डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

इतके असूनही विवेकमंचामध्ये धर्माच्या- विशेषकरून ख्रिश्चन धर्माविरोधात चर्चा केली जाते, असाच सूर आजूबाजूच्या ख्रिस्ती लोकांमध्ये होता. एकदा मी एका लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि आमच्या दूरच्या नातेवाइकांपैकी एक महिला माझ्या बाजूला आली आणि मला म्हणाली, ‘‘काय रे, काय चालते तुमच्या त्या मंचामध्ये? काय बोलता तुम्ही धर्माच्या विरोधात? तू असं काही करशील ह्यावर माझा विश्वासही बसला नाही.’’ ‘‘अगं ताई, असं काहीच होत नाही गं. नेहमीसारखी चर्चा आणखीन काय?’’ ‘‘आणि त्या ज्या मुली तिथे तुमच्याबरोबर बसतात- बाई गं! काय त्यांचे ते पुरुषी वागणं! चर्चमध्ये जाणे नाही, गावात फिरणे नाही आणि फक्त धर्माच्या विरोधात बोलत बसतात. त्या मुलींना ते शोभते का? तुम्ही पुरुष एक वेळ ठीक आहे... पण या मुलीपण?      

विवेकमंच सुरू झाला तो एक मुक्त व्यासपीठ म्हणून, जिथे कोणत्याही विषयावर चर्चा करता येईल. चर्चा करताना प्रस्थापित विचारांनाही वेळोवेळी आव्हान दिले जायचे. सुरुवातीला खूपच थोडे लोक या मंचात सहभागी व्हायचे. त्यांची संख्या फार-फार तर 15 ते 20 इतकी भरेल, परंतु त्या संख्येमध्येही लक्षणीय वैविध्य होते. विद्यार्थी, निवृत्त कर्मचारी, युवक-युवती, कॉलेज तरुणतरुणी, महिला, वयस्क अशा वेगवेगळ्या वयोगटांतील तसेच इंजिनिअर, डॉक्टर, प्रिन्सिपॉल, सरकारी अधिकारी, वकील अशी वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले लोक या उपक्रमात यायचे. या सदस्यांची संख्या हळूहळू वाढत गेली. जे सदस्य एकदा सभेला आले, त्यापैकी बहुतांशी पुढच्या सभेला यायचेच. निरनिराळ्या विषयांवरील सकस चर्चा सगळ्यांनाच आवडायची.

पण या उपक्रमावर हळूहळू टीका होऊ लागली. पहिली टीका ही धर्माच्या विरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या अनुप डिसोझा, तसेच देवळात न जाणाऱ्या व स्वतःला नास्तिक म्हणवणाऱ्या डिसोझासर यांच्या उपस्थितीमुळे झाली. हे दोघे तिथे असतात म्हणजे हे चर्चच्या विरोधातच बोलणार.  हे लोकांची दिशाभूल करतात. तरुणांना हे धर्मापासून लांब नेत आहेत... अशी सोईस्कर व सोपी टीका सुरू झाली. त्याचबरोबर मंचात जे लोक येतात, त्यांनी देवळात जाणेही  बंद केले आहे, वगैरे वगैरे.

आणखी एक टीका मंडळातून अशी व्हायची की मंचात फक्त चर्चाच चालते, कामे काही होत नाहीत; परंतू आपल्या मनात कित्येक हजारो वर्षे बुरसटलेल्या समजुती रुजल्या आहेत आणि त्या काढण्यासाठी  अशा मुद्यांवर खुलेआम चर्चा करणे हे त्या समजुती बदलण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे व तेच खूप मोठे कार्य आहे, हे मात्र लोक विसरतात. अशा चर्चेचा परिणाम ‘किती कार्यक्रम केले?’, ‘किती लोक आले?’ अशा मोजपट्ट्या लावून करता येऊ शकत नाही.

विवेकमंचात आलेले सगळेच लोक इथे थांबले नाहीत, हे काही अंशी खरे होते. त्याचं प्रमुख कारण म्हणजे काही विचार पचण्यास कठीण असतात. आपला जो चेहरा आहे, तो चेहरा नसून एक मुखवटा आहे ह्याची जाणीव मुळातच धक्कादायक असते. त्यातच तो मुखवटा काढून फेकताना होणाऱ्या वेदना तर वेगळ्याच. मंचात राजकारण, समाजकारण, विज्ञान, इतिहास असे बरेच विषय आणि त्यातही एकाच मुद्याचे वेगवेगळ्या बाजूंचे आयाम चर्चिले जात. वेगवेगळ्या बाजूंनी चर्चा करण्याची एक नशाच जणू इथे नियमितपणे येणाऱ्या सदस्यांना लागली होती. कधी-कधी चर्चा एकसुरी होत आहे हे दिसू लागताच, मंचातीलच काही सदस्य एक वेगळाच मुद्दा किंवा पैलू चर्चेमध्ये घेत व ती चर्चा वेगळ्याच उंचीवर जायची.

 ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.’ काहींना असे विचार धक्कादायक वाटत, तर काहींना बोजड. काहींना तर आपण आयुष्यभर कुरवाळलेल्या समजुतींना धक्का पोहचतोय असे वाटताच त्यांचे येणे बंद व्हायचे, तर काही जणांना घरच्यांचा, लोकांचा इतका विरोध व्हायचा की त्यांची इच्छा असूनही मंचाच्या सभेला येणे त्यांना जमायचे नाही.  उदाहरणार्थ- ग्रॅहम. ग्रॅहमला जेव्हा मी विवेकमंचात आणले, तेव्हा त्याच्या मनात सर्वसामान्य युवकाप्रमाणे बरेच प्रश्न होते. इथली चर्चा ऐकल्यावर तो काहीसा भांबावला. धर्माची दुसरी बाजू ऐकून त्याला धक्काच बसला. चर्चमधील आर्थिक बाबतीत असलेला अंधार, काही धर्मगुरूंचे दांभिक वागणे, त्याचबरोबर चर्चमध्ये असलेल्या राजकारणाविषयी ऐकून व काही प्रमाणात स्वतः अनुभवून तो अचानक अँटी-चर्च व अँटी-धर्म झाला. कोणी तरी सत्य लपवून ठेवावे आणि नंतर ते समजल्यावर विश्वासघात झाल्यासारखे वाटावे, अशी काहीशी त्याची अवस्था झाली होती. धर्म वगैरे सगळे खोटे आहे, आमचा विश्वासघात केला गेलेला आहे, धर्मपालन म्हणजे अगदी मूर्खपणा आहे... असे धारदार, जहाल, iconoclast असे त्याचे मत बनले. सर्व परंपरा, रूढी हा सर्व मूर्खपणा आहे. असे प्रखरपणे वाटण्यामागे मंचाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडीदेखील कारणीभूत होत्या.

इतर भारतीय समाजाप्रमाणे वसईतील समाजातही वयाची पंचविशी उलटली म्हणजे येथील मातांना आपल्या मुलांच्या लग्नाचे टेन्शन येते. कधी एकदा मुलाची सोयरीक होऊन लग्न होते आणि कधी एकदा सुनेच्या हाती आपले पुत्ररत्न सोपवते, असे त्यांना होते. जेव्हा प्रत्येक रविवारी माझे विवेकमंचात येणे सुरू झाले, तेव्हा माझ्या आई-वडिलांचीही तीच भूमिका होती. ‘‘तुझे काय, तुझे आता लग्न झाले आहे; तेव्हा आता तुला योग्य वाटते ते तू कर. पण ज्यांचे अजून लग्न व्हायचे आहे, त्यांना कशाला मंचात यायला सांगता?’’

थोडक्यात, त्यांचे जर चर्चमध्ये जाणे बंद झाले, तर त्यांना मुलगी कशी मिळणार? असे त्यांना सुचवायचे असायचे. बायकोलाही नवरा जोपर्यंत नोकरी आणि घरकामाकडे लक्ष देत आहे तोपर्यंत इतर सामाजिक गोष्टींकडे ती नवऱ्याचा निव्वळ टाइमपास म्हणूनच बघत असते. त्यामुळे मंचात जात असल्यामुळे  कुटुंबीयांचा मला सुरुवातीला इतका काही विरोध पत्करावा लागला नाही. पण हळूहळू जेव्हा मी प्रार्थनेविषयी, ‘जे ट्रॅफिकच्या नियमासारखे आचरणात आणण्यासाठी असतात, ते नियम, प्रार्थना म्हणून परत परत बोलून काय फायदा?’ असे म्हणून घरातील रोजच्या जेवणाअगोदरच्या रोझरीच्या प्रार्थनेत सहभागी होण्यासाठी नकार दिला, तेव्हा मात्र मग आई-वडिलांचा रोष पत्करावा लागला. पण माझ्यातील इतर बदलही ते पाहत होते. माझ्यात आलेली एक शांतता त्यांना जाणवत असावी.

आयटी क्षेत्रातील करिअरमुळे आलेल्या आर्थिक स्थैर्यामुळे असेल, त्यांनीही मग तुटेपर्यंत ताणू दिलं नाही. शेवटी ‘पोटापाण्याचं चालू आहे ना, बाकीचं सगळं नंतर’ हा प्राधान्यक्रम कोणाला मुद्दामहून सांगावा लागत नाही! त्यात, माझ्या मूळच्या बंडखोर स्वभावाच्या सवयीमुळे असेल, ‘हा नाही तरी आपलं कधी ऐकतो? बाकीच्या जबाबदाऱ्या पार पाडतोय ना तो?’ असे मग आई रागावलेल्या वडिलांना सांगून शांत करायची.  

ग्रॅहमची परिस्थिती काहीशी याउलट होती. ग्रॅहमला त्याच्या वयाच्या पंचविशीमध्ये त्याचे पॅशन म्हणजे म्युझिक फॉलो करण्याचे वेध लागले होते आणि त्यासाठी त्याला त्याची आयटीमधील उत्तम पगाराची नोकरी सोडायची होती. त्याला घरातून काहीसा विरोध होत होता. त्यात ‘धर्माने विश्वासघात केला आहे’ अशा स्वरूपाचे त्याचे वागणे. त्यामुळे त्याच्या घरात खूपच तणावाचे वातावरण होते. ग्रॅहम सुरुवातीला जवळजवळ सहाएक महिने दर रविवारी मंचात येत असे.

पण हळूहळू वर्षभरातच त्याचे रेग्युलरली येणे कमी झाले. त्याचे एक कारण म्हणजे, त्याच्याकडे रविवारी पियानो शिकण्यासाठी येणारी लहान मुले. मुलं सकाळी येत असल्याने त्याला त्याच वेळी असलेल्या मंचाच्या सभेस येणे शक्य नव्हते. तसा तो मंचाच्या व्हाट्‌सॲप ग्रुपवर ॲक्टिव्ह होता. वरचेवर इतर वेळीही आम्ही भेटत होतो. मधे मंचाच्या एक-दोन कार्यक्रमासाठीही तो हजर राहिला होता. पण ग्रॅहमचे मंडळात मंचाच्या सभेसाठी येणे हळूहळू बंद झाले. जवळजवळ दीड-दोन वर्षे या घटनेला झाली असतील. मी ऑफिसला जात होतो. घराजवळूनच मी एक बस पकडली आणि जी सीट रिकामी दिसली तिथे बसलो. पुढच्याच स्टॉपला ग्रॅहमची मम्मी, सिसिलिया आंटी ह्याही बसमध्ये चढल्या. मला पाहत माझ्या बाजूला बसल्या. नेहमीची खबरबात झाल्यानंतर मी ग्रॅहमची चौकशी करत विचारले, ‘‘आंटी, ग्रॅहमचे कसं चालू आहे सध्या?’’

‘‘होय, चालू आहे. त्याने सध्या नोकरी सोडली आहे आणि तो त्याच्या म्युझिकच्या कामात बिझी आहे.’’

‘‘कसे चालू आहे त्याचं म्युझिकमध्ये?’’

‘‘बरं चाललंय. हळूहळू कामे मिळत आहेत त्याला.’’ असे म्हणत त्यांनी बसच्या खिडकीतून बाहेर पाहत म्हटले, ‘‘आनंदी असतो. तो खूष, तर आम्ही खूष.’’

सिसिलिया आंटी काहीशा मला अस्वस्थ वाटत होत्या. ‘‘अंकल कसे आहेत?’’ मी ग्रॅहमच्या वडिलांची चौकशी करण्यासाठी त्यांना विचारले.

‘‘बरे आहेत. मागच्या आठवड्यातच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.’’

‘‘हॉस्पिटलमध्ये? का? त्यांना काही बरं नव्हतं का?’’ असं मी दचकून विचारताच आंटीने तिच्या डोळ्यांना पदर लावला.

‘‘त्यांना माईल्ड हार्ट ॲटॅक आलेला. एक आठवडा ते आयसीयूमध्ये होते.’’

‘‘ओह! माझंही महिन्याभरात ग्रॅहमशी बोलणं नाही झालं.’’

‘‘तुझ्या मित्राचंच टेन्शन. काय सांगू डेव्हिड तुला...’’ त्यांना हुंदका आवरला नाही. त्यांनी त्यांचा चेहरा रुमालामागे लपवला.

‘‘अरे... मला तर माहीतच नव्हतं! आता कसे आहेत अंकल?’’

‘‘होय, आता बरे आहेत.’’ काही वेळाने सिसिलिया आंटींच्या मनाचा बांध फुटला आणि त्या बोलू लागल्या, ‘‘ग्रॅहम तुमच्या त्या विवेकमंचात येऊ लागला आणि होत्याचं नव्हतं झालं. मंचातून आला की, आमच्याशी वाद घालत बसायचा. बायबलमध्ये हे लिहिले आहे, ते लिहिले आहे. फादर काही सांगतात वेगळं. तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही फादरांचं मेंढरांसारखं ऐकता, स्वतः काही विचार करत नाही. हे खोटे आहे, ते खोटे आहे. येशूने काही वेगळेच सांगितले आहे. चर्च काही वेगळीच शिकवण देत आहे. दर रविवारी विवेकमंचातून आला की, आमच्या घरात तंग वातावरण असायचे. जोरजोरात तो त्याचा मुद्दा रेटत बसायचा. आम्ही त्याला म्हणायचो की- एवढे लोक चर्चमध्ये, मंदिरात जातात ते काही वेडे नाहीत. चर्चमधील जे फादर आहेत त्यांनीही शिक्षण घेतलेले आहे, ते काही असेच उठून फादर झालेले नाहीत. त्यांनीही बायबलचा अभ्यास दहा-दहा वर्षे केलेला आहे. ते सगळेच का खोटे असेल? होय, एक-दोन मुद्दे इकडचे तिकडे असू शकतात. काही कर्मकांडं असतील, काही अंधश्रद्धा असतील, नाही असे नाही; पण सगळंच कसं खोटं असेल? आणि सगळंच खोटं असेल, तर मग बाकीचे लोक कसे काही बोलत नाहीत? मला बाई, ह्याचं काहीही कळत नसायचं.’’

सिसिलिया आंटी आता काहीशा सावरल्या होत्या, ‘‘तुमचे ते डिसोझासर आणि अनुप डिसोझा, मुलांना अशीच शिकवण देतात का? आम्हाला राग आहे तो अनुप डिसोझा यांचा. आमचे हेसुद्धा त्यांच्याशी भर नाक्यावर भांडले होते. आणि, का नाही? तुमच्या मुलांचे सगळे चांगले झालेले आहे. चांगले शिक्षण घेऊन ते अमेरिकेमध्ये सेटल्ड आहेत आणि आमचाच मुलगा  तुम्हाला मिळाला, हे सर्व डोक्यात भरायला? त्याचे अजून काहीही झालेले नाहीये. आणि कोणत्या वयात कोणते भलते विचार तुम्ही त्याच्या मनात भरवता?’’ परत सिसिलिया आंटीने पदर तोंडाला लावला. एका आईचे आपल्या मुलाप्रति प्रांजळ असे ते मत होते.

मलाही काय बोलावे, हे सुचत नव्हते. ‘‘मला अजूनही आठवते... आमच्या लहानपणी चर्चमध्ये, गावात किंवा कुठेही काहीही कार्यक्रम असला की अनुप डिसोझा असायचेच. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ‘‘मंगलमय पित्या-’’ अशा प्रार्थनेने करायचे. त्यावरूनच आम्ही त्यांना सर्व जण ‘मंगलमय पित्या’ असे त्यांच्या पाठीमागे चिडवायचो. इतका तो धार्मिक माणूस होता. किंबहुना, त्यानेच आम्हाला लहानपणी प्रार्थना करायला शिकवले व चर्चच्या जवळ आणले आणि आता तो स्वतःच चर्चपासून लांब झाल्यावर चर्चविषयी- धर्माविषयी काहीबाही बोलू लागला आहे. हे सगळे त्याचे वागणे गोंधळाचे आहे. ‘‘तुला एक सांगू? कोणाला सांगू नकोस-’’ असे म्हणत त्या आपले मन माझ्यापुढे मोकळे करू लागल्या, ‘‘ग्रॅहमचे हे असे विचित्र वागणे बघून मी आणि ग्रॅहमचे डॅडी, आम्ही दोघे पळसवाडी येथील चर्चच्या कॅरिझ्मॅटिक प्रार्थनेचे प्रमुख फादर जॉकीम त्यांना भेटायला गेलो. त्यांच्याकडून आम्ही सल्ला घेतला की, आमचा मुलगा एका मंचामध्ये जाऊ लागल्यावर त्याने चर्चमध्ये जाणे बंद केलेय आणि तो धर्माच्या विरोधात सतत बोलत असतो. आता आम्ही काय करू? त्याला नोकरीही सोडायची आहे, म्युझिकमध्ये करिअर करायचे आहे. तो खूप गोंधळलेला वाटतोय.

हे बोलत असतानाच त्या फादरांनी आम्हाला मधेच थांबवत म्हटले, ‘थांबा, थांबा. तुमचा मुलगा निर्मळ येथील विवेकमंचामध्ये जातो का? होय, आमच्या कानी आले आहे की, या विवेकमंचात तरुणांच्या मनामध्ये काहीबाही भरवले जात आहे आणि त्यांना वेगळे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही सांभाळा तुमच्या मुलाला. अशा ठिकाणी पाठवू नका. मी त्याच्यासाठी प्रार्थना करेन. हे घ्या पवित्र पाणी, जा आणि हे तुमच्या मुलावर हळूच शिंपडा. बघा, देवावर विश्वास ठेवा, सगळे काही व्यवस्थित होईल.’ आणि म्हणाले, ‘तुम्हाला ह्याची वेळेवरच कल्पना आली हे बरे झाले.’ असा सल्ला आम्हाला फादरांनी दिला आणि आम्ही घरी आलो.

 ‘‘ग्रॅहम देवळात जात नाही, ह्याला मुलगी कशी मिळणार? याचे वय ऑलरेडी 26 झाले आहे. ह्याच्या बॅचमधील सगळ्या मुलांची सोयरीक झाली आहे. सगळ्या मुलांची या वर्षी लग्नं होतील. हा एकटाच मागे राहिला आहे.’’

‘‘आंटी, 26 हे काही लग्न करायचे आता वय राहिले नाही.’’

‘‘असं कसं? लग्न, मुलं वगैरे हे सगळं वेळच्या वेळीच झालं पाहिजे. आम्ही जोपर्यंत तरुण आहोत तोपर्यंत आम्ही सहकार्य करू शकतो. लग्नानंतर संसार एकट्याने नाही रे होऊ शकत; मुले सांभाळण्यासाठी आई-वडिलांचा आधार लागतो. हा जर तिशीनंतर लग्न करणार असेल, आणि सहा-सात वर्षांनंतर आमचे काही झाले तर?’’ असे म्हणत सिसिलिया आंटींनी त्यांच्या डोळ्यांना परत पदर लावला.

तेव्हा मी उद्‌गारलो, ‘‘आंटी, तुम्ही उगाचच टेन्शन घेतले आहे बघा. प्रथम सांगतो, विवेकमंचात असे काहीही नकारार्थी चर्चिले जात नाही. आता आम्ही नाही का जात विवेकमंचात? आम्ही कुठे थांबवले आहे चर्चमध्ये जाणे? डिसोझासर तर पहिल्यापासून जात नाहीत, अनुप डिसोझा तर तुम्हाला माहीत असेलच की, त्यांनी काही वर्षांपासून चर्चमध्ये जाणे सोडून दिले आहे. परंतु त्याचा अर्थ असा नाही की, बाकीचे सर्वच चर्चच्या किंवा धर्माच्या विरोधात विवेकमंचात चर्चा करत असतात. चर्चा म्हणजे लोकशाहीची एक प्रक्रियाच असते. जेव्हा अनुप डिसोझा चर्चच्या विरोधात एखादा मुद्दा उपस्थित करतात, तेव्हा तो खोडून काढणारेही लोक तिथे असतात. सर्व अंगाने तिथे चर्चा केली जाते. एकमेकांचे विचार खोडून काढले जातात. ‘चर्चमध्ये जाऊ नका’ असे कोणी सांगत नाही. फादर म्हणजे कोणी देव नाही, तेही चुकतात. चर्चनेही थोडेसे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

ग्रॅहमने मागील वर्षभरापासून विवेकमंचात येणेही सोडून दिले आहे. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. विशेष म्हणजे त्याने त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये- संगीतामध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला  आहे. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये भरपूर काम आहे, चांगली कमाईही आहे. तो जशी आयटीमध्ये नोकरी करणार होता, तसेच संगीताच्या क्षेत्रात काम करेल. सगळं व्यवस्थित होईल बघा. ऑलरेडी वर्ष झाले तो या म्युझिक क्षेत्रात  आहे. त्याला थोडं सेटल होऊ द्या आणि मग मुलीचा विषय काढा. लग्न करेल तो.’’ हे ऐकून त्यांना धीर आला, ‘‘हो माझा मुलगा तसा खूप गुणी आहे. मन जिंकून घेईल असे त्याचे व्यक्तिमत्त्व आहे.. तो खूपच व्यग्र असतो, दहा-बारा तास. त्याला आता कामही मिळू लागले आहे.’’

‘‘झाले तर मग! आंटी, तुम्ही का उगाच टेन्शन घेतले आहे? तो सगळे काही व्यवस्थित करेल. आणि त्याला मुलगी का मिळणार नाही? त्याच्या आवडीच्या क्षेत्रातली, त्याच्या म्युझिक या पॅशनला समजून घेईल अशी मुलगी त्याला सहज मिळून जाईल. काय कमी आहे ग्रॅहममध्ये? आणि आंटी, प्लीजऽऽ विवेकमंच म्हणजे काही तरी चुकीचे आहे. असे विचार तुमच्या मनातून काढून टाका. इथे खूप चांगला विचार करणारे लोक येतात आणि सगळ्यांना इथे येऊन फायदा झालेला आहे. आपला विवेक शाबूत ठेवून, डोळे उघडे ठेवून आता ते धर्माचरण करत आहेत.’’

 का कोणास ठाउक, आंटीला आणखीन एक किस्सा सांगायचा होता. ‘‘हे तुझे म्हणणे मलाही पटतंय रे! हे सगळेच फादर चांगले नसतात, कधी-कधी काहीही बरळतात. मुलीने असे करू नये, मुलीने तसे करू नये, मुलीला मुंबईला कॉलेजला पाठवू नका, मुलींच्या हातात मोबाईल देऊ नका- अशी काहीबाही सनातनी वृत्तीची प्रवचने काही फादर देत असतात. आता हेच बघ ना- तेच फादर जॉकीम- जे मी तुला मघाशी म्हणत होते, पळसवाडी चर्चमधील- एकदा मी अंगणात बागेमध्ये काम करत होते तेव्हा दुरुन पाहिले की, आशीर्वादाचे पाणी घेऊन ते माझ्या घरासमोरून शेजारच्या घरी जात होते. मी त्यांना हाक मारली, फादर गुड मॉर्निंग. त्यांनीही हात वर केला आणि ते तसेच पुढे व्हिजीटसाठी गेले. मी अंगणातच थांबले त्यांची वाट पाहत. कारण आम्ही 15 दिवसांपूर्वीच त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्या हातातील पवित्र पाण्याची बाटली पाहून मी विचार केला की, आपण पण त्यांना घरी बोलवावे आणि आपल्या घरीही ब्लेसिंग करून घ्यावे. म्हणून मी अंगणात जवळजवळ अर्धा तास त्यांची वाट पाहत उभी राहिले. काही वेळाने ते समोरूनच त्या घरातून बाहेर आले. मी त्यांना हाक मारली- फादर, आमच्या घरी जरा येऊन जा, व्हिजिट करून जा. अतिशय कळकळीने मी त्यांना विनंती केली. आश्चर्य म्हणजे, त्यांनी लांबून हात केला आणि तसेच ते पुढे निघून गेले. एक  औपचारिकता म्हणून पण त्यांनी थांबून ‘तुम्ही कसे आहात? बरे आहात का?’ असेही विचारले नाही. जणू काही आम्ही अस्पृश्य आहोत की काय, असेच ते वागले. ‘मी घाईत आहे’ फक्त एवढे म्हणून ते बाईकवर बसून निघून गेले.

मला खूप राग आला त्यांचा त्या दिवशी. ते फादर आहेत, त्यांची जबाबदारी आहे. मी काही त्यांना गप्पा मारायला बोलावत नव्हते. त्यांना आमची पार्श्वभूमी माहीत आहे, आम्ही त्यांना भेटायलाही गेलो होतो. त्यांच्याकडून अपेक्षा होती की, धावती का असेना त्यांनी घरी येऊन व्हिजिट करावी. मला खूपच वाईट वाटले त्या दिवशी.’’

ते ऐकून मी त्यांना म्हटले, ‘‘बघितलंत आंटी, तुम्हीच आता कबूल झालात की फादरही असे चुकीचे वागू शकतात. म्हणून एक बाजू खरी आणि एक बाजू खोटी- असा विचार नका करू. शेवटी ती माणसंच आहेत, फादर म्हणजे काही देवाचे प्रतिरूप नाही. ते पण माणूस आहेत. मग त्यांनी पवित्र व्यक्तीचा आवही आणू नये. काही मिनिटांतच आन्टींचा स्टॉप आला. मी ग्रॅहमशी मोठ्या भावाच्या व मित्राच्या अधिकाराने लवकरच बोलण्याचे वचन दिले आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

ह्याउलट मिंगेल डिमेलोंसारखे काही सदस्य- जे सुरुवातीला मंचातील विचारांशी विरोधात होते ते मात्रहळूहळू सक्रिय झाले होते. विवेकमंच फक्त धर्माच्या बाबतीत नकारात्मक बोलत नाही, तर तिथे वेगवेगळ्या  पैलूंबद्दल अतिशय सकस आणि बुद्धिवादी विचारविमर्श होतो, हे पाहून बऱ्याच सदस्यांना इथे परतण्याची ओढ लागायची. याचे आणखीन एक उदाहरण म्हणजे मॅथ्यू लुद्रिक यांच्या कुटुंबाचे.

मॅथ्यू यांच्या घराशेजारी भाडेकरू राहायचे आणि त्यावरून त्यांच्याकडे रोज काही ना काही वाद होत असत. काही वाद तर कोर्टकचेरीतही पोहोचले होते. ते, त्यांची पत्नी आणि मुलगी ह्याचसंबंधी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी ॲड.अनुप डिसोझा ह्यांना भेटण्यास एका रविवारी मंडळात आले होते. अनायासे विवेकमंचाची चर्चा चालू होती, तेव्हा तेही चर्चेमध्ये बसले. का कुणास ठाऊक, त्यानंतर प्रत्येक रविवारी मॅथ्यू त्यांच्या पत्नीला घेऊन या सभेस येऊ लागले. ते सर्वसामान्य जोडपे होते. इतर सदस्यांप्रमाणे ते मंचातील सदस्यांची विविध मते  शांतपणे ऐकत राहत. काही महिने गेल्यावर कळले त्यांच्या भाडेकरूंबरोबरचा प्रश्न त्यांनी सामंजस्याने, कोर्टकचेरी न करता सोडविला होता. मॅथ्यूच्या पत्नीचे येणे नंतर थांबले असले तरी, मॅथ्यू मात्र मंचात रेग्युलर झाला.

इतके असूनही विवेकमंचामध्ये धर्माच्या- विशेषकरून ख्रिश्चन धर्माविरोधात चर्चा केली जाते, असाच सूर आजूबाजूच्या ख्रिस्ती लोकांमध्ये होता. एकदा मी एका लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि आमच्या दूरच्या नातेवाइकांपैकी एक महिला माझ्या बाजूला आली आणि मला म्हणाली, ‘‘काय रे, काय चालते तुमच्या त्या मंचामध्ये? काय बोलता तुम्ही धर्माच्या विरोधात? तू असं काही करशील ह्यावर माझा विश्वासही बसला नाही.’’

‘‘अगं ताई, असं काहीच होत नाही गं. नेहमीसारखी चर्चा आणखी काय?’’

‘‘आणि त्या ज्या मुली तिथे तुमच्याबरोबर बसतात- बाई गं! काय त्यांचे ते पुरुषी वागणं! चर्चमध्ये जाणे नाही, गावात फिरणे नाही आणि फक्त धर्माच्या विरोधात बोलत बसतात. त्या मुलींना ते शोभते का? तुम्ही पुरुष एक वेळ ठीक आहे... पण या मुलीपण? तुम्ही काय घरीच बसणार आहात का? उद्या तुम्ही दुसऱ्याच्या घरी जाल, तिकडेही असेच कराल का? कोणी ऐकून घेईल का तुमचे?’’

तिचा रोख फ्लोरी, सोनल, कॅलेट या मुलींकडे होता. मला खूपच वाईट वाटले. स्वतः स्त्री असून दुसऱ्या स्त्रियांबद्दल ती असे नकारात्मक उद्गार काढत होती. मी तिला म्हटले, ‘ताई, तुला असं का वाटतं की, आम्ही अशा चर्चा करत आहोत? आणि त्या मुली किती हुशार आहेत. फक्त चर्चमध्येच गेल्याने काही तरी विशेष मिळते, असे नाही. त्या मुलींचे वाचन अफाट आहे. विविध विषयांवर चांगली, स्वतंत्र मते आहेत त्यांची. आणि त्याचा प्रत्यय आम्हाला सभांमधून येत असतो. संस्कार, चांगले वागणे हा जो काही प्रकार आहे, तो फक्त काय चर्चमध्ये जाणाऱ्याकडेच बघायला मिळतो का?’’

खरंच, मुलींना किती वेगवेगळ्या पातळ्यांवर लढावे लागते ह्याची मला जाणीवच नव्हती. तरीही मंचात येऊन बिनदिक्कतपणे फुलपाखरासारख्या बागडणाऱ्या त्या मुलींबाबतचा आदर माझ्या मनात आणखीच वाढला. पाहुणे मंडळींत, गाव-परिवारात जेव्हा धर्माचे विषय चर्चेस यायचे; तेव्हा बहुतांशी, ‘आपला धर्म तेवढा बरा, त्यांचा वाईट’ किंवा ‘आपला वाईट असेल मग त्यांचा कुठे बराय?’ असे सरळधोपट सूर उमटायचे आणि मग ‘ह्यांना विवेकमंचाच्या विचारांविषयी थोडे सांगावे’ अशी मनावर एक स्ट्राँग नैतिक जबाबदारी यायची. पण असे एकत्रित भेटणे एखाद्या समारंभाच्या वेळीच व्हायचे. आणि चर्चा जरी घडली, तरी अशा वेळी तुमच्या समोर असणारी व्यक्ती ही तुम्हाला प्रिय असणारी तुमचा भाऊ, बहीण, मित्र, चुलत भावंडे किंवा तुमचे आई-वडील यापैकीच असते. त्याचे एक वेगळेच प्रेशर मनावर यायचे. कारण सुरुवातीचा प्रवास जरी सर्वांनी एकत्रितरीत्या केलेला असला, तरी वैयक्तिक आयुष्यात प्रत्येकाचा नंतरचा प्रवास हा सारखाच घडलेला असेल असे नाही.

अर्थात, कधी कधी त्यांना जाणवत असलेल्या धर्माविषयीचा असंतोषही काही वेळा बाहेर यायचा आणि तेव्हा त्यांना विवेकमंचाच्या उपक्रमाविषयी उत्सुकता वाटायची, पण ती तात्पुरतीच असायची. परत अशा हलक्या-फुलक्या समारंभाच्या वेळी कोणाला गंभीर, जड विषय चर्चेस नको असायचा. थोडक्यात, धर्म या विषयावर हलकी-फुलकी किंवा रागात चर्चा करण्यास जे तयार असतात, ते ‘गंभीरपणे’ चर्चेसाठी तयार असतीलच असे नाही! त्यात संपूर्ण दिवस दैनंदिन आयुष्यातील संघर्षांमध्येच सामान्य लोक थकून जातात आणि धार्मिक विधी ते फक्त आध्यात्मिकतेपेक्षा एक विरंगुळा म्हणूनच करत असतात. विचार करण्याची ताकदही कित्येकांत उरलेली नसते.

लोकांमध्ये विवेक जागृत करणे किती कठीण काम आहे, हे मात्र या अशा प्रसंगामुळे कळून यायचे. समाज विकास मंडळाच्या कार्यकारिणी मीटिंगमध्येही नकारात्मक सूर हळूहळू उमटू लागले होते. परिसरातील धर्मगुरू व बिशपांच्याही कानांवर मंचाविषयी बातम्या गेलेल्या होत्या. बिशपांनी तर म्हणे या धर्मगुरूंना आदेशच दिला होता की, समाज विकास मंडळाच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या सूचनेची अनाउन्समेंट तुम्ही चर्चमधून करू नका आणि या मंडळापासून लांब राहा. थोडक्यात, त्यांना वाळीत टाका. मंचाचा मंडळातील टिपिंग पॉइंट हळूहळू जवळ येत होता.

Tags: विवेकमंच मंच Manch डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस Daniel Mascarnehas weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात