डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सदा डुम्बरे : ‘कोल्हापूर सकाळ’पासून पाहिलेले

सदा डुम्बरे यांच्या मृत्यूचं वृत्त अत्यंत धक्कादायक होतं आणि अंतिम प्रवास तर खूपच वेदनादायी ठरला. नाशिकला क्रिडाईच्या एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी ते गेले होते. नगररचना विषयावरचं त्यांचं तिथलं भाषणही खूपच चांगलं झालं होतं. त्यासंदर्भात ते अतिशय उत्साहानं बोलले होते.  पण, नंतर चारच दिवसांनी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आल्याचं समजलं आणि तिथंच त्यांनी अंतिम श्वास घेतला. पत्रकारितेतील एका व्यासंगी व संपन्न व्यक्तिमत्वाचा कोरोना विषाणूनं बळी घेतला. ‘साहेब’, ‘मित्र’ आणि ‘कौटुंबिक स्नेही’ म्हणून मला त्यांच्याबरोबर चार दशकांचा काळ व्यतित करता आला. या प्रदीर्घ सहवासातील त्यांच्या संबंधीच्या असंख्य आठवणी. अविस्मरणीय अशा सदासर्वदा. त्या ताज्या व टवटवीतच राहतील. मन:पटलावर कोरलेल्या त्यांच्या सदाबहार, प्रसन्न व्यक्तिमत्वाप्रमाणे...

‘सकाळ’ पुणेची कोल्हापूर आवृत्ती 1 ऑगस्ट 1980 ला सुरू झाली. तत्पूर्वी साधारण पंधरवडाभर आधी सदा डुम्बरे संपादक म्हणून रूजू झाले. आवृत्तीची चर्चा सुरू झाल्यापासून संपादक म्हणून कोण येणार, याविषयी वेगवेगळी नावं चर्चेत होती. डुम्बरेचं नाव अनपेक्षितपणे पुढं आलं. कारण सकाळमध्ये त्यावेळी अनेक ज्येष्ठ पत्रकार होते. डुम्बरे त्यामानानं अनुभवानं कमी होते. खुद्द त्यांनाही ते कोल्हापूर आवृत्तीचे संपादक म्हणून निवडले जातील, असं वाटलं नव्हतं. आणि त्यावेळी तरी पुणं सोडण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पुणे जिल्ह्यात ते वाढलेले आणि पुण्यातच शिकलेले होते. पुण्याचं सांस्कृतिक, शैक्षणिक पर्यावरण त्यांना आवडत असे. साहजिकच पुणं सोडून कोल्हापूरसारख्या आडबाजूच्या शहरात यायला ते फारसे उत्सुक नव्हते. पण, बहुधा संपादक श्री. ग. मुणगेकर यांच्या शब्दांखातर ते यायला तयार झाले असावेत. कोल्हापुरात आल्यानंतरही  त्यांची पुण्याची ओढ यत्किंचितही कमी झालेली नव्हती. दर महिन्याला ते एक दोन दिवसांसाठी पुण्याला जात असत. पुण्यात  विविध क्षेत्रात चालणाऱ्या घडामोडींच्या तुलनेत कोल्हापुरात फार मोठ्या प्रमाणावर असं काही घडत नसे. एकंदर अवकाश खूपच कमी. पुण्यात त्यांचा विविध संस्थांशी, त्यांच्या उपक्रमांशी निकट संबंध होता. मित्रपरिवारही मोठा होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात त्यांना पोकळी जाणवणं साहजिक होतं. त्यांचा स्वभावही काहीसा ‘रिझर्व्ह’ असा. अघळपणा वा कुठंही सहज मिसळण्याची त्यांची वृत्ती नव्हती. ते मितभाषी आणि गंभीर प्रकृतीचे. निवडक मित्रमंडळीत, विद्वजनांत वावरण्यात त्यांना आनंद वाटत असे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना भेटण्यात, चर्चा करण्यात त्यांना अधिक रस असे. थोडक्यात, पुण्यातील त्यांच्या जडणघडणीला आणि वेगळ्या अभिरूचीला कोल्हापूरचं वातावरण फारसं मानवणारं नव्हतं. त्यामुळं कोल्हापुरात दीर्घकाळ वास्तव्य करण्याचा विचार त्यांनी सुरूवातीपासूनच केलेला नसावा. झालंही तसंच. वर्षभरातच त्यांना पुण्याला परतण्याचे वेध लागले. आणि सकाळ (कोल्हापूर)चा पहिला वर्धापनदिन झाल्यानंतर ते पुण्याला परत गेले.

सन 1980-81 मधील कोल्हापुरातील त्यांची ‘सकाळ’मधील कारकीर्द उण्यापुऱ्या एकच वर्षाची. कोल्हापुरात ते तसे नवखे होते आणि त्यांना ओळखणारेही फारच कमी लोक होते. पुण्यातील बहुसंख्य लोकांच्या मनात कोल्हापूरविषयी काही पूर्वग्रह आणि बरेच समज, गैरसमज असतात. डुम्बरेच्या मनातही तसे ते असावेत. पण, एक वर्षाच्या इथल्या वास्तव्यात या शहराविषयी आणि परिसरातील माणसांविषयी त्यांनी खूप काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. साहजिकच त्यांची आधीची मतं बऱ्याचअंशी बदलली असणार. त्यामुळंच कोल्हापूर-सांगलीला आलो की मला माहेरी आल्यासारखं वाटतं, असं ते नंतर म्हणत असत. 22 जानेवारी 2019 ला पुणे येथील पत्रकार भवनात त्यांच्या सत्तरीच्या निमित्तानं झालेल्या सत्काराला उत्तर देताना केलेल्या भाषणातही ते म्हणाले होते, ‘मी पुणेकर असलो तरी सांगली व कोल्हापूर मला खूप आवडतं. कोल्हापुरात मला राहायला जागा मिळाली. ती वि.स. खांडेकरांच्या बंगल्यात. खूप मित्र मिळाले. गो.मा. पवारांपासून प्रा. चंद्रशेखर जहागीरदार यांच्यापर्यंत आणि म. द. हातकणंगलेकर व मालतीबाई किर्लोस्कर यांच्यापर्यंत अनेकांशी स्नेह जुळला. या दोन्ही शहरांनी मला खूप प्रेम, जिव्हाळा आणि आपलेपणा दिला. माहेरी जावं तसं दरवर्षी सातारा, सांगली, कऱ्हाड आणि कोल्हापूरला मी जात राहिलो. विठ्ठलाचे भक्त दरवर्षी पंढरपूरची वारी करतात,.मी या शहरांची करतो. त्याच भक्तिभावाने.’ पण, हे त्यांचं नंतरचं मत होतं. तसा दक्षिण महाराष्ट्राचा सारा प्रदेश त्यांना वाचून, ऐकून माहीत होता. प्रसंगपरत्वे केलेल्या दौऱ्यांमुळे तो परिचीतही होता, पण, विविधांगाने तो समजून घेण्याचा, त्याच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी कोल्हापुरातील वास्तव्याच्या काळात केला. वसंतदादा पाटील यांच्यापासून ते श्रीपराव बोंद्रे, त्र्यं. सी. कारखानीस, सदाशिवराव मंडलिक यांच्यापर्यंत अनेक राजकीय नेते; माधवराव बागल, पी. बी. साळुंखे, एन. डी. पाटील, शांताराम गरूड, गोविंदराव पानसरे, पी. बी. पाटील यांच्यासारखे विचारवंत; व्ही. टी. पाटील, डी. वाय. पाटील, तात्यासाहेब कोरे, आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील, बापूसाहेब पाटील अशा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील विविध नेत्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कार्याविषयी माहिती घेण्याचा, त्यांची भूमिका समजून घेण्याचा डुम्बरेंनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला.

प्रायोगिकतेचं आकर्षण

वेगवेगळ्या क्षेत्रांत ज्यांनी प्रचंड काम उभं केलं आणि जनसामान्यांत महत्त्वाचं स्थान निर्माण केलं, त्यांना सर्वांगानं जाणून घेण्यात त्यांना मोठा रस होता. ज्यांच्याविषयी ऐकून वा वाचून माहिती असते, त्याहून खूप काही त्यांच्याशी भेटून-बोलून समजून घेता येतं, असं ते म्हणत. त्यामुळं अशा लोकांना भेटायला ते स्वत:हून जात असत. संपादकाने अशा बाबतील ‘स्टेटस’चा विचार न करता ‘फिल्ड’वर जाणं आवश्यक आहे, असं त्यांचं मत होतं. समाजात वेगवेगळ्या क्षेत्रांत चाललेल्या नवनव्या प्रयोगाविषयीही त्यांना औत्सुक्य असे. त्यामुळंच श्रीपाद दाभोलकरांनी घराच्या गच्चीवर केलेले शेतीचे प्रयोग असोत, आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी केलेली पॉली हाउसमध्ये केलेली गुलाबाची लागवड असो, किंवा तासगावच्या माळावर बहरलेली द्राक्ष बागायती असोत- प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहण्याला ते अग्रक्रम देत असत. प्राचार्य लीलाताई पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या प्रयोगाविषयी तर त्यांना खूपच आत्मीयता होती. सृजनानंद शिक्षण केंद्राची संकल्पना प्रत्यक्ष येण्याच्या कितीतरी आधीपासून- म्हणजे लीलाताई बीएड्‌ कॉलेजच्या प्राचार्य होत्या तेव्हापासून- डुम्बरे त्यांच्या नियोजित प्रयोगाच्या योजनेत सहभागी होते. (नंतरच्या काळातही ते त्यांना त्यांच्या प्रयोगात, लेखनात आणि पुस्तक प्रकाशनात सहकार्य करीत राहिले.) कोल्हापुरात असताना लीलाताई व बापूसाहेब पाटील यांचं निवासस्थान हे जणू त्यांचं हक्काचंच घर होतं. सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर हेही आणखी एक निकटचे मित्र. त्यांच्यामुळं त्यांचे बंधू प्रा. रमेश शिपूरकर आणि प्रा. सुभाष जोशी यांच्याशीही त्यांचा चांगला स्नेह जुळलेला होता. ही सारी मंडळी सामाजिक क्षेत्रांत, परिवर्तनाच्या चळवळीत काम करणारी आणि समविचारी म्हणूनही त्यांना जवळची वाटायची. त्यांच्यामुळं सीमाभागातही त्यांचा अनेकांशी संबंध आला, देवदासी प्रश्नापासून तंबाखू उत्पादकांच्या समस्यांपर्यंत अनेक गोष्टी त्यांना समजून घेता आल्या. कोल्हापूरचे प्रख्यात वास्तूशिल्पी शिरीष बेरी हेही डुम्बरेंचे आणखी एक खास मित्र. वास्तूरचना, पर्यावरण, नगररचना हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय. बेरींशी त्यांची या विषयानुषंगाने वारंवार चर्चा होत असे. वास्तूरचनेच्या बाबतीत बेरींनी ठिकठिकाणी केलेले प्रयोग पाहण्यातही त्यांना रस होता. त्यामुळं या भागातील त्यांच्या कितीतरी प्रकल्पांना त्यांनी भेटी दिल्या. (नंतरदेखील जेव्हा जेव्हा कोल्हापुरात येत, तेव्हा बेरींशी त्यांची भेट ठरलेली असे.) कोल्हापुरात असताना अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी, तसेच बाहेरून काही कार्यक्रमांच्या निमित्ताने येणाऱ्या साहित्यिक कलावंत, कलाकार आदींशी भेटी घडवून आणण्याचे काम त्यावेळी ‘सकाळ’मध्ये ग्रंथपाल म्हणून काम करणारे राम देशपांडे मोठ्या उत्साहाने करीत असत.

शिवाजी विद्यापीठ हे डुम्बरेंचं आणखी एक भेटीगाठीचं ठिकाण. ज्ञानाशी संबंधित सर्वच क्षेत्रांविषयी त्यांना आकर्षण आणि आस्था वाटत असे. ते स्वत: विज्ञान शाखेचे विद्यार्थी होते. पर्यावरण आणि वनस्पतीशास्त्र हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय होते. विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जोशी यांच्याशी त्यांचा दृढ परिचय होता. त्यांना ते अधूनमधून भेटत असत. पत्रकारिता आणि साहित्य हे तर त्यांच्या व्यासंग व अभ्यासाचे विषय. साहजिकच त्या विद्याशाखांशी त्यांचा नेहमीच संबंध येत असे. त्यावेळी इंग्रजी अधिविभाग प्रमुखपदी कार्यरत असलेले प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डॉ. शांतीनाथ तथा एस. के. देसाई व त्यांचे सहकारी डॉ. चंद्रशेखर जहागीरदार आणि मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. गो. मा. पवार यांच्याशी त्यांचे व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर स्नेहबंध जुळलेले होते. त्या विभागात व्याख्यानासाठी येणाऱ्यांत राज्यातील आणि देशातील अन्य ठिकाणच्याही अनेक नामवंत व्यक्तींचा समावेश असे. त्यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम काहीवेळा आयोजित केला जात असे. अशावेळी प्रमुख निमंत्रितांत डुम्बरेंचा आवर्जून समावेश होत असे. डॉ. भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. राम बापट, डॉ. यू. आर. अनंतमूर्ती अशा अनेकांशी त्यांनी मुक्तपणे गप्पागोष्टी केल्याचे आठवते. कितीतरी नामवंत साहित्यिक पत्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते तेव्हा ‘सकाळ’ कार्यालयास आवर्जून भेट देत असत. डुम्बरे यांचा त्यांच्याशी असणारा व्यक्तिगत स्नेह हेही त्यामागचे एक प्रमुख कारण असे.

वादळी पार्श्वभूमीवर प्रारंभ

डुम्बरेंचे कोल्हापुरातील आगमन एका वेगळ्याच पार्श्वभूमीवर झाले होते. त्यावेळी ‘सकाळ’ची आवृत्ती कोल्हापुरातून सुरू करण्यास काही स्थानिक घटकांनी विरोध केला होता. मोठ्या वृत्तपत्र समूहाचे ‘आक्रमण’ स्थानिक वृत्तपत्राच्या दृष्टीने मारक व हानीकारक ठरेल, असे काही लोकांना वाटत होते. स्थानिक अस्मितेला ते बाधक ठरेल, अशीही त्यांची भावना होती. या भूमिकेतून ‘पुणेरी’ वृत्तपत्राला सुरूवातीला  खूपच विरोध झाला. तथापि पुढे तो टिकला नाही. एकदाचे वृत्तपत्र सुरू झाले. पण, त्या लहानशा वादळी घटनेमुळे वृत्तपत्र व्यवसाय चर्चेत आला. एरवी कोल्हापूरच्या वृत्तपत्र क्षेत्रात तशी नीरव शांतता असायची. तीनचार स्थानिक वृत्तपत्रे निघत आणि पुण्या-मुंबईची काही वृत्तपत्रे टॅक्सीने येत. त्यांचा खपही जेमतेमच असे. व्यापक चर्चा व्हावी, असे या क्षेत्रात फारसे काही घडत नसे. खपाची स्पर्धा वगैरे तर लांबचीच गोष्ट होती. पण, सकाळच्या आगमनामुळे माहोल बदलला. स्थानिक पातळीवर वृत्तपत्र स्पर्धा सुरू झाली. एकंदर वृत्तपत्र व्यवसायातच चैतन्य निर्माण झाले. साहजिकच वृत्तपत्रातील कर्मचाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले. त्यातही पत्रकारांचा भाव चांगलाच वधारला. कुशल व अनुभवी मनुष्यबळाची किंमत वाढली. माणसांची ‘पळवापळवी’ सुरू झाली. गुणवत्ताधारक कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने ‘सकाळ’ हे एक आकर्षण बनलं. संपादकीय विभाग महत्त्वाचा असल्यामुळं ‘सकाळ’मध्ये कोणाची निवड होणार, हा औत्सुक्याचा विषय बनला. संपादकीय विभागाचं नेतृत्व करण्यासाठी डुम्बरेंची निवड झाल्यामुळं अन्य कुणी बुजुर्ग पत्रकार येतील, या अंदाजाला मात्र छेद गेला. एक-दोन अपवाद वगळता संपादकीय विभागात बहुअंशी सर्व तरुणांचीच निवड झाली. ‘पत्रकार हे अनुभवातूनच तयार होत असतात’, यावर त्यावेळी तरी बहुतेकांचं एकमत असे. वृत्तपत्र विद्या शिकून आलेले तरूण पत्रकार फारसे उपयोगाचे नसतात, असे तत्कालीन बहुअंशी संपादकांना वाटत असे. डुम्बरेंची भूमिका मात्र वेगळी होती. ते स्वत:लाही ‘रानडे स्कूल’चे आणि नंतर ‘सकाळ स्कूल’चे विद्यार्थी समजत असत. त्यामुळं पत्रकार हा विद्यार्थी असला पाहिजे आणि विद्यार्थी होण्याची तयारी तरूणच अधिक प्रमाणात दाखवू शकतो, असं ते म्हणत. साहजिकच नव्या दमाच्या उत्साही तरुणांनी पत्रकारितेत आलं पाहिजे, यावर त्यांचा भर असे. ‘सकाळ’मधील बऱ्याच सहकाऱ्यांची निवड त्यांनी त्या दृष्टिकोनातूनच केली असावी. संपादकीय विभागात प्रशिक्षणार्थी पत्रकारांचाच भरणा अधिक होता. बहुतेक सर्वांना ते एकेरी नावानेच संबोधत असत. दिवसभर कार्यालयात असताना ते कुणा ना कुणाला केबिनमध्ये बोलावून त्याच्याशी संवाद साधत असत. संपादकीय विभागातील प्रत्येक व्यक्ती आणि त्याचं काम ते समजून घेत. रोजच्या कामात चुका झाल्या असतील, तर समजावून सांगत.

‘सकाळ’ची साप्ताहिक बैठक सर्व संपादकीय सहकाऱ्यांना सक्तीची असे. या बैठकीस रात्रपाळीचा संपादक आणि शहरातील सर्व बातमीदारही उपस्थित असत. गत सप्ताहातील बऱ्यावाईट कामाची सविस्तर चर्चा या बैठकीत होत असे. चुकलेल्या महत्त्वाच्या बातम्यांची शहानिशा तर होत असेच. पण प्रसिद्ध झालेल्या मजकुराचेही विश्लेषण्‌ केले जात असे. चुकीचे मथळे, वापरलेले अयोग्य शब्द, सदोष वाक्यरचना, व्याकरणाच्या चुका, बातम्यांतील त्रुटी, त्यांचा अपुरेपणा वा अनावश्यक विस्तार, व्यक्तींच्या नावातील, त्यांना लावलेल्या पदनामातील चुका, छायाचित्रांचा अभाव किंवा वापरातील दोष वगैरे असंख्य गोष्टींची यावेळी  चर्चा होत असे. ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्याचं कौतुकही केलं जाई. या बैठकीत सर्वांना मोकळेपणानं चर्चा करण्याची मुभा असे. अपवादात्मक प्रसंग वगळता चर्चा फारच चांगली होत असे. जणू वृत्तपत्र प्रशिक्षणाचीच ही प्रक्रिया असे. त्यावेळी पुण्याहून कोल्हापूरला आलेले व ‘सकाळ’ची कार्यपद्धती माहीत असलेले किशोर कुलकर्णी, सोमनाथ पाटील व विजय साळुंखे या साप्ताहिक बैठकीतील चर्चेत आघाडीवर असत. शेवटी डुम्बरे मार्गदर्शन करीत. त्यांच्या बोलण्यात अनेक इंग्रजी आणि वृत्तपत्रीय पारिभाषिक शब्द वारंवार येत असत. शिवाय ‘हिंदू’, ‘हिंदुस्थान टाइम्स’, ‘लंडन टाइम्स’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ यांचे ते संदर्भ देत असत. आम्हाला हे सारंच नवं आणि वेगळं वाटे. कोल्हापूर जिल्हा आणि परिसर किंवा फार तर राज्यापुरता मर्यादित विचार करणाऱ्या आम्हा स्थानिक पत्रकारांना डुम्बरे जणू वेगळ्या, अनोख्या विश्वाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करीत.

सर्वोत्तमाचा ध्यास

‘कोल्हापुरात पत्रकारिता करणाऱ्यांना कशाला हवं आहे हे सारं?’ असं तेव्हा काही वेळेला वाटत असे. पण डुम्बरेंना मात्र सारं सर्वोत्तम हवं असे आणि ते सारं विशाल परिप्रेक्ष्यातून पाहण्याची त्यांना सवय होती. ती त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवत असे. सुमार गोष्टीचं ते कधीच समर्थन करीत नसत. ‘चलता हैं’ म्हणून किंवा ‘जुगाड’ करून वेळ मारून नेणं त्यांच्या तत्त्वात बसत नसे आणि त्यांना ते कदापि पसंत पडत नसे. ‘परफेक्शन’चे ते चाहते होते. त्यामुळंच बातमीची कॉपी स्वच्छ आणि नेमक्या व मोजक्या शब्दांतच हवी याकडं त्यांचा कटाक्ष असे. आणि लेख, अग्रलेख वा सदर लेखन आटोपशीर, स्पष्ट आणि ठोस तपशीलानिशीच हवं, असा ते आग्रह धरीत. त्यांचं स्वत:चं अक्षर अत्यंत सुरेख, रेखीव व देखणं होतं. आणि लिहिताना त्यांच्याकडून कागदावर कुठंही किंचितही खाडाखोड होत नसे. इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषावर त्यांचं प्रभुत्व होतं आणि त्यांची लेखनशैलीही आकर्षक होती. ते मोजकंच लिहीत, पण नेमकं आणि आशयसंपन्न असे. साप्ताहिक बैठकीत चांगल्या गोष्टीचं ते मनमोकळेपणानं कौतुक करीत आणि त्याबरोबरच उपयुक्त सूचनाही अगदी सहजपणे करीत. त्याचं सारं बोलणं म्हणजे एक प्रकारचं बौध्दिकच असे. प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रं व नियतकालिकं ते नियमीतपणे वाचत असत.

विविध विषयांतील त्यांचं ज्ञान अद्ययावत असे. त्यातील ताजे संदर्भ त्यांच्या बोलण्यात वारंवार येत असत. कोल्हापूरला ‘हिंदू’ व ‘हिंदुस्थान टाइम्स’चे अंक तेव्हा मिळत नसत. ते पुण्याहून मागवून घ्यायला त्यांनी सुरुवात केली. ‘टाइम’ व ‘इकॉनॉमिस्ट’सारख्या आंतरराष्ट्रीय इंग्रजी नियतकालिकांचे अंकही ग्रंथालयासाठी ते मागवीत आणि सर्व सहकाऱ्यांसाठी ते उपलब्ध करून देत. संपादकीय सहकाऱ्यांची बौध्दिक क्षमता वाढली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. त्यासाठी त्यांना हवे ते संदर्भग्रंथ, पुस्तके उपलब्ध करून देण्याची त्यांची तयारी असे. ‘सकाळ’ पुणेचे ग्रंथालय संपन्न होते. तेथून कितीतरी संदर्भग्रंथ, विविध लेखांची कात्रणे ते संदर्भासाठी घेत. अपुऱ्या वा वरवरच्या माहितीवर विसंबून काहीही लिहिणे टाळले पाहिजे, असं ते म्हणत. कॉलेजविश्वपासून शेतीपर्यंत वेगवेगळी सदरं सुरू करून सहकाऱ्यांना लिहितं ठेवण्यापासून ते त्यांना जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर विविध ठिकाणी महत्त्वाच्या घटनांचे वार्तांकन करण्यासाठी पाठवण्यापर्यंत त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. त्याचप्रमाणे वेगवेळे विषय निवडून त्यासंदर्भात माहिती व अभ्यासपूर्ण लेखन करण्यासाठीही त्यांना प्रोत्साहन दिलं.

थोडक्यात, संपादकीय विभागाला त्यांनी एखाद्या अभ्यासवर्गाचं स्वरूप दिलं. त्यामुळे प्रारंभीच्या काळात तरी ‘सकाळ’मध्ये एकप्रकारचं उत्साही वातावरण असे. पत्रकारांची एक चांगली टीम तयार करण्यात ते यशस्वी झाले. संपादकीय सहकाऱ्यांशी ते आपुलकीनं वागत असत. पण, गैर काही घडलं तर तीव्र संतापही व्यक्त करीत. पत्रकारांच्या स्वातंत्र्य व हक्कांसाठी व्यवस्थापनाशी संघर्ष करण्याची नेहमीच तयारी असे. त्यामुळे व्यवस्थापनाशी त्यांचे काही वेळा खटके उडत. संपादकीय विभागात ते जाहिरात विभागाला किंवा त्यांच्या बाजूंनी वकिली करणाऱ्या व्यवस्थापकांना कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू देत नसत. संपादकपद हे सर्वांत महत्त्वाचं आणि अंतिम अधिकाराचं, हे तत्त्वत: मानणाऱ्यापैकी ते होते आणि आपल्या कारकीर्दीत तरी ते स्वतंत्रपणे निर्णय घेत राहिले. पत्रकारांना द्यावयाचे जादा लेखनासाठीचे मानधन किंवा बाहेरील लेखकांचे मानधन याबाबतीत ते मुळीच तडजोड करीत नसत. त्यांच्या लेखी पत्रकार, लेखक, विचारवंत, कलाकार यांची प्रतिष्ठा निर्विवादपणे मोठी असे.

चळवळींविषयी आस्था

1980 मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री डॉ. बलराम जाखड यांचा कोल्हापूर दौरा झाला. त्यावेळी शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन असे बरेच कार्यक्रम जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्तानं डुम्बरेंनी एका कृषी पुरवणीचे नियोजन केले. ‘सकाळ’ची ती पुरवणी अतिशय दर्जेदार झाली आणि बहुचर्चित ठरली. कोल्हापुरात त्या काळात झालेले रिक्षाचालकांचे आंदोलन आणि त्यांनी महापालिकेला घातलेला घेराव हे प्रकरणही त्यावेळी राज्यभर गाजले. ‘सकाळ’ने त्या घटनेचे केलेले विस्तृत वार्तांकन हाही त्यावेळी व्यापक चर्चेचा विषय ठरला. 6 एप्रिल 1981 रोजी निपाणी येथे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलन तर राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण घटना म्हणून नोंदले गेले. शेतकऱ्यांच्या त्या ऐतिहासिक लढ्याचे डुम्बरे हे एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. ‘सकाळ’ने त्यावेळी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची बाजू घेतली आणि अप्रत्यक्षरित्या शेतकरी आंदोलनाला झुकते माप दिले. संपादक म्हणून त्यावेळी घेतलेल्या या भूमिकेचे डुम्बरेंनी नेहमीच समर्थन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे आणि शेतीविषयाचे ते जाणकार व अभ्यासक होते. शरद जोशींच्या तंबाखू आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी सीमाभागातील अनेक गावांचे दौरे करून शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतली होती. शरद जोशी यांच्याशी तर त्यांचे जवळिकीचे संबंध होतेच. पण, हमाल पंचायतीचे नेते डॉ. बाबा आढाव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉ.नरेंद्र दाभोलकर, देवदासींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असताना प्रा. विठ्ठल बन्ने, डॉ. आनंद वास्कर, डॉ. राजन गवस, भटक्या-विमुक्त संघटनेचे नेते लक्ष्मण माने, बाळकृष्ण रेणके, रामनाथ चव्हाण, व्यंकप्पा भोसले, डॉ. बाबासाहेब अकादमीचे किशोर बेडकिहाळ व दिनकर झिंब्रे, स्त्रीमुक्ती चळवळीतील विद्या बाळ, पुष्पा भावे, छाया दातार, आदिवासी क्षेत्रात काम करणारे दीनानाथ मनोहर, वाहरू सोनावणे, मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे हुसेन जमादार, दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ, राजा ढाले, अरूण कांबळे अशा अनेकांनी ‘सकाळ’ कोल्हापूरला त्यावेळी भेटी दिल्याचे आठवते.

पुरोगामी विचाराचे नेते आणि परिवर्तनाच्या चळवळी यांच्याशी डुम्बरेंचे नेहमीच आपुलकीचे नाते राहिले. पाणी पंचायतीचे विलासराव साळुंखे, सर्चचे डॉ. अभय बंग व राणी बंग आनंदवनचे डॉ. विकास आमटे व हेमलकसाचे डॉ. प्रकाश आमटे या विधायक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांशीही त्यांचा निकटचा संपर्क असे. त्यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार चाले आणि काहीवेळा भेटीही होत. त्यांचे काम प्रत्यक्ष पाहायलाही ते जाऊन आले होते. पर्यावरण, ग्रामीण विकास व रचनात्मक क्षेत्रांत स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्यांविषयी त्यांना विशेष आत्मियता वाटे. राजकीय नेते वा उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यांपेक्षा अशा कार्यकर्त्यांना भेटण्यात त्यांना अधिक आनंद वाटत असे. साहित्यिक व वैचारिक कार्यक्रमांच्या बाबतीतही दर्जा, सामाजिक मूल्ये, अभिरूची आदींचा विचार करून निवडक ठिकाणी जाणेच ते पसंत करीत. ते उत्तम वक्ते होते. पण, सवंग व गर्दीच्या सार्वजनिक कार्यक्रमांऐवजी विचारमंथनाला वाव असणाऱ्या मोजक्या समारंभांना वा चर्चा-परिसंवादांना ते अग्रक्रम देत असत. त्या काळात शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे आयोजित केलेल्या एका राष्ट्रीय चर्चासत्रास ते तीन दिवस पूर्णवेळ उपस्थित राहिल्याचे आठवते. डॉ. गो. मा. पवार यांनी आयोजित केलेल्या त्या चर्चासत्राचे बीजभाषण डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले होते. त्यांच्या त्या भाषणाने आणि त्यात सहभागी झालेल्या साहित्यिकांमुळे ते खूपच गाजले होते. त्या चर्चासत्राच्या निमित्ताने घडलेली एक कटू आठवण इथे मुद्दाम नमूद करावीशी वाटते. त्या चर्चासत्रासंबंधी समग्र आढावा घेणारा एक लेख मराठीतील एका ख्यातनाम समीक्षकांना ‘सकाळ’साठी लिहायला सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे त्यांनी तो लिहिलाही. पण, तो अत्यंत सुमार असल्याचे सांगून डुम्बरेंनी तो प्रसिद्धच केला नाही. त्यामुळे त्या समीक्षकाचा त्यांनी कायमचा रोष ओढवून घेतला. त्यामुळे अन्य कुणी संपादक असता तर कदाचित तो लेख छापून मोकळा झाला असता. पण डुम्बरेंनी ते केले नाही. लेखनाच्या बाबतीत दर्जाशी तडजोड करणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. त्यामुळे संपादकीय विभागात काम करणाऱ्यांना त्यांच्या ‘पसंती’चे नेहमीच एक प्रकारचे दडपण वाटत असे. मात्र लेखन आवडले की ते एकदम खूश होत आणि लिहिणाराही समाधानाचा सुस्कारा टाकत असे. संपादन व लेखनाच्या बाबतीत ते अत्यंत कठोर वागत. व्यक्ती कोण यापेक्षा त्याचं काम ते महत्त्वाचं समजत. त्यामुळं त्यांच्या निकषांना उतरणं ही कसोटी असे.

वृत्तपत्राच्या दैनंदिन कामकाजाच्या धबडग्यात लहानसहान चुका होतच असत. पण, काहीवेळा त्यांचे स्वरूप गंभीरही असे. तथापि, या चुकांची जबाबदारी सहकाऱ्यांवर टाकून नामानिराळे राहण्याऐवजी ते त्या स्वत:कडे घेत. एकदा कोल्हापूरच्या शिक्षणक्षेत्रातील एका ऋषीतुल्य व्यक्तीच्या निधनाची बातमी अंकात शेवटच्या पानावर व अगदीच त्रोटक स्वरूपात प्रसिद्ध झाली. आदल्या दिवशीच्या रात्रपाळीच्या संपादकाला त्यांच्याविषयी काहीच माहिती नव्हती. तो पुण्याहून आला असल्यामुळं त्याच्याकडून हे अनावधानाने घडलं होतं. पण, साप्ताहिक बैठकीत स्थानिक सहकाऱ्यांनी हा विषय जोरदारपणे उपस्थित  केला. शहरातूनही या बातमीच्या तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. डुम्बरेंनी हे प्रकरण शांतपणे हाताळलं आणि चुकीची भरपाई करण्याचाही प्रयत्न केला. प्रत्येक शहरांची, गावांची म्हणून काही आदरस्थानं असतात, त्यांच्या स्वतंत्र अस्मिता असतात. लोकांच्यात त्याबाबतच्या वेगळ्या भावना असतात तेव्हा पत्रकारांनी कसं काळजीपूर्वक जपून काम करायला हवं, याबाबत अनेक उदाहरणांनिशी डुम्बरेंनी नंतरच्या साप्ताहिक बैठकीत सहकाऱ्यांना प्रबोधित केलं. बैठकीत कधीही ते स्पर्धक दैनिकाबद्दल किंवा तेथील पत्रकारांविषयी टिकाटिप्पणी करीत नसत. स्वैर व सवंग प्रतिक्रिया तर कधीच व्यक्त करीत नसत. टीकासुद्धा ते अत्यंत जबाबदारीनं आणि रास्त व सौम्य शब्दांत करीत.

पत्रकारितेतील आदरस्थाने

मराठी पत्रकारितेसंबंधी बोलताना त्यांच्या तोंडून ‘सकाळ’ आणि डॉ. ना. भि. परूळेकर व श्री. ग. मुणगेकर (सर) ही नावे आपसूकपणे येत असत. प्रभाकर प्राध्ये यांचाही ते अनेकदा उल्लेख करीत असत. ही तिन्ही व्यक्तिमत्वे त्यांना आदरस्थानी होती. ‘सकाळ’मध्ये कसे व किती नवनवे प्रयोग करण्यात आले हे ते आवर्जून सांगत. या तिन्ही संपादकांकडे कशी वेगळी व व्यापक दृष्टी होती हेही प्रसंगपरत्वे निदर्शनास आणून देत. वास्तविक, डुम्बरे कोल्हापूरला आले तेव्हा ते तिशीतले होते. पण, खूपच अनुभवी वाटावेत, असं त्यांचं वक्तव्य असे. त्यांचं वाचन अफाट होतं. आणि व्यासंगही मोठा होता. त्यांच्या ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्वाचा अल्पावधीतच साऱ्यांवर प्रभाव पडत असे. तसे जेमतेम एक वर्षच ते कोल्हापुरात होते. कोल्हापूर त्यांना नवं होतं आणि प्रारंभी फारसं कुणी त्यांना ओळखत नव्हतं. पण तरीदेखील अल्पकाळातच त्यांनी ‘सकाळ’ रूजवला आणि त्याची वेगळी ओळख निर्माण करून दिली. ते स्वत: मात्र इथे रमले नाहीत. त्यांना आपल्या करिअरसाठी पुणे आणि ‘सकाळ’ पुणे हेच योग्य ठिकाण वाटलं असावं. कोल्हापुरात दीर्घकाळ संपादक म्हणून राहण्याचा त्यांनी आधीपासूनच विचार केला नसावा. ‘सकाळ’ कोल्हापूरला त्यांनी नेतृत्व दिलं. पण, त्यांचं नावही ‘प्रेसलाईन’मध्ये नव्हतं. गांधीनगरच्या त्यावेळच्या काहीशा ‘निर्जन’ परिसरात ते वावरले. ‘सकाळ’च्या पार्सल व्हॅनमधूनच ते कार्यालयात येत असत आणि कार्यक्षेत्रात सर्वत्र बसनेच प्रवास करीत असत. शहरात तर एखाद्याच्या स्कूटरवर मागे बसून वा रिक्षानेच फिरत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी वृत्तपत्राला दिशा देण्याचा आणि पत्रकारितेला विधायक वळण देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यांचे अनेक सहकारी नंतर विविध वृत्तपत्रांत संपादक वा अन्य पदावर चांगल्या प्रकारे कार्यरत राहिले.

वर्षभर संपादक म्हणून काम केल्यानंतर डुम्बरे पुण्यास गेले आणि रविवार सकाळचे काम पाहू लागले. नंतर ते साप्ताहिक सकाळचे संपादक झाले. वास्तविक, दैनिकाचे संपादक म्हणून ते सक्षमपणे काम करू शकले असते. पण, ते पद त्यांच्या वाट्याला येऊ शकले नाही. साप्ताहिक सकाळमुळे ते काहीसे वृत्तपत्रांच्या मुख्य प्रवाहांपासून बाजूला फेकले गेले. पण साप्ताहिक सकाळला त्यांनी वेगळी उंची व दर्जा मिळवून दिला आणि अनेक लेखक घडवले हे खरे. दैनिक वृत्तपत्रांचे विश्व आणि दैनिकाच्या संपादकाचे महत्त्व वेगळेच असते. पुरेसा अनुभव, प्रगल्भता व वैचारिक क्षमता असूनही दैनिकाचा संपादक होण्याचे भाग्य त्यांना लाभू शकले नाही. बहुधा संस्थेतील अंतर्गत राजकारणाचा ते बळी ठरले असावेत. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर व लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी यांच्याशी डुम्बरेंचा चांगला स्नेह होता आणि त्या दोघांनीही त्यांना आपल्या वृत्तपत्रात येण्याचा आग्रह केला होता. (70 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात केलेल्या भाषणात त्यांनीच हे नमूद केले होते.) पण काही कौटुंबिक कारणामुळे ते पुणे सोडू शकत नव्हते. परिणामी सकाळ संस्थेतच ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. तिथल्या प्रदूषित वातावरणातही त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले, हे खरे. पण, दैनिकाचा संपादक म्हणून त्यांचे वेगळे कार्यकर्तृत्व महाराष्ट्राला पाहायला मिळाले असते. तथापि, ती संधी त्यांना मिळू शकली नाही. तसा सकाळ संस्था हा नेहमीच त्यांचा ‘विक पॉइंट’ राहिला. या संस्थाप्रेमापोटी त्यांनी ‘सकाळ’मध्ये तब्बल 36 वर्षे पत्रकारिता केली. त्यातील प्रारंभीची दहा-बारा वर्षे सोडली तर दोन दशकांहून अधिक काळ साप्ताहिक सकाळचे संपादक म्हणूनच ते कार्यरत राहिले. तिथे त्यांची बरीच घुसमट झाली. पण, तरीदेखील वृत्तपत्रसृष्टीतले महत्त्वाचे पत्रकार म्हणून ते नावारूपाला आले व त्यांच्या नावाला वेगळे वलयही प्राप्त झाले. मात्र त्यांचा पिंड हा दैनिक वृत्तपत्राच्या संपादकाचाच होता. डॉ. परूळेकरांनी ‘सकाळ’ सामान्य माणसापर्यंत कसा पोहाचविला व त्यांच्या जीवनाचा तो कसा अविभाज्य बनला, हे डुम्बरे नेहमीच पोटतिडकीने सांगत असत. ‘सकाळ’ची जेव्हा एखाद दुसरीच आवृत्ती होती, तेव्हा ते हे बोलत असत. पुढील काळात या वृत्तपत्राच्या अनेक आवृत्त्या निघू लागल्या. पण, समाजाचा ‘आतला’ आवाज व समाजाच्या सद्दसद्विवेकाचा विश्वस्त असणारे किती संपादक या वृत्तपत्रांना लाभले? समूह संपादक म्हणून या वृत्तपत्रांची धुरा वाहण्यास डुम्बरे हे निश्चितच कार्यक्षम व सर्वस्वी सुयोग्य ठरले असते. तथापि, ही संधी नंतरच्या काळातही त्यांना कधीच का मिळू शकली नाही, हे समजले नाही. डुम्बरेनीही त्याबाबत कधी भाष्य केले नाही. दीर्घकाळ साप्ताहिकाच्या कामातच ते अडकून पडले. त्यांच्यामुळं साप्ताहिक सकाळचा दर्जेदार ‘ब्रँड’ झाला. पण दैनिकाचा संपादक म्हणून त्यांना जो लौकिक लाभला असता त्याचे मोल वेगळेच ठरले असते. ‘सकाळ’च्या दृष्टीनेही ते फलदायी ठरले असते. पत्रकार म्हणून डुम्बरेंची गुणवत्ता माहीत असणाऱ्या त्यांच्या मित्रांच्या व चाहत्यांच्या दृष्टीने ही नेहमीच खंतावणारी बाब बनून राहिली.

निवृत्तीनंतरची वाटचाल

डुम्बरे पुण्याला गेल्यानंतर त्यांचा सकाळ कोल्हापूरशी फारसा संबंध राहिला नाही. पुण्यातही दैनिकाच्या कामापासून ते दूरच असल्याने त्यांच्याशी बोलण्याचा कोल्हापूरच्या संपादकीय सहकाऱ्यांना फारसा कधी प्रश्न येत नसे. कोल्हापूरशी त्यांचे हे तुटलेपण तसे पुढे बराच काळ राहिले. गरजेपुरती कधीतरी संपादकीय  विभागाची ते मदत घेत असतील, तेवढीच. त्यामुळे दैनंदिन संपर्क, फोनवर चर्चा वगैरेचा प्रश्नच येत नसे. या भागातील त्यांचे येणेजाणेही तुलनेने कमी झाले. व्याख्याने व अन्य काही सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ते येत राहिले असतील, तेवढेच. साप्ताहिक सकाळची लोकप्रियता व त्यातील डुम्बरेंचे योगदान याविषयी कोल्हापूरच्या संपादकीय विभागात मात्र नेहमीच बोलणे होत असे. साप्ताहिक सकाळमधील ‘तुकाराम दर्शन’, ‘लोकमान्य ते महात्मा’, व ‘गर्जा जयजयकार’ या डॉ. सदानंद मोरे यांच्या सदरांची सर्वत्र व्यापकपणे व दीर्घकाळ चर्चा होत राहिली. पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाल्यानंतरही त्यांच्या लेखनाचा खूपच गाजावाजा झाला. साप्ताहिक सकाळच्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यात देशपातळीवरील अनेक नामवंत व्याख्याते दरवर्षी येत राहिले. यू. आर. अनंतूमर्ती. एम. टी. वासुदेवन नायर, पी.साईनाथ, दिलीप पाडगांवकर, योगेंद्र यादव, रामचंद्र गुहा, नानी पालखीवाला, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. राजा रामण्णा, अनिल अग्रवाल, वंदना शिवा, प्रमोद तलगेरी, डॉ.अभय बंग, जावेद अख्तर, राम गुहा आदी विविध क्षेत्रांतील दिग्गजांची नावे पाहिली की डुम्बरेंच्या कल्पकतेचे कौतुक वाटे. या साऱ्यांची व्याख्याने त्या त्या वेळी गाजली आणि लोकांना आवडलीही. त्या भाषणाचा ‘कर के देखो’ या नावाने नंतर प्रकाशित झालेला संग्रह हा जणू मौलिक संदर्भ ग्रंथ ठरला आहे.

 सकाळच्या सेवेत असताना आपण एक अक्षरही अन्यत्र लिहिलं नाही, असं डुम्बरे म्हणत असत. सकाळ व साप्ताहिक सकाळमध्येही त्यांनी मोजकंच लिहिलं. पण जे लिहिलं ते अत्यंत सकस असं. व्यासंग, अभ्यासूपणा आणि दूरदृष्टी यांचा प्रत्यय त्यांच्या लेखनात प्रकर्षाने येत राहतो.  ‘आरसपानी’, ‘प्रतिबिंब’, ‘दशकवेध’, ‘देणारं झाड’ आणि ‘सदासर्वदा’ ही त्यांची मोजकीच पुस्तकं. पण, त्यांचा वैचारिक आवाका आणि त्यांची लेखनक्षमता याचा अंदाज त्यावरून सहज बांधता येतो. शेती, नद्या, जंगलं, धरणं, पर्यावरण, प्रदूषण, शहर नियोजन, ग्रामीण व सामाजिक सुधारणा, आंतरराष्ट्रीय राजकारण, प्रबोधन, प्रसार माध्यमं हे त्यांचे आवडते विषय होते. अर्थात विषय कोणताही असो, सामान्य माणूस हा केंद्रबिंदू आणि व्यापक देशहित हा त्यामागचा अंतिम विचार असे. विचाराने ते नि:संशय पुरोगामी व ‘लेफ्ट टू द सेंटर’ भूमिका असणारे होते. ते उदारमतवादी होते आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या रानडे-आगरकरांच्या बुद्धीवादी परंपरेचे पाईक होते. पंडित नेहरू आणि यशवंराव चव्हाण यांच्या राजकीय भूमिका आणि वाटचालीबद्दल त्यांना आदर होता व त्यांचे ते कट्टर समर्थकही होते. साहित्य, कला, संस्कृती, राजकारण, समाजकारण व प्रसारमाध्यमे आदी क्षेत्रांचा त्यांचा म्हणून वेगळा विचार असे आणि त्या क्षेत्रांतील काही व्यक्तीविषयीची ठोस मतेही त्यांनी बनवलेली असत. त्यासंदर्भात बोलताना त्यांचा कधीच गोंधळ होत नसे. माहीत नसलेल्या गोष्टीबद्दल बोलणे किंवा मोघम शेरेबाजी करणे ते कटाक्षाने टाळत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्याचं पूर्णपणे ऐकून व समजून घेऊन मगच ते मतप्रदर्शन करीत. आपले विरोधक व टीकाकारांविषयी ते कधीच काही बोलत नसत. उमदं, उत्साही, मनमोकळं व सहृदयी असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. ते समजायला मात्र काही काळ जावा लागत असे.  कोल्हापुरात सुरवातीला आले तेव्हा ‘रिझर्व्ह’ वाटणारे डुम्बरे आम्हालाही तसे खूपच उशीरा कळले.

2008 ला साप्ताहिक सकाळमधून निवृत्त झाल्यानंतर डुम्बरेंचा सार्वजनिक क्षेत्रातील वावर वाढला. परिसर, मुक्तांगण, लोकविज्ञान, शं. वा. किर्लोस्कर प्रतिष्ठान, निरामय पब्लिक ट्रस्ट, प्रभाकर पाध्ये प्रतिष्ठान अशा काही संस्थांशी ते आधीपासून संबंधित होतेच. नंतर त्यांच्या कामासाठी ते अधिक वेळ देऊ लागले. अध्यापन त्यांना नेहमीच आवडत असे. रानडे इन्स्टिट्यूटमध्ये ते अतिथी प्राध्यापक म्हणून जात असत. नंतर तिथेही नियमीतपणे जात राहिले. भारतीय जैन संघटनेच्या शैक्षणिक कार्यातही काही काळ सहभागी झाले. पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ व अन्य काही समित्यांवरही काम करत राहिले.

व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे यांत अधिक प्रमाणात भाग घेऊ लागले. या सर्व घडामोडी व उपक्रमाबाबत ते नेहमीच सविस्तर बोलत असत. फर्ग्युसन टेकडीवर नियमीत फिरायला जाण्यापासून देशी-विदेशी इंग्रजी वृत्तपत्रांच्या वाचनापर्यंत त्यांचे दैनंदिन व्यवहार पूर्वीसारखेच सुरू राहिले. त्याविषयी अधून मधून ते प्रदीर्घ संवाद करीत. नवे काय वाचले, ते सांगत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवृत्तीनंतर त्यांचं फिरणं खूपच वाढलं. व्याख्यानांच्या निमित्तानं तर ते महाराष्ट्रात सर्वत्र दौरे करत राहिलेच. पण, निव्वळ पर्यटन म्हणूनही देश-विदेशातही फिरत राहिले. गेली सुमारे दोन दशके त्यांची ही भटकंती सुरूच होती. यातील अनेक दौऱ्यात आम्हालाही त्याची साथसंगत लाभली. त्यांच्या प्रेमळ सहवासाचा तर लाभ झालाच, पण असंख्य विषयांवर मनसोक्त गप्पागोष्टी करता आल्या. या काळात त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू पाहायला मिळाले आणि त्यांच्या वैचारिक उंचीचेही दर्शन घडले. गेल्या काही वर्षापासून त्यांच्या सांगली-कोल्हापूरच्या फेऱ्याही वाढल्या होत्या. पत्नी शुभांगीसह ते येत, तेव्हा सांगलीत प्रा. अविनाश सप्रे आणि कोल्हापुरात आमच्याकडे वास्तव्य करीत. नंतर राधानगरी, पन्हाळा किंवा अन्य एखाद्या पर्यटनस्थळी आम्ही जात असू. तेव्हा कुटुंबवत्सल, प्रेमळ व सहृदयी डुम्बरेंची वेगवेगळी रूपं पाहायला मिळत. अलीकडे कोरोनामुळं या उपक्रमात काहीसा खंड पडला होता. तथापि, आगामी काळातील पर्यटनाच्या बऱ्याच योजनांची आमची आखणी सुरू होती. देशांतर्गत तसंच विदेशातही अनेक ठिकाणी जायचं ठरलं होतं. लेखनाच्या बाबतीतही त्यांनी काही संकल्प केले होते. आणि मराठी वृत्तपत्रांच्या संदर्भात त्यांचं कामही सुरू होतं. त्याविषयी अधूनमधून ते चर्चा करीत असत. त्यांच्या अनपेक्षित जाण्यानं हे सारं आता कल्पनेतच राहिलं आहे. त्यांच्या मृत्यूचं वृत्त अत्यंत धक्कादायक होतं आणि अंतिम प्रवास तर खूपच वेदनादायी ठरला. नाशिकला क्रिडाईच्या एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी ते गेले होते. नगररचना विषयावरचं त्यांचं तिथलं भाषणही खूपच चांगलं झालं होतं. त्यासंदर्भात ते अतिशय उत्साहानं बोलले होते. पण, नंतर चारच दिवसांनी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आल्याचं समजलं आणि तिथंच त्यांनी अंतिम श्वास घेतला. पत्रकारितेतील एका व्यासंगी व संपन्न व्यक्तिमत्वाचा कोरोना विषाणूनं बळी घेतला. ‘साहेब’, ‘मित्र’ आणि ‘कौटुंबिक स्नेही’ म्हणून मला त्यांच्याबरोबर चार दशकांचा काळ व्यतित करता आला. या प्रदीर्घ सहवासातील त्यांच्या संबंधीच्या असंख्य आठवणी. अविस्मरणीय अशा सदासर्वदा. त्या ताज्या व टवटवीतच राहतील. मन:पटलावर कोरलेल्या त्यांच्या सदाबहार, प्रसन्न व्यक्तिमत्वाप्रमाणे...

Tags: पत्रकारिता कोल्हापूर सकाळ स्मृतीलेख श्रद्धांजली सदा डुम्बरे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके