डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अंधश्रद्धा ही कशी असावी याची त्यांनी अतिशय सोपी अशी व्याख्या केली. ‘‘जी श्रद्धा माणसाची शारीरिक, आर्थिक, भावनिक असे कोणत्याही प्रकारचे शोषण करत असेल, तर ती अंधश्रद्धाच आहे.’’ अंधश्रद्धेची डॉक्टरांनी केलेली ही सुटसुटीत आणि रिॲलिस्टिक व्याख्या मला खूपच आवडली. त्याचबरोबर त्यांनी आपले म्हणणे पटवून देताना एक उदाहरण सांगितलं, ‘‘समजा, एका सरकारी कचेरीमध्ये दोन कर्मचारी बसलेले आहेत. आपण असे मानू की, हे दोघेही ख्रिस्ती आहेत. त्या ठिकाणी जे स्थानिक आपल्या कामानिमित्त येतात, त्यापैकी काही लोक त्या पहिल्या माणसाला लाच देऊ करतात. तेव्हा तो पहिला माणूस ‘नाही, मी आज लाच घेऊ शकत नाही, कारण आज शुक्रवार आहे, आजचा दिवस येशूचा आहे.’ असे म्हणून ती लाच नाकारतो. दुसरी व्यक्ती मात्र, ‘दिवस कोणताही असो, भ्रष्टाचार मी मुळीच करणार नाही. मी लाच घेणार नाही.’ असे म्हणून ती लाच नाकारतो. मग माझ्या मित्रांनो, मला सांगा- या दोघांपैकी कोणाच्या भावना जास्त उच्च बरं?’’ उत्तरासाठी आपल्या तिरप्या चष्म्यातून श्रोत्यांकडे कटाक्ष टाकत ते म्हणाले.

समाज विकास मंडळाच्या ‘आदर्श पुस्तकालया’च्या कार्यकारणीवर जरी माझी निवड झाली असली, तरी सुरुवातीचा काळ वगळता त्या विभागाचे प्रमुख काही सभाच लावत नसल्याने मंडळात तसे रेग्युलर येणे कमीच होत होते. अपवाद फक्त पुस्तक बदलण्यासाठी तीन-चार आठवड्यांतून एकदा जे येणे व्हायचे, तेच. एकदा एका रविवारी मंडळाच्या लायब्ररीत नेहमीप्रमाणे मी माझं पुस्तक बदलण्यासाठी गेलो. तेथील लायब्ररियनशी थोडासा वार्तालाप केल्यानंतर मी माझे पुस्तक परत केले व नवीन पुस्तक घेण्यासाठी लायब्ररीच्या पुस्तक कक्षात फिरू लागलो. मंडळाचे ‘आदर्श पुस्तकालय’ हे ठाणे जिल्ह्यातील एक पुरस्कारप्राप्त पुस्तकालय आहे. इथे हजारो पुस्तके आहेत. चारही बाजूंनी भिंतीएवढ्या उंच असलेल्या मोठमोठ्या बुकशेल्फमुळे लायब्ररीमध्येच एक स्वतंत्र खोली वाटावी असा हा परिसर आहे. लायब्ररीत प्रवेश करताच असलेल्या दालनात वाचकांना वृत्तपत्रे, नियतकालिके व पुस्तके वाचण्यासाठी भले मोठे टेबल मांडून ठेवलेले आहे.

लायब्ररीच्या आतल्या दालनात मी वाचण्यासाठी नवे पुस्तक शोधत होतो. तोच मी पाहिलं की, नियतकालिकाच्या कक्षात त्या मोठ्या टेबलाभोवती काही लोक बसून कसलीशी चर्चा करत होते. त्यांचा संवाद माझ्या कानांवर पडत होता. ‘‘आज आपण कोणताही धर्म घेतला- मग तो ख्रिस्ती असो, हिंदू, मुस्लिम, जैन, बौद्ध- या सर्व धर्मांचे मूळ तत्त्वज्ञान खूप सुंदर आहे. ते माणसाला माणूस बनण्यास शिकविते.’’ अर्ध्या बाह्यांचा सफेद सदरा असा साधा वेष परिधान केलेले डिसोझासर म्हणत होते. ‘‘पण या धर्माचे आचरण करणारे आपण काय करतो? तर, मूळ विचार बाजूला ठेवून, तो न अंगीकारता फक्त कर्मकांड करण्यात आपण धन्यता मानतो. आज आपण बघितलं, तर मूळ धर्माचं पालन कुठल्याच धर्माचे लोक करत नाहीत. सर्वजण कर्मकांड करण्यातच गुरफटलेले आहेत.’’ सरांना मी खूप वर्षांनी पाहत होतो. शाळेत ते आम्हाला विज्ञान शिकविण्यास होते. समाज विकास मंडळातही ते गेली कित्येक वर्षे कार्यरत होते.

‘‘आज भारताची प्रगती खुंटलेली आहे. त्याला जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे धर्माचा असलेला फार मोठा पगडा.’’ डोक्यावर कॅप घातलेले ॲड.अनुप डिसोझा काहीसे निराशाजनक सुरात, समोर टेबलावरील वृत्तपत्रांच्या रांगेकडे शून्यवत्‌ नजरेने पाहत म्हणाले. सरांच्या बाजूच्याच खुर्चीत ते बसले होते. टेबलाभोवती 10-12 लोक बसलेले दिसत होते. त्यांतील काहींना मी ओळखत होतो. माझ्या शेजारीच राहणारे मिश्किल स्वभावाचे तात्या हे त्यांचे इतर ज्येष्ठ साथीदार सॅबेस्टियन फर्नांडिस व फ्रेडरिक मस्करणीस यांच्या समवेत बसलेले दिसत होते, बरीच अनोळखी तरुण मंडळीही दिसत होती. ज्यामध्ये कॉलेजला जाणारे तरुण मुला-मुलींबरोबरच शाळेत जाणारे एक-दोन विद्यार्थीही दिसत होते.

तोच फ्लोरी नावाच्या एका प्रसन्न व टवटवीत चेहऱ्याच्या तरुणीने ‘‘मला काहीतरी सांगायचे आहे’’ असे म्हणत आपला हात हळुवारपणे उंचावला आणि आपल्या गोड लडिवाळ आवाजात म्हणू लागली, ‘‘आमच्या कॉलेजमध्ये ना, एक educationalist आले होते. ते सांगत होते की, लहानपणी आपल्या इथे मुलांना आपण प्रथम रिलिजन शिकवतो आणि मग त्याला शाळेत सायन्स शिकवतो.’’ आपल्या कानातील लाँग इअरिंग्ज नीट करत फ्लोरी पुढे म्हणाली, ‘‘त्यामुळे त्याच्या आयुष्यात ना, पुढे रिलिजन नेहमी सायन्सपेक्षा जास्त डॉमिनेटिंग ठरतो. आणि तो मुलगा पुढे सायंटिस्ट जरी झाला, तरी सुपरस्टिशियस गोष्टींमध्येच जास्त अडकून पडतो.’’ तिच्या या विधानाने माझे कान टवकारले गेले. एक भयाण वास्तव ती तरुणी सहज बोलून गेली होती. ही चर्चा वेगळी वाटत होती.

ऑफिसमधील आयआयटीत शिकलेल्या माझ्या एका सहकाऱ्याने वाराणसीला फिरायला जाऊन आल्यानंतर आम्हा सर्वांसाठी तेथील लोकल गोडधोड डेलिकेसी आणण्याऐवजी सर्वांना चक्क बोटाएवढ्या आकाराच्या पात्रांमध्ये गंगाजल आणले होते. वाराणसी येथील गंगेचे पाणी भौगोलिक परिस्थितीमुळे किती अशुद्ध आहे, याची त्याला कल्पना नसेल का? तर दुसऱ्या एका सहकाऱ्याने केवळ न्युरोलॉजीवरच्या भक्तीमुळे आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीच्या ‘गुणगुण’ या गोड नावाचे ‘goonngoonn’ असे हॉरिफायिंग इंग्रजी स्पेलिंग केल्याचे पाहून मला धक्काच बसला होता. ही एवढी चांगल्या उच्चभ्रू कॉलेजमधून आलेली हुशार मुले अशी कशी असंबद्ध वागू शकतात, या विचाराने मला गोंधळात टाकले होते. फ्लोरीच्या त्या विधानावर ॲड.अनुप पुढे सरसावून करड्या आवाजात म्हणाले, ‘‘यासाठी आपण आपल्यातला विवेक जागृत ठेवणे आवश्यक आहे. धर्मातील जे-जे काही चांगले आहे, जे-जे आपल्या सदसद्‌विवेकबुद्धीला पटते फक्त तेवढे डोळसपणे घेऊन आपण आपलं जास्तीत जास्त लक्ष विज्ञानाकडे केंद्रित केलं पाहिजे.’’

मंडळातील महिला विभागात गेली कित्येक वर्षे प्रमुख म्हणून कार्य करणारी कॅथरिन ही महिलाही तिथे इतर मुलींसोबत बसलेली दिसत होती. पायाखाली ठेवलेल्या सामनाच्या पिशवीवरून ती तडक रविवारच्या बाजारातूनच मंडळात आलेली दिसत होती. तिचा भाऊ पीटर- जो स्वतःही मंडळात सक्रिय होता तोही- या चर्चेस उपस्थित होता. डिसोझासर या दोघा भावा- बहिणीचे मामा. त्यामुळे त्या दोघांना या सभेची सुरुवातीपासून कल्पना असावी, असे दिसत होते. आपला साडीचा लोंबकळणारा पदर सावरत कॅथरिनने कुतूहलापोटी विचारलं, ‘‘नाही... पण, जसं अनुपने सांगितलं, तसं हे सगळं फक्त आपल्या भारत देशातच आहे, की धर्माच्या नावाखाली जगात सगळीकडेच असंच चाललंय?’’ चर्चा काहीशी interesting होत आहे, हे पाहून मी मला जे पुस्तक हवं होतं ते घेऊन त्या चर्चेमध्ये सामील होण्यासाठी त्यांच्यासमवेत खुर्ची घेऊन बसलो.

‘‘धार्मिक पगडा असण्याचा त्या राष्ट्रावर कसा परिणाम होतो हे आपल्याला पाहायचं असेल, तर आपणाला  भारतापलीकडच्या देशाकडे पाहावं लागेल. मग आपल्या असं लक्षात येईल की ज्या देशावर धार्मिक पगडा कमी आहे, त्या देशांनी जास्त प्रगती केली आहे.’’

एकरेषीय पण धारदार आवाजात किरकोळ शरीयष्टीचे डिसोझासर बोलू लागले,

‘‘आता आपलंच पाहा- आपल्याला आपला धर्म कसा मिळाला? आपण काही धर्माची निवड आपणहून केलेली नाहीये. आपल्या आई-वडिलांनी आपल्याला तो धर्म दिला, म्हणून तो धर्म आपण अंगीकारतो आहोत. आपल्या आई-वडिलांना तो धर्म कोणी दिला? तर त्यांच्या आई-वडिलांनी. म्हणजे आपल्या आजी-आजोबांनी जो धर्म अंगीकारला, तोच धर्म त्यांनी पुढे नेलेला आहे. त्यामुळे यामध्ये हा धर्म खरंच मला पटतोय का; आम्ही आचरणात आणू शकतो का, असा विचार करून आपण धर्म स्वीकारतच नाही. आता जपानचं उदाहरण घ्या-’’

सर त्यांचे वाक्य पूर्ण करत आहेत, तोच टेबलाच्या कोपऱ्यात बसलेले एक मध्यमवयीन गृहस्थ त्यांना मधेच तोडत म्हणू लागले,

‘‘हे जे तुम्ही बोललात, ते एकदम खरे. धर्माची निवड आपण केलेलीच नाहीये. आपल्याला जे जन्मानेच मिळालंय, त्याच्याविषयी कसला आलाय अभिमान? बरं, ते जाऊ दे...’’ पिकलेली दाढी, डोळ्यांवर चष्मा, अंगात खाकी कुडता आणि समोर टेबलावर ठेवलेली झोळी... एखाद्या विचारवंतासारखा त्यांचा पेहराव होता. घसा खाकरत ते पुढे म्हणाले, ‘‘माझं खरं नाव विल्सन डिसिल्व्हा. आता हे नाव मला कोणी दिले? माझ्या आई-वडिलांनी का? तर, नाही. ते तर अशिक्षित होते! म्हणजे कोणा तरी फादरांनी त्यांना जे नाव आवडलं, ते मला दिलं... पण ते नाव मी का ठेवू?.. मी मोठा झाल्यावर मला ते नाव आवडलं नाही... मग मी ते नाव बदललं.’’ उन्हात फिरून काळा पडलेला चेहरा व पांढरी पिकलेली दाढी असलेली आणि स्वतःचे विल्सन हे नाव न आवडणारी ती व्यक्ती मला काहीशी विक्षिप्त वाटली.

नंतर त्या चर्चेदरम्यान ‘उपस्थित’ म्हणून नोंद करण्यासाठी फिरविल्या गेलेल्या मस्टरमध्ये सही करताना त्यांचे नवे नाव ‘पावन निर्मळकर’ आहे, असे लक्षात आले. एक तारा व त्याभोवती काढलेले वर्तुळ अशी काहीशी जगावेगळी रेखाटलेली त्यांची सही पाहिली आणि त्यांच्याविषयीचं माझं कुतूहल अधिकच वाढलं. एकंदरीत धर्माशी संबंधित मुक्त चर्चा होत आहे, हे जाणवत होतं. उपस्थितांपैकी काही जण आपले मत व्यक्त करत होते, तर इतर ही चर्चा शांतपणे ऐकत होते. डोळ्यांवरील चष्मा नीट करत सर आपलं अगोदरचं निरीक्षण पूर्ण करत म्हणाले,

‘‘जपानमध्ये नागरिक सुजाण वा 18 वर्षांचे झाल्यानंतर, जर त्या नागरिकाला एखादा धर्म आवडला तर ते तो धर्म अंगीकारू शकतात. त्यामुळे तिथे असं होतं की, एकाच कुटुंबात आई हिंदू आहे, बाप बुद्धिस्ट आणि मुलगी ख्रिश्चन धर्म पाळतेय! तिथे प्रत्येकाला ज्या-ज्या धर्माचे विचार आवडतात, तो धर्म तो पाळू शकतो. त्यामुळेच मला वाटतं, जपान इतका प्रगत झालेला आहे. जपानप्रमाणे आपण जर इतर देश- जसे, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यांच्याकडे पाहिले तर त्यांच्याकडेही तीच परिस्थिती आहे. धार्मिक पगडा ते जाणून-बुजून हळूहळू कमी करायला लागले आहेत. त्यामुळे त्यांची प्रगती झाली. याउलट, याच युरोपमधील पोर्तुगाल हा देश धार्मिक कट्टरपणामुळेच अन्य युरोपियन देशांच्या खूप मागे पडला आहे. देवाचा धाक व दहशत निर्माण केली गेली की, समाजाचा विवेक दाबला जातो व प्रगती खुंटली जाते.’’

मग ॲड.अनुप यांना ख्रिस्ती धर्मगुरूशी संबंधित एक ऐतिहासिक माहिती आठवली, ‘‘आता हेच बघा- अकराव्या शतकापर्यंत सर्व पोप हे विवाहित होते. धर्मगुरूंना लग्न करण्याचा अधिकार होता. असे असताना धर्मगुरूंनी अविवाहित राहिले पाहिजे, अशी अनैसर्गिक व अविवेकी भूमिका चर्चने अचानक घेतली. आज जे धर्मगुरू लैंगिक शोषणात अडकत आहेत, त्याचे कारण काय? त्यांच्या लैंगिक भावनांचा निचरा होत नाही, म्हणूनच ना?’’ असे म्हणत त्यांनी जोरात टेबलावर हाताची मूठ आपटली व म्हणाले, ‘‘तुम्ही लग्न करू नका, असे येशूने कुठे म्हटले आहे? चर्चचा हा शुद्ध मूर्खपणा नाही का? ’’ हे एकदम वरच्या पट्टीच्या आवाजात होते. मला काहीशी धडकीच भरली. त्यांच्या लालबुंद चेहऱ्याकडे बघून. चर्चविषयीचा राग त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.

शिरवळ गावातील फादर रेमंड यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या वेळी त्यांचे असे चारचौघांत आवेशाने बोलणे मी अनुभवलेले असले, तरी त्यांना मी सभेत इतके जवळून प्रथमच ऐकत होतो. अर्थात ॲड.अनुप यांनी दिलेली माहिती माझ्यासाठी नावीन्यपूर्ण होती. ‘फादर हे पूर्वी लग्न करू शकायचे’, ही कल्पनाच माझ्यासाठी स्फोटक होती. काहीशी गंमतही वाटली. विवाहित फादरांना चर्चमध्ये मिस्सा करण्यासाठी  जात असताना त्यांची पत्नी ‘अहो आज प्रवचन जरा आवरतं घ्या. घरी कामं आहेत म्हटलं-’ असे दटावत असेल का? आताचे जे फादर तावातावाने ‘पती-पत्नीने एकमेकांना समजून घेतले पाहिजे’ असे प्रवचनात उपदेश देत म्हणत असतात तसे, फादर विवाहित असतानादेखील बोलण्याची हिम्मत करत असतील का?

मला त्या चर्चेत थांबायचे होते. मला ती चर्चा पूर्ण ऐकायची होती. तोच मला माझ्या पत्नीच्या फोनमुळे चट्‌कन घरी यावे लागले. त्याला कारणही तसेच होते. माझ्या सहा महिन्यांच्या बाळाचे डायपर्स संपलेले होते. एकंदरीत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती! मला तत्काळ घरी पोहोचणे भाग होते. त्यानंतर माझा मुलगा एक वर्षाचा होईपर्यंत म्हणजे पुढील सहा महिने माझे मंडळात येणे जवळजवळ थंडावले होते. एक तर लायब्ररी कमिटीच्या सभा तेवढ्या सक्रियरीत्या होत नव्हत्या. आणि दुसरं म्हणजे, मीही माझ्या मुलाच्या संगोपनात पूर्णपणे बुडून गेलो होतो. मी जी ही चर्चा ऐकली होती, ती ‘विवेकमंच’ या समाज विकास मंडळात नव्याने स्थापन झालेल्या ग्रुपची होती.

डिसोझासर व ॲड.अनुप डिसोझा या दोघांनी तो ग्रुप नुकताच स्थापन केला होता. हे दोघेही तसे शिरवळ गावात लहानाचे मोठे झालेले. गेल्या कित्येक वर्षांपासून दोघे त्यांच्या गावापासून दूर विरुद्ध दिशेला राहत असल्याने त्यांची तशी भेट कमीच व्हायची. दोघेही परिसरातील हॉली सॅक्रामेंट या चर्चच्या शाळेत होते. शालेय जीवनात अनुप नेहमी चर्चमध्ये जाणारे, तर सिल्व्हेस्टर चर्चमध्ये न जाणारे. मॅट्रिक झाल्यावर दोघांनीही विज्ञान विषय घेऊन B.Sc. केले. सिल्व्हेस्टर त्याच हॉली सॅक्रामेंट शाळेत विज्ञानाचे शिक्षक म्हणून रुजू झाले तर अनुप यांनी वकिलीचा अभ्यास करून ते बॉम्बे हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करू लागले. मध्ये बरीच वर्षे निघून गेली, सांसारिक जबाबदाऱ्याही पूर्ण झाल्या होत्या. दोघेही आता निवृत्तीचे आयुष्य जगत होते. एके दिवशी अनुप नेहमीप्रमाणे बाजार करून घरी परतत होते, तोच त्यांची भेट सिल्व्हेस्टर डिसोझा यांच्याशी झाली. गेली कित्येक वर्षे चर्चमध्ये नियमितपणे जाणाऱ्या अनुप यांनी आता चर्चमध्ये जाणं अचानक थांबवलं होतं.

आयुष्याच्या एका निर्णायक वळणावर दोघे एकत्र आले होते. ‘‘हे जे चर्चद्वारे प्रार्थनेचे स्तोम माजवले जात आहे, इथे प्रार्थना, तिथे प्रार्थना, जेवणाअगोदर प्रार्थना... देवळात, गावात, घराघरात प्रार्थना... हे आपल्या समाजाला कुठे घेऊन चालले आहे? ‘‘आणि एवढं सगळं करून समाज आहे तसाच आहे. आपण आपल्या मुलांसोबत वागायचे तसेच वागतो. मुलंही आई-वडिलांशी वागायची तशीच वागतात. आपल्या समाजाच्या समस्या आहेत तशाच आहेत. ‘‘परत धर्माची चिकित्सा करायची म्हणजे, मोठा गुन्हा समजला जातो. आपल्या धर्माची चिकित्सा आपण नाही करायची, तर मग दुसऱ्या कोणा व्यक्तीची वाट पाहायची का?’’ ॲड.अनुप आपल्या मनातील खदखद आपल्या वर्गमित्राकडे मांडत होते. गुड फ्रायडे काही दिवसांवर येऊन ठेपला होता. ॲड.अनुप हे त्या वर्षी गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये प्रथमच जाणार नव्हते.

जे चर्चमध्ये जात नाहीत, त्यांनाही घराबाहेर पडण्यास निमित्त मिळावे म्हणून अनुप यांनी सिल्व्हेस्टर यांस, ‘‘आपण मंडळात मुक्तपणे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करता यावी म्हणून काही सुरू करू या का?’’ असे सुचविले. या दोघांबरोबर इतर पाच-सहा लोक जे चर्चला जात नव्हते, ते गुड फ्रायडेच्या दिवशी सकाळी दहा वाजता ‘समाज विकास मंडळा’च्या आवारात जमले व चर्चा करू लागले. थोडी खलबते झाल्यावर, ‘‘कुठे तरी आपल्या समाजाचा विवेक जागृत करण्याची गरज आहे. त्यासाठी धर्माशी संबंधित एखादे व्याख्यान आयोजित केले पाहिजे.’’ यावर सर्वांचे एकमत झाले. योगायोगाने ॲड.अनुप त्याच काळात बाँबे हायकोर्टात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील एक खटला हाताळत होते आणि त्यामुळे त्यांच्या ते संपर्कात होते. म्हणून त्यांनाच ‘धर्म आणि विवेक’ या विषयावर बोलण्यासाठी बोलावण्याचे त्या पहिल्या सभेत ठरले.

‘‘आपण आता असे प्रत्येक रविवारी इथे मंडळात भेटून अशीच विचारांची देवाण-घेवाण करू’’ असे अनुमान काढून ती गुड फ्रायडेच्या दिवशी मंडळात भरलेली सभा पार पडली. महिन्याभरातच मंडळात नरेंद्र दाभोलकरांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम होत आहे, अशी मला माहिती मिळाली. तोपर्यंत डॉ.नरेंद्र दाभोलकर म्हणजे ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ एवढं एकच समीकरण डोक्यात फिट्ट होतं. त्याचबरोबर डॉ.नरेंद्र दाभोलकर ही एक महाराष्ट्रातील नावाजलेली व्यक्ती आहे, एवढीच जुजबी  माहिती मला त्यांच्याविषयी होती. मी माझ्या आई- वडिलांसोबत त्यांच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. किरकोळ तरीही काटक शरीरयष्टी असलेले डॉक्टर साधा सफेद सदरा घालून मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात बसलेले दिसत होते. त्यांचे एकंदरीत वागणे खूपच साधे वाटत होते. व्याख्यानासाठी मंडळाचे सभागृह खच्चून भरून गेलेले होते. अंनिसचे वसईतील कार्यकर्ते, ‘साधना’ या अंकाचे वाचक व परिसरातील ख्रिस्ती समाजातील बरीच श्रोतेमंडळी या कार्यक्रमास हजर होती.

त्या दिवशी त्यांनी अतिशय परखड असे विचार व्यक्त केले. ‘‘विज्ञान आणि धर्म हे एकमेकांस पूरक असू शकतात, परंतु त्यासाठी धर्माचे आचरण हे विवेकाने करायला हवे.’’ काही शब्दांवर जोर देण्यासाठी, ते शब्द सलग न म्हणता त्यातील प्रत्येक अक्षरावर भर देत डॉक्टर बोलत होते. ‘‘त्यात अंधश्रद्धेला थारा नको. एकाची श्रद्धा ही दुसऱ्याची अंधश्रद्धा असू शकते, तर दुसऱ्याची अंधश्रद्धा ही आणखी कोणाची तरी श्रद्धा.’’ तेव्हा अंधश्रद्धा ही कशी असावी याची त्यांनी अतिशय सोपी अशी व्याख्या केली. ‘‘जी श्रद्धा माणसाची शारीरिक, आर्थिक, भावनिक असे कोणत्याही प्रकारचे शोषण करत असेल, तर ती अंधश्रद्धाच आहे.’’ अंधश्रद्धेची डॉक्टरांनी केलेली ही सुटसुटीत आणि रिॲलिस्टिक व्याख्या मला खूपच आवडली. त्याचबरोबर त्यांनी आपले म्हणणे पटवून देताना एक उदाहरण सांगितले,

‘‘समजा, एका सरकारी कचेरीमध्ये दोन कर्मचारी बसलेले आहेत. आपण असे मानू की, हे दोघेही ख्रिस्ती आहेत. त्या ठिकाणी जे स्थानिक आपल्या कामानिमित्त येतात, त्यापैकी काही लोक त्या पहिल्या माणसाला लाच देऊ करतात. तेव्हा तो पहिला माणूस ‘नाही, मी आज लाच घेऊ शकत नाही, कारण आज शुक्रवार आहे, आजचा दिवस येशूचा आहे.’ असे म्हणून ती लाच तो नाकारतो. दुसरी व्यक्ती मात्र, ‘दिवस कोणताही असो, भ्रष्टाचार मी मुळीच करणार नाही. मी लाच घेणार नाही.’ असे म्हणून ती लाच नाकारतो. मग माझ्या मित्रांनो, मला सांगा- या दोघांपैकी कोणाच्या भावना जास्त उच्च बरं?’’ उत्तरासाठी आपल्या तिरप्या चष्म्यातून श्रोत्यांकडे कटाक्ष टाकत ते म्हणाले. ‘‘दुसरी व्यक्ती!’’ उपस्थितांकडून अपेक्षित उत्तर आले हे ऐकताच ‘‘अगदी बरोबर! या दोन प्रसंगाकडे पाहिलं तर दोघांनीही लाच घेतली नाही. पण या दोघांत दुसऱ्या व्यक्तीची भावना सगळ्यात जास्त उच्च, कारण त्याने पहिल्या व्यक्तीप्रमाणे देवाच्या वा धर्माच्या भीतीमुळे लाच घेण्याचे टाळले नव्हते, तर ‘भ्रष्टाचार हा चुकीचाच’ म्हणून त्याने लाच स्वीकारली नव्हती.’’

The true test of a man's character is what he does when no one is watching. या धर्तीवरचं डॉक्टरांनी दिलेलं हे उदाहरण मला आवडलं. एकंदरीत त्यांनी खूपच तर्कशुद्ध व त्यांच्या विचारांची स्पष्टता जाणवणारं सुंदर असं व्याख्यान दिलं. याच व्याख्यानात त्यांनी आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यांचं हे जे व्याख्यान झालं होतं, ते एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात. तोपर्यंत महाराष्ट्रात उन्हाळ्याचा कहर जाणवू लागला होता. ठिकठिकाणी दुष्काळ पडू लागले होते. पाणी आटल्यामुळे शेतीच काय, तर पिण्यासाठीही शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हतं. अशी दारुण परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर दाभोलकरांनी एक वेगळंच मत मांडलं. ‘‘महाराष्ट्रामध्ये जी धरणं आहेत, त्या धरणांमध्ये एवढं पाणी आहे की, त्याचा योग्य वापर केला; तर शेतकऱ्यांना पिण्यासाठीच काय तर त्यांच्या गुरांना, त्यांच्या शेतीसाठीही हे पाणी वापरासाठी मिळू शकेल आणि त्यांच्या जीवनाची भ्रांत कायमची सुटू शकेल. पण ते तसं होत नाहीये, कारण या धरणांतील बहुतांशी पाणी हे महाराष्ट्रातील साखर कारखान्याचे जे मालक आहेत ते त्यांच्या उसाच्या शेतीसाठी पळवीत आहेत. त्यांना दिग्गज राजकारण्यांचा पाठिंबा आहे.’’ हे त्यांचे वक्तव्य ऐकून मला धक्काच बसला. मी दुष्काळाचं असं भयानक कारण प्रथमच ऐकत होतो. तोपर्यंत माझी अशी समजूत होती की- सरकारचा नाकर्तेपणा, पाटबंधारे-जलबंधारे बांधण्यात झालेला भ्रष्टाचार आणि महाराष्ट्राची जी भौगोलिक परिस्थिती आहे त्यामुळे ही दुष्काळी परिस्थिती दर वर्षी उद्‌भवत आहे. परंतु या कारणाबरोबरच या दुष्काळामागे राजकारण्यांचेही स्वार्थीपणही आहे, हे जेव्हा मला कळलं; तेव्हा रागाची एक तिडीक मनातून उमटली.

या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी एका अग्रगण्य दैनिकात दाभोलकरांनी जे स्फोटक विचार मांडले होते, त्याच्याशी अनुकूल असा एक अग्रलेख (‘उसाचे कोल्हे’ या शीर्षकाचा) आला होता. त्यामध्येही असंच म्हटलं गेलं  होतं की, दुष्काळाने होळपळणाऱ्या महाराष्ट्रात आणखी वीसहून अधिक साखर कारखान्यांना सरकारने परवानगी दिली आहे. वारेमाप पाणी पिणाऱ्या उसाखाली जास्तीत जास्त जमीन आणण्याचा राज्य सरकारचा उद्योग केवळ मूर्खपणाचा नाही, तर त्यामागे राजकीय धूर्त शहाणपणाचा पक्का पाया आहे. ते वाचून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलेल्या दाभोलकरांप्रति असलेला माझा आदर वाढला. दाभोलकरांविषयी आदर वाढण्याचं दुसरं कारण म्हणजे ते स्वत: साताऱ्याहून त्या भर उन्हाळ्यात जवळजवळ आठ ते नऊ तासांचा प्रवास करून वसईत हे व्याख्यान देण्यासाठी आलेले होते. ते व्याख्यान देऊन पुन्हा तत्काळ ते पुण्याला जाणार होते, कारण दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या ‘साधना’ या अंकाचं प्रकाशन करायचं होतं. त्यांची कामाप्रति असलेली एकनिष्ठता मला खूपच भावली. ते एक तासाच्या व्याख्यानासाठी जवळजवळ आठ ते नऊ तासांचा प्रवास करून पुन्हा तेवढ्याच तासांचा परतीचा प्रवास करणार होते.

त्यानंतर चारेक महिने मात्र मी माझ्या मुलाला वाढताना पाहत, पालकत्वाचा आनंद घेण्यात दंग होतो. मुलाची वाढ होताना पाहणे, हा किती आनंदाचा क्षण असतो! प्रथम अंथरुणात झोपून राहणारी, मग हळूहळू मोठ्यांच्या कडेवर बसून फिरायला लागतात. अगोदर सगळ्यांना एकाच नजरेने पाहणारी अचानक त्यांच्या मम्मा-डॅडा यांना स्पेशल प्रतिसाद देऊ लागतात. अगोदर फक्त रडणारी मग अचानक तोंडाचं बोळकं पसरवून खळखळून हसू लागतात. प्रत्येक मूल हे त्याचं स्वत:चं व्यक्तिमत्त्व, आवडनिवड घेऊन येत असतं. त्याची जाणीव आपल्याला होणे, हाही एक सुखद अनुभूती देणारा अनुभव असतो. पालकत्वाच्या या आनंदाच्या डोही एक बाप म्हणून मीही मनसोक्त डुंबत होतो. अख्ख्या आनंदात भुर्रकन एक वर्ष भरलं. मुलगा एक वर्षाचा होणार होता. मीही मग जवळच्या नातलगांना घेऊन वाढदिवसाची एक छोटी पार्टी आयोजित केली. पूर्ण दिवसाच्या धावपळीमुळे मी दुसऱ्या दिवशी रजा घेतलेली होती. सकाळची वेळ असेल. मी आणि माझी पत्नी मुलासोबत त्याला मिळालेली बर्थडे गिफ्ट्‌स उघडून दाखविण्यात मग्न होतो आणि अचानक माझा फोन वाजला. आमच्या लायब्ररी कमिटीच्या प्रमुखाचा, संजय रॉड्रिग्जचा तो फोन होता.

‘‘अरे डेव्हिड, तुला काही कळलं का?’’ ‘‘काय?’’ ‘‘डॉ.दाभोलकरांची हत्या झालेली आहे. त्यानिमित्ताने आज आपल्याला मंडळात निषेध नोंदविण्यासाठी एकत्र जमायचे आहे. जमलं तर ये संध्याकाळी.’’ असे म्हणत त्याने फोन ठेवला. मी लगेचच टीव्ही लावला. न्यूज चॅनेलवाल्यांनीही थेट लाइव्ह प्रक्षेपण सुरू केले होते. ‘डॉ.नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात दिवसाढवळ्या हत्या’, ‘विवेकवाद्याचा खून’, अशी वेगवेगळी मथळा दिलेली ब्रेकिंग न्यूज वेगवेगळ्या मराठी-इंग्रजी चॅनेल्सवर दाखविली जात होती. संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. विविध लिबरल्स, विचारवंत आपला निषेध नोंदवीत होते. ही हत्या म्हणजे नेहमीच्या हत्येसारखी नव्हती. दाभोलकर जे पुरोगामी विचार मांडतात, ते सहन न होऊन काही धर्मांधांनी केलेली ती हत्या होती. व्यक्तीला संपविले म्हणजे त्याचे विचारही संपतील, अशा विचारातून ती हत्या केली गेली होती. बघता-बघता संपूर्ण भारतात या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात अशा विवेकवाद्याची दिवसाढवळ्या हत्या होणे, ही शरमेची बाब होती. ज्या व्यक्तीला आपण इतक्या जवळून पाहिले होते व ज्या व्यक्तीने आपल्याला त्यांच्या विचाराने प्रभावित केले होते, त्यांचा असा करुण अंत व्हावा याचे मला वाईट वाटले.

ज्यांनी हत्या केली, त्यांना वाटले असेल- दाभोलकर संपले. पण त्यांना कदाचित तेव्हा हे माहीत नसावं की, त्यांनी केलेल्या हत्येमुळे दाभोलकरांचे विचार अधिकच वेग पकडणार होते... वसईत ते फक्त एक तासाच्या कार्यक्रमासाठी आठ-नऊ तास प्रवास करून आले होते, पण ते श्रम काही वाया जाणार नव्हते.

Tags: मंच डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस विवेकमंच डॉ. नरेंद्र दाभोलकर Narendra Dabholkar vivekmanch manch Daniel Mascarenhas weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात