डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

रशियामधील एक वर्षाच्या सैद्धांतिक शिक्षणाने डेंग यांची कम्युनिस्ट विचारांची बैठक पक्की झाली. मार्क्स-एंगल्स-लेनिन यांचे विचार,  हिस्टॉरिकल मटिरिॲलिझम, कम्युनिस्ट पक्षाचा  इतिहास, चीनमधील क्रांतीचा इतिहास इत्यादी अनेक विषयांचा त्यांनी अभ्यास केला. त्यांना आणखी एक महत्त्वाची बाब रशियात पाहावयास मिळाली. रशियन अर्थव्यवस्थेत त्या वेळी न्यू  इकॉनॉमिक पॉलिसी धोरणांतर्गत छोटे शेतकरी, दुकानदार,  व्यापारी व मोठे उद्योग यांना बाजारप्रणित अर्थव्यवस्थेप्रमाणे अर्थार्जन करण्यास मर्यादित स्वातंत्र्य दिलेले होते.  कम्युनिझमच्या आधिपत्याखाली मर्यादित  बाजारप्रणित अर्थव्यवस्था कार्यक्षमतेने काम करू  शकते,  हे त्यांचे त्या वेळचे निरीक्षण महत्त्वाचे  होते. त्यांनी 1978 मध्ये हाती सत्ता आल्यानंतर त्याच धर्तीवर अर्थव्यवस्था खुली करून तिला  मर्यादित बाजारप्रणित व्यवस्थेकडे नेले आणि चीनच्या आर्थिक विकासाचा पाया रचला.

भारत व चीन हे दोन्ही देश आर्थिक विकासाच्या  दृष्टिकोनातून 1978 पर्यंत समान मागासलेले होते. मात्र  आज 40 वर्षांनंतर निर्यात व्यापार,  औद्योगिकीकरण,   पायाभूत सुविधा,  कारखानदारी,  विज्ञान,  तंत्रज्ञान,  संशोधन  व उद्यमशीलता या सर्व बाबतीत चीनने मोठी आघाडी  घेतली आहे. चीनचे राष्ट्रीय उत्पादन भारताच्या पाचपट  असून,  जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिकेखालोखाल दोन  नंबरची मोठी अर्थव्यवस्था म्हणून चीनचा लौकिक आहे.  या आधुनिक चिनी महासत्तेचे जनकत्व बऱ्याच अंशी डेंग  झिओपेंग यांच्याकडे जाते. डेंग झिओपेंग यांनी हे सारे कसे  साध्य केले,  याबद्दलचे फार मोठे कुतूहल जगभर आहे.  अनेक पाश्चात्त्य अभ्यासकांनी अलीकडे डेंग यांच्या  व्यक्तिमत्त्वाचा,   त्यांच्या ध्येय-धोरणांचा वेध घेण्याचा  आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख काढण्याचा प्रयत्न केला  आहे.  जेमतेम 4 फूट 11 इंच उंची असणारे डेंग झिओपेंग  शारीरिक दृष्ट्या छोटेखानीच! मात्र प्रत्येक गोष्ट समजून-उमजून व काळजीपूर्वक बोलणारे डेंग हे एक अतिशय  भारदस्त व्यक्तिमत्त्व होते. एखाद्या बैठकीत व समुदायात ते  आपले महत्त्वाचे स्थान चटकन निर्माण करीत. त्यामुळे  कोठेही गेले की,  लोक त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देत.  बोलताना ते सरळ समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांत पाहून  बोलत असत. 
           
आयुष्यात तरुणपणापासून विविध प्रकारचे (युध्दापासून ते परराष्ट्रधोरण ठरविण्यापर्यंतचे) अनुभव घेतलेले डेंग हे कोणत्याही बाबतीत सरळ मुद्यावर येत. ते अतिशय प्रॅक्टिकल होते. उगीचच सैद्धांतिक बाबतीत  गुरफटून राहत नसत. कार्यक्षमता,  उत्स्फूर्तपणा,  काटेकोर  विचार या साऱ्यांचा संगम त्यांच्यात होता. सहकाऱ्यांकडून  झालेल्या चुकांबाबत ते फारसे ताणून धरत नसत. हाती  असलेला प्रश्न व त्याची सोडवणूक त्यांना महत्त्वाची वाटे.  क्रांतिकाळात,  युद्धाच्या ऐन धकाधकीच्या काळात तसेच  भूमिगत चळवळीमध्ये काम केले असल्याने डेंग हे कधी लिहिण्याच्या फंदात फारसे पडले नाहीत. या वैशिष्ट्यपूर्ण  पार्श्वभूमीमुळे असेल,  पण त्यांची स्मरणशक्ती तीव्र होती.  एक तासापर्यंतचे पूर्ण भाषण ते संथ लयीमध्ये,  मुद्देसूदपणे,  कोणतेही टिपण जवळ न घेता देऊ शकत.  
                     
डेंग हे कम्युनिस्ट विचारसरणीतले असले तरी,  लहानपणी ते चिनी परंपरेत वाढले असल्याने कन्फ्युशियन पारंपरिक संस्कृतीचा खोल ठसा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर  होता. त्यामुळे ते व्यवहारीही होते. आंतरराष्ट्रीय व्यवहारात  व चर्चेत ते चीनच्या हितसंबंधांबाबत स्पष्टपणे बोलत. मात्र  हे सारे व्यवहाराला धरून असल्याने परदेशातील अनेक  राजकीय नेते,  मुत्सदी व राष्ट्रप्रमुख यांच्याशी त्यांचे  व्यक्तिगत पातळीवर उत्तम संबंध राहिले. ते उत्तम ब्रिज  खेळत असत. उजव्या कानाने ते बऱ्यापैकी अधू होते.  सिचुआन प्रांतातील चिनी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण  ‘सिचुआन’  ढंगात ते बोलत असत. कम्युनिस्ट पक्ष व चीनवर त्यांचे अतोनात प्रेम होते. 
            
डेंग यांची राहणी साधी होती. लहान वयापासून  चळवळीत ओढले गेल्यामुळे त्यांचे औपचारिक शिक्षण  फारच कमी झाले होते. उच्च शिक्षणाच्या संधीपासून वंचित  राहिलेल्या डेंग यांना उच्च शिक्षण,  संशोधन व विद्यापीठे  यांच्याबद्दल विशेष आस्था होती. विशेषत: विज्ञान व  तंत्रज्ञान याबाबत त्यांना प्रेम होते. त्यांची पत्नी विद्यापीठात  पदार्थविज्ञानाची प्राध्यापक होती. पुढे सत्ता हाती  आल्यानंतर त्यांनी शैक्षणिक सुधारणा व विद्यापीठात  गुणवत्तेची जोपासना करण्यासाठी अग्रक्रम दिला. ते चिनी लष्कराशी आयुष्यभर संबंधित राहिले. पीपल्स लिबरेशन  आर्मीचे ते कॉमिसार होते. म्हणजे कोणताही प्रदेश लष्कराने जिंकून घेतला की,  लष्कराच्या साह्याने त्या प्रदेशाचे नागरी  प्रशासन चालविणे,  हे त्यांचे प्रमुख काम असे. याबद्दलचा  त्यांचा अनुभव मोठा असल्याने पुढे ते सेन्ट्रल मिलिटरी  कमिशन (सीएमसी) चे सदस्य व नंतर 1978 पासून  शेवटपर्यंत (1993)  अध्यक्ष राहिले.  
    
राजकीय सहमती निर्माण करून निर्णय घेणे,  पुढे जाणे हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यामुळे आर्थिक उदारीकरण व आर्थिक  सुधारणा याबद्दल महत्त्वाची धोरणे त्यांनी अतिशय  कुशलतेने आपल्या सहकाऱ्यांकडून मान्य करून घेतली.  मात्र यावरून ते उदारमतवादी व लोकशाही विचारांचे होते,  असा निष्कर्ष काढणे चुकीचे होईल. किंबहुना,  माओंच्या  1958 ते 1962 दरम्यानच्या ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’  या कार्यक्रमात व पुढेही ते अनेकदा कठोरपणे वागले. केवळ  माओंच्या सांगण्यावरून त्यांनी चीनमधील लाखो बुध्दिमंत  आणि विचारवंतांना तुरुंगात डांबले,  अनेकांना देशोधडीस लावले. त्यांनी 1978 ते 1993 पर्यंतच्या काळात  अर्थव्यवस्था खुली केली व आर्थिक सुधारणा केल्या,   हे खरे;  मात्र त्याच वेळी त्यांनी कोणत्याही राजकीय सुधारणा  करण्याचे नाकारले. बुध्दिमंत व विचारवंत यांचा उपयोग  राष्ट्रबांधणीत करून घ्यायचा;  मात्र त्यांना मर्यादित स्वातंत्र्य  द्यायचे,  प्रसंगी त्यांना कठोरपणे वागवायचे- ही त्यांची  पद्धत होती. म्हणूनच चीनमधील बुद्धिमंत व विचारवंत,  डेंग  हे हुकूमशाही प्रवृत्तीचे आहेत,  असे शेवटपर्यंत म्हणत.  त्यांचा क्रांतीतील आणि युद्धातील सहभाग,  साहसी जीवन, त्यांच्या आयुष्यात आलेले अनेक चढ-उतार,  त्यांची  भटकंती यामुळे त्यांचे चरित्र ढंगदार झाले,  हे खरे! मात्र,  या  साऱ्यांचा त्यांच्या राजकीय वाटचालीवर आणि पुढील  आयुष्यातील राजकीय व आर्थिक धोरण आखणीवर  परिणाम झाला असल्याने त्यांचे चरित्रविषयक तपशील  समजावून घेणे महत्त्वाचे आहे. 
      
डेंग झिओपिंग यांचा जन्म 1904 मध्ये चीनमधील  सिचुआन प्रांतातील ग्वांगान जिल्ह्यात पैफांग या गावात एका  छोट्या जमीनदार कुटुंबात झाला. लहानपणापासून अतिशय  बुध्दिमान व तरतरीत असलेले डेंग हे पुढे एखाद्या चांगल्या  सरकारी नोकरीत जातील,  असे त्यांच्या कुटुंबीयांना वाटत  होते. चीनमध्ये 1911 मध्ये झालेल्या राष्ट्रवादी उठावात,  मोडकळीस आलेले चिंग (मांचू) घराण्याचे साम्राज्य  संपुष्टात आले आणि त्याजागी सन येत सेन व त्यांच्या  सहकाऱ्यांच्या क्रांती मोर्चाने चिनी प्रजासत्ताक स्थापन केले.  पूर्वीच्या काळी नागरी सेवांसाठीच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी  उमेदवारांना कन्फ्युशियन पद्धतीचे शिक्षण घ्यावे लागे.  यामध्ये विविध प्रकारची पाठांतरे,  चीनमधील परंपरांचा व  इतिहासाचा अभ्यास,  चिनी नीतिशास्त्र व जुन्या चिनी  भाषेचा अभ्यास इत्यादींचा समावेश असे. क्रांती मोर्चाचे  प्रजासत्ताक अस्तित्वात येत असले,  तरी नवी शाळापध्दती  अजून सुरू व्हायची होती. त्यामुळे डेंग यांना पाचव्या वर्षापासून कन्फ्युशियन पध्दतीच्या शिक्षणक्रमासाठी पैफँग  येथेच एका जवळच्या नातेवाईकाच्या घरी ठेवण्यात आले.  याच वर्षी 1919 मध्ये डेंग यांना वयाच्या 15 व्या वर्षी राजकीय चळवळीत भाग घेण्याची संधी मिळाली. 
           
पहिल्या  महायुध्दाच्या समाप्तीनंतर फ्रान्स येथे झालेल्या व्हर्सायच्या  तहामध्ये पाश्चिमात्य राजकीय नेत्यांनी जर्मन  आधिपत्याखालील उत्तर-पूर्व चीनमधील डहरपवेपस  प्रांताचा पूर्व भाग हा चीनकडे सुपूर्द न करता जपानकडे   देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बीजिंग विद्यापीठ व  नानजिंग विद्यापीठ येथील संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी 4 मे  1919 रोजी पाश्चिमात्य देशांच्या व चिनी सरकारच्या  विरोधात जोरदार निदर्शने केली. ही बातमी चीनमधील इतर  विद्यापीठांत व शैक्षणिक संस्थांमध्ये वणव्यासारखी  झपाट्याने पसरली. ग्वांगान हे देशातील मोठ्या शहरांशी  व्यवस्थित जोडले असल्याने तेथेही विद्यार्थ्यांनी निदर्शने  केली. ही निदर्शने डेंग यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी  महत्त्वाची होती. कारण या निदर्शनांमुळेच अगदी तरुण  वयात आपल्या देशावर इतर राष्ट्रांनी केलेल्या अन्यायाविरुध्द  लढण्याची प्रेरणा त्यांच्यात निर्माण झाली.  
         
मांचू साम्राज्याचा अंत झालेला असल्याने व तरुणांसाठी  सरकारी नोकऱ्यांची दारे बंद झाली असल्याने त्यांचे वडील  डेंग वेनमिंग हे तरुण डेंग झिओपेंगसाठी इतरत्र काही संधी  मिळते का याचा शोध घेत होते. अशीच एक संधी म्हणजे,  फ्रान्समध्ये चिनी कामगार तरुणांसाठीची ‘कमवा आणि शिका’  ही योजना. पहिल्या महायुद्धात अनेक फ्रेंच तरुण  युध्दावर गेले असल्याने फ्रान्समध्ये चीनमधील तरुणांना वाव  होता. या योजनेनुसार चिनी तरुण फ्रान्सला शिकण्यासाठी दर वर्षी जात. हे विद्यार्थी तेथे काम करीत,  थोडी फार कमाई  करीत व फावल्या वेळात विद्यापीठात शिक्षण घेत असत.  सिचुआन प्रांतातील फ्रान्समध्ये शिक्षण घेतलेल्या एका  श्रीमंत व्यापाऱ्याने फ्रान्समध्ये एक शिष्यवृत्ती योजना सुरू  केली होती. या शिष्यवृत्तीसाठीची परीक्षा डेंग झिओपेंग  यांनी चोकिंग येथे दिली. अशा रीतीने 16 वर्षांचा तरुण डेंग  झिओपेंग 1920 मध्ये इतर 84 विद्यार्थ्यांसह फ्रान्सला  रवाना झाला. शांघायमध्ये एका आठवड्याच्या मुक्कामात  स्वत:च्याच देशात पाश्चिमात्य गोऱ्या व जपानी लोकांकडून स्थानिक कष्टाळू चिनी लोकांना किती वाईट वागविले जात  होते,  हेही त्याने पाहिले. पुढे शांघायहून हाँगकाँग,  व्हिएतनाम,  सिंगापूर, कोलंबो या मार्गाने डेंग शेवटी  फ्रान्समध्ये मार्सेल्स येथे येऊन पोहोचले. दरम्यान साऱ्याल  बंदरांमध्ये चिनी व आशियाई कामगारांना कसे वागविले  जात होते,  हे पाहणे हा त्यांच्यासाठी नुसताच एक दुख:द  अनुभव नव्हता;  पुढे आयुष्यभर गरिबी व अन्यायाविरुध्द  लढण्याची प्रेरणा देणाऱ्या या घटना होत्या. 
        
चीन व फ्रान्स यांच्या सहकार्याने 1919 ते 1921 या  दरम्यान एकूण 1600 चिनी विद्यार्थी फ्रान्समध्ये आले. मात्र  महायुध्द संपल्यानंतर युरोपियन देशांची अर्थव्यवस्था  तणावाखाली आली होती आणि युद्धावर गेलेले कामगारही  परत आले. त्यामुळे तिथे नोकऱ्या कमी झाल्या. शिवाय  सिचुआन प्रांतातील व्यापाऱ्यांचे फाउंडेशनही- ज्यांच्या  शिष्यवृत्तीवर डेंग फ्रान्सला आले- तीन चार महिन्यांत  अडचणीत आले. त्यांनी शिष्यवृत्तीची योजनाच बंद केली.  काही काळानंतर डेंग यांना पॅरिसजवळील श्नायडर अँड साय  या फ्रान्समधील सगळ्यात मोठ्या शस्त्रास्त्र कारखान्यात  मजुराची नोकरी कशीबशी मिळाली.  रशियन राज्यक्रांतीला 1920 मध्ये तीन वर्षे होऊन गेली  होती. या क्रांतीचे प्रतिध्वनी फ्रान्समधील डाव्या व  समाजवादी बुध्दिमंतांमार्फत या तरुण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत  होते. भांडवलशाही, साम्राज्यवाद व वसाहतवाद या  संकल्पनांची ओळखही डेंग व त्यांच्या सहकाऱ्यांना होत  होती. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1921 मध्ये  करण्यात आली. त्यामुळे 1922 मध्ये फ्रान्समधील अनेक चिनी विद्यार्थ्यांनीही स्थानिक युवक कम्युनिस्ट पक्षाची  स्थापना केली. पुढे ही संघटना (Chinese Communist Youth League in France) चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला  संलग्न करण्यात आली. 
                
फेब्रुवारी 1923 मध्ये डेंग यांनी  ‘युरोपियन यंग कम्युनिस्ट काँग्रेस’मध्ये कम्युनिस्ट पक्षाचा  प्रतिनिधी म्हणून भाग घेतला. अशा रीतीने अवघ्या 19 व्या  वर्षी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य म्हणून ते राजकीय  चळवळीत ओढले गेले आणि आयुष्यभर कम्युनिस्ट पक्षाचे  सदस्य म्हणून राहिले. पॅरिसच्या या युथ कम्युनिस्ट लीगचे  सचिव म्हणून झाऊ एन लाय यांची नेमणूक झाली होती,  ते  पुढे चीनचे पंतप्रधान झाले. डेंग यांचे सारे राजकीय शिक्षण झाऊ एन लाय यांच्या देखरेखीखाली झाले. अनेक अर्थाने ते डेंग यांचे गुरू होते. 
         
श्नायडर फॅक्टरीतील कष्टाचे काम सोडून जवळच्या  छोट्या गावात बूट तयार करण्याच्या कारखान्यात डेंग नोकरीला लागले. तेही काम सोडून त्यांनी स्थानिक कॉलेजमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला, परंतु आर्थिक  अडचणींमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. मग ते परत  पक्षाकडे वळले व पक्षाचेच काम करू लागले. त्याचबरोबर  त्यांनी पॅरिसमधील ‘युरोपियन कम्युनिस्ट ऑर्गनायझेशन’चे  काम करणे सुरू केले. झाऊ एन लाय यांच्या हाताखाली  काम करताना ते ‘रेड लाईट’ या नावाचे एक दहापानी  मासिक चालवीत. डेंग यांचे अक्षर सुंदर असल्याने या  मासिकाचे लिखाण,  स्टेन्सिल कट करणे,  संपादन करणे  इत्यादी सर्व कामे त्यांच्याकडे दिली जात. झाऊ एन लाय हे  डेंगपेक्षा सहा वर्षांनी मोठे होते. शिवाय,  फ्रान्समध्ये त्यांचे  शिक्षण झालेले असल्याने फ्रान्समधील इतर कम्युनिस्ट  नेत्यांशी संपर्क ठेवणे,  पक्षाची व चळवळीची स्ट्रॅटेजी  ठरविणे,  इतर पक्षांचे व नेत्यांचे सहकार्य मिळविणे- ही सारी  कामे ते स्वत: करीत. त्यांच्या हाताखाली काम करताना डेंग  यांना बरेच काही शिकावयास मिळाले. फ्रान्समधील ही  पाच वर्षे डेंग यांच्या भावी राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने  महत्त्वाची ठरली. सैध्दांतिक मार्क्सवादाचा अभ्यास,  प्रत्यक्ष  चळवळ उभारणे,  क्रांतीसाठी संघटन करणे, यामुळे तरुण  वयातच मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता त्यांच्यात  विकसित झाली. फ्रान्समधील ल्यॉन प्रांतातील मुख्य  संघटक म्हणून त्यांची 1925 मध्ये नेमणूक झाली. अनेक  चळवळी व निदर्शने यात भाग घेतल्याने ते उत्तम भाषण देत. याशिवाय पाश्चिमात्य विचार, त्या विचारांतील खुलेपणा, भांडवलशाहीतील विविध प्रेरणा यांचीही ओळख त्यांना  येथे झाली. 
            
जगभरातील कम्युनिस्ट पक्षांची व त्यांच्या  देशातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक,  सामाजिक,  राजकीय  वातावरणात होत असलेली वाटचाल आणि त्यातील  वैविध्य या साऱ्यांची जाण व समज डेंग यांना या काळात येत  होती. झाऊ एन लाय,  डेंग व कम्युनिस्ट पक्षातील फ्रान्स/ युरोपमध्ये राहिलेले इतर सारे नेते राजकीय विचाराबाबत  आणि प्रत्यक्ष राजकारणाबाबत बरेच वास्तववादी व  झीरसारींळल होते. त्या काळात फ्रान्समध्ये राहिलेल्या व  कम्युनिस्ट चळवळीत वाढलेल्या इतर अनेक चिनी नेत्यांनी  पुढे चीनमध्ये उत्तम काम केले. डेंग यांनी 1978 मध्ये सत्ता  हाती आल्यानंतर वास्तववादी भूमिका घेऊन अर्थव्यवस्था  खुली केली आणि भांडवलशाहीतील अनेक संकल्पना  आत्मसात केल्या. त्या साऱ्यांच्या मागे फ्रान्समधील त्यांचे वास्तव्य व अनुभव महत्त्वाचा होता.  
      
कम्युनिस्ट चळवळीतील सहभागामुळे फ्रेंच पोलीस  खात्यांची वक्रदृष्टी डेंग यांच्याकडे वळली आणि त्यांना  केव्हाही अटक होईल,  अशी परिस्थिती निर्माण झाली. दि. 7 जानेवारी 1926 रोजी पोलिसांचा ससेमिरा चुकवून डेंग  रेल्वेने जर्मनीमार्गे रशियाकडे रवाना झाले. तेथे ते मॉस्कोमधील सन येत सेन विद्यापीठात कम्युनिस्ट पक्षाच्या शिक्षणासाठी दाखल झाले. विद्यापीठातील 300  विद्यार्थ्यांचे एकूण 13 ग्रुप्स करण्यात आले. त्यापैकी  थिअरी ग्रुपचे ते प्रमुख झाले. या ग्रुपमधील सदस्यांना पुढे  मोठ्या राजकीय जबाबदाऱ्या देण्यात येत. एकंदरीत सन येत  सेन विद्यापीठातही डेंग यांनी त्यांची छाप पाडली. ते पुढे चीनमध्ये महत्त्वाच्या राजकीय पदावर जातील,  असेच सर्वांना वाटत होते. मॉस्कोमधील सन येत सन विद्यापीठात  डेंग यांचा अभ्यासक्रम दोन वर्षांचा होता.  
       
दरम्यानच्या काळात 1919 मध्ये चीनमध्ये सन येत सेन  यांनी कुओमिंगटांग या पक्षाची स्थापना केली होती. मांचू  साम्राज्य 1911 मध्ये कोसळल्यानंतर प्रचंड गोंधळ निर्माण  झाला होता. त्याची जागा घेणारे प्रजासात्तकही एकसंध  नव्हते. स्थानिक सरदार व लष्करी अधिकारी (वॉर लॉर्ड्स) हेच अनेक ठिकाणी सत्ता राबवीत. त्यांच्यावर नियंत्रण  नसल्याने केंद्र सरकार व प्रजासत्ताक दुबळे होते. चीनमध्ये रशियाच्या आशीर्वादाने कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1921  मध्ये झाली आणि त्यांनीही राजकीय सत्ता हस्तगत  करण्यासाठी चळवळ सुरू केली. सन येत सेन यांचे निधन  1925 मध्ये झाले आणि चँग कै शेक हे कुओमिंगटांग नेते  झाले. सुरुवातीला कुओमिंगटांगच्या छत्राखाली चँग कै  शेक यांचा उजवा पक्ष कम्युनिस्ट पक्ष हे चिनी प्रजासत्ताकवर  नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक सेनानी व वॉर लॉर्ड्सबरोबर संयुक्तपणे लढत होते. आता या आघाडीतून बाहेर पडावे,  असा निर्णय कम्युनिस्ट पक्षाने 1927 मध्ये घेतला. अशी  व्यूहरचना करण्यास मदत व्हावी म्हणून कॉमिंटर्नने सन येत  सेन विद्यापीठातील डेंग व त्यांच्या वीस तरुण साथीदारांना  तातडीने चीनमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला. अशा रीतीने  एप्रिल 1927 मध्ये आपले शिक्षण अर्धवट सोडून चीनमध्ये  परतले.
    
रशियामधील एक वर्षाच्या सैध्दांतिक शिक्षणाने डेंग  यांची कम्युनिस्ट विचारांची बैठक पक्की झाली. मार्क्स- एंगल्स-लेनिन यांचे विचार,  हिस्टॉरिकल मटिरिॲलिझम,  कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास,  चीनमधील क्रांतीचा इतिहास  इत्यादी अनेक विषयांचा त्यांनी अभ्यास केला. त्यांना  आणखी एक महत्त्वाची बाब रशियात पाहावयास मिळाली.  रशियन अर्थव्यवस्थेत त्या वेळी न्यू इकॉनॉमिक पॉलिसी  धोरणांतर्गत छोटे शेतकरी,  दुकानदार,  व्यापारी व काही मोठे  उद्योग यांना बाजारप्रणित अर्थव्यवस्थेप्रमाणे अर्थार्जन करण्यास मर्यादित स्वातंत्र्य दिलेले होते. कम्युनिझमच्या  आधिपत्याखाली मर्यादित बाजारप्रणित अर्थव्यवस्था  कार्यक्षमतेने काम करू शकते,  हे डेंग यांचे त्या वेळचे  निरीक्षण महत्त्वाचे होते. त्यांनी 1978 मध्ये हाती सत्ता  आल्यानंतर त्याच धर्तीवर अर्थव्यवस्था खुली करून तिला  हळूहळू मर्यादित बाजारप्रणित व्यवस्थेकडे नेले आणि  चीनच्या आर्थिक विकासाचा पाया रचला. 
   
रशियामधील एक वर्षाच्या वास्तव्यानंतर जानेवारी 1927 मध्ये डेंग चीनला रवाना झाले,  ते सरळ शांझी  प्रांतातील यलो रिव्हर खोऱ्यातील स्थानिक सैन्यदलाचे स्वतंत्र सरदार (वॉर लॉर्ड) फेंग युक्सिअँग यांना त्यांच्या आमंत्रणावरून भेटले. कुओमिंगटांग व कम्युनिस्ट पक्ष  यांच्यातील वाढती दरी पाहता,  डेंग व त्यांच्या पक्षाच्या  सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्या सैन्यदलातील अधिकारी व  जवान यांना युद्धाची/लढ्याची उध्दिष्टे समजावून देऊन  त्यांना उत्तमरीत्या लढण्यास प्रोत्साहित करता येईल का हे  पाहणे,  हा भेटीचा उद्देश होता. मात्र कम्युनिस्ट पक्षाचा  कमकुवतपणा,  बेताची तयारी व अपुरी युध्दसामग्री पाहता,  फेंग युक्सिअँग यांनी कुओमिंगटांगशी जुळते घेण्याचा विचार केला. त्यांनी डेंग व त्याच्या साथीदारांना परत पाठवून दिले.  पक्षाच्या आदेशाप्रमाणे डेंग शांघायला आले आणि तिथे  कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिगत चळवळीत दाखल झाले. कुओमिंगटांग व कम्युनिस्ट यांची आघाडी तुटल्यानंतर कुओमिंगटांगकडून अनेक ठिकाणी कम्युनिस्ट नेत्यांची  सरसकट हत्या करण्यात आली. त्यामुळे अनेक कम्युनिस्ट नेते भूमिगत झाले. भूमिगत चळवळीत काम करताना डेंग  यांच्या कार्यपध्दतीत कमालीचा फरक झाला. मागे कोठेही  पुरावा ठेवायचा नाही,  अगदी कागदाचा कपटाही नाही;  त्यामुळे सारे तपशील ते थेट डोक्यात ठेवीत.  
    
मॉस्कोमध्ये सन येत सन विद्यापीठात शिकत असताना डेंग यांच्याबरोबर झँग झियुआन ही तरुण सहाध्यायी होती. तिच्याशी त्यांचे स्नेहबंध जुळले होते. चीनमध्ये परतल्यानंतर त्यांची तिच्याशी परत एकदा वुहान येथे  पक्षकार्याच्या निमित्ताने भेट झाली व त्यांनी लग्न करायचे  ठरविले. लग्नानंतर डेंग पती-पत्नी शांघायला आले. 
        
दि.7 ऑगस्ट 1927 रोजी वुहान येथे 21 वरिष्ठ  कम्युनिस्ट पक्षनेत्यांची महत्त्वाची बैठक झाली आणि त्या  बैठकीची इतिवृत्ते व टिपणे घेण्याचे काम डेंग यांच्याकडे  देण्यात आले. याच बैठकीत शांत, गंभीर व छोटेखानी डेंग  यांची पहिलीच भेट उंच व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या व  कमालीचा आत्मविश्वास असलेल्या तरुण माओ झेडुंग  यांच्याशी झाली. कम्युनिस्ट पक्षातील अतिशय वरिष्ठ नेत्यांमध्ये अशा रीतीने डेंग यांची उठबस सुरू झाली.  त्यांच्या कामामुळे,  प्रामाणिकपणामुळे सर्वांवरच त्यांची  छाप पडली. पक्षाने 1929 मध्ये त्यांना शांघायहून ग्वांझी  प्रांताच्या पश्चिमेकडील ग्वान्ग्क्षी या मागासलेल्या प्रांतात प्रतिनिधी म्हणून पाठविले. गुओमिंगडाँगबरोबर कम्युनिस्ट  पक्षाची असणारी भागीदारी संपुष्टात आल्यानंतर चिनी  कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीने कॉमिंटर्नच्या  निर्देशानुसार छोट्या-छोट्या शहरांमध्ये/शहरी भागांमध्ये  कम्युनिस्ट नेत्यांना पाठवून विविध प्रकारे क्रांतिकारी उठाव करण्याचे निश्चित केले. या धोरणाचा भाग म्हणून डेंग यांना  ग्वांझी येथे पाठविण्यात आले. तेथे चँग कै शेक यांच्या  कुओमिंगटांगमधून बाहेर पडलेले स्थानिक सरदार व लढाऊ  टोळ्या यांच्याबरोबर तात्पुरती राजकीय आघाडी करण्यात  डेंग यांना यश आले. अशा रीतीने त्यांनी  Baise आणि  Longzhou येथे कम्युनिझमचा झेंडा रोवला. 
            
कम्युनिस्ट  पक्षाच्या इतिहासात अशा घटनांची नोंद साम्यवादी क्रांती वा क्रांतिकारी उठाव अशी झाली असली,  तरी प्रत्यक्षात अनेक  ठिकाणी बलशाली नेते मोहिमेवर गेल्याने निर्माण झालेल्या  पोकळीत करण्यात आलेल्या या तात्पुरत्या स्थानिक  तडजोडी होत्या. मोहिमेवरून नेते परत आले की,  कम्युनिस्टांना पळ काढावा लागे. अशा रीतीने ग्वांझीमधील  छोट्या स्थानिक नेत्यांबरोबर/मिलिटरी अधिकाऱ्यांबरोबर  केलेल्या तडजोडी लवकरच संपुष्टात आल्या. तेथील सैन्यदलाचे बडे स्थानिक नेते चँग कै शेकबरोबर संपूर्ण  चीनवर नियंत्रण मिळविण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून  उत्तरेकडे कुओमिंटोंगच्या सेनेबरोबर स्वारीवर गेले होते. ते  ग्वांझीला परतताच चित्र पूर्ण पालटले. या मोठ्या नेत्यांकडे  अधिक संख्येने सैन्यदल व शस्त्रास्त्रे असल्याने त्यांनी परत  येताच दरम्यानच्या काळात झालेल्या व्यवस्था नुसत्याच  मोडीत काढल्या नाहीत;  तर अशा तडजोडी करून  कम्युनिस्ट पक्षाबरोबर हातमिळवणी करणाऱ्या  सैन्यदलातील अधिकाऱ्यांना कठोर शासन केले,  कम्युनिस्ट  नेत्यांची कत्तल केली आणि कम्युनिस्टांच्या सशस्त्र दलांची  मोठी हानी केली.
          
डेंग यांच्या Baise आणि  Longzhou  येथील सातव्या  रेड आर्मीचा नुसताच पराभव झाला नाही,  तर त्या सैन्याची  मोठी हानी होऊन सैन्याला स्थानिक झुआंग (Zhuang)  टोळ्यांच्या मदतीने उत्तरेकडे माघार घ्यावी लागली. अशाच  एका माघारीच्या लढाईत सातव्या रेड आर्मीबरोबर असलेले  डेंग आपल्या सैन्यदलापासून मागे पडले व त्यांचा  सैन्यदलाशी संपर्क पूर्णपणे तुटला. पदरी पराभव व मानहानी  आल्याने अत्यंत अपमानास्पद परिस्थितीत ते शांघायला  परतले. शांघायला परत आल्यानंतर त्यांनी पक्षाला आत्म- निभर्त्सना (Self-Criticism) सादर करून स्वत:च्या  चुकांची कबुली दिली. सातव्या रेड आर्मीनेच आपणास शांघायला परत जाण्यास सांगितले, अशी भूमिका त्यांनी  घेतली;  तरीही सातव्या रेड आर्मीला सोडून शांघायला  परतायला नको होते,  याची कबुलीही त्यांनी दिली.  हे प्रकरण येथे मिटले खरे. पण पुढे सांस्कृतिक क्रांतीच्या  दरम्यान त्यांच्या विरोधकांनी हे प्रकरण उकरून काढले  आणि त्यांना पक्षातील व सरकारमधील महत्त्वाची पदे  गमवावी लागून बराच काळ सत्तेबाहेर राहावे लागले. 

Tags: कॉमिसार डेंग चिनी महासत्तेचा उदय डेंग deng commissar deng weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात