बापट यांच्यासमवेत 'महाराष्ट्र शाहीर' या नावाचे कलापथकही होते. 

सर्वश्री कवी वसंत बापट, राम तेलंग, लीलाधर हेगडे, माडगूळकर, राजा मंगळेवेढेकर, काका केणी असे अनेक तरुण त्यामध्ये होते. सभेच्या प्रारंभी 'घ्या रे, हरिजन घरात घ्या रे, घरात घ्या!' हे समूहगीत म्हटले जाई. ग.दि.मांचे धाकटे बंधू भालूमास्तर माडगूळकर हे अरबांच्या घोड्यांच्या विक्रीची कथा रंगवून सांगत. आणि शेवटी साने गुरुजीच्या रसाळ अन् हृदयस्पर्शी वाकगंगेत दोन दोन तास सारा जनसमुदाय बुडून जात असे! लोकांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागत. गुरुजींच्या वाणीने सारे श्रोते प्रभावित होऊन जात! या दौऱ्यात प्रत्येक गावी सकाळच्या प्रहरी हरिजन वस्तीत साफ सफाई आणि दुपारच्या वेळेत कार्यकर्त्यांशी चर्चा आणि व्यक्तिगत भेटीगाठी असा कार्यक्रम चाले. गुरुजींचे हे कार्यक्रम चालू असताना सेनापती बापट लहान मुलांना गोळा करून त्यांच्याबरोबर गोट्या खेळत!

चुरमुऱ्याची भेळ मागवून मुलांसमवेत खात असत! याला सेनापतींनी 'लेनिन मिक्शर' असे नाव दिले होते! कोल्हापूर शहरानंतर प्रचारदौरा नृसिंहवाडीस गेला श्री. दत्तगुरूंच्या पुजाऱ्यांना भीती वाटत होती की हरिजनांच्या प्रवेशामुळे मंदिर अपवित्र होणार की काय? पण आमचा भर जोर-जबरदस्तीवर नव्हता. विचार समजावून पटवून देण्यावर होता. याकरता प्रचारसभा कुरुंदवाडच्या कृष्णा-पंचगंगा संगम घाटावर घेतली. महाशिवरात्रीची अमाप यात्रा लोटली होती! लाखांवर श्रोते असतील. गुरुजींच्या वाणीने सारेजण प्रभावित होऊ गेले. या मंदिर प्रवेश प्रचारदौऱ्यात 1942 च्या चले जाव चळवळीत तुरुंगात गेलेल्या आणि हुतात्मे झालेल्या अनेक कार्यकत्यांच्या घरोघरी जाऊन मातापित्यांची विचारपूस साने गुरुजी करीत असत. 

निपाणीच्या पूर्वेला 'पांगिरे' या गावचा भूमिगत कार्यकर्ता मल्ल हणबरही पोलिसांना सापडत नव्हता. म्हणून त्याची निष्पाप आई काशीबाई हणबर हिच्यावर इंगवले नावाच्या फौजदाराने साऱ्या पुरुषजातीला लाजेने मान खाली घालायला लावतील असे अमानुष अत्याचार केले होते! हे प्रकरण भारतात व जगात गाजले होते. त्यामुळे ब्रिटिश सरकारची जगभर नाचक्की झाली होती! आमची दौऱ्याची मिरवणूक ढोल-झांज-लेझीम यांच्या पथकासह पांगिरे गावात शिरली, तेव्हा काशीबाई रस्त्यावर गुरुजींचे दर्शन घेण्यासाठी येऊन उभी राहिली. आम्ही गुरुजींना तसे सांगताच एखाद्या लहान बालकाप्रमाणे गुरुजी धावत गेले अन त्यांनी भर रस्त्यावर काशीबाईच्या पायांवर डोके ठेवले! काशीबाई  भांबावून गेली! तिचे पाय गुरुजींच्या अश्रृंनी ओलेचिंब झाले! जणू साऱ्या पुरुषजातीच्या वतीने इंगवले फौजदाराने केलेल्या पापांचे प्रक्षालन गुरुजींनी आपल्या अश्रूंनी केले! असाच आणखी एक प्रसंग! निपाणीच्या पश्चिमेकडील चिखलगावात आमची मिरवणूक शिरली. वाद्यांचा आवाज ऐकून हुतात्मा हरी बेनाडीची म्हातारी आंधळी आई दरवाजाला धरून चाचपडत उभी राहिली. आम्ही तसे गुरुजींना सांगितले लगेच गुरुजींनी धावत जाऊन त्या माऊलीला मिठी घातली! गुरुजींच्या डोक्यावरून आपला थरथरता हात फिरवून तिनं विचारलं, 'माझा हरी कुठे आहे?" "मीच तुझा हरी, आई!" गुरुजींनी उत्तर दिले! अशा असंख्य मातांचा 'हरी' बनून गुरुजींच्या अश्रृंची गंगा महाराष्ट्रभर सर्वत्र संचार करीत राहिली! या गंगेच्या पुण्यस्पर्शाने अनेकांची जीवने पावन झाली, पवित्र झाली! एप्रिल महिन्याच्या अखेरीस पंढरपूरच्या भीमातीरावर ही गंगा पोचली! 10 मे 1947 रोजी या उपोषणाची यशस्वी सांगता झाली! ज्ञानोबा आणि तुकोबांप्रमाणे चोखोबालाही विठोबाचे मंदिर खुले झाले.

Tags: काका केणी   राजा मंगळेवेढेकर लीलाधर हेगडे राम तेलंग काशीबाई हणबर वसंत बापट साने गुरुजी चंद्रकांत पाटगावकर kaka Keni Raja Mangalwedhekar Liladhar Hegade Ram lenang Kashibai Hanabar Vasant Bapat Sane Guruji Chandrkant Patgawkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके