डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मग फादर जोएल परेरा यांनी वेळ न दवडता आपली भूमिका मांडताना म्हटले, ‘‘सर्वांना नमस्कार. मीच या गुरुवारी अनुपला फोन केला आणि म्हटले की, मला येथे यायचे आहे. येथे काय चर्चा चालते, ह्याविषयी माहिती करून घ्यावयाची आहे. विवेकमंचामागील प्रयोजन काय, हे मला समजवून घ्यायचे आहे. माझ्या असे कानी आले आहे की...’’ आपली मान काहीशी टेबलाकडे पुढे झुकवत ते शांत आवाजात बोलू लागले, ‘‘किंबहुना, खरं सांगायचं तर आम्हा सर्व धर्मगुरूंची मागे एक सभा भरली होती. त्या सभेत काही फादरांनी विवेकमंचाचा उल्लेख केला होता. काही व्यक्ती या मंचात येतात व काहीसे ख्रिश्चनविरोधी त्यांचे वागणे-बोलणे आहे, असे आरोप बऱ्याच फादरांनी त्या सभेत केले. तेव्हा मग या लोकांचे म्हणणे काय आहे, चर्च ह्यांना समजून घेण्यात कुठे कमी पडले आहे- हे जाणण्यासाठी त्यांनी मला इथे पाठविलेले आहे. मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून इथे आलो आहे.    

ब्रूस टकमन या विचारवंताची एक थिअरी आहे, जी त्याच्याच नावाने ओळखली जाते. एखादी नवी गोष्ट आपण सुरू करू इच्छितो, तेव्हा तिला प्रथम तीन अवस्थांतून जावे लागते. त्या अवस्था म्हणजे form, storm आणि norm. विवेकमंच फॉर्म होऊन चार वर्षे झालेली होती. पण आता स्टॉर्म या फेजमध्ये आणखीन किती वेळ अडकणार होते याचा मात्र काही अंदाज लागत नव्हता. विवेकमंचावर अजूनही नाके मुरडलीच जात होती. मंचामुळे विविध क्षेत्रांतील लोक मंडळाशी जोडले गेले होते आणि यातील कित्येक जण तर मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते होऊन नवनवीन कार्यक्रमही मंडळात त्यांनी राबविले होते. तरीही मंडळाच्या कार्यकारिणी वा मासिक सभेत मंच अजूनही वादाचाच विषय म्हणूनच चर्चिला जात होता.

‘‘मंचामध्ये राजकारण आणि धर्म सोडून दुसऱ्या कोणत्याही विषयावर चर्चा करावी’’,

मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पतपेढीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी जेम्स फुटार्डो हयांनी चर्चेला तोंड फोडले.

‘‘अहो राजकारण व धर्म सोडलं तर मग काय उरतं काय? मला वाटतं, विवेकमंचातून बरेच नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत आणि त्याचा फायदा मंडळालाच जास्त झालेला आहे, तेव्हा आता विवेकमंचावरती झाली चर्चा तेवढी पुरे. विवेकमंच आता मंडळाचा सक्रिय भाग आहे.’’

पीटरने मंचाची बाजू उचलत म्हटले. ‘‘आपलं मंडळ हे ख्रिश्चनांचं आहे आणि बऱ्याच धर्मगुरूंनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे, तेव्हा त्यांचे उपकार विसरून उलट त्यांच्यावरच अशी टीका करणे आपल्याला शोभते का?’’

अनिल आल्मेडा हा युवक- जो फक्त मंडळामध्ये मासिक सभेला उपस्थित राहून तक्रार करण्यात धन्यता मानणारा होता- त्याला काही हा विषय संपवायचा नव्हता. ‘‘एक मिनिट- मुद्दा तो नाहीय. आपल्या माहितीसाठी म्हणून, आपले मंडळ हे ख्रिश्चनांचे नाही तर सर्वधर्मीयांचे आहे. ते या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे आहे. तुम्ही चुकीची माहिती देत आहात. आपले वाक्य मागे घ्या.’’

मंडळाचे माजी अध्यक्ष जॉन आल्मेडा यांनी अधिकारवाणीने उभे राहून अनिलकडे बोट करत म्हटले. ‘‘मग इथे या सभेत आपण जमलो आहोत, ते कोण आहोत?’’

फ्रँक कुटिन्हो ह्यांनाही अनिलचे म्हणणे मान्य होते, ते काहीसे जोरात म्हणाले, ‘‘इतर धर्मीय कुठे आहेत इथे?’’

‘‘तो वेगळा मुद्दा आहे. पण आपले मंडळ सर्वधर्मीयांसाठी नेहमीच खुले राहिलेले आहे.’’

‘‘पुरे. झाला वाद तेवढा पुरे झाला आता.’’

उगाच त्याच त्या विषयाभोवती चर्चा रेंगाळतेय, हे पाहून बस्त्याव लोपीस यांनी प्रमुख विश्वस्त म्हणून मधे हस्तक्षेप करत म्हटले, ‘‘आपले मंडळ जॉन म्हणाले तसे सर्वधर्मीयांचेच आहे. मंडळाच्या आसपास ख्रिश्चनधर्मीय जास्त असल्याने त्यांचा येथील वावर काहीसा जास्त आहे, एवढेच. आपण आतापर्यंत वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर व्याख्याने आयोजित केलेली आहेत. त्यात सर्वधर्मीय सहभाग असतो. पण तरीही मला असे वाटते की, आपल्या समाजात ख्रिश्चनांबरोबर हिंदूही मोठ्या संख्येने आहेत. तसेच दोन्ही धर्मीय जरी गुण्यागोविंदाने राहत असले, तरी दोन्ही समाजांचे आदान-प्रदान काही प्रमाणात कमी दिसते आहे. मला वाटते, हे दोन्ही समाज एकत्र येतील असा काही कार्यक्रम आपल्याला मंडळात राबविता येईल का, ते जरा पाहा.’’

‘‘माझ्या मनात एक कल्पना आहे. आता दोन महिन्यांवर दिवाळी येतेय. आपण दिवाळीनिमित्त काही हलकाफुलका असा संगीतमय कार्यक्रम करू या का?’’ अध्यक्ष संजय रॉड्रिग्ज यांनी सोल्युशन सुचवीत म्हटले. मग सभेत आणखी खलबते झाल्यावर दीपावलीनिमित्त ‘दीपावली संध्या’ हा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले. दोन्ही समाजांचे लोक या कार्यक्रमास उपस्थित राहावेत, या अनुषंगाने दोन्ही समाजांतील नावाजलेल्या कलाकारांना आमंत्रणे दिली गेली. विवेकमंचामध्ये अगोदरच काही कलाकारमंडळी आम्ही जोडलेली होती, त्यांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं. त्यात ग्रॅहम, मॅक्सवेल व रॉकी यांचा उल्लेख करावा लागेल. गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये मंडळात फक्त सामाजिक विषयावरच कार्यक्रम झालेले होते, पण दोन्ही समाजांना एकत्र आणण्यासाठी एका सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी प्रथमच होत होती. विवेकमंचावरील चर्चेमुळे हे निष्पन्न झाले होते.

हा कार्यक्रम बऱ्याच कारणांसाठी महत्त्वाचा होता. एरवी मंडळाच्या कोणत्याही कार्यक्रमात फार-फार तर 200- 300 लोकांची गर्दी जमायची. पण या कार्यक्रमासाठी 500च्या वर तरी गर्दी जमणे अपेक्षित होते. त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आमंत्रणे देण्याचा झपाटा लावला. ह्या वेळेला फोकस हिंदू बांधवांकडे होता, त्यामुळे हिंदू धर्मीयांतील विविध संस्थांना तसेच ठिकठिकाणी त्यांच्या घरी जाऊन आम्ही प्रत्यक्ष भेटी देत होतो. सूरसंध्येचा हा कार्यक्रम आम्हा सर्वांची कसोटी घेणारा होता. आतापर्यंत मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आर्थिक बजेटचे एक लिमिट होते. त्या बजेटबाहेर जाऊन या कार्यक्रमावर खर्च करण्यात आलेला होता. उत्तमोत्तम साऊंडसिस्टम, मंडळालगत मोठ्या विस्तीर्ण जागेत श्रोत्यांच्या सोईसाठी प्रशस्त मंडप... कार्यक्रमाचा खर्च खूपच झालेला होता. हा कार्यक्रम सपशेल फेल गेला, तर पुढे अध्यक्षांना असे कार्यक्रम मंजूर करून घेताना अडथळा येणार होता. त्याचबरोबर विवेकमंचाचा आवाजही काही प्रमाणात क्षीण होणार होता.

अखेर तो दिवस उजाडला. नोव्हेंबर महिन्यातली ती संध्याकाळ दिवाळीच्या सणाच्या आनंदात अधिकच न्हाऊन निघालेली होती. कार्यक्रम संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होणार होता. लोकांची गर्दी वाढतेय की नाही, या साशंकेत आम्ही कार्यकर्ते मंडपात उभे होतो. परिसरातील लोक हळूहळू जमू लागले. मग दुचाकी,  चारचाकी गाड्या येऊ लागल्या. असे करता-करता रात्री आठपर्यंत कार्यक्रमाचा मंडप खच्चून भरून गेला. तब्बल 600 हून अधिक लोकांनी या कार्यक्रमास गर्दी केली होती. हिंदू समाजातील किती तरी लोक मंडळाच्या आवारात प्रथमच येत होते. हिंदू आणि ख्रिस्ती समाजातील लोक एकत्र बसून विविध गीतांचा आनंद घेत होते. कार्यक्रम ज्या कारणासाठी आयोजित केलेला होता, ते काम फत्ते झालेले होते. कार्यक्रम सुपरहिट झालेला होता. त्यापेक्षाही जास्त आनंद केवळ धर्मामुळे काहीसे लांब गेलेल्या या ख्रिश्चन व हिंदू लोकांना एकत्र आणण्याचा होता.

तसं पाहिलं तर इथले सर्व ख्रिश्चन अगोदरचे हिंदूच. येथील स्थानिक हिंदू व ख्रिश्चनांचा DNA रिपोर्ट काढला, तर तो एकमेकांशी मिळता- जुळताच असणार. जमलेली गर्दी पाहून आम्ही सर्व खूश होतो. दीपावली संध्येचा कार्यक्रम यशस्वी झालेला होता. कार्यक्रम संपल्यावर मी तसे पीटरला बोलून दाखवले, तेव्हा त्यावर 

‘‘नाचगाण्याच्या कार्यक्रमाला लोक टोप्या उडवण्यासाठी चटकन जमतात; विज्ञानाशी किंवा धर्माशी निगडित कार्यक्रम घेतला असता, तर इतके लोक जमले असते का रे?’’

त्याच्या या प्रश्नाने मला अंतर्मुख केले. खरंच समाज इथे एवढा कधी प्रगल्भ होईल? काही महिने गेले. नेहमीची रविवारची सकाळ. 9.45 वाजले होते. लगबगीची वेळ होती, तरीही लायब्ररीत पुस्तक बदलण्यासाठी वाचकांची वर्दळ तेवढी आज जाणवत नव्हती. वातावरणात एक वेगळीच शांतता भरून राहिली होती. विवेकमंचाची सभा सुरू होण्यास आणखीन 15 मिनिटे होती. मी ग्रंथालयात वृत्तपत्र चाळत बसलो होतो. तोच खादीचा कुर्ता आणि खांद्याला झोळी लटकवलेले एक गृहस्थ ग्रंथालयाच्या पायऱ्या चढून आत आले. मध्यम उंची, सावळा रंग आणि अतिशय शांत भाव असलेला चेहरा. ते फादर जोएल परेरा होते, हे जरा मला उशिरानेच कळले. त्यांनी धर्मगुरूंचा वेष परिधान केला नव्हता. तसेच मी त्यांना फक्त दुसऱ्यांदाच पाहत असल्याने चटकन ओळख पटली नसावी. त्यांना मी अगोदर प्रथम अनुप डिसोझा यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी स्टेजवर पाहिले होते. अनुप डिसोझा यांनी त्यांच्या विविध चिकित्सात्मक लेखांचा संग्रह पुस्तकरूपाने प्रकाशित केला होता.

‘‘विवेकमंचाची सभा इथेच असते का?’’ त्यांनी विचारले.

‘‘होय इथेच असते.’’ मी म्हणालो, ‘‘फादर, अजून 15 मिनिटे आहेत, 10 वाजता सुरू होणार आहे तोपर्यंत तुम्ही इथे लायब्ररीत बसू शकता-’’ असे म्हणत फादरांना मी वाचनकक्षामध्ये बसण्यास सांगितले.

10 वाजले आणि आमचे नियमित सदस्य सभेस येऊ लागले. सोनल आणि फ्लोरी या बहिणी, नॉर्मन, पीटर, पीटरची मुलगी रियोना, कॅथरिन, डिसोझासर, ॲड.अनुप डिसोझा, सॅबेस्टियन, तात्या, फ्रेडरिक, सुनीला, राहुल, दीपेश असे एक-एक करून लोक टेबलच्या आजूबाजूला येऊन बसले. या सभेस मिंगेल डिमेलो हेही उपस्थित होते. मिंगेलने जरी काही महिन्यांपूर्वी गोंधळ घातला असला, तरी ‘त्याला त्याचे विचार मांडण्याचा आधिकार आहे’; त्यामुळे त्याच्याबद्दल कोणालाच आकस नव्हता. तसेच मिंगेलच्या पत्रामुळेच वसईतील सर्व धर्मगुरूंना विवेकमंचाविषयी माहिती झाली होती. थोडक्यात, कोणाच्या खिजगणतीतही नसलेल्या मंचाला उगाचच वसईभर प्रसिद्धी मिळाली होती. तेही या सभेस उपस्थित होते.

योगायोगाने सर्वच वयोगटांतील प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते. 

‘‘आज आपल्यामध्ये जेजुईट फादर जोएल परेरा आलेले आहेत. त्यांनी मागच्याच आठवड्यात फोन करून मला विवेकमंचाच्या सभेस येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना आपल्या सर्वांना भेटायचे होते.’’ ॲड.अनुप डिसोझा यांनी फादरांचे मंचातर्फे स्वागत करत म्हटले.

मग डिसोझासर व इतर सदस्यांनी आपापली ओळख त्यांना करून दिली. मग फादर जोएल परेरा यांनी वेळ न दवडता आपली भूमिका मांडताना म्हटले,

‘‘सर्वांना नमस्कार. मीच या गुरुवारी अनुपला फोन केला आणि म्हटले की, मला येथे यायचे आहे. येथे काय चर्चा चालते, ह्याविषयी माहिती करून घ्यावयाची आहे. विवेकमंचामागील प्रयोजन काय, हे मला समजवून घ्यायचे आहे. माझ्या असे कानी आले आहे की...’’ आपली मान काहीशी टेबलाकडे पुढे झुकवत ते शांत आवाजात बोलू लागले,

‘‘किंबहुना, खरं सांगायचं तर आम्हा सर्व धर्मगुरूंची मागे एक सभा भरली होती. त्या सभेत काही फादरांनी विवेकमंचाचा उल्लेख केला होता. काही व्यक्ती या मंचात येतात व काहीसे ख्रिश्चनविरोधी त्यांचे वागणे-बोलणे आहे, असे आरोप  बऱ्याच फादरांनी त्या सभेत केले. तेव्हा मग या लोकांचे म्हणणे काय आहे, चर्च ह्यांना समजून घेण्यात कुठे कमी पडले आहे- हे जाणण्यासाठी त्यांनी मला इथे पाठविलेले आहे. मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून इथे आलो आहे. आता तुमच्याशी बोलण्यासाठी माझी निवड कशी झाली, हेही सांगतो... अनुप माझे कित्येक वर्षांचे स्नेही आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते चर्चच्या विरोधात त्यांची मते जाहीरपणे मांडत आहेत. पण आमची मैत्री कधी तुटली नाही. त्यांना वेगळा विचार करण्याचा व तो मांडण्याचा अधिकार आहे आणि ह्याची जाणीव मला आहे. त्यांनी चर्चच्या बऱ्याच धोरणावर जाहीररीत्या टीका केलेली आहे. त्यांनी जेव्हा या सर्व लेखांचे एकत्रितरीत्या पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरविले, तेव्हा त्या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहावी, अशी त्यांनी मला विनंती केली. त्या विविध चर्चविरोधी लेखांतील विचार मला पटले नव्हते. चर्चच्या भूमिकेवर माझी श्रद्धा आहे. मी त्यांच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली. चर्च आणि धर्मगुरूंच्या विरोधात लिहिणाऱ्या एका पुस्तकाची प्रस्तावना एका धर्मगुरूनेच लिहावी, हे माझ्या सहकारी फादरांना रुचले नव्हते. बऱ्याच फादरांनी फोन करून मला त्यांची नाराजीही कळवली. पण मी त्याची पर्वा करीत नाही...’’

वयोमानामुळे झुकलेली आपली पाठ परत खुर्चीला टेकवत ते बोलू लागले, ‘‘विवेक असावा माणसामध्ये, उपस्थित करावेत त्याने विविध प्रश्न. त्यामुळे मला आज इथे हे समजून घ्यावेसे वाटते. हा विवेकमंच स्थापन करण्यामागचे कारण काय? आणि खरंच तुम्ही इथे धर्मविरोधी चर्चा करता का? कारण कानांवर जे पडते आणि आपण जे प्रत्यक्षात पाहतो, यात फरक असतो. ह्यासाठीच मी इथे उपस्थित राहिलेलो आहे...’’

फादरांनी चर्चेचा सूर सेट केला होता. प्रथम डिसोझासर यांनी बोलण्यास सुरुवात केली,

‘‘फादर, इथे फक्त धर्माच्या विरोधात चर्चा होत नाही; विविध विषयांवर चर्चा केली जाते. चर्चा होत असताना ती वेगवेगळ्या मुक्त मार्गांनी होते, तिला कित्येक बाजू असतात. प्रत्येक बाजू चर्चिली जाते. चर्चला कधी एखादी बाजू विरोधीही वाटू शकते, तसेच एखादी भूमिका चर्चला आपल्या बाजूचीही वाटू शकते. इथे वेगवेगळे मुद्दे चर्चिले जातात. धर्म, विज्ञान, राजकारण, समाजकारण अशा सर्वच विषयांवर आम्ही बोलत असतो. जीवनातील विविध प्रसंगी आपल्यामधील विवेक कसा जागृत ठेवायचा, ह्याविषयी आम्ही चिंतन करत असतो. आता हे पीटर, हे माझे भाचे आहेत. दोन वर्षांपूर्वी यांच्या 16 वर्षीय मुलाला- गिल्सनला आकस्मिक अपघात झाला. आम्ही त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्याचा जीव गेला होता. आम्ही तसं घरी सगळ्यांना फोन करून सांगितलंही. पोस्टमॉर्टेम होण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये थांबलो होतो आणि अचानक माझा मोबाईल फोन वाजला. बघतो तर, पीटरचा नंबर होता. यांनी मला फोन करून काय सांगावे? माझ्या मुलाचे प्रेत आणण्यास वेळ झाला तरी चालेल; परंतु त्याच्या शरिराचा जो काही भाग उपयोगात आणता येईल, तो आणा. त्याचे अवयवदान करा. इतका मोठा आघात होऊनही त्याने तो धाडसी विचार केला. ही शक्ती त्याच्यात कुठून आली? हा विवेक, ही शक्ती चर्चा करण्यातूनच येते. यांनी मुलाचे अवयवदान केले आणि त्यानंतर पीटरच्या मुलाकडून प्रेरणा घेऊन आपल्या इथे बरीच अवयवदाने झाली, याचे श्रेय पीटरच्या विवेकी कृत्याला आहे.’’

असे बोलून सर पुढे म्हणाले, ‘‘आता, गिल्सनच्या शोकसभेच्या वेळी त्याच्या अवयवदानासाठी आम्हाला मदत करणारे पुरुषोत्तम पवार-पाटील हेही आले होते आणि शोकसभेच्या वेळी ते अवयवदानाचे महत्त्व विशद करत होते. अशा वेळेला येथील चर्चमधील फादर कुरेल यांनी काय म्हणावे? ‘‘हॅ, त्यात काय एवढे विशेष? आमच्या अमुक एका धर्मगुरूंनीही अवयवदान केलं होतं, हे काही नवं नाही. कुठे काय बोलायचं ह्याचं तारतम्य नसावं या धार्मिक नेत्याला? तुम्ही फादर आहात. सर्वप्रथम म्हणजे तुम्ही एका पॅरिशचे धार्मिक नेते आहात, आणि हे असे वागणे तुम्हाला शोभले का?”

‘‘हो, मला माहीत आहे- तुम्ही इथे जे आलेले आहात त्याचे कारण म्हणजे विवेकमंचाने आयोजित केलेले फादर जोशवांचे व्याख्यान. त्यामुळे जो गोंधळ झाला, त्याचे तीव्र पडसाद वसईभरात उमटले. पण मला वाटते की, फादर जोशवा हे पंडित आहेत आणि काय बोलावे हे त्यांना आम्ही सांगितले नव्हते. त्यांनी त्यांचे विचार मांडले आहेत आणि त्यांना ते मांडण्याचा आधिकार आहे. त्या कार्यक्रमानंतर परत आपले हे फादर कुरेल मला निर्मळ नाक्यावर भेटले आणि मला बरेच काही बोलले. तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही काय इथे कोपऱ्यामध्ये  धर्माच्या विरोधात बोलता, चर्च म्हणजे काय कुणीही यावे आणि काहीही बोलावे असे वाटले काय तुम्हाला? तुमचे धर्माविषयी ज्ञान किती? बाकीचे धर्मगुरू बसलेत की इथे; तुम्ही काय स्वतःला शहाणे समजता का? असे बरेच बोलले. फादर म्हणजे देवाचे प्रतिरूप असतात आणि तुम्ही त्यांचे ऐकत नाही, असे बोलत असताना पुढे ते असेही म्हणाले- हे कोण जोशवा? कुठले फादर ते? त्यांना म्हणावं, जे काही बोलायचे ते फादरांचे कपडे काढून बोला. फादरांच्या कपड्याचा असा अपमान नाही करायचा. म्हणजे बघा...’’

स्मितहास्य करत सर फादरांकडे पाहत म्हणाले, ‘‘एकीकडे ते फादरांना देवाचे प्रतिरूप म्हणत होते आणि दुसरीकडे त्यांच्याच सहकारी फादरांचा असा भर नाक्यावर उद्धार करत होते. मी त्यांना काहीच बोललो नाही. मी शांतपणे निघून आलो. नंतर मला कळाले की, त्यांनी एक-दोन जणांना सांगितले की, मी डिसोझासरांचे तोंड बंद केले. पण मी तोंड उघडलेच नाही, मग त्यांनी माझे तोंड कसे काय बंद केले? मला माझे तोंड उघडावेसेच वाटले नाही! कारण की, जे ते बोलत होते त्यावर काय बोलायचे माणसाने?’’

चर्चा बरीच रंगली होती. बरेच सदस्य आपापली बाजू मांडत होते. विवेकमंच हा कसा विवेकीरीत्या, मुक्तरीत्या चर्चा करण्यास प्रोत्साहन देतो, हे फादरांना उदाहरणासह पटवून देत होते. मीही मग यात सहभागी होत म्हणालो,

‘‘हा जो विवेकमंचाविषयीचा वाद अचानक उफाळून आलेला आहे- त्याचे एक कारण म्हणजे, जसे सरांनी सांगितले की फादर जोशवा ह्यांचे व्याख्यान आणि दुसरे कारण म्हणजे अनुप डिसोझा यांनी चर्चवर टीका करणारे जे पुस्तक लिहिलेले आहे त्याविषयी असलेली नाराजी हे आहे. परंतु मला इथे नमूद करावेसे वाटते की, मंचाविषयी फक्त एकांगी माहितीच बाहेरील लोकांना आहे. ज्यांना अनुप यांच्या पुस्तकाविषयी माहिती आहे, त्यांना डिसोझासरांनी मराठीमध्ये भाषांतरित केलेल्या टॉलस्टॉयच्या पुस्तकाविषयी काही माहिती आहे का? यांनी टॉलस्टॉयने लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे व ई-साहित्य नावाच्या प्रकाशन संस्थेने तो प्रकाशितही केला आहे. पोप फ्रान्सिस यांच्यासारख्या विवेकी पोपने जेव्हा स्त्रियांना चर्चमध्ये डिकन म्हणून दर्जा देण्याचे जाहीर केले, तेव्हा या मंचातूनच त्यांचे जाहीरपणे अभिनंदन करणारे पत्र गेले होते. चर्च जेव्हा-जेव्हा काही चांगले करते, तेव्हा त्याला या मंचातून सपोर्ट केला जातो आणि ज्या-ज्या ठिकाणी बदल होणे अपेक्षित आहे त्या-त्या वेळेला या मंचाच्या चर्चेत त्याचे पडसाद उमटतात.’’

‘‘अनुप डिसोझा यांच्या पुस्तकाविषयी फादरांना एवढाच राग असेल, तर त्या पुस्तकातील विचारांना प्रतिवाद करणारा असा सडेतोड लेख ते का लिहू शकत नाहीत? एवढी फादरांची फौज असलेल्या या वसईत एकही फादर त्यांचे विचार खोडून काढू का शकत नाहीत? सर्व हतबल का होतात? की, आपल्याला प्रतिवाद करण्यासाठी काहीच ठोस मुद्दा नाही?’’ नॉर्मन नेहमीच्या संयमित लयीत पण काहीशा वरच्या पट्टीत बोलला. त्याचा हा आक्रमक पवित्रा मी प्रथमच पाहत होतो.

‘‘नाही म्हणायला चिकित्सा करणारा एक लेख आला होता, ‘प्रेरणा’मध्ये आणि तोही डॉक्टर म्हणवणाऱ्या एलायस डाबरे या ज्येष्ठ धर्मगुरूचा. किती बालिश लेख होता तो! समीक्षा कशी न करावी याचे उत्तम उदाहरण होते ते.’’

ह्याला फादर जोएल ह्यांनीही हसून उत्तर दिले, ‘‘होय, तो लेख अतिशय सुमार दर्जाचा होता.’’

‘‘मला वाटते, आपल्या सध्याच्या बिशपांनी वसईला 10 ते 15 वर्षांनी मागे नेले आहे. आता मागे ‘प्रेरणा’मध्ये त्यांनी एक परिपत्रक प्रकाशित केलेले की, ‘ख्रिस्तशरीर प्रसाद’ हा फादरांनीच भाविकांना द्यायचा, सिस्टरांनी द्यायचा नाही. किती सनातनी विचार आहे हा! सिस्टरांचा त्याग नाही का? त्याग फक्त फादरांचाच आहे का? असा निर्णय बिशप कसा घेऊ शकतात?’’

सुनीलानेही आपल्या मनातील खदखद मोकळी करत म्हटले. तेव्हा त्याला फादरांनी लागलीच उत्तर दिले,

‘‘होय, तो त्यांचा निर्णय चुकला होता, पण तो लगेचच मागे घेण्यात आला.’’

सुनीलाने मग जोरात प्रत्युत्तर करीत म्हटले, ‘‘पण मागे घ्यावा लागावा असा चुकीचा निर्णय मुळात त्यांनी घेतलाच कसा? तुम्ही नेत्यांच्या जागी आहात, असा सनातनी व स्त्रियांना मागे नेणारा विचार बिशप मांडतात आणि त्यांना कोणीही फादर प्रतिवाद करीत नाहीत. सर्व फक्त माना हलवतात; हे चुकीचे नाही का?’’

(उत्तरार्ध पुढील अंकात)

Tags: VivekManch Manch Daniel Mascarenhas डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस विवेकमंच मंच weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात