डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सांस्कृतिक धक्का कधीही बसला नाही...

आमच्या एका चर्चेदरम्यान मनोज व सुरेश या तमिळनाडूच्या मुलांना मोहम्मद रफी आणि किशोरकुमार यांसारख्या भारतातल्या लोकप्रिय गायकांविषयी मी विचारले. त्या दोघांनाही या गायकांविषयी काहीही माहिती नव्हती आणि नेपाळी असून मला ती होती. भारताच्या वैविध्यतेचा आणि विसाव्या शतकात दक्षिण भारतात झालेल्या भाषाविषयक चळवळीचा हा परिणाम होता.  

मला असे ठामपणे वाटते की, विद्यापीठांमध्ये जाड्या- भरड्या पुस्तकांतील मजकूर तर शिकवला पाहिजेच; पण त्याचबरोबर तिथे मुलांना नैतिकता, मैत्री आणि वैविध्यता जपण्याचेही प्रशिक्षण मिळायला हवे. विद्यापीठांमध्ये मुलांना त्यांच्या आयुष्याला उपयोगी ठरतील अशी कौशल्ये (life skills) सुद्धा द्यायला हवीत, ज्यामुळे पुढील आयुष्य अधिक सुखकर आणि सहजपणे जगता येईल. मला वाटते- कोणत्याही विद्यापीठाचे गुणवत्ताविषयक मूल्यमापन या चौकटीत करायला हवे. पूर्वीच्या अकबर हॉटेलमध्ये असणाऱ्या सार्क युनिव्हर्सिटीमधील दोन वर्षांमुळे एक माणूस म्हणून माझी निश्चितच वाढ झाली. 

इथले ॲकॅडमिक आयुष्य, विविध सांस्कृतिक-धार्मिक-राष्ट्रीय पोर्शभूमीच्या मुलांशी झालेले बरे-वाईट वाद-संवाद आणि एका खऱ्याखुऱ्या दक्षिण आशियाई समूहात जगण्याचा अनुभव आयुष्यभर जपून ठेवावा असाच आहे. माझ्यासाठी आणि तिथे शिकणाऱ्या माझ्यासारख्याच इतर अनेकांसाठी सार्क युनिव्हर्सिटीतला अनुभव दोन कारणांमुळे विलक्षण होता. त्यांपैकी पहिले कारण म्हणजे विविधता. एकच कॅम्पस आणि किचन आठ देशांतील मुले शेअर करीत होते! आणि दुसरे कारण म्हणजे, दक्षिण आशियाई अस्मितेची तिच्या बऱ्या व वाईट अशा दोन्ही प्रकारांतील खरीखुरी ओळख. 

माझे पदवीपर्यंतचे शिक्षण नेपाळमध्ये झालेले असल्याने, ही विविधता आणि हा प्रादेशिकतेचा अनुभव माझ्यासाठी अद्वितीय होता. सार्क युनिव्हर्सिटीतले पहिले सहा महिने मला नवा अभ्यासक्रम आणि आजूबाजूची वैविध्यता यांच्याशी जुळवून घेणे फारच कठीण गेले. मी पदवीसाठीचे शिक्षण ‘पर्यटन व्यवस्थापन’ या विषयातून घेतलेले असल्याने International Relations (IR) या विद्याशाखेशी माझा अजिबातच परिचय नव्हता. 

खरे सांगायचे तर, मी IR शिकण्याचा निर्णय दोन कारणांमुळे घेतला होता. International Relations या शब्दाला येणारा ‘ग्लॅमरस’ फील हे पहिले कारण. म्हणजे, निळ्या नंबरप्लेटच्या (डिप्लोमॅटिक स्टेटस्‌वाल्या) गाड्यांचे स्वप्न सार्क युनिव्हर्सिटीत येण्यापूर्वी मला अनेकदा पडायचे! दुसरे कारण, ‘प्रेसिडेंट स्कॉलरशिप’ या नावाने मिळणाऱ्या स्कॉलरशिपसाठी माझी निवड झाली होती. परंतु कोर्स जॉईन केल्यानंतर मात्र एक भारतीय व एक अफगाण असे दोन अनोळखी रूममेट वाट्याला येणे आणि अभ्यासाचा ताण यामुळे मी फारच अस्वस्थ होतो. मी हे कधीही जाहीरपणे व्यक्त केले नाही, पण आता सांगतो- मी माझ्या अफगाण रूममेटबरोबर पूर्ण दोन वर्षे अनकम्फर्टेबल होतो. कदाचित सांस्कृतिक- धार्मिक आणि भाषिक वेगळेपणामुळे असे झाले असावे. मला सुरुवातीच्या दिवसांत फारच कमी मित्र होते आणि त्यामुळे माझा बराचसा वेळ लॅपटॉपवर सिनेमे पाहणे, वाचन करणे किंवा झोपणे यातच जात असे. 

घरी परत जाण्याचे विचारही सतत मनात घोळत असत. त्यामुळेच पहिले तीनचार महिने तर माझी मुख्य बॅगही कायम भरून ठेवलेली असायची. घरी परत गेलो तर भोगाव्या लागणाऱ्या अपमानाच्या भीतीमुळे मी पहिल्या सेमिस्टरपुरता कसाबसा तग धरला. परंतु दिल्लीत राहूनसुद्धा भारतीय संस्कृतीशी असणारी ओळख आणि भारतीय सीमेचे माझ्या घरापासूनचे सान्निध्य, यामुळे मला अकबर भवनच्या बाहेर कधीही सांस्कृतिक धक्का बसला नाही. वर्गमित्र आणि होस्टेलमधील इतर मुले यांच्याशी मैत्री होण्यास सुरुवात झाल्यामुळे दुसऱ्या सेमिस्टरमध्ये मला नवी उमेद जाणवू लागली. काही हुशार आणि मेहनती मित्रांशी रात्री उशिरापर्यंत इतिहास, राजकारण, संस्कृती आणि भविष्यातल्या योजना यांविषयी चर्चा होत असत. त्यामुळे मला व्यापक जगाविषयी अधिक जाणून घ्यायची स्फूर्ती मिळाली. 

त्याच वेळी मनोज, सुरेश, नवीन, संकल्प, शिशिर, श्लोक, मिझान, अपु, शुवो, शरीफ, कृतिका या वर्गमित्रांशी आणि माझा रूममेट करण व इतर अनेकांशी माझी फारच जवळची (अगदी भावासारखी) मैत्री झाली. मला याची खात्री आहे की, येत्या काळात ही मैत्री अधिकच दृढ होत जाईल आणि आयुष्यभर टिकेल. विविध देशांबद्दल मुलांशी होणाऱ्या चर्चांमुळे त्या-त्या देशांच्या संस्कृतीराजकारण आणि देशातल्या समस्यांविषयी ‘फर्स्टहँड ’ माहिती मिळू शकली, जी इतर स्रोतांद्वारे क्वचितच उपलब्ध होते. आठ देशांच्या उत्तमोत्तम मुलांशी झालेली मैत्री आणि त्या-त्या देशांबाबतचे ‘फर्स्टहँड’ ज्ञान हे माझे सार्क युनिव्हर्सिटीमधून मिळालेले सर्वांत महत्त्वाचे ‘ॲसेट्‌स’ आहेत. 

आमच्या एका चर्चेदरम्यान मनोज व सुरेश या तमिळनाडूच्या मुलांना मोहम्मद रफी आणि किशोरकुमार यांसारख्या भारतातल्या लोकप्रिय गायकांविषयी मी विचारले. त्या दोघांनाही या गायकांविषयी काहीही माहिती नव्हती आणि नेपाळी असून मला ती होती. भारताच्या वैविध्यतेचा आणि विसाव्या शतकात दक्षिण भारतात झालेल्या भाषाविषयक चळवळीचा हा परिणाम होता. नंतर त्यांनी मला सांगितले की- लता मंगेशकर, अमिताभ बच्चन आणि सध्याचे काही कलाकार यांविषयी मात्र त्यांना माहिती आहे. (ही दोन्ही मुले आता भारतीय प्रशासनाच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत.) 

मला श्रीलंकेतील अंतर्गत संघर्षाविषयी तमिळ आणि सिंहली अशा दोन्ही बाजू त्यात्या समूहाच्या मुलांकडून समजून घेता आल्या. तीच गोष्ट अफगाणिस्तानातील युद्धांविषयी सांगता येईल. मला नाही वाटत, वर नमूद केलेली माहिती इतर स्रोतांकडून इतक्या सहजपणे मिळू शकली असती. मित्रा-मित्रांमधील चर्चा काही फक्त वर उल्लेखलेल्या विषयांपुरत्याच मर्यादित नव्हत्या. विद्यापीठातील प्रशासकीय ‘लूपहोल्स’, ॲकॅडमिक स्वातंत्र्य आणि नैतिकता, विद्यापीठाचे भवितव्य वगैरे अनेक मुद्दे चर्चेत येत असत. प्रशासकीय आडमुठेपणा आणि काही व्यक्तींचे उद्धट वर्तन यांविषयी आमच्यापैकी बहुतेक जण असमाधानी होते. प्रशासनातली महत्त्वाची पदे भूषवणारी काही माणसे पुरेशी क्वालिफाईड नव्हती, बेजबाबदारही होती. परंतु फॅकल्टी असिस्टंट मात्र मित्रांसारखेच वागायचे, त्यामुळे इथले आयुष्य सुकर होऊ शकले. 

विद्यापीठात उत्तम ते निराशाजनक या सर्वच कॅटेगरीतले शिक्षक होते. बहुतेक नव्या विद्यापीठात कमी-अधिक फरकाने अशीच परिस्थिती असते. मात्र ॲकॅडमिक एथिक्सविषयी मिळालेल्या ज्ञानाबद्दल मी सार्क युनिव्हर्सिटीचा कायम ऋणी राहीन. मला हे पण सांगायला हवे की, येथील होस्टेल हे उत्तम होस्टेल्सपैकी एक आहे. संगणक कक्ष, रीडिंग रूम, इंटरनेट यांसारख्या सुविधा आहेत. लायब्ररीही चांगली असून, तिच्यात पुस्तकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बहुतेक मुले युनिव्हर्सिटीच्या उज्ज्वल भविष्याविषयी आशावादी आहेत. मात्र त्यासाठी इथले काही प्रश्न सुटणे फार आवश्यक आहेत. उदा. पाकिस्तानी आणि  बांगलादेशी मुलांचे व्हिसाविषयक प्रश्न जबाबदार यंत्रणांच्या ताळमेळामधून सुटायला हवेत. तसेच आठही देशांतील चांगले विद्यार्थी आकर्षित करण्यासाठी काही खास योजना राबवण्याची गरज आहे. 

माजी विद्यार्थी या नात्याने माझ्यावर सार्क विद्यापीठाची इमेज सुधारण्याची जबाबदारी आहे. त्याशिवाय, काही ठोस पावले उचलून ही संस्था उच्च दर्जाचे संशोधन करणारी आणि ॲकॅडमिक गुणवत्ता जोपासणारी बनायला हवी. बाहेरच्या जगाचा अनुभव येण्यासाठी इंटर्नशिप्स आणि प्लेसमेंटच्या सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. विविध राष्ट्रीय-प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य करून, सार्क युनिव्हर्सिटीतील मुलांना तिथे इंटर्नशिप्स देता येतील. इतर देशांतील काही विद्यापीठांशी सहकार्य करून सार्क युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना, (थोड्या काळासाठी का होईना) तिथे पाठवता येईल. अशा सहकार्यामुळे विविध विद्यापीठांची ॲकॅडमिक कॅलेंडर्स साधारणतः सारखी होतील, त्याचा मुलांना फायदाच होईल. याशिवाय मला वाटते, सार्क संघटनेच्या सकारात्मक वाटचालीसाठीही सार्क युनिव्हर्सिटी इनपुट्‌स देऊ शकेल. 

सार्क युनिव्हर्सिटीला आपली इमेज उंचावण्यासाठी आणि उत्तम विद्यार्थी मिळवण्यासाठी आपल्या माजी विद्यार्थ्यांचा वापर करता येईल.  संस्थेच्या प्रगतीसाठी आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे, संस्थेकडे असणारे इन्फ्रास्ट्रक्चर. मला अशी आशा आहे की, येत्या पाच-सहा वर्षांत सार्क विद्यापीठाला स्वतःचा असा कॅम्पस असेल. कॅम्पससारख्या वातावरणाचा आणि वेळ घालवण्यासाठी-मनोरंजनासाठी- अकबर भवनमध्ये असणारा सुविधांचा अभाव, माझ्यासकट सर्वांनाच जाणवत असे. जरी सार्क युनिव्हर्सिटी आता फार ग्रेट वाटत नसली तरी तिची सतत वाढ होत आहे. विविध देशांत तिचा प्रभाव हळूहळू जाणवू लागला आहे आणि इथून बाहेर पडलेले विद्यार्थी त्यांच्या-त्यांच्या देशांत चांगले काम करीत आहेत. ही सकारात्मक चिन्हे आहेत. भविष्यात याच दिशेने वाटचाल करीत सार्क युनिव्हर्सिटी उत्तम प्रकारे विकसित होईल, असा मला विेशास वाटतो.

डंबरने सार्क युनिव्हर्सिटीतून International Relationa मध्ये एम.ए. (२०१२-१४) केले असून, तो सध्या काठमांडू शहरातील नॅशनल कॉलेजात शिकवत आहे.

 

Tags: नेपाळ डंबर भट्टा संस्कृती अकबर भवन सांस्कृतिक धक्का कधीही बसला नाही culture nepal bhatta damber sanskrutik dhakka kadhi basala nahi akbar bhavan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके