डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गेल्या वर्षी गुड फ्रायडेच्या दिवशी या मंचाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अशा उदात्त हेतूचा शुभारंभ करण्यासाठी आपल्याला लाभले होते ते अवघ्या महाराष्ट्रात विवेकमंचाची पताका फडकावत ठेवणारे डॉ.नरेंद्र दाभोलकर. त्या सभेला आपल्यापैकी बरेच जण हजर असतील. मीही होतो. विवेकवाद हा काही धर्माविरुद्ध नाही, उलट विवेकवादामुळे आपण अधिक प्रगल्भरीत्या धर्माचे आचरण करू शकतो आणि विवेकवादाचा वापर करून आपण आपलं आयुष्य अधिक समृद्ध करू शकतो, हे त्यांनी त्यांच्या विचारातून श्रोत्यांना पटवून दिले होते. दुर्दैवाने अवघ्या सहा महिन्यांतच त्यांची निर्घृण हत्या झाली. काही अविवेकी, धर्मांध प्रवृत्तीच्या लोकांनी डॉक्टरांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. अवघा देश हळहळला. या अमानुष प्रकारात जरी डॉक्टर दगावले असले, तरी त्यांचा विचार मात्र त्या मारेकऱ्यांना संपविता आला नाही; उलट त्यांच्या मृत्यूनंतर तो विचार अधिकच झळाळू लागला. या घटनेनंतर आपला विवेकमंचही अधिक सक्रिय झाला.’’

कधी-कधी विवेकमंचात असे लोक यायचे, जे खूपच धार्मिक असायचे. चर्चमध्ये जाणे, धार्मिक रीती-रिवाज, कर्मकांडे हे सर्व कळत-नकळत ते करत असायचे. पण चर्च, धर्म हे सर्व साग्रसंगीत करत असतानाही त्यांच्या मनात कुठे तरी एक असंतोष खदखदत असायचा लोकांच्या दांभिकतेविषयी, लोकांच्या ढोंगी श्रद्धेविषयी. असे लोक मग मंचात यायचे. त्यांचे मन हलके करून जायचे. पळसवाडी परिसरातील धार्मिक लेखन करणारे लेखक फ्रान्सिस आल्मेडा हे त्यांपैकी एक. आपण भाविक किती ढोंगी असतो याविषयी त्यांच्या मनात सल टोचत होता, डिसोझासरांकडून त्यांना या विवेकमंचाविषयी माहिती मिळाली आणि मंचाच्या एका सभेत ते आले.

‘‘आमच्या पळसवाडी चर्चमध्ये माऊलीचा पुतळा उभा करायचा होता. म्हटलं, ‘बरं, तुम्ही मोकळी जागा विकत घेऊन तिथे पुतळा उभारणार असाल, तर ठीक आहे; पण भर रस्त्यामध्ये- जो वर्दळीचा व सार्वजनिक रस्ता आहे- तो तुम्ही पुतळा उभारण्यासाठी कसा बळकावू शकता?’ या लोकांनी तो रस्ता बळकावला, तेथील जागेवर अतिक्रमण केलं आणि तिकडे त्यांनी भर रस्त्यामध्ये माऊली उभी केली. आपण त्यांना विरोध तर करू शकत नाही. विरोध करायला गेलात तर तुम्ही धर्माच्या विरोधात आहात असे पुन्हा हे बोलण्यास मोकळे!’’

काहीसे अलिप्त वाटणारे फ्रान्सिस अगदी हलक्या आवाजात सांगत होते... ‘‘आपण नेहमी सांगतो की, फादरने हे सुंदर प्रवचन दिले, ते सुंदर प्रवचन दिले, पण आपण प्रवचनात सांगितल्यासारखे वागतो का? नाही. आपण एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. कृतिविना श्रद्धा व्यर्थ आहे. चर्चमध्ये जे अर्पणपात्र आहे, त्यामध्ये ‘बाजूच्याने फक्त 10 टाकले, मी तर 50 टाकले’ हे आपण इतरांना प्रौढीने सांगतो. पण एखाद्याने अर्पणपात्रात काहीही टाकले नसेल; मात्र जर घरी एखादा भिकारी आलेला आहे; त्याला त्याने जेवू घातले तर ती खरी सेवा. आपला धर्म सेवेचा आहे.’’ फ्रान्सिस आल्मेडा हे त्यांच्या मनातील सारी खदखद बाहेर काढत होते.

पुतळ्याचा मुद्दा ऐकताच जगभरात प्रवास केलेले ॲड.अनुप यांना त्यांचं एक निरीक्षण मांडण्याचा मोह आवरला नाही. ‘‘मी संपूर्ण युरोप, अमेरिकेत फिरलो आहे. घराच्या आवारात क्रूस किंवा माऊलीची इमेज कुठेच नाही. परंतु आपल्याकडे ‘देव म्हणजे माझ्या खिशात’ या वृत्तीनुसार आपण घरोघरी पुतळे उभारतो. हे धर्माचे बाजारीकरण नाही तर काय?’’ अनुप डिसोझांनी त्यांचं कटू निरीक्षण मांडलेलं होतं.

तेव्हा ज्येष्ठ सदस्य पास्कोल डिसोझा यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले, ‘‘अध्यात्म आणि धर्म यातील फरक आपल्या लोकांना समजलाच नाही. आपले एक फादर आहेत. त्यांनी ‘अध्यात्म आणि धर्म यातील फरक काय?’ याविषयी एक सुंदर उदाहरण सांगितले होते. भावाला मारायला निघालेला भाऊ... चर्चचा घंटानाद झाला म्हणून तो कोयता बाजूला ठेवतो, गुडघे टेकतो व प्रार्थना करतो आणि परत कोयता घेऊन त्याच्या भावाला मारावयास निघतो. यात त्या व्यक्तीने गुडघे टेकले हा त्याचा धर्म; पण जर त्याने त्याच्या भावाला मारण्याचा विचार सोडून दिला असता, तर ते त्याचं खरं अध्यात्म ठरलं असतं. लोक फक्त धर्म-धर्म करत बसतात, पण अध्यात्माचे पाणी काही मनात पडतच नाही. आपण कोरडे ठणठणीतच राहतो.’’

तात्यांनी नुकतेच त्यांच्या ‘रिटायर्ड बट नॉट टॉयर्ड’ ग्रुपमध्ये पास्कोल डिसोझा यांनाही चौथे मेंबर म्हणून घेतलेले होते. पंच्याहत्तरीच्या पुढे गेलेले व हातात काठी घेऊन येणारे पास्कोल डिसोझा मात्र वाचन करणारे, अभ्यासू वृत्तीचे होते. एरवी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत बोलणारी फ्लोरी या वेळी मात्र गंभीर चेहरा करत म्हणाली, ‘‘असं म्हणतात की- आपण रिलिजन, कस्टम्स, कल्चर यांचे स्लेव्हज आहोत, हेच बहुतेकांना माहिती नसतं. ते जर माणसाला एकदा कळलं, तर तो पेटून उठेल. We actually need to emancipate ourselves from mental slavery.’’ ती आणि तिची बहीण सोनल या दोघी उपस्थित होत्या.

‘‘ख्रिस्ती बनू नका, तर ख्रिस्त बना. धर्माची शिकवणूक डोळे बंद करून आचरणात आणू नका. ख्रिस्ताची शिकवणूक समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा...’’ नॉर्मननेही त्याच्या वाचनात आलेल्या एका वाक्याचा दाखला देत म्हटले. ‘‘आपल्या भारतात पूर्ण दिवस शेतात काबाडकष्ट करणारा शेतकरी मन रिझविण्यासाठी देवाची आराधना करतो. अध्यात्म, देवाशी संवाद हे सगळं त्याच्या आकलनापलीकडचं असतं किंवा तितका विचार करण्यासाठी त्याच्याकडे ऊर्जाही शिल्लक नसते. श्रद्धा, भक्ती काही वाईट नाही. ती मन रिझविते, विरंगुळा देते, पण इग्नेशिअस लॉयलो म्हणतात त्याप्रमाणे परमेश्वर आणि भक्त यांचे नाते हे वैयक्तिक असावे, त्यात इतर कोणी मध्यस्थ नको.’’ सुनीलाने म्हटले.

केसांत माळलेला गजरा, गुलाबी रंगाची नेसलेली साडी... सुनीला चर्चमधून तडक मंचाच्या सभेस आलेली दिसत होती. मंचाचे सदस्य अशी चर्चा करत आहेत, तोच एक युवक आत आला. सावळा रंग, मान खाली झुकलेली अशी ती तिशीतील व्यक्ती मागच्या रांगेत पीटरच्या बाजूच्या खुर्चीत येऊन बसली. ‘‘ये मोहन, बैस. तुझे या विवेकमंचात स्वागत.’’ असे म्हणून सरांनी त्याचे स्वागत केले व पुढे म्हणाले, ‘‘हे मोहन पेडणेकर. मागच्याच आठवड्यात माझी याच्याशी भेट झाली. मीच त्याला ‘विवेकमंचाच्या सभेस ये’ म्हणून सांगितलं होतं. मोहन, तूच तुझी कथा या सर्वांना सांग.’’

मोहनने बोलण्यास सुरुवात केली... ‘‘नमस्कार. माझी ओळख सरांनी आत्ताच करून दिलेली आहे. मी राहायला विरारला आहे. एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. माझं लग्न काही केल्या जमत नव्हतं. उपवर मुलीबरोबर माझी कुंडलीच जुळत नव्हती. मी पत्रिका न जुळल्यामुळे तब्बल 16 मुली नापसंत केल्या. शेवटी वयाच्या 31व्या वर्षी एका मुलीची पत्रिका माझ्या पत्रिकेशी जुळली. आम्ही विवाहबद्ध झालो...’’ क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला,  ‘‘पण तीन महिन्यांतच आमचा विवाह मोडला.’’ मोहनचा आवाज आता थोडा घोगरा झाला होता. त्याने मान खाली घातली. आवंढा गिळला अन्‌ म्हणू लागला, ‘‘आता वाटते, जेवढा वेळ कुंडली जुळत आहे की नाही हे पाहण्यात खर्ची घातला; त्याऐवजी मनं जुळतायत की नाही हे पाहिलं असतं. तर एव्हाना यशस्वी वैवाहिक आयुष्य जगत असलो असतो!’’ तो बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली करुण हास्याची लकेर आणि त्याच्या त्या कटु अनुभवाच्या बोलांनी अस्वस्थ वाटलं.

‘‘आपल्याकडे लग्न जुळवताना कुटुंब, खानदान, धर्म, जात सर्व पाहिलं जातं. पण विवाह दोन धर्मांतील, जातींतील वा कुंडलींतील नसतो; तर तो दोन माणसांतील असतो याची आपणाला जाणीवच नसते.’’ सुनीलाने नेहमीप्रमाणे आपले सडेतोड निरीक्षण नोंदविले.

अशी विविध मतांतरे चर्चिली जात आहेत तोच लायब्ररीचे उपाध्यक्ष संजय रॉड्रिग्ज व कार्यवाह रॉबर्ट फरेरा हे दोघे, मंडळाचे प्रमुख विश्वस्त बस्त्याव लोपीस यांना घेऊन सभेमध्ये आले. एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात चष्म्याचे कव्हर घेतलेले प्रमुख विश्वस्त तडक बोलू लागले, ‘‘माफ करा, सभेत व्यत्यय आणतोय. पण तुमचे ते विवेकमंचाचे सदस्य पावन निर्मळकर यांना त्या दिवशी काही पुस्तक हवे होते म्हणून ते लायब्ररीत आले होते. आता जर एखादं पुस्तक उपलब्ध नसेल तर त्यांनी दुसरं पुस्तक घ्यायला हवं होतं किंवा परत काही दिवसांनी विचारणा करायला हवी होती. पण रागाने ‘तुमच्याकडे पाहिजे ती पुस्तके कधी मिळतच नाहीत, नेहमी दुष्काळच असतो पुस्तकांचा!’ असे म्हणत ते माघारी फिरले, इथल्या लायब्ररीयनवर ओरडले आणि लायब्ररीतून बाहेर निघाल्यावर आपल्या आवारात जे रक्तदान शिबिराचे बॅनर लावलेले होते, ते त्यांनी पायदळी तुडवले. नंतर कळलं, त्यांनी वरती आपल्या पतपेढीमध्येही आवाज वाढवला होता म्हणे. हा तुमचा विवेक का? विवेकमंचात हाच विवेक तुम्ही शिकता? हे खूप चुकीचे आहे. आपले काही लोक तर त्यांच्यावर हात उचलायला जाणार होते, मी त्यांना अडवले. असे का त्यांचे हे वागणे विक्षिप्त?’’ प्रमुख विश्वस्त त्यांचा पावन निर्मळकरांवरचा राग सर्वांसमक्ष बोलून दाखवत होते.

त्यावर सर म्हणाले, ‘‘त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात थोडा प्रॉब्लेम चालू आहे, त्यांना समजून घ्या. त्यांची पत्नी दुबईला आहे, ते दुबई सोडून इथे आलेले आहेत, त्यामुळे थोडासा गोंधळ चालू आहे. मी त्यांच्याशी बोलतो.’’

‘‘ते काहीही असो, ती त्यांची वैयक्तिक गोष्ट आहे, म्हणून असे वागावे? त्यांचे स्खलन होत नाही, ते दिसतेच आहे.’’ संजय रॉड्रिग्ज अजूनही रागात होते. त्यानंतर लायब्ररीचे जे प्रमुख होते, त्यांनी आणखी एका मुद्याला हात घातला- ‘‘सर, आणखी एक सांगायचे आहे. तुम्ही ही जी विवेकमंचाची सभा आहे, ती कृपया इथे लायब्ररीमध्ये घेऊ नका. कारण लायब्ररीमध्ये ज्यांना शांतपणे वाचायचे असते, त्यांना उगाचच डिस्टर्ब होतो, त्रास होतो. वरती आपला हॉल आहे तिथे सभा घ्या.’’

‘‘आम्ही काही इथे गप्पा मारत नाही. एखाद्या विषयाला धरूनच आमची चर्चा असते. असे कित्येक वेळा झालेले आहे की, लायब्ररीमध्ये वाचक पुस्तक घ्यायला आलेले आहेत आणि इथली चर्चा ऐकून ते या चर्चेत सहभागी झालेले आहेत.’’ मंचाची बाजू घेत पीटर म्हणाला.

‘‘आणि आमच्यासारखी बरीच ज्येष्ठ मंडळीही येत असतात, त्यांना असं प्रत्येक रविवारी तिसऱ्या मजल्यावर चढणे शक्य होणार नाही.’’ पास्कोल डिसोझा यांनी ज्येष्ठांच्या वतीने म्हटले. ‘‘आपण काही रोज इथे बसत नाही, आठवड्यातून एखादा तास जमतो आणि चर्चा करणे चांगलेच आहे ना; ते ही वैचारिकच आहे की!’’ कॅथरिनलाही लायब्ररीतून चर्चा हटविणे आवडलेले नव्हते. पण लायब्ररीचे उपाध्यक्ष आणि कार्यवाह दोघेही आपल्या म्हणण्यावर ठाम होते. शेवटी आम्हीच लायब्ररीच्या बाहेर लागूनच एक छोटीशी खोली आहे तिथे सभा घेण्याचे ठरविले.

पावन निर्मळकर यांचे काही महिन्यांपासून मंचात येणे काहीसे थांबले होते. या प्रकारानंतर त्यांचे विवेकमंचाच्या सभेस येणे पूर्णपणे बंद झाले. त्यांनी म्हणे कोणा परिचिताला त्याच्या बिझिनेसमध्ये कर्ज घेण्यासाठी जामीनदार म्हणून सही दिली होती. त्या व्यक्तीला बिझिनेसमध्ये अपेक्षित फायदा झाला नाही आणि त्याने कर्जाचे हप्ते भरण्याचे सोडून दिले. तेव्हा आता मंडळाची पतपेढी कर्जवसुलीसाठी निर्मळकरांच्या मागे लागली होती, त्यामुळे ते बरेच चिंतेत होते. त्यांचे तसे खरे नाव विल्सन डिसिल्व्हा. ते धर्मगुरू होण्यासाठी गेले होते.

ते जेजुइट सेमिनरीत 15 वर्षे होते.  पण मधेच वयाच्या चाळिशीत त्यांनी तेथील उच्चपदस्थांचा भ्रष्ट स्वभाव पाहिला व सेमिनरी सोडली. ते दुबईला गेले व तेथील शाळेत शिकवू लागले. यादरम्यान ते एका ननच्या संपर्कात होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. तिनेही मग कॉन्व्हेंट सोडले आणि तीही त्यांच्याकडे दुबईला गेली. तिथे त्यांनी लग्न केले. काही काळाने एक मुलगीही दत्तक घेतली. वसईला परत येऊन सर्वसामान्य आयुष्य जगू, अशी स्वप्ने पाहत, दुबईला कमावलेले पैसे त्यांच्या वसई येथील कुटुंबीयांकडे पाठवत राहिले. पण इथे आल्यावर त्यांना कळले, त्यांच्या नातेवाइकांनीच त्यांचे सारे पैसे हडपले आहेत. त्यांचा विश्वासघात झालेला होता. धर्मगुरूच्या वैराग्याला कंटाळून ते सांसारिक भूमिकेत आले खरे... पण इथेही वेगळी आव्हाने आहेत; दैनंदिन संघर्ष, स्वार्थी जगणे आहे याची जाणीव त्यांना झाली. आता दोघांनाही सहजीवनातही रस उरला नव्हता, दोघांना वैराग्याच्या आयुष्याची सवय जडली होती. मग ते मुलीला घेऊन येथे वसईला परत आले, तर त्यांची पत्नी तिथेच राहून शाळेत शिकवू लागली. इथे आल्यावर जे काही पैसे होते, त्यात येथे घर बांधून ते राहू लागले.

सेमिनरीत असताना त्यांनी बुद्धाच्या विपश्यनेचा अभ्यास केलेला होता. त्याने ते प्रभावित झालेले होते. तेव्हा ते वसईत परत आल्यावर गावाबाहेर दलित वस्तीत जाऊन, तेथील लोकांना गोळा करून त्यांनी मोकळी जागा साफ केली आणि तिथे स्वखर्चाने बाग फुलवून मधोमध बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. रहदारीच्या ठिकाणी कुठे चिखल दिसतो आहे, मग पेव्हर ब्लॉक आणून टाक... कुठे भर रस्त्यात खड्डा दिसतोय- मग तो बुजव, असे स्वतःचे पैसे खर्च करून ते त्यांच्या परीने समाजकार्य करत होते. सेमिनरी जॉईन केल्यावर त्यांचा अपेक्षाभंग झाला होता, त्यामुळे त्यांचा गोंधळ उडालेला होता. अगोदर मला विक्षिप्त वाटलेले पावन निर्मळकर खरं तर मनस्वी स्वभावाचे होते.

निर्मळकर यांच्या निमित्ताने मंडळात विवेकमंचाविषयी असलेली अस्वस्थता समोर आली होती. मंडळात कुजबुज सुरू झाली होती- हे लोक फक्त बसून चर्चा करतात, काम काहीच करत नाही. तसेच चर्चेदरम्यान ती धर्मविरोधात काहीबाही बरळतात. नाही म्हणायला येथील चर्चा ऐकून या सभेस रेग्युलर येणारे बरेच जण ॲलर्ट झाले होते. प्रत्येकाला आपापल्या धर्मातील दोष दिसू लागले होते. एव्हाना विवेकमंच ग्रुप स्थापन झाल्याला एक वर्ष होत आलेलं होतं. त्या निमित्तानं एक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याचे ठरले. त्याला ‘प्रेरणा’ या मासिकात योगायोगाने आलेला धर्मगुरूंचा एक लेख कारणीभूत ठरला. ‘प्रेरणा’ हे मासिक म्हणजे वसईतील चर्चचे अधिकृत मुखपत्र. गेल्या 60 वर्षांपासून हे वसई येथील पाली येथून प्रकाशित होत आहे. मुख्यत्वेकरून धार्मिक व सामाजिक लेख यात प्रकाशित होत असतात. त्यातही चर्चची बाजू भरभक्कमपणे मांडलेली असते. त्यामुळे धर्मावरील चिकित्सात्मक लेख छापून येण्याचं प्रमाण खूपच नगण्य असतं.

अशातच फेब्रुवारीच्या एका ‘प्रेरणा’ अंकात फादर जोशवा डिमेलो नामक एका धर्मगुरूंचा खूपच सुंदर लेख आला होता. ‘धर्म आणि विवेकवाद हे एकमेकांचे शत्रू नसून, ते एकमेकांस पूरक आहेत. तसेच बायबलमधील चमत्कार शब्दशः ना घेता ते कसे प्रतीकात्मकरीत्या घेणे गरजेचे आहे,’ हे त्यांनी उदाहरणाद्वारे स्पष्टपणे मांडलं होते. येशूने भुते काढली याचा अर्थ- त्याने माणसातील वाईट प्रवृत्ती दूर केली. मुके, बहिरे, आंधळे यांना बरे केले म्हणजे- त्यांना जगण्याचा आत्मविश्वास दिला. धर्माची कास धरताना आपण विज्ञानाचीही साथ द्यायला हवी, असे अतिशय पुरोगामी विचार त्यांनी मांडले होते. प्रेरणामध्ये हा लेख प्रकाशित झाला, तेव्हा सोनलनेच ही बाब प्रथम आम्हा सर्वांच्या निदर्शनास आणून दिली. ‘‘असे विवेकी विचार जेव्हा धार्मिक नेते मांडतात, तेव्हा आपण अशा विचारांचे स्वागत करायला हवे. मला वाटते, आपण सगळे त्यांना फोन करून त्यांचं अभिनंदन करू या. मी त्यांचा मोबाईल नंबरही आणलाय.’’ असे सोनलने म्हटले आणि मंचानेही तिच्या कल्पनेचे स्वागत केले. बऱ्याच सदस्यांनी फादर जोशवा यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले.

विवेकमंचाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त त्यांनाच व्याख्यानासाठी आमंत्रित करण्याचं ठरलं. पहिला कार्यक्रम असल्याने, तसेच लोक जमावेत या हेतूने ॲड.अनुप यांनी या कार्यक्रमात ‘वसई ख्रिस्ती सभा’ या संघटनेलाही सहभागी करण्याचं ठरवलं. जेणेकरून त्या संघटनेशी निगडित लोकही या कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यामुळे समाज विकास मंडळाचा विवेकमंच व वसई ख्रिस्ती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करण्याचं ठरलं.  विवेकमंचातर्फे होणाऱ्या या पहिल्या-वहिल्या कार्यक्रमासाठी तयारी सुरू झाली. पीटर व कॅथरिन या दोहोंना सुरुवातीपासून वाटायचे की, विवेकमंचातर्फे काही तरी खुला कार्यक्रम व्हावा. त्यांनी मंचातही तसे बोलून दाखवले होते. त्यामुळे यथावकाश व्याख्यानाचा पहिला प्रबोधनात्मक कार्यक्रम होतोय, हे कळताच पीटर एकदम अंगात उत्साह संचारल्यासारखा या कार्यक्रमाच्या तयारीस लागला. त्याच्या जोडीला आम्हीही होतोच. मजकूर तयार करून बॅनर छापणे, ते नाक्यावर तसेच मंडळाच्या बाहेर व इतर मोक्याच्या ठिकाणी जाऊन लावणे, कार्यक्रमाची जाहिरात करणे, कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे, पाहुण्यांच्या चहा-पाण्याची व्यवस्था करणे, मंडळाच्या हॉलमध्ये व्याख्यानाची सर्व तयारी करणे- अशी सर्व पातळ्यांवर तयारी सुरू झाली. 

त्या वेळेला जॉन आल्मेडा हे मंडळाचे अध्यक्ष होते. ते बऱ्याच वेळेला विवेकमंचाच्या सभेस यायचे. विवेकमंचाचे वेगळेपण त्यांना जाणवलं होतं. त्यामुळे कार्यक्रमाच्या तयारीसाठी त्यांचंही बरंच सहकार्य लाभलं. एव्हाना लायब्ररीच्या कार्यकारिणीतून विवेकमंचाचे कार्यवाह म्हणून माझी नियुक्ती झाली होती. त्यामुळे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. एरवी चर्चमध्ये किंवा ‘कुपारी अड्डा’च्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमात मी लोकांना संबोधित केले होते, पण हा कार्यक्रम वेगळा होता. इथे समाजकारणात मुरलेल्या बऱ्याच व्यक्ती येणार होत्या. त्यामुळे मनात खूप धाकधूकही होती. अखेर तो दिवस उजाडला. रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडणार होता. साडेतीनलाच आम्ही मंडळावर पोहोचलो. फादर जोशवा कार्यक्रमाच्या 15 मिनिटे अगोदरच मंडळात पोहोचले होते. खादी कुर्ता घातलेले, डोक्यावर विरळ केस असलेले व फ्रेंच कट ठेवलेले ते फादर टिपिकल ख्रिश्चन धर्मगुरूसारखे वाटतच नव्हते. त्यांच्या बोलण्यात वर्टीसर, बाबा आमटे, कुसुमाग्रज यांचे संदर्भ ऐकून ते महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेले व गाढ चिंतन असलेल्या एका ज्ञानी माणसासारखे जाणवले.

त्यांचं चहापाणी होत असताना मंडळाचे काही ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्या बाजूला बसून त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारीत बसले होते. वसईमध्ये रोमन कॅथॉलिक पंथात मुख्यत्वेकरून दोन प्रकारचे धर्मगुरू आहेत. एक म्हणजे बहुतांशी आढळणारे धर्मप्रांतीय धर्मगुरू तर दुसरे म्हणजे येशूसंघीय धर्मगुरू. वेगवेगळ्या चर्चेसमध्ये मिस्साबली व धार्मिक विधी करणे हे धर्मप्रांतीय धर्मगुरूचे प्रमुख काम. चर्चशी सलंग्न ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत, त्यादेखील धर्मप्रांतीय धर्मगुरूंच्या अखत्यारीत येतात. हे धर्मगुरू बिशपांच्या आदेशाखाली कार्यरत असतात. सर्वसामान्य लोकांसमोरील व्हॅटिकनप्रणीत चर्चचा चेहरा म्हणजे हे पांढऱ्या झग्यामधील धर्मप्रांतीय धर्मगुरू. तर, येशूसंघीय धर्मगुरूंना बिशपांचे आदेश पाळणे बंधनकारक नसते तसेच हे धर्मगुरू चर्चमध्येच कार्यरत असलेच पाहिजेत, असेही बंधन नसते.

येशूसंघीय वा जेजुईट काही धर्मगुरू शैक्षणिक संस्था चालविण्याचे काम करतात, तर काही पूर्णतः वैराग्याप्रमाणे राहतात. इग्नेशिअस लॉयलो या धर्मगुरूने 1539 मध्ये चर्चच्या सत्ताकारणाला वैतागून धर्मगुरूंसाठी दुसरा पंथ स्थापन केला. त्याला जेजुईट वा येशूसंघीय धर्मगुरू असे त्याने नाव दिले. पुढे त्याला पोपनेही मान्यता दिली व ते चर्चचाच एक भाग बनले. धर्मप्रसार, शिक्षणप्रसार यात येशूसंघीय धर्मगुरूंनी मोठे योगदान दिलेले आहे. जगभरात उत्तमोत्तम शैक्षणिक संस्था जेजुईट धर्मगुरूंनी स्थापन केलेल्या आहेत. जेजुईट वा येशूसंघीय धर्मगुरू हे स्वतंत्र विचार करणारे, बुद्धिमान, धीट मानले जातात. थोडक्यात, ते चर्चपेक्षा चर्चच्या बाहेरच जास्त रमणारे असतात. धर्मप्रांतीय धर्मगुरू हे सेमिनरीत जाऊन सहा वर्षांत धर्मगुरू होऊ शकतात, तर जेजुईट धर्मगुरू बनण्यासाठी तब्बल 12 वर्षे खर्ची घालावी लागतात.

जोशवा डिमेलो हेही येशूसंघीय वा जेजुईट धर्मगुरू होते. ऐन तारुण्यात धर्मगुरू म्हणून त्यांनी आनंदवनात बाबा आमटेंची भेट घेतली, तेव्हा बाबांनी ‘ख्रिश्चॅनिटीविरुद्ध चर्चानिटीच्या लढाईत मी ख्रिश्चॅनिटीच्या बाजूने उभा आहे’ असे सांगून या तरुण धर्मगुरूला ख्रिस्ताच्या मूळ शिकवणुकीसाठी ठामपणे उभे राहण्याचा सल्ला दिला होता. तसेच जेजुईट धर्मगुरूचे शिक्षण घेत असताना ‘अंकुर’ नावाचे धर्मसुधारक मासिक ते प्रकाशित करत असत. तेव्हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनीही त्यांचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले होते की- धर्माच्या कर्मकांडांपेक्षा धर्माच्या मूलतत्त्वांची जाणीव भाविकांत निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आपल्या अभ्यासातून आणि आपण प्रसिद्ध करत असलेल्या ‘अंकुर’ षण्मासिकातून जाणवतो, तो स्तुत्य आहे...’ फादर जोशवा  त्यांचे हे असे विविध अनुभव चहापाणी घेत असताना मंडळातील सदस्यांसमोर कथन करत होते.

एव्हाना कार्यक्रमाची वेळ झाली होती. श्रोतेही बऱ्यापैकी जमलेले होते. त्यामुळे फादरांना मंडळाच्या तिसऱ्या मजल्यावर व्याख्यानाच्या हॉलमध्ये घेऊन गेले. सूत्रसंचालनाची जबाबदारी मंचात पहिल्यापासून हजर असलेले शांत स्वभावाचे नॉर्मनसर यांच्याकडे दिलेली होती. उपस्थितांचे स्वागत मंडळाच्या वतीने सुनीला हिने केले. त्यांच्यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी माझ्या नावाची घोषणा झाली. पोटात धाकधूक व मनात संदेह घेऊन मी स्टेजवर चढलो आणि पाठांतर केलेलं प्रस्ताविक ओकण्यास सुरुवात केली,

‘‘सुस्वागतम! आज आपण सर्व जण मंडळाच्या ‘विवेकमंच’ या उपक्रमाचा पहिला वर्धापनदिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. यानिमित्ताने आज आपल्याला फादर जोशवा डिमेलो हे ‘धर्म आणि विवेकवाद’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी लाभलेले आहेत. ‘धर्म’! धर्म म्हणजे आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. आपला भारतीय समाज खूपच धार्मिक आहे. ख्रिस्ती, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन असे विविध धर्म आपल्या जनतेत आहेत. धर्माचं आचरण केल्यास आपली वागणूक चांगली होते आणि आपल्याला मानसिक सुख-शांती लाभते, अशी सर्वसामान्य जनतेची समजूत असते. पण खरंच धर्माचं पालन केल्यानं लोकांची वागणूक चांगली होत आहे का? लोकांना मानसिक शांती खरंच लाभत आहे का? आपण जर आजूबाजूला किंवा स्वतःमध्ये डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की, दुर्दैवाने त्याचं उत्तर नकारार्थी आहे. याचं कारण काय? तर, धर्म पाळत असताना असलेला विवेकाचा अभाव. आपण बहुतांशी धर्माच्या कर्मकांडांमध्येच गुरफटलेलो असतो आणि धर्माच्या मूळ शिकवणुकीपासून मात्र खूप लांब असतो. याचं कारण म्हणजे आपली विचार करण्याची शक्ती, सदसद्‌विवेकबुद्धी आपण व्यवस्थित वापरत नसतो. या मूळ प्रश्नाला हात घालण्यासाठी, लोकांमधील विवेकवाद जागृत राहावा व लोकांना विवेकाने वागण्याची दिशा मिळावी म्हणून...’’

असे मी बोलत आहेच तोच मी रॉयलला कार्यक्रमात येताना पाहिले. इतक्या दिवसांनी त्याला मंचात आल्याचे पाहून मला बरे वाटले. त्यानेही मला स्टेजवर उभा असल्याचे पाहिले व नजरेनेच स्मितहास्य केलं. ‘‘...म्हणून समाजविकास मंडळाने ‘विवेकमंच’ या उपक्रमाची स्थापना केली. गेल्या वर्षी गुड फ्रायडेच्या दिवशी या मंचाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अशा उदात्त हेतूचा शुभारंभ करण्यासाठी आपल्याला लाभले होते ते अवघ्या महाराष्ट्रात विवेकमंचाची पताका फडकावत ठेवणारे डॉ.नरेंद्र दाभोलकर. त्या सभेला आपल्यापैकी बरेच जण हजर असतील. मीही होतो. विवेकवाद हा काही धर्माविरुद्ध नाही, उलट विवेकवादामुळे आपण अधिक प्रगल्भरीत्या धर्माचे आचरण करू शकतो आणि विवेकवादाचा वापर करून आपण आपलं आयुष्य अधिक समृद्ध करू शकतो, हे त्यांनी त्यांच्या विचारातून श्रोत्यांना पटवून दिले होते. दुर्दैवाने अवघ्या सहा महिन्यांतच त्यांची निर्घृण हत्या झाली. काही अविवेकी, धर्मांध प्रवृत्तीच्या लोकांनी डॉक्टरांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. अवघा देश हळहळला. या अमानुष प्रकारात जरी डॉक्टर दगावले असले, तरी त्यांचा विचार मात्र त्या मारेकऱ्यांना संपविता आला नाही; उलट त्यांच्या मृत्यूनंतर तो विचार अधिकच झळाळू लागला. या घटनेनंतर आपला विवेकमंचही अधिक सक्रिय झाला...’’

असे सात-आठ मिनटे मी माझे प्रास्ताविक करून, प्रमुख व्याख्याते फादर जोशवा यांना व्याख्यानासाठी पाचारण केले आणि स्टेजच्या बाजूला ठेवलेल्या खुर्चीत येऊन बसलो... ‘‘वेल डन! खूप छान केलंस भाषण.’’ बाजूलाच बसलेल्या ॲड.अनुप यांनी माझं अभिनंदन करत म्हटले. एकंदरीत माझं सामाजिक आयुष्यातील पहिलं-वहिलं भाषण- मग ते 200 श्रोत्यांपुढे का असेना- छान झालं होतं. सोशल लाईफसाठी सोशल नेटवर्किंगवर लॉगिन होणारा मी, नंतर कुपारी अड्डा या कादोडी भाषेसाठी आणि नंतर कुपारी सांस्कृतिक मंडळामध्ये ‘कुपारी’ संस्कृतीविषयी कार्य करूनही सोशल लाईफविषयी समाधानी नव्हतो. आठवड्यातून काही तास समाजासाठी द्यायचे होते, पण मार्ग सापडत नव्हता. विविध वाटा धुंडाळणाऱ्या माझ्यासारख्या युवकाला कोणत्या विषयात कार्य करायचे आहे याची कल्पना हळूहळू येऊ लागली होती... एव्हाना फादर जोशवा यांनी श्रोत्यांचा ताबा घेतला होता...

‘‘धर्म म्हणजे जीवनपद्धती. मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय आणि त्यासाठी मानवाने या जगात कसे जगायला  पाहिजे, हा आहे धर्माचा विषय. परंतु मानवनिर्मित संप्रदायांनी धर्मावर अशा काही नियमांची बंधने घातली की, त्यामुळे मानवाचा आध्यात्मिक विकास होण्याऐवजी दिवसेंदिवस ऱ्हास होत गेला. आज कोणताही धर्म घ्या; सर्व धर्मांची मूलतत्त्वे ही विवेकवादीच आहेत. मात्र स्वार्थापोटी मूळ धर्माला व त्यातील मूलतत्त्वांना स्वतःच्या सोईनुसार अर्थ दिल्यामुळे आज धर्म मूल्यहीन होताना दिसत आहे. ज्या पुरोहितांकडून शुद्ध, निरामय, निर्गुण धर्माची अपेक्षा करावी, तेच आज भ्रष्ट झाल्याने खूप वेदना होतात. अशा वेळी आपल्यातीलच विवेकी माणसं प्रवक्त्यांच्या भूमिकेतून पुढे येताना पाहून खूप बरे वाटते. विवेकवाद्यांनी या लुबाडल्या वा फसवल्या जाणाऱ्या मुक्या भाविक मेंढरांचे रक्षण करायला हवे.

धर्माला भावनिकतेची चौकट लाभली की, माणसाचा धर्मचिकित्सा करण्याचा विवेक संपलाच म्हणून समजा. धर्म ही माणसाच्या जीवनावर दूरगामी परिणाम घडवून आणणारी एक वस्तुस्थिती आहे. धर्माचे अस्तित्व आणि त्याचा प्रभाव नाकारता येत नाही. आजच्या विज्ञानयुगात वावरणाऱ्या माणसाला समजेल अशा भाषेत धर्मसत्याची ओळख करून देणे निकडीचे आहे. सर्व संत हे विवेकवादीच होते. समाजसुधारणेचा आग्रह धरत होते. म्हणूनच जिवंतपणी सर्व संतांच्या वाट्याला मानखंडना, अपमान, हत्या वा जिवंत समाधी आली होती. पण मेल्यानंतर मात्र याच संतांचे देव्हारे बांधण्यात आले. मानसिक गुलामगिरीत जगण्याची सवय झालेल्या लोकांना धर्माची ही चिकित्सा मानवत नाही. पण येणाऱ्या काळात धर्म या विषयाला नव्या तरुण पिढीमध्ये जर ीशश्रर्शींरपीं ठेवायचे असेल, तर धर्मगुरूंना विज्ञानवादी दृष्टिकोन अवलंबिण्याचा व धर्माची चिकित्सा करण्याचा विवेक दाखवावाच लागेल; नाही तर धर्मातील कर्मकांडांच्या अतिरेकामुळे धर्माचाच नाश होईल व धर्मात असलेल्या सर्वांगसुंदर मूल्यांचाही ऱ्हास होईल. मग माणूस धर्मापासून दुरावेल आणि याला जबाबदार धर्माचे कथित ठेकेदारच असतील. मानवाला धर्मातील मूलतत्त्वांची फार गरज आहे. भोंगळ दैववाद असलेला धर्म आज आऊटडेटेड करणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे कट्टर नास्तिकतेमध्येही समाजाचे हित नाहीये. त्यामुळे पूर्वापार चालत आलेली कर्मकांडे धर्माला जर त्याजता आली आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारता आला, तरच भोंगळ दैववाद व कट्टर नास्तिकता यात सुवर्णमध्य साधला जाऊ शकतो...’’ संपूर्ण सभागृहात शांतता होती. संध्याकाळचे साडेसहा वाजत आले होते. हॉलमधील स्लायडिंगच्या खिडक्यांतून तांबूस सूर्यप्रकाश आत डोकावत होता. कार्यक्रमाला आलेल्यापैकी कोणीही मधे उठून गेले नव्हते. सर्व जण जणू देहभान विसरून फादरांच्या विचारांच्या मैफलीत चिंब होत होते. धर्मचिकित्सेसाठी आवश्यक असलेला त्यांच्या विवेचनातील तर्कशुद्धपणा व सच्चेपणाने हृदयाचा ठाव घेतलेला होता. फादर जोशवा यांच्या व्याख्यानाने एक वेगळीच उंची गाठलेली होती. वसई ख्रिस्ती सभेच्या व विवेकमंचाच्या वतीने ॲड.अनुप यांनी आभार व्यक्त केल्यावर विवेकमंचाच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या या कार्यक्रमाची सांगता झाली. परिसरातील उपस्थित बऱ्याच लोकांनी चांगल्या विषयाशी निगडित कार्यक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन केले. मी गर्दीतून वाट काढत तडक रॉयलला गाठले. खूप दिवसांनी मी त्याला भेटत होतो. ‘‘कसा वाटला कार्यक्रम?’’ मी विचारले. ‘‘फार छान वाटला रे! धर्माविषयी फादरांचे विचार खूपच पुरोगामी आहेत.’’ ‘‘म्हणून तर त्यांना लांब वसईबाहेर ठेवलंय!’’ आम्ही दोघंही हसू लागलो. ‘‘कसा आहेस? तू तर आता मंचात येणं सोडूनच दिलंस रे?’’ ‘‘एकदम फर्स्ट क्लास! नोकरी, संसार, मुलं, त्यात माझं पार्टटाइम कॉलेज... वेळ कुठे आहे? तुझा मुलगा थोडा मोठा झाला की, कळेल तुला.’’ ‘‘दॅट्‌स ट्रू! रॉइस काय म्हणतोय? रॉइसला परत डॉक्टरांकडे वगैरे नेलेलंस?’’ ‘‘सध्या तरी नाही. आता बरा आहे तो. बाय द वे, आपले रॉकस्टार कुठे आहेत?’’ ‘‘अरे, ग्रॅहमला तर मी आज स्वागतगीतासाठी गिटार वाजवायला बोलवलं होतं. पण तो आज बिझी आहे, असे म्हणाला. त्याच्याकडे रविवारी दिवसभर लहान मुलं पियानो शिकण्यासाठी येतात. त्यामुळे तोही आता मंचात पहिल्यासारखा रेग्युलर येत नाही.’’ ‘‘म्युझिक म्हणजे ग्रॅहमचं पॅशन आहे. तो जितका त्यात व्यग्र आहे तेवढं चांगलं.’’ ‘‘डॅम! आय मिस दोज अर्ली डेज. आपण तिघे परत एकदा भेटायला हवं. बऱ्याच दिवसांनी बिअरवर धर्म  डिस्कस करायचा राहिलाय.’’ मी काहीसा नॉस्टॅल्जिक होत म्हटले. ‘‘हाऽ हाऽ हा! आय ॲग्री. डेडली कॉम्बिनेशन.’’ ‘‘चल बाय! लवकरच भेटू या-’’ असे म्हणत आम्ही दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. मंडळातून घरी जात असताना एका चांगल्या कार्यक्रमाच्या आयोजनाचा भाग होण्यास मिळाले म्हणून मी वरवर खूश असलो, तरी फादरांच्या या व्याख्यानाने माझ्या अंतःकरणाचा भेद केला होता. कोणताही डिप्लोमॅटिक स्टॅन्ड न घेता विवेकी विचार सडेतोडपणे मांडणाऱ्या या फादरांनी मन जिंकून घेतले होते. ‘मानसिक गुलामगिरीत जगण्याची सवय झालेल्या लोकांना धर्माची ही चिकित्सा मानवत नाही.’ फादरांचे हे विचार मनात रुंजी घालत होते. मी पाळत असलेल्या माझ्या ख्रिश्चन धर्माची चिकित्सा मला सहन होईल का? अंधश्रद्धा ज्या आहेत त्या इतरांच्या धर्मात, माझ्या धर्मात आहे ती फक्त श्रद्धा. किंवा कर्मकांडे जी काही आहेत ती ‘त्यांच्या’मध्ये, ‘आमच्या’मध्ये आहेत ते फक्त पवित्र विधी! ...किती सोईस्कर पवित्रा घेत असतो आपण; की, उगाच मनाच्या विविध समजुतींना धक्का लागेल म्हणून त्या कुंपणाच्या पलीकडे जाण्याचे टाळतो? चर्चमध्ये जाणे, पूजा-अर्चा करणे या धार्मिक बंधनापेक्षा येशूची मूळ शिकवणूक- भले आचरण्यास कितीही कठीण असली तरी- ती पाळण्याचा प्रयत्न करणे! हेच किती मुक्त करणारे आहे! पन्नासच्या वेगाने बाईक चालवत जरी मी घरी परतत असलो, तरी मन मात्र ज्या प्रकाशवेगाच्या गतीने पळत होते, ते मात्र विस्मित करत होते. विचारांना पंख फुटले होते. मनाची बंदिस्त दरवाजे किलकिली झालेली असली, तरी पूर्णपणे उघडत मात्र नव्हती. ‘धर्मातील कर्मकांडांच्या अतिरेकामुळे धर्माचाच नाश होईल आणि धर्मात असलेल्या सर्वांगसुंदर मूल्यांचाही ऱ्हास होईल. मग माणूस धर्मापासून दुरावेल आणि याला जबाबदार धर्माचे कथित ठेकेदारच असतील. त्यामुळे हा अतिरेक थांबविला पाहिजे.’ हे फादरांनी व्याख्यानात केलेलं वक्तव्य काही केल्या मनातून जात नव्हतं.

Tags: साधना प्रकाशन विवेक मंच चर्च मंच vivek manch chikitsa church manch weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात