डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

नोव्हेंबर 1948 ते जानेवारी 1949 पर्यंत  चाललेली हुआइ है ही यु नोव्हेंबर 1948 ते जानेवारी 1949 पर्यंत  चाललेली हुआइ है ही युध्द मोहिम लष्करी  इतिहासातील महत्त्वाची समजली जाते.  कुओमिंगटांगचे 6 लाख सैन्य व 5 लाख  कम्युनिस्ट सैन्य यांच्यातील हा मोठा संघर्ष होता.  कम्युनिस्टांनी सैन्यदलाला अन्न, सामग्री व रसद  पुरविण्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन केले होते.  याशिवाय घोडे,  बैल इत्यादी भारवाहक  प्राण्यांचीही जमवाजमव केली होती. या युध्दात  माओने आपल्या जनरल्सना चँग कै शेकच्या सैन्यदलातील जनरलपेक्षाही जास्त (स्थानिक व  दैनंदिन निर्णय घेण्याचे) अधिकार दिले होते.  त्यामुळेच कुओमिंगटांगच्या सैन्याचा पराभव होऊ  शकला. विशेष म्हणजे,  या मोहिमेत डेंग  यांच्याकडे सेनेचे नेतृत्व होते. या मोहिमेपासून  कम्युनिस्ट पक्षाचा युध्दावर वरचष्मा राहिला. डेंग  यांच्याबाबत या मोहिमेत अनेक वादग्रस्त प्रसंग  घडले. लिऊ बोचेंग सैन्याची खूप काळजी घेत  असत. बचावासाठी पुरेसे खंदक खोदल्यशिवाय, पुरेसे बंकर्स तयार केल्याशिवाय ते स्वस्थ बसत  नसत. डेंग मात्र फारशी काळजी न करता  सैनिकांचा जीव धोक्यात घालीत असत.   

युध्दातून पराभूत होऊन शांघायला परतणाऱ्या डेंग यांना  आणखी काही दु:ख पचवायचे होते. त्यांची पत्नी झँग  जीयुआन इस्पितळात प्रसूतीसाठी दाखल झाली होती.  प्रसूतिवेळी गर्भाशयात इन्फेक्शन होऊन तिचे निधन झाले  आणि नंतर त्यांच्या तान्ह्या मुलाचाही मृत्यू झाला. त्यानंतर  शांघायमध्ये डेंग यांनी एक वर्ष काढले. पक्षाने त्यांना  जिआंझी प्रांतातील चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या  आधिपत्याखाली असलेल्या ‘सोव्हिएत’मध्ये कामगिरीवर  पाठविले. जिआंझी प्रांतातील डोंगराळ प्रदेशाच्या पलीकडे  माओ झेडुंग यांनी अनेक जिल्हे कम्युनिस्ट पक्षाच्या  आधिपत्याखाली आणून त्या प्रदेशाचे आदर्श सोव्हिएत वा  कम्यून करण्याचा प्रयोग आरंभिला होता. उत्तरेकडील  पर्वतरांगांपासून ते दक्षिणेकडील सुपीक व सपाट  पठारापर्यंतचा शेकडो मैलांचा अनेक जिल्ह्यांचा प्रदेश माओ  यांच्या या महत्त्वाच्या सोव्हिएतमध्ये अंतर्भूत होता. तेथे  जमीन सुधारणा व इतर कार्यक्रम यांनी सुरू केले होते. 
        
त्या  राज्याच्या नैर्ऋत्य भागातील रुजिन या जिल्ह्यात पक्षाचे  सचिव म्हणून डेंग यांची नेमणूक झाली.  पहिल्या पत्नीच्या निधनानंतर एका वर्षातच डेंग यांच्या  आयुष्यात रोमँटिक प्रेमाचा दुसरा अध्याय सुरू झाला होता.  शांघायमधील एक अतिशय बुध्दीमान,  पुरोगामी विचाराच्या  व क्रांतिकार्याला वाहून घेतलेल्या जिन वेयिंग या तरुणीच्या  ते निकट आले आणि तिच्याशी विवाहध्दही झाले.  ऑगस्ट 1931 मध्ये ते रुजिनमध्ये पक्षाचे सचिव म्हणून  रुजू झाले,  तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची दुसरी पत्नी जिन वेयिंगही होती. डेंग यांनी त्यांच्या काम करण्याच्या शैलीने  लवकरच रुजिनमधील कार्यकर्त्यांना व अधिकाऱ्यांना  आपलेसे केले. डेंग तिथे येण्यापूर्वी पक्षाची गुपिते  कुओमिंगटांगकडे जातात आणि त्यात अनेक स्थानिक  अधिकारी,  नेते व कार्यकर्ते सामील आहेत,  असा संशय  होता. संशयावरून मोठ्या प्रमाणावर धरपकड होऊन अनेक  कार्यकर्त्यांना देहांताची कठोर शिक्षा देऊन दहशत निर्माण  करण्यात आली होती. डेंग यांनी या साऱ्या प्रकरणाची  नि:पक्षपाती चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणली. त्यामुळे तुरुंगात असणारे अनेक कार्यकर्ते सुटले आणि  अनेकांना जीवदान मिळाले. उलट,  या साऱ्यात निर्दोष पक्ष  कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबणाऱ्या नेत्याला तिथून जावे  लागले. 
       
झिआंझी प्रांतात डेंग यांना माओचे सोव्हिएत  जवळून पाहता आले. हुनान प्रांतात स्थानिक बलवान  प्रादेशिक सेनानींकडून पराभव झाल्याने मूठभर सैन्य व  कार्यकर्ते यांना घेऊन माओ मोठ्या शिताफीने पूर्वेकडील  डोंगराळ भागातून सटकले आणि झिआंझी प्रांतात येऊन  त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिपत्याखाली पहिले स्वतंत्र  क्रांतिकारी सोव्हिएत निर्माण केले होते. प्रादेशिक स्वतंत्र  सैन्यदलाशी लढणे, टिकून राहणे,  अगदी यशस्वी माघार  घेणेही किती अवघड असते,  हे डेंग यांनी बैसे आणि लाँगझौ  येथे स्वतःच्या झालेल्या दारुण पराभवातून अनुभवले होते.  त्यामुळे माओबद्दलचा त्यांचा आदर खूप वाढला. रुजिनमध्ये एक वर्ष झाल्यानंतर डेंग यांची नेमणूक  रुजिनच्या दक्षिणेकडील हुइचांग जिल्ह्याच्या पक्षप्रमुखपदी  करण्यात आली. त्याचबरोबर झुनफू आणि आनफू या  जिल्ह्यांतील कम्युनिस्ट पक्षाचे प्रशासनही ते पाहू लागले. हुईचांग येथे सचिवपदी आल्यानंतर मात्र त्यांचे सारेच ग्रह जणू वक्री झाले. माओप्रमाणेच डेंगही असे मानीत असत  की,  चीनसारख्या ग्रामीण देशात यशस्वी क्रांतिकारी उठाव करण्याची क्षमता प्राप्त करेपर्यंत कम्युनिस्ट पक्षाने ग्रामीण  भागातच पक्षाचे बस्तान बसवावे आणि मगच सत्तेच्या  केंद्रांकडे म्हणजे शहरी व नागरी भागाकडे वळावे. 
      
याच  वेळेला माओ यांच्या कम्युनिस्ट क्रांतीत ग्रामीण भागाला  जास्त महत्त्व देण्याचे धोरण कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय  नेतृत्वाला फारसे मान्य नव्हते. म्हणून पक्षातील माओ  यांच्या प्रभावाखाली येणाऱ्या डेंग यांना इतरही काही आरोप ठेवून पदच्युत करण्यात येऊन इतरत्र हलविण्यात आले.  दुर्दैवाने या साऱ्या मानहानिकारक प्रकारात डेंग यांना पत्नीने  साथ तर दिली नाहीच;  उलट तिने त्यांच्या विरोधकांशी  हातमिळवणी करून डेंग यांच्यावरील आरोप सिध्द करण्यास  मदत केली. पुढे तर तिने कळसच केला. हुइचांग येथील डेंग  यांचेच प्रतिस्पर्धी ली विहान यांच्याशी लग्न करून तिने डेंग  यांचे जीवन अशक्य करून टाकले. डेंग यांच्या सुदैवाने  फ्रान्समध्ये असतानाचे त्यांचे सहकारी व झिआंझी प्रांताच्या  कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ली फुकन यांनी स्वत:चे वजन  वापरून डेंग यांना या साऱ्या प्रकारातून सोडविले व  झिआंझी प्रांताच्या प्रचार विभागाचे प्रमुख केले. पहिल्या  पत्नीचा मृत्यू,  फारसे कारण नसताना पक्षाकडून मिळालेली  शिक्षा,  दुसऱ्या पत्नीने दिलेला घटस्फोट या साऱ्याने डेंग  अक्षरश: हबकून गेले होते. या प्रसंगापासून मूळचे आनंदी व थोडे बिनधास्त असणारे डेंग अधिक गंभीर,  अबोल व  अंतर्मुख झाले. मात्र याच काळात माओंचे पक्षातील नेतृत्वाचे पारडे जड होऊ लागले,  त्यामुळे डेंग हळूहळू परत  सत्ताकेंद्राजवळ आले आणि नेहमीच माओच्या आसपास  राहिले. 
        
पुढे 1969 मध्ये सांस्कृतिक क्रांतीदरम्यान हे  प्रकरण उकरून काढण्यात आले आणि डेंग यांना त्याची  मोठी किंमत चुकवावी लागली.  चँग कै शेक यांना व कुओमिंगटांगच्या इतर नेत्यांना  कम्युनिस्ट पक्षाच्या वाढत्या प्रभावाची काळजी वाटत  होती;  त्यांनी झिआंझीमधील कम्युनिस्ट सोव्हिएत नष्ट करण्यासाठी मोठ्या तयारीनिशी हल्ल्याची तयारी केली.  यातील पहिल्या चार मोहिमांमध्ये माओच्या सोव्हिएतने  कुओमिंगटांगचे सारे हल्ले परतवून लावले. मात्र शेवटच्या  पाचव्या मोहिमेत कुओमिंगटांगने कम्युनिस्टांचा मोठा  पराभव केला व झिआंझीमधून त्यांना हाकलून दिले. माओ  यांनी या पराभवानंतर यशस्वी माघार घेत उत्तरेकडे कूच  केले. चीनच्या कम्युनिस्ट क्रांतीमध्ये ही यशस्वी माघार  महत्त्वाचा टप्पा मानली जाते. जवळजवळ एक वर्षाच्या  प्रदीर्घ कालावधीमध्ये माओ आणि त्यांच्या साथीदारांनी  उत्तर शांझीमध्ये नवा तळ उभारला. या लाँग मार्चमध्ये  कम्युनिस्टांचे अतोनात नुकसान झाले. 6000 मैलांचा प्रवास झाला;  86,000 लोक माघारीच्या प्रवासास  निघाले,  त्यापैकी फक्त 10,000 उत्तर शांझी येथे पोहोचले.  उर्वरित सैनिक एक तर युध्दात कामी आले अथवा सोडून  गेले.
         
ऑक्टोबर 1935 मध्ये शांझी येथील कम्युनिस्टांनी  त्यांचे स्वागत केले. या लाँग मार्चदरम्यान डेंग हे झिआंझी  प्रांतांच्या प्रचार विभागाचे प्रमुख असल्याने या काळात  सैन्याचे व पक्षाचे मनोबल टिकून राहण्यासाठी ते  सैनिकांच्या संपर्कात सातत्याने असत आणि त्यांची  माओशीही वारंवार भेट होत असे. लाँग मार्चदरम्यान जानेवारी 1935 मध्ये गिझौ  प्रांतातील झुनयी येथे जी महत्त्वाची बैठक झाली,  त्यात  माओ यांनी कम्युनिस्ट पक्षाचे सैन्यदलच स्वतःच्या  नियंत्रणाखाली आणले. या बैठकीने माओ यांचे चीनच्या कम्युनिस्ट पक्षातील स्थान पक्के केले. डेंग या बैठकीचे  निमंत्रित सदस्य नसले,  तरी या बैठकीची इतिवृत्ते  घेण्यासाठी त्यांची नेमणूक झाली होती आणि म्हणून पुढे  कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासात त्यांची नोंद या बैठकीचे  महासचिव वा सेक्रेटरी जनरल म्हणून घेण्यात आली. लाँग  मार्चच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांत डेंग हे  नियमितपणे ‘रेड स्टार’  नावाचे छोटेखानी पत्रक काढीत.  पुढे-पुढे मोहिमेवर लिखाणाचे व छपाईचे सामान नेणे  अवघड झाल्याने व सायक्लोस्टाईल मशीन नसल्याने डेंग यांचे सारे कम्युनिकेशन तोंडी होऊ लागले. दरम्यानच्या  काळात जपानने 1931 मध्ये हल्ला करून मांचुरिया गिळंकृत  केला होता. 
        
पुढे 1937 मध्ये तर जपानने चीनवर  मांचुरियामधून हल्ले सुरू केले. मांचुरियामधून जपानी हल्ले  सुरू झाल्याने कुओमिंगटांगपेक्षाही जपानी सैन्य हाच  कम्युनिस्टांचा मुख्य शत्रू  झाला.  याच वेळी अशी एक घटना घडली की,  त्यामुळे  चीनमधील साम्यवादी चळवळीला नवी ऊर्जा मिळाली.  डिसेंबर 1936 मध्ये कुओमिंगटांगचे प्रादेशिक सेनानी झांग  झ्युलोंग यांच्या शिपायांनी चक्क कुओमिंगटांगचे प्रमुख चँग कै शेक यांचेच अपहरण करून त्यांना कैदेत ठेवले. त्यांना  सोडविण्यासाठी कम्युनिस्टांची मदत आवश्यक होती.  किंबहुना,  मांचुरियामधून होणाऱ्या जपानच्या मोठ्या  मोहिमेविरुध्द लढता यावे म्हणून कम्युनिस्ट पक्षाबरोबर  आघाडी करावी,  यासाठीच हे अपहरणनाट्य रचण्यात  आले होते. त्यामुळे कुओमिंगटांगने परत एकदा कम्युनिस्ट  पक्षाशी हातमिळवणी केली व जपानी सैन्याशी लढाई सुरू  ठेवली. कम्युनिस्टांवरील कुओमिंगटांगचा दबाव नाहीसा  होताच कम्युनिस्टांनी 1937 मध्ये उत्तर शांझीमधील  यानानमध्ये आपला तळ अधिक व्यापक केला. तिथे डेंग  प्रसिध्दी व प्रचार विभागाचे प्रमुख होते. भाषणे,  लेख,  वार्तापत्रे व बुलेटिन्स याव्यतिरिक्त संगीत,  कला व नाटक  यांचाही उपयोग त्यांनी प्रचारासाठी केला. एकंदरीतच प्रसिध्द व प्रचार या तंत्राचा कार्यक्षमतेने वापर प्रत्यक्ष  केलेला असल्याने कम्युनिकेशन व प्रचार या क्षेत्रात ते  अतिशय वाकबगार झाले.  याच वेळी जपानी सैन्य उत्तरेकडून,  मांचुरियाकडून  चीनमध्ये येऊन अनेक शहरांचा ताबा घेत होते.
      
मोठ्या  ग्रामीण भागात कम्युनिस्टांचे प्राबल्य,  तर शहरे जपानकडे- अशी परिस्थिती होती. त्यामुळे सारा उत्तर चीन लढाया व  सशस्त्र संघर्ष यांनी पेटून उठला. उत्तरेकडून चढाई करीत  येणाऱ्या व आधुनिक प्रगत युध्दयंत्र अवगत केलेल्या जपानी  सैन्याला रोखण्यासाठी कुओमिंगटांग व कम्युनिस्ट हे एकत्र  आले खरे,  मात्र हे सहकार्य तात्पुरत्या स्वरूपाचे होते.  परस्परांविषयीच्या संशयामुळे परिस्थिती तणावपूर्वच होती. दोन्ही पक्षांच्या एकत्रित सेनादलाला आठवे सैन्यदल (8th Route Army) असे संबोधिले जात असे. या आठव्या  सैन्यदलाचे मुख्यालय कम्युनिस्टांच्या मुख्य तळावर शांझी  पठारावर होते. तिेथे सैन्यासाठी अन्न व इतर रसदपुरवठा  करणे शक्य होते,  तसेच जपानी सैन्याचे तळही उत्तरेला  जवळ असल्याने त्यांच्यावरही अधूनमधून गनिमी काव्याने  हल्ले चढविणे शक्य होते. माओने 1937 मध्ये आठव्या सैन्यदलाचे कार्यक्षम प्रमुख अधिकारी लिऊ बोचेंग यांना  चढाईसाठी प्रसिध्द असलेल्या 129 व्या डिव्हिजनचे प्रमुख  म्हणून धाडले. शिवाय या डिव्हिजनमध्ये पक्षाच्या वतीने  डेंग यांची नेमणूक केली. 
       
सर्वसाधारणपणे सैन्यदलाच्या  जनरलला पक्षाच्या प्रथम सचिवपदी व पक्षाच्या बिगर लष्करी अधिकाऱ्याला दुय्यम सचिवपदी नेमले जात असे.  माओ यांनी या प्रथेत बदल करून डेंग यांना सैन्यदलातील  पक्षाचे पहिले सचिव म्हणून नेमले आणि बोचेंग यांना  पक्षाचे दुय्यम सचिवपद दिले. पक्षाच्या प्रमुखाला  सैन्यदलातील मोहिमेवर पाठविताना ‘पोलिटिकल  कॉमिसार’  असे संबोधित असत. कॉमिसारचे काम म्हणजे  सैन्यदलाच्या तयारीनुसार स्थानिक राजकीय निर्णय घेणे, लष्कराने व्यापलेल्या प्रदेशाची आर्थिक-राजकीय व  प्रशासकीय घडी बसविणे आणि सैन्यदलात व सैन्यदलाने  व्यापलेल्या प्रदेशात राजकीय प्रचार व प्रसिध्दी यांची धुरा  वाहणे. डेंग झिओपेंग व लिऊ बोचेंग यांनी परस्परांना उत्तम सहकार्य करून या डिव्हिजनमार्फत अनेक जिल्ह्यांमध्ये  कम्युनिस्ट राजवट स्थापन केली.
        
1937 ते 1945 या आठ  वर्षांत जपानी सैन्याला त्यांनी उत्तमरीत्या रोखले;  1945  नंतर जपानी सैन्याचे आव्हान संपुष्टात आल्यावर नागरी  युध्दात कुओमिंगटांगच्या सैन्यदलाबरोबर त्यांनी उत्तम लढत दिली. लिऊ बोचेंग व डेंग यांची जोडी इतकी प्रसिध्द झाली की,  त्यांना संयुक्तरीत्या लिऊ डेंग या नावाने संबोधित असत.  गंमत अशी की,  लिऊ बोचेंग यांच्यापेक्षा डेंग हे अधिक  कणखर म्हणून ओळखले जात. लिऊ बोचेंग सैन्यप्रमुख  असूनही सैन्यदलातील जवानांबाबत थोडे मवाळपणे वागत  असत. हेरगिरी वा अशा प्रकरणी जवानांना कडक शिक्षा  देताना लिऊ बोचेंग थोडे भावनिक व संवेदनशील होत. मात्र  डेंग शिस्तीच्या बाबतीत अतिशय कडक व काटेकोरपणे  वागत. 1937 ते 1945 या काळात जपानी सैन्याशी गनिमी काव्याने लढताना या दोघांनी सैन्यदलाचा तळ पूर्व  शांझीमधील टाईहँग पर्वतरांगेमध्ये सतत फिरता ठेवला  होता.  डेंग यांना टार्इंहँग पर्वतरांगेतील त्यांच्या तळावरील,  आजूबाजूच्या परिसराकडे आणि तेथील स्थानिक जनतेचे  प्रशासन,  राजकारण व अर्थव्यवस्था यांच्याकडे जातीने  लक्ष द्यावे लागे. तेथील नागरिकांसाठी व सैन्यदलासाठी  पुरेशा अन्नधान्याची तरतूद करणे,  प्रदेशातील छोट्या- मोठ्या उद्योगांसाठी आवश्यक कच्च्या मालाची तरतूद  करणे इत्यादी जबाबदाऱ्याही त्यांच्याकडे होत्या.
        
स्थानिक  कर प्रशासनही त्यांच्याकडे होते. त्यात त्यांनी काही  महत्त्वाचे बदलही केले. विविध करांचे दर वाजवी तर  असले पाहिजेतच,  याशिवाय कर आकारताना  अलीकडच्या काळातील सरासरी उत्पादन लक्षात घ्यावे  याबाबत ते दक्ष असत.  यानान येथे 1939 मध्ये आले असताना त्यांची ओळख झुओ लिन या अतिशय हुशार मुलीबरोबर झाली आणि  त्यांनी 35 व्या वर्षी तिसरे लग्न केले. तिचे वडील उद्योजक  व व्यापारी होते,  ही त्यांची तिसरी मुलगी. ज्या काळात  चीनमध्ये मुली अजिबात शिकत नसत,  त्या काळात तिने व  तिच्या दोन्ही बहिणींनी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण  घेतले होते. या तिन्ही बहिणी विद्यापीठात शिकत  असतानाच कम्युनिस्ट चळवळीकडे ओढल्या गेल्या  होत्या. झुओ लिन यांना तर बीजिंग विद्यापीठात  पदार्थविज्ञान शाखेत प्रवेश मिळाला होता. (पुढे उच्च  शिक्षण झाल्यानंतर त्या बीजिंग विद्यापीठात पदार्थ- विज्ञानाच्या प्राध्यापक झाल्या.) डेंग यांच्या साधेपणाने  संपन्न झालेल्या विवाहास यानान येथील कम्युनिस्ट  चळवळीतील महत्त्वाची मंडळी होती;  त्यात स्वतः माओ  झेडुंग, लिऊ शाओची व ली फुकन हेही होते. डेंग व झुओ  लिन यांचे लग्न शेवटपर्यंत टिकले. त्यांना एकूण पाच अपत्ये. लिन,  नाम व राँग या तीन मुली आणि पुफांग व  झिफांग ही दोन मुले. 
    
डेंग यांचा त्यांच्या मुलांवर फार जीव  होता. मुलगी राँग डेंग हिने तर पुढे वडिलांचे चरित्रही  लिहिले. दुसऱ्या महायुध्दानंतर जपानचे सैन्य चीनमधून माघारी  फिरले. त्यानंतर चीनमध्ये जे यादवी युध्द झाले, त्यात  कम्युनिस्टांच्या सैन्याला कुओमिंगटांगबरोबर कडवी झुंज  द्यावी लागली. तोपर्यंत कम्युनिस्टांचा प्रभाव अनेक  राज्यांमध्ये होता,  ती राज्ये कम्युनिस्ट पक्षाच्या  आधिपत्याखाली आली. चीनमधील उत्तर सीमेवरील ज्या  प्रदेशाला जीन,  जू,  लुयू म्हटले जाते,  त्या प्रदेशात एकूण  चार प्रांतांचा (हेबेई, शांझी,, शॅनडाँग, व हेनान) समावेश  होता. कम्युनिस्ट पक्षाने या चारही प्रांतांत घट्ट पाय रोवले  होते. या प्रदेशात कम्युनिस्ट पक्षात डेंग हे सर्वांत वरिष्ठ नेते  म्हणून ओळखले जात. दुसऱ्या महायुध्दानंतर मुख्य सामना कुओमिंगटांगबरोबर असल्याने त्या मोठ्या चढाईसाठी  आपल्या सैन्यदलाला डेंग चढाईचे प्रशिक्षण देत असत,  प्रोत्साहित करीत असत. ही जबाबदारी पेलवतील अशा  सहकाऱ्यांच्या नेतृत्वाच्या शोधात डेंग असत. या काळातच  झाओ झियांग व वॅन ली हे दोन उत्तम संघटक डेंग यांना  मिळाले. (पुढे 1978 मध्ये हाती सत्ता आल्यानंतर डेंग  यांच्या आर्थिक व प्रशासकीय सुधारणांच्या कामात या  दोघांची खूप मदत झाली.) 
      
माओ यांनी लिऊ बोचेंग व डेंग  यांच्या सैन्यदलाला 1946 मध्ये नैर्ऋत्य चीन व मध्य चीन  येथील डाबी पर्वतच्या टोकाकडील पठाराकडे कूच  करण्याचे आदेश दिले. कुओमिंगटांग सैन्याची उत्तरेकडे व  वायव्य चीनकडे मोठी जमवाजमव सुरू असल्याने आणि  कम्युनिस्ट पक्षाच्या उत्तरेकडील प्रांतामधील अस्तित्वास  धोका निर्माण झाल्याने कुओमिंगटांगच्या काही सैन्यदलाला  दक्षिणेकडे गुंतवून ठेवण्यासाठी केलेली ही एक खेळी होती.  शिवाय चीनमधील युध्दाचा इतिहास असे दर्शवितो की,  सैन्यदलाच्या मदतीने संपूर्ण चीन देशावर नियंत्रण  आणण्यासाठी ज्या-ज्या लढाया झाल्या,  त्यात अखेरच्या  लढाया व सामने हे मध्य चीनच्या सपाट प्रदेशांमध्ये झाले.  म्हणून मध्य चीनमध्ये कम्युनिस्टांची खडी फौज असणे  आवश्यक होते. लिऊ व डेंग यांची सेना अशा रीतीने  दक्षिणेकडे निघाली;  मात्र पुरेशी रसद,  शस्त्रास्त्रे, युध्द सामग्री  व गरम कपडे यांच्या अभावामुळे दक्षिणेकडे सरकताना  अनेक सैनिक कामास आले,  थंडी व पुरेशा अन्यधान्याच्या  अभावी दक्षिणेकडे पोहोचू शकले नाहीत. तरीही अशा  परिस्थितीत सैन्याने मध्य चीनमध्ये आपला तळ उभारला.  
        
नागरी युध्दामध्ये शेवटच्या हुआई है या निर्णायक यु  मोहिमेसाठी मध्य चीनमधील सैन्यदलाला याचा मोठा  उपयोग झाला.  नोव्हेंबर 1948 ते जानेवारी 1949 पर्यंत चाललेली  हुआइ है ही युध्द मोहिम लष्करी इतिहासातील महत्त्वाची  समजली जाते. कुओमिंगटांगचे 6 लाख सैन्य व 5 लाख  कम्युनिस्ट सैन्य यांच्यातील हा मोठा संघर्ष होता.  कम्युनिस्टांनी सैन्यदलाला अन्न,  सामग्री व रसद  पुरविण्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन केले होते. याशिवाय  घोडे,  बैल इत्यादी भारवाहक प्राण्यांचीही जमवाजमव केली  होती. या युध्दात माओने आपल्या जनरल्सना चँग कै  शेकच्या सैन्यदलातील जनरलपेक्षाही जास्त (स्थानिक व दैनंदिन निर्णय घेण्याचे) अधिकार दिले होते. त्यामुळेच  कुओमिंगटांगच्या सैन्याचा पराभव होऊ शकला. विशेष  म्हणजे,  या मोहिमेत डेंग यांच्याकडे सेनेचे नेतृत्व होते. या  मोहिमेपासून कम्युनिस्ट पक्षाचा युध्दावर वरचष्मा राहिला.  डेंग यांच्याबाबत या मोहिमेत अनेक वादग्रस्त प्रसंग घडले.  लिऊ बोचेंग सैन्याची खूप काळजी घेत असत. बचावासाठी  पुरेसे खंदक खोदल्यशिवाय,  पुरेसे बंकर्स तयार  केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नसत. डेंग मात्र फारशी  काळजी न करता सैनिकांचा जीव धोक्यात घालीत असत,  असा अनेकांचा आक्षेप होता. तरीही शेवटी कम्युनिस्ट  सैन्याने कुओमिंगटांगचा पराभव केला. त्यानंतर यांगत्झी  नदी पार करून कम्युनिस्ट सैन्याने दक्षिणेकडे व पश्चिमेकडे  त्वरेने कूच करून सारा देश पादाक्रांत केला. 
      
पुढे 1984  मध्ये जपानच्या पंतप्रधानांनी डेंग यांना ‘तुमच्या  आयुष्यातील सगळ्यात यशस्वी व आनंदी प्रसंग कोणता?’  असे विचारले असता,  डेंग यांनी ‘तीन वर्षांचा नागरी  युध्दाचा व दक्षिणेकडील हुआई है मोहिमेतील यांगत्झी नदी  पार करण्याच्या कामगिरीचा’ असे उत्तर दिले होते. सैन्य  जसजसे पुढे जाऊन शहरे व प्रदेश काबीज करीत व  कुओमिंगटांगचा स्थानिक विरोध मोडून काढीत,  तसतसे  कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य स्थानिक प्रशासनाचा ताबा घेत  असत आणि तेथील प्रशासनाची घडी बसवीत असत. या  कार्यात डेंग पुढे असत आणि स्थानिक नेत्यांना व  अधिकाऱ्यांना कम्युनिस्ट पक्षाची व क्रांतीची संकल्पना ते  स्पष्ट करीत;  प्रशासनाची भूमिका व तत्त्वज्ञान समजावून  सांगत. शांघाय शहरावर ताबा मिळविण्यासाठी त्यांनी  स्वतः तिथे बराच काळ मुक्काम केला होता. अशा रीतीने डेंग  यांनी प्रत्यक्ष युध्द व नंतर पोलिटिकल कॉमिसार या दोन्ही  भूमिका उत्तमपणे पार पाडल्या.  कम्युनिस्टांनी ईशान्य चीनचा ताबा 1947 मध्ये घेतला.  त्यानंतर संबंध देशावर ताबा मिळविण्यासाठी त्यांना दोन  वर्षे लागली. या दोन वर्षांत डेंग यांनी नव्या चीनची  प्रशासकीय घडी बसविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या  दोन वर्षांत चीनमधील एकूण सहा विविध प्रदेश कम्युनिस्ट  पक्षाने आपल्या नियंत्रणाखाली आणले. त्यांच्या प्रशासनासाठी प्रत्येक प्रदेशाला स्वतंत्र ब्युरो किंवा  प्रशासकीय केंद्र निर्माण करण्यात आले. सहाही प्रदेशांचा कारभार स्वतंत्रपणे या सहा ब्युरोंमधून 1952 पर्यंत चालत  असे. दरम्यानच्या काळात कम्युनिस्ट पक्षाने बीजिंग येथे  केंद्र सरकारची स्थापना केली. या साऱ्याच प्रदेशांचे प्रशासन  ब्युरोमार्फत चालविण्यासाठी त्या-त्या प्रदेशातील  कम्युनिस्ट नेत्यांची मदत घेण्यात आली. 
       
नागरी युध्द संपल्यानंतर व शांतता प्रस्थापित झाल्यानंतर  नैर्ऋत्य चीनमधील ब्युरोचे पहिले सचिव म्हणून डेंग यांची  नेमणूक झाली. हा प्रांत व ब्युरो कम्युनिस्टांचा सर्वांत  शेवटचा प्रांत होता. यातच तिबेटचा समावेश होता. शांतता  काळात प्रशासनाची घडी बसविणे;  शिक्षण,  सांस्कृतिक  कार्य, आर्थिक विकासासाठी व्यापार,  उद्योग व शेती  इत्यादींना चालना देणे;  कम्युनिस्ट पक्षासाठी सदस्य-नेते यांची निवड करणे- अशी अनेक कामे डेंग करू लागले.  तेथील ग्रामीण भाग प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा  होता,  कारण कुओमिंगटांगचे सैन्य माघार घेत या प्रदेशात  आले होते. तिथून काही शरण आले,  काही पळून गेले व  काही चक्क तेथील स्थानिक जनतेत मिसळून गेले. काहींनी  कम्युनिस्टांना विरोध सुरू ठेवला. सगळ्यात शेवटी  नियंत्रणाखाली येणारा प्रांत म्हणजे तिबेट. तिबेटची सेना  अगदीच कमकुवत असल्याने तिबेट लवकरच  नियंत्रणाखाली आला. डेंग यांना माहीत होते की,  प्रशासकीय व्यवस्था अधिक कार्यक्षम होण्यासाठी निष्णात  व चांगले कार्येकर्ते व अधिकारी पक्षात हवे. कुओमिंगटांग  पक्षातील कार्यकर्ते,  सैनिक व अनेक अधिकाऱ्यांना डेंग  यांनी आपल्या पक्षात व प्रशासनात सामावून घेतले आणि प्रशासनव्यवस्था कार्यक्षम केली. सतत भाषणे देऊन व लेख लिहून डेंग यांनी कम्युनिस्ट पक्षाची ध्येय-धोरणे सामान्य  माणसांपर्यंत नेली,  मोठ्या प्रमाणावर जमीन सुधारणा केल्या  आणि मोठ्या जमीनदारांच्या जमिनींचे वाटप प्रत्यक्ष  कष्टकरी जनतेला केले. याशिवाय चोंगकिंग आणि चेंगडू यादरम्यानची रेल्वेबांधणी सुरू करून 1952 मध्ये त्यांनी  ती पूर्णही केली.  लाँग मार्चपासून सातत्याने मिळणारे यश,  गाठीशी प्रचंड  अनुभव,  माओशी असणारी जवळीक आणि मोठी अंगभूत  कार्यक्षमता पाहता केंद्र शासनातील मोठ्या पदासाठी त्यांचा  विचार न होता,  तरच नवल! आणि मग 1952 मध्ये डेंग हे  बीजिंगला केंद्र शासनात उपपंतप्रधान म्हणून गेले. 

Tags: रुजिन झाओ झियांग वॅन ली चीन कम्युनिस्ट क्रांती युध्द rujina jhao jhiyang vyan li chin kamyunist kranti yuodhh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात