डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मारिया मिएस यांचे 'पॅट्रिआर्की ॲन्ड ॲक्युमुलेशन ऑन वर्ल्ड स्केल'

मला हॉलंड सरकारची शिष्यवृत्ती मिळाली 16 महिन्यांसाठी, वयाच्या 36 व्या वर्षी (1980-81). तेथे मारिया मिएस शिकवायला होती. जगभरातून आलेल्या माझ्याच वयाच्या आत-बाहेर असणाऱ्या 20 स्त्रिया होत्या. त्यामध्ये मारियाने डच स्त्रियांना सामील करून घेण्याची स्पेशल परवानगी मिळविली होती. त्यामुळे आम्हा तिसऱ्या जगातून किंवा जगाच्या दक्षिणेतून आलेल्या स्त्रियांना पहिल्या जगातील स्त्रियांचे प्रश्न आणि तेथे सुरू झालेली स्त्रीवादी चळवळ जवळून अनुभवायला मिळावी, हा उद्देश होता. शीर्षकामध्ये वर्णन केलेले पुस्तक नंतर प्रसिद्ध झाले, पण आम्हाला शिकविण्यात येत असलेल्या प्रश्नांतूनच या पुस्तकाने आकार घेतला असे म्हणायला हरकत नाही.  

तशी मी डाव्या चळवळीतील कार्यकर्ती होण्याचे आणि त्यातूनच आलेले स्त्रीवादाचे भान याची सुरुवात वयाच्या तिशीनंतर (1973 पासून) झाली. मागोवा गटाच्या मार्क्सवादी अभ्यास बैठकींतून स्त्रियांनीही कामगार चळवळीत- त्या वेळचा लोकप्रिय शब्द ‘सर्वहारा’ चळवळीत- भाग घेतला पाहिजे, हे तत्त्व मनावर बिंबविले गेले होते. त्यातील काही मंडळी शहादा येथील आदिवासींशी संबंधित श्रमिक संघटनेशी जोडलेली होती आणि त्यामुळे आदिवासी स्त्रियांशी बोलणे-चालणे, त्यांची शिबिरे घेणे यातून सर्वहारा स्त्रियांचे काही प्रश्न पुरुषांहून वेगळे असतात, हेही लक्षात येत होते. म्हणूनच आजही कोणी विचारले की स्त्रीवाद कोणी शिकविला, तर मी ‘आदिवासी स्त्रियांकडून’ असे उत्तर आपसूक देते.

या स्त्रीवादाच्या अंकुराला खाद्य आणि पाणी मिळाले ते मात्र 1975 या वर्षी युनोने जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय स्त्री वर्षाने. यानिमित्ताने 1974 मध्ये ‘भारतातील स्त्रियांची परिस्थिती’ हा पहिलाच समग्र अहवाल वीणा मुझुमदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने प्रसिद्ध केला होता. सर्व क्षेत्रांतील स्त्री-पुरुषांची आकडेवारी गोळा करून दोन्ही लिंगातील स्थितीमधील फरक ठळकपणे लक्षात आणला गेला होता. पुरुषांच्या मानाने स्त्रिया किती मागे आहेत, हे पुन: पुन्हा दिसत होते. या परिस्थितीला नाव दिले गेले नव्हते. पण तेव्हापासून स्त्रियांचा लढा हा वेगळा आणि वेगळ्या पद्धतीने लढावा लागणार आहे, हे लक्षात येत गेले.

अर्थात मार्क्सवाद्यांकडे यालाही उत्तर होते. एंगल्स हा मार्क्सचा सहकारी. त्याचे पुस्तक ‘दि ओरिजिन ऑ़फ दि  फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी ॲन्ड दी स्टेट’ यात दाखवूनच ठेवले होते की, पुरुषांनी तंत्रज्ञानाच्या साह्याने संपत्ती मिळविण्यास सुरुवात केली आणि मग स्त्रियांवर त्या संपत्तीला वारस निर्माण करण्याची जबाबदारी आली. पुरुषाच्या मालकीचे कुटुंब ही संस्था तयार झाली. मग या सामूहिक कुटुंबांच्या संरक्षणासाठी काही सैन्य व राज्यसंस्था निर्माण झाली. स्त्रीचे बंधन पूर्ण झाले. ‘पुरुषसत्ता’ हा उल्लेख त्याने केला आहे. तरीही सर्वसाधारण मांडणी हीच होती की, सर्वहारा वर्गाची क्रांती होऊन समाजवादी समाजाची स्थापना झाली की, अनेक प्रकारचे कायदे करून पुरुषसत्तेचा वारसा पुसला जाईल. आमच्या लक्षात आले की, या सर्वंकष क्रांतीची वाट पाहण्यात अर्थ नाही. येथे आत्ता काही बदल घडले पाहिजेत.

काही प्रमाणात स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात आणि नंतर संविधानामध्ये अनेक मार्गदर्शक तत्त्वे स्त्रियांसाठी तयार झाली आहेत. पण त्यांना मूर्त रूप देण्यासाठी जो जोश लागतो, जी जिद्द लागते- ती प्रशासनात तर नाहीच, पण राजकीय पक्षातही नाही. पुरुषसत्ता ही रोज घडणाऱ्या हिंसेतून प्रगट होत असते. रस्त्यावरील बलात्कारातून, कौटुंबिक हिंसेतून आणि कामाच्या ठिकाणी दिसणाऱ्या छळातून. या हिंसेला आव्हान देण्यासाठी स्त्रियांना तयार करणे, जरूर पडल्यास कायद्यांमध्ये बदल मागणे हा स्त्रीवादी चळवळीचा एक महत्त्वाचा मार्ग असल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी अनेक स्त्रियांचे गट स्थापन झाले. केवळ आर्थिक स्वायत्तता मिळवून देऊन स्त्रिया भयमुक्त होत नाहीत; त्यांचे मन भयमुक्त करावे लागते, हा महत्त्वाचा मंत्र स्त्रीवादी चळवळीला सापडला.

येथपर्यंत मी पोचले होते. पण त्यानंतरचा प्रवास हा मारिया मिएसच्या सहवासाने आणि तिच्या विविध पुस्तकांतून लिहिलेल्या दार्शनिक संकल्पनांतून झाला, त्याची ही गोष्ट. मला हॉलंड सरकारची शिष्यवृत्ती मिळाली 16 महिन्यांसाठी, वयाच्या 36 व्या वर्षी (1980-81). तेथे मारिया मिएस शिकवायला होती. जगभरातून आलेल्या माझ्याच वयाच्या आत-बाहेर असणाऱ्या 20 स्त्रिया होत्या. त्यामध्ये मारियाने डच स्त्रियांना सामील करून घेण्याची स्पेशल परवानगी मिळविली होती. त्यामुळे आम्हा तिसऱ्या जगातून किंवा जगाच्या दक्षिणेतून आलेल्या स्त्रियांना पहिल्या जगातील स्त्रियांचे प्रश्न आणि तेथे सुरू झालेली स्त्रीवादी चळवळ जवळून अनुभवायला मिळावी, हा उद्देश होता. शीर्षकामध्ये वर्णन केलेले पुस्तक नंतर प्रसिद्ध झाले, पण आम्हाला शिकविण्यात येत असलेल्या प्रश्नांतूनच या पुस्तकाने आकार घेतला असे म्हणायला हरकत नाही.

तिचा मुख्य विषय होता जगभरातील स्त्रियांचे श्रम. वेगवेगळ्या स्वरूपातील. मोरोक्कोमधील अशिक्षित स्त्रियांकडून कॉम्प्युटरसाठी लागणाऱ्या चिप्सचे जाळे भरतकामासारखे करून घेतले जायचे आणि दुसरीकडे युरोपमधून येणाऱ्या एकट्या पुरुषांसाठी व जगभर मोक्याच्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेल्या अमेरिकन शिपायांसाठी (पर्यटनाच्या नावाखाली) थायलंडमधील वेश्याव्यवसाय चालविला जायचा. भारताबद्दल तर तिचा स्वत:चा अभ्यास होता.

आंध्र प्रदेशमधील नसरापूर येथील लेस विणणाऱ्या बायकांचा तिने अभ्यास केला होता. त्यांची उच्च जात, त्यामुळे त्यांना शेतमजूर म्हणून कामावर जायची परवानगी नाही; पण आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी त्यांना ख्रिश्चन संतिणींनी शिकविले लेस विणण्याचे कौशल्य. आणि या लेसी निर्यात केल्या जायच्या युरोपमध्ये, जर्मनीमध्ये. पण धागा पुरविणे, ऑर्डर मिळविणे, केलेले काम घेऊन जाऊन मोठ्या व्यावसायिकाकडून त्याची विक्री व निर्यात- येथे या स्त्रियांना प्रवेश नाही. त्यांची संचारबंदी आडवी यायची. ग्रामीण भागातील स्त्रिया घरगुती काम म्हणून जे खऱ्या अर्थाने उत्पादनाचे काम करतात- उदा. चारा कापून आणणे, लाकूडफाटा गोळा करणे, गुरांना चरायला नेणे, पाणी भरणे... केवळ घरासाठी नाही तर गुरांसाठी, ज्यांच्या दूधातून घरात पैसे येतात, शेळ्या विकून पैसे केले जातात- या सर्वांची तर गणतीच होत नाही. याला जर उत्पादन मानले, तर किती पैसे मिळाले असते- असा पर्यायी हिशोब काढला जात नाही आणि म्हणून राष्ट्रीय सकल उत्पन्नामध्ये हे श्रम सामावले जात नाहीत. ‘बिनमोबदल्याचे श्रम’ असे ज्याचे वर्णन केले जाते, त्याची आज फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होते आहे देशाच्या आणि युनोच्या पातळीवर. या श्रमाचे आकलन कसे करावे, याबद्दल अनेक अर्थशास्त्रज्ञांनी लिहिले आहे. मला कौतुक वाटते की, त्या काळी 1980 मध्ये तिने आम्हाला याचे भान दिले. मार्क्सवादाने अशा प्रकारच्या श्रमांचा आणि भांडवल गोळा होण्याचा उल्लेख केला नव्हता.

मारियाचे गृहीतकृत्य होते- भांडवलशाहीत स्त्रियांच्या श्रमांचा फायदा फुकट घेतला जातो किंवा जेथे श्रमांना कमी पैसे देणे शक्य असेल तेथे त्याचा फायदा घेऊन आपला वाढावा म्हणजेच सरप्लस गोळा करणे हे सर्व केवळ एकेका देशात घडत नसून याचा उपयोग जागतिक पातळीवरील एकच, केंद्रीय पण विविध स्तरीय रचना उभी राहण्यात कसा होतोहा सिद्धांत सिद्ध करण्याचे तिचे प्रयत्न होते. केवळ भांडवलशाहीचा प्रसार सर्व देशांतून झालेला आहे, असा अर्थ ती काढत नसे; तर जेथे भांडवशाही सुरू झाली त्या देशांनी वसाहतवादातून श्रमांची चोरी केली आणि आज ते देश ह्या  भांडवलशाहीच्या गाभ्यामध्ये स्थिरावलेले आहेत. आणि या जागतिक भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बाकीचे देश या केंद्रस्थानी असलेल्या भांडवली देशांच्या परिघावर फिरत आहेत. काही अगदी शेवटच्या परिघावर आहेत आणि काही आतल्या परिघावर- ज्यांना या भांडवलशाहीचा काही प्रमाणात फायदा मिळाला असे आहेत. ही विषमता दिवसेंदिवस वाढत जात आहे. मार्क्सच्या सरप्लस व्हॅल्यू ॲक्युमुलेशन या सिद्धांताचा उपयोग करून इमॅन्युएल वॉलरस्टाईन आणि काही अर्थतज्ज्ञांनी मिळून अशी संकल्पना केली आहे की- सगळ्या जगातून जी श्रमांची चोरी होते, लूट होते; ती या केंद्रस्थानी असलेल्या देशांत साठविली जाते. म्हणूनच ते श्रीमंत तर होतातच, पण जागतिक पातळीवर सत्ताकेंद्री होतात.

याला जोडून मारिया पुरुषसत्तेचा सिद्धान्त घेते आणि स्त्रियांच्या श्रमांची चोरी करण्यासाठी कौटुंबिक पातळीवरील पुरुषसत्तेपासून ते राज्यसंस्था व भांडवली अर्थसंस्था यांच्या माध्यमातून या केंद्रीकरणामध्ये भर घातली जाते. ही एक पिरॅमिडसारखी संरचना आहे, म्हणूनच जगामधील विषमता वाढत जाते आणि जाणार आहे. यामध्ये सत्ताकेंद्री असणाऱ्या देशातील स्त्रियांनाही या पुरुषसत्तेमुळे तिसऱ्या जगात केल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या श्रमांच्या शोषणाचा फायदा मिळत असतो, याची जाणीव त्यांनी ठेवावी, असे ती ठामपणे सांगते. (याचा अर्थ आम्ही भारताच्या संदर्भात सवर्ण स्त्रियांनाही जातीच्या उतरंडीमुळे बहुजन जाती, दलित जाती व आदिवासी स्त्रिया यांच्या श्रमांचा फायदा होतो, असा काढू शकलो) सर्व जगातील स्त्रिया पुरुषसत्तेमुळे भरडल्या जात आहेत हे खरे; पण हे सपाट पातळीवर केवळ एकेका देशात घडते असे नाही, तर त्याचे फायदे पैशाच्या स्वरूपात पिरॅमिड पद्धतीने परिघावरच्या देशातून वरच्या आणि अधिक वरच्या देशांमध्ये दिले जातात. उदा.- कौटुंबिक वेतन ही कल्पना युरोपमधील कामगारवर्गाने पुढे आणली आणि कायदे करून घेतले. पण त्यासाठी युरोपमधील भांडवलदारांना वसाहतीमधील शोषणातून भरपूर फायदा मिळत होता, हे लक्षात घेतले पाहिजे, हे मारिया मिएस आवर्जून सांगते.

आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत तिने आम्हाला शिकविला. तो म्हणजे- रोझा लक्झेंबर्ग या लेनिनच्या समकालीन मार्क्सवादी जर्मन विचारवंत स्त्रीने मांडलेली वसाहतवादाची सैद्धांन्तिक मांडणी. वसाहतवाद हीच भांडवलशाहीची सुरुवात होती आणि आजही तिचा हाच आत्मा आहे. मार्क्सवादाच्या मांडणीमध्ये भांडवलाच्या विरुद्ध कामगार, म्हणजेच वेतनावर आधारित श्रम करणारी मंडळी- बहुधा पुरुष यावर भर दिला जातो आणि क्रांतीचे ते पुढारी मानले जातात. तसेच शोषणरहित समाजाचे दर्शनसंकल्पना त्यांनाच शक्य होते, असे गृहीत धरले जाते. रोझाच्या वसाहतवादाच्या सिद्धांतनानुसार जागतिक भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये एकाच वेळी अनेक प्रकारची श्रमिक मंडळी- उदा. कारखान्यातील कामगार, शेतातील मजूर, जमीनदाराच्या शेतावर राबणारी कुळे आणि या सर्वांबरोबर याच प्रकारची कामे करणाऱ्या स्त्रिया व त्याहूनही अधिक म्हणजे त्यांचे जीव प्रसविणे व सर्व मानवांचे संवर्धन करणे हे सर्व श्रम एकाच वेळी उपस्थित असतात. किंबहुना, म्हणूनच भांडवलाला जास्त फायदा होतो, सरप्लस व्हॅल्यू जास्त प्रमाणात जमा होते. एकाच देशात गुंतवणूक केलेले भांडवल आणि त्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या शोषणातून जेवढा सरप्लस निघू शकतो, त्याहून अधिक या सरंजामशाही देशातील विविध प्रकारच्या कामगारांच्या श्रमांच्या शोषणातून मिळतो. त्यांच्या पुनरुत्पादनाची काळजी भांडवलाला घ्यावी लागत नाही. किंबहुना, आज अशी स्थिती आहे की, तिसऱ्या जगातील- भारतसुद्धा त्यात आहे- जन्मलेले व शिकलेले लोक, तंत्रज्ञ पहिल्या जगात जातात आणि त्यांच्या संवर्धनाचा कोणताही खर्च तेथील भांडवलाने केलेला नसतो. त्यांना हे कुशल कामगार आयते मिळतात आणि गाभ्यातील देशांमध्ये जास्त सरप्लस जमा व्हायला मदत होते.

वासाहतिक देशातील नैसर्गिक संसाधने आणि बिनमोबदल्याच्या घरगुती कामामधून तयार झालेले कुशल कामगार यातूनच जागतिक भांडवलशाही फोफावली. तेथील उत्पादनव्यवस्था उद्‌ध्वस्त होऊनच साम्राज्यवादी देशांची भरभराट झाली. मारिया मिएस आणि तिच्या काही जर्मन सहकाऱ्यांनी उदारमतवादी स्त्रीवादालाही आव्हान दिले आणि सांगितले की, कौटुंबिक संबंध म्हणजे केवळ पुरुषाशी असलेले पुनरुत्पादनाचे संबंध असे मर्यादित नाते मानू नका. आजचे कौटुंबिक संबंध म्हणजे बिनमोबदल्याचे काम, हे जागतिक भांडवलाशी असलेले पुनरुत्पादनाचे आणि शोषणाचे संबंध आहेत. या संदर्भात मारिया आणि तिच्या सहकाऱ्यांनी जे पुस्तक लिहिले आहे, त्याचे नाव आहे- जागतिक अर्थव्यवस्थेतील सर्वांत शेवटची मोठी वसाहत म्हणजे जगभरच्या स्त्रिया (वुमेन- दि लास्ट कॉलनी).

औद्योगिकता म्हणजेच विकास हा (इंडस्ट्रियलिझम) सिद्धान्त म्हणजे भांडवलशाहीची पाठराखण करण्यासारखे आहे. म्हणूनच याच औद्योगिकतेचा विकास ही कल्पना किंवा चौथ्या भांडवली क्रांतीची कल्पना ही स्त्री-पुरुष समानतेच्या विकासासाठी पूरक आहे, असे स्त्रीवाद जोपर्यंत मानत असेल तोपर्यंत स्त्रीवाद हा पुरुषसत्तेचा पराभव करू शकणार नाही. निसर्गानुकूल विकास, मानवाचे आणि चराचरातील सर्वच जीवांचे संवर्धन हे तत्त्व केंद्रीभूत मानून केलेली विकेंद्रीत समाजरचना हीच खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुषांच्या समानतेचा पाया घालू शकेल, अशी मारिया मिएसची मांडणी होती. या पुस्तकामध्ये त्याचा तपशील पूर्णपणे आलेला नाही. पण पुढील काळातील तिचे सर्व लिखाण या दिशेने जाणारे आहे. पर्यावरणीय स्त्रीवाद या शाखेची ती एक मुख्य प्रणेती आहे, असे म्हणता येईल.

माझ्या जीवनावर या मार्गदर्शक तत्त्वांचा निश्चित परिणाम झाला. मी जे-जे संशोधनात्मक प्रकल्प राबविले, कृतिशील प्रयोगांमध्ये सहभागी झाले- त्यामागे स्त्रियांचे श्रम व नैसर्गिक संसाधनांचे महत्त्व, त्यांच्या प्रक्रियांचे आकलन हे दोन निकष सतत राहिले आहेत. माझे सुदैव असे की, मला त्या प्रकारची कामेही मिळत गेली. निपाणी येथील तंबाखू कुटणाऱ्या कामगार स्त्रियांचे संघटन असो, की रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या स्त्रियांच्या व्यथा व कथा असोत, नवऱ्यांच्या आत्महत्येने ग्रस्त शेतकरी महिला आणि पिण्याच्या पाण्याच्या नियोजनामध्ये भाग घेण्यासाठी केलेली महिलांची तयारी, या व अशा अनेक ठिकाणी अभ्यास करण्याची व कृतिशील राहण्याची संधी मला मिळाली. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचीही मला साथ मिळाली. त्याचाच परिपाक म्हणून माझे प्रसिद्ध झालेले पुस्तक- ‘स्त्रियांचे नाते जमिनीशी आणि पाण्याशी’ हे सांगता येईल.

Tags: छाया दातार मारिया मिएस पॅट्रिआर्की ॲन्ड ॲक्युमुलेशन ऑन वर्ल्ड स्केल आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

छाया दातार,  मुंबई
chhaya.datar1944@gmail.com

मागील अर्धशतक स्त्रीमुक्ती चळवळीतील महत्त्वाच्या कार्यकर्त्या व लेखिका असलेल्या छाया दातार, विचारवेध संमेलनाच्या अध्यक्ष राहिल्या आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके