डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वेगवेगळ्या तत्कालीन धर्मसत्तांनी तसेच राजसत्तांनी त्यांना सोईचे ठरेल अशा रीतीने बायबलमध्ये त्या-त्या वेळेस बरेच फेरफार केलेले आहेत. त्यामुळे अशा बायबलमधील दगड-गोटे काढून येशू ख्रिस्ताने सांगितलेली शिकवणुकीची रत्ने टॉलस्टॉयने वेगळी करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘गॉस्पेल इन ब्रीफ’ या पुस्तकात टॉलस्टॉय यांनी बायबललाच केंद्रस्थानी ठेवले आहे आणि येशूची खरी शिकवण काय आहे, ती सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही शिकवण वेगळी काढत असताना येशूने केलेले चमत्कार व इतर काल्पनिक गोष्टी त्यांनी वगळलेल्या आहेत. येशूची मूळ शिकवणूकच किती प्रभावी आहे, ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

प्रत्येक युवकाच्या मनात अनेक प्रश्न असतात, बरेच गोंधळ असतात. स्वत:विषयी, स्वत:च्या धर्माविषयी; स्थानिक प्रश्नांविषयी आणि देशपातळीवरील ते जागतिक रंगमंचावरील राजकारणाविषयी त्याला बरीच उत्तरे हवी असतात. पूर्वजांकडून किंवा सध्याच्या नेत्यांकडून ज्या काही घटना घडल्या आहेत, त्या तशा का घडल्या? का घडत आहेत? अशा प्रकारचे प्रश्न. तो युवक कधी डाव्या विचारसरणीचा असतो, तर कधी उजव्या बाजूला झुकलेला असतो; बहुतांश वेळेला त्याला लिबरलही व्हायचं असतं. वेगवेगळ्या विचारसरणींत तो हरवलेला असतो. माझेही काहीसे असेच झाले होते. मीही मनातून बराचसा अस्वस्थ होतो. कधी धर्माविषयी चर्चा करावीशी वाटायची, तर कधी विज्ञानाविषयी. कधी इतिहासात जावेसे वाटायचे, तर कधी भविष्यातील समाजक्षेत्राकडे. कधी नातेसंबंध, लैंगिकता यावर प्रश्न विचारावेसे वाटायचे; तर कधी तत्त्वज्ञानाची बरीच माहिती हवी असायची. सगळ्या प्रश्नांची खरीखरी उत्तरे हवी असायची.

पण एवढा व्यासंग एकाच व्यक्तीकडे असणे हे काहीसं अशक्य होतं. सुदैवाने डिसोझासर यांचा या सर्व विषयांचा व्यासंग होता. त्यांना जे-जे काही प्रश्न विचारू, त्या-त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न ते करीत असत. सिल्व्हेस्टर डिसोझा हे त्यांच्या घरापासून जवळंच असलेल्या ‘हॉली साक्रामेंट हायस्कूल’ या मराठी माध्यमाच्या शाळेत विज्ञानाचे शिक्षक होते. त्यामुळे परिसरात सर्व जण त्यांना ‘डिसोझासर’ म्हणूनच ओळखतात. मंडळापासूनही फक्त पाच मिनिटे अंतरावर त्यांचे घर आहे. ते समाजविकास मंडळात गेली कित्येक वर्षे कार्य करीत आहेत, हे मला माहीत होतं; परंतु त्यांची खरी ओळख विवेकमंचाच्या निमित्ताने मला झाली. त्यांचे वाचन अफाट होते. विज्ञान, राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य, धर्म या आणि अशा विविध विषयांवर त्याचं भरपूर वाचन होतं आणि तेवढंच दीर्घ चिंतन. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात वेगळीच खोली जाणवायची. प्रत्येक मुद्यावर ते विविध अंगाने, वस्तुनिष्ठपणे, पूर्वग्रह न ठेवता प्रकाशझोत टाकू शकायचे. त्यांचे ज्ञान अफाट होते; तरीही ‘सगळे काही मला माहीत आहे’ असा अहंपणाचा दर्प त्यांच्या चेहऱ्यावर कधीच दिसला नाही. उलट, अजूनही आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे, हीच नम्र वृत्ती त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसली. किंबहुना, याचसाठी असेल- स्वत:ला उत्तम शिक्षक मानण्यापेक्षा ते  एक चिरकाल शिकण्याची उत्सुकता असलेला एक विद्यार्थी मानायचे.

नेहमी साधा सफेद व फिक्कट रंगाचा सदरा घालणारे आणि वयाच्या सत्तरीतही आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ते नॅनो-टेक्नॉलॉजी यावरील सर्व अपडेटवर इंटरनेट-पुस्तकाच्या माध्यमातून बारीक नजर ठेवून असणारे, सतत नव्या विचारांचे स्वागत करणारे डिसोझासर म्हणजे ‘साधी राहणी-उच्च विचारसरणी’चे मूर्तिमंत उदाहरण होते. तसेच हळूहळू अस्तंगत होत चाललेल्या समाजवादी विचारसरणीच्या पिढीचेही ते प्रतिनिधी होते. मी जेव्हा प्रथम विवेकमंचाच्या सभेला येऊ लागलो, तेव्हा मला या चर्चेचं आकर्षण वाटायला लागलं. विज्ञान, राजकारण, इतिहास यासंबंधित विषयांचे विविध पैलू ह्या चर्चेद्वारे माझ्या ज्ञानात भर टाकत होते. जेव्हा जेव्हा चर्चेसाठी धर्म हा विषय यायचा, तेव्हा जे विविध मुद्दे मांडले जायचे, त्यामध्ये डिसोझासर आणि ॲड.अनुप खूप जास्त वेळ बोलायचे. त्यांचा या बाबतीत खूपच जास्त अभ्यास होता, जास्त चिंतन होते.

अनेकदा ‘लोक कसे एका अर्थाने चर्चची किंवा for that matter मंदिर किंवा मस्जिदची गुलामगिरी करीत आहेत’ किंवा ‘धर्म कसा मानवजातीला अपायकारक आहे’ असे मुद्दे समोर यायचे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, अशी चर्चा म्हणजे माझ्यासाठी एक धक्काच असायचा. असे विचार कितीही वेगळे असले, तरी पचवण्यास जड जायचे. जे धर्म वाईट आहेत ते सर्व इतरांचेच, माझा धर्म कसा चांगला आहे- अशाच सर्वसाधारण विचारसरणीचा मी होतो. ‘हे दोघे धर्माच्या द्वेषातून तर धर्मविरोधी बोलत नाहीत ना?’ अशा संशयाच्या कोनातूनही मी सुरुवातीला कधी कधी त्यांच्याकडे पाहायचो.

मी चर्चमध्ये जायचो ते फक्त काही ठराविक बाबींसाठी. एक म्हणजे, socializing. आपल्या समाजातील लोकांना एकत्रितरीत्या भेटण्यास मिळणे हे एक प्रमुख कारण असायचं. दुसरं कारण म्हणजे, चर्चमधील काही विधी. जसे- चर्चकॉयरचं चांगलं सुमधुर संगीत ऐकणे व त्यात भाग घेणे. ख्रिस्तशरीर प्रसाद स्वीकारणे. मला ती चव आवडायची. आणि सर्वांत जास्त आवडणारा आणखी एक विधी म्हणजे, एकमेकांचे हात हातात घेऊन ‘शांती देणे’. शांती देण्याचा विधी काहीसा आपल्याला नम्र बनवितो. भले चर्चमध्ये त्या दिवशी आपल्या बाजूला जो बसलेला असेल तो तुमच्यापेक्षा खूपच यशस्वी असेल किंवा तुमच्यापेक्षा तो खूपच अशिक्षित किंवा गरीब असेल; परंतु आपण सर्व जण समाजाचा एक भाग आहोत, ही जाणीव एकमेकांना शांती अर्पण करताना मनामध्ये यायची.

आणखी एक मुद्दा मला चर्चकडे आकर्षित करायचा तो म्हणजे, चर्चमध्ये फादर जे काही प्रवचन करायचे तो. प्रवचने प्रत्येक वेळी चांगली नसली, तरी कधी कधी नाजूक मनावर योग्य वेळी, योग्य शब्द- मग ते कितीही cliché असोत- हलकी फुंकर घालायचे. बस्स. या व्यतिरिक्त चर्चमधील ‘पवित्र आत्मा’ म्हणजे काय; ‘पवित्रत्रैक्य’, नंतर ते ‘पुनरुत्थान’, ‘प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त अर्पण करणे’ हे मला कधी समजलेच नाही. तसेच बाकीच्या ज्या काही डझनभर प्रार्थना होत्या, त्याही फक्त एक सवयीचा भाग म्हणून मी म्हणत होतो. त्या प्रार्थना काय आहेत, त्यांचा अर्थ काय आहे; तो कधीच मी शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता वा प्रयत्न करावासाही वाटला नव्हता.

धार्मिकतेपेक्षा चर्च ही माझी एक सामाजिक गरज जास्त होती. चर्च ही संस्था फक्त प्रार्थना, व्रतवैकल्ये वगैरे करत बसत नाही; त्याबरोबरच विविध वयोगटांतील लोकांना सामावून घेता येईल अशा विविध संघटना तिथे असतात. लहान मुलांसाठी संडे स्कूल, तरुणांसाठी युवक संघटना, स्त्रियांसाठी संघटना, गरिबांसाठी सेंट विन्सन्ट डी पॉल वगैरे विविध संघटना-ग्रुप्स येथे कार्यरत असतात. चर्चच्या संस्थांचं वैशिष्ट्य म्हणजे भाविक सहज उपलबध होत असल्याने कोणत्याही संघटनेचा कोणताही कार्यक्रम असू द्या- लोकांची गर्दी सहज जमते. तसेच सामान्यातल्या सामान्य माणसांना येथे कोणत्याही संघटनेत काम करता वा सभा अटेंड करता येतात.

मी स्वत: युवक संघटनेत कार्यरत होतो. बऱ्याच गोष्टी शिकलो होतो. तसेच वाचनाची, लिखाणाची आवड असल्याने चर्चचा जो वार्षिक अंक निघत असे, त्याच्या संपादक मंडळावरही होतो. विवेकमंचात आल्यानंतर येथील चर्चेतून चर्चविषयी काही बाबी लक्षात येऊ लागल्या. पहिली बाब म्हणजे, येशू ख्रिस्ताविषयी. येशू ख्रिस्त आणि चर्च या दोन भिन्न गोष्टी आहेत. पण ‘येशू ख्रिस्त म्हणजेच चर्च’ हे समीकरण सामान्य लोकांच्या मनात बिंबविण्यात चर्च यशस्वी ठरले आहे. पण येशू ख्रिस्त म्हणजे चर्च नाही. किंबहुना, येशूची शिकवणूक सध्याच्या चर्चच्या वागणुकीशी अगदी विसंगत आहे. एका बाजूला ‘मूर्तीपूजा करू नका’ असे म्हटले जाते आणि दुसऱ्या बाजूला चर्चने मोठमोठ्या मूर्ती  उभारलेल्या आहेत.

नोव्हेना करणे, तीर्थक्षेत्रांना भेटी देणे या सगळ्या गोष्टी येशूच्या विचारसरणीशी विसंगत आहेत. त्याने नेमके सांगितलेय तरी काय, हे वाचण्यासाठी बायबल उघडावे; तर बायबलची सुरुवात जुना करार या संपूर्ण जुनाट व सनातनी वाटणाऱ्या तसेच मुख्यत्वेकरून ज्यू धर्माविषयी व त्यांच्या चालीरीतींविषयी आहे. जुन्या करारामध्ये जी काही मांडणी आहे, ती इतकी कंटाळवाणी आहे की, चार-पाच पानांतच कंटाळा येतो. तसेच त्यात दिसणारी संस्कृती, भौगोलिक संदर्भही एक भारतीय म्हणून अनोळखी वाटतात. नव्या करारात मात्र येशूबरोबर जे चार शिष्य राहिले होते, त्यांनी लिहिलेली चार पुस्तके आहेत व ती सर्व वाचनीय आहेत. त्यातून येशूविषयी व त्याच्या एकंदरीत शिकवणुकीविषयी बरीच माहिती मिळते. पण त्यानंतरच्या प्रकरणांमध्ये पवित्र आत्मा, विविध संदेष्टे, संत, विविध धर्मगुरूंची पत्रे या सर्व असंबद्ध बाबींमुळे बायबल हे इतके किचकट झाले आहे (वा करून ठेवले आहे) की, सर्वसामान्य ख्रिश्चन लोकांसमोर येशूचे आज खूपच गुंतागुंतीचे चित्र आहे.

अशा या बायबलमधील येशूची खरी शिकवण काय आहे, हे मात्र प्रामाणिकपणे सांगायचे तर- मला चर्चमध्ये न जाणाऱ्या डिसोझासरांकडून कळली! डिसोझासर हेही लहानपणी चर्चच्या शाळेत होते. नित्यनेमाने चर्चला जाणे, चर्चच्या संडे स्कूलला जाणे हे तेही करत होते. साठच्या दशकात चर्चमध्ये लॅटिन भाषेत मिस्सा साजरी होत असे. त्यामुळे त्यांना लॅटिन प्राथर्नाही अवगत होत्या. एका वर्षी शालेय पाठ्यपुस्तकात त्यांना वि.दा. सावरकरांचा ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ हा धडा आला. देव असलाच, तर तो मनुष्य या एकाच प्राण्यात का असेल; तो तर इतर कोणत्याही प्राण्याच्या रूपात असू शकतो. पृथ्वीवर इतरही प्राणी आहेत. इथे फक्त एकटा माणूसच प्राणी नाही. म्हणजे तो देव फक्त माणसांचाच नाही, तर किडे-मुंग्या किंवा त्या अर्थाने इतर सर्व प्राण्यांचाही असला पाहिजे. याचा अर्थ, तो फक्त मनुष्याचा नसून सर्व विश्वाचा देव असला पाहिजे. असे विवेकवादी व पुरोगामी विचार मांडलेल्या त्या धड्याने कुतूहल जागृत असलेल्या विद्यार्थ्याचे लक्ष वेधून न घेतले. तर नवलच!

त्याने त्यावर खूप विचार केला. तेरा-चौदा वर्षांच्या त्या विद्यार्थ्याने सावरकरांचे व इतरही लेखकांचे साहित्य वाचून काढले. मग त्याला अशी जाणीव व्हायला लागली की- आपण चर्चमध्ये जे काही शिकतो, त्याच्या पलीकडे काही तरी आहे. विश्वाची निर्मिती मनुष्याची निर्मिती, यात बायबल जे काही सांगते- विज्ञान जे काही सांगते, यात त्याला विसंगती जाणवली. मग यातील खरे काय मानायचे? एका ठिकाणी डोळे बंद करून विश्वास ठेवायचा आणि दुसरीकडे डोळे उघडे ठेवून विचार करून पुराव्यानिशी, प्रयोगानिशी जे सिद्ध झाले त्याच्यावर विश्वास ठेवायचा. पुढे तरुणपणी ही मनातील प्रक्रिया सुरूच असताना ते बायबलदेखील चिकित्सकपणे वाचायचे. ख्रिस्ताने जे विविध दाखले, बोधकथा सांगितलेल्या आहेत, त्यांचा खरा अर्थ काय?

‘हिंसेला आपण अहिंसेने उत्तर दिलं पाहिजे’ हे येशूचे तत्त्वज्ञान तेव्हा त्या तरुण वयातील डिसोझांना खूपच प्रभावी वाटले. दुर्दैवाने चर्च किंवा चर्चमध्ये जाणारे लोक याच्या अगदी उलट वागत होते. हा दांभिकपणा त्यांना लवकरच दिसला आणि ते चर्चपासून हळूहळू दूर होत गेले; परंतु त्यांचा बायबलचा अभ्यास चालूच राहिला. थोडक्यात, सावरकरांचा विज्ञानवाद आवडला असला तरी त्यांच्या कडव्या धर्मवादाला मात्र सरांनी लांबच ठेवले. कितीही म्हटले तरी धर्माने आपल्या आयुष्याची बरीच अंगे व्यापली आहेत. धर्माचा खूप मोठा पगडा आपल्यावर आहे. त्यामुळे मंचात बहुतांश वेळेला चर्चा जरी एका वेगळ्या विषयावरून सुरू झालेली असली, तरी ती ‘धर्म’ या विषयाभोवतीच फिरत राहायची.

अर्थात, लोकांच्याही मनात खूप प्रश्न होते आणि अशा प्रश्नांची उत्तरे त्यांना चर्चमध्ये किंवा धर्मगुरुंकडून मिळत नव्हती. त्यांच्या मनात गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे विवेकमंचामध्ये जे लोक यायचे ते त्यांच्या मनात जे काही प्रश्न असायचे ते बेधडकपणे चर्चेसाठी मांडायचे. उपस्थित प्रत्येक जण त्या-त्या प्रश्नाला आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. सरांचे उत्तर मात्र दिशा देणारे असायचे. महान जगप्रसिद्ध लेखक ‘टॉलस्टॉय’ यांच्या ‘गॉस्पेल इन ब्रीफ’ या पुस्तकासंदर्भात त्यांनी आम्हाला जी माहिती दिली होती, ती अजूनही लक्षात आहे.

ते पुस्तक एक वेगळा येशू आपल्यासमोर आणते. ‘‘वेगवेगळ्या तत्कालीन धर्मसत्तांनी तसेच राजसत्तांनी त्यांना सोईचे ठरेल अशा रीतीने बायबलमध्ये त्या-त्या वेळेस बरेच फेरफार केलेले आहेत. त्यामुळे अशा बायबलमधील दगड-गोटे काढून येशू ख्रिस्ताने सांगितलेली शिकवणुकीची रत्ने टॉलस्टॉयने वेगळी करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘गॉस्पेल इन ब्रीफ’ या  पुस्तकात टॉलस्टॉय यांनी बायबललाच केंद्रस्थानी ठेवले आहे आणि येशूची खरी शिकवण काय आहे, ती सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही शिकवण वेगळी काढत असताना येशूने केलेले चमत्कार व इतर काल्पनिक गोष्टी त्यांनी वगळलेल्या आहेत. येशूची मूळ शिकवणूकच किती प्रभावी आहे, ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

येशूने जे काही विचार मांडलेले होते, ते त्याअगोदर कोणीही मांडलेले नव्हते. उदा. एका व्यभिचारी शोमरोनी स्त्रीला मारायला आलेल्या लोकांना तो म्हणतो की, ‘दगड मारायला आलेल्यांपैकी ज्यांनी कोणी कधी चूक केलीच नाही, त्यांनी प्रथम दगड मारावा.’ तेव्हा सगळे जण निघून जातात. येशूचा हा दृष्टिकोन पूर्णपणे विवेकवादी आहे. त्याने असे नाही सांगितले की, तुम्ही अमुक केले तर पाप लागेल किंवा पापक्षालन होईल. खरे पाहिले तर, बायबल हे येशू ख्रिस्तांनंतर चार-पाचशे वर्षांनंतर रचले गेले. येशू त्याच्या हयातीत जे काही बोलला, ते सामान्य लोकांच्या संगतीत बोलला. त्याने जर ते विद्वानांसमोर सांगितले असते, तर काहींनी ताबडतोब त्याची कदाचित नोंद करून घेतली असती. त्यामुळे येशूने जे काही सांगितले, त्याची नोंद तब्बल तीन-चारशे वर्षांनंतर व्हायला लागली. 

अनेक लोकांचे जे अनुभव आहेत, त्यापैकी काही ठराविक लोकांचे अनुभव एकत्र करून आजचे बायबल रचले गेले. येशू हे जे नाव आहे, ते मुळात ‘तारणारा’ या अर्थाने ज्यू लोकांत दिले जायचे. तेव्हा ते नाव ज्यू लोकांत खूप कॉमन होते. बायबल रचणाऱ्यांनी ज्यूंच्या धर्मग्रंथात ‘तुम्हाला तारणाऱ्यांसाठी देव त्याचा एकुलता एक पुत्र पाठवणार आहे’ हे जे भाकीत आहे, ते येशू ख्रिस्ताच्या रूपाने खरे ठरले गेले- अशा रूपाने बायबलची मांडणी केली. सध्याच्या ज्यू लोकांना हे मान्य नाही. ते येशूला देवाचा पुत्र मानत नाहीत. ज्यूंच्या धर्मग्रंथाशी- जो मुसलमानसुद्धा मानतात त्याच्याशी- बायबलची जोडणी करण्यासाठी मग चर्चने, ‘येशू जे तुम्हाला मुक्त करतो ते सांगायचा तर ते मुक्त कशातून करतो? तर, पृथ्वीच्या निर्मितीनंतर आदाम आणि ईव्ह यांनी केलेल्या मूळ पापापासून’ अशी ओढून-ताणून रचना चर्चने बायबलमध्ये केली. प्रत्यक्षात येशूच्या शिकवणुकीत तसे कधीच आलेले नाही.

येशू ख्रिस्त जेव्हा तुम्हाला ‘मी मुक्त करतो’ असे म्हणायचा, तेव्हा मग त्याचा अर्थ काय? येशू ख्रिस्त ज्यू होता. तेव्हा अनेक रूढीपरंपरा होत्या आणि अजूनही आहेत. हात-पाय कसे धुवायचे ते लग्नसमारंभ कसा करायचा, जन्म-मृत्यूच्या वेळेला काय करायचे अशा विविध प्रसंगी करावयाचे अनेक नियम आहेत आणि हे नियमशास्त्र जो नेहमी पाळतो, तो धार्मिक माणूस. येशूच्या मते, तुम्ही हे सर्व जे काही करता यापलीकडे जे काही आहे, ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही एकमेकांवर प्रेम करा आणि हे सगळे सोडून द्या, तेव्हा तुम्ही खरे मुक्त व्हाल. आजच्या धर्मनेत्यांना हे पटण्यासारखे नाही. चर्चला आजदेखील हे सर्व उमगलेले नाही. पण टॉलस्टॉयने हे शोधून काढले आणि मुख्य म्हणजे त्याने बायबलमधून शोधून काढले.’’, डिसोझासर एका सभेत आम्हाला ही माहिती देत होते. विचारांतील तर्कशुद्धपणा व ते सुस्पष्टपणे व्यक्त करत बोलण्याची पद्धत यामुळे सरांचे बोलणे कधीच कंटाळवाणे व्हायचे नाही.

तोपर्यंत कॅथॉलिक असल्याकारणाने प्रार्थनेचे माझ्या आयुष्यात बरेच महत्त्व होते. त्यातील फोलपणा असा लक्षात आला नव्हता. जी काही प्रार्थना करायचो, ती चर्चने शिकवलेली असायची. पण याविषयी एकदा सर म्हणाले, ‘‘आजकाल चर्च प्रार्थनेवर भर देते. ‘प्रार्थना करा, वेगवेगळ्या आराधना करा’ असे नेहमी सांगत असते. किंवा आजकाल विविध प्रार्थना ग्रुपचे जे पेव फुटले आहे, त्या पार्श्वभूमीवर आपण जर येशू स्वत: किती प्रार्थना करीत होता त्याचा जर शोध घेतला, तर वेगळेच चित्र दिसेल. येशूच्या सतत बरोबर राहणारे त्याचे शिष्यसुद्धा त्याला विचारतात की- गुरुजी, आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. याचा अर्थ तो सतत प्रार्थना करत नव्हता. येशूने ‘आमच्या बापा’ ही एकमेव प्रार्थना त्यांना शिकवली. आमच्या बापा म्हणजे आमच्या सगळ्यांच्या बापा. आपण सर्व जण एकाच देवाचे पुत्र आहोत असे त्याला अभिप्रेत होते. आपण ते मानत नाही. हा आपला, तो परका. पण हा विचार येशूने बदलायला लावला होता.

येशूच्या शिकवणुकीचे सार त्याने ही जी एकमेव प्रार्थना करायला सांगितली त्यात आहे. बाकीच्या ज्या प्रार्थना आहेत, त्या सगळ्या चर्चने रचलेल्या आहेत. त्याचबरोबर कर्मकांड याविषयीसुद्धा येशूचे दाखले बायबलमध्ये स्पष्टरीत्या आहेत. येशू एकदा शिष्याबरोबर जेवायला बसले होते, तेव्हा त्यांनी जेवणापूर्वीचा धार्मिक विधी केला नव्हता. तेव्हा शिष्य त्याला म्हणाले, ‘तुम्ही धर्माचा नियम पाळला नाही.’ तेव्हा तो म्हणाला, ‘पोटात तुम्ही काय घालता, त्यापेक्षा तुमच्या ओठातून काय बाहेर पडते ते महत्त्वाचे आहे.’ मनातून दया, प्रेम बाहेर पडणे हे महत्त्वाचे. म्हणजे त्याने प्रार्थनेला जास्त महत्त्व दिले  नव्हते.

त्यांनी जी जी काही प्रार्थना सांगितली ती म्हणजे, ‘तुम्ही असे वागा’ या धर्तीवरील होती. उदा.- आपण जसे ट्रॅफिकचे नियम पाळतो, ‘वाहन डाव्या बाजूने चालवा’. हा नियम तुम्ही कितीही वेळेला बोललात तरी तुमचे वाहन वाचणार नाही. पण तुम्ही खरोखरीच त्या नियमाप्रमाणे वागाल, तरच तुमचे वाहन सुरक्षित राहील. तसेच येशूने जे सांगितले ते तुम्ही आचरणात आणले, तरच स्वर्गाचे राज्य तुमच्या मनात तयार होईल. नाही तर प्रार्थना तुम्ही कितीही वेळा बोला, तिचा उपयोग होणारच नाही. ...आणि हेच बिंबवण्यासाठी त्याने दोन मुलांचा दाखला सांगितला. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मनुष्य आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर’. मुलाने उत्तर दिले, मी जाणार नाही, परंतु नंतर त्या मुलाने खरेच शेतात जायचे ठरविले व तो गेला. नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर. त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो’. पण तो गेला नाही. आता या दोघांपैकी चांगला कोण? ज्याने अगोदर नाकारले, तरीही जाऊन केले तो अधिक चांगला. कारण त्याने कृती केली. आणि दुसऱ्या मुलाने फक्त शब्दाने आश्वासन देऊन बाबाला खुश केले, परंतु केले काहीच नाही. प्रार्थना करणारे लोकही हेच करतात. ते जाऊन देवाला आश्वासन देतात की, ‘जशी आम्ही आमच्या अपराध्याची क्षमा करतो तशी तूसुद्धा आमच्या अपराध्याला क्षमा कर’; परंतु प्रत्यक्षात तसे आपण करत नाही. जो खरोखर दुसऱ्याला क्षमा करत असेल- भले, त्याने प्रार्थना नाही केली, तरी- तो खरा धार्मिक माणूस. येशूने या दाखल्यात हे सांगितले आहे.’’

हा दाखला सरांना खूपच आवडलेला दिसत होता, अतिशय प्रभावी रीतीने त्यांनी तो मंचाच्या मीटिंगमध्ये सांगितला होता. येशूच्या शिकवणुकीचे सार या प्रसंगात आले होते. विधी म्हणून चर्च जी काही सांगेल, ती कर्मकांडे करण्यातच मी धन्यता मानत आलो होतो; पण दस्तरखुद्द येशूने जे काही सांगितले आहे, त्यावर कधी विचारच केला नव्हता. प्रार्थना म्हणजे ‘ट्रॅफिकच्या नियमांप्रमाणे’ आहे, हे सरांचे भन्नाट स्पष्टीकरण पटले. ट्रॅफिकचे नियम जोरजोरात बोलले म्हणून काहीही फरक पडत नाही. ते नियम आचरणात कसे आणता येतील, यावरच भर देणे गरजेचे आहे. सरांचे विचार ऐकताना कधी भान हरपून जायचे, तर कधी मन विस्मित व्हायचे. डिसोझासर फक्त बोलत राहावेत, त्यांची विचारांची बैठक लागावी आणि ते सर्व विचारधन तल्लीन व एकतान होत आपण घेत राहावे, असे वाटायचे. बहुतेक वेळा किती घेऊ अन्‌ किती नको, अशी आमची अवस्था व्हायची. आपले ज्ञानाचे भांडवल किती तोकडे आहे, ही जाणीव त्यांच्यासमोर बसल्यावर व्हायची. अशी माणसे आपल्या आजूबाजूला हवी असतात. आपले तोकडेपण जाणवून देणाऱ्या व्यक्ती आयुष्याच्या प्रवासात महत्त्वाच्या असतात. डिसोझासर त्यापैकीच एक होते.

धर्माचा पगडा लहानपणापासून आपल्या सर्वांवर आपल्या नकळत पडत राहतो. पुढे मोठे झाल्यावर धर्मातील सर्व त्रुटी लक्षात आल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी भल्या-भल्यांना कळत असूनही खूप वर्षे निघून जातात. सरांचा तरुणपणीच धर्मापासून लांब राहण्याचा निर्णय म्हणूनच धाडसी वाटतो. येशूची शिकवणूक लोकांपर्यंत पोहोचवण्यात चर्च कसे अपयशी ठरले आहे हे मग अशा चर्चेद्वारे उमगायचे. येशू ख्रिस्ताने जेव्हा सांगितले की, ‘जा, माझी सुवार्ता तुम्ही इतरांना सांगा’. तेव्हा चर्चतर्फे इथे आलेल्या पोर्तुगीज मिशनऱ्यांनी सुवार्ता देण्याऐवजी धर्माच्या नावाखाली इकडच्या लोकांचे नाव बदलले, लोकांना मटण खाण्याची, दारू पिण्याची दीक्षा दिली. म्हणजे धर्म बदलला, लेबल बदलले परंतु मूळ माणसे होती तशीच राहिली. विवेकी येशूला ते अभिप्रेत नसावे. चर्चने येशूलाच देव बनवले आणि ‘येशूवर विश्वास ठेवला’ की तुम्हांला शांती मिळेल, स्वर्ग लाभेल, अशा प्रकारचे वातावरण निर्माण केले. ‘

‘पण चर्चमुळेच तर आपल्याला शिक्षण मिळालं. आपली आर्थिक प्रगती झाली.’’ एका चर्चेत नॉर्मनने असे विचारताच सर म्हणाले, ‘‘आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचे वारे वाहू लागले, तेव्हा कुठे वसईतील चर्चमध्ये शाळा सुरू झाल्या. चर्च वसईत 500 वर्षांपासून आहे, शिक्षण मात्र 60 वर्षापासूनच इथे आले हा इतिहास आहे.’’ अर्थात वसईत जरी गावोगावी शिक्षण उशिराने सुरू झाले तरी ते चर्चनेच सुरू केले हेही तितकेच खरे होते. ‘चर्च तेथे शाळा’ ह्या धोरणामुळे चर्चच्या आजूबाजूचा परिसर चटकन शिक्षित झाला. आणि त्यात फक्त ख्रिश्चन धर्मीयच नाही तर, परिसरातील हिंदू-मुस्लिम सर्वांनाच ह्या धोरणाचा फायदा झाला, हेही ते प्रांजळपणे  मान्य करत.

टॉलस्टॉय यांच्या ‘गॉस्पेल इन ब्रीफ’ या बायबलवरील पुस्तकाविषयी सरांनी सांगितलेल्या विविध विचारांनी येशूच्या शिकवणुकीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. इतकी वर्षे चर्चमध्ये जाऊन येशूच्या शिकवणुकीविषयी जे कुतूहल निर्माण झाले नव्हते, ते सरांचे हे अगाध चिंतन ऐकून झाले होते. ‘‘सर जरी स्वतःला नास्तिक मानत असले, तरी त्यांच्यात एका साधूचं वैराग्य मात्र आहे!’’ रॉयल एकदा त्याचे सरांविषयी निरीक्षण मांडत असताना हे बोलला होता. सरांच्या वैराग्यासारख्या साध्या राहणीमानाने रॉयल आकर्षित झाला होता; तर त्यांच्या नितळ, पारदर्शी व प्रामाणिक नास्तिकतेने ग्रॅहमवर गारूड केलं होतं! ग्रॅहमने तर टॉलस्टॉयचे मूळ इंग्रजी पुस्तक आणून वाचले. टॉलस्टॉयने सोपी केलेली येशूची शिकवण व चर्चमध्ये सांगितले जाणारे किती वेगळे आहे, हे जाणून तो काहीसा बिथरला. तो देव, धर्म या विषयावर आणखीन चिंतन हळूहळू करू लागला.

देवाने जर आपल्याला निर्माण केले असेल; तर त्याने आपली काळजी घेतली पाहिजे, आपल्याला काय हवे, नको हे त्याला माहिती असले पाहिजे. मग आपल्या प्रार्थनेची गरज त्याला का लागावी? अगम्य, गूढ वाटणाऱ्या गोष्टी, विविध परंपरा, धर्माविषयीचे निरर्थक अभिमान याविषयी खरे सत्य काय आहे आणि ते तर्काने कसे शोधावे, याविषयी मग तो आणखी वाचन करू लागला. त्यातून त्याच्या हाती लागलेल्या उत्तराने मात्र तो सुरुवातीला भांबावला व मग पेटून उठला. मंचामध्ये तसेच मंचाबाहेर त्याच्यासोबत वावरताना मला हे जाणवू लागले. ‘‘येशू हा मानवाचा पुत्र म्हणून या पृथ्वीतलावर आला असेल, तर मानवासारखे त्याने लग्न केले किंवा मानवासारखा त्याला मृत्यू आला; तर त्यात अनैसर्गिक ते काय? चर्च या गोष्टीचा का एवढा बाऊ करते? शेवटी त्याने जी शिकवणूक दिलेली आहे, ती महत्त्वाची नाही का?’’ ग्रॅहममधील बंडखोरपणा अधिकच प्रखर होऊ लागला होता.

गरीब सुताराच्या घरी जन्माला आलेला हा सर्वसामान्य मुलगा खरेच कसा असेल? चित्रकारांनी जी काही येशूची चित्रे काढली, ती सर्व गंभीर स्वरूपाची आहेत. तो कायम असाच गंभीर राहणारा असेल का, की जगण्याचे मर्म सापडल्यामुळे समाधानाने हसणारा? ‘जे तुमच्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर प्रेम केले तर त्यात वेगळे ते काय? तुमचे शत्रूही तसेच करतात. तुम्ही तर आपल्या शत्रूवरही प्रेम करा’ असा भन्नाट सल्ला देणारा आणि बंदिस्त ज्यू मंदिरापेक्षा मुक्त वातावरणात टेकडीवर बसून प्रवचन देणारा येशू खरेच कसा असेल? ‘कुष्ठरोग्यापासून लांब राहा’ असे शास्त्रात म्हटलेले असूनही (बायबल, जुना करार : लेवीय, 13:44-46), कुष्ठरोग्याला जवळ घेऊन त्याला स्पर्श करणारा (बायबल, नवा करार : मार्क, 1:40-45) येशू धर्मपीठाच्या कथित ‘नियमांपासून’ फारकत घेणारा खरे तर एक बंडखोरच नाही का? तेव्हाच्या सामर्थ्यवान शास्त्रीपरुशांच्या अस्तित्वाला आणि अहंकाराला धक्का देणाऱ्या येशूच्या मागे धर्मपीठाची माणसे किती हात धुऊन लागली असतील? अवघ्या 33व्या वर्षी त्याला क्रुसावर अपमानित करून मारण्यात आले, तरी त्या मरणदायी वेदनेतही ‘हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करत आहेत, हे त्यांना कळत नाही’ असे तो कसे म्हणू शकला असेल?

चर्चमध्ये कार्यरत असलेले किती धर्मगुरू हे वैराग्यासारख्या राहणाऱ्या येशूचे अनुयायी व किती येशूला वधस्तंभी खिळणाऱ्या दांभिक शास्त्री परुश्यांचे? गाई- म्हशींच्या गोठ्यात, गव्हाणीत जन्मलेल्या येशूवर हक्क सांगणारे, व्हॅटिकनच्या भव्य प्रासादात कसे राहू शकतात? समाज विकास मंडळाच्या त्या फिक्या पिवळ्या रंगाच्या भिंती असलेल्या काळोख्या खोलीत मग येशूच्या प्रतिमांची किती तरी वर्तुळे मनःपटलावर अलगद उमटायची. अशा प्रतिमा- ज्या भव्य चर्चमध्येही कधी दिसायच्या नाहीत. माणसाला धर्माचरण करण्यासाठी विचार आणि आचार किती पुरेसे आहेत! चमत्काराशिवायचा किंवा सोप्या भाषेत बोलणारा हा येशू मग देशाची, भाषेची, काळाची बंधने भेदून या मातीतील गौतम बुद्ध, तुकाराम यांच्या अगदी जवळचा वाटू लागायचा. मंचाच्या किती तरी सभांत येशू, तुकाराम, गौतम बुद्ध यांचा विचारांवरील मैफली रंगायच्या. तासाभराची ही सभा संपल्यावर घरी नेहमीच्या आयुष्यात परत आल्यावरही मन भारावलेल्या अवस्थेतच असायचे.

Tags: विवेक मंच गॉस्पेल इन ब्रीफ मंच ख्रिस्त येशू लिओ टॉलस्टॉय church vivek manch manch gospel in brief bible yeshu leo tolstoy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात