डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

पंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस्टो

मार्केटिंग विभागाच्या ज्या कोणा व्यक्तीने ही निळी-गुलाबी रंगसंकल्पना तयार केली असेल, तो फारच हुशार असेल. मी गेले होते त्या दुकानात मुले-मुली यांच्या विभागांव्यतिरिक्त एक ‘जेन्डर न्युट्रल’ विभाग होता. तिथे छाप पाडणाऱ्या गोष्टींची भव्य मालिका लावतात तसे करड्या/राखाडी रंगाचे कपडे होते. खरे तर ‘जेन्डर न्युट्रल’ असा स्वतंत्र विभाग करायची कल्पनाच वेडेपणाची आहे, कारण तो निर्णय मुलांसाठी निळा आणि मुलींसाठी ‘गुलाबी’ या पूर्वग्रहावर आधारित आहे. दुकानात लहान मुलांसाठी एकच विभाग करून त्यातच वयोमानानुसार सर्व रंगांचे कपडे का नसावेत? 

प्रिय इजिआवेले,

तुला मुलगी झाली, ही किती आनंदाची बातमी दिलीस! तुझ्या गोड मुलीचे ‘चीझालूम अडाओरा’ हे नावसुद्धा फारच सुरेख आहे गं. तिचा जन्म होऊन एकच दिवस झालाय आणि एवढ्यातच जगाबद्दलचे कुतूहल तिच्या डोळ्यांत लुकलुकत आहे. तू पाठवलेलं पत्र वाचून माझ्या डोळ्यांत पाणी आले. तुला तर माहीत आहे, मी कधी कधी खूप भावनिक होते. मात्र, ‘चीझालूम’ला ‘फेमिनिस्ट’ म्हणून वाढवायचे आहे, या तुझ्या इच्छेकडे मी खूप गांभीर्याने पाहते. आजूबाजूच्या परिस्थितीला ‘फेमिनिस्ट’ पद्धतीने कसा प्रतिसाद द्यावा हे नेमके समजत नाही, असं तू म्हणतेस. तुला काय म्हणायचंय हे मला कळतंय.

मला वाटतं ‘फेमिनिझम’ ही संकल्पना कशाच्या तरी संदर्भातच वापरावी लागते. त्यामुळे ‘फेमिनिस्ट’ असणे म्हणजे नेमके काय, याचे ठोस नियम माझ्याकडे  नाहीत. मात्र ‘फेमिनिस्ट’ होण्यासाठीचा फार्म्युला म्हणता येईल अशा दोन पूर्वअटी सांगता येतील. या विषयावरील चर्चेची सुरुवात या दोन महत्त्वाच्या मुद्यांनी करता येईल. ‘फेमिनिस्ट’ असण्यातील पहिलाच मुद्दा आहे : तुमचा पूर्वपक्ष! एखाद्या गोष्टीला पूर्वपक्ष असतो, म्हणजे ती गोष्ट असण्यामागचा एक ठोस आणि निश्चयी विश्वास. तुझा पूर्वपक्ष काय आहे? तर, तुझा पूर्वपक्ष हा असावा की, मी महत्त्वाची आहे. मी बरोबरीने महत्त्वाची आहे- पण या गोष्टीकडे लक्ष असावे की, मला महत्त्व दिले तरच किंवा जोपर्यंत मला महत्त्व दिलंय तोपर्यंतच असा त्याचा अर्थ नाही. मी बरोबरीने महत्त्वाची आहे, इतकाच त्याचा अर्थ आहे. 

‘फेमिनिस्ट’ असण्यातील दुसरा मुद्दा एका प्रश्नाने स्पष्ट करते. जर आपण कोणत्याही गोष्टीबाबत ‘क्ष’ घटक बदलला, तरीही आपल्याला मिळणारे अंतिमोत्तर तेच  असेल काय? एका उदाहरणाने हा मुद्दा समजून घेऊ या. समजा- एखाद्या स्त्रीचा नवरा बाहेरख्याली असेल, तर तिचा या परिस्थितीतील ‘फेमिनिस्ट’ प्रतिसाद ‘नवऱ्याला सोडून जाणे’ हा असावा, असे अनेकांना वाटते. पण मला वाटतं, नवऱ्याला सोडून न जाणे हासुद्धा, विशिष्ट परिस्थितीत ‘फेमिनिस्ट’ प्रतिसादच असू शकतो. उदाहरणार्थ- तुझ्या नवऱ्याने दुसऱ्या एखाद्या स्त्रीशी शरीरसंबंध ठेवले आणि तू त्याला माफ केलंस, पण दुसऱ्या एखाद्या पुरुषाशी तू शरीरसंबंध ठेवल्यास तुझा नवरा तुला माफ करेल का? याचं उत्तर जर ‘हो’ असेल, तर त्याला माफ करणे, हा ‘फेमिनिस्ट’ प्रतिसाद असूच शकतो. कारण त्या परिस्थितीत तुमचा निर्णय ‘जेन्डर’मधल्या विषमतेमुळे झालेला नसेल. मात्र दुर्दैवाने आपल्या आजूबाजूच्या बहुतेक घरांमध्ये वरील प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच येते. याचे कारण ‘लिंगभेद’. आपल्या समाजात पुरुष हे शेवटी पुरुषांप्रमाणेच ‘वागणार’, असाही एक खुळचट युक्तिवाद आढळतो.

तुझ्या मुलीला- ‘चीझालूम’ला- कसे वाढवावे, यासाठी माझ्याकडे काही मुद्दे आहेत. मात्र असे असले, तरीही एक गोष्ट लक्षात ठेव- मी जे सांगेन ते सर्व करूनसुद्धा तुझ्या अपेक्षेपेक्षा ‘चीझालूम’ वेगळी घडली जाऊ शकते. कारण कधी कधी आयुष्य त्याच्या पद्धतीने वळण घेत असतं. पण त्यातही महत्त्वाचं हेच असेल की, तरीही आपण प्रयत्न करावेत. इतर कशाहीपेक्षा तू तुझ्या प्रवृत्तीवर पूर्ण विश्वास ठेव, कारण तुझ्या बाळाप्रति असलेलं तुझं प्रेम तुला योग्य दिशा दाखवेल.

आता माझ्या सूचना :

1 पहिली सूचना- आधी तू स्वतः एक संपूर्ण व्यक्ती आहेस, हे लक्षात घे. ‘आईपण’ ही एक उत्कृष्ट भेट आहे. मात्र स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला केवळ ‘आईपणाच्या’ व्याख्येत बांधू नकोस. तू एक संपूर्ण ‘व्यक्ती’ आहेस, हे लक्षात ठेव. ‘आईपण’ त्यातला एक भाग असू दे. तुझ्या बाळाला त्याने फायदाच होईल. एकदा मर्लिन सँडर्स ही अग्रगण्य अमेरिकन पत्रकार एका ज्युनिअर पत्रकार मुलीला म्हणाली की, तू काम करतेस (नोकरी/व्यवसाय) यासाठी कधीही अपराधीपणाची भावना बाळगू नकोस. तुला जे आवडतं, तेच तू करते आहेस. ही तुझ्या बाळासाठी एक अस्सल भेट असू शकते. मी तर म्हणेन, तू अगदी तुझ्या कामावरसुद्धा प्रेम करण्याची गरज नाही. तुझं काम तुझ्यासाठी जे करते आहे, त्यावर तू प्रेम करू शकतेस. म्हणजे तुझा आत्मविश्वास, तुझं मानसिक समाधान व आर्थिक बळ यावर.

‘आई असणं’ आणि ‘नोकरी/व्यवसाय/काम करणं’ या दोन्ही स्वतंत्र गोष्टी असल्याच्या कल्पनेला तू नकार दे. तुला हे तर पटेल की- जेव्हा आपण दोघीही वाढत होतो त्या काळात तुझी आई आणि माझी आई नोकरी करत होत्या. त्याचा आपल्या वाढीवर वाईट परिणाम झाला का? आपण दोघीही चांगल्या तयार झालोच ना? किमान तुझ्याबाबत तरी असे नक्कीच म्हणता येईल. माझ्याबाबत अजूनही मतमतांतरं आहेत! तुझा नवरा इतके कमावतो की, तुला काम करण्याची गरज नाही... उलट, तू घरीच राहून एका पारंपरिक आईप्रमाणे आपल्या मुलीला वाढवावे... असा सल्ला तुझ्या नणंदेने दिल्याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. लोक आपल्या सोईने ‘पारंपरिक’ आणि ‘परंपरा’ या शब्दांचा वापर कोणत्याही गोष्टीचे समर्थन करण्यासाठी करतात. तर, तुझ्या नणंदेला हे तू नक्कीच सांग की, घरातील दोघांनीही काम करणं आणि कमावणं ही वसाहतवादाच्या आधीच्या काळातील आपल्या ‘इबो’ समाजाची खरी परंपरा आहे. त्या काळातील स्त्रिया व्यापार आणि शेती असे दोन्हीही करायच्या.

‘आई असण्याच्या’ या सुरुवातीच्या दिवसांत स्वतःशी मायेने आणि दयेने वाग. स्वतःवर फार ताण घेऊ नकोस. इतरांकडून मदत माग आणि ती मिळावी अशी अपेक्षाही कर. लक्षात ठेव, ‘सुपरवुमन’ अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही! ‘पालकत्व’ ही सराव आणि प्रेम यांच्याशी निगडित गोष्ट आहे... (मला तर असं अनेकदा वाटतं की, ‘पालक’ या शब्दाचे ‘पालकत्व’ असे क्रियापदात रूपांतर व्हायला नको होते. कारण मध्यमवर्गीयांच्या मनात ‘पालकत्वा’ची जबाबदारी पेलताना एक न संपणारी, सतत अस्वस्थ करणारी आणि ‘आपणच दोषी असल्याची भावना’ असते, त्याचे मूळ यात असावे.) त्यामुळे स्वतःला चुकण्याची आणि अपयशी होण्याची मोकळीक दे.

नव्यानेच ‘आई’ झालेल्या स्त्रीला आपल्या बाळाला शांत कसे करावे, हे माहीत असेलच असे नाही. आपल्याला सर्व काही माहीत  ‘असायलाच हवं’, असं गृहीत धरू नये. तुझ्यासमोरील प्रश्नांच्या उत्तरांसाठी इंटरनेटवर शोध घे... पुस्तके वाच... अनुभवी व्यक्तींशी संवाद साध... किंवा तुला वाटत असलेले वेगवेगळे पर्याय अजमावून पाहा आणि त्यातून शिक... तू एक ‘संपूर्ण व्यक्ती’ म्हणून राहण्यावर तुझं लक्ष केंद्रित असू दे. त्यामुळे स्वतःला वेळ दे, स्वतःच्या गरजांची पूर्तता कर. ‘आपणच करायला हवं’ असा विचार प्रत्येक बाबतीत करू नको, आपल्या संस्कृतीत सर्व काही करता येणाऱ्या स्त्रियांचे कौतुक केले जाते. या कौतुकाचा पूर्वपक्ष काय असेल, हा प्रश्न आपण कधीही विचारात घेत नाही. ‘सर्व काही करता येणारी स्त्री’ या वाद-विवादात मला रस नाही; कारण यात असं गृहीतच धरलं जातं की, ‘घरकाम आणि मुलांची काळजी घेणे’ ही फक्त स्त्रियांचीच कामे आहेत. ही कल्पना मी नाकारते. घरकाम आणि मुलांची ‘काळजी घेणे’ याचा ‘जेन्डर’शी संबंध नाही. एखादी स्त्री सर्व कामे करू शकते की नाही, असा प्रश्न विचारण्यापेक्षा आपण ‘पालकांना’ त्यांचं घर आणि कामकाज ही दुहेरी कर्तव्ये पार पाडण्यात कशी मदत करू शकू, हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे.

2. दुसरी सूचना- एकत्रितपणे काम करा. तुला आठवतंय... लहानपणी आपल्याला व्याकरणात शिकवलंय की, वाक्यात जो शब्द क्रिया दर्शवितो ते ‘क्रियापद’. तर, या पालकत्वाच्या वाक्यात ‘चुडी’- तुझा नवरा- हा तितकाच क्रियाशील असू शकतो, जितकी तू. जीवशास्त्रानुसार तुझा नवरा ‘चीझालूम’ला दूध पाजण्याव्यातिरिक्त इतर सर्व कामे करू शकतो. काही वेळा ‘आपणच सर्व काही करायला हवं’ आणि ‘सर्व जबाबदाऱ्या आपणच घ्याव्यात’ या समजुती स्त्रीच्या इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की, ती कळतनकळत ‘बाळाच्या संगोपनात वडिलांचा वाट कमीच असतो,’ असे मानत राहते. तुला असे वाटेल- ‘चीझालूम’ला जशी तू आंघोळ घालतेस तशी चुडी घालू शकणार नाही. तिची स्वच्छता करतानासुद्धा कदाचित तो तुझ्यासारखी करत नसेल. पण त्यामुळे काय होईल? यातून वाईटात वाईट असे काय घडेल? चीझालूमचा वडिलांच्या हातून मृत्यू नक्कीच होणार नाही! त्यामुळे तो मुलीशी संबंधित कामे करत असेल, तेव्हा तुझ्यातील ‘परफेक्शन’चा आग्रह कमी कर आणि ‘संगोपन हे केवळ माझंच कर्तव्य आहे’ असा समज बाजूला ठेव.

बाळाच्या संगोपनाची जबाबदारी समानतेने घ्या. अर्थात, ‘समान जबाबदारी’ याचा अर्थ तुम्हा दोघांवर अवलंबून आहे. ‘समान जबाबदारी’ म्हणजे, कामांची काटेकोर नोंद ठेवून पन्नास-पन्नास टक्के विभागणी करायची, असं नव्हे. समान जबाबदारी घेतली जाते आहे, की नाही, हे तुमचे तुम्हाला जाणवेल. कसे? तुमच्या संगोपनात राग, संताप, चीड या गोष्टींचा अभाव दिसला की, आपण समान जबाबदारी घेतल्याचं जाणवेल. कारण जिथे खरीखुरी समानता अस्तित्वात असते तिथे राग, संताप, चीड नसते.

आणि कृपया ‘मदत केल्याची’ भाषा वापरू नकोस. ‘चीझालूम’ची काळजी घेऊन ‘चुडी’ तुझी मदत वगैरे करत नाहीये. खरे म्हणजे, तो तेच करतोय जे त्याने करायलाच हवे. जेव्हा आपण असे म्हणतो की, ‘वडील बाळाच्या संगोपनात मदत करतात’ तेव्हा कळत-नकळत हा समज पसरवत असतो की, ‘बाळाचे संगोपन’ हा केवळ आईचा प्रांत आहे- ज्यात वडील असूनही ते सहभागी होण्याचे धाडस दाखवतात. मात्र असे नाहीये. जगात किती तरी लोक अधिक आनंदी, स्थिर आणि अधिक चांगले योगदानकर्ते झाले असते; जर त्यांच्या बालपणी त्यांच्या संगोपनात त्यांच्या वडिलांनीसुद्धा सहभाग घेतला असता तर!

आणि असेही कधीच म्हणू नकोस की, ‘चुडी’ बाळाला तात्पुरते चांगले सांभाळतो. कारण बेबीसिटिंग करणाऱ्या किंवा बाळाला काही काळापुरते सांभाळणाऱ्या लोकांची प्रथम जबाबदारी ते बाळ कधीच नसतं. मुलीची काळजी घेतल्याबद्दल चुडीची किंवा तुझी- अशी दोघांचीही विशेष प्रशंसा करण्याची गरज नाही. तुम्ही दोघांनीही या बाळाला या जगात आणण्याचा निर्णय घेतला. आणि ते बाळ तुमच्या दोघांशी संबंधित असल्यामुळे त्याची जबाबदारीदेखील तुमच्या दोघांशी संबंधित आहे. अर्थात, तू परिस्थितीने किंवा पसंतीने ‘सिंगल मदर’ असती, तर गोष्ट वेगळी होती. कारण तिथे एकत्रितपणे काम करण्याचा पर्यायच नसता. पण आपण खरंच ‘सिंगल मदर’ नसताना तसे वागण्याची गरज नाही. माझ्या मित्राने- नवाबूने एकदा मला सांगितले की, त्याच्या मुलांची आई, ती मुले लहान असतानाच सोडून गेली. म्हणून तो ‘मिस्टर मॉम’ (आईच्या जबाबदाऱ्या घेतलेला पुरुष) झाला. म्हणजे तो त्या मुलांचे रोजचे संगोपन काळजीपूर्वक करू लागला. मात्र, मला वाटतं तो काही ‘मिस्टर मॉम’ नव्हता; वडील म्हणून त्याने जे करायला हवे, तेच करत होता.

3. तिसरी सूचना- ‘चीझालूम’ला सांग की, ‘जेन्डर’नुसार भूमिका ठरवणं, हा मूर्खपणा आहे. ती मुलगी आहे म्हणून तिने एखादी गोष्ट करावी किंवा करू नये, असे तू तिला कधीही सांगू नकोस. ‘तू मुलगी आहेस म्हणून’ हे कशासाठीचेही कारण असू शकत नाही- कधीच नाही! मला आठवतंय... मी लहान असताना ‘मुलीसारखं कंबरेतून नीट वाकून कचरा काढ’ असे सांगितले गेले. म्हणजे ‘घरात कचरा काढणं’ हे स्त्रीत्वाशी संबंधित केले गेले आहे. खरं तर, ‘कंबरेतून नीट वाकून कचरा काढल्याने जमीन चांगल्या प्रकारे स्वच्छ होते’, असे मला सांगायला हवे होते आणि माझ्या भावांनासुद्धा तेव्हा हेच सांगायला हवे होते.

नायजेरियात नुकताच सोशल मीडियावर ‘स्त्रिया आणि स्वयंपाक करणे’, यावर वाद-विवाद झाला. आज 2016 मध्येसुद्धा आपण ‘स्वयंपाक करणे’ याकडे स्त्रियांची लग्न ठरण्यासाठीची पात्रता-चाचणी म्हणून पाहतो, हे फार विनोदी आहे. ते इथंपर्यंत विनोदी आहे की, एखादी दु:खद गोष्ट विनोदी असू शकते... स्वयंपाक करण्याचे ज्ञान हे जन्मतःच स्त्रियांच्या गुणसूत्रांमध्ये प्रस्थापित नसते. ‘स्वयंपाक करणे’ हे शिकावे लागते. स्वयंपाक करणे व एकूणच घरातील कामे करणे हा जीवनकौशल्याचा एक भाग आहे. आणि ती कौशल्ये प्रत्येक व्यक्तीकडे असायला हवीत.

आणखी एक... लग्न ही स्त्रियांसाठी एक बहुमोल गोष्ट किंवा ‘पारितोषिक’ आहे, या संकल्पनेवर आपण प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. कारण याच्याच आधारे स्त्रियांनी ‘नवऱ्यासाठी स्वयंपाक करावा की करू नये’ असे हास्यास्पद वाद-विवाद होतात. म्हणजे लग्नाकडे आयुष्यातील एकमेव ‘बहुमोल गोष्ट’ किंवा ‘पारितोषिक’ म्हणून बघण्याची सवय आपण स्त्रियांच्या अंगवळणी पाडणे बंद करायला हवे. त्यामुळे हे पारितोषिक किंवा बहुमोल वस्तू मिळविण्यासाठी ‘बायकोने स्वयंपाक करावा की नाही’ अशा चर्चा व वाद-विवाद कमी होतील.

जगात किती सुरुवातीच्या टप्प्यावर जेन्डरनुसार भूमिका ठरवल्या जातात, याचे मला आश्चर्य वाटते. काल मी ‘चीझालूम’ला एक ड्रेस घेण्यासाठी एका दुकानात गेले  होते. त्या दुकानात मुलींच्या विभागात फिकट गुलाबी रंगाचे आणि निस्तेज रंगांच्या छटा असलेले कपडे होते. ते मला अजिबात आवडले नाहीत. मुलांच्या विभागात मात्र आकर्षक निळ्या रंगाचे कपडे होते. मला वाटले की, तिच्या बदामी त्वचेवर निळा रंग उठून दिसेल. फोटोसुद्धा अगदी चांगले येतील. म्हणून मी त्या विभागातून एक ड्रेस घेतला. बाहेर पडताना काउंटरवर असलेल्या कॅशियरने मला सांगितले की, मुलासाठी हा ड्रेस अगदी परफेक्ट असेल. त्यावर मी हा ड्रेस एका मुलीसाठी घेतला आहे, असे सांगितले, ते ऐकून त्या कॅशियरला धक्काच बसला. ‘एका मुलीसाठी निळ्या रंगाचा ड्रेस?’ असे आश्चर्यचकित होऊन ती म्हणाली.

मार्केटिंग विभागाच्या ज्या कोणा व्यक्तीने ही निळी- गुलाबी रंगसंकल्पना तयार केली असेल, ती फारच हुशार असेल. मी गेले होते त्या दुकानात मुले-मुली यांच्या विभागांव्यतिरिक्त एक ‘जेन्डर न्युट्रल’ विभाग होता. तिथे छाप पाडणाऱ्या गोष्टींची भव्य मालिका लावतात तसे करड्या/राखाडी रंगाचे कपडे होते. खरे तर ‘जेन्डर न्युट्रल’ असा स्वतंत्र विभाग  करायची कल्पनाच वेडेपणाची आहे, कारण तो निर्णय मुलांसाठी ‘निळा’ आणि मुलींसाठी ‘गुलाबी’ या पूर्वग्रहावर आधारित आहे. दुकानात लहान मुलांसाठी एकच विभाग करून त्यातच वयोमानानुसार सर्व रंगांचे कपडे का नसावेत? कारण अगदी लहानपणी मुले आणि मुली यांची शरीरे साधारणतः सारखीच असतात. खेळण्यांचा विभागसुद्धा ‘जेन्डर’नुसार विभागलेला दिसला. मुलांसाठीची खेळणी- उदा. कार, ट्रेन वगैरे... मुलांना ‘काही तरी करायला’ भाग पाडणारी, सक्रिय ठेवणारी होती. मुलींसाठीची खेळणी मुख्यतः ‘स्थितिशील’/बैठे राहण्याशी संबंधित होती. त्यात बाहुल्यांचाच मोठ्या प्रमाणावर समावेश होता. आपल्या संस्कृतीत किती लहानपणीच मुलगा कसा असायला हवा आणि मुलगी कशी असायला हवी याच्या कल्पना आपण तयार करतो, हे पाहून मी थक्क झाले.

एक सात वर्षांची नायजेरियन मुलगी आणि तिची आई यांच्याबरोबर मी अमेरिकेत असताना एका मॉलमध्ये गेले होते, तो किस्सा तुला सांगितला का? रिमोट कंट्रोलवर काम करणारे एक हेलिकॉप्टर त्या मुलीने पाहिले. तिला ते फारच आवडले. आईकडे तिने ते हेलिकॉप्टर मागितले. त्यावर आईने नकार दिला व सांगितले, ‘तुझ्याकडे खेळायला बाहुल्या आहेत ना?’ त्यावर ती मुलगी म्हणाली, ‘आई, मी फक्त बाहुल्यांशीच खेळायचे का?’ तो प्रसंग चांगलाच लक्षात राहिला. आपल्या मुलीचे भलेच व्हावे, असे त्या आईला वाटत होते. मात्र ती ‘जेन्डर’च्या संकल्पनेत स्त्री-पुरुष यांच्या ज्या भूमिका ठरवल्या जातात, त्यानुसार वागत होती. म्हणजे उदा. मुलींनी बाहुल्यांशी खेळणे... मुलांनी कारबरोबर खेळणे, वगैरे... आता मला प्रश्न पडतो- जर त्या मुलीला तेव्हा हेलिकॉप्टरबरोबर खेळण्याची संधी मिळाली असती, तर ती पुढील आयुष्यात क्रांतिकारक काम करणारी इंजिनिअर बनली असती का? मला वाटतं- आपण लहान मुलांवर ‘जेन्डर’नुसार भूमिका लादल्या नाहीत, तर त्यांची खरीखुरी आवड जोपासण्यास आवश्यक ती मोकळीक त्यांना देऊ शकतो.

त्यामुळे ‘चीझालूम’ ही एक मुलगी असून तिने ‘ठरावीक पद्धतीनेच वागावे’ या दृष्टिकोनातून पाहू नकोस. तिच्याकडे एक व्यक्ती म्हणून पाहा आणि तिच्या गुणदोषांकडे वैयक्तिक दृष्टीने पाहा. ‘एखाद्या मुलीने कसे वागावे’ याच्या निकषावर तिचे मूल्यमापन करू नकोस. तिच्या पूर्ण क्षमतेनुसार, एक व्यक्ती म्हणून स्वतःच्याच सर्वोत्तम आवृत्तीत तिचे रूपांतर होते आहे की नाही, यावरून तिचे मूल्यमापन कर. एकदा एका तरुण मुलीने मला सांगितलं होतं की, ती अनेक वर्षे मुलाप्रमाणेच वागायची. तिला फुटबॉल खेळायला आवडायचे. मुलींसारखे ड्रेस घालण्याचा कंटाळा येत असे. पण तिच्या आईने हे मुलासारखं वागणं थांबवलं. त्यामुळे ती मुलगी आता एका टिपिकल मुलीने जसे वागावे तशीच वागते. आणि आपल्या आईने जे केले, त्याबद्दल मुलीच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. ही गोष्ट ऐकल्यावर मला फारच वाईट वाटले. मुलीसारखे वागण्यासाठी तिला आपल्या मनातील कोणकोणत्या प्रेरणांना आवर घालावा लागला असेल? या प्रक्रियेत तिने नेमके काय गमावले असेल? आता मी याची केवळ कल्पनाच करू शकते. कारण खरं तर ती तथाकथित मुलांसारखी राहताना, ती तिच्या अंगभूत प्रेरणांनुसार म्हणजे तिच्या ‘स्व’ला जसे वाटेल तसेच वागत होती.

एका ओळखीच्या स्त्रीने लहान मुलांच्या खेळघरातील एक अनुभव सांगितला होता. ती स्त्री आपल्या एक वर्षाच्या मुलाला घेऊन तिथे गेली. तिला असे लक्षात आले की, तिथे आलेल्या मुलींच्या आया आपल्या  मुलींवर सतत बंधने घालत होत्या. एखाद्या वस्तूला हात लावू नये, छान वागावे- असा सल्ला मुलींना देत होत्या. दुसरीकडे, मुलांच्या आया मात्र कोणतेही बंधन घालत नव्हत्या. उलट, मुलांनी मोकळेपणाने वागावे यासाठी प्रोत्साहन देत होत्या. ‘छान वागावे’ असा सल्ला मुलांना देत नव्हत्या. त्यावरून त्या स्त्रीचा असा सिद्धांत आहे की, पालक फार लहान वयातच मुलींनी कसे वागावे याचे धडे देतात. त्यामुळे मुलींना अधिकाधिक नियमपालन आणि कमीत कमी वाव दिला जातो. दुसरीकडे, मुलांसाठी मात्र हेच प्रमाण अधिकाधिक वाव आणि कमीत कमी नियम- पालन असे केले जाते. आपल्या मनात ‘जेन्डर’नुसार ठरवलेल्या भूमिका खूप घट्टपणे रुजवल्या जातात. इतक्या की- अनेकदा आपल्या खऱ्या प्रेरणा, गरजा यांच्यात निवडीची वेळ आल्यावर आपण सवयीप्रमाणे जेन्डरवर आधारित भूमिकांनुसारच वागतो. अशा ‘जेन्डर’ने लादलेल्या भूमिका घेण्याची सवय मोडणं कठीण असतं. त्यामुळे ‘चीझालूम’ हे सुरुवातीपासूनच कसं नाकारेल, याची दक्षता घे. ‘जेन्डर’अनुरूप भूमिका घेण्यापेक्षा स्वयंपूर्ण कसे बनावे हे तिला शिकव...

स्वतःचे आयुष्य स्वतःला जगता येणे, स्वतःसाठी कमावता येणे, याचे महत्त्व तिच्या मनावर ठसव. रोजच्या वापरातील वस्तू जेव्हा तुटतात, नादुरुस्त होतात तेव्हा त्यांची दुरुस्ती कशी करायची हे तिला शिकव. आपण अनेकदा असे ठरवून टाकतो की, मुलींना काही गोष्टी येत नाहीत. पण अशा गोष्टी स्वतः करण्याचा तिला प्रयत्न करू दे. तिला ट्रेन आणि ठोकळे अशी खेळणी दे... तुला वाटतच असेल, तर बाहुलीसुद्धा खेळायला दे.

4. चौथी सूचना- एका धोक्यापासून सावध राहा, ज्याला मी ‘फेमिनिझम लाईट’ असे म्हणते. या कल्पनेत स्त्रीची समानता सशर्त असते. या सशर्ततेपासून सावध राहा आणि तिला नकार दे. ‘फेमिनिझम लाईट’ ही कल्पना पोकळ, अनुनय करणारी आणि बौद्धिक दिवाळखोरीची आहे. ‘फेमिनिस्ट’ असणे हे गरोदर असण्यासारखे आहे. तुम्ही एक तर गरोदर असता किंवा नसता. तेच फेमिनिझमबाबतसुद्धा लागू होते. ‘स्त्रियांसाठी पूर्ण समानता’ यावर तुमचा विश्वास असतो किंवा नसतो. तर ‘फेमिनिझम लाइट’ची काही उदाहरणे देऊन हा मुद्दा समजावून सांगते.

एखादी स्त्री महत्त्वाकांक्षी हवी, मात्र तिच्या महत्त्वाकांक्षा एका मर्यादेपर्यंत असाव्यात... एखादी स्त्री यशस्वी व्हावी, मात्र तिने त्याबरोबरच घरातील कामे आणि नवऱ्यासाठी स्वयंपाक करायला हवा... एखादी स्त्री स्वतःच्या इच्छेनुसार वागू शकते, मात्र तिने घराची देखरेख करण्याची जबाबदारी विसरू नये... एखादी स्त्री नोकरी करू शकते, मात्र ‘घराचा कर्ता’ कायम पुरुष असेल... ‘तो डोके आहे, तर तू मान आहेस’... ‘तो गाडी चालवत असला, तरी तूही समोरच्याच सीटवर आहेस’... असल्या मूर्खपणाच्या उपमा ‘फेमिनिझम लाईट’ देते. आणि ‘फेमिनिझम लाईट’बाबत जास्त त्रासदायक गोष्ट म्हणजे, तिथे असे मानले जाते की- पुरुष नैसर्गिकरीत्या वरिष्ठच आहे आणि म्हणून त्याने ‘स्त्रियांना बरे वागवावे’ असे अपेक्षित आहे. नाही! नाही! नाही! स्त्रियांच्या हिताचा पाया हा पुरुषांच्या उपकारबुद्धीवर अथवा दानशूरपणावर अवलंबून असण्यापेक्षा अधिक काही तरी असावा. ‘फेमिनिझम लाईट’ नेहमी ‘परवानगी’ची भाषा वापरते.

थेरेसा मे या आज ब्रिटनच्या पंतप्रधान आहेत. एका पुरोगामी ब्रिटिश वर्तमानपत्राने त्यांच्या नवऱ्याचे वर्णन करताना लिहिलं, ‘फिलीप मे राजकारणातून बाजूला झाले आणि आपल्या पत्नीला- थेरेसाला त्यांनी राजकारणात नाव कमावण्याची परवानगी दिली.’ परवानगी? आता हेच वाक्य उलटे करू या. थेरेसा मे यांनी आपल्या नवऱ्याला ‘नाव कमावण्याची परवानगी दिली.’ काही अर्थ लागतो का? जर फिलीप मे पंतप्रधानपदी असते, तर त्यांच्या बायकोने त्यांना पडद्यामागे राहून कशी ‘मदत’ केली याविषयीच ऐकायला मिळाले असते. पण तिने त्यांना यशस्वी होण्याची ‘परवानगी’ दिली, हे आपल्याला कधीही ऐकायला मिळाले नसते.

‘परवानगी’ हा त्रासदायक शब्द आहे. ‘परवानगी देणे’ याचा संबंध सत्तेशी येतो. ‘फेमिनिझम लाईट’वर विश्वास असणारे लोक म्हणतात, एखाद्या स्त्रीला तिच्या नवऱ्याची परवानगी आहे तोपर्यंत ‘जे पाहिजे ते करू द्यावे’. पण परवानगी देण्यासाठी नवरा काही शाळेचा हेडमास्तर आणि बायको काही शाळेतली मुलगी नाही. ‘परवानगी देणे आणि घेणे’ हे शब्दप्रयोग प्रामुख्याने एकाच बाजूसाठी वापरले जातात. त्यामुळे समानतेवर आधारित कोणत्याही लग्नामध्ये कधीही ‘परवानगी’ची भाषा नसावी.  ‘फेमिनिझम लाईट’चे आणखी एक असेच ठळक उठून दिसणारे उदाहरण- काही पुरुष म्हणतात, माझ्या बायकोला घरातलं काम नेहमीच करावं लागत नाही... जेव्हा ती प्रवासात असते, तेव्हा मी घरकाम करतो... 

तुला आठवतंय... काही वर्षांपूर्वी माझ्यावर एक भयानक लेख लिहिला गेला होता. तो वाचून आपण किती हसलो होतो! मी ‘रागावलेली’ आहे, असा आरोप त्या लेखकाने माझ्यावर केला होता. त्याचा रोख असा की, रागावलेली असणे, ही लाज वाटण्याची बाब आहे. मी रागावलेले आहे हे खरंय. वंशावरून, लिंगावरून भेदभाव केला जातो तेव्हा मी रागावले आहे. मला वंशावरून केल्या जाणाऱ्या भेदभावामुळे जितका राग येतो त्यापेक्षा अधिक राग लिंगावरून भेदभाव केल्यामुळे येतो. मी अशा लोकांमध्ये राहते- ज्यांना वंशवादामुळे अन्याय होतो हे मान्य असते; लिंगावरून अन्याय केला जातो, हे ते मान्यच करत नाहीत. मी तुला हे सांगू शकत नाही की, आपल्या वाटणाऱ्या माणसांनी- स्त्री-पुरुष दोघांनीही- मी ‘लैंगिक भेदभाव सिद्ध करून दाखवावा’ अशी अपेक्षा किती वेळा ठेवलीये. मात्र याच लोकांनी मी वांशिक भेदभाव सिद्ध करावा, अशी अपेक्षा कधीही ठेवली नाही. (अर्थात जगभरात अनेकांना वंशवादावरून होणारा ‘भेदभाव’ अस्तित्वात आहे हे सिद्ध करून दाखवावे लागते. माझ्या जवळच्या वर्तुळात अशी माणसे नाहीत.)

मी हेसुद्धा तुला सांगूच शकत नाही की, माझ्या जवळच्या माणसांनी लैंगिक भेदभावाचे प्रसंग किती वेळा सहजपणे झटकून टाकले आहेत किंवा त्यांचे महत्त्व नाकारले आहे. इकेन्गा मला एकदा म्हणाला होता- ‘सर्वसाधारणतः पाहिल्यास आमच्या घरात माझ्या वडिलांचा शब्द चालतो. मात्र खरं सांगायचं तर पडद्यामागे राहून माझी ‘आईच घराची सूत्रे हलवत असते’. त्याला वाटले, या उदाहरणाने तो लैंगिक भेदभावाचा मुद्दा खोडतोय. मला वाटलं, नेमक्या याच उदाहरणाने माझा मुद्दा सिद्ध होतो. ‘आई पडद्यामागे राहूनच का सूत्रे हलवते?’ असा प्रश्न विचारता येईल. जर एखाद्या स्त्रीकडे घराची सूत्रे खरोखरच असतील, तर तिने आपली सत्ता अप्रत्यक्षपणे राबवावी अशीच अपेक्षा आपण का ठेवतो? मला उमगलेलं एक दु:खद सत्य सांगते. जगात असे अनेक स्त्री-पुरुष आहेत ज्यांना सामर्थ्यवान, प्रबळ आणि प्रभावी स्त्रिया आवडत नाहीत...

प्रबळ आणि प्रभावी असणे हा पुरुषी गुणधर्म आहे, असंच आपल्या अंगवळणी पडलंय. त्यामुळे एखादी शक्तिशाली आणि प्रबळ असलेली स्त्री पाहणे आपल्याला पटत नाही किंवा विचित्र वाटते. म्हणूनच स्त्रीवर बंधने लादली जातात. प्रबळ स्त्रियांना कायम, ‘ती नम्र आहे का...?’, ‘ती हसते का...?’, ‘तिच्याकडे कृतज्ञतेची पुरेशी भावना आहे का...?’, ‘तिला घरकाम येते का...?’, ‘घरातील माणसांबाबत ती प्रेमळ आहे का...?’ असे प्रश्न विचारले जातात. सत्तापदी असलेल्या सामर्थ्यवान पुरुषांच्या तुलनेत आपण सत्ता असलेल्या सामर्थ्यवान स्त्रियांबाबत नेहमीच जास्त कठोर निकष लावतो. ‘फेमिनिझम लाईट’मुळे तसे निकष लावणे सोपे होते.

 5. पाचवी सूचना- ‘चीझालूम’ला पुस्तकांवर प्रेम करायला शिकव. याचा सोपा आणि सर्वोत्तम मार्ग म्हणजे- जर तिने तुला वाचताना पाहिलं तर वाचन करणे ही एक उपयुक्त गोष्ट आहे, हे तिच्या लक्षात येईल. तिने शाळेत न जाता घरीच राहून फक्त पुस्तके वाचली तरी चालेल. सर्वसाधारणतः शाळेत जाऊन शिकणाऱ्या मुलांपेक्षा तिच्याकडे जास्त ज्ञान असेल... पुस्तकांमुळे हे जग ती समजून घेईल... तिला त्या जगाबाबत प्रश्न पडतील... जे वाटते, ते नेमक्या शब्दांत व्यक्त करता येईल... शास्त्रज्ञ, शेफ, गायक होणे असे कोणतेही क्षेत्र निवडल्यावर तिच्या वाचनाचा त्यात उपयोगच होईल... अर्थात मला पाठ्यपुस्तके अभिप्रेत नाहीत. शालेय अभ्यासक्रमाशी ज्यांचा काहीही संबंध नाही अशी पुस्तके उदा- आत्मचरित्रे, इतिहास, कादंबऱ्या यांच्याविषयी मी बोलतेय. जर इतर सर्व उपाय करून थकलीस, तर तिला पुस्तक वाचण्यासाठी बक्षीस म्हणून पैसे दे.

अमेरिकेत राहणारी एक भन्नाट नायजेरियन स्त्री मला माहितीये. आपल्या मुलाला वाचनाची आवड नाही, हे लक्षात येताच तिने त्याला प्रत्येक पानामागे पाच सेंट्‌स (एका डॉलरमध्ये शंभर सेंट्‌स असतात) द्यायला सुरुवात केली. ‘हे खर्चिक प्रकरण होते’, हे ती आता चेष्टेने सांगते. मात्र ही योग्य ठिकाणची गुंतवणूक आहे, हेही तिला माहीत होते.

 6. सहावी सूचना- भाषेचा वापर कसा करतो, याविषयी ‘चीझालूम’ला प्रश्न विचारायला शिकव. भाषेत आपले समज-गैरसमज, ग्रह-पूर्वग्रह, श्रद्धा यांचा संचय असतो. तिला भाषेविषयी प्रश्न विचारायला शिकवताना आधी तुला स्वतःच्या भाषेविषयी प्रश्न विचारावे लागतील. माझी एक मैत्रीण म्हणते की, ती तिच्या मुलीला कधीही ‘प्रिन्सेस’ (राजकन्या) म्हणणार नाही. एखाद्या मुलीला ‘राजकन्या’ म्हणताना तिच्याविषयी चांगलीच भावना मनात असते. मात्र राजकन्या नाजूक असते... तिला वाचवण्यास कोणी राजपुत्र नंतर येईल... असे अर्थ ‘राजकन्या’ या शब्दाशी जोडलेले आहेत. त्यामुळे माझी मैत्रीण तिच्या मुलीसाठी ‘एन्जल’ (देवदूत) आणि ‘स्टार’ (तारा) हे शब्द वापरते. त्यामुळे आपल्या मुलीसाठी कोणते शब्द वापरायचे आणि कोणते वापरायचे नाहीत, हे आधी ठरव.

‘चीझालूम’साठी जे शब्द वापरशील, त्यांचा प्रभाव तिच्यावर पडेल. त्यातूनच कशाला किती महत्त्व द्यावे, हे तिला कळेल. ‘इबो’ समाजात बालिश मुलींसाठीचा तो विनोद तुला माहिती असेलच, ‘‘तू काय करत आहेस? तुला हे माहीत नाहीये का, आता नवरा शोधण्याइतके तुझे वय झाले आहे?’’ पूर्वी मी हा विनोद अनेकदा वापरत असे. मात्र आता तो वापरायचा नाही, असं ठरवलंय. मी आता म्हणते, ‘नोकरी शोधण्याइतके तुझे वय झाले आहे’. कारण तरुण मुलींना लग्न हे उद्दिष्ट मानण्याची शिकवण द्यावी असे मला वाटत नाही. तिने ‘त्याच्या’ बाळाला जन्म दिला असेही मी आता म्हणत नाही. तिने ‘त्याच्याबरोबर’ बाळाला जन्म दिला असे म्हणते. माझी बायको ‘माझ्या’ बाळाला कॅरी करत आहे असे एखादा पुरुष म्हणतो, तेव्हा त्याचा खूप राग येतो. ‘आमचे बाळ’ असे म्हणायलासुद्धा छान वाटते. तसेच म्हणणे योग्यसुद्धा आहे.

चीझालूमसमोर ‘पुरुषसत्ताक व्यवस्था’, ‘स्त्रीद्वेष्टे’ असे शब्द सतत वापरू नकोस. आपण ‘फेमिनिस्ट’ अनेकदा शब्दजाळ्यात अडकतो. त्यामुळे आपले बोलणे अनाकलनीय वाटू शकते. समोरच्याला आपण काय म्हणत आहोत, हेच कळत नाही. एखादी गोष्ट नुसती अनभिज्ञ आहे, असे म्हणून थांबू नकोस. ती कशात अनभिज्ञ आहे, आणि काय केले तर ती गोष्ट अनभिज्ञ होणार नाही, हे चीझालूमला समजावून सांग. त्यासाठी उदाहरणे दे. तिला हे सांग की, स्त्रियांमधल्या एखाद्या ‘क्ष’ गोष्टीवर टीका करणे आणि पुरुषांमधील त्याच ‘क्ष’ गोष्टीवर टीका न करणे, याचा अर्थ आपल्याला त्या ‘क्ष’ गोष्टीबाबत आक्षेप नसून आपण स्त्रीविषयीच आक्षेप घेतो. त्या ‘क्ष’च्या जागी ही उदाहरणे टाकून बघ- राग येणे... मोठ्याने बोलणे... हट्टीपणा... भावनाशून्यता...  निर्दयीपणा... इत्यादी.

केवळ स्त्री असल्यामुळे कोणकोणत्या गोष्टी करता येत नाहीत... किती गोष्टींशी सांस्कृतिक प्रतिष्ठेची संकल्पना जोडलेली आहे... तसे नसल्यास या गोष्टी करण्याची परवानगी फक्त पुरुषांनाच का दिली जाते... असे प्रश्न विचारायला तिला शिकव. त्यासाठी प्रचलित घडामोडींमधील उदाहरणे वापर. उदा. नायजेरियाच्या दोन खासदारांचे भांडण झाले... त्यातील स्त्री खासदार पुरुष खासदाराला ‘बास्टर्ड (अनौरस)’ म्हणाली... त्यावर ‘मी तुझ्यावर बलात्कार करेन’ असे तो पुरुष खासदार स्त्री खासदाराला म्हणाला... या उदाहरणात पुरुष लैंगिकतेवरून भेदभाव करणारा आहे. कसा? त्याने त्या स्त्रीला एक ‘व्यक्ती’ या अर्थाने अपमानित केले नसून एक ‘स्त्री’ म्हणून तिचा अपमान केलाय. असे करणे अमानवी आहे. तोसुद्धा तिला ‘बास्टर्ड (अनौरस)’ म्हणू शकला असता किंवा तिच्या स्त्रीत्वाशी संबंधित नसलेल्या इतर अनेक गोष्टींवरून तो तिला काहीही म्हणू शकला असता, नाही का?

लागोसमध्ये असताना आपण पाहिलेली ती टीव्हीवरची जाहिरात तुला आठवते का? त्यात एक पुरुष स्वयंपाक करतो. त्याबद्दल त्याची बायको टाळ्या वाजवते, अशी ती जाहिरात होती. त्याने स्वयंपाक करणे या कृतीबद्दल ती स्त्री टाळ्या वाजवणे थांबवून, केलेल्या स्वयंपाकावर तो आवडला किंवा आवडला नाही अशी प्रतिक्रिया देईल, तेव्हाच खरी प्रगती झाली, असे म्हणता येईल. असाच प्रकार त्या पुरुषाकडूनसुद्धा होऊ शकेल. तिच्या स्वयंपाकाच्या चवीबद्दल आवडले किंवा आवडले नाही असे तो सांगू शकेल. मात्र त्याने स्वयंपाक केला याबद्दल ती टाळ्या वाजवते, तेव्हा त्यात लैंगिकतेवर आधारित भेदभावाची भावना येतेच. ‘स्वयंपाक करणे’ ही स्त्रीसाठीचीच कृती आहे आणि ती एका पुरुषाने करून किती मोठी कामगिरी केली, असेच टाळ्या वाजवण्याने सूचित होते.

लागोस शहरातली ती मेकॅनिक तुला आठवते का? तिचा उल्लेख कायम ‘लेडी मेकॅनिक’ असाच केला जाई. चीझालूमला हे शिकव की- ती स्त्री एक मेकॅनिक आहे, ‘लेडी मेकॅनिक’ नाहीये. एखादी स्त्री गाडी चालवताना त्या गाडीला धडकल्यानंतर ‘एका स्त्रीशी या विषयावर चर्चा करू शकत नाही’ असे म्हणून जो पुरुष ‘कारच्या बाहेर येऊन ‘तुझ्या नवऱ्याला आण’ असं म्हणतो; त्याचं वागणं किती चुकीचं आहे, हे तिला शिकव. दुर्व्यवहार हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असा दोन्ही प्रकारचा असू शकतो. प्रत्यक्ष उदाहरणे देऊन या दोन्ही प्रकारचे वर्तन घृणास्पदच असते, हे तू तिला शिकव.

कोणते तरी नाते तयार केल्याशिवाय केवळ एक माणूस म्हणून स्त्रीविषयी सहानुभूती वाटत नाही, अशा पुरुषांना तिला प्रश्न विचारायला शिकव. एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला, तर त्याविषयी बोलताना ही माणसे ‘ती माझी मुलगी, पत्नी किंवा बहीण असती तर...’ अशी भाषा वापरतात. मात्र अशाच पुरुषांना एखाद्या पुरुषावर अत्याचार झाले असतील, तर त्याविषयी सहानुभूती वाटण्यासाठी ‘भाऊ किंवा मुलगा’ मानायची गरज पडत नाही. ‘स्त्री’ ही एक विशेष प्रजाती आहे, या कल्पनेला तिला प्रश्न विचारायला शिकव. उदा.- अमेरिकेतील वरिष्ठ रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवाराने स्त्रियांविषयी जे उद्‌गार काढले, त्यावर प्रतिक्रिया देताना सभागृहाचे सभापती पॉल रायन म्हणाले, ‘स्त्रियांकडे केवळ एक भोगवस्तू म्हणून न पाहता त्यांना शौर्यवान आणि धाडसी बनवायला हवे, त्यांच्याविषयी वेगळा आदर बाळगायला हवा.’ स्त्रियांना शौर्यवान आणि धाडसी करण्याची किंवा वेगळा आदर देण्याची गरज नसते, हे चीझालूमला शिकव. केवळ त्या माणूस आहेत असे म्हणून त्यांना समानतेने पाहावे. ‘केवळ स्त्रिया असल्याने त्यांना आदर आणि प्रोत्साहन देणे’ यात एक प्रकारची श्रेष्ठत्वाची भावना येते. मला हे सारे ऐकताना कुठे तरी शौर्याचा भास होतो... आणि स्त्रियांना शौर्यवान बनवले पाहिजे याचा पूर्वपक्ष आहे, ‘स्त्रिया दुबळ्या असतात’.

7. सातवी सूचना- लग्न म्हणजे काही तरी मोठी यशस्वी कामगिरी करणे असे तिच्यासमोर कधीही बोलू नकोस. लग्न करणे ही काही मोठी कामगिरी नाही. लग्न करणे हे आयुष्याचे ध्येय असू शकत नाही, हे तिला समजावण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोध. लग्न हे आनंदी किंवा दु:खी असू शकते. ते काही यश किंवा अपयश असू शकत नाही. आपल्याकडे स्त्रियांना आपण लग्न करण्याची स्वप्नं पहायला लावतो. मात्र मुलांना लग्नाची स्वप्ने पाहायला शिकवत नाही. त्यातून विचित्र प्रकारचे असंतुलन सुरुवातीपासूनच तयार होते. कारण याच मुली मोठ्या  झाल्यावर त्यांना लग्नाची आस असते. मात्र मुले मोठी झाल्यावर त्यांना लग्नाची आस नसते. मुली अशा मुलांशी लग्न करतात आणि या नात्यात सुरुवातीपासूनच असंतुलन तयार होते. कारण एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपेक्षा लग्न खूपच महत्त्वाचे वाटत असते. अशा लग्नांना टिकवण्यासाठी स्त्रिया, पुरुषांच्या तुलनेत खूपच जास्त प्रमाणात, स्वतःच्या इच्छा-आकांक्षांचा बळी देतात याचे आश्चर्यच वाटत नाही. याचेच सर्वात हिडीस आणि सार्वत्रिक स्वरूप म्हणजे दोन स्त्रिया एकाच पुरुषावरून सार्वजनिकरित्या भांडतात आणि ज्याच्यावरून भांडतात तो पुरुष शांतपणे हे भांडण पाहत उभा असतो.

हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी उभ्या आहेत. त्यांच्या टि्वटर अकाउंटवर स्वतःची ओळख सांगताना पहिली ओळ ‘त्या बिल क्लिंटन यांच्या पत्नी आहेत’ अशी येते. मात्र बिल क्लिटंन यांच्या टि्वटर अकाउंटवर त्यांची ओळख ‘हिलरी क्लिंटन यांचा नवरा’ अशी येत नाही. (त्यामुळेच जे पुरुष स्वतःची ओळख ‘मी त्या स्त्रीचा नवरा आहे’ अशी करून देतात त्यांच्याविषयी मला खूपच आदर वाटतो!) हिलरी क्लिंटन यांच्या अशा वागणुकीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वापेक्षाही जास्त प्रतिबिंब आपल्या आजूबाजूच्या समाजाचे पडते... जिथे अजूनही स्त्रीचे आई असणे आणि पत्नी असणे याला इतर कशाहीपेक्षा जास्त महत्त्व आहे. हिलरींचे 1975 मध्ये जेव्हा बिल क्लिंटन यांच्याशी लग्न झाले तेव्हा त्यांनी स्वतःचे आडनाव बदलले नव्हते. त्या तेव्हा ‘हिलरी रॉडहॅम’ असे नाव लावायच्या. त्यानंतर काही काळाने त्यांनी स्वतःच्या ‘हिलरी रॉडहॅम’ या नावामागे ‘क्लिंटन’सुद्धा लावायला सुरुवात केली. नंतर काही काळाने राजकीय दबावाखाली ‘रॉडहॅम’ हे आपले आडनाव पूर्णच टाकून दिले. कारण काय? तर हिलरींनी लग्नानंतरसुद्धा स्वतःचे आडनाव ठेवणे ज्या वर्गाला आवडले नसते त्या वर्गाची मते ‘बिल क्लिंटन’ यांना मिळाली नसती. तेव्हापासून त्या ‘हिलरी क्लिंटन’ म्हणूनच वावरतात. म्हणजे अमेरिकन मतदारसुद्धा स्त्रियांवर प्रतिगामी अपेक्षा लादतो.

तुला तो प्रसंग आठवतो का, जेव्हा एका पत्रकाराने मला नवे नाव द्यायचे ठरवले. त्याने माझ्या नावाचा उल्लेख सौ...(माझ्या नवऱ्याचे आडनाव) असा केला होता. त्यावेळी मी त्याला ‘पुन्हा तसे करू नको’ असे सांगितल्यावर किती गहजब झाला होता! माझे नाव तसे नाही हे मी स्पष्ट करूनही, नायजेरियातील खोडसाळ लेखकांनी माझा उल्लेख तशाच रीतीने करणे चालूच ठेवले. गंमत म्हणजे, असे करणाऱ्यांत स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा खूपच जास्त होते. मला स्त्रियांकडून खूपच तीव्र द्वेषाचा सामना करावा लागला. असे का झाले यावर मी विचार केला. मला लक्षात आले, त्या स्त्रियांनी प्रश्न न विचारता सामाजिक संकेत स्वीकारले होते, त्याला माझ्या वागण्याने आव्हान दिले होते. तेव्हा अनेक मैत्रिणींनी, ‘तू यशस्वी आहेस. त्यामुळे तू तुझे मूळ नाव लग्नानंतरही कायम ठेवणे चालू शकते’ अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. मग मी असा विचार करू लागले की, स्त्रियांना लग्नानंतरही स्वतःचे नाव लावता यावे यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्याची गरजच काय? खरं सांगायचं तर मी यशस्वी आहे म्हणून मूळ नाव कायम ठेवले असे नाहीये. जरी मी लेखिका झाले नसते आणि माझी इतकी पुस्तके प्रकाशित झाली नसती, तरीही मी माझे मूळ नावच ठेवले असते. कारण ते माझे नाव आहे. मला ते आवडते. म्हणून मी ते तसेच ठेवले आहे. इतर घटकांचा त्याच्याशी संबंध नाही.

मला असेही काही लोक भेटतात जे म्हणतात, ‘तुझे नाव एका पुरुषसत्ताक व्यवस्थेचेच प्रतीक आहे. कारण ते तुझ्या वडिलांकडून चालत आलेले नाव आहे.’ मी म्हणते, ‘खरंय. ते नाव माझ्या वडिलांकडून आलेले असो किंवा चंद्रावरून आलेले असो. माझ्या जन्मापासून माझं तेच नाव आहे. आयुष्याचे महत्त्वाचे टप्पे मी याच नावाने पार केले आहेत. मी बालवाडी शाळेत गेले तेव्हा  शिक्षकांनी मला हे सांगितले होते की, ‘हे’ नाव उच्चारताच मी त्यावर ‘हजर आहे’ असे म्हणायचे. उदा. क्रमांक एक- अदीची?, हजर आहे! मला माझे नाव आवडते आणि मी ते बदलणार नाही. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक स्त्रीला हा अधिकार मिळायला हवा. मला सांग, किती पुरुष लग्नानंतर आपले आडनाव बदलायला तयार असतील?

नावामागे लावल्या जाणाऱ्या संबोधनांचे म्हणशील, तर मला ‘सौ.’ (Mrs.) हे संबोधन अजिबातच आवडत नाही. कारण नायजेरियन समाज त्याला नको इतके महत्त्व देतो. मी अनेक स्त्रियांना ‘सौ. (नवऱ्याचे आडनाव)’ असे मोठ्याने आणि अभिमानाने म्हणताना ऐकले आहे. त्यामुळे ज्यांच्या नावापुढे अजून ‘सौ.’ लावले जात नाही ते काही तरी मोठे अयशस्वी आहेत, असाच काही तरी समज केला जातो. आपल्याला ‘सौ. नवऱ्याचे आडनाव’ म्हणावे की नाही, याची निवड करता आली पाहिजे. मात्र असे नाव लावण्यास आपला समाज इतके अवास्तव महत्त्व देतो की, ते अस्वस्थ करणारे आहे. आपण ‘सौ’ म्हणण्यास इतके महत्त्व देणे याचा अर्थ, लग्नानंतर स्त्रीचे सामाजिक स्थान बदलणे. पुरुषांबाबत तसे होत नाही. (यामुळेच कदाचित लग्न झालेल्या अनेक स्त्रिया ‘आपले नवरे लग्नानंतरसुद्धा अविवाहित असल्यासारखेच वागतात अशी तक्रार करतात. का? कदाचित आपल्या समाजाने पुरुषांनासुद्धा लग्नानंतर ‘श्री’पेक्षा वेगळे असे काही अभिधान लावायची सक्ती केली, तर त्यामुळे का असेना त्यांचे वागणे बदलेल?... काय वाटते?... हाहा!...) त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे लग्नानंतर, स्वतः 28 वर्षीय, मास्टर्स डिग्री घेतलेली तू एका रात्रीत ‘इजिआवेले उडे’वरून ‘इजिआवेले ओन्येकाईलोडिबे’ होतेस. हा बदल स्वीकारण्यासाठी पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्सवरील नावे बदलणे यालाच फक्त मानसिक ऊर्जा लागते, असे नव्हे. शब्दशः एक नवी ओळख स्वीकारणे हा बदल मानसिक स्तरावर स्वीकारण्यासाठी खूपच ऊर्जा लागते. जर पुरुषांनासुद्धा लग्नानंतर असाच त्रास सहन करावा लागला असता, तर आपल्या त्रासाची तीव्रता बरीच कमी वाटली असती. आपण अजूनही संबोधनाविषयीच बोलत आहोत म्हणून सांगते. मला ‘Miss.’ (मिस) हे संबोधन जास्त आवडते. ते ‘Mr. (मिस्टर)’ सारखेच आहे. पुरुषाचे लग्न झालेले असले-नसले तरीही त्याला ‘Mr.’च म्हटले जाते.

तसेच स्त्रीबाबतसुद्धा हवे. लग्न झालेले असो-नसो, तिच्यासाठी ‘Ms.’ च वापरावे. (प्रत्यक्षात कुमारी (Miss) आणि सौभाग्यवती (Mrs) हे शब्द अविवाहित व विवाहित स्त्रियांसाठी वापरली जातात.) ज्या समाजात खरोखर समता असते तिथे लग्न झाल्यानंतर पुरुषांना जे बदल करावे लागत नाहीत, ते बदल स्त्रियांनाही करायची गरज नाही, हे ‘चीझालूम’ला शिकव. यावर एक पर्याय- लग्नानंतर स्त्री आणि पुरुष या दोघांनीही पूर्णतः नवे आडनाव घ्यावे. त्यांनी ते कसेही निवडावे, फक्त ते दोघांनाही मान्य हवे. त्यामुळे लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरा आणि बायको दोघेही आनंदाने, हातात हात घेऊन पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, सह्या, बँक अकाउंट इत्यादींसाठी आवश्यक ते बदल करायला सरकारी कार्यालयात एकत्र जाऊ शकतील.

 8. आठवी सूचना- ‘आपण सर्वांना आवडायला हवे’ ही भावना नाकारायला शिकव. इतरांना आवडेल असे वागणे हे तिचे काम नाही. ‘चीझालूम’ स्वतः खरीखुरी जशी आहे तसेच तिने असावे, हे तिला शिकव. त्याचबरोबर ती प्रामाणिक व्हावी, तिला इतरांच्या माणूसपणाची जाणीव असावी, यावर भर दे. नेहमी मला करावीशी किंवा बोलाविशी वाटलेली एखादी गोष्ट ‘लोकांना आवडणार नाही’ असे चिओमा सांगत असे. तुला आठवत असेलच- त्यावर मला किती राग यायचा. तिच्या सांगण्याने मी अस्वस्थ व्हायचे. कारण ‘लोक’ नावाच्या आकार-विकार नसलेल्या गोष्टीसाठी माझे वागणे बदलावे असा दबाव तिच्या माध्यमातून माझ्यावर येई. याचा त्रास व्हायचा.

आपल्या जवळच्या लोकांनी आपण जसे आहोत तसे राहण्यास आपल्याला उत्तेजन द्यावे, असे वाटते. कृपा करून असा दबाव तुझ्या मुलीवर कधीही टाकू नकोस. ती इतरांना आवडायला हवी, इतरांशी छान वागायला हवी, आपण असे खोटेपणाचे वागायला मुलींना शिकवतो. मात्र मुलांना हीच शिकवण देत नाही. हे धोकादायक आहे. लैंगिक अत्याचार करण्यासाठी याचा अनेकदा गैरफायदा घेतला गेलाय. अनेक मुली त्यांना त्रास दिला गेला तरीही ‘आपण छान वागावे’ या शिकवणुकीमुळे होणाऱ्या त्रासाविषयी बोलतच नाहीत. तक्रार करत नाहीत. अनेक मुली त्यांना छळणाऱ्या व्यक्तीच्या ‘भावनांचा’ विचार करतात. आपण कायम इतरांना आवडायला हवे, या शिकवणुकीचे हे अनर्थकारी परिणाम आहेत. काही दिवसांपूर्वीच एका खटल्यात बलात्कार झालेली स्त्री म्हणाली, ‘माझ्यामुळे भांडण आणि वाद होऊ नये अशी माझी इच्छा आहे!’

आपल्या मानसिक आकांक्षा-इच्छा मारून जगणाऱ्या असंख्य स्त्रिया आज या जगात आहेत. त्या मोकळा श्वाससुद्धा घेऊ शकत नाहीत. कारण ‘आपण इतरांना आवडायला हवे’ या शिकवणुकीमुळे त्या स्वतःला बाजूला टाकायला शिकल्या आहेत. आपण इतरांना आवडावे यापेक्षा प्रामाणिक आणि क्षमाशील असावे, हे तू चीझालूमला शिकव... तिने धाडसी असायला हवे, हेही शिकव... तिला मनातून नेमकं काय वाटतंय, हे प्रामाणिकपणे बोलायला शिकव, खरं बोलायला शिकव. जेव्हा ती असे वागेल, तेव्हा तिला शाबासकी दे. जेव्हा-जेव्हा ती कठीण किंवा अप्रिय अशा भूमिका स्वतःच्या प्रामाणिक भूमिका म्हणून घेईल, तेव्हा तर तिचे विशेषच कौतुक कर.

क्षमाशील असणं महत्त्वाचं आहे, हेही तिच्या मनावर ठसव. जेव्हा ती इतरांबाबत क्षमाशील वृत्तीने वागेल, तेव्हा तिला शाबासकी दे. पण तिचे क्षमाशील असणे हे इतरांनी गृहीत धरू नये. तिला हेही सांग की, इतरांकडूनसुद्धा क्षमाशील वर्तन तिच्या वाट्याला यावे. तिला स्वतःच्या मतांसाठी ठाम उभे राहायला शिकव. जर एखाद्याने तिचे खेळणे परवानगीशिवाय घेतले, तर ते परत मागायला तिला सांग. तिला हे शिकव- जर एखाद्या गोष्टीमुळे त्रास होत असेल, तर त्याविषयी बोलणे गरजेचे आहे. सर्वांना ती आवडायला पाहिजे याची काहीही गरज नाही. काही जणांना ती आवडत नसेल, तर ज्यांना ती आवडत असेल असेही काही जण असतील. तिला शिकव, इतरांना आवडावी किंवा आवडू नये अशी ती ‘वस्तू’ नाही. तिला स्वतःलासुद्धा काही आवडी-निवडी असाव्यात. तारुण्यात पदार्पण करताना एखाद्या मुलाला ती आवडत नाही म्हणून रडत-रडत घरी आली तर तिला हे सांग की, तिलासुद्धा एखादा मुलगा न आवडणे हा पर्याय असतो.

अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ‘व्हाईट हाउस’वर जेव्हा गोळीबार झाला, त्या रात्री तिथे ड्युटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाबाबत ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये आलेली ही बातमी पाहा- शुक्रवारी सुरक्षारक्षकांचा रोल कॉल चालू असताना कॅरी जॉन्सन हिने व्हाईट हाउसच्या ट्रुमन बाल्कनीतील काही भाग  कोसळल्याचा आवाज ऐकला. मात्र शनिवारी दुपारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘व्हाईट हाउस’समोरील रस्त्यावर दोन कारमधील माणसे एकमेकांवर गोळीबार करत होती. त्या गोळीबाराचा आवाज सर्वांनी ऐकला होता. जॉन्सन हिने शुक्रवारी रात्रीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले होते की, कदाचित ‘व्हाईट हाउस’वरच हल्ला झालाय. पण शनिवारी जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेगळेच स्पष्टीकरण दिले, तेव्हा आपल्यावर टीका होईल या ‘भीतीने’ जॉन्सन गप्प राहिली. आपल्यावर टीका होण्याची भीती वाटणे हे ‘आपण इतरांना आवडावे’ या वृत्तीचा परिणाम आहे. एखादा पुरुष असे कारण देण्याची शक्यता खूपच कमी असते. कारण मुलांना वाढवताना ‘ते इतरांना आवडायला हवेत’ हे केंद्रस्थानी ठेवून वाढवले जात नाही.

9. नववी सूचना- ‘चीझालूम’ला स्वतःची ‘आयडेंटिटी (ओळख)’ तयार करायला शिकव. त्याची आवश्यकता असते याची जाणीव करून देणे महत्त्वाचे असते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न कर. तिच्या वाढीच्या वयात तिला ती ‘इबो’ स्त्री आहे याचा अभिमान वाटावा. तिला ‘इबो’ संस्कृतीतील चांगल्या गोष्टी स्वीकारायला आणि वाईट गोष्टींचा त्याग करायला शिकव. तू वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे तिला हे सांगू शकतेस की- इबोंच्या संस्कृतीत सामूहिक प्रयत्न, एकमताने निर्णय घेणे, कष्टाची तयारी ठेवणे हे चांगले गुण आहेत. इबोंची भाषा सुंदर असून, त्या भाषेतील म्हणींमध्ये खूप शहाणपण दडलेले आहे. परंतु इबो संस्कृतीत स्त्रियांना त्या केवळ स्त्रिया आहेत म्हणून काही गोष्टी करण्याची परवानगी नसते- हे चुकीचे आहे.

तसेच इबोंच्या संस्कृतीत पैशाला गरजेपेक्षा जास्तच महत्त्व दिले जाते. माणसाला स्वयंपूर्ण होण्यासाठी पैशांची गरज असते. मात्र कोणाकडे पैसा आहे आणि कोणाकडे नाही, यावरून माणसांची किंमत होऊ शकत नाही. तसेच आफ्रिकन, कृष्णवर्णीय लोकांचे सौंदर्य आणि आनंदी वृत्ती याची तिला प्रयत्नपूर्वक जाणीव करून दे. असे का करावे, असा प्रश्न पडेल. या जगात सत्तेचे गणित असे आहे की, त्यामुळे जगभरात ती कुठेही असली तरी श्वेतवर्णीयांचे सौंदर्य, श्वेतवर्णीयांच्या क्षमता आणि श्वेतवर्णीयांचे यश यांची चित्रे कायम पाहतच ती मोठी होईल. पाहत असलेल्या टीव्ही सिरियल्स, इतर लोकप्रिय कलाप्रकार, पुस्तके अशा सर्व ठिकाणी हेच पाहायला मिळेल. तसेच कृष्णवर्णीय, आफ्रिकन लोकांची नकारात्मक प्रतिमा तिला अनेक ठिकाणी पाहायला मिळेल. तिला आफ्रिकेचा इतिहास आणि अमेरिकेत स्थलांतर केलेल्या कृष्णवर्णीयांविषयी अभिमान बाळगायला शिकव. इतिहासातील कृष्णवर्णीय नायक-नायिका शोध. तशा व्यक्ती इतिहासात नक्कीच आहेत.

नायजेरियातील शालेय शिक्षणाच्या माध्यमातून मुलांमध्ये इतिहासाविषयी अभिमान निर्माण होईलच असे नाही. त्यामुळे शाळेत जे काही शिकवले जाते, त्यातील काही गोष्टी तुला पुन्हा नव्याने शिकवाव्या लागतील. पाश्चात्त्य देश आपल्या इतिहासाविषयी अभिमानाची जाणीव मुलांमध्ये निर्माण करण्यात यशस्वी होतात. कारण तसा इतिहास ते अप्रत्यक्षपणे शिकवतात. इतिहासाविषयी ‘अभिमान बाळगायला शिकवतात’ असं म्हटलं, तर कदाचित त्यांना ते मान्यसुद्धा होणार नाही; पण ते नेमके तेच करत असतात. त्यामुळे ‘चीझालूम’च्या शिक्षिका तिला गणित, विज्ञान, कला आणि संगीत चांगले शिकवतील; पण आपल्या इतिहासाविषयी ‘अभिमान जागवण्या’चे काम तुलाच करावे लागेल.

तिला समाजातील विषमता आणि विशेषाधिकार या दोन्हींची जाणीव करून दे. जे लोक कोणताही त्रास देणार नाहीत अशा लोकांविषयी आदर बाळगायला तिला शिकव. तिच्याहून वयाने जे कोणी मोठे आहेत अशी घरात काम करणारी माणसे, ड्रायव्हर आणि इतर लोकांनाही आदराने वागवावे, हे शिकव. याचा संबंध तिच्या आयडेंटिटीशी जोड. उदा. आपल्या घरात तुम्ही लहान असताना घरात काम करणाऱ्या, तुमच्याहून वयाने मोठ्यांना आदरानेच वागवता वगैरे... तिला एक ‘इबो’ पद्धतीचे टोपणनाव दे. मी लहान असताना माझ्या मावशीने ‘ओबोडो डिके’ असे नाव दिले होते. मला ते फार आवडायचे. माझे गाव ‘योद्‌ध्यांचे गाव’ म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे मावशीने दिलेल्या टोपणनावाचा ‘योद्‌ध्यांच्या गावाची मुलगी’ हा अर्थ समजल्यावर मी फारच खूष झाले होते.

‘चीझालूम’ला ‘इबो’ भाषा शिकव. हसत-खेळत शिकव. एखादा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे, अशा भावनेने ‘इबो’ भाषा शिकवू नकोस. सध्याच्या काळात अनेक पालक इथेच चुकतात. एखादे कठीण वाक्य  बोलल्याबद्दल बक्षीस देणे, आठवड्यातून एकदा ‘इबो’ शिकवणाऱ्या वर्गात घालणे आणि घरात मुलांशी कधीही ‘इबो’मध्ये न बोलणे असे ते वागतात. मुले हुशार असतात. तुम्ही कशाला महत्त्व देता आणि कशाला देत नाही, हे त्यांना चटकन समजतं. आठवड्यातून एकदा एखाद्या वर्गात ‘इबो’ शिकण्यासाठी पाठवणे... आणि घरात ‘इबो’ भाषेत बोलण्याची कधीही अपेक्षा न ठेवणे... यामुळे तुम्हाला ‘इबो’ भाषेचे फार काही महत्त्व नाही, हे त्यांच्या लक्षात येतंच. त्यामुळे या साऱ्या उपायांचा काहीही परिणाम होत नाही. जर ‘चीझालूम’ला इबो भाषा येत असेल, तर अधिकाधिक जागतिकीकरण होत असलेल्या या जगात वावरणे तिला फार सोपे जाईल. तसेच द्वैभाषिक असण्याचे खूप फायदे असतात, हे संशोधनाने सिद्ध केलंय.

10. दहावी सूचना- तू तिच्याशी आणि तिच्या दिसण्याशी कसे आणि काय संदर्भ जोडते, याबद्दल जाणीवपूर्वक दक्ष राहा. तिला खेळण्यास प्रोत्साहन दे. ती शारीरिक दृष्ट्या सक्रिय हवी. तिच्याबरोबर चालायला जा... तुम्ही एकत्र पोहा... धावा... टेनिस... फुटबॉल... टेबलटेनिस... यापैकी काहीही खेळा. तिला आवडणारा कोणताही खेळ खेळू दे. आरोग्य चांगले राखण्यासाठी याचे फायदे तर होतीलच;. पण त्याशिवाय, मुलींवर शारीर-प्रतिमेमुळे जग जी असुरक्षितता लादते, त्याचा सामना करतानासुद्धा उपयोग होईल. कार्यरत राहण्याचे खूप फायदे आहेत, हे तिच्या मनावर ठसव. संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की, मुलींना मासिक पाळी यायला सुरुवात झाल्यावर मुली खेळणे थांबवतात. यात आश्चर्य वाटावे असे काहीही नाही. स्तनांची वाढ आणि स्वतःचे शरीर कसे दिसत असेल याबद्दलची अनावश्यक काळजी यामुळे खेळणे थांबते. तिच्याबाबत असे होऊ देऊ नकोस. जर मेकअप करायला आवडत असेल, तर तिला तो करू दे. जर तिला फॅशन करायला आवडत असेल, तर मनासारखे कपडे घालू दे. जर तिला दोन्ही आवडत नसेल, तर तिच्यावर सक्ती करू नकोस.

तिला ‘फेमिनिस्ट’ पद्धतीने वाढवणे म्हणजे तिच्यातील स्त्रीत्वच पूर्णतः नाकारणे असे नव्हे. ‘फेमिनिझम’ आणि स्त्रीत्व एकमेकांपासून वेगळे आहे, असे मानू नकोस. तसे मानणे हे पुन्हा ‘फेमिनिझम’विरोधी आहे. दुर्दैवाने पारंपरिकरीत्या ज्याला स्त्रैण गुण म्हटले जातात, त्या ‘फॅशन आणि मेकअप’ यांची आवड असण्याबाबत स्त्रियांना लाज वाटायला लावली जाते. मात्र ज्याला ‘टिपिकल’ पुरुषी मानले जाते अशा स्पोट्‌र्स कार्स, मर्दानी खेळ यांच्याविषयी पुरुषांना जी आवड वाटते, त्याविषयी त्यांना लाज वाटायला समाज भाग पाडत नाही. पुरुषांनी आणि स्त्रियांनी स्वतःच्या दिसण्यावर मेहनत घेणे याकडे समाज वेगवेगळ्या नजरेने पाहतो. पुरुष जर चांगला दिसत असेल, तर त्याला आपल्या दिसण्यावरून समाज आपल्याविषयी काय विचार करेल याची चिंता वाटत नाही. मात्र स्त्री जर चांगली दिसत असेल किंवा नसेल, तर त्यावरून तिची बुद्धिमत्ता, क्षमता किंवा गांभीर्य याविषयी जजमेंट पास केले जाते.

अजून एक... तिच्या दिसण्याला नैतिकतेशी कधीही जोडू नकोस. आखूड स्कर्ट घालणे अनैतिक आहे, असे कधीही म्हणू नकोस. तिने काय कपडे घालावेत ही व्यक्तिगत आवड-निवड आणि आकर्षकता याच्या आधारे ठरवण्याची बाब आहे, हे शिकव. तिने काय कपडे घालावेत यावरून तुमच्या दोघींचे वाद झाल्यास तिला ‘तू वेश्येसारखी दिसतेस’ असे कधीही म्हणू नकोस. मला आठवतंय... तुझी आई एकदा तुला असे म्हणाली होती आणि तुला ते अजिबात आवडले नव्हते. तिचा ड्रेस तुला आवडला नसल्यास तिला सांग की, ‘या ड्रेसमध्ये तू तितकी काही आकर्षक दिसत नाहीस... त्याचे फिटिंग नीट नाही.. हा ड्रेस तुला चांगला दिसत नाही...’ वगैरे... परंतु तो ड्रेस घालणे अनैतिक आहे, असे तिला कधीही म्हणू नकोस. कारण कपडे आणि नैतिकता यांचा काहीही संबंध नाही.

तिच्या केसांचा आणि त्रासाचा संबंध जोडला जाणार नाही, यासाठी प्रयत्न कर. माझ्या लहानपणी माझे केस विंचरून वेणी घातली जात असे, तेव्हा दाट आणि लांब केसांमुळे किती वेदना होत हे चांगलेच आठवते. त्यामुळे केस विंचरणे आणि वेणी घालणे या प्रक्रियेत शांत राहण्यासाठी मला चॉकलेटचे आमिष दाखवले जात असे. आणि हे सारे कशासाठी? केसांसाठी! आपल्या लहानपणीचे किती शनिवार आणि रविवार आपण केवळ केसांची निगा राखण्यासाठी दिले आहेत... जर समजा तसे नसते तर... या वेळेत आपण काय काय शिकलो असतो... कोणत्या प्रकारे आपली वाढ झाली... आणि याच काळात आपल्याबरोबरीची मुले काय करत असावीत?

तिच्या केसांबाबत विचार करताना ‘नीटनेटके’ असणे  म्हणजे नेमके काय, याची नव्याने व्याख्या कर. आपल्याकडे केस नीटनेटके असण्याचा अर्थ अतिशय घट्ट बांधलेले, डोकेदुखी वाढवणारे आणि डोक्याची वाट लावणारी केशरचना करणे- असा होतो. हे थांबवले पाहिजे. नायजेरियातील शाळांमध्ये मुलींचे केस ‘नीटनेटके’ नाहीत, त्यांच्या सुंदर केसांची बट कानाजवळ लडिवाळपणे खेळत आहे म्हणून त्यांना किती भयानक पद्धतीने शिक्षा केल्या जातात, हे मी पाहिलंय. ‘चीझालूम’चे केस मोकळे राहू दे. तीच ‘नीटनेटकी’ अशी तुझी केसांची व्याख्या असायला हवी. गरज पडली तर तू शाळेच्या प्रशासनाशी या विषयावर बोल. कोणताही बदल घडवण्यासाठी कोणी तरी सुरुवात करणे गरजेचे असते आणि बदल घडवण्यासाठी एक व्यक्तीसुद्धा पुरेशी असते. मुलींचे केस जसे बांधले आहेत तसेच दिवसभर राहावेत, यासाठी करकचून बांधतात. मात्र केस दिवसभर तसेच राहायची गरज नाही. तिचे केस करकचून बांधण्यापेक्षा मी सुचवेन, त्याच्या मोकळ्या आणि मोठ्या वेण्या बांध. तीक्ष्ण दात असलेल्या फणीने तिचे केस विंचरू नकोस. तशा फण्या बनवताना आपल्या केसांच्या टेक्श्चरचा विचार केलेला नसतो.

लहान मुलांना आजूबाजूचे जग चटकन समजते. त्यामुळे बाहेरच्या जगात कशा स्वरूपाच्या सौंदर्याला महत्त्व दिले जाते, हे तिला फारच लवकर कळेल. मासिके, टीव्ही आणि सिनेमांत तिला पाहायला मिळेल. तिला हे लक्षात येईल की, गोरे असण्याला महत्त्व मिळते. नीट बसवलेले... सरळ... छान गुंफलेले... अशा केसांना उभ्या केसांपेक्षा महत्त्व दिले जाते, हे तिच्या लक्षात येईल. तुला आवडो अथवा न आवडो, तिच्यासमोर हे येतच राहील. त्यामुळे ती जे पाहील, त्याला पर्याय देत राहावे लागेल. तिला हे शिकव की- सडपातळ, गोऱ्या स्त्रिया जशा सुंदर असतात, तशाच सडपातळ आणि गोऱ्या नसलेल्या स्त्रियासुद्धा सुंदर असतात. जगभरात अशा अनेक व्यक्ती आणि संस्कृती आहेत- जे आज रूढार्थाने ‘सौंदर्य’ म्हटले जाते त्याला महत्त्व देत नाहीत. तुझी मुलगी नेमकी कशी आहे, हे तुला कळेल. त्यामुळे तिला तिच्या सौंदर्याचा अभिमान वाटायला हवा... तिने स्वतःकडे असमाधानी नजरेने पाहायला नको... यासाठी काय करायला हवे, ते तुला जास्त चांगले माहीत असेल.

तिने ज्या गुणांचे कौतुक करावे असे तुला वाटते, ते गुण असलेल्या स्त्रियांच्या सहवासात तिला ठेव. तुला त्या व्यक्ती आणि त्यांचे ते गुण किती महत्त्वाचे वाटतात, हे तिला सांग. कारण मुलं उदाहरणातूनच शिकतात. उदा.- फ्लोरेन्स केनेडी नावाच्या आफ्रिकन-अमेरिकन फेमिनिस्ट स्त्रीविषयी मला खूपच आदर वाटतो. मला विचारशील तर चीझालूमला ‘अमा अता ऐदु’, ‘डोरा अकुन्यी’, ‘मुथोनी लीकीमानी’, ‘एन्गोझी ओकोन्जो इविएला’, ‘ताईवो अजायी लिसेट’ यांची ओळख करून दे. ‘फेमिनिस्ट’ व्यक्तींनी प्रेरणा घ्यावी, अशा खूप आफ्रिकन स्त्रिया आहेत. या स्त्रियांनी काय केले आणि काय करायला नकार दिला, यावरून त्यांची खरी ओळख होईल.

अशीच एक स्त्री म्हणजे तुझी आजी. ती कणखर, फटकळ तोंडाची स्त्री होती. एकदा मी जोसेफिन अनेनी यांचे बोलणे ऐकले होते. त्यांच्या साध्या आणि तरीही कणखर ‘फेमिनिझम’मुळे मी फारच प्रभावित झाले होते. ते माझ्यासाठी अनपेक्षित होते. ‘चीझालूम’च्या वाढीच्या काळात आजूबाजूला असेच प्रेरणादायी पुरुषसुद्धा असायला हवेत. अर्थात ‘चुडी’चे मित्र पाहता, हे थोडेसे कठीण जाईल. नको इतकी दाढी कोरलेला तो माणूस मला अजूनही आठवतो. चुडीच्या मागच्या वाढदिवसाला आपण जमलो, तेव्हा ‘मी तिच्यासाठी हुंडा दिला आहे आणि त्यामुळेच ती स्त्री मला शहाणपणा शिकवू शकत नाही’ असे तो ओरडत होता. त्यामुळे शक्य असतील तितके चांगले पुरुष शोध. त्या दाढी कोरलेल्या माणसासारखे अनेक पुरुष तिला आयुष्यात भेटतील. त्यामुळे सुरुवातीपासून चांगल्या माणसांची उदाहरणे तिच्या आजूबाजूला असलेली बरी. अशा पर्यायांचे महत्त्व किती असते, हे मी तुला वेगळे सांगायला नको. जर तिच्या आजूबाजूला चांगली उदाहरणे असतील, तर ठरवून दिलेल्या जेन्डर-भूमिकांना आव्हान देणे तिला सोपे जाईल. स्वयंपाक करणारा आणि त्याचे त्याला विशेष काहीही न वाटणारा असा पुरुष तिने पाहिला असेल, तर जेव्हा कोणी तरी ‘स्त्रियांनी स्वयंपाक करायलाच हवा’ असे म्हणेल, तेव्हा ती एक स्मितहास्य करून त्या मूर्खपणाला अगदी सहजपणे बाजूला सारू शकेल.

11. अकरावी सूचना- आपल्या संस्कृतीत स्त्रीबाबत सामाजिक नीती-नियम तयार करताना ‘जीवशास्त्रा’त सोईने केल्या जाणाऱ्या वापराबाबत तिला सांग. त्या गोष्टीला प्रश्न विचारण्याची सवय ‘चीझालूम’ला लाव. मला एक ‘योरुबा’ जमातीची स्त्री माहीत आहे. तिचे लग्न ‘इबो’ जमातीच्या पुरुषाबरोबर झाले होते. ती पहिल्याच बाळासाठी गरोदर असताना त्यासाठी जी नावे सुचवली जात होती, ती सारी ‘इबो’ जमातीतील होती. खरं तर वडिलांचे ‘इबो’ आडनाव लागणारच असल्याने मुलाचे नाव तरी ‘योरुबा’ पद्धतीचे ठेवायला नको का? मी तिला असे सुचवल्यावर ती म्हणाली, ‘पहिले बाळ हे वडिलांचे असते. त्यामुळे ते ठरवतील तसेच होईल.’

पुरुषांना जे ‘फायदे मिळतात’ त्याचे कारण पुरुषांच्या शारीरिक क्षमता जास्त आहेत असे म्हणून आपण त्यांचे अनेकदा समर्थन करतो. हे खरंय की, सर्वसाधारणतः स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या शारीरिक क्षमता जास्त असतात. मात्र आपण शारीरिक कारणांचा वापर अतिशय सोईने करतो हा खरा मुद्दा आहे. नायजेरियात असे मानतात की, ‘पहिल्या मुलावर वडिलांचा हक्क असतो’. मात्र शारीरिक कारणांचा वापर करूनच आपण सामाजिक नीती-नियम तयार करणार असू, तर मुलांवर पहिला हक्क आईचा असायला हवा की नको? कारण मुलांच्या जन्मानंतर शारीरिक दृष्ट्या आणि निर्विवादपणे मुलांची आई कोण आहे, हे आपल्याला नक्की माहीत असते. वडिलांबाबत बोलायचं तर, आई सांगेल त्यांनाच आपण त्या मुलाचे वडील मानतो की नाही? यावरून मला असा प्रश्न पडतो, समाजामध्ये किती वंशपरंपरा असाव्यात, ज्या जीवशास्त्राच्या या प्रमाणावर खऱ्या ठरतील?

काही ‘इबो’ स्त्रियांमध्ये हे समज खोलवर रुजलेले असतात. मुलावर नवऱ्याचा हक्क आहे असेच त्या मानतात. मला अशा स्त्रिया माहीत आहेत, ज्यांनी त्रास होतो म्हणून लग्न मोडले. मात्र त्या स्त्रिया मुलांना आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकल्या नाहीत. तसेच मुलांना भेटण्याची त्यांना ‘परवानगी’ नसते, कारण मुलांवर नवऱ्याचा हक्क असतो! आपण शारीरिक उत्क्रांतीच्या तत्त्वाचा वापर करून पुरुषांच्या बाहेरख्यालीपणाचे स्पष्टीकरण देतो; मात्र त्याच तत्त्वाचा वापर करून स्त्रियांच्या बाहेरख्यालीपणाचे स्पष्टीकरण देत नाही. खरं तर उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार पाहिल्यास, एका स्त्रीने अनेक पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवणे इष्ट मानायला हवे. कारण ‘जेनेटिक पूल’ जितका मोठा तितके होणारे अपत्य कणखर असण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ‘चीझालूम’ला हे शिकव की, शरीरशास्त्र  हा इंटरेस्टिंग विषय आहे. मात्र त्याच्या आधारे ठरवलेले सामाजिक नीती-नियम स्वीकारण्याआधी तपासून पाहावेत. माणसेच सामाजिक नियम तयार करतात, म्हणून सर्व सामाजिक नीती-नियम बदलणे शक्य आहे.

12. बारावी सूचना- तू तिच्याशी लैंगिकतेच्या विषयावर संवाद साधावास. याची सुरुवात लवकरच करायला हवी. कदाचित असा संवाद साधताना थोडेसे अवघडल्यासारखे वाटू शकते, मात्र तरीही ते गरजेचे आहे. आपण तिसरीत असताना ‘लैंगिकता’ या विषयावर आपली कार्यशाळा घेतली गेली होती, ती आठवते? मुलांशी बोलण्याने आपण कशा गरोदर होऊ आणि समाज कसा धिक्कार करेल, याच्या धमकीसदृश बोलण्याशिवाय तिथे आपल्याला लैंगिकतेबद्दल काही शिकवले गेले नाही. ती कार्यशाळा मला स्वतःविषयी लाज वाटायला लावणारी म्हणूनच आठवते. तो दिवस किळस आणणारा आणि लाजिरवाणा होता... आपण स्त्री असल्याबद्दल आपल्याला लाज वाटायला लावणारा तो दिवस होता... ‘चीझालूम’वर अशा अनुभवाचा सामना करायची वेळ कधीही येऊ नये. ‘सेक्स ही केवळ प्रजननासाठी करण्याची कृती आहे...’ किंवा ‘सेक्स केवळ लग्नानंतरच करण्याची कृती आहे...’ असे तिला सांगू नकोस. कारण तसे सांगणे अप्रामाणिकपणाचे आहे. (साधारणपणे ती बारा वर्षांची होईल, त्या सुमारास तिला हे कळेलच.)

सेक्स ही अतिशय सुंदर गोष्ट असू शकते... ‘सेक्स करणे’ या कृतीचे (बरे-वाईट) मानसिक परिणाम असतात... सेक्स करण्यासाठी प्रौढ होण्यापर्यंत थांबायला हवे... हे तिला सांग. ती एकदा प्रौढ झाली की, सेक्सचा तिच्या आयुष्यात नेमका अर्थ काय हे तिलाच ठरवता येईल, हेही सांग. पण ती सेक्स करण्यासाठी 18 वर्षांची होईपर्यंत कदाचित थांबणार नाही, अशीही मनाची तयारी ठेव. मात्र ती 18 व्या वर्षापर्यंत थांबणार नसेल, तर तिने सेक्स केलाय हे तिला सांगावेसे वाटेल, असे तुमचे नाते हवे. ‘मी एका मुलीचे संगोपन करत आहे, जी माझ्याशी कोणत्याही विषयावर बोलू शकते’ असे म्हणणे पुरेसे नाही. त्यासाठी आवश्यक ती भाषासुद्धा तिला शिकवायला हवी. उदा. तिने सेक्स केलाय हे तिने कोणत्या भाषेत, कोणत्या शब्दांचा वापर करून तुला सांगावे याचा विचार कर.

मला आठवतंय... लहान असताना माझ्या आजूबाजूचे लोक ‘आईक (ike)’ हा शब्द योनी आणि गुदद्वार या दोन्हीसाठी वापरत. गुदद्वार हा खरे तर त्या शब्दाचा योग्य आणि समजायला सोपा अर्थ होता. मात्र दोन्हींसाठी एकच शब्द वापरल्याने नेमक्या अर्थाबाबत अनिश्चितता राहत असे. त्यामुळे माझ्या योनीत खाज येतेय, हे कसे सांगावे हेच कळत नसे. बालरोगतज्ज्ञ आणि मुलांच्या वाढीचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते लैंगिक अवयवांचा निर्देश vagina (योनी) आणि penis (पुरुषांचे जननेन्द्रिय)’ या त्यांच्या योग्य नावानुसारच करावा. मलाही ते पटते. पण आपल्या मुलीने या विषयावर कोणत्या भाषेत बोलावे, याचा निर्णय तू घे. मात्र कोणत्याही भाषेत बोललात तरीही लैंगिक अवयवांना नाव असायलाच हवं. तसेच शरमेची भावना त्या नावाशी जोडलेली नसावी, याची काळजी नक्की घे. शरमेची भावना तिच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी, आधी तुझ्या मनातून शरमेची भावना घालवावी लागेल. हे कठीण आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. जगातील सर्व संस्कृतींमध्ये स्त्रीच्या लैंगिकतेचा संबंध हा शरमेशी जोडलेला आहे.

पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये स्त्रीने लैंगिक दृष्ट्या आकर्षक असायला हवे, अशी अपेक्षा ठेवली जाते. मात्र त्याच संस्कृतीत स्त्रीचा तिच्या लैंगिकतेवर पूर्ण अधिकार आहे, ही कल्पना स्वीकारली जाईलच असे नाही. स्त्रीच्या लैंगिकतेचा संबंध शरमेशी जोडणे याचे मूळ ‘नियंत्रण ठेवता येणे’ या वृत्तीत आहे. अनेक समाज आणि धर्म स्त्रीच्या शरीरावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नियंत्रण ठेवतात. यामागे स्त्रियांचे भले व्हावे असा हेतू असता, तर ते कदाचित समजू शकते. उदा. स्त्रियांनी शॉर्ट स्कर्ट्‌स घालू नयेत, कारण त्यामुळे त्यांना कॅन्सर होतो. मात्र स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण घालणे याचा संबंध पुरुषांशी आहे. पुरुषांचे रक्षण होण्यासाठी स्त्रियांना बंधनात ठेवावे, अशी ही कल्पना आहे. याचा अर्थ, स्त्री ही केवळ पुरुषांच्या लैंगिक इच्छा पूर्ण होण्यासाठी वापरली जाणारी वस्तू आहे, असाही होतो. लैंगिकता आणि शरम... नग्नता आणि शरम... यांचा परस्परसंबंध कधीही जोडू नकोस.

‘कौमार्य’ हा तुमच्या संवादाचा फोकस कधीही नसावा. कौमार्यविषयक चर्चा ही अंतिमतः शरमेच्या दिशेने सरकते. स्त्रीचे शरीर आणि  शरमेची भावना याचा परस्परसंबंध चीझालूमला नाकारायला शिकव. आणखी एक सांगते. मासिक पाळीबाबत हळू आवाजात बोलण्याची शिकवण आपल्याला का दिली असावी? आपल्या कपड्यावर मासिक पाळीतील रक्तस्रावाचे काही डाग पडल्यास त्याची लाज वाटावी असे का शिकवले जाते? मासिक पाळीबाबत लाज वाटावी असे काहीही नाही. अतिशय नैसर्गिक आणि नॉर्मल गोष्ट आहे. तिला हे सांग. मला आठवते, ‘मासिक पाळी ही अतिशय घाणेरडी गोष्ट आहे’ असे एकदा एक माणूस म्हणाला होता. तेव्हा मी त्याला म्हणाले, ‘ही नुसती घाणेरडी नाही तर भयावह अशी घाणेरडी गोष्ट आहे. कारण मासिक पाळी नसती, तर तुझा जन्मच झाला नसता!’

13. तेरावी सूचना- ‘चीझालूम’च्या आयुष्यात रोमान्स नक्की असेल. त्यामुळे त्याची तयारी ठेव. तिला भिन्नलिंगी व्यक्तींविषयी आकर्षण वाटेल, असे गृहीत धरून मी हे लिहीत आहे. कदाचित तसे नसेल, हेही शक्य आहे. मात्र मी तसे गृहीत धरूनच बोलेन, कारण त्याच आकर्षणाविषयी मला माहिती आहे. तिच्या आयुष्यातील ‘रोमान्स’विषयी तुला माहिती असायला हवी. त्याचा एकमेव मार्ग म्हणजे तिच्याशी तुझा संवाद असणे. त्यासाठी सुरुवातीपासून या विषयावर कोणत्या भाषेत बोलावे, हे तिला शिकवले पाहिजे. तू तिची मैत्रीण व्हावीस असे मला वाटत नाही. तिला जिच्याशी सर्व विषयांवर बोलता येईल अशी तिची आई असावीस, असे मी म्हणेन.

तिला शिकव की, ‘प्रेम म्हणजे नुसतं देणंच नव्हे, तर घेणंसुद्धा आहे.’ हे शिकवणं महत्त्वाचे आहे, कारण आपल्या वर्तनातून अनेक वेळा मुलींना आपण अनेक गोष्टी अप्रत्यक्षपणे शिकवतो. जशा की- ‘मुलींची प्रेम करण्याची क्षमता ही त्यांच्या त्याग करण्याच्या क्षमतेशी निगडित आहे’. मात्र हेच आपण मुलांना शिकवत नाही. प्रेम करण्याच्या प्रक्रियेत ती अगदीच भावनिक दृष्ट्या जोडीदाराशी समरस होऊ शकते. आणि त्याचबरोबर, त्या जोडीदारानेही तितक्याच आत्मीयतेने तिच्याशी भावनिक दृष्ट्या समरस व्हावे अशी अपेक्षा तिने निश्चितच करावी, हे तिला सांग. मला वाटते, प्रेम ही आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. ते कोणत्याही प्रकारचे असले किंवा त्याची कशीही व्याख्या केली, तरी त्यात दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला आदरपूर्वक महत्त्व मिळणे आणि आपल्याकडूनही त्या व्यक्तीला तसेच आदरपूर्वक महत्त्व देणे, हे मुख्य आहे. पण आपण फक्त स्त्रियांनाच हे का शिकवतो, हे कुणास ठाऊक!

अनेक स्त्रिया जमलेल्या एके ठिकाणी मी काही निमित्ताने गेली होते. त्या खोलीतील संवादात पुरुषांचा विषय इतक्या वेळा आला की, मला आश्चर्य वाटले. हा उल्लेखसुद्धा चांगल्या अर्थाने नव्हता. कोणी फसवले, कोणी खोटे बोलला, कोणी लग्नाचे वचन देऊन गायब झाला, या नवऱ्याने असे केले- अशाच स्वरूपाची ती चर्चा होती. याच्या तुलनेत जेव्हा इतके पुरुष एकत्र येतात, तेव्हा ते स्त्रियांविषयी अशा प्रकारची चर्चा करत नाहीत. पुरुषांच्या बोलण्यात ‘स्त्रिया’ हा विषय येईलच असे नाही. आणि आलाच, तरी फार-फार तर ते स्त्रियांविषयी एक भोग्यवस्तू असेच बोलतील. मात्र ‘स्त्रियांमुळे आपल्या आयुष्यावर विपरीत परिणाम झाला’ अशा अर्थाचे बोलणे तिथे होत नाही. असे का? मला वाटते, याचा संबंध अगदी लहानपणापासून स्त्रीपुरुषांना कसे वाढवले जाते त्याच्याशी येतो.

काही दिवसांपूर्वीच एका लहान बाळाला बाप्तिस्मा देण्याच्या समारंभात पाहुण्यांना तान्ह्या मुलीसाठी संदेश लिहायला सांगण्यात आले. एका पाहुण्याने लिहिले, ‘तिला चांगला नवरा लाभू दे’. यामागील भावना चांगली असली तरी मानसिकता फारच त्रासदायक आहे. म्हणजे काय तर, तीन महिन्याच्या मुलीला ‘चांगला नवरा मिळावा हे तुझे ध्येय असावे’ याची अपेक्षा ठेवायला शिकवले जात आहे. त्या मुलीऐवजी तीन महिन्यांचा मुलगा असल्यास त्याला ‘चांगली बायको मिळावी’ असा संदेश येणं दुर्मिळच होय. पुरुषांनी लग्न करण्याचे वचन दिले आणि ते गायब झाले, अशा केसेसविषयी आपण बोलतच आहोत; तर हेही सांगते, अजूनही बहुतेक समाजांत स्त्रिया लग्नाची मागणी घालू शकत नाहीत. हे विचित्र आहे, नाही का? लग्न करणे हे तुमच्या आयुष्यातील मोठे पाऊल असते, तरीही स्त्रियांचे त्यावर नियंत्रण नाही. त्याबाबतसुद्धा त्यांना पुरुषांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे असेही होते की, स्त्री-पुरुष बराच काळ प्रेमात असतात. मात्र पुरुषाने लग्नाची विचारणा करेपर्यंत स्त्रियांना थांबावे लागते. अनेकदा अशी वाट पाहणे हे आपण लग्नास कसे पात्र आहोत, हे सिद्ध करण्यासाठीचे त्या स्त्रीचे प्रत्यक्ष  अप्रत्यक्षपणे एक सादरीकरण होऊन बसते.

जर आपण फेमिनिझमच्या पहिल्या तत्त्वाला इथे लागू केले तर असे दिसते की- स्त्रीला पुरुषाइतकेच महत्त्व दिले जाणार असेल, तर लग्नासारखा आयुष्यावर इतका दूरगामी परिणाम करणारा मोठा निर्णय घेताना ‘इतर कोणी तरी पहिले पाऊल उचलण्यासाठी वाट पाहणे’ याला काही अर्थ नाही. ‘फेमिनिझम लाईट’ (ज्याचा उल्लेख आधी आला आहेच) नुसार वागणाऱ्या व्यक्तीने मला एकदा सांगितले, आपल्या समाजात लग्नाची मागणी घालण्यासाठी पुरुषांना पुढं यावं लागतं, याचा अर्थ सत्ता स्त्रियांकडे आहे. कारण स्त्रियांनी होकार दिल्यावरच लग्ने होतात. पण यातले सत्य हे की, लग्नाची मागणी घालणाऱ्या व्यक्तीकडेच खरी सत्ता असते. कारण तुम्ही होकार किंवा नकार देण्यासाठी आधी तुम्हाला मागणी यावी लागते. माझी खरोखरच इच्छा आहे, जिथे स्त्री-पुरुषांपैकी कोणीही लग्नाची मागणी घालू शकेल अशा जगात ‘चीझालूम’ मोठी व्हावी. लग्न केले अथवा नाही केले तरी त्यांचे नाते खूपच कम्फर्टेबल आणि आनंदी असेल. लग्न करायचे की नाही, हा निर्णयसुद्धा आनंदी-नॉर्मल संवादातून घेतला जाईल.

मला इथे पैशांविषयी सांगायचंय. माझे पैसे हे माझेच आणि त्याचे पैसेही ‘माझेच’, असल्या वेडेपणाच्या कल्पना आपण कधीही स्वीकारू नयेत, हे तिला शिकव. अशा कल्पना धोकादायक असतात. ही कल्पना मान्य असल्यास तत्सम इतर धोकादायक कल्पनासुद्धा मान्य होऊ शकतात. तिच्या जगण्यासाठी आवश्यक पैसे मिळवणे, हे पुरुषाचे काम नाही. एका चांगल्या, सुदृढ नात्यात जेव्हा ज्याला शक्य असेल, तेव्हा त्याने पैसे कमावले पाहिजेत.

14. चौदावी सूचना- शोषणाविषयी शिकवताना ज्यांचे शोषण होते ते साधू वृत्तीचे आहेत, असे शिकवणार नाहीस याची काळजी घे. साधुत्व असणे ही आदर मिळविण्यासाठीची पूर्वअट असू शकत नाही, हे तिला शिकव. जे लोक दुष्ट आणि अप्रामाणिक असतात, तेही माणूसच असतात. त्यांनासुद्धा किमान आदर मिळायलाच हवा. नायजेरियाच्या ग्रामीण भागातील स्त्रियांचा जमिनीवरील हक्क हा नायजेरियातील ‘फेमिनिस्ट’ चळवळीसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या स्त्रियांना त्यांचा हक्क मिळवण्यासाठी त्या चांगल्या स्वभावाच्या किंवा दयाळू असण्याची गरज नाही.

‘जेन्डर’विषयक चर्चा करताना काही वेळा असे मानले जाते की, स्त्रियांनी पुरुषांपेक्षा नैतिकतेशी जास्त एकनिष्ठ असायला हवे. पण तसे नसणार आहे, कारण स्त्री ही पुरुषांइतकीच माणूस आहे. त्यामुळे स्त्रियांचा चांगुलपणा स्त्रियांच्या दुष्टपणाइतकाच नॉर्मल आहे. जगात अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्यांना इतर स्त्रिया आवडत नाहीत. म्हणजे स्त्रियांना स्त्रिया आवडत नाहीत, हे नाकारण्यात अर्थ नाही. तसे न करणे हे फेमिनिझमला दोष देण्यासाठी फेमिनिझमच्या विरोधकांना संधी देण्यासारखे आहे. ‘मी फेमिनिस्ट नाही’ असे म्हणणाऱ्या स्त्रियांची उदाहरणे गौरवाने उचलणाऱ्या विरोधकांविषयी मी बोलतेय... जणू काही योनी घेऊन जन्माला आलेल्या व्यक्तीने ‘मी फेमिनिस्ट नाही’ असे म्हणणे... हा फेमिनिझमचा पराभव झाल्यासारखे आहे... असेच त्या विरोधकांचे वर्तन असते. एखादी व्यक्ती ‘मी फेमिनिस्ट नाही’ असे म्हणते, त्याचा अर्थ फेमिनिझमची गरज कमी झाली असा होत नाही. उलट, अशा उदाहरणांमुळे आपल्यासमोरील आव्हान मोठे आहे... पुरुषसत्ताक मानसिकता किती खोलवर रुजली आहे... हे त्यावरून लक्षात येते... त्याचबरोबर सर्व स्त्रिया फेमिनिस्ट नाहीत आणि सर्व पुरुष दुर्व्यवहारी नाहीत, हेही यातून लक्षात येते.

15. पंधरावी सूचना- तिला भिन्नता/वेगळेपणा याविषयी शिकव. तू तिला आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या ‘वेगळेपणा’ला अगदी नॉर्मल पद्धतीने पाहायला शिकव. वेगळेपणा असण्याचा संबंध ‘महत्त्वाचा असणं’ याच्याशी कसा नाही, हे तिच्या मनावर ठसव. असे करणे चांगुलपणाचे लक्षण आहे किंवा न्याय्य असते म्हणून नव्हे, तर असे करणे हे ‘प्रॅक्टिकल आणि मानवी’ असते म्हणून ‘वेगळेपणा/भिन्नता’ हेच आपल्या जगाचे वास्तव आहे. ‘चीझालूम’ला ‘भिन्नते’विषयी शिकविल्यामुळे या वैविध्यपूर्ण जगात राहण्याची तिची पूर्वतयारी होईल. तिला हे कळायला हवं की, जगात वेगवेगळे लोक वेगवेगळ्या मार्गाने जातात. जोपर्यंत या मार्गांच्या निवडीमुळे इतर कुणाचे नुकसान होत नाही तोपर्यंत ते सर्व मार्ग योग्यच आहेत. तिने त्याचा आदर करायला शिकले पाहिजे. आपल्याला आयुष्याविषयी सर्व काही माहीत नाही, आणि माहीत होणारही नाही, हे तिला शिकव.

विज्ञान आणि धर्म या दोन्हींमध्ये आपल्याला अशा माहीत नसलेल्या गोष्टींसाठी पुरेशी मोकळीक असते. त्यामध्ये जगणे अगदी सहजपणे शक्य आहे.. काही लोक समलैंगिक असतात... काही नसतात... काही लहान मुलांना दोन आया किंवा दोन वडील असू शकतात... काही लोक मशिदीत जातात... काही लोक चर्चमध्ये जातात... काही लोक इतर काही प्रार्थनास्थळांमध्ये जातात... काही जण कोणत्याच प्रार्थनास्थळी जात नाहीत... कारण आयुष्य हे असेच असते... तू तिला हे सांग- जसे तुला पामतेल आवडते तसे ते काही जणांना आवडत नाही... ती तुला विचारेल, असे का? तेव्हा तू तिला सांग, मला माहीत नाही... पण जग असंच असतं वेगळेपणाने भरलेलं... एक लक्षात ठेव- चीझालूमने ‘जजमेंटल असू नये’ अशा रीतीने तिला वाढवावे, असे मला म्हणायचे नाहीये. आजकाल आपल्या आजूबाजूला ‘आम्ही जजमेंटल नाही’ हे म्हणायची लोकांना सवय लागलीये. मला याची भीती वाटते. कारण त्यामागील मूळ भावना चांगली असली, तरी ‘आम्ही जजमेंटल नाही’ याचे रूपांतर पुढे ‘माझे कशाही- विषयी काहीही मत नाही’ यात होऊ शकते. त्यामुळे मला आशा आहे, ‘चीझालूम’ची स्वत:ची मतं असावीत आणि ती मतं अभ्यास, अंगभूत माणुसकी आणि खुल्या मनाने तयार झालेली असावीत.

तिला आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्य लाभू दे... तिचं आयुष्य तिला हवं तसं असू दे... हे सारे वाचल्यावर तुझे डोके दुखायला तर नाही ना लागले? असे झाले असेल तर सॉरी... आणि मग पुढच्या वेळेस ‘माझ्या मुलीला फेमिनिस्ट पद्धतीने कसे वाढवू’, असे विचारू नकोस... ओयी जी, सप्रेम!

चिमामांडा.

अनुवाद : संकल्प गुर्जर, दिपाली अवकाळे 

(नायजेरियाची तरुण व लोकप्रिय लेखिका चिमामांडा अदिची एन्गोझी हिने 2016 च्या अखेरीस तिच्या फेसबुकवर पोस्ट केलेले हे पत्र अंशत: संपादित करून त्याचा अनुवाद केला आहे.)

Tags: mahila manifesto feminism feminist chimamanda weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

चिमामांडा एन्गोझी

नायजेरियन लेखिका 


Comments

  1. Rohit Kanavaje- 17 Aug 2020

    It is nice Articles..! :)

    saveसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके