डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ॲड.अनुप एक पॉज घेत व गळ्यातील निळ्या रंगाचा मफलर नीट करून म्हणाले, ‘‘फा.रेमंड, तुम्ही धर्मगुरू म्हणून चर्चचे प्रतिनिधी असलात, तरी बायबलमधील येशूची खरी शिकवणूक सर्व लोकांकडे पोहोचवा. तुमच्यासारख्या उच्च विद्याविभूषिताची खरी जबाबदारी हीच आहे की- फक्त चर्चला काय हवं आहे तेवढंच तुम्ही लोकांना सांगू नका, येशूची शिकवणूक आणि चर्चची शिकवणूक यातील फरक इथल्या लोकांना तुम्ही स्पष्टपणे सांगा. कृपया लोकांना अंधारात ठेवू नका...’’ असं बोलत असतानाच उपस्थितांतून जोरदार टाळ्या वाजत होत्या. अर्थात, या टाळ्या काही ॲड. अनुप यांनी केलेल्या भाषणासाठी नव्हत्या, तर ‘खूप झालं’, ‘अति झालं’, ‘थांबवा आता हे भाषण’ यासाठी त्या टाळ्या होत्या. मंडपात थोडीशी कुजबूज चालू झाली होती, ‘बंद करा आता हे भाषण. एवढा चांगला कार्यक्रम होत असताना त्यात मिठाचा खडा टाकण्याचा अधिकार यांना कोणी दिला?’ अशा सुरात त्याचं भाषण तसंच मध्येच तोडलं गेलं

ती संध्याकाळ वसईतील शिरवळ गावपरिवारासाठी अतिशय अविस्मरणीय व अभिमानाची वाटावी अशी होती. सोमवारचा कामाचा दिवस असूनही बरेच लोक या शिरवळ गावात बाहेरून येत होते. गावातील बहुतांश चाकरमान्यांनी कामावर रजा टाकलेली होती. आज त्यांच्या गावामध्ये संपूर्ण गावपरिवालाच नव्हे, तर अवघ्या वसईला अभिमान वाटावा अशी घटना घडणार होती. त्यांच्या गावाचे सुपुत्र फा.रेमंड यांनी ‘बायबल’ या धर्मग्रंथावर डॉक्टरेटची पदवी संपादन केलेली होती. बऱ्याच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी हे यश संपादन केले होते आणि त्यांचे हे यश साजरे करण्यासाठी गावपरिवाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता.

निर्मळ परिसरातील होली सॉक्रामेंट ह्या चर्चच्या उत्तरेला मोठे विस्तीर्ण शिवार आहे. पावसाळ्यातील भातशेतीव्यतिरिक्त वालाच्या शेंगा, भेंडी, मिरची, वांगी, कांदे व इतर भाजीपाल्याने हे शिवार बाराही महिने फुललेलं असतं. या शिवाराला लागूनच शिरवळ हे गाव वसलेले आहे. नारळ, केळीच्या गच्च हिरव्या बनात लपलेले आणि काळपट लाल रंगाच्या कौलारू घरांचे ठिपके ल्यायलेले असे हे प्रेमळ व पापभीरू शेतकऱ्यांचे वास्तव्य असलेले गाव आहे. गावात जी घरं आहेत, ती दाटीवाटीने या शिवाराच्या बाजूनेच वसलेली आहेत. दुभत्या गाई-म्हशी असलेले एक-दोन गोठेही या गावात काळाच्या पाऊलखुणा अजून जपून आहेत.

वसईतील इतर गावांप्रमाणे या गावाच्याही मधोमध त्यांचा सामाईक गावकी क्रॉस होता. या क्रॉसच्या बाजूच्या मोकळ्या विस्तीर्ण जागेत भला मोठा मंडप घातला गेला होता. संपूर्ण गावभरात दिव्यांची रोषणाई केलेली होती. गावातील सर्व तरुण-तरुणी या कार्यक्रमाच्या धावपळीत गुंतलेले होते. परिसरातील पंचक्रोशीतूनही फादर रेमंड यांचे बरेच चाहते, पाहुणे आलेले होते.

फादर रेमंड यांनी गुरुदीक्षा स्वीकारली नंतर त्यांच्या ओघवत्या व रसाळ प्रवचनशैलीने भाविकांची मने जिंकून घेण्यास सुरुवात झाली. शब्दांवर असलेलं प्रभुत्व तसेच शब्दांचं सौंदर्य अधिक खुलविणारे स्पष्ट उच्चार, स्पीच डिलिव्हर करण्याची पद्धत, चेहऱ्यावरील तेज आणि प्रवचनातून वाहणारं ते पांडित्य, यामुळे ज्या-ज्या चर्चमध्ये ते प्रवचन करण्यासाठी गेले तिथे-तिथे त्यांनी जनमानसावर मोहिनी घातली होती. धर्मगुरुपदामध्ये काही काळ अशी सेवा केल्यावर ते उच्च शिक्षणासाठी काही वर्षं व्हॅटिकनला गेले, तिथे त्यांनी डॉक्टरेटची पदवी संपादन केली होती.

व्यासपीठावर फादर रेमंड यांच्यासमवेत त्यांची वृद्ध आई बसलेली होती आणि या दोघांच्या बाजूला त्यांच्याच गावात राहणारे त्यांचे शाळेतील शिक्षक व्हिक्टर फरास व मुंबई हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करणारे ॲड.अनुप डिसोजा हेही बसलेले होते. माईकवर फादर विनीत बोलत होते, ते फादर रेमंड यांचे बालमित्र. ‘‘बायबल या धर्मग्रंथावर बऱ्याच जणांनी संशोधन करून डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे; परंतु बहुतांशी डॉक्टरेट बायबलमधील तुलनेने सोप्या असलेल्या ‘नवा करार’ वर आहेत. बायबलचा आणखी एक भाग आहे, ‘जुना करार’. त्यामध्ये संशोधन करण्याच्या फंदात जास्त कोणी पडत नाही, कारण ते खूपच वेळखाऊ असतं. जुना करार खूपच किचकट आणि क्लिष्ट आहे. पण फादर रेमंड यांनी हे शिवधनुष्य लीलया पेललेलं आहे. बायबलमध्ये बऱ्याच संदेष्ट्यांचे दाखले अंतर्भूत केले गेलेले आहेत. अशा अनेक संदेष्ट्यांपैकी जुन्या करारातील एक महत्त्वाचा संदेष्टा म्हणजे ‘एलिया संदेष्टा’. त्यावर त्यांनी पी.एच.डी. केलेली आहे. त्यासाठी त्यांनी ३३३ पानांचा शोधप्रबंध लिहिलेला आहे. जुन्या कराराला हात लावण्याची तशी कोणाची हिंमत होत नाही, परंतु त्यांनी जवळजवळ सोळा वर्षे अथक परिश्रम करून हा शोधप्रबंध लिहून ही पदवी संपादन केलेली आहे. त्यांच्या पीएच.डी.चा फायनल इंटरव्ह्यू पाहण्यासाठी (defend) मी स्वतः तिथे गेलो होतो.

फादरांनी मला आमंत्रित केलेल होतं. आपल्या वसईतून बरेच फादर, सिस्टर्स व हितचिंतक पुण्यात जिथे ही फायनल परीक्षा होणार होती तिथे गेले होते. या फायनल परीक्षेमध्ये खुल्या जागेत ज्या-ज्या विषयामध्ये ती व्यक्ती पी.एच.डी. करणार आहे, त्या-त्या विषयातील पंडितांना बोलाविले जाते. ते मुरलेले पंडित त्या पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्याला/व्यक्तीला जाहीर सभेत प्रश्न विचारतात. आपल्या फादरना पण तसेच प्रश्न दोन ते तीन तासभर चाललेल्या सभेत विचारले गेले. तीनशेसाडेतीनशे लोक समोर बसलेले होते. त्या सभेत त्यांनी प्रत्येक प्रश्नाला सुंदर, समर्पक आणि अतिशय नेमके उत्तर दिले. शेवटी अशी वेळ आली की, पंडितांचे प्रश्न संपले; परंतु फादरांची ऊर्जा काही संपलेली दिसली नाही. आणि पंडितांनीही जाहीर सभेत त्यांच्या विद्वतेची, त्यांच्या पांडित्याची वाहवा करून त्यांना डिस्टिंक्शन ग्रेड दिली. खरंच, आपल्या गावपरिवाराला अभिमान वाटला पाहिजे, अशी ही बाब आहे.’’ उपस्थितांकडून टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला.

छोटेखानी शरीरयष्टी असलेले व त्यामुळेच कदाचित, व्यक्तिमत्त्व संतुलन राखलेले आणि भारदस्त व कडक आवाज कमावलेले फादर विनीत पुढे बोलू लागले, ‘‘लहानपणापासून आम्ही दोघं या शिवारात खेळलो आहोत, एका गावात वावरलेलो आहोत. गाई-म्हशी चारण्यासाठी एकत्र घेऊन गेलेलो आहोत. ते मला ज्येष्ठ बंधूसारखे आहेत. मी त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन सेमिनरी जॉईन करण्याचा निर्णय घेतलेला होता, हे आज तुम्हा सर्वांना जाहीररीत्या सांगावेसे वाटते.’’ बोलत असताना फादर विनीत यांना हुंदका आवरला नाही. त्यांनी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या झग्यातून रुमाल काढून आपल्या डोळ्यांना लावला. अतिशय भावपूर्णरीत्या ते त्यांच्या ज्येष्ठ बंधूंच्या कर्तृत्वाविषयी बोलत होते.

त्यानंतर व्यासपीठावर बोलण्यास उभे राहिले, फादरांना शाळेत मराठी शिकवणारे व त्यांच्याच गावात राहणारे शिक्षक श्री.व्हिक्टर फरास. ‘‘आज या व्यासपीठावर फादर रेमंड यांचा शिरवळ गावपरिवारातर्फे सत्कार होत आहे आणि फादर रेमंड यांचे शाळेतील शिक्षक म्हणून मला इथे बोलण्याची संधी मिळत आहे. फादर विनीतनी भाषणात सांगितल्याप्रमाणे, अतिशय किचकट अशा जुन्या कराराला हात घालून त्यावर अतिशय मोठा शोध प्रबंध तुम्ही लिहिलेला आहे. मला माहिती आहे, कारण तुम्ही मला फोनवर सांगायचा की, जुन्या करारातील मूळ लिखित जे आहे ते सर्व हिब्रू, ग्रीक, लॅटिन या भाषांमध्ये होते. तेव्हा भाषांतरित इंग्रजीमधील मजकूर न चाळता थेट मूळ भाषेतील मजकूर अभ्यासता यावा म्हणून तुम्ही त्या भाषाही शिकून घेतल्या. म्हणजे मातृभाषा व राष्ट्रभाषा हिंदी व्यतिरिक्त इंग्रजी, हिब्रू, ग्रीक, लॅटिन आणि फ्रेंच इतक्या भाषांवर तुम्ही प्रभुत्व मिळवले आहे. मला तुमचा खूप अभिमान आहे. शाळेत असताना एक हुशार, मेहनती विद्यार्थी म्हणून तुम्ही माझ्या आठवणीत आहात; परंतु या सर्वांच्या पलीकडचे तुमचे एक गुपित आज मला सर्वांसमोर जाहीर करायचे आहे.

मित्रहो, फादर रेमंड यांनी सेमिनरी जॉईन केल्यानंतर किती वर्षं मला पत्र लिहिले आहे, माहितीये?’’ शिक्षक असल्याने व समोर बसलेली बहुतांशी श्रोतेमंडळीही त्यांचे विद्यार्थी असल्याने, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याच्या शैलीत व उत्तराची उत्कंठा वाढवून ते पुढे म्हणाले, ‘‘एक नाही दोन नाही, तर तब्बल  २० वर्षे!! ते दर वर्षी शिक्षकदिनाच्या दिवशी मला पत्र लिहायचे. मी ती सर्व पत्रं लॅमिनेट करून ठेवलेली आहेत. आज ती सर्व पत्र बरोबर घेऊन आलो आहे.’’ असे म्हणत त्यांनी स्टेजवरील टेबलावर, सोबत आणलेल्या पिशवीतील सर्व लॅमिनेट केलेली पत्रे बाहेर काढली आणि हातात धरून उंचावत म्हणू लागले, ‘‘एका विद्यार्थ्याचे शिक्षकावर किती निस्सीम प्रेम असू शकतं किंवा एक विद्यार्थी त्याच्या शिक्षकाच्या ॠणात कसं राहणं पसंत करू शकतो, किती नम्र असू शकतो याची पोचपावती देणारी ही पत्रं आहेत. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते, कदाचित मी शिक्षक असल्याने असेल बहुतेक; ते म्हणजे त्यांचं असलेलं टपोरं, मोतीदार अक्षर...’’ असे म्हणत त्यांनी ती पत्रे परत टेबलावर ठेवली आणि भाषण संपविताना म्हणाले, ‘‘आज इतका मोठा प्रबंध यांनी लिहिलेला आहे. आपल्यासारखा सर्वसामान्य गावात फिरणारा, शिवारात शेतीमध्ये आई-वडिलांना मदत करणारा, गरीब घरातील या मुलाचा शोधप्रबंध आज जगातील उत्तमोत्तम लायब्ररीत ठेवण्यात येणार आहे. ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.’’ तोच उपस्थितांकडून जोरदार टाळ्या वाजविल्या गेल्या.

आपल्यातलाच एक, शिवारात हिंडणारा, शेतामध्ये जाणारा, गावामध्ये फिरणारा साधासुदा कुपारी इतकी मोठी पदवी मिळवत होता, ही सर्वांसाठी गहिवरून टाकणारी व अभिमान आणणारी बाब होती. श्रोत्यांमध्ये कित्येक स्त्रीपुरुष आपले डोळे पुसताना दिसत होते. फादर रेमंड यांच्या चेहऱ्यावर एक शिवधनुष्य लीलया पेलल्याचे कृतार्थ स्मित होते. पदवी, डॉक्टरेट याविषयी काहीही माहिती नसलेली त्यांची वृद्ध अशिक्षित आई ‘गावात आपल्या मुलाचा आज इतका सन्मान होतोय’, या कल्पनेनेच धन्य-धन्य झालेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

शेवटी भाषण करण्यास उभे राहिले गावातील ज्येष्ठ ॲड. अनुप. जीन्स, टी-शर्ट व त्यावर लेदर जॅकेट असा वेष परिधान केलेले ॲडव्हॉकेट म्हणाले, ‘‘आज मला फादर रेमंड यांचे अभिनंदन करावेसे वाटते. त्यांनी बायबलवरती १६ वर्षे संशोधन करून डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे. फादर रेमंड यांची लहानपणीची परिस्थिती आपणा सर्वांस माहीत आहेच. ‘सेंट विन्सेन्ट दि पॉल’ या चर्चच्या (गरिबांना मदत करण्यासाठी असलेल्या) संस्थेमध्ये मी होतो, त्यामुळे फा.रेमंड यांच्या कुटुंबीयांची हलाखीची परिस्थिती मी पाहिलेली आहे. म्हणूनच त्यांनी बायबलचा जो काही अभ्यास केलेला आहे, त्याबद्दल त्यांचा मला विशेष आदर आहे. पण...’’ ॲड.अनुप एक पॉज घेत व गळ्यातील निळ्या रंगाचा मफलर नीट करून म्हणाले, ‘‘फा.रेमंड, तुम्ही धर्मगुरू म्हणून चर्चचे प्रतिनिधी असलात, तरी बायबलमधील येशूची खरी शिकवणूक सर्व लोकांकडे पोहोचवा. तुमच्यासारख्या उच्च विद्याविभूषिताची खरी जबाबदारी हीच आहे की- फक्त चर्चला काय हवं आहे तेवढंच तुम्ही लोकांना सांगू नका, येशूची शिकवणूक आणि चर्चची शिकवणूक यातील फरक इथल्या लोकांना तुम्ही स्पष्टपणे सांगा. कृपया लोकांना अंधारात ठेवू नका...’’ असं बोलत असतानाच उपस्थितांतून टाळ्या वाजत होत्या. अर्थात, या टाळ्या काही ॲड. अनुप यांनी केलेल्या भाषणासाठी नव्हत्या, तर ‘खूप झालं’, ‘अति झालं’, ‘थांबवा आता हे भाषण’ यासाठी त्या टाळ्या होत्या. मंडपात थोडीशी कुजबूज चालू झाली होती, ‘बंद करा आता हे भाषण. एवढा चांगला कार्यक्रम होत असताना त्यात मिठाचा खडा टाकण्याचा अधिकार यांना कोणी दिला?’ अशा सुरात त्याचं भाषण तसंच मध्येच तोडलं गेलं. त्यानंतर प्रमुख सत्कारमूर्ती फादर रेमंड यांनीही ‘‘डॉक्टरेट ही पदवी काही एकट्याने मिळविता येत नाही, त्यासाठी बऱ्याच जणांचे हातभार लागतात,’’ असे नम्र उद्‌गार काढून समारोपाचं भाषण आटोपलं.

अर्थातच कार्यक्रम खूपच सुंदर झाला होता. उपस्थित मंडळी फादरांचं अभिनंदन करण्यासाठी रांगेमधून स्टेजवर येत होती. मीही फादर रेमंड यांना एक पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या व खाली मंडपात आलो. गावाने आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठी उपस्थितांची लगबग सुरू झाली होती. दबक्या आवाजात ॲड.अनुप यांच्याविषयी लोकांत कुजबूज सुरू होती. मला खरे तर ॲड.अनुप यांच्या बोलण्यात काहीच वावगे वाटले नव्हते. त्यांच्या ‘खरे-खरे सांगा, अंधारात ठेवू नका’ या बोलण्यात एक प्रामाणिकपणा जाणवला होता. कोर्टामध्ये जोरजोरात प्रतिवाद करण्याची सवय असल्याने कदाचित त्यांचे भाषण त्वेषपूर्ण झाले होते, इतकंच. ते जरी मला परिचित असले, तरी खूप वर्षांनी मी त्यांना पाहत होतो. मला त्यांना भेटायचे होते, पण गर्दीत काहीसे एकटे पडल्याने ते त्या कार्यक्रमातून लगेचच गायब झाले होते.

Tags: मंच सॉक्रामेंट फा.रेमंड डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस वसई शिरवळ सेंट विन्सेन्ट दि पॉल’ व्हिक्टर फरास एलिया संदेष्टा’ शोधप्रबंध ॲड.अनुप डिसोजा फादर विनीत Thesis St. Vinsent The Paul Victor Faras Adv. Anup Disouza Father Vinit Bible Father Remond Daniel Fransis Maskarnis Vasai Shival weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात