डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

इतिहासात रुची ठेवणाऱ्या रॉयलच्या मते, ‘जो फरक गांधींना गोखले आणि टिळक यांच्या स्वभावात जाणवला होता, तोच फरक मला सर व ॲड.अनुप यांच्यातही जाणवतो.’ तर बॉलिवुड संगीतात आवड असलेल्या ग्रॅहमच्या मते- सर म्हणजे आपले अमिताभ बच्चन आहेत. पिक्चर कितीही फ्लॉप नाही तर हिट होवोत, त्यांचं भावनांवरचं कंट्रोल सॉलिड आहे आणि ॲड.अनुप अंकल म्हणजे आपल्या राजेश खन्नासारखे आहेत. टॅलेंटेड ॲक्टर, पण तेवढेच इमोशनल. अर्थात, एका बाजूला डिसोझासरांचे भावनांवर नियंत्रण असलेले संयमित बोलणे, तर दुसरीकडे ॲड.अनुप यांचे भावनाविवश होऊन त्वेषाने बोलणे- अशी दोन टोके असली तरी ही दोन्ही टोके ‘धर्मामुळे माणसाचे नुकसान जास्त झाले आहे’ या सामाईक मुद्याने जोडली गेलेली असल्याचेही जाणवायचे.

ॲड.अनुप डिसोझा हे इथल्या समाजातील एक ज्येष्ठ वकील. तसेच कित्येक वर्षे चर्चच्या संघटनेत कार्य करणारे व चर्चमुळेच वसईभर प्रसिद्ध असलेले नेते. स्वत: वकील असल्याने त्यांच्या वकिली पेशाचा फायदा त्यांनी फादरांना, बिशपांना करून दिलेला होता. लहानपणी खूप वेळा माझ्या घरी आलेले मी त्यांना पाहिले आहे. ते माझ्या आईचे मावसभाऊ. लहानपणी जेव्हा जेव्हा ते माझ्या घरी आले, तेव्हा ते मावसभाऊ म्हणून कमी आणि न्यायनिवाडा करणारे वकील म्हणून जास्त वेळा आल्याचे मला स्मरते. अतिशय हुशार, सामाजिक जाणीव असलेले, चर्चमध्ये आणि गावात समाजकार्यात नेहमी पुढे असणारे, तसेच तेवढेच शिस्तप्रिय व कडक असा त्यांचा स्वभाव होता. अजूनही आहे.

अनुप न्याय करणार म्हणजे तो योग्यच असणार, अशी लोकांची खात्री असायची. याला कारण म्हणजे, एक तर त्यांचे कायद्याचे ज्ञान आणि त्याचबरोबर चर्चमध्ये कार्य करणारा परोपकारी अशी त्यांची जनमानसात असलेली प्रतिमा. त्यामुळे विविध गावांत त्यांना जमिनीचे व इतर वाद सोडविण्यासाठी बोलवीत असत.

सरकारदफ्तरी वसई हा एक तालुका असला, तरी ख्रिश्चनधर्मीय व्हॅटिकनच्या मॅनेजमेंटसाठी त्याला ‘डायोसिस’ वा ‘धर्मप्रांत’ असं संबोधिलं जातं. या डायोसिसच्या अंतर्गत जी विविध गावं येतात, त्या गावांना पॅरिशेस म्हटलं जातं. वसई धर्मप्रांतात आत्ताच्या घडीला 40-50 पॅरिशेस आहेत आणि या धर्मप्रांतात एकूण दीड लाख एवढी ख्रिस्ती लोकसंख्या आहे. अशा प्रत्येक पॅरिशमध्ये एक चर्च असतं आणि त्या-त्या पॅरिशमध्ये पॅरिशचे प्रमुख धर्मगुरू कार्यरत असतात. पॅरिशच्या आकारानुसार एक ते तीन असे धर्मगुरू प्रत्येक चर्चमध्ये नेमलेले असतात. फादर म्हणजे त्या-त्या पॅरिशचे धार्मिक नेते. या सर्व फादरांवर निगराणी राखणारा तो, म्हणजे बिशप. बिशप हा थोडक्यात ‘धर्मप्रांतांचा नेता’. परत विविध धर्मप्रांतांचे सर्व बिशप देशपातळीवर मुख्य असलेल्या कार्डिनलला रिपोर्ट करतात आणि मग शेवटी कार्डिनल हे पोपला रिपोर्ट करतात. हेच कार्डिनल्स नव्या पोपचीही निवड करू शकतात. भारतात सध्या रोमन कॅथॉलिक चर्चचे पाच कार्डिनल्स आहेत. असं हे जगभरात पसरलेल्या चर्चच्या व्यवस्थापनाचं रचनात्मक स्ट्रक्चर.

चर्चला त्यांच्या बऱ्याच मालमत्तेसंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी त्या-त्या देशातील कायद्याचे ज्ञान असणाऱ्या  व्यक्ती हव्या असतात. त्यामुळे ॲड.अनुप डिसोझा यांनी चर्चपातळीवर धर्मगुरूंबरोबर तसेच धर्मप्रांतपातळीवर कार्यरत असणाऱ्या बिशपांपर्यंत अशी बरीच कामे केली. कार्य करताना ते हळूहळू अधिकच वरच्या सर्कलमध्ये पोहोचले. जास्त ओळख कधीही वाईटच. जे सामान्य जनतेला कधी दिसत नाही, असं राजकारण त्यांना चर्चमध्ये उच्च पातळीवर काम करताना दिसू लागलं. चर्चच्या इनर सर्कलमध्ये कार्य करीत असताना तिथे होत असलेला दुटप्पीपणा, दांभिकपणा त्यांना खुपू लागला. त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागलं.

निवृत्तिवय आल्यावर त्यांनी त्यांचा वकिली पेशाही थांबविला होता. त्यांचा तोही व्याप कमी झाला होता. त्यामुळे त्यांचं धर्माविषयी अवांतर वाचन वाढलेलं होतं आणि त्यात जे-जे काही त्यांच्या हाती लागत होते, ते सर्व ते चिकित्सकरीत्या वाचत होते. त्यातून धर्माविषयी काही धक्कादायक असे निष्कर्ष त्यांच्यासमोर येत होते. त्यांनीही ते विचलित झाले होते. चर्चमधील राजकारण फक्त इथलेच नसून जगभर चालणारे व पूर्वापार होत आलेले असे आहे, हे त्यांना कळून चुकले. येशू ख्रिस्ताला अभिप्रेत असलेला धर्म आणि चर्चमध्ये जो धर्म पाळला जात आहे, त्यातील फरक हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागला.

अशात एक असा प्रसंग घडला की, त्याने या सर्वांवर कडेलोट केला. तेव्हा वसई धर्मप्रांतात अपंगांसाठी कार्यरत अशी चर्चची कोणतीच संघटना नव्हती. शीला डिक्रूज नामक स्वतः अपंग असलेल्या एका स्त्रीने अपंगांसाठी एक छोटेखानी संस्था वसईत सुरू केली होती. समाजात ज्या अपंग व्यक्ती होत्या, त्या या संस्थेमध्ये येण्यास सुरुवात झाली होती. फादर डेनिस जी हे एका पॅरिशमध्ये काम करणारे धर्मगुरूही या संस्थेशी हळूहळू संलग्न झालेले होते. अर्थात, अपंगांची संस्था त्यामुळे समाज त्यांच्याप्रति खूपच संवेदनशील आणि भावनिक असतो. मदत करायची इच्छा असो-नसो, सामान्य माणसाला अपंग व्यक्तीविषयी ममत्वच वाटत असतं.

काही कारणामुळे ॲड.अनुप हेही त्या संस्थेशी निगडित झाले होते. संस्थेसाठी तो काळ काहीसा सुरुवातीचाच होता. तेव्हा या संस्थेच्या महिला संस्थापक शीला डिक्रूज व फादर डेनिसजी यांनी एक महत्त्वाकांक्षी स्वप्नं पाहिलं. परिसरातील जे-जे अपंग आहेत, त्या सर्वांचा एक भव्य मेळावा भरवायचा. कारण सर्वच आई-वडील आपल्या अपंग मुला-मुलींना बाहेर पाठवत नाहीत. कधी कधी तर घरात अपंग मूल आहे, हेदेखील लोकांना माहीत नसतं. म्हणूनच अपंगांचा एक मेळावा भरवून त्यांच्या आई-वडिलांसाठीही एक समुपदेशकी कार्यक्रमाचं आयोजन करावं, या हेतूने अपंगांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा एक मेळावा भरवायचे ठरले. त्या दृष्टीने त्यांचं प्लॅनिंगही सुरू झालं होतं. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, जागा. अर्थातच वसईमध्ये कार्यक्रम करण्याजोगी मोकळी जागा हवी असेल, तर ती म्हणजे चर्चचं वा शाळेचं आवारच. बहुतांशी शाळाही चर्चच्याच अखत्यारीत येतात. त्यामुळे त्यांनी वसईच्या खाडीलाच लागून असलेल्या ‘मनमाड’ या पॅरिशच्या चर्चचे आवार मुक्रर केले. मनमाड पॅरिशचे जे प्रमुख धर्मगुरू होते, त्यांची त्यांनी रीतसर परवानगी घेतली आणि सर्व कार्यक्रम ठरला.

त्याच वेळेस मागच्या बाजूला आणखी एक घटना सुरू होती. वसई धर्मप्रांताची अधिकृत अशी अपंगांमध्ये कार्य करणारी कोणती संस्था नसल्याने तत्कालीन बिशपांना असं वाटत होतं की, अपंगांसाठी आपली चर्चची ऑफिशियल अशी एक विंग असावी व त्यासाठी ते प्रयत्नशील होते. जेव्हा त्यांना कळलं की, अपंगांची एक अशी संस्था अगोदरच कार्यरत आहे आणि शीला डिक्रूज नामक एक स्त्री तिची संस्थापिका आहे, तेव्हा त्यांनी शीला डिक्रूज यांच्याशी संपर्क साधला. त्यांना म्हटलं की, तुम्ही आमच्या चर्चच्या संघटनेत विलीन व्हा. आपण चर्चच्या नावाखाली ही संस्था चालवू. ही संघटना आणि हे कार्य पुढे नेऊ. पण हे शीला डिक्रूज यांना रुचले नाही. त्यांनी नम्रपणे, परंतु ठामपणे सांगितले, ‘‘नाही, ही संस्था आम्ही अपंगांसाठी चालवत आहोत. अपंगांत तरी मला धर्माच्या मुद्यावर भेदभाव करायचा नाही. चर्चमध्ये विलीन होऊन मला या संस्थेवर ‘ख्रिस्ती’ म्हणून शिक्का नाही मारून घ्यायचा. अर्थात, तुम्ही दुसरी संस्था चालू करू शकता आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील.’’

बिशपांना हा नकार रुचला नसावा. त्यांना जेव्हा कळलं की, या अपंग संस्थेचा कार्यक्रम मनमाड चर्चच्या आवारात होत आहे, तेव्हा बिशपांनी त्या चर्चच्या प्रमुख धर्मगुरूंना फोन करून ती जागा रद्द करण्यास सांगितले. ‘त्या संस्थेला ती जागा देऊ नका, त्यांचं ते पाहून घेतील’. अर्थातच बॉसची अशी ऑर्डर आल्यानंतर त्या धर्मगुरूची बिचाऱ्याची काय गत होणार? त्या फादरांनी अगोदर कार्यक्रमाला रीतसर परवानगी देऊनही ऐनवेळी नाइलाजाने त्या अपंगांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली.  अपंगांच्या मेळाव्याची सगळी जय्यत तयारी झाली होती. ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करणे आता अशक्य होते. मोठी पंचाईत झाली होती. मनमाड चर्चसमोर परिसरातील ख्रिस्ती शेतकऱ्यांची मोकळी शेतजमीन होती. त्यांना विचारावे का? पण त्यात तर त्यांनी भाजीपाल्याची लागवडही केली होती. आता काय करावे? कार्यक्रमाचे स्थळच ऐनवेळी रद्द झाल्यावर नवे स्थळ मूळ स्थळाच्या आसपास तरी असावे, कारण शेवटी येणारे लोक अपंग होते. शीला डिक्रूज यांचा तसा प्रयत्न चालू होता.

एका शेतकऱ्याला याची खबर लागली आणि आयोजकांनी काही विचारण्याअगोदर त्याने स्वतःहून आपली जमीन या मेळाव्यास दिली. स्वतः मेहनतीने फुलवलेल्या मळ्यावर त्याने पाणी सोडलं आणि ऐनवेळी चर्चसमोरच्या एका विस्तीर्ण शेतात हा कार्यक्रम पार पडला. बिशपांचा राग फक्त त्या वर्षीपर्यंतच सीमित नव्हता, तर त्यानंतर सलग सहा वर्षे ते बिशपपदावर असेपर्यंत त्यांनी या अपंगांच्या मेळाव्यासाठी चर्च नाकारले! वसईतील चर्चच्या कारकिर्दीतील काळा कुट्ट क्षण होता तो! शीला डिक्रूज या धार्मिक व्यक्ती होत्या. त्यामुळे ‘उगाच वाद नको’ म्हणून हा अपमान त्यांनी मनातच ठेवला आणि त्याची बाहेर जास्त वाच्यता झाली नाही.

शीला यांच्या संस्थेशी फादर डेनिसजी अगोदरपासून संलग्न होते, ते मात्र या संबंध प्रकरणात शीला डिक्रूज यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. त्याची ‘शिक्षा’ म्हणून बिशप हाऊसतर्फे त्यांचीही बदली मग काही वर्षे एका दुर्गम परिसरात करण्यात आली. येशूचे मेंढपाळ म्हणवणाऱ्या बिशपांचे हे वर्तन पाहून कोणाही संवेदनशील माणसाच्या संयमाचा कडेलोट होणे अपरिहार्य होते. तसा बिशपांच्या वर्तुळात वावरणाऱ्या ॲड.अनुप यांचाही झाला. बिशपांशी असलेल्या मैत्रीची परिणती वादात झाली. ॲड.अनुप त्यांच्याशी भांडले. ‘‘तुम्ही चर्चमध्ये लोकांना दया, प्रेम, शांतीच्या गोष्टी शिकवता आणि स्वत: असे का वागता? तेही अपंगांसारख्या केविलवाण्या लोकांसाठी?’’ त्यांचा राग खूपच अनावर झालेला होता.

चर्चमधील उच्चपदस्थांचं ढोंगीपण मग त्यांच्या डोळ्यात खुपू लागलं आणि त्यांनी चर्चला जाणं हळूहळू सोडून दिलं. चर्चच्या बाहेर पडल्यावर अनुप यांना काही तरी करावंसं वाटत होतं. त्यांच्याबरोबर इतरही असे चर्चच्या कारभारावर नाखूश असलेले बरेच लोक होते. या फादरांवरती, बिशपांवरती वचक ठेवण्यासाठी समांतर अशी काही व्यवस्था असावी, या हेतूने त्यांनी यातील काही लोकांना घेऊन ‘वसई ख्रिस्ती सभा’ स्थापन केली. पण दुर्दैवाने जे सदस्य होत गेले, ते इतके भित्रे निघाले की, चर्चला विरोध होण्यापेक्षा ती चर्चचीच एक संस्था वाटू लागली. ॲड.अनुप त्या संस्थेतून बाहेर पडले आणि त्यांनी हातात लेखणी घेऊन ‘एकला चलो रे’ची भूमिका वठवण्यास सुरुवात केली. ते जे काही वाचत होते, जे काही धक्कादायक निष्कर्ष त्यांच्या वाचनातून, अभ्यासातून निघत होते, ते त्यांच्या लेखातून ते मांडत राहिले. त्यामध्ये चर्चचा भोंगळ आर्थिक व्यवहार असेल वा इतर बरीच अशी प्रकरणं त्यांनी चव्हाट्यावर आणली. चर्चमध्ये त्यांना खुपलेल्या बऱ्याच मुद्यांवर ते बिनधास्त लिहू लागले.

अर्थातच हे काही समाजातील सर्वांना रुचले नाही. चर्चसाठीही तो धक्का होता. त्यांचे काही मित्र असलेले फादर यांनी तर ‘‘अनुप, तुला तर चर्चने मोठे केले आणि आता तू चर्चच्या विरुद्ध का वागतोस?’’ असे बोलून त्यांना शांत करण्याचा प्रयत्नही केला; परंतु ते आता गप्प राहणारे नव्हते. कारण धर्मसत्तेची काळी बाजू त्यांना स्पष्टपणे जाणवली होती. आता त्यांनी त्यासंबधी जनजागृती करण्यास सुरुवात केली होती. अर्थात, त्यांचे हे प्रयत्न चर्चची बदनामी करण्यापेक्षा चर्चमध्ये सुधारणा कशी करता येईल या धर्तीवरचे होते.

पाचशे वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी वसईच्या दक्षिण टोकाला वसई किल्ल्यात जरी प्रथम चर्च उभारले असले, तरी वसईच्या भागात जशी कॅथॉलिकांची संख्या हळूहळू वाढत जाऊ लागली तसतशी पोर्तुगीजांनी निर्मळ, पापडी, आगाशी, गिरिज, नंदाखाल अशा ठिकठिकाणी चर्च बांधली. गेली कित्येक वर्षे भाविक ती चर्च वापरत होते आणि अजूनही ती वापरत आहेत. परंतु अलीकडच्या 50-60 वर्षांत ठिकठिकाणी लोकवस्ती, नववस्ती वाढल्याने इतर बरीच नवी चर्चही उभारण्यात आली. ‘चर्च’ म्हणजे कॅथॉलिकांचा भावनिक आधार. संपूर्ण दिवस शेतामध्ये काबाडकष्ट करून संध्याकाळी मन रिझविण्यासाठी देवाची भक्ती करीत झोपी जाणे- अशी इतर धर्मीयांप्रमाणे इथलीही साधी-सरळ जीवनशैली. सर्वसामान्य भाविक जरी चर्चमध्ये रविवारी जात असले, तरी काही मिस्सासाठी रोज जाणारेही आहेत. रोज चर्चच्या आवारात काही ना काही चालूच असते. ज्या-ज्या गावी पहिल्यांदा चर्च बांधण्यात आली, तेव्हा बहुतांशी स्थानिक  ख्रिस्ती लोकांनीच त्यासाठी आपापल्या शेतजमिनी दिल्या. दानशूर ते फकीर सर्वांनीच सढळ हस्ते मदत केल्यामुळे चर्च आकारास येऊ शकले.

चर्च हा मुळातच भावनिक मुद्दा. सर्वसामान्य कॅथॉलिक या देवाच्या घराला आपलेच घर समजतात. चर्च ही त्यांची सामुदायिक जबाबदारी बनते. परंतु गावकऱ्यांची जमीन असूनही एकदा हे चर्च उभे राहिल्यानंतर या चर्चच्या आवारात चर्चचेच कार्यक्रम होऊ शकतात. मग आवारात खेळण्यास येणाऱ्या गावातील मुलांना ‘हे धार्मिक प्रार्थनास्थळ आहे, त्याचा औचित्यभंग नको’ असे सांगून तिथे येण्यास मज्जाव केला जातो. कधी कधी गावातील कार्यक्रम असतील, तर त्यांना परवानगी द्यायची की नाही, हा अधिकार चर्चच्या धर्मगुरूंना आणि बिशप यांनाच असतो. ‘देवाचे घर’ या भावनेतून गावकऱ्यांनी दिलेली जमीन आणि त्यावर दानशूरांनी दिलेल्या दानातून उभी राहिलेली वास्तू मग ‘चर्च’ नावाच्या जगातील एका बलाढ्य संस्थेची होते. बरे, चर्चचे प्रतिनिधी म्हणून त्या चर्चमध्ये कार्य करणारे धर्मगुरू असतात ते पुन्हा इथल्याच मातीतले. मग आपल्याच माणसाला का म्हणून बोलायचं. म्हणून मुद्दे जास्त खेचले जात नाही.

चर्चमध्ये जो मिस्सा विधी साजरा केला जातो, त्यात विविध भाग असतात. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे अर्पण. चर्चच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत. अनुप डिसोझा यांच्या मते, चर्चच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारात तितकीशी पारदर्शकता नाही. चर्चच्या मालमत्ता व मिळकतीच्या व्यवस्थापनासाठी त्या-त्या चर्चच्या प्रमुख धर्मगुरूंबरोबरच त्या-त्या गावातील लोकांनाही सामावून घेतले गेले पाहिजे. तसेच बँकेप्रमाणे वा इतर संस्थेप्रमाणे खुली सभा घेऊन प्रत्येक वर्षाच्या जमा-खर्चाचा अहवालही दिला गेला पाहिजे. पब्लिक ट्रस्टच्या भारतीय कायद्यानुसार त्याचे अगदी पारदर्शक व्यवस्थापन केले गेले पाहिजे. परंतु तसे होत नाही. तेव्हा अनुप यांनी या आर्थिक बाबतीत प्रथम आवाज उठविला.

विवेकमंचात आल्यावर त्यांच्या या लिखाणाविषयी जास्त जवळून माहिती मिळू लागली. वकील असल्याने त्यांचा ज्या-ज्या बाबतीत चर्चप्रति आक्षेप होता, असे सहा-सात मुद्दे त्यांनी व्यवस्थित मुद्देसूदपणे मांडले होते. चर्चच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणणे, विविध लैंगिक शोषणाचे गुन्हे टाळण्यासाठी धर्मगुरूंना लग्न करण्याची परवानगी देणे, स्त्री धर्मगुरूला मान्यता देणे, तसेच धर्मातील कालबाह्य निकषांना तिलांजली देणे- असे काही ठळक मुद्दे त्यात होते. कधी याबाबत बिशपांना पत्र लिही, तर कधी पोपला पत्र पाठव- असे त्यांच्यापरीने ते या बाबतीत आवाज उठवत होते. ते पेशाने वकील होते. कोर्टात जोरजोरात आक्रमकपणे आपला मुद्दा समोरच्यांना पटवून देण्याची त्यांची वृत्ती, त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांची भीती वाटायची. पण नंतर शांतपणे विचार केल्यावर त्यांच्या बोलण्यातील अर्थ लक्षात यायचा.

या संदर्भात मला मंचाची एक चर्चा अजूनही आठवते. माझे सगळे कुटुंब मरियामातेचे भक्त. कदाचित तो भारतीय असण्याचा परिणाम असेल. देवाची माता ही आपल्यासाठी आदरणीय असते. भारतीय कॅथॉलिकमध्ये मरियामातेच्या भक्तीला खूप गर्दी जमते. मरियामातेने जिथे जिथे दर्शन दिले असं मानलं जातं, त्या-त्या परिसराची नावे घेऊन मरियेच्या आवृत्त्या केल्या गेल्या. लुड्‌समध्ये दर्शन दिले म्हणून लुड्‌स मेरी, मुंबई येथील वांद्य्राच्या माऊंट विभागात दर्शन दिले म्हणून माऊंट मेरी, भारताच्या चेन्नई येथील वेलंकनी भागात दर्शन दिले म्हणून वेलंकनीमाता. किंबहुना, मी ज्या भागात राहतो तेथील चर्च हे लुड्‌स मातेला वाहिलेले आहे. ख्रिस्ती धर्मानुसार मरिया हीसुद्धा येशू ख्रिस्ताबरोबर सदेह स्वर्गात घेतली गेली. त्यामुळे तिला दैवताचं वलय प्राप्त झालं.

एकदा मंचात चर्चेच्या वेळी अनुप बोलत होते, ‘‘आपण मरिया स्वर्गात गेली आहे असे मानतो, परंतु हे सगळं खोटं आहे. 1950 पर्यंत असे काहीच नव्हते. एके दिवशी एका पोपला वाटलं, आपण तसे जाहीर करावे आणि त्याने तसे केले. बायबलमध्ये असा कुठेच उल्लेख नाही. खरे म्हणजे ही आपल्या सगळ्यांची फसवणूक आहे.’’ ते जोरजोरात आपले म्हणणे ठाम सुरात सांगत होते. मला काहीसे वाईट वाटले. स्वर्ग- नरक यामध्ये मला काही विशेष रस नव्हता. मात्र माता म्हणून मरियेचे दु:ख सगळ्यात मोठे होते. येशूला जर आपण देव मानत असू, तर त्याला जन्म देणाऱ्या व आपल्या पोटच्या मुलाला वधस्तंभी खिळताना पाहणाऱ्या मरियेला दैवत्व दिलं तर बिघडलं कुठे? मी त्यांना तसे बोलून दाखविले.

त्यावर ते म्हणाले, ‘‘प्रश्न दैवत्वाचा नाही. चर्चने स्त्रियांना समान वागणूक कधीच दिली नाही. चर्चमध्ये ख्रिस्ती नन्‌ वा धर्मभगिनींना कायम दुय्यम स्थान असते. मिस्सा करण्याचा अधिकार फक्त पुरुष धर्मगुरूंना. सारे पुरुषी वर्चस्व. मरियेचा ढालीसारखा वापर करून आम्ही स्त्रीला कसे उंचावितो, हे बोलण्यास चर्च पुन्हा मोकळे.’’ हे त्यांचं बोलणं मात्र मला 100 टक्के पटलं.  महिला नेतृत्व किंवा feminism हे शब्द जगाला माहीत होण्याअगोदरपासून कॅथॉलिक धर्मभगिनींनी वा सिस्टर्सनी विविध संस्था एकहाती चालविलेल्या आहेत. 24 X 7 मोठमोठी हॉस्पिटल, सर्वोत्तम शैक्षणिक संस्था जर सिस्टर्स चालवीत असतील; तर मिस्साबली करून चर्च सांभाळणे तसं पाहिलं तर किती तरी सोप्पं! तेही त्या सहज करू शकतील, पण त्यांना तो दर्जा काही चर्चने दिला नव्हता. त्याबाबतीत त्यांना अजूनही दुय्यम समजलं जात होतं.

कधी कधी एखाद्या सोशल कार्यक्रमात असं व्हायचं की- खूप सिनिअर्स असलेल्या सिस्टर्स ज्यांचं खूप मोठं कार्य आहे, त्या स्टेजच्या खाली बसल्या आहेत आणि फक्त दोन-तीन वर्षांअगोदर जो फादर झाला, त्याला मात्र स्टेजवर बोलवून त्याचा सन्मान केला आहे. असं विचित्र दृश्य चर्चच्या बऱ्याच कार्यक्रमांत जेव्हा मी बघायचो, तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. पण तसं पाहिलं तर सिस्टर्सनाही दाद द्यायला हवी. चर्चच्या परवानगीची वाट न पाहता त्यांनी शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात स्वत: पुढाकार घेऊन भरीव असं कार्य केलेलं आहे आणि आपलं कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलं आहे. आज जगभरात स्त्रीमधील नेतृत्वगुणांचे कौतुक होत असताना, कॅथॉलिक नन्स कित्येक वर्षांपासून शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात नेतृत्व सिद्ध करीत आलेल्या आहेत.

वकील असल्याने कोर्टातील कित्येक रंजक किस्सेही ॲड.अनुप यांच्याकडून ऐकण्यास मिळायचे. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतप्त लाट उलटली होती. देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा तंग वातावरणात आसारामबापू यांनी त्यांच्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार त्या मुलीच्या कुटुंबीयांनी नोंदविली. अशा संवेदनशील केसमध्ये राम जेठमलानी यांनी आसारामबापूंचे वकीलपत्र घेतले. अर्थात, त्यात काही गैर नाही. पण त्या मुलीवर बलात्काराचा गुन्हा झालाय, हे स्पष्टपणे सिद्ध करणारे पुरावे असूनही त्यांच्या अशिलाला वाचविण्यासाठी जेठमलानी यांनी त्याची बाजू पटवून देण्यासाठी एक क्लृप्ती लढवली. ‘या अल्पवयीन मुलीला पुरुषांना एकांतात भेटण्याचा मानसिक आजार आहे’ असा खूपच गलिच्छ प्रतिवाद त्यांनी केला. अर्थात, राजस्थान हायकोर्टाने तो फेटाळून लावला व बापूंना शिक्षा ठोठावली.

या प्रसंगाचा उल्लेख करून ॲड.अनुप यांनी जे वक्तव्य केले होते, ते माझ्या मनात अजूनही घर करून आहे. ‘‘एखादी गोष्ट पटवून देता आली म्हणून ती सत्य होत नाही!’’ विज्ञानातील सूचक शब्द उचलून, भ्रामक विज्ञानाने एखादी काल्पनिक धार्मिक घटना ऐतिहासिक म्हणून ‘पटवून’ देणे किंवा जे वैज्ञानिक दृष्टिकोनाने समजाविता येत नाही ते विविध चपखल उदाहरणांनी सांगून पुढच्याला ‘निरुत्तर’ करणे, मी आजूबाजूला पाहत होतो. त्यासंदर्भात हे वाक्य मला खूपच महत्त्वाचे वाटते. ॲड.अनुप डिसोझा कधी कधी धर्माचं 100 टक्के आदर्श आचरण माणसात आणायची काहीशी अवास्तव अपेक्षा ठेवत. न्याय करत असताना जो समाज रोज चर्चमध्ये एवढी प्रार्थना, पूजा-अर्चा करतो, त्या समाजाची घाणेरडी बाजू त्यांच्या पाहण्यात यायची. त्यामुळेच असेल कदाचित, आपण कसे ढोंगी आहोत, हे त्यांच्या बोलण्यातून नेहमी यायचे.

त्यांच्या बुद्धिमत्तेविषयी व त्यांच्या उद्देशाविषयी कोणालाही संदेह नव्हता, परंतु मंचातील सदस्य त्यांची काहीशी भीतीच जास्त बाळगून असायचे. अर्थात, विवेकमंचात वेळोवेळी होत असणाऱ्या चर्चेमुळे ॲड.अनुप डिसोझाची ही माहिती काहीशी स्फोटक वाटली तरी पचविणे सुलभ जात होते. कदाचित एकांतात त्यांचे लेख वाचून हे फक्त चर्चप्रति असलेल्या द्वेषभावनेतूनच लिहितात आणि त्यांचे हे स्पष्टवक्तेपण धर्मसुधारणा करण्याच्या उद्दिष्टाने नसून धर्मद्वेषातून आलेले आहेत, असे इतर लोकांप्रमाणे कदाचित मलाही वाटले असते. त्यामुळे त्या अर्थाने विवेकमंच म्हणजे असे विवेचन पचविण्यासाठी एक कणखर पचनसंस्थाच बनली; परंतु सर्वांचीच पचनसंस्था तशी विकसित झालेली नव्हती. त्यामुळे कधी कधी विवेकमंचाच्या सभेसाठी प्रथमच येणारे नवे सदस्य ॲड.अनुप डिसोझांचे आक्रमक भाषेत असे धर्मविरोधी वाटणारे व्यक्तव्य ऐकायचे, तेव्हा ते काहीसे घाबरून-गांगरून जायचे. ते सभेला परत यायचे नाहीत. आम्ही रेग्युलर झाल्यामुळे आम्हाला असे विचार ऐकून प्रत्येक बाजू ऐकण्याची आता सवय झालेली होती; पण ती अपेक्षा नव्या माणसांकडून करणे अप्रस्तुत होते.

ख्रिस्ती धर्माविषयी उघडपणे ते स्थानिक मासिकातून चिकित्सात्मक लिखाण करत असल्याने ‘अनुप चर्चविरोधी व धर्मविरोधी आहेत’ असा सोईस्कर समज लोक करून घ्यायचे, पण अशांनी ॲड.अनुप डिसोझा यांची दुसरी बाजू ऐकलेली नसायची. विद्यमान पोप फ्रान्सिस यांच्याविषयी मात्र त्यांना बराच आदर आहे. ‘आतापर्यंत चर्चमध्ये सर्वोच्च पदावर आलेले विवेकी पोप’  असा ते त्यांचा उल्लेख करायचे आणि ते अगदी रास्तच आहे. ‘बिग बँग थिअरी’चे समर्थन करणारे, ‘नास्तिक- समलिंगी’ यांबाबतीत ‘मी कोण त्यांचा न्याय करणारा?’ अशी प्रांजळ भूमिका घेणारे तसेच स्त्री-धर्मगुरू, संततिप्रतिबंध, घटस्फोट या एरवी चर्चने दुर्लक्ष केलेल्या विषयाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी व्हॅटिकनमधील अधिकाऱ्यांत नव्याने चर्चा सुरू करणारे हे जेजवीट पोप विवेकी विचारांचा पुरस्कार करणारे ॲड.अनुप यांना नव्या युगाचे न वाटते, तर नवलच. पोप जशी विधाने व कृती करीत आहेत, हे पाहून ते नक्कीच चर्चच्या या अजून मध्ययुगातच वावरणाऱ्या तारूला विज्ञानाच्या युगात नेतील असा विश्वास ॲड.अनुप डिसोझा नेहमी मंचाच्या सभेत व्यक्त करायचे.

चर्च हे एका अर्थाने पुरोगामी राहिलेले आहे. तसेच ख्रिस्ताची शिकवण ही पूर्णपणे मानवतावादी व काहीशी मोशेच्या रूढीप्रिय देवाच्या व्याख्येला छेद देणारी आहे. ख्रिस्त हा एक प्रकारे बंडखोरच होता. माणसाने माणसाला माणूस म्हणून वागवावे आणि मानवता धर्म पाळून समाधानाने शांततेचा समाज निर्माण व्हावा; त्याकरता दया, क्षमा व त्याग ही त्रिसूत्री ख्रिस्ताने कशी दिली, याविषयी ते भरभरून बोलायचे. एकंदरीत जे काही चर्चविरोधात चार-पाच मुद्दे त्यांनी उचलून लावून धरले होते, त्यांच्यामते ते जर चर्चने स्वीकारले व अमलात आणले; तर चर्च अजूनही एक चांगला ख्रिस्ती धर्म देणारी संस्था होऊ शकते. चर्चने जगभर केलेल्या प्रचंड सामाजिक कार्याविषयीही ते भरभरून बोलायचे. ख्रिस्ती धर्म हा कसा सेवेचा धर्म आहे आणि येशूच्या सेवेच्या संदेशातून प्रेरणा घेऊन जगात आरोग्यसेवेचे किती तरी मोठे धर्मादाय कार्य चालू आहे, हेही त्यांच्या बोलण्यातून जाणवायचं.

ते जेव्हा असे बोलायचे तेव्हा ते स्वत:ला जरी नास्तिक मानत असले, तरी ख्रिस्ती धर्मातील सत्याचा शोध घेणाऱ्या खऱ्या धार्मिक वृत्तीचेच ते आहेत, हे मात्र मग उमगायचं. त्यांचा प्रवास डिसोझासरांपेक्षा खूप कठीण आहे. आयुष्याच्या उमेदीची वर्षे चर्चमध्ये घालविल्यानंतर उतारवयात धर्माच्या ढोंगीपणाची जाणीव होऊन स्वत:च्या श्रद्धेचे इमले जमीनदोस्त होताना पाहणे, हे त्यांना नक्कीच खूपच क्लेशदायक झालेले असणार. सर आणि ॲड.अनुप हे जरी विवेकमंचाच्या निमित्ताने एकत्र आले आणि त्यांचे शालेय व कॉलेज शिक्षण तसेच समाजातील जाणकार म्हणून असलेले स्थान यात समानता असली, तरी त्यांच्या स्वभावात फरक होता. सरांचं त्यांच्या भावनांवर विलक्षण नियंत्रण होतं, तर ॲड.अनुप हे भावनांत वाहून जाणारे होते. चर्चेचा ओघ कसाही असो; सरांच्या वागण्यात, बोलण्याच्या हालचालींत काहीच फरक जाणवत नसे. याउलट, कधी समाजाच्या अतिधर्मातिरेकाने लालबुंद होणारे, कधी तात्यांच्या विनोदी टिप्पणीने खळखळून हसणारे, तर कधी काही सकारात्मक घडले की भरभरून आश्वस्त सुरात बोलणारे अशी ॲड.अनुप यांची बरीच रूपे आम्हाला मंचात अनुभवण्यास मिळायची. त्यांच्या करड्या शिस्तप्रिय व तत्त्वनिष्ठ स्वभावामुळे त्याच्या कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागत असे.

वकिली करून त्यांनी बऱ्यापैकी पैसा, प्रसिद्धी मिळविली होती. ते नेहमी टी-शर्ट, जीन्स अशा टापटीप पोशाखात सभेला यायचे. मंचातील आम्हा तरुणांना तर त्यांनी स्वतः वार्षिक वर्गणी भरून ‘साधना’चे सभासद करून घेतले होते आणि आम्ही जेव्हा पैसे परत करण्यासाठी त्यांच्याकडे जात असू, तेव्हा ‘मी जशी तुमची वार्षिक फी भरली तशी तुम्ही इतरांची भरा. विवेकाची ही चळवळ फोफावली पाहिजे.’ असे म्हणायचे.

इतिहासात रुची ठेवणाऱ्या रॉयलच्या मते, ‘जो फरक गांधींना गोखले आणि टिळक यांच्या स्वभावात जाणवला होता, तोच फरक मला सर व ॲड.अनुप यांच्यातही जाणवतो.’ तर बॉलिवुड संगीतात आवड असलेल्या ग्रॅहमच्या मते- सर म्हणजे आपले अमिताभ बच्चन आहेत. पिक्चर कितीही फ्लॉप नाही तर हिट होवोत, त्यांचं भावनांवरचं कंट्रोल सॉलिड आहे आणि ॲड.अनुप अंकल म्हणजे आपल्या राजेश खन्नासारखे आहेत. टॅलेंटेड ॲक्टर, पण तेवढेच इमोशनल. अर्थात, एका बाजूला डिसोझासरांचे भावनांवर नियंत्रण असेलेले संयमित बोलणे, तर दुसरीकडे ॲड.अनुप यांचे भावनाविवश होऊन त्वेषाने बोलणे- अशी दोन टोके असली तरी ही दोन्ही टोके ‘धर्मामुळे माणसाचे नुकसान जास्त झाले आहे’ या सामाईक मुद्याने जोडली गेलेली असल्याचेही जाणवायचे. भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यात पुढे असणाऱ्या भारताच्या नेत्यांत वकिलांचाच भरणा जास्त होता. वसईतील लोकांना धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी असाच एक वकील त्याच्या परीने प्रयत्न करीत होता.

Tags: विवेक मंच धर्म चिकित्सा चिकित्सा मंच vivek manch dharm chikitsa chikitsa manch weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात