डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नारायण कुळकर्णी कवठेकर यांचे 'हे माझ्या गवताच्या पात्या'

मौजेचं हे पुस्तक मी घरी घेऊन गेलो आणि वाचतच राहिलो. कवितेला असलेला शेतीमातीचा दरवळ, गावपांढरीतल्या शेणामुतात रापलेल्या प्रतिमा, अनुभवाला जिवंत करणारी गोळीबंद अभिव्यक्ती, कमावलेली रांगडी भाषा, व्यवस्थेची गचांडी धरणारा पवित्रा, थेट तर कधी उपरोधाने शोषणावर हल्ला करण्याचा स्वभाव... असं काय काय उजागर होऊ लागलं. एकूण या कवितेचं सामाजिक आणि राजकीय भान थक्क करणारं. मूल्यहीन जगण्यात त्रस्त असणारा कवितेतला ‘डरपोक’ माणूस मला माझ्यात दिसू लागला.   

‘मला प्रभावित करून गेलेलं पुस्तक’ कोणतं बरं- असा विचार करायला सुरुवात केल्याबरोबर अनेक पुस्तकं ‘मी पण... मी पण’ असं म्हणत पुढ्यात दिसू लागली. मोठाच पेच निर्माण झाला. पुस्तकं वाचून माणसं समजूतदार होतात. मग पुस्तकं समजूतदार असणारच. समजावल्यावर शांत झाली. जगण्यातली समजूत वाढवण्याऱ्या असंख्य पुस्तकांबद्दल मनोमन कृतज्ञता व्यक्त करून प्रभावित करणाऱ्या पुस्तकांबद्दल विचार करू लागलो. तरीही नेमकं कोणतं पुस्तक निवडावं, हा गोंधळ कायम होता. ठरवलं, आपल्या आवडत्या कविताप्रकारांत निवडावं. तर- मर्ढेकर, आरती प्रभू, विंदा, कोलटकर, चित्रे, नेमाडे, धामणस्कर, डहाके, ढसाळ... अशी रांग लागलेली. शेवटी ठरवलं, कवितेत सर्वप्रथम ज्या पुस्तकानं प्रभावित केलं, त्यावरच लिहू या. अर्थात, पुस्तकाचा पहिला प्रभाव सांगण्याआधी वाचनाबद्दलची पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे.

‘मी दुसरीत असताना रामायण वाचलं. चौथीत महाभारत वाचून संपवलं. आठवीत सोफोक्लिसचं इपिडस वाचलं. दहावीत तर सार्त्र, कामू, काफ्का वाचून संपवले होते;’ असं सांगता आलं असतं, तर मलाही आवडलं असतं. पण घडलं नेमकं याउलट, लहानपणी माझं वाचन शून्य होतं. कारण ज्या छोट्या गावात मी वाढलो, तिथं वाचनाचं वातावरणच नव्हतं. आजूबाजूला व्यंकटेश स्तोत्र, सत्यनारायण, संतोषीमाता, गणपती स्तोत्र, भागवत पुराण असं भक्तिभावे वाचलं नी ऐकलं जात होतं. नाही म्हणायला रेल्वे स्टेशनच्या बुक स्टॉलवर मिळणारी गुलशन नंदा टाईप  पॉकेट बुक्स काहींच्या हातात दिसायची. काहींच्या घरात ‘चांदोबा’ उगवलेला असे. बाकी आनंदीआनंद. वाचन ही जाणीवपूर्वक करण्याची क्रिया आहे, हेच ज्ञात नव्हतं. मुळात वाचनच कच्चं असल्यामुळं शाळेतल्या वर्गात सहावी-सातवीपर्यंत आमचं वाचन घेतलं जायचं. बाकी कानकापल्या कुत्र्यासारखं भटकणं, याशिवाय दुसरा काही उद्योगच नव्हता. चौथीपर्यंत तर मला शाळाच आवडत नव्हती. शेत-मळे, नदी-नाले-विहिरी, माळ भटकत राहायचं. चव्हाट्यावर गप्पा ऐकायच्या, रंगवायच्या. असं जगण्याचं खुलं पुस्तक हाती लागल्यामुळं छापील पुस्तकाकडे लक्षच गेलं नाही. घरात कापडात गुंडाळून ठेवलेल्या जीर्ण पोथ्या फक्त पूजनीय होत्या.

शाळा आवडत नसली, तरी अभ्यासक्रमातील मराठीचं पुस्तक मात्र प्राणप्रिय होतं. खरं तर छापील अक्षरं प्रथम तिथंच भेटली, मग इतर वर्गाचीही मराठीची पुस्तकं मिळवून वाचू लागलो. कविता, धडे आणि चित्रंही आवडू लागली. मोठ्या भावाने सोव्हिएत रशियन मासिकाची वार्षिक वर्गणी भरली होती. गुळगुळीत पानावर रंगीत चित्र असलेल्या या मासिकातील रशियन बालकथा वाचण्याचा नाद लागला. सहावीत असताना नववीच्या पुस्तकात शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’मधील नाट्यप्रवेश होता. स्वत:च्या मुलीच्या घरी चोर ठरलेले नटसम्राट गणपतराव बेलवलकर बेहद्द आवडले. न राहवून चक्क वि. वा. शिरवाडकरांना मी पत्र लिहिलं. सहावीतला मुलगा लिहिणार तरी काय? पण शाळेच्या पत्त्यावर चक्क शिरवाडकरांचं पत्रोत्तर आलं. हेडमास्तरांनी शिरवाडकरांचं पत्र सर्वांना दाखवून माझं कौतुक केलं. वाचनानं दिलेली ही पहिली शाब्बासकी. अक्षरं हाका मारू लागली. बालभारतीच्या पुस्तकातील छापील कवितांनी लळा लावला. ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’, ‘या बालांनो या रे या’, ‘माझ्या मामाची रंगीत गाडी हो’, ‘शिंगे रंगविली... बाशिंगे बांधिली’, ‘वारूळ वारूळ मुंग्यांचे वारूळ’, ‘घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात’, ‘खबरदार, जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या’, ‘फुलपाखरूऽ छान किती दिसते’, ‘मैं बंजारा, ले एक तारा’ अशा कितीतरी कविता पहिल्या भेटीतच आवडल्या. प्रयत्न न करता पाठ झाल्या. ‘चांदोबा’तील गोष्टींबरोबर चित्रंही आवडू लागली. ‘गुलबकावली’, ‘उडती सतरंजी’, ‘जादूचा दिवा’ अशी बारकुली पुस्तकं कधी कधी हाती लागली. पण खरं वाचन सुरू झालं अंबाजोगाईच्या साहित्य निकेतन ग्रंथालयात!

खूप अभ्यास करूनही बारावीला अपेक्षित मार्क्स पडले नाहीत. मेडिकलला नंबर लागणं शक्य नव्हतं. मनातून जनावरांचा डॉक्टर होण्याची इच्छा होती. नागपूरच्या व्हेटर्नरी कॉलेजला नंबर लागला, पण वेटिंगवर होता. आयुर्वेद महाविद्यालयाचा आठ दिवस विद्यार्थी होऊन बसण्याचा प्रयत्नही फोल ठरला. शेवटी अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात विज्ञान शाखेत पदवीला प्रवेश घेतला. गुणपत्रिकेत लखलखाट करता आला नाही, याचं शल्य मनात होतंच. आपण स्टेशनात पोचलो आणि आपल्यासमोरून रेल्वे निघून गेली, अशी स्वप्नं पडायची. खरं तर देवा-धर्माकडे वळण्याची किंवा टुकार धंद्याकडे झुकण्याची ही अवस्था असते. भाड्याची सायकल घेऊन मुकुंदराज, दासोपंत परिसरात भटकू लागलो. अशा वेळी मला एक जागा सापडली. मन:शांतीसाठी निवडलेल्या या जागेत मन रमू लागलं. हे ठिकाण म्हणजे साहित्य निकेतन गं्रथालय! अंबाजोगाईमध्ये भाजी मंडईत एका जुन्या इमारतीत हे ग्रंथालय होतं. (आजही भव्य इमारतीत चांगल्या पद्धतीनं हे ग्रंथालय सुरू आहे.) याच ग्रंथालयात मला प्रथम जी. ए. कुलकर्णी, आरती प्रभू, कुसुमाग्रज, आनंद यादव, एलकुंचवार, नेमाडे, विंदा, तेंडुलकर, दुर्गा भागवत, साने गुरुजी, बाबूराव बागुल, पु. शि. रेगे, सुर्वे, व्यंकटेश माडगूळकर, पाडगांवकर, शांताबाई, ग्रेस, मतकरी, दया पवार, ढसाळ, महानोर, बोराडे, अशी मांदियाळी भेटली. या माणसांनी धीर दिला. पुस्तकं मित्र झाली. वर्तमानपत्रांच्या पुरवणीत काहीबाही लिहू लागलो. छापूनही येत होतं. ग्रंथालयातही मुक्त संचाराला परवानगी होती. आतल्या अंधाऱ्या खोलीतली चांगली-चांगली पुस्तकं माझ्या हाती लागली. त्या वेळी वाचनालयाच्या काऊंटरवर उभं राहिलं तर- बाबा कदम, सुहास शिरवळकर, रमेश मंत्री, सुमती क्षेत्रमाडे, शिवाजी सावंत, रणजीत देसाई, व. पु. काळे अशी नावं अधिक कानांवर पडायची. त्यात माझं व. पु. काळेंच्या प्रेमात पडूनही झालं होतं. पण जी. ए., नेमाडे, तेंडुलकर, विंदा, एलकुंचवार, आरती प्रभू असे दिग्गज प्रभावी ठरत गेल्यामुळं वाचनाला वेगळं वळण लागलं.

कविता वाचायला तर खूप आवडायचं. अंधाऱ्या खोलीतून धूळ झटकून आरती प्रभूंना उजेडात आणून प्रथम पाहिलं तो क्षण- आहाहाऽऽ! बाळंतिणीच्या अंधाऱ्या खोलीत जन्मलेलं बाळ ओसरीतल्या उजेडात आणून पाहावं, तसा काहीसा प्रकार होता. या कविता वाचताना मनात काही तरी हलत होतं. दोन डोळे / दोन खाचा / प्रश्न कोठे आसवाचा/ बाप रे! हादरे बसायला लागले. अनेक उत्तमोत्तम पुस्तकं हाती लागली. त्यातच पॉप्युलर प्रकाशनाची एक मालिका हाती लागली. ‘नवे कवी, नव्या  कविता’ या मलिकेत प्रथम ना. धों. महानोर आणि ग्रेस भेटले. या दोन कवींचे हाती लागलेले कवितासंग्रह 1967 मध्ये आलेले- ‘रानातल्या कविता’ आणि ‘संध्याकाळच्या कवितां’नी गारूड केलं. दोघांचेही पहिलेच संग्रह. पद्मा सहस्रबुद्धे यांचं मोहक मुखपृष्ठ. मलपृष्ठावर रेखाचित्रातून (स्केच) उजागर होणारे शेतकरी कवी महानोर आणि डोळ्यांत उदासवाणी संध्याकाळ उतरलेला ग्रेसांचा घनव्याकूळ फोटो. आतल्या कविता वाचून-वाचून पाठ झाल्या. स्वत:च्या स्वतंत्र वाटेनं जाणारी ही कविता होती. पहिला कवितासंग्रह म्हणजे स्वत:ची वाट सापडलेल्या कविता- हे समीकरण या दोन संग्रहांनी पक्कं केलं. अधोरेखित केलं.

या सगळ्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे पुस्तकं शोधत होतो, चाळत होतो. एकदा पुस्तकांच्या रांगेत दडलेला अमृत मासिकाच्या आकाराचा (कटसाईज) कवितासंग्रह अचानक हाती लागला. संग्रहाचं आगळंवेगळं नाव ‘हे माझ्या गवताच्या पात्या’ आणि कवी होते नारायण कुळकर्णी-कवठेकर! पाहताक्षणी पुस्तक उचलून घेण्याचा मोह व्हावा, असं आकर्षक दृश्यरूप. लोभस आकार. कवी वसंत आबाजी डहाके यांचं साधंच पण अर्थपूर्ण मुखपृष्ठ. मुखपृष्ठावर डहाके सरांच्या कवितेत व्यापून राहिलेला काळा रंग, त्या काळ्या पार्श्वभूमीवर कॉन्ट्रास्ट केशरी रंगाचा खिडकीवजा चौकोन. त्या केशरी चौकोनात आभाळीच्या सूर्यगोलाकडे झेपावणारी गवताची पाती... असं सूचक रेखाचित्र पाहणाऱ्याला अधीर करतं. मौजेचं हे पुस्तक मी घरी घेऊन गेलो आणि वाचतच राहिलो. कवितेला असलेला शेतीमातीचा दरवळ, गावपांढरीतल्या शेणामुतात रापलेल्या प्रतिमा, अनुभवाला जिवंत करणारी गोळीबंद अभिव्यक्ती, कमावलेली रांगडी भाषा, व्यवस्थेची गचांडी धरणारा पवित्रा, थेट तर कधी उपरोधाने शोषणावर हल्ला करण्याचा स्वभाव... असं काय काय उजागर होऊ लागलं. एकूण या कवितेचं सामाजिक आणि राजकीय भान थक्क करणारं. मूल्यहीन जगण्यात त्रस्त असणारा कवितेतला ‘डरपोक’ माणूस मला माझ्यात दिसू लागला. इथे या कवितेशी आपण जोडले जातो.

‘दु:ख म्हणजे आठवण?

आषाढी एकादशीला मटनदारू झोकल्याची...

देवापुढच्या दिव्यावर सिग्रेट पेटवल्याची कच्च्या पोरीला उभ्या ज्वारीत कुस्करल्याची...’

या ओंगळ क्षणांना चिमटीत पकडायला मोठं धारिष्ट्य लागतं. भर चौकात स्वत:च स्वत:ला नागडं करून घ्यायला मोठी हिम्मत लागते. दु:खाची व्याख्या उलगडायच्या निमित्तानं अपराधी भावानं कबुलीजबाब देणारा ‘डरपोक’ माणूस आपला वाटतो.

स्वत:ला खोदत राहण्याचा कवीचा छंद कवितेला पारदर्शी करत जातो. घटनांचं काव्यात्मक रूपांतरण होताना अनुभवाची माती बेमालूम मळलेली असते. त्यामुळे कवितेतला अनुभव माझ्यासारख्याच्या मानगुटीवर बसतो. पहाटेची वाट पाहणाऱ्या कोंबड्यांचा बसलेला घसा, पायात पाय अडकल्यासारखे लुडकणारे शब्द, टाळूवरचे लोणीसुद्धा कमी पडू लागते तेव्हा होणारी ‘गरिबी हटाव’ची श्रीमंत घोषणा... (आजच्या काळात फक्त ‘गरिबी हटाव’च्या जागी ‘अच्छे दिन आयेंगे’ एवढाच काय तो बदल.) झाडानेच फळ खाल्ल्याची गोष्ट, चोवीस तास कैचीत मान अडकल्यासारखे धास्तीतले जगणे, विधवेच्या कपाळासारखा बदनाम सूर्य, तोडलेल्या संबंधासारखे  फारकत घेणारे थंडगार अश्रू, डोळ्यांत मिरचीची पूड जावी तशी भळभळणारी आईची पिचत मरण्याची आठवण, मुली म्हणजे चुलीचं खाद्य, सरकारी इमारतीच्या बांधकामासारखा ढासळत गेलेला बाप, मंत्र्याच्या मोटारजवळून भरलेलं ढुंगण अन्‌ इवलीशी नुन्नी उघडी टाकून बेदरकारपणे जाणारं कैकाड्याचं तीन वर्षांचं काळं कार्टं... कवितेत पेरलेल्या अशा अनेक अणकुचीदार दगडांना ठेचकाळण्याशिवाय पर्याय नसतो. आपल्याच गावातील एखाद्या फाटक्या पोरानं मस्तवाल व्यवस्थेच्या काचेरी तावदानावर दगड भिरकावल्याचं आत्मीय समाधान या कविता देत होत्या. या कवितेतलं भरलेलं ढुंगण अन्‌ इवलीशी नुन्नी उघडी टाकून मंत्र्याच्या कारजवळून बेदरकारपणे जाणारं काळं कार्टं पुन्हा एकदा ‘फँड्री’ चित्रपटात कॅमेऱ्यावर उद्वेगानं दगड भिरकावताना पडद्यावर दिसलं, तेव्हाही शहारून गेलो.

‘नियमितपणे चूळ भरल्यासारखे माणुसकी, समता, स्वातंत्र्य हे शब्द कोड फुटल्यागत पसरत जाताहेत कवठा खुर्दपासून बम्बई बुद्रुकपर्यंत.’

आपल्या चिमूटभर खुर्द गावाला महाकाय सत्ताकेंद्राशी जोडून केलेली मांडणी पाहता, कवठा हे एक वैयक्तिक गाव राहत नाही, तो ग्रामीण भारताचा प्रातिनिधिक संदर्भ ठरतो. या संग्रहातील बहुतांश कविता कवीच्या मूळ गावी म्हणजे कवठा या गावात लिहिल्या गेल्या आहेत. कवीचा भोवताल हे त्याचं भावविश्व असतं. त्यामुळे या कवितेतून अधोरेखित झालेली आशयसूत्रं शेतीमातीतली असली तरी रूढ अर्थानं भावुक नाहीत. सहलीला किंवा हुरडा पार्टीसाठी येणाऱ्या शहरी माणसांचा हिरव्या गालिच्यांचा प्रासंगिक आनंद बाजूला ठेवून नारायण कुळकर्णी-कवठेकर शेतीमातीतला वास्तव जाळभाज कवितेत केंद्रस्थानी आणतात. कवीचं सामाजिक व राजकीय भान कवितेला गळाकाढू रूप येऊ देत नाही. उलट, खऱ्या शत्रूकडे थेट अंगुलीनिर्देश करण्याची भूमिका घेते.

इथे या कवितांचं विश्लेषण करण्याचा माझा हेतू नाही. झाडाच्या पाडलेल्या आंबटढाण चिंचा डोळे मिचकावत खाताना मेंदूला करंट लागलेला असतो. जीभ वेडीपिशी झालेली असते. हा प्रभावित करणारा आरंभिक अनुभव आपल्याला पुन: पुन्हा चिंचेकडे घेऊन जातो. यात चिंचेत असणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वाचं पृथक्करण अनस्यूत नसतं. या कवितेत मेंदू आणि हृदयाचा मिलाफ आहे. ही कविता हृदयाला आकर्षित करते आणि मेंदूला खुराक देते. सामाजिक आशयाच्या नावाखाली सपाट, गद्यप्राय भाषा इथे नाही. अनुभवाला संवादी असणारी, नेणिवेतून आलेली भाषा या कवितेचा लळा लावते. चिरेबंदी बांधकामात प्रत्येक दगड घडवावा, तसा ओळीतला प्रत्येक शब्द तासून बसवलेला आहे. माझ्यासारख्या कविता लिहिणाऱ्याला हे भाषेचं आदर्श प्रारूप होतं. या कवितेचं अनुकरण मी कधीच केलं नाही. (अनुकरणातून लिहिलेल्या सुरुवातीच्या कविता मी फाडून टाकल्या. त्यात ग्रेस यांच्या कवितेचं अनुकरण अधिक होतं.) पण कविता ही अत्यंत गांभीर्यानं करायची कृती आहे, हा ‘गवताच्या पात्या’चा संदेश शिरोधार्य मानला.

एखाद्या भावलेल्या साहित्यकृतीच्या कर्त्याला वैयक्तिक रीत्या जाणून घेताना किंवा प्रत्यक्ष भेटल्यावर पश्चात्तापही होऊ शकतो. पण नारायण कुळकर्णी कवठेकर सरांसोबत कविसंमेलनांच्या निमित्ताने सहवास आला, कवितेतली तडफ व्यक्तिमत्त्वातही जाणवली. त्यांचं कविता सादरीकरण तर वाचिक अभिनयाचा वस्तुपाठ आहे. 1980 च्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी राजकीय व्यवस्थेला थेट जबाबदार धरताना या कवीने स्वत: गावपातळीवरच्या राजकारणात सहभाग नोंदवला आहे. कवठेकर सरांच्या तोंडून ‘नंदीबैल’ कविता ऐकताना आशय आणि अभिव्यक्तीचा प्रभाव आविष्कार आजही जाणवतो. साहित्यसंस्थांच्या राजकारणात न पडता, प्रकाशझोतापासून लांब राहून, व्रतस्थपणे मोजकेच पण मौलिक कवितालेखन (फक्त दोन कवितासंग्रह) करणारा हा कवी मला आजही महत्त्वाचा वाटतो. इथे दाबला गेलेला आवाज एक दिवस ‘ब्र’ उच्चारेल, हा आशावाद मला प्रभावित करतो.

Tags: पुस्तकदिन वाचन दासू वैद्य साहित्य मराठी कविता हे माझ्या गवताच्या पात्या नारायण कुळकर्णी कवठेकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दासू वैद्य,  औरंगाबाद
dasoovaidya@gmail.com

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक असलेले दासू वैद्य हे मराठीतील आघाडीचे कवी असून, त्यांनी ललित लेख, बालसाहित्य व गीतलेखन केले आहे.


Comments

 1. Chandrakant Bhaskarrao Kulkarni- 25 Apr 2021

  खूप सुंदर विवेचन. आमच्या सारख्या सामान्य वाचकांना कवितेकडे बघण्याची एक दृष्टी मिळते. धन्यवाद दासू सर.

  save

 1. BHAKTI SHIVAJI PTALEWAD- 25 Apr 2021

  या अप्रतिम लेखांबद्दल साधना व वैद्य सर या दोघाचे खुप खुप आभार

  save

 1. Swapna- 11 May 2021

  सर, आपला हा लेख वाचून तुमच्या वाचनाचा प्रवास, वाचनाची आवड वाचायला मिळाले. साधना मुळे आपला लेख वाचण्याचा आनंद मिळाला. खूप शुभेच्छा व आभार. स्वप्ना..

  save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके