डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सुनीलाने उत्तर दिले, ‘‘देव सर्व करू शकतो वगैरे सगळे ठीक आहे; पण मग आपण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारायचाच नाही का? त्यांनी जे काही संशोधन केले आहे, ते आपण स्वीकारायचे नाही का? मी असे म्हणत नाही की, यामागे कोणती तरी अज्ञात शक्ती नसेल, असेलही अज्ञात शक्ती; परंतु पृथ्वीची निर्मिती मात्र अशी झाली नाही, हे मात्र एक वैज्ञानिक सत्य आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. म्हणून मला असे वाटते की, या वाचनाबद्दल फेरविचार केला गेला पाहिजे.’’ सुनीला काही मागे हटण्यास तयार नव्हती.

त्यांचा वाद भर चर्चमध्ये तब्बल एक तास रंगला, पण बिशपने काही तिला समाधानकारक उत्तर दिले नाही. किंबहुना, बिशप एकंदरच खूपच संतप्त झाल्यासारखे दिसत होते. ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. सुनीलाला अपेक्षा होती की, जर खरे उत्तर माहीत नसेल तर शांतपणे, ‘परमेश्वराचे ते एक रहस्य आहे’ असे काही चातुर्य दाखवून ते सहज या प्रश्नाला हाताळू शकले असते.              

मंचातील मुक्त चर्चेच्या आकर्षणापोटी परिसरातील बरेच नवीन लोक मंडळात रविवारी येत असत. पण बहुतांशी लोक आपली उत्सुकता शमल्यावर आपल्या दैनंदिन आयुष्यात व्यस्त होत असत. तर काहीजण मात्र रेग्युलर होत आणि त्यांच्या खंबीर व अनुभव संपन्न व्यक्तिमत्त्वामुळे मंचासही बळकटी आणत. अशातील एक व्यक्ती व जिचा उल्लेख अगोदरच्या दोन लेखातही आपण वाचला तो म्हणजे ‘सुनीला’ या स्पष्टवक्ती महिलेचा.

 तिची मंचात सहभागी होण्याची कहाणी रंजक आहे. विवेकमंच जॉईन करण्यापूर्वी मी कित्येक वर्षं चर्चच्या संघटनेमध्ये होतो. चर्चमध्ये कार्य करण्याचा एक फायदा म्हणजे, या माध्यमातून तुम्हाला सामान्य लोकांपर्यंत चटकन्‌ पोहोचता येते, जे इतर वेळी शक्य नसते. समाज विकास मंडळात कोणताही कार्यक्रम असो, लोक यावेत म्हणून बरीच मेहनत करावी लागायची.

मला आठवते, मंडळात लायब्ररीच्या कार्यकारिणीत आल्यावर आम्ही दिवाळीच्या सुट्टीत मंडळात लहान मुलांसाठी पुस्तक प्रदर्शनाचा व छंदवर्गाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी मुलं जमावीत म्हणून जाहिरातीवर बऱ्यापैकी खर्च केला, तसेच ज्या विक्रेत्यांकडून पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात येणार होती, त्यांच्याकडून घसघशीत सूट मिळवण्यात आली. पण तरीसुद्धा कार्यक्रमासाठी खूप  कमी मुले आलेली होती. त्या अनुषंगाने चर्चमध्ये संडे स्कूलला जी गर्दी जमते, ती पाहून हेवा वाटायचा आणि खरोखरच वाटायचे की, ही जी ताकद आहे तिचा सकारात्मक रीतीने वापर केला गेला पाहिजे.

चर्चमध्ये कोणताही कार्यक्रम राबवा, गर्दी सहज जमते आणि त्यामुळे एखादे कार्य करण्यास चर्चमध्ये खूपच सोपे जाते. चर्चचा वार्षिक अंक दर वर्षी निघायचा आणि त्या अंकाच्या संपादक मंडळात मी असायचो. चर्चचा अंक असल्याकारणाने तळागाळातले लोकसुद्धा तो अंक वाचतात. त्यामुळे भले चर्चच्या अंकामध्ये 70 टक्के जाहिराती असल्या आणि फक्त 30 टक्के वाचनीय सामग्री असली अन्‌ त्या 30 टक्क्यांमध्येसुद्धा जरी 15-20 टक्के फादरांचे लेख असले, तरी बाकीच्या साहित्यातून काही विवेकवादी किंवा जीवनोपयोगी विचार आपण सामान्यांपर्यंत घेऊन जाऊ शकतो.

ज्या वर्षी मी विवेकमंचात नियमित जाऊ लागलो, त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये चर्चच्या वार्षिक अंकाचे काम सुरू झाले होते. त्या वर्षी अंकाचा विषय होता, ‘‘आई-वडील आणि मुले यांतील सुसंवाद’’ आणि त्याच संदर्भात चर्चलाच लागून असलेल्या चर्चच्या कार्यालयात आम्हा संपादक मंडळाची सभा भरलेली होती. संपादक मंडळातील आम्ही सात-आठ सदस्य आणि फादर असे सर्व जण चर्चा करत होतो. विषयाच्या दोन्ही बाजू आम्हाला व्यवस्थित हाताळता याव्यात, मांडता याव्यात म्हणून आम्ही चर्चमध्ये आवाहन करून आई-वडिलांना ‘मुलांकडून असलेल्या अपेक्षा’ व मुलांना ‘आई- वडिलांकडून असलेल्या अपेक्षा’ अशा दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया आधीच मागविलेल्या होत्या. त्याला बऱ्याच जणांनी प्रतिसाद दिला होता.

एक ओळीच्या, दोन ओळीच्या, दीड पान, एक पान असे लिहिलेले कागद आमच्यापर्यंत पोहोचले होते. प्रथम आम्ही लहान मुलांचे कागद चाळत होतो. बऱ्याच जणांनी छान-छान लिहिले होते की- आई-वडिलांनी आमचे ऐकले पाहिजे, आमच्याकडे लक्ष दिले पाहिजे. ज्या काही प्रतिक्रिया आल्या होत्या, त्या खूपच गोड होत्या.

 मला आठवते, एका मुलीने लिहिलेली प्रतिक्रिया मला खूप आवडलेली होती. तिने तिच्या आई-वडिलांकडून काय अपेक्षा आहेत याविषयी असे लिहिले होते की, ‘मम्मी-पप्पांनी दर रविवारी जेवणास चिकन आणले पाहिजे.’ किती प्रामाणिक आणि सुस्पष्ट अपेक्षा होती ती! त्याचप्रमाणे पालकांकडूनही ज्या काही प्रतिक्रिया आल्या होत्या, त्यामध्येही बऱ्याच अशा गमती-जमती होत्या. त्यामधली एक सांगावीशी वाटते.

शिक्षिका असलेल्या आईने एक प्रतिक्रिया पाठविलेली होती. खूपच लांबलचक ती प्रतिक्रिया होती. लेखाची सुरुवात ‘मुलांनी चांगले शिक्षण घेऊन सुजाण नागरिक झाले पाहिजे’, ‘पालकांपुढील आजकालची आव्हाने’ वगैरे सरळधोपट मार्गाने झाली होती. लेखाचा शेवट मात्र भन्नाटच होता. त्या लेखाचं शेवटचं वाक्य होतं- ‘...तर अशा प्रकारे विज्ञान शाप नसून वरदानच आहे.’ एकंदरीत निबंधाच्या पुस्तकातून वाक्यांची जुळवाजुळव करताना चुकून ‘विज्ञान- शाप का वरदान?’ या निबंधाचा त्या पालकाने वापर केला होता. परंतु ती चोरी व्यवस्थित करता आली नव्हती.

 अर्थात, एरवी दैनंदिन आयुष्यात आकंठ बुडालेल्या व लेखनाचा काहीही अनुभव नसलेल्या पण चर्चच्या वार्षिक अंकानिमित्त लेखणी हातात धरलेल्या अशा सामान्य लोकांचे लेख कितीही मोडक्या-तोडक्या भाषेत असले तरी त्याची आम्ही डागडुजी करून अंकात प्रकाशित करतच असू.

 संपादक मंडळाच्या अशाच एका सभेत आम्ही चर्चच्या कार्यालयात बसून विविध लेख चाळत होतो. आई-वडील   आणि मुले यांतील सुसंवाद या त्या वर्षीच्या विषयावर संपादक मंडळातील कोणी काय काय लिहायला हवे, यावर संपादक समितीत खल होत होता. हास्यविनोद करत वेगवेगळ्या बाबी चर्चिल्या जात होत्या.

आतापर्यंत शांत बसलेल्या आमच्या संपादक समितीतील एक सदस्य सुनीला या एका मध्यमवयीन महिलेने अचानक एक वेगळेच मत व्यक्त केले. खूपच पोटतिडिकीने ती तो मुद्दा मांडत होती, ‘‘आमची पिढी तर कामामध्येच अडकली. आम्ही लहान असताना आई-वडिलांना शेतात मदत करायचो, कारण तेव्हा तर घरची परिस्थिती एकदम गरिबीची. शाळेत फाटके कपडे घालून जायचो. ‘तु अभ्यास कर’ असे सांगणारेही आम्हाला कोणी नव्हते. आमचं आम्हीच शिकलो आणि आम्हीच शिकून नोकरीला लागलो. पुढे लग्न झाल्यावर ज्या सासू मिळाल्या त्या अशिक्षित, बुरसटलेल्या विचारांच्या. ‘सुनबाई लग्न होऊन घरी आली म्हणजे आता घरचं सगळं काही ती बघेल’ असा पारंपरिक विचार करणाऱ्या. म्हणजे आम्ही दिवसभर नोकरी करून घरी आलो की, घरीसुद्धा राबणे आलेच. पण आता आमच्या मुलांची पिढी मात्र लाडात वाढलेली. आता माझी जी सूनबाई येईल, तीसुद्धा तिच्या माहेरच्या घरी लाडात वाढलेली असणार. तिला काही मी काम करायला लावणार नाही, म्हणजे मलाच परत घरची सारी कामे निस्तरायला लागणार. आमच्या आधीच्या पिढीतील स्त्रियांनी फक्त घराकडेच लक्ष दिले. आम्ही नोकरीही केली आणि घरातही राबलो, आता वृद्धापकाळी परत आमच्या मुलांच्या कुटुंबाचेही सर्व करावे लागणार. एक अशिक्षित पिढी आणि एक उच्चशिक्षित पिढी- या दोघांमध्ये आमच्या पिढीचा आक्रोश मात्र दबला गेला.’’

एका पिढीचे हृदय हेलावून टाकणारे आक्रंदनच जणू तिने व्यक्त केले होते. सुनीला त्यावर्षी प्रथमच संपादक समितीवर आलेली होती. कोणत्या तरी समितीवर काम करायचेच आहे, म्हणून ती येथे आलेली दिसत नव्हती. तिला संवेदनशील मन ही होते. तसेच चाळिशीनंतर स्त्रियांत येणारा ठसकेबाजपणाही तिच्यात जाणवत होता. आमची मीटिंग संपली. पहिल्या माळ्यावर असलेल्या चर्च कार्यालयातून खाली उतरून आम्ही चर्चच्या मोकळ्या आवारात आलो.

खाली आल्यावर मी सुनीलाला मला तिचे बोलणे आवडल्याचे सांगितले. का कुणास ठाऊक, तिच्या बोलण्यात संवेदनशीलतेबरोबरच विवेकीपणा व विचारांचा स्पष्टपणाही मला जाणवला होता. त्यामुळे मी ज्या विवेकमंचाच्या उपक्रमात जात आहे, त्याचीही मी तिला अनायसे माहिती दिली. धर्म व इतर विषयांवर तिथे कशी चिकित्सकपणे चर्चा केली जाते, हे मी तिला सांगितले.

त्यानंतर मात्र तिने तिच्यासोबत चर्चमध्ये घडलेला जो काही प्रसंग मला सांगितला ते ऐकून तर मी चक्रावूनच गेलो. ती विवेकी विचार करू शकणारी व आचरणात आणणारी अशी एक धाडसी स्त्री होती. तिने जे धाडस केले होते, ते 10 स्त्रिया जरी करू शकल्या तरी समाजपरिवर्तन घडून येण्यास वेळ लागणार नाही.

तो प्रसंग असा : एके दिवशी आमच्या ‘लुड्‌स माता चर्च’ येथे खास मिस्साबली अर्पण करण्यासाठी बिशप हजर होते. आणि ती मिस्साबली होती ‘दृढीकरण’ हा संस्कार देण्यासाठी. ख्रिस्ती धर्मात 7 संस्कार महत्त्वाचे मानले जातात. हे संस्कार वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये प्रत्येकाने घ्यायचे असतात. त्यापैकीच एक संस्कार म्हणजे दृढीकरण. तुमची ख्रिस्ती श्रद्धा दृढ झाली आहे, हे दर्शवणारा हा दृढीकरण संस्कार. हा मुख्यत्वेकरून तारुण्यावस्थेत पदार्पण करणारे युवक-युवती वयाच्या 14-15 व्या वर्षी घेत असतात. आणि त्या दिवशी हा संस्कार देण्यासाठी बिशप हे या चर्चमध्ये खास आले होते.

संस्कार घेणाऱ्या युवक- युवतींसोबत मिस्सासाठी ‘बिशप येणार आहेत’ म्हणून इतर अनेक भाविकही उपस्थित होते. पूर्ण चर्च हे खच्चून भरलेले होते. मिस्सा संपली आणि त्यानंतर काही वेळ बिशपांकडे शिल्लक होता. त्यांनी वेळ घालवण्यासाठी उपस्थित भाविकांना आवाहन केले की- ख्रिस्ती श्रद्धेविषयी तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तर ते मला विचारू शकता. त्यांचा मुख्य रोख जे तरुण-तरुणी, ज्यांनी तो दृढीकरण संस्कार स्वीकारला होता, त्यांच्याकडे होता.

युवक- युवतींकडून जास्त काही रिस्पॉन्स मिळत नाही, हे पाहून त्यांनी उपस्थित इतरांना आवाहन केले की, तुम्ही मला इथे काहीही प्रश्न विचारू शकता. चर्च भाविकांनी पूर्ण भरलेले होते. अर्थातच सभासंकोच हा बहुतेकांकडे असतोच. त्यामुळे मनात प्रश्न असूनही खूपच थोडे भाविक बिशपांना प्रश्न विचारू शकत होते.

त्यामधीलच एक सुनीला होती. ती उभी राहिली, तिने हातात माइक घेतला व ‘मला एक प्रश्न विचारायचा आहे’ असे म्हणून तिने आपला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली,  ‘‘बायबलमध्ये ‘उत्पत्ती’ या प्रकरणातील पृथ्वीची निर्मिती कशी झाली यासंदर्भात जे काही प्रसंग आहेत, ते वैज्ञानिक दृष्ट्या खरे नाहीत, हे चर्चने मान्य केलेले आहे. मग ते अजून आपण का वाचतोय?’’

 ‘‘मला प्रश्न कळला नाही.’’ सुनीलाचा संक्षिप्त प्रश्न बिशपांना व्यवस्थित ऐकू गेला नव्हता.

तेव्हा ती माइक परत हातात धरून बोलू लागली, ‘‘चौदाव्या-पंधराव्या शतकामध्ये गॅलिलिओ असो, कोपर्निकस असो किंवा इतर कोणी संशोधक असो; त्यांनी बऱ्याच संशोधनानंतर हे सिद्ध करून दाखविले आहे की, पृथ्वी सपाट नसून ती गोल आहे. त्याचबरोबर पृथ्वी ही स्वत:भोवती व सूर्याभोवती फिरत असते. सूर्य उगवतो व मावळतो. असे बरेच संशोधन, विविध शोध त्यांनी सिद्ध करून दाखविले आणि अशा वेळी चर्चच्या धर्मपीठाने त्यांना शिक्षा ठोठावली होती. पण त्यानंतर इग्निशियस लॉयला असो वा इतर धर्मसुधारक; त्यांनी चालविलेल्या ‘धर्मसुधारणा चळवळी’मध्ये जी काही रोमन कॅथॉलिक धर्माला झळ पोहोचली, त्या दृष्टिकोनातून नव्या पोपनी काहीशी माघार घेत वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला. अखेर 1992 मध्ये पोप जॉन पॉल दुसरे यांनी त्या शास्त्रज्ञांना दोषमुक्त केले. आता एवढं सगळं होऊनही दर वर्षी ईस्टरच्या सणाला आपण भर मिस्सामध्ये हे जे पृथ्वी निर्मितीसंबंधी वाचन आहे, ते वाचत असतो. आपण ज्या अर्थी संशोधकांचे संशोधन स्वीकारले आहे, त्या अर्थी चर्चने हे मान्य केलेले आहे की- पृथ्वीच्या उत्पत्तीसंबंधी जे काही बायबलमध्ये लिहिलेले आहे, ते खरे नाही; मग ते आपण अजून डिलिट का केले नाही? ते तसेच का ठेवले आहे? बरं, डिलिट करण्याचे राहू द्या, निदान ईस्टरच्या रात्री आपण जे वाचन करतो तेव्हा तरी त्या वाचनाला मुक्ती द्यावी, कारण पुढच्या पिढीला हे सगळे पटण्यासारखे नाही. कदाचित आत्तापर्यंत लोकांनी तसा विचार केला नसेल; परंतु येणारी पिढी तसा विचार करेल की, सायन्स काही वेगळे सांगत आहे आणि आपण हे काय ऐकत आहोत? एकंदरीत त्यांच्या विेश्वासालाच तडा जाऊ शकतो आणि बायबलच्या विेश्वासार्हतेवरती ते प्रश्न उपस्थित करू शकतात. तेव्हा तुम्ही बिशप या नात्याने व्हॅटिकन पातळीवर हा मुद्दा उपस्थित करून हे डिलिट करणे शक्य नसले तरी त्याचे वाचन करण्यास स्थगिती द्यावी.’’ सुनीलाने सविस्तरपणे पुरेसे संदर्भ मांडून आपला प्रश्न बिशपांपुढे बिनदिक्कतपणे मांडला.

 बिशपांना हा लांबलचक अनपेक्षित प्रश्न ऐकून थोडासा धक्काच बसला. एक भाविक- तीही एक महिला- भर सभेत आत्मविेशासपूर्वक प्रश्न विचारते काय आणि तो प्रश्न पण कसा- तर प्रार्थना कशी करावी, श्रद्धा कशी वाढवावी, असा सोप्पा प्रश्न नाही; तर थेट बायबलच्या एका वचनावरती ती प्रश्नचिन्ह उपस्थित करते, तेही इग्निशिअस लॉयलो, कोपर्निकस यांचे संदर्भ रोखठोकपणे देऊन! बिशप काहीसे अस्वस्थ झाले.

 पण स्वतःला सावरून व थॉमस एक्विनस या प्रभृतींचे नाव घेऊन त्यांनी तिला म्हटले, ‘‘थॉमस एक्विनसने असे सांगितले आहे की, देव हा सर्वसमर्थ आहे. तो जे काही करू शकतो, ते कोणालाच शक्य नाही.’’

पण या पठ्ठीला त्यांचेही नाव माहीत होते, त्यांचेही पुस्तक तिने वाचलेले होते. ती तत्काळ उद्‌गारली, ‘‘थॉमस एक्विनसने सांगितले आहे- तुम्ही बुद्धिप्रामाण्यावादावर भर द्या. तुमच्या बुद्धीला जे पटत नसेल, ते तुम्ही सोडून द्या. त्याने जरी चर्चला पाठिंबा दिला व चर्चच्या बाजूनेच तो राहिला, तरी तुमच्या बुद्धीला जे पटेल तेच तुम्ही करा व विवेकानेच पुढे जा, असे परखड मत त्याने त्याच्या लिखाणामध्ये व्यक्त केले आहे. त्यामुळे पृथ्वीच्या उत्पत्तीबद्दल हे जे लिहिलेले आहे, ते धादांत खोटे आहे. आज जर तुम्ही शाळेतल्या एका मुलाला सांगितले की- परमेश्वर सूर्य आणतो आणि मग पृथ्वीवर उजेड पडतो, मग तो सूर्य घेऊन जातो आणि त्याने पृथ्वीवर काळोख पडतो; तर त्याला ते पटणार नाही. तो हे हसण्यावारी नेईल.’’

 बिशपांचा गौरवर्णीय चेहरा लालबुंद झाला. त्यांनी दीर्घश्वास घेतला, स्वत:ला थोडे सावरले व विविध उदाहरणे देत तिला आवर घालण्याचा प्रयत्न केला, ‘‘तुला काय माहीत आहे? देव जे करू शकतो, ते अन्य कोणाला शक्य आहे का? हे सर्व देवानेच निर्माण केले आहे.’’

त्यावर सुनीलाने उत्तर दिले, ‘‘देव सर्व करू शकतो वगैरे सगळे ठीक आहे; पण मग आपण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारायचाच नाही का? त्यांनी जे काही संशोधन केले आहे, ते आपण स्वीकारायचे नाही का? मी असे म्हणत नाही की, यामागे कोणती तरी अज्ञात शक्ती नसेल, असेलही अज्ञात शक्ती; परंतु पृथ्वीची निर्मिती मात्र अशी झाली नाही, हे मात्र एक वैज्ञानिक सत्य आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. म्हणून मला असे वाटते की, या  वाचनाबद्दल फेरविचार केला गेला पाहिजे.’’

सुनीला काही मागे हटण्यास तयार नव्हती. त्यानंतर त्यांचा वाद भर चर्चमध्ये तब्बल एक तास रंगला. पण बिशपने काही तिला समाधानकारक उत्तर दिले नाही. किंबहुना, बिशप एकंदरच खूपच संतप्त झाल्यासारखे दिसत होते. ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. सुनीलाला अपेक्षा होती की, जर खरे उत्तर माहीत नसेल तर शांतपणे, ‘परमेश्वराचे ते एक रहस्य आहे’ असे काही चातुर्य दाखवून ते सहज या प्रश्नाला हाताळू शकले असते वा या प्रश्नाला कलाटणी देऊ शकत होते. एवढ्या लोकांसमोर ते स्वतःला एक संयमित नेते दर्शवून वागू शकत होते. पण त्यांचा तोल घसरला, हे मात्र खरे.

त्यामानाने सर्वसामान्य प्रापंचिक असूनही सुनीलाचे पारडे जड ठरले, असेच म्हणावे लागेल. ती काही जास्त ज्ञानी होती असे नाही, पण ती तिच्या भूमिकेवर ठाम राहिली. अर्थात आजूबाजूच्या बायकांमध्ये एव्हाना कुजबुज सुरू झाली होती, ‘कोण ही एवढी मोठी लागून गेलीय, जी स्वतःला शहाणी समजते आणि बिशपांबरोबर भांडण करते?’ सर्वांत धक्कादायक म्हणजे, त्या उपस्थित भाविकांपैकी कोणालाही तिला पाठिंबा द्यावासा वाटला नाही किंवा ‘ती जे काही म्हणते आहे ते खरे आहे, याचा तुम्ही प्रतिवाद कसा करू शकाल?’ असे बिशपांना म्हणणारा कोणीच पुढे आला नाही. सगळे जण फक्त स्तब्ध होऊन त्या दोघांकडे पाहत होते.

धर्मपीठाच्या मुख्य व्यक्तीसोबत एक महिला वाद- विवाद करते आणि ती फक्त वाद-विवादच न करता आपल्या मतावर शेवटपर्यंत खंबीर राहते, हे खरोखरच समाजामध्ये विवेक किती जागृत आणि शिल्लक आहे याचे लक्षण आहे. जसजसे समाजातील वाचन वाढत जाईल तसतसे मेंढरांप्रमाणे झुकलेल्या माना उंचावतील व तसतसा या प्रश्नांचा आवाज मोठा होत जाणार आहे.

दुसऱ्या दिवशीच रविवार असल्याने मी तिला मंचाच्या सभेत येण्यास सांगितले. एक रणरागिणी आता विवेकमंच परिवारात सामील झाली होती. मंचाच्या सभेत सर्वांनी तिच्या या धीटपणाचे कौतुक केले. सुनीलाही नंतर मंचात नियमित सदस्य झाली.

Tags: मिस्साबली बायबल चर्च कोपर्निकस गॅलिलिओ missabali bibal chruch copernikas galilio weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात