डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विवेकमंचाच्या चर्चेचा फायदा काय? यातून काय निष्पन्न होते ? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. प्रश्न रास्त आहे. पण जर फक्त चर्चाच होत असली, तरीही मागील चार वर्षे प्रत्येक रविवारी म्हणजे जवळजवळ सलग २०० रविवार हे व्यासपीठ सुरू राहिले आहे. याचा अर्थ काय? लोक फक्त चर्चा करण्यासाठी नव्हे तर व्यक्त होण्यासाठीही येत असतात. त्यांच्या मनातली  खदखद, गोंधळ, प्रश्न, व्यथा व्यक्त करण्यासाठी त्यांना माध्यम हवंय. काही जण टि्वटर, फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर तो आधार शोधतात, तर काहींना तो पर्यायच नसतो वा ते माध्यम प्रभावी वाटत नाही. अशा वेळी विवेकमंचासारखा एखादा निर्मळसारख्या छोट्या गावात चालणारा उपक्रम कामी येतो. व्याख्यानाच्या कार्यक्रमात एखादाच वक्ता असतो आणि बाकी सारे श्रोते. विवेकमंचात सामान्य माणूस वक्ताही असतो ,आणि तोच श्रोतादेखील बनतो. या सभेसाठी  आपण कोणतीही जाहिरात करत नाही, तरीही पंचक्रोशीतून बरेच लोक या सभेस येत असतात.   

चर्चचे फादर मंचास भेट देण्यासाठी मंडळात येत आहेत ह्याची कल्पना ॲड. अनुप यांनी मंडळाच्या अध्यक्षांना अगोदर दिली होती. त्यामुळे संजयही सभेस आले होते. त्यांनी अध्यक्ष म्हणून विवेकमंचाची भूमिका विशद करताना म्हटले, ‘‘फादर, समाज विकास मंडळ ही एक प्रथितयश सामाजिक संस्था आहे. गेल्या ६० वर्षांपासून ही या समाजात कार्य करत आहे. महिला सक्षमीकरण, कलाक्रीडा, लायब्ररी, पतपेढी, मेडिकल फंड किंवा शैक्षणिक फंड असे विविध उपक्रम येथे कार्यरत आहेत. या उपक्रमांव्यतिरिक्त काही तरी नवे विचार पुढे यावेत आणि त्याचे एक मुक्त व्यासपीठ असावे- ज्याला कोणतेच बंधन नसेल, म्हणून या मंचाची आम्ही इथे स्थापना केली आहे. कारण पचविण्यास कितीही जड असल्या तरी वेगवेगळ्या क्रांतिकारी कल्पनांनीच हे जग पुढे जात असते. माझा मुलगा मला विचारायचा की, देवाचे देव कोण? देवाने जर जग निर्माण केले, तर त्याच्याही अगोदर कोणी तरी असायला हवे. त्यालाही कोणी तरी बनवलेले असायला पाहिजे. म्हणजे मुलांचे, आपले असे जे प्रश्न असतात, ते कुठे तरी बिनदिक्कत विचारले गेले पाहिजेत. त्यामुळे अशा कल्पना कोणतेही बंधन नसलेल्या खुल्या वातावरणात चर्चिल्या जाव्यात, म्हणून हा विवेकमंच आम्ही सुरू केलेला आहे आणि खूपच चांगल्या गोष्टी इथे घडत आहेत.

आता उदाहरणच द्यायचे झाले तर- एका सर्वसाधारण सभेमध्ये विवेकमंचावर चर्चा होत असताना एक मुद्दा असा पुढे आला की, ख्रिश्चन आणि हिंदू किंवा इतर धर्मीय समाज ह्यामध्ये सेतू बांधण्यासाठी आपण काय करू शकू? आणि त्या चर्चेतूनच या मागील दिवाळीत आम्ही ‘दीपावली संध्या’ हा येथील हिंदू व ख्रिस्ती धार्मिक भाविकांसाठी कार्यक्रम आयोजित केला. त्याला किती भरघोस प्रतिसाद मिळाला! दोन्ही समाजांतील मिळून ६०० माणसे या कार्यक्रमास उपस्थित राहिली. किती सुंदर तो कार्यक्रम झाला! दोन्ही समाज जवळ आले. हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षी करणार आहोत.’’

अशा तऱ्हेने फादरांनी विवेकमंचात स्वतः येऊन येथील सदस्यांशी संवाद साधला. ‘मला त्या ग्रुपमध्ये काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, उलट खरा धर्म समजून घेण्याचे त्यांचे प्रयत्न स्तुत्य आहेत’, असा फीडबॅक फादर जोएल परेरा यांनी बिशपला दिला, असे नंतर कळाले. विवेकमंचाविषयीचा विरोध हळूहळू कमी होत होता. अशातच काही महिने गेल्यावर एके दिवशी समाज विकास मंडळाशी सुरुवातीपासून निगडित असलेल्या सर्व आजी- माजी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा एक स्नेहमेळावा घेण्याचे ठरले. सर्व सदस्यांना या कार्यक्रमास आमंत्रित केले गेले. त्याचबरोबर विवेकमंचाचाही मंडळातील चौथा वर्धानपनदिन असल्याने तसेच विवेकमंचात येणारी मंडळीही मंडळाशी जोडली गेली असल्याने त्यांनाही या मेळाव्यासाठी निमंत्रित केले गेले.

विवेकमंचात प्रत्यक्ष सभेत प्रत्येक रविवारी येणे शक्य नसलेल्या पण व्हॉट्‌सॲप, फेसबुक या माध्यमातून विवेकमंचाशी व पर्यायाने मंडळाशी जोडल्या गेलेल्या सर्व सदस्यांना फोन करून या मेळाव्याची कल्पना दिली गेली. रॉयल, ग्रॅहम व इतर सदस्य जे सुरुवातीला मंचात यायचे, त्यांनाही मी या स्नेहमेळाव्यास येण्यासाठी फोन केला. पावन निर्मळकरांनाही फोन करण्याचा प्रयत्न केला, पण ते दुबईला परत गेलेले असल्याचे कळले.

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मंडळात तयारीसाठी गेलेलो असताना, मॅथ्यू क्रॅस्टो हे मंडळाच्या आवारात भेटले ‘‘स्नेहमेळावा फक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठीच होता. विवेकमंच ह्यामध्ये कसे आले इथे?’’ स्नेहमेळाव्याच्या बॅनरमधील ‘विवेकमंच’च्या नावाकडे अंगुलीनिर्देश करत ते म्हणाले.

‘‘अहो विवेकमंच आपल्या मंडळाचाच एक भाग आहे. विवेकमंचाचे सदस्य म्हणजे मंडळचेच सदस्य!’’ मी म्हणालो.

‘‘स्नेहमेळावाच्या कार्यक्रमात विवेकमंचाचं जास्त चालतेय असा लक्षात आलं, तर मी खुर्च्या स्टेजवर फेकून मारेन; लक्षात ठेवा.’’ असे म्हणत ते ताड्‌ताड्‌ जिना चढून पतपेढीत निघून गेले. माझ्या पोटात धस्स झालं. मंचाला मॅथ्यू क्रॅस्टो यांचा विरोध आहे, हे माहिती होतं. पण तो विरोध वैचारिक असेल, अशी मी अपेक्षा केली होती. तसेच एव्हाना यामागील चार वर्षांत मंडळातील गटबाजी, राजकारण याचा मला पुरेपूर अनुभव आलेला होता. पण चक्क खुर्च्या पुढे फेकून मारण्याची भाषा ऐकली आणि प्रथमतः मी ‘दहशत’ म्हणजे काय, ते अनुभवले. ताबडतोब मी पीटर व डिसोझासर यांच्या कानांवर ही बातमी घातली. कार्यक्रमास बरीच पाहुणेमंडळी येणार होती. उगाच सगळ्यांसमोर तमाशा नको होता. त्या रात्री मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी क्रॅस्टो यांच्या लुडबुडीपासून उगाच धोका नको म्हणून डिसोझासरांनी क्रॅस्टो ह्यांचे समवयस्क व मंडळात त्यांच्यापेक्षा जास्त योगदान दिलेले माजी अध्यक्ष व विवेकमंचाचे खंदे समर्थक जॉन आल्मेडा ह्यांना खास या मेळाव्यासाठी येण्यासाठी विनंती केली.

दुसऱ्या दिवशी १० मिनटे अगोदरच मी मंडळात पोहोचलो. सभागृहात आमंत्रित सदस्य हळूहळू येत होते, तर काही अगोदरच स्थानापन्न झालेले होते. किती लोक येतील आणि मॅथ्यू क्रॅस्टो आणखी काही गोंधळ तर घालणार नाही, या विवंचनेत मी पायऱ्या चढत मंडळाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सभागृहात पोहोचलो. तोच मी तिथे ग्रॅहमला तात्या व सॅबेस्टियन अंकल यांच्याबरोबर उभे राहून वार्तालाप करताना पाहिले आणि मला खूप आनंद झाला. तो नुकताच आलेला दिसत होता.

‘‘वेलकम बॅक ग्रॅहम! थँक्स फॉर कमिंग.’’ मी त्याच्या पाठीवर थाप देत म्हटले. ‘‘येस सर. हाऊ आर यू?’’ असे म्हणत आम्ही एकमेकांना आलिंगन दिले.

‘‘इथे बरेच नवे चेहरे  दिसतायेत. आपल्या मंचात एवढे लोक रेग्युलर झालेत?’’

‘‘नाही रे, ह्यांना उलट मंचात रेग्युलर करायचंय, म्हणून बोलावलंय आपण!’’ मी हसत म्हटले.

‘‘यू नो व्हॉट- ही सगळी चर्चेस, मंदिरं, या मशिदी जेव्हा आपल्या मंचासारख्या खुल्या चर्चा करायला लागतील ना, तेव्हा हे जग खऱ्या अर्थाने बदलेल.’’

‘‘ॲग्री. काश, वो सुबह कब आयेगी!’’ ‘‘जैसे मेरे लाईफ में आ गयी.’’

‘‘हो रे, तुला मंचाची गरज अवघी सहा महिनेच लागली. बरं, ते आता आपण कार्यक्रमात बोलूच. मला सांग, तुझं म्युझिकचं कसं चालू आहे? आणि मम्मी-डॅडी कसे आहेत?’’

‘‘मम्मी-डॅडी आता मस्त शांत आहेत. त्यांना माझ्या प्रत्येक म्युझिक शोमध्ये मी पहिल्या रांगेत बसवतो. म्युझिकची दुनिया त्यांनाही आता आवडतेय. आणि करिअरही एकदम मस्त चाललंय.’’

‘‘आणि आम्हाला लग्नाला कधी बोलावतोयस?’’ ग्रॅहमच्या मम्मीचा काळजीयुक्त चेहरा आठवून मी विचारले.

‘‘बघू रे ते, करिअरचे सूर आता छानपैकी लागतायेत. होपफुली, लवकरच.. आपल्या सगळ्या मंचाला बोलवणार आहे मी...’’ असे हसत-हसत म्हणत तो खुर्चीत बसणार, इतक्यात ग्रॅहमने काही आठवल्यासारखे केले व मला म्हणाला, ‘‘अरे डेव्हिड, तुला एक सांगायचं राहूनच गेलं. रॉयलने आज सकाळी फोन केला होता मला. तो मला म्हणाला की, तू त्याला मागच्या आठवड्यत फोन केलेलास म्हणून. पण त्याला आज जमणार नाही. ते आपलं ‘कुपारी संस्कृती मंडळ’ आहे ना, ते जॉईन केलंय त्याने. आणि त्याची काही तरी आज मीटिंग आहे म्हणे. त्याने तुला मेसेज पास करायला सांगितले.’’ असे म्हणून दीपेश आणि नॉर्मन यांच्या बाजूला ग्रॅहम जाऊन बसला.

‘‘ओके. थँक्स फॉर टेलिंग.’’ असे म्हणत मी एक दीर्घश्वास घेतला.

मी संस्कृती मंडळातून मंचात आलो होतो, तर रॉयलचा प्रवास मात्र मंचातून संस्कृती मंडळापर्यंत उलट्या दिशेने होत होता. मंचाचे सदस्य, मंडळाचे कार्यकर्ते व इतर आमंत्रित हळूहळू जमत होते. आम्ही कार्यक्रम सुरू केला. मेळाव्याच्या पहिल्या सत्रात मंडळाचे अध्यक्ष संजय यांनी कार्यकर्त्यांनी मंडळाच्या पुढील प्रगतीसाठी आत्मपरीक्षण करणे कसे गरजेचे आहे, ह्याविषयी त्यांचे मत व्यक्त केले. पतपेढीचे अध्यक्ष शिरीष आल्मेडा यांनी समाजाचा वा संस्थेचा विकास करायचा असेल तर प्रथम व्यक्तिविकास करणे का महत्त्वाचे आहे, यासंबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मंडळाच्या विविध विभागांचा आढावा त्यांच्या विभागप्रमुखांनी घेतला.

उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी बंडू मास्तर आणि ॲलेक्स दोडती ह्यांनीही मंडळाच्या गतकाळातील अनुभव उपस्थितांबरोबर शेअर केले. चहापानाच्या सत्रात मंडळाशी विवेकमंचातर्फे जोडल्या गेलेल्या विविध कवीसिंगसर्  यांनी आपापल्या कला सादर केल्या. यात प्रामुख्याने ग्रॅहम, रिमा पाटील, मॅक्सवेल आल्मेडा यांनी विविध गीते; तर रॉकी परेरा, फेलिक्स डाबरे, इग्नेशिअस निग्रेल, एडिसन डिसोझा यांनी कविता व गजल सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. दुसऱ्या व शेवटच्या सत्रात मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांसमोर विवेकमंचाच्या सदस्यांनी ‘मंचामुळे आपल्याला काय फायदा झाला?’ ह्याविषयी आपापले अनुभव कथन करण्याचे ठरले होते.

‘‘विवेकमंचाच्या चर्चेचा फायदा काय? यातून काय निष्पन्न होते? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. प्रश्न रास्त आहे. पण जर फक्त चर्चाच होत असली, तरीही मागील चार वर्षे प्रत्येक रविवारी म्हणजे जवळजवळ सलग २०० रविवार हे व्यासपीठ सुरू राहिले आहे. याचा अर्थ काय? लोक फक्त चर्चा करण्यासाठी नव्हे तर व्यक्त होण्यासाठीही येत असतात. त्यांच्या मनातली खदखद, गोंधळ, प्रश्न, व्यथा व्यक्त करण्यासाठी त्यांना माध्यम हवंय. काही जण टि्वटर, फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर तो आधार शोधतात, तर काहींना तो पर्यायच नसतो वा ते माध्यम प्रभावी वाटत नाही. अशा वेळी विवेकमंचासारखा एखादा निर्मळसारख्या छोट्या गावात चालणारा उपक्रम कामी येतो. व्याख्यानाच्या कार्यक्रमात एखादाच वक्ता असतो आणि बाकी सारे श्रोते. विवेकमंचात सामान्य माणूस वक्ताही असतो आणि तोच श्रोतादेखील बनतो. या सभेसाठी आपण कोणतीही जाहिरात करत नाही, तरीही पंचक्रोशीतून बरेच लोक या सभेस येत असतात. काही लोक तर त्यांच्या मनातली खदखद एकदा व्यक्त होऊन शांत झाली की, परत ते  आपापल्या आयुष्यात गुडुप होतात. किती छान आहे हे! आज समाजकारणाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात समाज विकास मंडळासारख्या बऱ्याच संस्था आहेत. पण या सर्वांत समाज विकास मंडळ हे वेगळं ठरतं ते या विवेकमंचासारख्या मुक्त व्यासपीठाच्या उपक्रमामुळे.’’ विवेकमंच विभागप्रमुख म्हणून मी सुरुवात केली.

नंतर कॅलेट आपले अनुभव सांगण्यास पुढे आली. ‘‘एका मित्राला आपण जर १० रुपयांची भेटवस्तू दिली. तर तोही आपल्याला दहा रुपयांची भेट परतफेड म्हणून देतो. म्हणजे दोघांकडे शेवटी परत १० रुपयेच राहतात. पण आपण जेव्हा एक विचार मित्राबरोबर शेअर करतो व मित्रही जेव्हा त्याच्याकडील एक वेगळा विचार देतो, तेव्हा दोघांकडे दोन-दोन विचार उरतात. विवेकमंचामुळे अशा विविध नवनवीन विचारांच्या exchange मुळे आपण सगळेच श्रीमंत झालो.’’ पिवळ्या रंगाचा टॉप व जीन्स घातलेली कॅलेट नेहमीच्या आत्मविेशासाने आपले अनुभव कथन करत होती.

‘‘मी आणि डेव्हिड आम्ही दोघे खूप अगोदरपासून मित्र आहोत. आम्हाला नेहमी वेगवेगळ्या टॉपिक्सवर डिस्कशन करायला आवडायचे. ‘एक मंच आहे व तिथे खूप चांगली चर्चा चालते’ हे इनफॅक्ट मला त्यानेच सांगितलं आणि माझ्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या ग्रुपचा मी भाग झालो. होय, थोडा त्रास झाला मला; पण तो तेवढ्यापुरताच. येथे झालेल्या विविध चर्चांमुळे हळूहळू मनातील सर्व क्लाउड्‌स क्लीअर होत गेले व एक वेगळंच क्षितिज गवसलं. आयुष्यात काय करायचंय आणि त्यापेक्षा काय नाही करायचं, हे आता एकदम स्पष्ट दिसू लागलं...’’ ग्रॅहमनेही खूप उत्स्फूर्तपणे आपले विचार मांडले.

‘‘Pearls ribbons  नेही जे शक्य झालं नसतं, ते books thoughts ने शक्य करून दाखवलं. आणि ते म्हणजे, आम्ही चौघी बहिणी या विवेकमंचामुळे खूपच क्लोज आलो. विवेकमंच is like a family now. एखादे काही चांगलं वाचलं किंवा ऐकलं, तर कधी एकदाचे मंचात येऊन सगळ्यांबरोबर ते मी शेअर करते, असे होते...!’’ गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली प्रसन्नवदनी फ्लोरी मंचामुळे तिला झालेला फायदा सांगत होती. मंचामुळे ती व सोनल या दोघा बहिणींचं कॅलेट व मितभाषी प्रिया या मैत्रिणींशी गहिरे नाते जुळले होते.

राम देशमुख त्यांचे म्हणणे मांडताना म्हणाले, ‘‘माझी  मुलगी प्रिया ही कॅलेटची मैत्रीण. त्यामुळे विवेकमंच जेव्हा सुरू झाला, तेव्हा प्रिया मलाही या सभेत घेऊन आली. मला झालेला फायदा म्हणजे, दैनंदिन आयुष्यात आपण संसारी माणसं इतकी व्यग्र असतो की, बऱ्याच गोष्टींवर शांतपणे विचार करण्यास सवडच मिळत नाही. इतकी वर्षे मी करतोय ना, इतरही करतायत ना- म्हणून मीही करत जातो. पण मी जे करतोय ते काय व का करतोय- आणि त्याने मला आत्मिक समाधान मिळतेय का, हा कधी आपण विचारच करत नाही. पण ती शहानिशा विवेकमंचात आल्यापासून करावीशी वाटली.’’

ह्यांबरोबरच दीपेश, ॲड.व्हिन्सेंट, सुनीला ह्यांनीही आपापले अनुभव कथन केले. विवेकमंचाविषयी बिशपहाऊसला तक्रारींचे पत्र लिहिणारे मिंगेल डिमेलो हेही आमंत्रित होते व हजर होते. काही वादग्रस्त चर्चिले जात नाहीये, हे उमगताच मग ते मधेच कार्यक्रमातून उठून गेले! मंडळाच्या विेशस्त मंडळातील ज्येष्ठ नेते व कार्यकारिणीतील इतर सदस्यही शेवटपर्यंत या मेळाव्यास थांबले होते. खूपच हृद्य असा तो सोहळा रंगला.

‘ॲड.अनुप का बरं आले नाहीत?’ असा विचार मनात येतोय तोच त्यांना मी जिने चढत येताना पाहिले. ते काहीसे उशिरानेच सभेस येत होते. त्यांच्याबरोबर एक महिलाही दिसत होती. चालताना त्या महिलेच्या पायाला काही त्रास असल्याचे जाणवत होते. फिक्कट पांढऱ्या रंगाची साडी, केसांत माळलेला चाफा आणि चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा उत्साह. मंडळाचा जिना चढत येऊनही कसलीच वेदना तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. होय, त्या शीला डिक्रूझ होत्या. तीच ती धीरोदत्त स्त्री- जिने चर्चच्या दबावाला बळी न पडता व आपल्या विवेकाशी तडजोड न करता अपंगांची संस्था सिद्धहस्तपणे उभी केली होती. ॲड.अनुप हे तर शीला डिक्रूझ यांच्यावर बिशपांनी केलेल्या अन्यायामुळे कसे चर्चमधून बाहेर पडले होते ह्याविषयी त्यांच्याकडून बऱ्याचदा ऐकले होते. आज त्यांना प्रथमच भेटणे होत होते.

‘‘येथे जवळच आज शीला मॅडमचा कार्यक्रम होता तेव्हा मी त्यांना म्हटलं- येताना जमलं तर आमच्या मंचाच्या मेळाव्यातही चला म्हणून. थोडे तुमचे अनुभव आमच्या यंग लोकांबरोबर शेअर करा.’’ ॲड.अनुप यांनी सभागृहात येताच त्यांची ओळख करून देत म्हटले.

‘‘अनुप मंचाविषयी खूप सांगत असतो. सर्वांना नमस्कार!’’ असे म्हणत त्यांनी स्मितहास्य करत उपस्थितांना नमस्कार केला.

ॲड.अनुप यांच्या विनंतीवरून त्यांनी आपल्या संस्थेविषयी उपस्थितांना मग थोडक्यात माहिती दिली. त्यांच्याकडून त्यांच्या संस्थेची प्रगती ऐकून तर आम्ही थक्कच झालो. सुरुवातीला एका कॉन्व्हेंटमधील छोट्या खोलीपासून त्यांच्या संस्थेची सुरुवात झाली होती. वीस वर्षांनंतर या संस्थेचे दोन मजली स्वतंत्र इमारतीमध्ये रूपांतर झाले होते. अपंगांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, विविध वैद्यकीय शिबिरे भरविणे ह्यापासून ते अपंगांसाठी ठिकठिकाणी सहलींचे आयोजन करणे व त्यांच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम राबविणे अशा विविध उपक्रमांतून त्यांनी दिव्यांगांसाठी हक्काचे सर्वधर्मीय विरंगुळा केंद्र उपलब्ध करून दिले होते. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी, कसलीही तडजोड न करता प्रसंगी बलाढ्य चर्चला नकार देण्याची हिम्मत दाखवणाऱ्या त्या बाईकडे पाहून उर भरून येत होता. शीला डिक्रूझ ह्यांचे व्यक्तिमत्त्व पाहून मनात विचारांचे पांगळेपण घेऊन जगणारे आपण ‘सुदृढ’ खरे तर अपंग आहोत ह्याची जाणीव झाली.

‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ असे सूचक व्यक्तव्य करून बिशपबरोबरच्या ‘त्या’ वादाविषयी बोलणे मात्र त्यांनी टाळले. कारण बिशपांनी जरी येशूच्या सेवेचा संदेश बासनात गुंडाळून आपल्या सत्तेचा दुरुपयोग केलेला असला, तरी त्याच बिशपांचा रोष पत्करून शीला डिक्रूझ यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारी व्यक्तीही चर्चशीच निगडित होती. फादर डेनिसजी यांच्याविषयीचा आदर त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. फादर डेनिसजी हेही मंचाच्या ‘त्या’ वादग्रस्त कार्यक्रमाचे एक वक्ते होते. तेव्हा त्या फादरांना ऐकण्याचा योग आला होता.

‘‘फादर डेनिसजी हे माझे गुरू आहेत. त्यांच्यामुळेच माझ्या हातून हे सारे कार्य घडू शकले. अनुप मला बोलला की, तुम्ही अंधश्रद्धेच्या विरोधात कार्य करता म्हणून. त्यावरून आठवलं.’’ असे ॲड.अनुप यांच्याकडे पाहत त्या पुढे म्हणाल्या, ‘‘तीस वर्षांपूर्वी मी ज्या शाळेत शिकवत होते, तिथे फादर डेनिसजी एक अंधश्रद्धाविरोधी नाटकाच्या तालमी घेत होते. आपल्या ख्रिस्ती समाजातील अंधश्रद्धेविषयी ते नाटक होते. अपंग मुलीच्या प्रेमात पडलेल्या मुलाला समाजाचा कसा सामना  करावा लागतो, अशी त्यात कथा होती, जी मुलगी अपंग मुलीची भूमिका करत होती तिला अपंग मुलगी कशी चालते हे दाखविण्यासाठी तालमीदरम्यान मला एक- दोनदा बोलाविले होते. पण ती मनासारखी अभिनय करत नव्हती. शेवटी मलाच त्या मुलीची भूमिका करण्याचा आग्रह होऊ लागला. सुरुवातीला माझ्या अपंगपणाचे प्रदर्शन मी सर्वांसमोर का मांडू, म्हणून मी मागे हटत होते; पण फादर डेनिसजी यांनी मात्र ‘तू तुझे अपंगपण स्वीकार. लोक हसत असतील तर हसू दे लोकांना’ असे म्हणून मला विचार कारावयास भाग पाडले. आणि मग ती भूमिका मी स्वीकारली.’’ शीला डिक्रूझ भावनिक झाल्या होत्या. ‘‘आम्ही त्या नाटकाचे ४० एक प्रयोग केले. माझ्या पहिल्या एंट्रीला प्रेक्षक हसत, मात्र नंतरच्या एंट्रीला ते रडत. त्या नाटकाने माझं वैगुण्य मला स्वीकारण्यास शिकवलं. मला वाटतं, त्या नाटकामुळेच मी माझा आहे तसा स्वीकार केला. आणि म्हणूनच माझ्या अपंग बांधवांसाठी मी हे छोटेसे कार्य करू शकले’’ कॅथरिन व तिच्या बाजूला कार्यक्रमाचा वृत्तांत लिहीत बसलेली सोनल आपले डोळे पुसताना दिसत होत्या. उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे उभे राहून व जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या कार्याला सलामी दिली. आपले मनोगत व्यक्त केल्यावर त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. ॲड.अनुप मग त्यांना परत घेऊन गेले.

माजी अध्यक्ष जॉन आल्मेडादेखील या स्नेहमेळाव्यासाठी आलेला आहे, हे पाहून मॅथ्यू क्रॅस्टो या कार्यक्रमाच्या जवळही फिरकले नाहीत आणि कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. एकूण ६० कार्यकर्ते या कार्यक्रमास हजर होते. विवेकमंचाचे संस्थापक डिसोझासर या सर्व सदस्यांचे मनोगत ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटलेली दिसत होती. निर्मळ या परिसरात हा छोटा का असेना, हा प्रयोग चार वर्षे अखंडपणे सुरू राहिला होता. डॉ.नरेन्द्र दाभोलकरांचे येथे येणे वाया गेले नव्हते.

मधे काही महिने गेले आणि मंडळाची वार्षिक सभा परत आली. मंडळाच्या सर्व विभागाचा वार्षिक आढावा घेण्यात येत होता. छापील वार्षिक अहवालाच्या पानांनुसार उपस्थितांची मते मागविण्यात येत होती. लायब्ररी, मेडिकल फंड, शिक्षण फंड, महिला मंडळ, कला-क्रीडा मंडळ असे करत-करत सभा विवेकमंचाचा अहवाल ज्या पानावर छापलेला होता, तिथे पोहोचली. मी दीर्घश्वास घेतला. जे काही प्रश्न येतील, त्याला मंचचा विभागप्रमुख म्हणून उत्तर देण्याच्या प्रयत्नामध्ये मी होतो. पण काय आश्चर्य... ‘चला, या पानावर कोणाला काही आक्षेप नसेल तर अहवालाच्या पुढच्या पानाकडे वळू या’ असे म्हणत चक्क पान उलटले गेले! समाज विकास मंडळात विवेकमंचाचे पान एकदाचे उलटले गेले होते! हुश्श : मी सुटकेचा निेशास टाकला. थोडक्यात form, storm  नंतर विवेकमंच 'norm' या अवस्थेत पोहोचल्याची चिन्हे दिसू लागली होती.

त्यानंतर मंचाने इतरही काही कार्यक्रम राबविले. विशेष उल्लेख करायचा म्हणजे, शालेय मुलांसाठी वैज्ञानिक प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात मुलांना विज्ञानाशी निगडित त्यांच्या मनात येतील ते कोणतेही प्रश्न विचारण्याची मुभा देण्यात आली होती. डिसोझासर विज्ञानाचे शिक्षक असल्याने ते व खखड मधून शिक्षण घेतलेल्या दीपेश वझे ह्यांना केंद्रस्थानी ठेवून हा कार्यक्रम आखला गेला होता. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. परिसरातील इंग्रजी, मराठी माध्यमात जाणाऱ्या पांढरपेशा कुटुंबातील मुलांबरोबरच निर्मळ गावकुसाबाहेर राहणाऱ्या पाड्यांवरील आदिवासी मुलांनीही ह्याला गर्दी केली होती व बरेच प्रश्नही विचारले होते. एकूण ३५० मुलं या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमास हजर होती. ‘मनात जो काही प्रश्न आहे तो विचारा आणि व्यक्त व्हा’ हा विवेकमंचाच्या ध्येयाशी पूरक असलेला कार्यक्रमाचा ढाचा होता. दोन तासांच्या या कार्यक्रमात ७० मुलांनी आपल्या मनातील प्रश्न विचारले. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे उपस्थित मुलांनीच दिली. मुलांची एवढी गर्दी मंडळाच्या कोणत्याच कार्यक्रमास जमली नव्हती. लहान मुलांची नस चांगली पकडली, म्हणून मंडळातील बऱ्याच लोकांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली आणि असे मुलांसाठीचे कार्यक्रम रिपीट करण्यावरही सगळ्यांचे एकमत झाले.

मंडळातील मंचाला असलेला विरोध हळूहळू मावळत होता. पण मंडळात जरी विवेकमंच आता स्थिरावला असला, तरी हा विचार मंडळाच्या बाहेर पडण्यास सज्ज झाला होता.

वाचा- फॉर्म, स्टॉर्म आणि... (पूर्वार्ध)

Tags: वैज्ञानिक उपक्रम डॉ.नरेन्द्र दाभोलकर चर्चा चर्च उपक्रम समाजकारण संस्कृती मंडळ समाज विकास मंडळ स्नेहमेळावा विवेकमंच डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस स्टॉर्म आणि फॉर्म मंच Scientific programs Dr Narendra Dabholkar discussion samajkaran Sanskruti Mandal Samaj Vikas Mandal Get together Vivekmanch Daniel Mascarenhas Form storm aani Manch weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात