डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

यावर सरांनी मला व ग्रॅहमला जी प्रतिक्रिया दिली, तिने मात्र आम्ही गप्पच झालो. सर म्हणाले, ‘‘एक धर्म- एक राष्ट्र ही संकल्पना बऱ्याच राष्ट्रांनी अवलंबिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या देशातही आपण हिंदू राष्ट्राचा धुरळा उठलेला पाहतो. पण इस्रायलवगळता तो प्रयोग कुठे यशस्वी झालेला नाही आणि हे फक्त हिंदू-मुस्लिमांतच नाही, तर आपल्या ख्रिश्चन धर्मातही होते. आपले सर्व फादर, धर्मगुरू हे सर्व इथे वाढलेले व राहणारे, परंतु यांचे लक्ष कुठे असते- तर व्हॅटिकनकडे. इथे भारतात मंत्री कोण आहेत, हे यांना माहीत नसते; पण व्हॅटिकनमध्ये पोप कोण आहे, कार्डिनल कोण आहे, बिशप कोण आहेत ते त्यांना माहिती असते. भले आपण तितक्या अतिरेकी टोकाला जात नसलो, तरी ते चुकीचेच आहे. येशूची जी शिकवण आहे, ती आपण स्वतंत्रपणे जाणून, चिंतन करून अंगीकारू शकत नाही का? प्रत्येक वेळी व्हॅटिकनची मंजुरी आपल्या फादरांना का लागावी?

ॲडव्होकेट व्हिन्सेंट फर्नांडिस हे परिसरातील तरुण व तडफदार वकील. वकिलीची प्रॅक्टिस करत असताना विविध समाजकार्यांतही रमणारे. तसेच राजकारणातही आपला सक्रिय सहभाग दाखवणारी एक उत्साही व्यक्ती. आधीच मंचात अनुप डिसोझा हे एक वकील होते आणि त्यात आणखी एका वकिलाची भर पडली होती. व्हिन्सेंट मात्र देवळात जाणारा, सर्वसामान्य ख्रिस्ती लोकांप्रमाणे होता.

तसे पाहिले तर मंचात जे नवे लोक यायचे, तेव्हा जो-जो विषय चर्चिला जायचा, त्यामुळे एक तर ते भारावून जात असत किंवा मंचातील काही सदस्यांच्या रोखठोक स्वभावामुळे वा प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे काहीसे दडपून जात असत. एक-दोन सभा झाल्यानंतरच हे नवे सदस्य मोकळे, सैल होत आणि आपले म्हणणे मोकळेपणाने मांडू लागत. अपवाद मात्र व्हिन्सेंट यांचा.

ते जेव्हा प्रथम सभेत आले, तेव्हाच ते आत्मविेशासपूर्वक ‘धर्म का गरजेचा आहे?’ हे सांगू लागले. ‘‘स्वर्ग व नरक जे काही आहे ते इथेच आहे, दूर कोठे तरी परलोक आहे यावर माझा विेशास नाही. समजा- एखाद्याची प्रिय व्यक्ती मरण पावली असेल, तर त्याने ते दुःख एकट्याने सहन करत बसण्यापेक्षा तिथे चार धर्मगुरू जाऊन प्रार्थना करीत असतील तर त्यात वाईट ते काय? तसेच जर धर्मगुरू त्याला ‘तुझी आवडती व्यक्ती जिथे कोठे गेली असेल तिथे  व्यवस्थित आहे’, असे परलोकाचे आश्वासन देत असेल, तर त्याने त्या व्यक्तीच्या मनाला नक्कीच उभारी येणार आहे.’’ व्हिन्सेंट फर्नांडिस यांनी अतिशय चपखल असे उदाहरण दिले होते.

अंगात घातलेला फुल बाह्यांचा चांगला कलरफुल शर्ट, चाळिशीत असूनही काळेभोर केस अन्‌ आवाजातील सळसळते तारुण्य, व्हिन्सेंट यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय उमदे व रुबाबदार होते. अर्थातच, डॉ.अनुप डिसोझा यांनी प्रत्युत्तर देत त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही जर या विेश्र्वाची रचना कशी झाली ह्याबद्दल विज्ञानातील माहिती वाचली, तर तुम्हाला कळेल की- हे विेश्र्व जे आहे ते कोटी-कोटी वर्षांपासून आहे आणि आपण इथे किती काळ आहोत, तर फार-फार 80-90 वर्षे. तसं पाहिले तर काळाच्या पडद्यावर माणसाचा कालावधी अगदीच नगण्य आहे. आपण खूप कमी वेळेसाठी या पृथ्वीतलावर असतो.’’ असे म्हणत आपल्या उजव्या हाताची पाचही बोटे अलगदपणे टेबलावर ठेवून स्वतःवर संयम ठेवत, काहीसे स्मित हास्य करत ते म्हणाले, ‘‘आता... या वैज्ञानिक दृष्टिकोनाची जर जाणीव असेल, तर आपण आपल्या स्वकीयांचे मरण सहज पचवू शकतो; नाही का? त्यासाठी परलोकाच्या आश्वासनाचीही मग गरज नाही.’’

 त्यावर तरुण ॲड.व्हिन्सेंट फर्नांडिस यांचे उद्‌गार होते, ‘‘जर विवेकीपणाने वागणे चांगले असेल आणि धार्मिक राहणे चुकीचे असेल, तर मग निसर्गनियमाप्रमाणे वाईट बंद पडायला हवे आणि चांगले चालू राहायला हवे, नाही का? पण तसे तर होताना दिसत नाही. याचा अर्थ, बहुतांशी लोकांना धर्म हा हवा आहे.’’ दोन वकिलांची जुगलबंदी रंगली होती. ॲड.अनुप यावर काहीसे नरमाईने प्रतिवाद करत म्हणाले, ‘‘लोकांना धर्म हवा आहे, कारण इतक्या वर्षांचा तो पगडा आहे. धर्माशिवाय आपल्या सदसद्विवेकबुद्धीने पण जीवन जगता येते किंवा माणूस हा धर्म मानून जगता येते, हे माणसाला कळायला थोडा वेळ जावा लागेल. ही प्रक्रिया सुरू झाली आहे, पण त्याला थोडा वेळ लागेल.’’

जेव्हा कोणाच्या घरी मयत होते, तेव्हा मयताच्या कुटुंबीय व नातेवाइकांत जोरजोरात रडणे, आक्रोश करणे चालते. मृत व्यक्ती जर तरुण असेल, तर त्या दुःखमय वातावरणाची तीव्रता अधिकच गहिरी होते. कधी कधी मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी होईपर्यंतचा काळ खूपच मोठा असतो. सलग जोरजोरात शोक केल्यामुळे स्त्रीवर्गाचा घसा सुकून आवाज निघेनासा होणे, चक्कर-भोवळ येणे, ब्लड प्रेशर वाढणे-कमी होणे असे प्रकार घडतात. अशात या मयताच्या घरी 15-20 मिनिटांच्या प्रार्थनेने का होईना पण शांतता येते. प्रार्थनेत गायली जाणारी गाणी जरी अप्रस्तुत वाटली, तरी ती मयताच्या नातेवाइकांना दुःखाच्या डोंगरातून काही क्षणाकरता का होईना, पण ‘सामान्य’ वातावरणात आणतात व life goes on चा संदेश अप्रत्यक्षरीत्या निकटवर्तीयांच्या मनावर बिंबविला जातो. धर्मात ज्याप्रमाणे कर्मकांडे आहेत, त्याचप्रमाणे मानवी आयुष्यातही कृष्णविवरे आहेत. धार्मिक कर्मकांडे जरी ही कृष्णविवरे बुजवीत नसली, तरी तात्पुरती का असेना कव्हरअप मात्र करते. सर्व कर्मकांडे जर बंद पाडली, तर ही मानवी आयुष्यातील छिद्रे उघडी पडण्याचाही धोका आहेच. जर काही कर्मकांडे माणसाचे मन रिझवीत असतील व ती त्याचे कोणत्याही प्रकारचे शोषण करत नसतील, तर ती त्यांनी का करू नयेत? हा ॲड.व्हिन्सेंटचा मुद्दा भावनिक दृष्ट्या नक्कीच पटणारा होता. शेवटी माणसात फक्त मेंदूच नाही, तर मनही आहे.

पण ‘‘आपण सर्वच मरणार आहोत. या जगाचे आपण फार तर 70-80 वर्षांचेच रहिवासी आहोत आणि हे जग ज्या अनादि काळापासून येथे आहे, त्याच्या तुलनेत आपला कालावधी अगदी नगण्य आहे.’’ हे ॲड.अनुप यांचे म्हणणे मात्र मनाला तात्पुरती नाही, तर चिरकाल उभारी देते! एकदा हे वैज्ञानिक सत्य स्वीकारले की, मग कोणत्याच कर्मकांडाच्या कुबड्याचा आपल्याला आधार घ्यावासा वाटत नाही. दुर्दैवाने हा वैज्ञानिक दृष्टिकोन ल्यालेला विचार बहुतांश लोकांपर्यंत नीट पोहोचतच नाही.

‘‘धर्माचा पगडा जरी असला तरी तो किती वेळ असतो? तसे पाहिले तर आपण सगळे जण आपापल्या कामात पूर्ण वेळ व्यग्र असतो. खरं सांगायला गेलं, तर मी कोर्टात आणि माझ्या दैनंदिन आयुष्यात इतका व्यस्त असतो की, मला धर्माबद्दल विचार करायलासुद्धा वेळ नसतो. चर्चमध्ये मी किती वेळा जातो, तर मुश्किलीने दर रविवारी सकाळी एक तास. मग जर आपण आठवड्यातून एक तास धार्मिक कर्मकांडाला देत असू, आणि इतर सगळा वेळ आपण विज्ञान व इतर जीवनाभिमुख गोष्टींना देत असू तर त्यात गैर ते काय?’’ सफेद शर्ट व ब्लू जीन्स घातलेले ॲड.व्हिन्सेंट आपल्या मनातील खदखद व्यक्त  करत म्हणत होते. वकील असल्याने विचार articulate करण्याचे त्यांचे तंत्र खूपच विकसित झालेले दिसत होते. ‘‘माणूस हा समाजशील प्राणी आहे. चर्चमध्ये, देवळात जाणे यामागे एक प्रमुख कारण म्हणजे सोशलायझिंग. लोकांना तसा प्रार्थनेमध्ये फारसा रस नसतोच.’’ ॲड.व्हिन्सेंट फार प्रभावीपणे धर्माची बाजू मांडत होते. ‘‘आता माझे आई-वडील आहेत, ते वृद्ध झालेले आहेत. चर्चच्या बाजूला राहतात. थोडेफार जे काही त्यांना काम जमते, ते करतात आणि मग इतर वेळेचे काय करायचे? तर धर्म, बायबल वाचणे, प्रार्थना करणे. त्यांना ते बरे वाटते त्यांना एक मानसिक आधार लाभतो. ते रोज मिस्साला जातात; पण त्यानिमित्ताने ते रोज सकाळी उठतात, त्यांना फ्रेश वाटते, हवापालट होतो, त्यांचे समवयस्क भेटतात, काहीसा वार्तालाप होतो आणि त्यांचा दिवस चांगला जातो. तर, मी त्यांचा दिनक्रम का बरे बंद करावा या वयात? त्यांना असे कसे सांगू की, धर्म वगैरे सर्व झूठ आहे. त्यांच्यावर हा अन्यायच होईल.’’

यावर सर म्हणाले, ‘‘प्रश्न एक तास देवळात जाणे की पूर्ण दिवस जातो, हा नाही. पण जर ॲड.व्हिन्सेंटसारखा हुशार व्यक्ती जर देवापुढे नतमस्तक होत असेल, तर इतर सामान्य लोक काय विचार करणार? इतका शिकलेला हा माणूस देवळात जातोय, म्हणजे सगळंच खोटं कसं असेल? एक उदाहरण देतो. मी एका लग्नात गेलेलो तिथे काही लोक दारू पीत उभे होते. त्यातील एकजण माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘सर, थोडी घेणार का?’ मी म्हटले, ‘नाही. मी दारू पीत नाही.’ तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘अहो, त्यात काय एवढं विशेष? आपले ते लोपीस सर नाहीत का- किती मोठे शिक्षक ते- ते पण पितात’!’’ उपस्थितांत थोडी खसखस पिकली.

तोच हसत-हसत सर ॲड.व्हिन्सेंटकडे पाहत म्हणाले, ‘‘हे असं आहे. आता आपल्या आर्यभट्टालाही विज्ञानात बरीच गती होती. पृथ्वी अचल नसून ती स्वतःभोवती फिरते, हे त्याला तेव्हा माहिती होते. पण त्याने गाडगेबाबांसारखं केलं का? की- तुम्ही सगळे जण जे तिकडे गंगेच्या काठावर पूजा करता आहात, ते या बाजूने या आणि हे ऐका की, विेश्व हे असे चालत आहे म्हणून? नाही. तर, तोही गंगेमध्ये त्यांच्याबरोबर पवित्र स्नान करण्यास उतरला. आर्यभट्टाच्या या कृत्यामुळे भारतीय संशोधनक्षेत्राचं बरंच नुकसान झालं. हे असं आहे. त्यामुळे धर्म वगैरे ठीक आहे; पण ज्या स्वरूपात आपण तो आचरणात आणत आहोत, त्याने आपण शिकलेले लोक पुढच्या पिढीसाठी कोणता आदर्श ठेवत आहोत, हेही तपासणे महत्त्वाचे आहे.’’ ॲड.व्हिन्सेंटची ही पहिलीच सभा होती. नंतर मंचात येणे सुरू झाल्यावर त्याच्या हळूहळू लक्षात येऊ लागले की, मूळ विरोध हा धर्माला नसून तो धर्माच्या अविवेकी अतिरेकाला आणि धर्माच्या नावाखाली सामान्य भाविकांची पिळवणूक करणाऱ्यांना आहे. तसेच हा जो धर्माचा अतिरेकीपणा आहे, त्यामुळे भारतीय समाजाची प्रगती फारच धीम्या गतीने होत आहे. जर आपण हा धार्मिक पगडा बाजूला ठेवला, जर विवेक शाबूत ठेवला, जर आपण चर्चमध्ये- मंदिरात डोळसपणे गेलो; तर आपण अधिक परिणामकारकरीत्या धर्माचे पालन करू शकू. इतर बऱ्याच राजकीय व सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत असल्याने त्यांचे येणे नंतर काहीसे रोडावले. पण ॲड.व्हिन्सेंटसारखे तडफदार नेतृत्व मंडळात विवेकमंचाच्या निमित्ताने का होईना आले आहे, तेव्हा मंडळाच्या विेशस्त मंडळाने त्यांना आपल्या कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून घेतले होते. सामाजिक संस्थांना वकिलांची गरज असतेच. त्यामुळे प्रत्येक रविवारी जरी नसले, तरी कार्यकारिणीच्या सभेनिमित्त त्यांची महिन्यातून मंचात एकदा फेरी व्हायची. वकिलीचा गाठीशी जमा झालेला बऱ्यापैकी अनुभव, तारुण्याचा जोश आणि बोलण्याची एक विशेष लकब यामुळे ॲड.व्हिन्सेंट यांच्या बोलण्याला एके वेगळेच वजन यायचे. कधी-कधी व्हिन्सेंटने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे खूपच सुंदर अशी चर्चा या मंचात घडून यायची. एक दिवशी व्हिन्सेंटने प्रश्न उपस्थित केला की- ‘‘आरएसएसचा इतका ख्रिश्चन व मुस्लिम द्वेष का?’’ ती हिंदू धर्माची संस्था आहे हे मान्य, पण धर्मा-धर्मात सुसंवाद असू शकत नाही का? त्यांचा इतर धर्मांप्रति एवढा द्वेष का? व्हिन्सेंटच्या मताला दुजोरा देत सुनीला बोलायला लागली- ‘‘मान्य. इथले ख्रिस्ती हे मुळात हिंदूधर्मीय होते आणि त्यांना पोर्तुगीजांनी किंवा तत्सम धर्मनेत्यांनी धर्मांतरित केले. आज जरी आपण धर्माबद्दलचा अभिमान बाळगत असू, तरी आपण पोर्तुगीजांकडून अन्याय झालेला किंवा त्यांच्या  अत्याचाराला बळी पडलेला समाज आहोत. तेव्हा खऱ्या सहानुभूतीची गरज आपल्याला आहे. पण त्याऐवजी हे आरएसएसवाले लोक आपला द्वेष करतात.’’ सुनीलाने आपल्या मनातील खंत व्यक्त केली होती.

 ह्यावर सरांनी उत्तर देताना म्हटले, ‘‘अल्पसंख्याकांचा राष्ट्रवाद हा त्यांच्या धर्मापेक्षा कमी असतो, अशी आरएसएसची समजूत आहे आणि धर्मांतर केले म्हणजे त्यांनी राष्ट्रांतर केले, असे आरएसएस मानते.’’

 तेव्हा सरांना मध्येच तोडून अनुप डिसोझा बोलू लागले, ‘‘यामागे एक कारण असेही आहे की, हिंदू धर्माची सारी श्रद्धास्थाने भारतातच आहेत; पण ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म जर तुम्ही बघितलात, तर त्यांची श्रद्धास्थाने ही भारताबाहेरच आहेत. इस्राइल किंवा मक्का-मदिना येथे ती आहेत. त्यामुळे त्यांचे ते मत बनले आहे.’’

‘‘भारत-इंग्लंड मॅच होते तेव्हा ख्रिश्चनांचा पाठिंबा हा नि:संशय भारतालाच असतो आणि भारताची फुटबॉल टीम सध्या जागतिक पातळीवर पात्र नसेल, पण जेव्हा कधी ती युरो कपमध्ये खेळेल आणि जेव्हा केव्हा भारत विरुद्ध पोर्तुगाल सामना रंगेल तेव्हा मला खात्री आहे की, वसईमध्ये पाठिंबा हा भारतालाच असणार आहे...’’ ग्रॅहम असे म्हणत आहे, तोच- ‘‘तसेच 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी असो; आपण चर्चमध्ये देशाचा झेंडा सन्मानाने फडकवतो व त्याला सलामी देतो. त्यामुळे मला वाटते की, ख्रिश्चनांच्या देशभक्तीवर कोणी संशय घ्यायलाच नको.’’ सुनीला स्फुरण चढल्यासारखी बोलू लागली. त्या जोशात तिचा पाय तिनेच बाजूला ठेवलेल्या तिच्या बाईकच्या हेल्मेटला चुकून लागला.

 व्हिन्सेंटने आणखी एक प्रश्न उपस्थित करताना म्हटले, ‘‘आरएसएस म्हणते तसे भारत हे हिंदू राष्ट्र आहे. आणि त्यात काय चुकीचे आहे? इथे राहणारे हे बहुसंख्य हिंदू असतील, तर हे हिंदू राष्ट्रच झाले ना? आता आपण अमेरिका किंवा ब्रिटनला ख्रिश्चन राष्ट्र म्हणतो, कारण तिथे बहुसंख्य ख्रिश्चनच आहेत.’’

 ॲड.अनुप यावर उत्तरले, ‘‘हिंदूंची अशी काही व्याख्या नाही. हिंदू हे मूळचे सिंधू नदीच्या खोऱ्यातील. आज आपण पाहिले तर सिंधू नदी ही पाकिस्तानात आहे. म्हणजे मग जे स्वतःला हिंदू मानतात, त्यांनी पाकिस्तानात जायला हवे का? हा निरर्थक वाद आहे. भारताचे जे खरे वैविध्य आहे, ते बहुभाषिक आणि बहुधर्मीय समाजामध्ये, हे आपल्याला थोडे कळायला हवे. पण हे कळण्यातली प्रमुख अडचण ही प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दलचा वाटणारा निरर्थक अभिमानही आहे. एकदा हे मान्य केले की- केवळ माझाच धर्म नाही तर प्रत्येक धर्म आपल्याला एकाच दिशेने घेऊन जातो, मानव जातीला परोपकारच शिकवतो ही भावना येईल ती खरी महत्त्वाची.’’

 मंचाचे आणखी एक सदस्य रॉकी परेरा यांनी एक विनोदी निरक्षण नोंदवीत म्हटले, ‘‘जसे ख्रिश्चन होण्यासाठी बाप्तिस्मा घ्यावा लागतो किंवा मुस्लिम होण्यासाठी तुम्हाला सुंता करावी लागते, तसे हिंदू होण्यासाठी काहीही करावे लागत नाही. त्यामुळे मला वाटते की, जन्मतः सगळे हिंदूच असावेत.’’

तेव्हा फ्लोरी, सोनल, कॅलेट या जोरजोरात हसू लागल्या. उपस्थितांतही हशा पिकला. ‘‘धर्म हे आपल्यावर काहीही न करता आपसूक आलेलं ओझं आहे आणि त्याचा एवढा अभिमान बाळगण्याची गरज नाही. इतिहासाचे आपण सर्वच बळी आहोत. तेव्हा त्यात जेवढे कमी गुंतू तेवढे चांगले, हे मान्य करण्यापर्यंत जरी भारतीय समाज प्रगल्भ झाला, तरी खूप.’’ देशमुख यांनी मार्मिक टिप्पणी केली.

‘‘राष्ट्रवाद असो वा धर्मवाद- यामधील राष्ट्रवाद ही संकल्पना पाहिली, तर ती सतराव्या शतकातील आहे. त्याअगोदर ही संकल्पना नव्हतीच. त्याआधी राजेशाही होती. राष्ट्रवादापेक्षा किंवा देशभक्तीपेक्षाही मानवतावाद महत्त्वाचा. आता आपल्या देशाचा सैनिक जेव्हा परदेशी सैनिकाचा खून करतो, त्याला आपण पराक्रम म्हटले तर ते चुकीचेच असेल; कारण मुळात मानवधर्माच्या विरोधातील ते कृत्य आहे.’’ व्हिन्सेंटच्या हिंदू राष्ट्र या प्रश्नास उत्तर देताना सर म्हणाले.

सरांच्या मानवतावादाच्या मुद्याचा धागा अलगद उचलत त्यांचा भाचा पीटर म्हणाला, ‘‘तसं पाहिलं, तर धर्म हा विषय एका वाक्यात संपणारा आहे. मामा म्हणाले तसं ‘धर्म म्हणजे मानवतावाद’. बस्स, एवढा तो साधासरळ आहे. आपण त्याला उगाचच खूप कठीण करून ठेवलंय.’’ पीटर सहजपणे खूप मोठी गोष्ट बोलून गेला होता. त्याच्या मामाबरोबर त्याचे रेग्युलर उठणे-बसणे असावे, कारण पीटर जेव्हा बोलायचा तेव्हा त्याच्या विचारांची पक्की बैठक जाणवायची. सरांच्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर जाणवायचा.

 तोच पीटरच्या बाजूला  बसलेली त्याची बहीन कॅथरीन काहीसे ओशाळत म्हणाली, ‘‘नाही म्हणजे, थोडं विषयांतर करते; पण आज पीटर मला सांगत होता... नाही तर... पीटर, तूच सांग.’’ असे म्हणत कॅथरिनने पीटरला बोलण्यास खुणावले. ‘‘आपल्या या ग्रुपला आता एक वर्ष होईल. आपण या विवेकमंचात दर रविवारी नियमित भेटतो, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो वगैरे ठीक आहे; पण आपण आता काही तरी कार्यक्रम राबवायला हवा, काही तरी कार्य करायला हवं. नुसती चर्चा किती करायची?’’ कॅथरिन व पीटर ही भावा-बहिणींची जोडी कित्येक वर्षांपासून मंडळात कार्य करत होती. त्यांना विविध कार्यक्रम राबविण्याची आवड होती. त्यांच्यातील कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यात मंडळातील इतर विभागांतील कार्यकर्त्यांचे ‘विवेकमंचात धर्माशी संबंधित नकारात्मक चर्चा चालते’ असे कुजबुजणे यांच्या कानांवर आले होते. तेव्हा मंचावरील प्रेमापोटी काही तरी कार्य करून बोलणाऱ्यांची तोंडे बंद करावीत, हाही त्यांचा एक हेतू होता.

‘‘मंच स्थापन झाल्याला आता पुढच्या महिन्यात एक वर्ष होईल, तेव्हा आपण एक प्रबोधनात्मक एखादा कार्यक्रम करू शकू.’’ सर उत्तर देत म्हणाले. एव्हाना सकाळचे 11 वाजून 15 मिनिटे झाली होती. मंचाची सभा काहीशी लांबली होती. कधीकधी सभा संपूच नये, असे वाटे. मनात जे काही प्रश्न, शंका-कुशंका असतील, त्या सभेसमोर व्यक्त कराव्याशा वाटत.

मलाही त्या सभेत एक मुद्दा मांडायचा होता पण या लांबलेल्या वाद-विवादामुळे तो मांडायचा राहून गेला होता. (आयसिस) दहशतवादी संघटनेसंबंधी तो मुद्दा होता. आयसिसच्या दहशतवादी कारवायांनी जगात खूपच धुमाकूळ घातलेला आहे. या संस्थेविषयी एक बातमी तेव्हा माझ्या वाचनात आली होती. किंबहुना, ग्रॅहमनेच ती बातमी मला प्रथम सांगितली होती.

‘आयसिस’ संघटनेचा एक हस्तक हा बेंगळुरुमध्ये सापडला होता, त्यासंबंधी ती बातमी होती. तुम्ही भले कोणत्याही देशाचे नागरिक असा; पण इस्लाम धर्मावर आधारित असे इस्लाम धर्मीयांचे ‘एक इस्लामिक स्टेट’ हवे अशी संकल्पना ‘आयसिस’च्या मागे आहे. या संकल्पनेच्या उद्देशपूर्तीसाठी ते खूपच अतिरेकी टोकाला जात आहेत. जगभरात झालेले विविध दहशतवादी हल्ले ही त्याचीच परिणिती आहे.

मला खूप अस्वस्थ वाटले होते ती बातमी वाचून. जेव्हा मला बातम्यांतून कळले की, बेंगळुरुमधून त्याच्या एका हस्तकाला अटक केली, तेव्हा मला खंत वाटली आणि मी ती सरांना बोलून दाखवली. ‘‘राहायचे इथे, भारत सरकारने दिलेले सगळे नागरी फायदे घ्यायचे, शिक्षण इथे घ्यायचे, नोकरी इथे करायची, पगार इथे घ्यायचा, सर्व सुख-सुविधांचा उपभोग इथे घ्यायचा आणि रमायचे कुठे? तर, इस्लामिक स्टेटमध्ये! हे किती चुकीचे आहे?’’

 त्यावर सरांनी मला व ग्रॅहमला जी प्रतिक्रिया दिली, तिने मात्र आम्ही गप्पच झालो. सर म्हणाले, ‘‘एक धर्म- एक राष्ट्र ही संकल्पना बऱ्याच राष्ट्रांनी अवलंबिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या देशातही आपण हिंदू राष्ट्राचा धुरळा उठलेला पाहतो. पण इस्रायलवगळता तो प्रयोग कुठे यशस्वी झालेला नाही आणि हे फक्त हिंदू-मुस्लिमांतच नाही, तर आपल्या ख्रिश्चन धर्मातही होते. आपले सर्व फादर, धर्मगुरू हे सर्व इथे वाढलेले व राहणारे, परंतु यांचे लक्ष कुठे असते- तर व्हॅटिकनकडे. इथे भारतात मंत्री कोण आहेत, हे यांना माहीत नसते; पण व्हॅटिकनमध्ये पोप कोण आहे, कार्डिनल कोण आहे, बिशप कोण आहेत ते त्यांना माहिती असते. भले आपण तितक्या अतिरेकी टोकाला जात नसलो, तरी ते चुकीचेच आहे. येशूची जी शिकवण आहे, ती आपण स्वतंत्रपणे जाणून, चिंतन करून अंगीकारू शकत नाही का? प्रत्येक वेळी व्हॅटिकनची मंजुरी आपल्या फादरांना का लागावी? त्यामुळे ही भावना फक्त मुस्लिमांतच नाही, तर दुर्दैवाने ख्रिश्चन लोकांमध्ये व हिंदू राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हिंदूंमध्येही आहे; फक्त इतके हिंसक स्वरूप तिने घेतलेले नाही, एवढेच.’’ सरांनी खरंच माझे डोळे उघडणारे वक्तव्य केले होते.

‘‘सरांचं बरोबर आहे. बघ, तुला मी सांगत नव्हतो- आपल्या धर्मातही अतिरेकीपणा आहे. अक्कल गहाण ठेवून श्रद्धा मानणारे आपण नाही का पाहत आपल्याकडे?’’ घरी परतताना ग्रॅहम मला म्हणत होता. अतिरेकी म्हणून ज्या परकीय धर्माकडे बोट दाखवीत मी सरांकडे गेलो होतो, त्यांनी माझ्या स्वतःच्या धर्मातील अतिरेकीपणा बघण्यास मला माझ्या डोळ्यांवरील झापडं किलकिली करायला लावली होती. मी ग्रॅहमच्या बोलण्याला फक्त ‘हूं’ करत होतो. ‘‘आय थिंक, देव-देव हे आता मोठ्ठं lie आता आपण गुंडाळून ठेवायला हवे.’’ ग्रॅहमचा नास्तिकाकडे प्रवास इतक्या लवकर होतोय, याचे मला आश्चर्य वाटले आणि काही प्रमाणात हेवाही वाटला. देव, स्वर्ग, नरक, चमत्कार हे सगळं थोतांड आहे याबाबत संदेह नव्हता; पण या सर्वापलीकडे धर्माचं एक सामाजिक किंवा सांस्कृतिक मूल्य मात्र मला अजूनही आकर्षित करत होतं. एकत्र येऊन विविध धार्मिक उत्सव साजरे करणे, धर्मातील कथा शब्दशः न घेता त्याकडे प्रतीकात्मकरीत्या एक मनोरंजन म्हणून पाहणे- यात मला अजून तरी काही वावगे वाटत नव्हते. पण ग्रॅहमला हे सगळं कसं समजावू, हेच कळत नव्हतं. किंबहुना, ऍथिस्टपेक्षा ग्रॅहम अँटी-रिलिजनच जास्त वाटत होता. एव्हाना रॉयलचं त्याच्या इतिहास या विषयातील पार्ट टाइम MA च्या लेक्चरमुळे व इतर सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे मंचात येणं काहीसं मंदावलं होतं. त्यामुळे आमचं त्रिकूट काहीसं विस्कटलं होतं. मंचातील चर्चेसाठी येताना मला माझ्या मित्रांनाही भेटण्यासाठी एक निमित्त मिळत होतं. पण हळूहळू मला याची सवय करायला लागणार होती... शेवटी काहींना काय हवं- काय नको ते चटकन गवसते, तर काहींना मात्र बरीच पायपीट करत लांब प्रवास करावा लागतो...

Tags: मंच चर्च पोर्तुगीज विवेकमंच मृत्यु धर्म manch vasai church church Portugies Vivekmanch Death Religion weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात