डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

न्या. राजिन्दर सच्चर : एक सच्चा माणूस

राजिंदर सचर हे एक प्रकारे फाळणीचे बळी होते. त्या वेळी अनेक हिंदूंना आणि शीखमंडळींना अचानक एका रात्रीत घरादाराला-मातृभूमीला सोडून यावे लागले, त्यातील ते एक होते. एका अर्थाने फाळणीच्या पूर्व परिस्थितीमध्ये त्यांना सातत्याने हिंदू-मुस्लिम संघर्षाचा जाच व्यक्तिगतरीत्या सहन करावा लागला. आणि तरीही इतर अनेकांसह तेही एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते की, ज्यांनी भारतातील मुस्लिम समाजाची परिस्थिती सुधारावी म्हणून सातत्याने प्रयत्न केले होते. शेवटी मुस्लिम हा भारतातील सर्वांत मोठा अल्पसंख्य समाज आहे, याची नोंद त्यांनी घेतली होती. भारतात आल्यावर त्यांनी भारतीय सोशॅलिस्ट पक्ष पुन्हा एकदा उभा राहील, यासाठी प्रयत्न पण केले होते. त्यांच्या लेखनातून वाट काढताना त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य जाणवते की- त्यांना स्वत:ची मते होती, दृष्टिकोन होता आणि त्यासाठी अतिशय नेटाने  संघर्ष करण्याची तयारीही होती.

हल्लीच्या काळात ‘बोलणारी’ माणसे भेटणे विरळ झाले आहे, म्हणूनच वायरमध्ये त्यांच्या आत्मचरित्राचे परीक्षण आल्यावर मी भारावून गेले. मला वाईट वाटले की, इतक्या भल्या माणसाची मला पुरेशी माहिती कशी नाही? भारतातील मुस्लिम समाजाच्या सद्य:स्थितीबद्दलचा अहवाल यूपीए सरकारच्या काळात त्यांनी लिहिला होता; याचे उल्लेख मी आमच्या मुस्लिम स्त्रीवादी मैत्रिणींकडून पुष्कळदा ऐकले होते. काही आकडेवारीही समोर आली होती, पण ती आकडेवारीच राहिली होती. आज मुस्लिमद्वेष इतका भडकलेला असताना मला वाटले की, या अहवालाचे पुन्हा एकदा पाढे म्हणून दाखवायची गरज आहे. ते करू तेव्हा करू; पण आज तरी या माणसाची ओळख करून घेऊ, असे माझ्या मनात आले. त्यांचे हे आत्मचरित्र ते निवर्तल्यावर प्रसिद्ध झाले आहे, त्यामुळे त्यानिमित्ताने सत्कार समारंभ आणि पुरेशी प्रसिद्धी मिळण्याची शक्यता नाही. पुस्तक दोघांनी मिळून तयार केले आहे. एक आहे त्यांचा एकनिष्ठ सचिव निरंजन कौशिक आणि अतिशय साक्षेपी पत्रकार चित्रा पद्मनाभन. या दोघांची त्यांच्याबद्दल असलेली निष्ठा व आपुलकी पाहता, वाटेत भेटलेल्या सर्वांना आपल्याबरोबर घेऊन जाण्याच्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. अनेकांबरोबर त्यांचा सहज संवाद होत असे. त्यामध्ये समोरची व्यक्ती कोणत्या वयाची आणि अनुभवाची आहे, हेही ते बघत नसत. उद्याचे जग सुंदर असेल, नव्या जाणिवांचे असेल यावर त्यांचा विश्वास होता.

सच्चर प्रत्यक्ष कधी राजकारणामध्ये निवडून आले नाहीत आणि तरीही ते मनाने राजकारणी होते. बरीच वर्षे तरुणपणी ते संयुक्त समाजवादी पक्षाचे सभासदही राहिले होते. ‘हिंद मजदूर सभे’चे काम केले होते. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश आणि नंतर मुख्य न्यायाधीश म्हणून काम करत असताना राजकारणाशी म्हणजेच सत्तेमधील राजकीय लोकांशी त्यांचा संबंध सतत येत राहिला. त्या वेळी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. प्रत्येक घटनेबद्दल त्यांनी स्वत:ची भूमिका घेतली. कोणत्याही आमिषाला बळी न जाता स्वत:ची विवेकबुद्धी सांभाळून ठेवण्याची त्यांची तयारी  होती. राजकारणाबद्दल प्रेम असूनही  राजकारण अंगाला लावून न घेणारा निरलस माणूस विरळाच.  

आजच्या पाकिस्तानात 1923 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. जवळजवळ 20 वर्षे वयापर्यंत ते लाहोरला राहिले होते. दि.14 ऑगस्ट 1947 ला ते पाकिस्तानात होते. त्यांचे वडील तेथील संविधान समितीमध्ये सभासद म्हणून निवडून आले होते. ते भीमसेन सच्चर या गांधीवादी स्वातंत्र्यसैनिकांचे पुत्र होत. मुख्य म्हणजे, महंमद अली जीनांनी पहिल्या स्वातंत्र्यदिनी केलेले भाषण ऐकायला ते उपस्थित होते. त्या भाषणामध्ये जीनांनी ‘हे स्वातंत्र्य सर्वांचे आहे; हिंदू, मुस्लिम, शीख सर्व जण आपापल्या धर्माचे पालन करायला स्वतंत्र आहेत,’ हे शब्द त्यांनी ऐकले आणि घरी येऊन बघतात तर रेडिओवर हिंदू-मुस्लिम दंग्याच्या आणि हिंसेच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्यांच्या आईचे वडील आणि सर्व कुटुंब उन्हाळ्यासाठी डलहौसीला जाऊन राहिले होते, ते परत येऊ शकले नाहीत. त्यांच्या घरात आधीच कोणी तरी राह्यला आले होते आणि सच्चरांना आतमध्ये यायला मज्जाव करत होते. एवढेच नव्हे तर, आणखी काही दिवसांनी ते स्वत: व वडील दिल्लीहून लाहोरला सामान घेण्यासाठी आले, तेव्हा त्यांचे स्वत:चे घर भारतातून पाकिस्तानात आलेल्या एका मुस्लिम वकिलाला असेच मिळाल्याचे लक्षात आले. नशिबाची गोष्ट एवढीच की, तो वकील खूप सभ्य निघाला आणि त्याने शांतपणे त्यांना सामान बांधण्यासाठी वेळ दिला. हे मुद्दाम सांगायचे अशासाठी की- स्वत: फाळणीचे बळी असूनसुद्धा कधी त्यांना मुस्लिमांबद्दल चीड आली नाही; द्वेष वाटला नाही तर अल्पसंख्याकांचे दु:ख ते समजू शकत होते. पुढे 1948 मध्ये भीमसेन सच्चर हे पंजाब प्रांताचे मुख्यमंत्रीही झाले होते. त्यामुळेच राजिंदरना जवळच आखाड्यात चाललेले अनेक राजकीय सत्तासंघर्ष आणि घटना जवळून बघण्याची संधी मिळाली. कौतुकाची गोष्ट म्हणजे  तरुणपणीचा स्वत:चा उल्लेख करताना ते स्वत:ला फक्त राजिंदर लाल म्हणवून घेताना आढळतात, कारण त्यांना असे वाटते की- आडनाव लावले तर त्यांच्या वडिलांच्या छायेचा ते उपयोग करून घेतात की काय, असे लोकांना वाटेल.

या पुस्तकातून सच्चरांचा जीवनप्रवास- एक मुलगा, एक विद्यार्थी, एक कायदेतज्ज्ञ, एक न्यायाधीश, राजकीय प्राणी, राजकीय कार्यकर्ता आणि पुन्हा अनेकांना दिशा दाखविणारे मेन्टॉर म्हणून पुढे येत राहतो. अतिशय संघर्षमय प्रसंगीही न्यायाची बाजू आग्रहपूर्वक जपणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधोरेखित होत जाते. त्यांच्या जीवनातून हाच संदेश मिळतो की, तुम्ही स्वत:साठी कोणतेही कार्यक्षेत्र निवडलेले असू दे, उदाहरणार्थ- वकील, न्यायाधीश किंवा पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजचा कार्यकर्ता- या सर्व छोट्या-मोठ्या भूमिकांतूनही शेवटी अर्थपूर्ण आणि आदर्शवत्‌ काम करता येते, हे त्यांनी दाखवून दिले.

काँग्रेसमधून फुटून समाजवादी पक्ष 1948 मध्ये तयार झाला होता. डॉ.लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघविरोधी मोहीम सुरू केली होती. त्यांनी काही दिवस हिंद मजदूर संघ या समाजवादी पक्षाच्या कामगार युनियनमध्ये काम केले होते. जॉर्ज फर्नांडिसशी त्यांची ओळख होती. या पक्षातर्फे आपल्याला राज्यसभेमध्ये जाता येईल का, याची त्यांनी चाचपणी केली होती. संसदीय कामातूनच राजकारण पुढे नेता येईल, असे त्यांना वाटत होते. पण ते शक्य झाले नाही आणि त्यांनी वकिली सोडून उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक पत्करली. त्यांचा पोशाख बदलण्यासाठी कामगार संघटनेचे काम कारणीभूत झाले. कामगारांमध्ये हिंडतांना त्यांच्या लक्षात आले की, पँट आणि कोट घातल्यामुळे एक प्रकारचा दुरावा तयार होतो. म्हणून ते पायजमा आणि कुर्ता घालू लागले. पुढे उच्च न्यायालयामध्येही त्यांनी आपला पोशाख कायम ठेवला. ते अचकन आणि सुरवार असा भारतीय पोशाख घालू लागले. अनेक वेळा सहकाऱ्यांनी सांगूनही त्यात फरक पडला नाही. कामगार संघटनेचे काम करताना त्यांना थोडे अपराधी वाटत असे की, वडील आपली जेवण्या-खाण्याची काळजी घेतात म्हणून आपण असे बिनपैशाचे काम करू शकतो. त्याला विशेष स्वार्थत्याग म्हणता येणार नाही.

सच्चर बोलत राहत आणि आपली भूमिका मांडत राहत. आणीबाणी काळातील दोन घटना खूप बोलक्या आहेत. आणीबाणी जाहीर झाल्यावर सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांनी शासनाशी समझोता केला होता. पण बार कौन्सिलच्या वकिलांनी त्या दिवशी विरोध जाहीर केला आणि सभा घेतली. सच्चर उच्च न्यायालयात न्यायाधीश होते, तरीही ते या निदर्शनांना हजर राहिले. त्याच काळात सिक्कीम राज्य नुकतेच जाहीर झाले होते आणि तेथे उच्च न्यायालय उघडले गेले होते. सच्चरांची बदली तेथील उच्च न्यायलयातील मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आली. त्यांना ती नको होती; पण ज्येष्ठ सहकाऱ्यांनी सांगितले की, यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे लवकर उघडले जातील. तेव्हा सच्चर सिक्कीममध्ये असताना त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी तेथे भेट दिली. दोन दिवस त्या होत्या. सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर पॅडच्या बाहेर स्वागतासाठी ज्या चार-पाच व्यक्तींची निवड केली गेली, त्यात सच्चरांचे नाव होते. पण त्यांनी निक्षून सांगितले नाही. रात्री जेवताना इंदिराबाईंची भेट झाली, पण अगदी औपचारिक संभाषणाशिवाय ते काहीच बोलले नाहीत. याच इंदिराबार्इंच्या हत्येनंतर जे हत्याकांड दिल्ली येथे झाले, 6000 शीख मंडळी मारली गेली. त्या वेळी राजीव गांधींना जाब विचारणारी जी थोडी मंडळी होती, त्यात ते होते. त्यांच्याच दबावामुळे त्या वेळी शोधकमिशन नेमण्यात आले. अर्थात त्याचा फारसा उपयोग झाला नाही, हा इतिहास आहे.

कायदा, न्यायालये आणि न्यायव्यवस्था याबद्दल त्यांची खास मते होती. त्यांचे जीवन म्हणजे भविष्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम करू इच्छिणाऱ्या, किंवा कायद्याशी संबंधित काम करू इच्छिणाऱ्या सर्वांना एक आदर्श आहे. कारण कायदा या ज्ञानशाखेचा उद्देशच मुळी सर्वांत दुबळ्या आणि सत्ताहीन अशा लोकांना न्याय मिळवून देणे हाच आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि जेव्हा कोणी ऐकून घेणार नाहीत, तेव्हा त्यांचा आवाज होणे हेच न्यायदान करणाऱ्यांचे काम आहे, असे त्यांचे मत होते. न्यायाधीशांनी दिवाळीच्या वेळी वकिलांकडून येणारी मिठाई, भेटवस्तू स्वीकारू नयेत- हे ते आवर्जून सांगत असत. तसेच न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत त्यांच्या मते न्यायाधीशाच्या सामाजिक विचारव्यूहाचा विचार झाला पाहिजे. न्यायाधीश हा संविधानाचा संरक्षक असतो. त्या काळी बांधिलकी असलेले न्यायाधीश योग्य की अयोग्य, ही चर्चा बऱ्याच जोरात चालू होती. त्या वेळी त्यांनी स्वत:चे मत बोलून दाखविले होते. शासनाशी- किंबहुना सत्तेवर असणाऱ्या पक्षाशी बांधिलकी असणे चूक आहे, पण संविधानाशी बांधिलकी असलीच पाहिजे. या पार्श्वभूमीवर त्यांनी कामगार व कंपनी यांच्यामधील केससंबंधी दिलेला निकाल ही बांधिलकी दर्शवितो. खालच्या न्यायालयाने दिलेला निकाल कामगाराच्या बाजूने लागला आणि त्याला त्याचा मागील पगार देण्याबाबत कंपनीसाठी हुकूम निघाला. परंतु कंपनीने आपण वरील न्यायालयात अपील करणार आहोत आणि म्हणून आता पगार देण्याची गरज नाही, अशी भूमिका मांडली. त्यावर सच्चरांनी 50 टक्के रक्कम आता द्या आणि बाकी रक्कम नंतर द्या, असा न्याय दिला. कामगाराने काम केलेले आहे, त्याची भरपाई झाली पाहिजे, ही भूमिका घेतली. तोपर्यंत सर्व कंपन्या खालच्या न्यायालयातील निकालावर स्टे आणत होत्या आणि बिचारा कामगार पैशाविना तडफडत असे. सच्चरांचा निकाल हा आदर्श समजला गेला आणि हीच पद्धत पुढे चालू राहिली. ते एका हाय पॉवर कमिटीचे सभासद होते. त्या कमिटीने रिव्ह्यू कंपनीज ॲक्ट करून 1978 मध्ये तो अहवाल सरकारला सादर केला. त्यात महत्त्वाची सूचना होती की, कोणत्याही कंपनीला राजकीय पक्षांना देणग्या देण्यास बंदी घालावी. मात्र हा कायदा 1985 मध्ये सुधारणा करून बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी निर्णय घेऊन देणगी देण्यास हरकत नाही, असा करण्यात आला. यानंतर काही कालावधीने तो आणखी सुधारून तीन वर्षे नफ्याच्या सरासरीच्या 7.5 टक्क्यांपर्यंत देणग्या देण्याची परवानगी देण्यात आली. आजच्या राजकारणातील पैशांचे महत्त्व कसे वाढत गेले ते आपण जाणतोच.

या पुस्तकातून स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्य काळासारख्या खळबळजनक काळाचा आलेख रेखाटला गेल्यामुळे अनेक महत्त्वाची माणसे आणि प्रसंग सहजपणे सच्चरांसंदर्भात समोर येतात. उदाहरणार्थ- सच्चरांचे वडील भगतसिंगबरोबर तुरुंगाच्या कंपाऊंडमध्ये फिरत असत, तेव्हापासून ते जीनांनी ऑगस्ट 1947 मध्ये पाकिस्तान स्वतंत्र होत असताना केलेल्या भाषणचा उल्लेख येतो, तसेच महात्मा गांधींच्या हत्येनंतर बिर्ला हाऊसच्या आवारामध्ये धक्का बसल्यामुळे व्यथित झालेले नेहरू बोलत असताना सच्चरांची आठवण ठळकपणे पुढे येते. आणीबाणीच्या विरोधात केलेले प्रयत्न, नंतर 1984 ला इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेले शिरकाण या सर्व प्रसंगांची उजळणी त्यांच्या स्वत:च्या मतांनिशी पुढे येते. त्यानंतरचा सर्वांत अलीकडचा प्रसंग म्हणजे मुस्लिम समाजाच्या परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर जी प्रचंड टीका सहन करावी लागली, विरोधाला तोंड द्यावे लागले- त्या वेळचे अनुभव. एखाद्या देशापुढे अनेक आव्हाने उभी असतात आणि सर्वच संवेदनशील नागरिकांना त्यांच्यातून मार्ग काढण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.  

सामान्य माणसाने, संवेदनशील नागरिकांनी सत्तेला प्रश्न विचारत राहणे, बोलत राहणे हे किती आवश्यक आहे, हे सच्चरांच्या जीवनातून पुन्हा एकदा लक्षात येते. नाही तर फक्त राजकीय पक्षांना आपण राजकीय लढे लढण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिल्यासारखे होते. पुष्कळदा असे प्रश्न विचारत राहणे हे भिंतीवर डोके आपटण्यासारखे वाटून जाते, तरीसुद्धा सतत बोलत राहण्यामुळे चर्चेचा प्रवाह बदलण्यास काही प्रमाणात मदत होते आणि अगदी न वाकणारा नेतासुद्धा काही वेळा नवे विचार अजमावून पाहायला तयार होतो. सच्चरांच्या जीवनचरित्रामधून लक्षात येते की, पूर्वीचे काही न्यायाधीश उदा.- ए.पी.शाह, मदन लोकूर, गोपाल गौडा आणि अशीच काही महत्त्वाची मंडळी जेव्हा त्यांच्या व्यवस्थेबद्दलच्या ज्ञानाच्या जोरावर सत्तेवर असणाऱ्यांच्या कृतीला सतत जबाबदार धरत राहतात, स्पष्टीकरण विचार राहतात; तेव्हा काही प्रमाणात सत्तेला संविधानाच्या तत्त्वांना जागून जनतेला न्याय देण्यास ते भाग पाडू शकतात.

अखेरच्या दिवसांत त्यांचे खरे नाव झाले ते मुस्लिम समाजातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक  मागासलेपणाचा दस्तऐवज त्यांनी तयार केल्यामुळे (2006). त्या वेळचे पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्या शासनाने त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या वरिष्ठ पातळीवरील समितीला हा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्या अहवालामुळे मुस्लिम समाजाबाबतच्या चर्चाविश्वाची दिशाच बदलून गेली. त्याचे परिणाम दोन्ही बाजूने झाले. एक तर मुस्लिम समाजाच्या अंतर्गत ह्या चर्चेला योग्य ती दिशा मिळाली आणि तसेच मुस्लिम समाजाच्या बाह्य विश्वातही, देशातही यातील अनेक मुद्दे अधोरेखित होऊन डोळे उघडल्यासारखे झाले. आजपर्यंत मुस्लिम समाजाची चर्चा केवळ त्यांची ‘अस्मिता जपणे’ या संकल्पनेवर येऊन थांबत असे. आता ती त्यांची पीछेहाट कशी झाली आहे आणि त्यांचे सक्षमीकरण कसे होण्याची गरज या मुद्यावर येऊन ठेपली. एवढेच नव्हे तर मुस्लिम समाजानेसुद्धा सक्षमीकरणासाठी बांधिलकी असल्याचे जाहीर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. या पार्श्वभूमीवर जे सतत काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणाबद्दल बोलत होते, त्यांच्या शिडातील हवाच निघून गेली. मात्र दु:खाची गोष्ट अशी की, तो अहवाल प्रसिद्ध झाल्याला आठ वर्षे होत नाहीत तोवर परिस्थितीमध्ये नाट्यपूर्ण बदल झालेला आहे. आता त्यांच्या अस्मितेचा प्रश्न तर मागेच पडला आहे, पण सुरक्षितता आणि त्याहून अधिक त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

राजिंदर सच्चर हे एक प्रकारे फाळणीचे बळी होते. त्या वेळी अनेक हिंदूंना आणि शीख मंडळींना अचानक एका रात्रीत घरादाराला, मातृभूमीला सोडून यावे लागले, त्यातील ते एक होते. एका अर्थाने फाळणीपूर्व परिस्थितीमध्ये त्यांना हिंदू-मुस्लिम संघर्षाचा जाच  व्यक्तिगत रीत्या सातत्याने सहन करावा लागला. तरीही इतर अनेकांसह तेही एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते की, ज्यांनी भारतातील मुस्लिम समाजाची परिस्थिती सुधारावी म्हणून सातत्याने प्रयत्न केले होते. शेवटी मुस्लिम हा भारतातील सर्वांत मोठा अल्पसंख्य समाज आहे, याची नोंद त्यांनी घेतली होती. भारतात आल्यावर त्यांनी भारतीय सोशॅलिस्ट पक्ष पुन्हा एकदा उभा राहील, यासाठी प्रयत्न पण केले होते. त्यांच्या लेखनातून वाट काढताना त्यांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य जाणवते की, त्यांना स्वत:ची  मते होती, दृष्टिकोन होता आणि त्यासाठी अतिशय नेटाने संघर्ष करण्याची तयारीही होती. त्यांच्यावर अनेक वेळा कट्टर लोकांनी हल्ला करण्याचा व त्यांच्या दृष्टिकोनाचा अपभ्रंश करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांचे चैतन्य हरपले नाही. ते स्वत: म्हणतात तसे ते त्यांचे वडील व आजोबा यांच्या प्रभावाखाली होते आणि म्हणूनच वैश्विक मानवी आदर्श सांभाळण्याची त्यांनी तात्त्विक पराकष्ठा केली. विश्वबंधुत्वाची कल्पना पावित्र्यपूर्वक जपली.

जर सच्चर आणखी काही काळ जगले असते, तर मागील वर्षी सध्याच्या सरकारविरोधी नागरिकता आणि धर्म जोडला गेल्याच्या पार्श्वभूमीवर (CAA) संबंधित धरणे झाली, त्याबद्दल त्यांनी बरीच टीकाटिप्पणी केली असती. आपल्याला माहिती आहे की, जेव्हा पाकिस्तानची निर्मिती झाली आणि त्यांना लाहोरमध्ये स्वत:च्या घरातून हाकलून लावले गेले होते, त्या वेळी ते व्यथित झाले होते पण रागावलेले नव्हते. नागरिकतेच्या प्रश्नामध्ये धर्म आल्यावर निर्माण होणाऱ्या विद्वेषाची परिणती काय होते, हे त्यांनी स्वत: अनुभवले होते. त्यांना कधी निवृत्त न्यायाधीश म्हटलेले आवडत नसे. म्हणूनच ते 12 वर्षे पीयूसीएल या संस्थेचे काम करत राहिले. काश्मीर प्रश्न नुकताच सुरू झाला होता. त्या वेळी त्यांनी काश्मीरचा दौरा करून जेकेएलएफ या जहाल तरुणांच्या संघटनेबरोबर बोलणी (1989-1993) करण्याचा प्रयत्न केला होता.

अशा अतिशय सज्जन आणि सच्च्या माणसाला प्रणाम!    

In Pursuit of Justice
- Justice Rajindar Sachar
Rupa Publications
Pages 280, Rs. 595         

----

या पुस्तकातून स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्य काळासारख्या खळबळजनक काळाचा आलेख रेखाटला गेल्यामुळे अनेक महत्त्वाची माणसे आणि प्रसंग सहजपणे सच्चरांसंदर्भात समोर येतात. उदाहरणार्थ- सच्चरांचे वडील भगतसिंगबरोबर तुरुंगाच्या कंपाऊंडमध्ये फिरत असत, तेव्हापासून ते जीनांनी ऑगस्ट 1947 मध्ये पाकिस्तान स्वतंत्र होत असताना केलेल्या भाषणचा उल्लेख येतो, तसेच महात्मा गांधींच्या हत्येनंतर बिर्ला हाऊसच्या आवारामध्ये धक्का बसल्यामुळे व्यथित झालेले नेहरू बोलत असताना सच्चरांची आठवण ठळकपणे पुढे येते. आणीबाणीच्या विरोधात केलेले प्रयत्न, नंतर 1984 ला इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेले शिरकाण या सर्व प्रसंगांची उजळणी त्यांच्या स्वत:च्या मतांनिशी पुढे येते. त्यानंतरचा सर्वांत अलीकडचा प्रसंग म्हणजे मुस्लिम समाजाच्या परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर जी प्रचंड टीका सहन करावी लागली, विरोधाला तोंड द्यावे लागले- त्यावेळचे अनुभव.     

Tags: राजिन्दर सच्चर छाया दातार पुस्तक परिचय इंग्रजी पुस्तक काश्मीर गोपाल गौडा मदन लोकूर ए.पी.शाह weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

छाया दातार,  मुंबई
chhaya.datar1944@gmail.com

मागील अर्धशतक स्त्रीमुक्ती चळवळीतील महत्त्वाच्या कार्यकर्त्या व लेखिका असलेल्या छाया दातार, विचारवेध संमेलनाच्या अध्यक्ष राहिल्या आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके